मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक १६

शतश्लोकी - श्लोक १६

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


तिष्ठन् गेहे गृहशोऽप्यातिथिरिव निजं धाम गंतुं
चिकीर्षुर्गेहस्थंदुःखसौख्यं न भजति सहसा निर्ममत्वाभिमानः ॥
आयात्रायास्यतीदं जलदपटलवद्यातृ यास्यत्यवश्यं
देहाद्यं सर्वमेव प्रविदितविषयो यच्च तिष्ठत्ययत्नः॥१६॥

अन्वयार्थ- ‘गृहेशः गेहे तिष्ठन् अपि निजं धाम गंतुं चिकीर्षुः अतिथिः इव निर्ममत्वाभिमानः सन् गेहस्थं दुःखसौख्यं सहसा न भजति-’ गृहस्थ गृहांत रहात असूनही स्वग्रामाला जाण्याची इच्छा करणार्‍या एखाद्या अतिथीप्रमाणें अहंता व ममता यांनीं रहित असल्यामुळें गृहांतील सुखदुःखांनीं कधींही सुखी किंवा दुःखी होत नाहीं. ‘इह सर्व एव देहाद्यं जलदपटलवत् अवश्यं आयातृ आयास्यति यच्च यातृ (तत्) यास्यति (इति) प्रविदितविषयः अयत्नः सन् तिष्ठति-’ तर मेघपटलाप्रमाणें हें सर्वही देहादि विषयजात, जें अवश्य येणारें असेल तें येईल, व जें जाणारें असेल तें जाईल; ह्याप्रमाणें यथार्थज्ञानी होऊन कांहीही प्रयत्न न करितां घरीं राहतो. िआतां संन्यास करून गृहत्याग करणें जरी अत्यंत अवश्य आहे तरी शरीरादिकांच्या पारतंत्र्यामुळें संन्यास करावयास अशक्त असलेल्या विवेकी पुरुषाला गृहांत राहूनही मोक्षोपायाचें अनुष्ठान करितां येतें असें येथें आचार्य सांगतात. ज्याप्रमाणें आपल्या स्वतःच्या गांवाला जाण्याची इच्छा करणारा अतिथि मार्गामध्यें कांही काल विश्रांति घेण्याकरितां एखाद्या गृहामध्यें उतरला असतां तेथील सुखदुःखांनीं सुखी किंवा दुःखी न होतां मी या ठिकाणाहून आज किंवा उद्यां अवश्य जाणार आहें असा निश्चय करून असतो; त्याप्रमाणें एखादा गृहस्थ घरांत राहून सुद्धां सर्व विषयांविषयीं अहंता व ममता सोडल्यानें संसारविषयक कोणत्याही सुखदुःखांनीं सुखी किंवा दुःखी होत नाहीं. तर मग विषयांची प्राप्ती झाली असतां किंवा त्यांचा नाश झाला असतां तो उदासीन कसा रहातो, हें पुढील श्लोकार्धोत सांगितलें आहे. ज्याप्रमाणें मेघसमूह यदृच्छेनें उत्पन्न होतो व लय पावतो, त्याप्रमाणें देहादि सर्वही विषयजात जें अवश्य येणारें असेल तें येईल व जाणारें असेल तें जाईल असें जाणतो; व अशा अन्वयव्यतिरेकानें ज्याला सर्व विषयांचें ज्ञान झाले आहे, तो विद्वान् पुरुष, सुखप्राप्तीकरितां किंवा दुःखपरिहारकरितां कांहींच यत्न न करितां घरांत रहातो. सारांश स्वतःच्या देहाविषयीं अभिमान व तत्प्रयुक्त ममता सोडून जरी एखादा विद्वान् पुरुष शरीरादिकांच्या अशक्त तेमुळें संन्यासाश्रमाचा आश्रय न करितां घरांत राहिला तरी तो मोक्षामार्गापासून च्युत होत नाहीं]१६


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP