मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक १

शतश्लोकी - श्लोक १

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


सान्वयार्था, महाराष्ट्रविवरणसमेता च ।
दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः ।
स्पर्शश्चेत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् ॥
न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये ।
स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वालौकिकोपि ॥१॥

अन्वयार्थ- ‘त्रिभुवनजठरे ज्ञानदातुः सद्रुरोः दृष्टान्तः नैव दृष्टः-’ या त्रिभुवनांत ज्ञानदात्या गुरूंना (शोभेल असा) दृष्टान्तच मिळत नाही. ‘तत्र स्पर्शः कल्प्यः चेत् (तथापि स न घटते)-’ त्यांना परिसाची उपमा जर दिली, (तर तीही योग्य होत नाहीं.) ‘अहो यत् (यद्यपि) सः अश्मसारं स्वर्णतां नयति तथापि स्पर्शत्वं न (नयति)-’ कारण अहो जरी परिस लोखंडाला स्वर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाहीं. ‘सद्रुरुः’ (तु) श्रितचरणयुगे स्वीयशिष्ये स्वीयं विधत्ते-’ (परंतु) सद्रुरु, चरणयुगुलाचा आश्रय करणार्‍या आपल्या शिष्याला स्वतःचें साम्य देतात. ‘तेन निरुपमः भवति-’ आणि त्यामुळेंच ते निरुपम आहेत. ‘अलौकिकोऽपि वा (दृष्टांतः न दृष्टः)-’ अथवा (त्यांना योग्य असा) प्रपंचातीत (अलौकिक) दृष्टान्तही मिळत नाहीं. (श्रीमज्जगद्रुरु परमपुज्य आचार्य प्रथमतः सद्रुरूंची योग्यता व माहात्म्य या पहिल्या श्लोकांत सांगतात. कारण ‘‘ज्याची देवाप्रमाणें गुरूंवर परम भक्ति असेल त्यालाच तत्त्वप्रकाश होतो ’’ अशी श्रुति आहे. ज्ञानदान करणार्‍या सद्रुरूंना शोभेल असा दृष्टान्त ह्या त्रिभुवना मध्यें कोठेंहि मिळत नाहीं. व्यावहारिक क्षुद्र विद्या शिकविणार्‍या गुरुंना योग्य असा दृष्टान्त कदाचित्‌ मिळूं शकेल, परंतु प्रत्यक्ष भगवानांनीं ‘‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’’ (ज्ञानासारखी पवित्र वस्तु या जगांत नाहीं) अशा प्रकारें ज्या ज्ञानाच्या पवित्रतेविषयीं थोरवी वर्णिली आहे, त्या ज्ञानाचें दान करणार्‍या सद्रुरूंना तर ह्या नाना चित्रविचित्र वस्तूंनीं भरलेल्या त्रिभुवनांत एकही दृष्टान्त आढळत नाहीं.आतां कदाचित् परिस लोखंडाला सुवर्णता देतो, म्हणून त्याचा दृष्टान्त देऊं म्हटलें, तर तोही योग्य होत नाहीं. कारण परिस लोखंडाला जरी सुवर्णत्व ह्मणजे पूर्व स्थितीपेक्षां उच्चत्व देतो, तरी आपलें परिसत्व देत नाहीं. ह्मणजे त्याला अनुग्राह्य (ज्याच्यावर अनुग्रह करावयाचा अशा) वस्तूला स्वतःसारखें करितां येत नाहीं. पण सद्रुरूंच्या चरणद्वयाचा आश्रय करून रहाणार्‍या शिष्याला सद्रुरु स्वसाम्य देतात; ह्मणजे ते शिष्याला आपल्याप्रमाणेंच धन्य करून  सोडितात; आणि म्हणूनच त्यांना नानाप्रकारच्या विचित्र वस्तूंनीं भरलेल्या ह्या देवादि तिन्हीं लोकांत योग्य अशी उपमा मिळत नाहीं. तसेंच, प्रपंचातीत असाही त्यांना योग्य दृष्टान्त मिळत नाहीं. कारण ते आत्मरूप झालेले असतात. भगवानांनींही ‘‘ज्ञानी त्वात्मैव मे मतम्’’ ज्ञानी तर माझा आत्माच आहे, असें सांगितलें आहे. सारांश सद्रुरूंच्या संगतीवांचून व ते प्रसन्न होऊन त्यांचा अनुग्रह झाल्यावांचून कोणाही साधकाला कृतार्थ होतां येत नाहीं. गुरूला शरण गेल्याशिवाय व शरण गेल्यानंतरही शिष्याचा अधिकार किती आहे याविषयीं त्यांचा निश्चय झाल्याशिवाय ते कधीही तत्त्वाचा उपदेश करीत नाहींत. पण त्यांनी एकदा तत्त्वोपदेश केला कीं, तो शिष्यही सद्रुरूंच्या योग्यतेचा होतो. तस्मात् गुरूपसदन (ह्मणजे गुरूंना शरण जाणें), गुरुसेवा व तद्वारा त्यांची प्रसन्नता हींच परमपुरुषार्थप्राप्तीचीं उत्कृष्ट साधनें आहेत.]

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP