मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ९०

शतश्लोकी - श्लोक ९०

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


यं भातं चिद्धनैकं क्षितिजलपवनादित्यचन्द्रादयो ये
भासा तस्यैव चानु प्रविरलगतयो भांति तस्मिन्वसंति ।
विद्युत्पुंजोऽग्निसंधोऽप्युडुगणविततिर्भासयेत्किं परेशं
ज्योतिः शांतं ह्यनंतं कविमजममरं शाश्वतं जन्मशून्यम् ॥९०॥

अन्वयार्थ-‘ये प्रविरलगतयः क्षितिजलपवनादित्यचन्द्रादयः-’ जे स्वरूपतः अगदीं भिन्न असणारे पृथ्वी, जल वायु, सूर्य, चंद्र इत्यादि पदार्थ ‘ते यं चिद्धनैकं भातं सन्तं तस्य भासा एव च अनु
भांति च तस्मिन् वसन्ति’ ते ज्या चैतन्यपूर्ण, एक व प्रकाशरूप असणार्‍या आत्म्याच्या स्वप्रकाशामागून प्रकाशित होतात; व ज्याच्यामध्येंच रहातात; ‘तं शान्तं ज्योतिः अनंतं कविं अजं अमरं हि शाश्वतं जनमशून्यं परेशं-’ त्या शान्त, प्रकाशरूप, अंतरहित, सर्वज्ञ, जन्मरहित, अमर, म्हणूनच नित्य व जन्मशून्य अशा परमेश्वराला ‘विद्युत्पुंजः अग्निसंघः अपि उडुगणविततिः भासयेत्  किं-’ वीज, अग्निसमूह किंवा तारागण प्रकाशित करील काय? कधींहि नाहीं. ‘सर्व प्रकाशकत्व’ हें ब्रह्माचें लक्षण सांगून, स्थूणानिखनन- (खुंटा हालवून हालवून घट्ट करणें या) न्यायानें पुनः तेंच दृढ करून आतां ‘न तत्र सूर्यो भाते’ या प्रमाणभूत श्रुतीच्या आधारानें पुनः तेंच निश्चित करितात पृथ्व्यादि प्रत्येक तत्त्वानें स्वरूप भिन्न भिन्न असल्यामुळें त्यांचा अगदीं पृथक् रीतीनें व्यवहार होतो. तीं सर्व तत्त्वें जरी प्राण्याला प्रकाशरूप दिसतात तरी तो त्यांच्या अंगाचा प्रकाश नसतो. तर तीं सर्वहि सच्चिदानंदघन, दुसर्‍या प्रकाशाची अपेक्षा न धरितां स्वरूपानेंच प्रकाशित होणारा, एक व सर्वांना प्रकाश देऊन व्यवहारपटु करणारा जो परमात्मा त्याच्या प्रकाशानें प्रकाशित होतात, शिवाय तीं सर्व तत्त्वें त्याच्या सत्तेनेंच (अस्तित्वानेंच) सत्तावान् होतात; व आपापले व्यवहार करितात. सारांश सर्व जगाचें कारण, वासनाशून्य, नाशरहित, सर्व शास्त्राचें बीज असल्यामुळें सर्वज्ञ, नित्य अविकारी असल्यामुळें जन्मशून्य व मरणशून्य अशा त्या आत्म्याला लोकांना प्रकाशमय दिसणारा विजेचा गोळा, अग्नि, नक्षत्रमाला किंवा चंद्र-सूर्यादि तरी प्रकाशित करतील काय? छेः कधींच नाहीं. कारण सत्तारूप आत्म्यावांचून कधींच कोणाची स्थिति होणें संभवनीय नाहीं. शिवाय व्यवहारांत सुद्धां एक प्रकाश दुसर्‍या प्रकाशाला प्रकाशित करीत नाहीं, असाच अनुभव आहे.या श्लोकांत यास्कमुनिपठित ‘जायते, अस्ते’ इत्यादि म्ह० जन्म घेतो, जीवंत असतो, वाढतो, यौवनावस्थापन्न होतो, वृद्ध होतो व मरतो या सहा भावविक्रियांचा ‘अजे’ इत्यादि पदांनी निषेध केला आहे] ९०


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP