मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ८९

शतश्लोकी - श्लोक ८९

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


व्यापारं देहसंस्थः प्रतिवपुरखिलं पंचवृत्त्यात्मकोऽसौ
प्राणः सर्वेंद्रियाणामधिपतिरनिशं सत्तया निर्विवादम् ।
यस्येत्थं चिद्धनस्य स्फुटमिह कुरुते सोऽस्मि सर्वस्य
साक्षी प्राणस्य प्राण एषोऽप्याखिलतनुभृतां चक्षुषश्चक्षुरेषः ॥८९॥

अन्वयार्थ-
‘अनिशं यस्य चिद्धनस्य सत्तया इह पंचवृत्त्यात्मकः देहसंस्थ सर्वोन्द्रियाणां अधिपतिः असौ प्राणः इत्थं प्रतिवपुःनिर्विवादं अखिलं व्यापारं स्फुटं कुरुते’ सर्वदा ज्या चिद्रूप परमात्म्याच्या सत्तेनें या शरीरांत पांच वृत्तींनीं युक्त असणारा, देहात राहणारा व सर्व इंद्रियांचा अधिपति असा हा प्राण ह्याप्रमाणें प्रत्येक शरीरांत निःसंशय सर्व व्यापार स्पष्टपणें करितो; ‘स सर्वस्य साक्षी (अहं) अस्मि-’ तो सर्वसाक्षीच मी आहें. ‘अखिलतनुभृतां प्राणस्य प्राणः एषः चक्षुषः चक्षुः अपि एषः-’ सर्व देहधार्‍यांच्या प्राणांचा प्राण हाच व सर्वांच्या नेत्राचाहि नेत्र हाच आहे. ह्याप्रमाणें पूर्व श्लोकांत प्राणादिकांचें कर्म सांगून आता येथें सिर्ववृत्तिसमूह रूप जो मुख्य प्राण त्याला सत्ता व प्रकाश देऊन त्याचा साक्षी होणारा जो सच्चिदानंदरूप आत्मा त्याचें स्पष्टीकरण करण्याकरितां येथें लक्षण सांगतात- केवल चैतन्यरूप आत्म्याच्या सत्तेनें (अस्तित्वानें) सद्रूप व पूर्वोक्त प्राणनादि पांच वृत्तींनी वृत्तियुक्त होऊन हा मुख्यप्राणवायु या व्यष्टि व समष्टि देहांत रहातो.तो समष्टिरूपानें उपास्य व व्यष्टिरूपानें उपासक होतो. तोच समष्टि व व्यष्टि देहांतील इंद्रियाचा (ज्ञान-कर्मसाधनांचा) स्वामी आहे. कारण त्याच्या वांचून कोणत्याच इंद्रियाची प्रवृत्ति होत नाहीं. असा तो हा प्राण जीवरूपानें प्रत्येक शरीरामध्यें अगदीं स्पष्टपणें सर्व व्यवहार करितो. ह्याप्रमाणें सर्वांना सत्ता (अस्तित्व) व प्रकाश (ज्ञानशक्ति) देऊन त्यांच्याकडून व्यवहार करवीत असल्यामुळें तो सर्व कार्यांचें निमित्त व उपादान कारण आहे. त्यामुळेंच असा हा सर्वांचा साक्षी (प्रत्यक्ष प्रकाशक) जो आत्मा तोच मी आहें. ह्याविषयीं प्रमाणभूत श्रुतीच्या एकदेशाचा श्लोकांतच निर्देश करितात. हा प्रत्यगात्मा सर्व व्यापाराला कारण होणार्‍या वायूचेंहि कारण व तसेंच सर्वांच्या ज्ञानशक्तीचेंहि बीज आहे] ८९


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP