मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक २

शतश्लोकी - श्लोक २

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


यद्वछ्रीखंडवृक्षप्रसृतपरिमलेनाभितोऽन्येऽपि वृक्षाः ।
शश्वत्सौगंध्यभाजोऽप्यतनुतनुभृतां तापमुन्मूलयन्ति ॥
आचार्याल्लब्धबोधा अपि विधिवशतः सन्निधौ संस्थितानां ।
त्रेधा तापं च पापं सकरुणहृदयाः स्वोक्तिभिः क्षालयन्ति ॥२॥

अन्वयार्थ- ‘यद्वत श्रीखंडवृक्षप्रसृतपरिमलेन अभितः अन्ये अपि वृक्षा शश्वत् सौगंध्यभाजः (भवन्ति)-’ ज्याप्रमाणें चंदनवृक्षापासून पसरलेल्या परिमलानें जवळ असलेले दुसरेही वृक्ष निरंतर सुगंधयुक्त होतात; ‘(न केवलं सौगंध्यभाजः किंतु) अतनृतनुभृतां तापं अपि उन्मूलयन्ति.’ (इतकेंच नव्हे तर) पुष्कळ लोकांचा तापही नाहींसा करितात, ‘ (तद्वत्) आचार्यात् विधिवशतः लब्धबोधाः अपि सकरुणहृदयाः (संतः) स्वोक्तिभिः सन्निधौ संस्थितानाम् त्रेधा तापं च पापं क्षालयन्ति-’ व्याचप्रमाणें दैवयोगानें आचार्यांपासून ज्यांना ज्ञान प्राप्त झालें आहे असे पुरुषही दयार्द्र अंतःकरणानें युक्त होत्साते स्वतःच्या वाणीनें, आपला आश्रय करून राहाणार्‍यांचे त्रिविध ताप व त्रिविध पापें नाहींशीं करितात. (आतां ह्या दुसर्‍या श्लोकामध्यें, केवळ श्रीगुरूंच्या सांनिध्यानेंही शिष्य कृतार्थ होतो;) मग उपदेशानें होईलच हें काय सांगावें? असें चंदनाच्या दृष्टान्त देऊन आचार्य प्रतिपादन करितात-मलयगिरीवर सर्वच चंदनाचे वृक्ष नसतात. खरा चंदन कोठें एखादाच असतो. त्याच्यापासून सर्वतः पसरणार्‍या सुगंधानें आसपासचे दुसरे वृक्षही निरंतर सुगंधयुक्त होतात. केवळ ते सुगंधयुक्त होतात इतकेंच नव्हे, तर सर्व जातींच्या अनेक प्राण्यांचे तापही नाहींसे करितात. ह्मणजे मुख्य चंदनाच्या छायेनें, सुगंधानें व उटीनें ज्याप्रमाणें उष्ण दिवसांमध्यें प्राण्यांना आह्लाद वाटतो त्याचप्रमाणें सांनिध्यानें चंदनत्वास प्राप्त झालेल्या ह्या वृक्षांची छाया, उटी व सुगंध यांच्या योगानेंही सर्वांचे ताप नष्ट होतात. ह्या श्लोकांतील ‘‘अनतु’’ ह्या पदानें लोकांतील तारतम्य भाव घालविला आहे, ह्मणजे ते वृक्ष प्राण्यांच्या जाती, वर्ण इत्यादिकांकडे न पाहतां सर्वांचें सारखें समाधान करितात, त्याचप्रमाणें दैववशात् आचार्यांपासून ज्यांना उपदेश मिळाला आहे असे दयार्द्र अंतःकरणाचे सत्पुरुष, कांहीं कर्मधर्मसंयोगानें आपला आश्रय करून राहणार्‍या साधकांचें आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक असे तीन ताप, व कायिकवाचिक आणि मानसिक अशीं तीन प्रकारचीं पापें ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणें कर्म, उपासना किंवा ज्ञान यांचा उपदेश करणार्‍या स्वतःच्या वाणीनेंच नाहींशी करितात. ‘‘विधिवशतः’’ या पदानें सद्रुरूंपासून ज्ञानप्राप्ति होणें अत्यंत दुर्लभ आहे हें सुचविलें आहे.] २.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP