मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ७८

शतश्लोकी - श्लोक ७८

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


सन्धौ जाग्रत्सुषुप्त्योरनुभवविदिता स्वाप्न्यवस्था
द्वितीया तत्रात्मज्योतिरास्ते पुरुष इह समाकृष्य सर्वेंद्रियाणि ।
संवेश्य स्थूलदेहं समुचितशयने स्वीयभासान्तरात्मा
पश्यन्संस्काररूपानभिमतविषयान्याति कुत्रापि तद्वत् ॥७८॥

अन्वयार्थ-‘जाग्रत्सुप्त्योः संन्धौ (या) अनुभवविदिता स्वाप्नी अवस्था (सा) द्वितीया-’ जाग्रदवस्था व सुषुप्त्यवस्था यांच्या संधीत (मध्यें) जी सर्वांच्या अनुभवाला येणारी स्वप्नावस्था ती दुसरी होय. ‘तत्र इह सर्वेंद्रियाणि समाकृष्य पुरुषः आत्मज्योतिः आस्ते-’ त्या अवस्थेमध्यें स्वस्वरूपांत सर्वहि इंद्रियें ओढून घेऊन आत्मा स्वप्रकाशानें युक्त होऊन रहातो. ‘स्थूलदेहं समुचितशयने संवेश्य संस्काररूपान् अभिमतविषयान् स्वीयभासा पश्यन् अन्तरात्मा कुत्र अपि तद्वत् याति-’ ज्या शय्येवर तो निजलेला असतो तेथेंच स्थूल देह ठेवून संस्काररूप इष्ट विषयांना
स्वप्रकाशानें पाहणारा अंतरात्मा पाहिजे तेथें संस्काररूपानेंच जातो. मागील श्लोकांत सांगितलेला सिद्धान्त श्रुतिसंमत आहे, असें आतां येथें सांगतात- जाग्रदवस्थेचा अंत व निद्रावस्थेचा आरंभ यांच्यामध्यें असणारी व सर्वहि प्राण्यांच्या अनुभवाची अशी ही स्वप्नदशा दुसरी आहे. जाग्रत पहिली, स्वाप्नी दुसरी व सुषुप्ति तिसरी असा ह्या अवस्थांचा क्रम शास्त्रांत सांगितला आहे. त्या दुसर्‍या अवस्थेमध्यें स्वतःच्या स्वरूपांत सर्वहि सूक्ष्म इंद्रियांना लीन करून आत्मा आपल्या साक्षिरूपानें रहातो. विषयांचा भोग होण्याला इंद्रियांची आवश्यकता असते; पण या द्वितीय अवस्थेमध्यें सर्व इंद्रियें लीन होत असल्यामुळें हा अंतरात्मा स्वतःच्या ज्ञानरूपानेंच तेथें स्वाप्न विषयांचा भोग घेतो. ‘तर मग त्यावेळी स्थूल देहाची काय वाट होते?’ असें कोणी विचारतील म्हणून सांगतात; जाग्रत्-कालीं ज्या तल्पावर (अंथरुणावर) तो निद्रा घेण्याकरितां हातपाय पसरून पडतो तेथेंच त्या स्थूल देहाला तसाच टाकून स्वतःच्या ज्ञानसामर्थ्यानें संस्कारानुरूप स्वप्नदेह व इंद्रियसमूह उत्पन्न करून वाटेल त्या स्थळीं त्या संस्काररूपानेंच जाऊन व्यवहार करितो. सारांश त्या अवस्थेंत देह वस्तुतः उत्पन्न होत नाहीं; किवा तो संकल्पात्मकहि नाहीं; तर संस्कारद्वारा व आत्म्याच्या ज्ञानमाहात्म्यानेंच त्या अवस्थेचा प्राण्याला अनुभव येतो] ७८


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP