कथामृत - अध्याय अकरावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीशंकराय नमः । भवानि माते नमोस्तुते ॥१॥
गताध्यायीं वाचिले साचे । योगवैभव योगेश्वराचे । चिंतन करुनी मनीं त्यांचे । कथाश्रवणा सिद्ध व्हा ॥२॥
जनहितास्तव देह अनेक-। घेउनिं तयें रक्षिले लोक । पुरावे पहा ते प्रत्यक्ष । मिळतील पुढे वाचावया ॥३॥
दीपावलीसम आनंदात । योगेश्वरांच्या सहवासात । राजूरकरांचे दिवस जात-। होते अपूर्व सौख्यात ॥४॥
तदनंतर काय झाले । अवचित जाया यति निघाले । शोकसागरीं जन बुडाले । करिती सारे हाय हाय ॥५॥
गोकुळातुनिया मथुरेला । श्रीकृष्ण निघता जावयाला । दुःखसागरीं या समयाला-। नगर सारे बुडाले की ॥६॥
यती, श्रीकृष्ण गमती जनां । ते निघता होती अति यातना । लोटांगणे घालुएने त्यांना । अडवू पाहती नगरजन ॥७॥
शोकसागर उचंबळला । हे न पाहवे श्रींस डोळा । सांत्वन करिती तया वेळा । उपदेशुनी सर्वासा ॥८॥
एके ठायीं सदा वास । हे न मानवे मन्मनास । करणे सर्वत्र संचारास । जनकल्याण करावया ॥९॥
आम्ही आहोत संन्यासी । कदा न वसणे एक देशीं । जाणता तुम्ही सद‌धर्मासी । अधिक नलगे सांगाया ॥१०॥
शोक विवेके आवरावा । पुनश्च येऊ आम्ही गावा । जावया मार्ग मोकळा द्यावा । आम्हास जाणे अग्त्य हो ॥११॥
चंचलभारती नामाभिधान । प्राप्त तयां भक्तांकडून । राजूरचे जन सुजाण । उदंड भक्तीं स्वामींवरी ॥१२॥
जाणार कोठे तुम्ही स्वामी । ते न सांगतो कुणा आम्ही । स्वच्छंद फिरतो सदा भुवनीं । आम्ही स्वतंत्र संन्यासी ॥१३॥
सांगोनि ऐसे यती जाती । बोलता, बघता गुप्त होती। जाहली कुंठित सकल मती । मुग्ध जाहले सर्वजण ॥१४॥
यतिवर्य तेथुनी गेलियावरी । काही संवत्सरां उपरी । मदत जाहली बंद सारी । निजाम काहीच देईना ॥१५॥
लालभारती नी अनेक । राजुरीहुनी निघती लोक । धुंडाळिले स्थळ प्रत्येक । प्राप्त व्हावया यतिवर्य ॥१६॥
लहान मोठ्या राउळांत । डोकावुनी पाहती आंत । ऐसा स्वामी नसे येथ । पुजारी तेथील सांगती । १७॥
निराश होउनीए पुढे जाती । गावोगावी शोध घेती । आजानुबाहू दिव्य कांती । यतींद्र ऐसे पाहिले कां ॥१८॥
लोक सांगती शिष्यासी । वर्णना ऐसा तो तापसी । येथे न दिसला हो आम्हासी । आम्ही नसो भाग्यवान ।१९॥
शिष्य तुम्ही भाग्यवंत । धन्य देखिला असा संत । परंतु ऐसा दिव्य महंत । आसमंती कोणी नसे ॥२०॥
तीर्थक्षेत्रीं चला जाऊ । हिंडुनी तया तिथे पाहू । मिळताक्षणी घेउनी येउ । प्रार्थना करोनी स्वामींसी ॥२१॥
प्रातःकाली तीर्थास जाती । यती-बैरागी तिथे दिसती । नीट निरखुनी तयां बघती । परंतु स्वामी नसते कुठे ॥२२॥
दीर्घ टाकोनि सुस्कारा । वदती हरहर परमेश्वरा । अससी कोठे योगेश्वरा । हिंडुनी । शोधुनी श्रमलोकी ॥२३॥
दया आमुची कां न येई । हिंडतो जरी दिशा दाही । योगेश्वरा बा प्रसन्न होई । आम्हा दीनांसि सत्वरी ॥२४॥
ऐशी अस्वस्थ मनस्थिती । काही सुचेना तयांप्रती । स्वामि दर्शना व्याकूळ अती । धावा करिती अहर्निश ॥२५॥
देवा पावा यतीश्वरा । ब्रह्मांडनायका योगेश्वरा । वियोग यातना सर्वेश्वरा । असह्य होती आम्हासी ॥२६॥
तोंच वदले कोणीतरी । व्यर्थ शोधिता नगरोनगरी । लोक बोलती प्रज्ञापुरी-। नूतन यती आलासे ॥२७॥
कळता ऐशी तयां वार्ता । अधिर झाले दर्शनाकरिता । प्रज्ञापुरीचा पथ कोणता । सांगा, दाखवा आम्हासी ॥२८॥
नवे पांथस्त दिसता की । मार्ग येथले नच ठाउकी । तुम्ही न जावे एकाकी । मीही येतो आपुल्या सवे ॥२९॥
शिष्यगणासी धीर आला । सवे घेती मग तयाला । सर्व निघती प्रज्ञापुरीला । योगेश्वरांसी पहावया ॥३०॥
नाना तर्क मनीं करिती । भेटतील का निश्चित यती । असेल त्यांची कैसी स्थिती । आम्हासवे वदतील का ॥३१॥
विचारमग्न ते असता भले । प्रज्ञापुरीच्या नजिक आले । मार्गदशके तयां बोले । आलीच पहा प्रज्ञापुरी ॥३२॥
जीवनाविना मासोळी । करी जैसी ती तळमळी । दर्शनोत्कंठा अति वाढली । म्हणती चला अति वेगे ॥३३॥
हां हां म्हणतां वेशींत आले । तेथील लोकां तये पुसिले । अपूर्व योगी इथे आले-। असति काय या प्रज्ञापुरीं ॥३४॥
हांसुनी खो खो टवाळ लोक । वदती आहांत का बिनडोक । वडाखालती असे एक । पहा वेडापिसा कुणी ॥३५॥
दुर्लक्ष करिती मुर्खाकडे । जायास निघती वडाकडे । पाहती तेथे मोठे कडे । लोकांचे की तयां भवती ॥३६॥
लोकमताचा तो गलबला । प्रत्यक्ष त्यांनी आयकिला । कळला पाहिजे सकलांला । म्हणोनि येथे सांगतसे ॥३७॥
ग्रामस्थ वदती आपसांत । कोण असे हा साधुसंत । वदती कुनी कैचा महंत । वेडापिसा हा दिसतो कुणी ॥३८॥
टवाळी, कुचाळी कुणी करिती । लोक काही परीक्षा बघती । उमज पडेना । लोकांप्रती । साएरे दिङ्‌मूढ जाहले ॥३९॥
सान-मोठे स्त्रिया पुरुष । सांज-सकाळीं पाहती त्यांस । पुष्पे, फळे अर्पावयास । जवळी जाती प्रेमाने ॥४०॥
परंतु त्यांतले खाती न काही । वाटुनी टाकिती सर्व काही । पळारे पळा बघता काई । नातरी धोंडा बसेल हा ॥४१॥
बघता तयांचे उग्ररुप । पळती जन आपोआप । कांहीं वदती काय हा ताप । ग्रामस्थांसी होत असे ॥४२॥
त्यांतील काही भाग्यवान । धरिती तयांचे घट्ट चरण । तयापाठीं रट्टे घालुन । पिटाळिती त्यां माघारी ॥४३॥
कशास येता त्रास देता । तुमचा माझा संबंध नसता । चरण धरुनी मज याचिता । तुम्हा काय मी देणार ॥४४॥
मी न जातो घरीं दारीं । कुणाच्याही ओसरीवरी । सांगतसे मी परोपरी । परी वृथा हे जन छळिती ॥४५॥
जयांप्रती मिळाले रट्टे । रोग, दारिद्रय तयांचे हटे । भाग्यरेषा तयांची उमटे । अगाध महिमा स्वामींचा ॥४६॥
स्वामी जाती जिथे जिथे । लोक धावती त्यांमागुते । कृपा करावी हे श्रीपते । आम्हावरी की सत्वरी ॥४७॥
रुद्रावतार ते कधी घेती । पिटोनि लोकां गर्जना करिती । शिव्या देती दगड मारिती । परीक्षा पाहती भक्तांची ॥४८॥
उंच गोरी दिव्य मूर्ती । आजानुबाहू जनां दिसती । अत्यानंदी कधी असती । हांसती बोलती प्रेमाने ॥४९॥
मुलाबाळी गोजारिती । रुग्णां , वृद्धा प्रसाद देती । दुर्जन बघता अति कोपती । स्वभाव जना आकळेना ॥५०॥
विवित्र ऐशी बघुनी स्थिती । राजुरिचे भक्त चक्रावती । कस्तुरीचे मोल लोकांप्रती । कळे न हेची दुर्भाग्य ॥५१॥
इतुक्यामाजीं काय झाले । चोळाप्पा ते धावुनी आले  लोकांसि तेणे पिटाळिले । नेले स्वामींस स्वगृहीं ॥५२॥
राजूरचे जन भक्त फार । चोळाप्पाचे गाठिती घर । पाहता स्वामीस गादीवर । अत्यानंद जाहला त्यां ॥५३॥
लालभारती आदी जन । घालिती स्वामींस लोटांगण । उभे राहिले कर जोडुन । वाहती नेत्रीं प्रेमाश्रू ॥५४॥
शब्द मुखांतुनि उमटेना । उचंबळल्या अष्ट भावना । ह्रदयीं कवटाळिले चरणां । ऐसे भक्त विलक्षण ॥५५॥
ऐसे जाता काही क्षण । स्वामी वदती गोंजारुन । राजूरचेना तुम्ही जन । आम्ही तुम्हासि ओळखिले ॥५६॥
तुमचे कळले मनोगत । स्थानीं रहावे अति शांत । सफल होतील मनोरथ । शंका अंतरीं न धरावी ॥५७॥
चोळाप्पा होता सर्व बघत । त्यास म्हणती जगन्नाथ । जावे घेउनी मंडळी प्रत । प्रज्ञापुरीच्या नृपाकडे ॥५८॥
तदा चोळाप्पा उठे त्वरित । सेवेस ठेवुनी दुसर्‍या प्रत । काय गूढ हे नसे कळत । कशास धाडिती नृपाकडे ॥५९॥
श्रीसमर्था नमस्कारुन । जावया निघती भक्तजन । नृपासमोरी ते येउन । उभे राहिले अत्यादरे ॥६०॥
मालोजीराव भोसले नृप । दयाळू, न्यायी प्रख्यात खूप । बोलती भक्त त्यां मायबाप । कृपा करावी आम्हावरी ॥६१॥
काय असे आपुले काम । पाहिजे का आपणा दाम । यतिवर्याचे घेतसा नाम । त्यांनी तुम्हा धाडिले असे ॥६२॥
राजाचा हा प्रश्न कळता । हर्ष जाहला अत्यंत चित्ता । राजमुद्रांकित पुरावा पुरता । तये ठेविला नृपापुढे ॥६३॥
लोक आम्ही राजूरचे । गाव आहे निजामाचे । उत्पन्न सारे की मठाचे । जप्त केल यवनांनी ॥६४॥
मठाची असे कठिण स्थिती । होणार कैशी पुढली गती । असता श्रींची तिथे वसती । देत होते उत्पन्न ते ॥६५॥
महाकष्टे शोधिले श्रींना । अति नम्रत्वे विनविले त्यांना । जाणिल्या त्याना दुःखाभावना । यास्तव इकडे पाठविले ॥६६॥
नृपे करोनी अति विचार । उत्पन्न दिधले तयां थोर । मठा मंदिरांचा कैवार । घेतला पाहिजे आम्हासी ॥६७॥
सनदापत्रे करायासी । आज्ञा दिधली सेवकंसी । परमानंद जाहला त्यांसी । ऋणी आपुले राजेश्वर ॥६८॥
साह्य मिळता आनंदले । देवे करावे आपुले भले । कृतज्ञतेने तये नमिले । नृपवर्यासी पुनः पुन्हा ॥६९॥
विनयशील नी सत्वशील । राजे बोलती अति प्रेमळ । तुमचे आहे योग्य प्रवळ । यास्तव झाली स्वामीकृपा ॥७०॥
स्वामीकृपा जरि ना होती। आम्हास बुद्धी झालीच नसती । वर्षासन ते द्यावया प्रती । तुमच्या मठा कारणे ॥७१॥
विश्वेश्वर तो करता करविता । नृप मी असे निमित्ता पुरता । ऐसी जयांची समर्थ सत्ता । योगेश्वरा त्या वंदावे ॥७२॥
नृपाचे ऐकता मृदुभाषण । संतुष्ट भक्तगण । जाण्या अनुज्ञा असो म्हणुन । निघाले जाया स्वामींकडे ॥७३॥
“होगया क्या आपका काम । यहांसे जाके करो आराम । गरिब-गुरिबको देना दाम । तकलीफ किसीको देना नही" ॥७४॥
मधे हिंदी, मधे मराठी । बोलती सदा श्रीजगजेठी । आज्ञेप्रमाणे वागू मठीं । शपथ आपुल्या चरणांची ॥७५॥
धन्य आपण त्रैलोक्यनाथ । दर्शने आपुल्या हो सनाथ । स्वामींस घालुनी दंडवत । जाया निघती स्वग्रामीं ॥७६॥
नृपवर्याचे उपाध्याय । महशूर नाम ते गिरिराय । पुत्र त्यांचे रामकृष्णराय । धर्मपरायण अत्यंत ॥७७॥
गोपालकृष्ण नी पंढरिनाथ । अक्कलकोटीं होते रहात । वेदविद्येत पारंगत । रामकृष्णांचे बंधु द्वय ॥७८॥
मातामह ते शेषाद्रिनाथ । वृद्ध जर्जर अति अस्वस्थ । रुग्ण होउनी पडले स्वस्थ । चिंता लागली सर्वासी ॥७९॥
जिवाची तयांच्या घालमेल । बेशुद्धींत बोलती बोल । स्वामी स्वामी शब्द खोल । ऐकू येतसे अस्पष्ट ॥८०॥
इतुक्यामाजीं काय झाले । स्वामी समर्थ तिथे आले । उशापाशी स्वये बसले । पाहता स्तंभित सर्वही ॥८१॥
स्वामी न बोलती एक शब्द । सर्व मंडळी बैसली स्तब्ध । असेल जे काय प्रारब्ध । कळेल आता सर्वासी ॥८२॥
बैसुनी स्वामी काय करिती । जपमाळ भूमीस आपटती । मुखे काहिसे पुटपुटती । काय परंतु न कळे कुणा ॥८३॥
माळ भूमीस आपटती । माळ तुटुनी मणी गळती । कुडी सोडुनी प्राण जाती । स्वामी तयासी सोडविले ॥८४॥
शेषाद्रि महा पुण्यवान । अंतकाळी स्वये येउन । निज स्वर्शे करुनि पावन । सद्‌गती तयांसी दिधली की ॥८५॥
शेषाद्रि होते कर्मनिष्ठ । वेदविद्येत अति श्रेष्ठ । यज्ञ, दान, तप करुन इष्ट । महत्‌भाग्य ते मेळविले ॥८६॥
शेषाद्रींचे कलेवर । लोक घेउनी खांद्यावर । स्वामी निघाले बरोबर-। स्मर्शानी त्या पोचवाया ॥८७॥
भाग्यवान ते शेषाद्रिनाथ । अग्नि द्यायला यतींद्रनाथ-। चितेसन्निध उपस्थित । स्वये स्मशानीं असती की ॥८८॥
नृसिंहस्वामी दयाळू अती । भक्तास्तव ते कष्ट घेती । निस्पृहतेची अपूर्व रीती । पामरे मी वर्णू किती ॥८९॥
निजभक्तास्तव घेति धाव । जयाचा असे शुद्धभाव । प्रभुदर्शनी तीव्र हाव । ऐसा मानव प्रिय त्यांसी ॥९०॥
दाजी पिराजीराव भोसले । मुंबापुरीसी असती भले । निज उद्योगीं जरि गुंतले । स्वामींस स्मरती अहर्निश ॥९१॥
तयां लागे अति तळमळ । यतींचे पहाया चरणकमळ । उद्योगांतिल प्रश्न प्रबळ । संधि न सांपडे जावयासी ॥९२॥
यतिंद्र चरणी गुंतले मन । सुचेना काही तयां म्हणुन । पुसो लागले मित्र जन । अस्वस्थ मानसी का दिसतां ॥९३॥
प्रातःकालीं असे घडले । दाजी स्नानार्थ ते गेले । नामस्मरण मनीं चाले । स्वामी स्वामी अखंड ॥९४॥
धूतवस्त्रे नेसोनिया । गंध-पुष्पे घेवोनिया । देवपूजेस्तव जावया-। निघती दाजी सद्‌भक्त ॥९५॥
आंत करिता पदार्पण । दृश्य दिसले त्यां महान । समर्थ पाटावरी बसुन । सस्मित बघती दाजींकडे ॥९६॥
डोळियांवरी विश्वास न । राहती उभे ‘आ" वासुन । स्वामींस पाहता हरपे भान । दिङ्‌मूढ झाले सर्वस्वी ॥९७॥
तेधवा वदले श्रीसमर्थ । स्तंभीत होसी तूं किमर्थ । केवळ आलो रे तवार्थ । नित्य मजला पाचारिसी ॥९८॥
दाजी आले भानावर । मस्तक ठेविती चरणांवर । तुलसीमाला पुष्पहार । वाहती गंधाक्षता फुले ॥९९॥
अष्टगंध नी उंची अत्तर । केशरी टिळा निटिलावर । कस्तुरी उटणे शरीरावर । विलेपिले श्रीसमर्थाच्या ॥१००॥
केळी आंबे फळे रुचिर । दुग्धीं घाली शर्करा केशर । भक्त आग्रहे घेती यतिवर । प्रेम पाहुनी संतुष्टले ॥१०१॥
करु नको तूं व्यर्थ चिंता । सन्निध आहों आम्हा स्मरता ।  प्रचिती तुला दाविली आता । विश्वास ह्रदयीं पूर्ण धरी ॥१०२॥
सुखे करीरे व्यवहार । आमुचा अससी भक्त थोर । प्रेमळ भक्तांचा कैवार । सर्वदा आम्ही घेत असो ॥१०३॥
अष्टभाव ते उचंबळले । दाजी सद्‌गद तदा झाले । चरण श्रींचे ह्रदीं धरिले । नेत्रीं वाहती अश्रूंसरी ॥१०४॥
डोई पाठीवरी हात-। फिरवुनी स्वामी गोंजारित । बोलता जाहले अकस्मात । गुप्त तेथल्या तेथेची ॥१०५॥
गुप्त पावता गुरुमाउली । दाजी तदा अश्रू ढाळी । स्मरणमात्रे की प्रकटली । धन्य यतिवर्य कनवाळू ॥१०६॥
भावनवेग तो आवरुनी । पूजा नैवेद्य ते करुनी । आश्चर्यकारक भेट घडुनी-। संपूर्ण झाले समाधान ॥१०७॥
मन गुंतता नामस्मरणीं । चित्त ठेविता तयां चरणीं । आर्त भक्तांच्या उद्धरणी । उडी घालिती तात्काळ ॥१०८॥
परम दयाळू सद्‌गुरुमूर्ती । त्रैलोक्यांत जयांची कीर्ती । भक्त मनाची वाढो आर्ती । प्राप्त व्हाया सद्‌गुरु कृपा ॥१०९॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥११०॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP