मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ४

शतश्लोकी - श्लोक ४

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


आत्मा चिद्वित्सुखात्मानुभवपरिचितः सर्वदेहादियन्ता ।
सत्येवं मूढबुद्धिर्भजति ननु जनो नित्यदेहात्मबुद्धिम् ॥
बाह्येऽस्थिस्रायुमज्जापलरुधिरवसाचर्ममेदोयुगन्त-
र्विण्मूत्रश्र्लेष्मपूर्णं स्वपरवपुरहो संविदित्वापि भूयः ॥४॥

अन्वयार्थ- ‘चिद्वित्सुखात्मा आत्मा अनुभवपरिचितः (तथा)सर्वदेहदियंता-’ आत्मा सच्चिदानन्दरूप आहे व त्याचा अनुभवानें परिचयही झालेला आहे. तसाच, तो सर्व देहादिकांचा नियंता आहे. ‘ननु एवं सति (अपि) मूढबुद्धिः जनः अनित्यदेहात्मबुद्धिं भजति-’ पण खरोखर असें आहे तरी मूढबुद्धिजन अनित्य जो देह त्याचे ठिकाणीं आत्मबुद्धि ठेवितात. ‘अहो स्वपरवपुः बाह्ये अस्थिस्नायुमज्जापलरुधिरवसाचर्ममेदोयुक-’ अहो पण आपलें किंवा दुसर्‍याचें शरीर बाहेरून अस्थि, शिरा, मज्जा, मांस, रक्त, वसा, चर्म व भेद यांनी युक्त आहे ‘तथा अंतर् विण्मूत्रश्र्लेष्मपूर्ण-’ आणि आंत विष्ठा, मूत्र व श्र्लेष्मा यांनीं भरलेलें आहे; ‘(इति) संविदित्वापि भूयः (देहात्मबुद्धिं भजते इति महदाश्चर्य)-’ हें जाणूनही पुनः ते त्याच ठिकाणीं आत्मबुद्धि ठेवितात हें केवढें आश्चर्य आहे? [याप्रमाणें आचार्यांनीं पूर्वश्लोकांत नामनिर्देशानें दोन प्रकारची आत्मप्रतीति सांगितली. आतां पुढें ‘‘आत्मा चिद्वित्सुखात्मा’’ या श्लोकामध्यें तिचें पूर्वींपेक्षां अधिक स्पष्ट निरूपण करितात. परमात्म्याचें सच्चिदान्दरूप केवल उपनिषद्ववाक्यांवरूनच जाणतां येतें असें नाहीं तर आपल्या नेहमीच्या अनुभवानेंही तें परिचित झालेलें आहे. तो देह, इंद्रिय व प्राण यांचा चालक, भासक व नियमक आहे, तो देहाला क्रिया करण्याची शक्ति देतो म्हणून चिद्रूप, इंद्रियांच्या द्वारा विषयोपभोगे घेतो म्हणून ज्ञानरूप, व निद्रावस्थेमध्यें केवल आनंदाचाच अनुभव घेतो म्हणून आनंदरूप आहे; ह्याप्रमाणें तिन्ही अवस्थांमध्यें प्रत्येक प्राण्याला त्याचा अनुभव येतो. तथापि हा मूढ पुरुष ह्या अनित्य देहालाच आत्मा असें मानतो. पण तें अगदीं अयोग्य आहे. कारण बाह्यभागीं अस्थि, मांस, रक्त इत्यादिकांनीं व आंत विष्ठा-मूत्रादिकांनीं भरलेलें जें स्वतःचें किंवा दुसर्‍याचें शरीर तें अत्यंत अमंगल व निंद्य आहे असें जाणूनसुद्धां पुनः त्यालाच आत्मा समजून त्याची सुश्रुषा करणें हें केवढें आश्चर्य आहे! सारांश निंद्य शरीर व अत्यंत पवित्र आत्मा यांचें त्रिकालींही ऐक्य होणें शक्य नाहीं.] .


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP