कथामृत - अध्याय सहावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्रीसमर्थ चरणाभ्याम नमः । लक्ष्मीनृसिंह नमोस्तुते ॥१॥

षष्टाध्याय व्हावया सुरस । प्रार्थितो मी गुरुचरणांस । रात्रंदिन मनीं ध्यास । ग्रंथ संपूर्ण हा व्हावा ॥२॥

समर्थाचे स्तवन करितां । भस्म होती सर्व चिंता । प्रसन्नता ती मना येता । कार्य होईल सत्वर ॥३॥

करारे ते मन प्रसन्न । आत्मलाभा ते कारण । उपदेशिता तुकाराम । भक्तजनांच्या कल्याणा ॥४॥

रामदासही तेचि कथिती। भली , बुरी येवो स्थिती -। राम स्मरतां सदा चित्तीं । संरक्षितो भक्तांसी ॥५॥

संसारसागरीं अति वादळे । अशा समयीं भाव डळमळे । भक्ति करोनी फळ ना मिळे । विकल्प मनीं उठताती ॥६॥

उद्विग्न होतां मनःस्थिती । संतोपदेश आणुनी चित्तीं । सावरावी आपुली स्थिती । साधावया हित आपुले ॥७॥

भोग कोणासि चुकती ना । भोगल्याविणे सुटकाचि ना । मनें चिंतुनी गुरुचरणां । सन्मुख व्हावे प्रसंगासी ॥८॥

सफल व्हाया निजजीवन । करुया आता गुरुवर्णन । वाया न घालवू एक क्षण । कल्याण आपुले साधूया ॥९॥

गत अध्यायीं हो वाचिले । समर्थे जनां उपदेशिले । "नाम चिंतिता हित आगळे । होईल वदले सुनिश्चित ॥१०॥

ऐसे उपदेशुनी सकलां । वेगे निघाले पुढिल स्थला । भक्तवृंद तो अस्वस्थ झाला । स्वामींमागुनी धावती ॥११॥

धनुष्यापासुनी सुटता बाण -। जेविं वेगे करी गमन । तेवि स्वामी जात निघोन । पाहती जन आश्चर्ये ॥१२॥

जन वदती आपसांत । क्षणीं कैसे निघोनि जात । गुप्त जाहले की गगनांत । काहीच आम्हा कळेना ॥१३॥

दुःखमिश्रित मने जन । जावया निघाले परतोन । मुर्खे स्त्तविती पुरुषोत्तम । आत्मशांती मिळावया ॥१४॥

वायू गतीनें स्वामि आले । सानुल्या क्षेत्रीं तदा वसले । कृष्ण त्रिविक्रम् ‍ नांव कळले । काठेवाडांत ते असे ॥१५॥

श्रीकृष्ण मंदिर अति सुंदर । समिप तयाचे सरोवर । प्रफुल्ल कमळे मनोहर । नाम तयाचे नारायण ॥१६॥

प्रशांत सारा आसमंत । आनंदले समर्थ चित्त । स्नान करावे सरोवरांत । वाटता ऐसे जाती तिथे ॥१७॥

कौपीन कटीं , दुजे न वस्त्र । रुद्राक्ष माला कंठि असत । अति तेजस्वी , रत्नवत नेत्र । आजानु बाहू गौर मूर्ती ॥१८॥

मुखचंद्रमा परम विमल । मुखीं हास्य त अति प्रेमळ । स्वामींस बघतां लोक सकल । संत , सज्जन नमिती त्यां ॥१९॥

भोवती प्रेमे लोक जमले । अत्यादरे पद वंदिले । नाम आपुले पाहिजे कळले । आपुल्या मुर्खे सर्वासी ॥२०॥

ऐसे स्वरुप ना देखिले । बहुत साधू आले नि गेले । तेज आपुले अति आगळे । अम्हा गमतसा परब्रह्म ॥२१॥

चरण वंदनी होत घाई । कोणि ठेविती पदीं डोई । सेवा आपुली करु देई -। अम्हां पामरां जनार्दना ॥२२॥

स्वामीपदीची घेत माती । मस्तकी आपुल्या ती वाहती । कृपा करावी अम्हावरती । प्रार्थिती जन नम्रत्वे ॥२३॥

लोकभक्ती विलोकुनी । नाथ सद्‍गद जाहले मनीं । ईशसेवा नित्य करुनी । साधणे आपुले कल्याण ॥२४॥

आमुच्या संगे सरोवरांसी । येतसा कां स्नानासी । ऐशिया प्रातः समयासी । संधी पुन्हा ना येईल ॥२५॥

ऐसे ऐकता श्री वचन । हर्षोत्फुल्ल जाहले जन । परंतु त्यांतिल एकजण । स्वामींस वदे तात्काळ ॥२६॥

स्वामी आपुले वचनामृत । ऐकता होय संतुष्ट चित्त । पंडे येथले अति उन्मत्त । त्रस्त करिती यात्रिकां ॥२७॥

समर्थ वदले जाऊं । जे जे होईल ते ते पाहूं । उगिच अंतरीं नका भिऊ । आम्ही आहोत सांगाती ॥२८॥

ऐकतां जन आनंदले । स्वामींसवे स्नानां निघाले । सरोवराच्या समीप आले । जलीं लागले उतराया ॥२९॥

तोंचि पंडे तिथे आले । स्वामींस दरडावुनी वदले -। तयां मायावया सजले -। आणि बोलती अपशब्द ॥३०॥

अरे तूं अससी कोठचा कोण । आपणां समजसी तूं महान । ऐसे पाहिले तुज समान । आजपर्य्त कित्येक ॥३१॥

मोठा उन्मत्त दिसतोसी । भुलवुनी लोकां तूं जमविसी । धंदा तुझा या क्षेत्रासी । आम्ही न चालू देणार ॥३२॥

कौपिन नेसुनी , फासूनि रक्षा । वेधुनी घेसी जनांच्या लक्षा । परंतु ज्ञानी तूझियापेक्षा -। आम्ही आहोत येथे कीं ॥३३॥

थोर अससी जरि गारुडी । परतु उडवूं तव रेवडी। वागण्याची वाट वाकडी । सोड आपुल्या हितास्तव ॥३४॥

महा दक्षिणा दिधल्याविण। जासी कैसा कराया स्नान । आमुचे सरोवर नारायण । धनी आम्हीच कीं त्याचे ॥३५॥

अनुज्ञा आमुची प्रथम घ्यावी । दक्षिणा चोख ती मोजावी । मग स्नानार्थ सिद्धता व्हावी । ना तरि व्हावे चालते ॥३६॥

द्रव्य संपत्ती अपार । वाटेचि आम्हां परमेश्वर । द्रव्याविणे सर्व निःसार हाचि वेदांत आमुचा ॥३७॥

धनास्तवं या अहर्निश । आम्ही करितसो सायास । बुडवू पाहिजो दक्षिणेस । थारा तर्यासी ना इथे ।३८॥

चला काढा ती दक्षिणा । अन्यथा संधी न मिळे स्नाना । सोंगा ,ढोंगा फसतो न जाणा । इंगा दाखवूं समयासी ॥३९॥

समर्थ पाहती पुंडाई । दक्षिणेची तयां घाई । लाज लज्जा जयां नाही । पंडे उन्मत्त देखिले ॥४०॥

साधु संतासि नोळखती । बोलण्याची नसे रीती । श्वानापरी जे भूंकती । ऐसे पंडे अनुभविले ॥४१॥

ईश्वर दिधले सरोवर । तोचि तयाचा धनी थोर । स्नान कराया नारी -नर । भक्तिभावे येताती ॥४२॥

भक्तजनांसी कां नाडिता । द्रव्य सर्वदा अपेक्षिता । यात्रेकरुंसी कां पीडिता । साधाल तेणे हित कोणते ॥४३॥

अमाप ऐसे धन मिळविता । अनाथांचे शाप कां घेता । अधोगतीसी कारण होता । तुमचे तुम्हीच जाणा हे ॥४४॥

ऐशा उद्दंड वर्तनानें । सज्जनांची दुखविता मनें । धर्मतत्वे तुडविल्यानें । अधोगतीसी जाल तुम्ही ॥४५॥

ऐकता ही उपदेश वाणी । पंडे उठले चवताळुनी । पुरे करा ही बोधवाणी । आम्हासि नलगे उपदेश ॥४६॥

आमुची दक्षिणा असे अटळ । वृथा न करणे हो खळखळ । द्यावयासी नसले बळ । तरी येथूनी काळे करा ॥४७॥

क्रोधा -विरोधा यति हांसले । बोलणे ऐसे ना चांगले । सुमधुर वाचे जरी वदले । तरी समजते आम्हांसी ॥४८॥

पांडित्य आम्हा नको तुमचे । टाका पैसे दक्षिणेचे । धक्के मारुनी पाठवू साचे । आम्ही तुम्हास मागुती ॥४९॥

देतो दक्षिणा ही घ्या वदुनी । स्वामी उडाले उंच गगनीं । बाहुद्वय उभारोनी । या ,या म्हणती पुजार्‍यासी ॥५०॥

‘ आ ’ वासुनी पुजारी बघती। गाळण उडे भ्यायले अती । अरे बापरे कोण हा यती ॥ आमुच्या पित्याने देखिला ॥५१॥

तेव्हा उडाला अति गोंधळ । जिकडे तिकडे पळापळ। योगेश्वराचे पाहता बळ । नको दक्षिणा म्हणती ते ॥५२॥

गगनीं घालुनी सिद्धासन । तैसे उतरती जलीं म्हणुन । आश्चर्य पावले सकल जन । बघतां ध्यानस्थ जलावरी ॥५३॥

योगियांचे महायोगी । स्वामी निरिच्छ अति विरागी । जगदुद्धारास्तव ते जगीं । संचार करिती सर्वत्र ॥५४॥

मोह माया नसे स्वार्थ । जीवन कैसे करावे सार्थ । ईश्वरनिष्ठे विना व्यर्थ । निजाचरणे शिकविती ॥५५॥

चिरंतन सुखासी भुलावे । तत्प्रीत्यर्थ प्रयत्न व्हावे । द्रव्ह , दारा नच मानावे । परमोच्च सुख म्हणोनी ॥५६॥

निज बाळाची कराया वृद्धी । माता योजिते आपुली बुद्धी । निःस्वार्थता नी चित्तशुद्धी । ऐसे वागणे प्रत्येकी ॥५७॥

चमत्कारे लोक वळती । सांगता कांहीं ते ऐकती । येणे कारणे अपूर्व घडती । घटना जीवनीं सिद्धांच्या ॥५८॥

माय -बाप ते संतमहंत । कार्य तयांचे मानवी हित । परमानंद तयांना त्यांत । निरपेक्ष सर्वदा ते असती ॥५९॥

विषयकर्दमीं रुतले जन । कराया तयांचे उद्धरण । वारंवार ते अवतरुन । कार्य अविरत करिताती ॥६०॥

आश्चर्य , भीती अति आदर । विविध वृत्तिचा सभोवार -जनसंघ दाटला अनिवार । दृश्य विलक्षण पहायासी ॥६१॥

दृश्य देखता असामान्य । जन गर्जती धन्य , धन्य । शिवावतार हा , नसे अन्य । साष्टांग घालुनी त्यां नमिले ॥६२॥

देवा यावे , मागतो क्षमा । दया दाखवा अम्हा अधमा । प्रार्थना प्रभो हे शिवरामा -। मूढ आम्ही करित असो ॥६३॥

जनगणाची ही प्रार्थना । ऐकतां येई दया त्यांना । उभे राहिले जलतरणा । चालु लागले पाण्यावरी ॥६४॥

सुहास्य वदर्ने तीरावरी -। प्रकटता हर्षला लोक भारी । समर्थांच्या जयजयकारीं । धुंद जाहला आसमंत ॥६५॥

गर्दी जाहली लोटांगणा । घातली मिठी कुणी चरणां । अज्ञ जनांवरी करी करुणा । हीच प्रार्थना पद्कमली ॥६६॥

पुजारी कांपती ते थरथरा । अपराध आमुचे क्षमा करा । शरण येतसो योगेश्वरा । घालिती चरणीं लोटांगण ॥६७॥

लोक उधळिता बुक्का , फुले । सुगंध सर्वत्र तो दरवळे । पुडे सराया मार्ग न मिळे । ऐसा दाटला समुदाय ॥६८॥

जनमनाची बघुनि स्थिती । श्रींचे द्रवले ह्रदय अती । नेत्र तयांचे पाझरती । क्षणभर राहिले निःस्तब्ध ॥६९॥

बहुत घालिती पुष्पमाला । प्रेमसागर उचंबळला । अपूर्व देखती जन सोहळा । धन्य जाहलो सर्वस्वी ॥७०॥

चालतां स्वामी बोलती मंद । देवभक्तिचा धरा छंद । कृपा करिल श्रीगोविंद । विकल्प अंतरीं न धरावा ॥७१॥

कृष्ण मंदिरीं यती आले । जनां स्वामी कृष्ण गमले । जय गोविंद गर्जना चाले । नभ निनादे त्या नादे ॥७२॥

मंदिरीं जनां न दिसे कान्हा । स्वामी भासले तया स्थाना । जन वदती परस्परांना । स्वामी प्रत्यक्ष श्रीकृष्ण ॥७३॥

अत्यादरे समर्थासी । उच्चासनी बसवुनी त्यांसी । महापूजा करायासी । सिद्ध जाहले जन सारे ॥७४॥

अत्यादरे आरती चाले । टाळ -मृदंगी दंग झाले । देहभानही ते हरपले । प्रेमा तिरेके सर्वजन ॥७५॥

गंधाक्षता सुगंधी फुलें । तेवि अर्पिली मधुर फळें । धूप , दीप ते ओवाळिले । सुग्रास अर्पिले नैवेद्य ॥७६॥

पाद्यपूजेचा थाट ऐसा । वाटेल हेवा इंद्रा असा । योगेश्वरांचा महिमा असा । जाणिला कीं भक्तांनी ॥७७॥

पूजा -अर्चा झालियावरी । आग्रहे प्रार्थिता समर्थस्वारी । भोजना उठली वाद्यगजरीं । षड्ररस भोजन करावया ॥७८॥

भोजनाचा अपूर्व थाट । हारिने मांडिले चंदनी पाट । अगरबत्तिचा घमघमाट । दरवळे तो सर्वत्र ॥७९॥

रंगवल्लिका अति सुंदर । पात्रांभोवती मनोहर । पदार्थ वाढिती अति मधुर । एकामागोनि एक ते ॥८०॥

सनया वाजती अति मंजुळ । प्रेमें जेविती लोक सकळ । वाळ्याचे ते शीतल जल । प्यावया वाढिती नर -नारी ॥८१॥

परस्परां आग्रह करिती । हास्य -विनिदे रमली मती । प्रेमे विनविती सर्वाप्रती । करा आकंठ भोजन ॥८२॥

पदे गाती , श्लोक म्हणती । कुणी श्रींचा घोष करिती । परमानंदा येतसे भरती । ऐसा भोजनसोहळा ॥८३॥

स्वामींसवे जेवावया । यावे लागते भाग्य उदया । संधी न ऐशीं लाभे जया । अभागी ते खरोखर ॥८४॥

कृष्णासवे जेविता गोप । हर्ष त्यांसी हो अमूप । संतसंगे वागता ताप । जातसे तो विलया कीं ॥८५॥

भोजनोत्सव ऐइसा सरता । तांबूल -दक्षिणा श्रींस देता । अत्तरादी माला अर्पिता । भक्त वंदिती यति चरणां ॥८६॥

प्रसन्न मनें सर्वासि कथिती । श्रोते तेव्हा कर जोडिती । एकचित्ते श्रवण करिती । अमृतवाणी स्वामींची ॥८७॥

तुम्ही आहांत संसारी -। सागर तराया कठिण भारी । तरोनि जाया युक्ति न्यारी । सांगतो ती श्रवण करा ॥८८॥
यथा शक्ती यथा मती । साह्य द्याया असा पुढती । सदा सर्वदा तो श्रीपती । मनीं स्मरावा अखंड ॥८९॥

तडी तापसी संन्यासी । साधू महंत ऐशियांसी । पीडा न द्यावी कदा त्यांसी । द्रव्यार्जन करावया ॥९०॥

द्रव्य , दारा , पुत्र , मित्र। हे न देती सुख सर्वत्र । सद्‌गुण , ईश्वरभक्ति मात्र । सौख्यदायक सर्वदा ॥९१॥

देवाचरणीं अर्पिता मन । होईल तुमचा नारायण। हांक मारितां ये धावुन । देव ऐसा कनवाळू ॥९२॥

मर्म यांतले जाणावे । लाभ साधण्या यत्न व्हावे । आयुष्य व्यर्थ ना दवडावे । वागवा हे नित्य मनीं ॥९३॥

यतिवर्य असताम उपदेशित । ये समोरी वृद्ध पंडित । विलोकुनी त्या यती वदत । हीन कर्मे का करिता ॥९४॥

आम्ही करितसो इंद्रजाल । मोहिनी , गारुडी आणि रमल । साध्य यक्षिणी , नी वेताळ । हाडळी , जखिणी साध्य आम्हा ॥९५॥

पिशाच्च विद्या या साधुनी । हिंडतो आम्ही सदा भुवनीं । चुकते कोठे सांगा मुनी । मार्गदर्शन करावे ते ॥९६॥

स्वामी पाहती रोखुन तया । भय वाटले ह्रदयी तया । शरण जावे अशा समया । हेचि आपणा योग्य असे ॥९७॥

भयग्रस्त ते पंडित भले । पुनः पुन्हा चरण धरिले । निजाश्रूंनी अभिषेकिले। द्रवले तेणे श्री समर्थ ॥९८॥

घोर अपराधांची क्षमा । असलिया सोडतो श्रीचरणां। नातरी त्यागीन स्वप्राणां । शपथपूर्वक सांगतसे ॥९९॥

त्यावरी स्वामी तयां वदती । ज्ञात आपुली आम्हा स्थिती । आम्ही रुष्ट ना तुम्हावरती । अभय देतसो तुम्हासी ॥१००॥

श्रवणीं पडता देववाणी । परमानंद जाहला मनीं । भाग्यवान मी असे भुवनीं। नाथ कृपाळू मज भेटला ॥१०१।

आपुल्या वाचोनि नाही गती । वाटे ऐसे मज श्रीपती । दास्यत्व आपुले दीनाप्रती । लाभो मजसी आजन्म ॥१०२॥

गेहीं आपुल्या कोण कोण । माता , पिता , बंधु , बहिण। पत्नी ,पुत्र आणखी कोण । प्रेमे पुसती स्वामी तयां ॥१०३॥

आपुल्या कृपे आहो सुखी । पत्नी , पुत्र , सुना , लेकी। माता -पिता स्वर्गस्थ कीं । आतां आपण मायबाप ॥१०४॥

सप्रेम स्वामी तदा वदती । काय येतसे बघू प्रचिती । आम्हासि येणे गृहाप्रती । महाशास्त्री चला उठा ॥१०५॥

पिता असता तुमच्या गृहीं । आम्हां वदता जगीं नाहीं । समक्ष दावितों सर्वासही । उठा सत्वरी चलावे हो ॥१०६॥

लोक आश्चर्य करिती महा । आहे काय प्रकार हा । स्वामींसवे निघती गृहा । सत्यासत्य पहावया ॥१०७॥

इथे संपवू हा अध्याय । मनीं स्मरुयां सद्‌गुरु पाय । सुरस कथेचा सप्तमाध्याय । ऐकावयाते सिद्ध असा ।१०८॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०९॥

॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP