मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६३

शतश्लोकी - श्लोक ६३

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


वाद्यान्नादानुभूतिर्यदपि तदपि सा नूनमाघातगम्या
वाद्याघातध्वनीनां पृथगनुभवतः किंतु तत्साहचर्यात् ।
मायोपादानमेतत्सहचरितमिव ब्रह्मणा भाति तद्वत्तस्मिन्प्रत्यक्प्रतीते
न किमपि विषयीभावमाप्नोति यस्मात् ॥६३॥

अन्वयार्थ-‘यदपि वाद्यात् नादानुभूतिः तदपि नूनं सा आघातगम्या-’ जरी वाद्यापासून नाद निघतो असें वाटतें तरी तो खरोखर आघातामुळें निघत असतो. ‘वाद्याघातध्वनीनां अनुभवतः पृथक् किंतु तत् साहचर्यात् (अनुभूयते)-’ वाद्य, आघात व ध्वनि हीं वस्तुतः पृथक् असतात. परंतु, त्यांचा अनुभव मात्र एकदम येतो. ‘तद्वत् एतत् मायोपादानं ब्रह्मणा सहचरितं इव आभाति-’ तसेंच हं मायाद्रव्यानें तयार झालेलें जगत् ब्रह्मासहवर्तमान असल्यासारखें भासतें. (पण तें पृथक् आहे.) ‘यस्मात् तस्मिन् प्रत्यक्प्रतीते सति किमपि विषयीभावं न आप्नोति-’ कारण तें ब्रह्मच माझा आत्मा आहे असा प्रत्यय आला असतां त्या पुरुषाला कोणत्याच विषयाची भावना होत नाहीं. ह्या श्लोकांत सुद्धां आचार्य ब्रह्माच्या सर्वात्मकतेचेंच प्रतिपादन करितात-नगारा, नौबत इत्यादि वाद्यांवर काठीनें प्रहार केला असतां त्यांचा मोठा ध्वनि होतो. पण तो आघातावांचून कधींच होत नाहीं. पण वाद्य, प्रहार व ध्वनि हे तीन पदार्थ एकमेकांहून अगदीं निरनिराळे आहेत, असें सर्वांनाहि जरी ठाऊक असतें तरी वाद्याचा ध्वनि ऐकतांना हें कोणाच्या ध्यानांत येत नाहीं; तर आम्हांला वाद्य, प्रहार व ध्वनि यांचा एकाच कालीं प्रत्यय येतो. तसेंच मायाद्रव्यानें बनलेलें हें जगत् ब्रह्माबरोबर भासतें. ह्मे  ब्रह्म व जगत् हीं निरनिराळ्या धर्मांचीं व परस्पर विरुद्ध अशी दोन तत्त्वें, पृथक् न भासतां एकरूपानें भासतात. पण खरोखर पहातां ब्रह्म जगाहून अगदीं भिन्न आहे. कारण एकदा ‘चित्स्वरूप ब्रह्म मी आहें’ असा अनुभव आला कीं मग जगाचें भानच नाहींसें होतें व त्यामुळें मी विषयी आहें व जगांतील इतर पदार्थ माझे विषय आहेत असें कधींच वाअत् नाहीं. ‘यथा दुंदुभेर्हन्यमानस्ये इत्यादि प्रमाणभूत श्रुतींतील ध्वनीचा दृष्टान्तच येथें आचार्यांनीं दिला आहे. आघात या शब्दाचा अर्थ उपलक्षणेनें प्रहार, किंवा तोंडानें, फुंकणें असा करावा. कारण सनईसारख्या वाद्यांचा ध्वनि तोंडानें फुंकलें असतां होतो हें सर्वप्रसिद्ध आहे] ६३


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP