कथामृत - अध्याय सातवा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः । नृसिंहदेवा नमोस्तुते ॥१॥

गताध्यायीं हे वाचिले । पंडितागृही यति निघाले । लोकसमुदाय तोहि चाले । अति उत्कंठे पहावया ॥२॥

अल्पावकाशे ते सर्वही । जाहले उपस्थित पंडितागृहीं । आश्चर्य पावुनि जो तो पाही । अवचित कैसे श्री आले ॥३॥

शास्त्रीबुवा पुढे होती । अति नम्रत्वे श्रींस नमिती । उच्चासनीं त्यां बैसविती । प्रेमादरे करोनिया ॥४॥

पुष्पमाला घालिती गळां । मस्तकी लावितो केशरी टिळा । धृप , कर्पूर त्या वेळा । लावुनी तयाम ओवाळिती ॥५॥

नाना तर्‍हेची पक्क फळे । गोरसाचे रुपेरी पेले । तांबूल दक्षिणा अर्पुनी भले । अंगी लाविली केशरी उटी ॥६॥

सौभाग्य द्रव्ये अर्पिती स्त्रिया । फुले , अक्षता , तुळशी तयां -। वाहुनी महिला पडोनि पाया । सन्मानिती समर्थासी ॥७॥

अवति -भवतिचे लोक जमले । दर्शन होतां सुखावले । ऐशा महात्म्या ना देखिले । सूर्यासम हे तेजस्वी ॥८॥

चाले मंजूळ वाद्य गजर । स्वामी समर्थ जयजयकार । शास्त्रेबुवा सोहळा फार । भक्तिभावे करिती ते ॥९॥

स्मित पंडिता पुसती । कोठे तुमचे पिता असती । तदा मंडळी सर्व वदती । विद्यमान ते असतीना ॥१०॥

स्वामी म्हणती काय वदता । अंतर्गृही पिता असता । पालख असे नातवा करिता । झोके तयासी कोण देई ॥११॥

लोक बघाया जाति आंत । बाळ खेळे पाळण्यांत । भुजंग देखतां झोके देत । लोक किंचालले तदा ॥१२॥

अरे बापरे केवढा साप । अर्भका डसता होईल ताप । अहो हा कैचा तुमचा बाप । मारा मारा ठार याते ॥१३॥

गलका ऐकोनी हसती स्वामी । संधी साधिली असे नामी । मारिला असता तयाते तुम्ही । जरी आम्ही असतो ना ॥१४॥

कासया मारिता त्या गरिबाते । मीच पाचारितो त्याते । महा भुजंगा ये ये येथे । वृथा नातरी मरशील ॥१५॥
सरसर आला तो भुजंग । खडा राहिला झाडुनी आंग । शीळ वादनीं जाहला गुंग । स्वामीसन्मुख डोले तो ॥१६॥

सुवर्णापरी अंगकांती । विशाल काया सुदृढ अती । सळसळे जिव्हा चंचला ती । टाकुनी फूत्कार बोले जणू ॥१७॥

समर्थ प्रेमे पुसती तया । सुटली नसे कां मोह -माया । अरे टपले तुज माराया । पुत्र -पौत्रादि सर्वही ॥१८॥

बा फणिंद्रा सोडि हा छंद । तीव्र वासना घालिती बंध । मोह -माया तोडि संबंध । कासया वृथा मरतोसी ॥१९॥

जगीं नाही कुणाचे कुणी । लाभास्तव मानिती धनी । माता , पिता ,भगिनी । स्वार्थ साधण्य़ा पुरते हे ॥२०॥

ऐक नागा तुज सांगतो । वासनात्याग करावा तो । तव उद्धारास्तव दावितो । मार्ग तोचि जो हितकारी ॥२१॥

फूत्कारें तो कांहीतरी -। वदे , सुंदर फणा पसरी । यतिवर्य त्याचे मस्तकावरी । प्रेमे निज कर ठेविती ॥२२॥

नजिक सरोवर नारायण । तयामाजी करी गमन । योगियांच्या कुळीं जनन । प्राप्त होईल तुजला कीं ॥२३॥

समजले जणूं तया वचन । स्वामींपदीं फणा नमवुन । पुत्र -पौत्रादी विलोकुन । सरसर केले गमन तये ॥२४॥

जातं तेथुनी सर्ववीर । लोकनेत्रीं चालला पूर । परम ज्ञानी योगेश्वर । लीला यांची अपूर्व कीं ॥२५॥

यतिवर्य वदती त्या पंडिता । पाहिलात का तुमचा पिता । वासनाबले राहिला होता । भुजंग होउनी जगतीं या ॥२६॥

होता तयाचा मुक्तियोग। यास्तव आला हा सुयोग । नातरी मरता , भोगिता भोग । वासना प्राबल्य असते असे ॥२७॥

पंडिते यतीचरण । याचिती असो क्षमा म्हणुन । आम्हास कोठले हे ज्ञान । मीतों असे अपंडित ॥२८॥

माझिया पितयाचा कळवळा । आपणा आला आजि या वेळा । या निमित्तें प्रसंग सगळा । आगळाची अनुभविला ॥२९॥

स्वामी थोर त्रिकालज्ञानी । जाणिली पित्याची सर्पयोनी । येउनी मुक्ति दिधली झणी । अनंत उपकार असती कीं ॥३०॥

याकारणें आपुले चरण । गृहीं लागले झालों पावन। अनन्य भावे तुम्हां शरण । माथीं घेतसो पदांबुज ॥३१॥

सर्वास प्रेमें मुनी वदती । निरोप द्यावा जाण्याप्रती । ईश्वरभजनीं ठेवुनी मती । सुखे वर्तंणे संसारी ॥३२॥

जावया उठतां समर्थ मूर्ती । लोक श्रींचा जयघोष करिती । भेटाल केव्हा दीनांप्रति । साश्रुनयनें पुसती तयां ॥३३॥

आम्हास जाणे सर्व प्रांतीं । नानाविध त्या स्थलांप्रती । मार्गदर्शना मुमुक्शप्रति । नित्य नूतन हिंडतसो ॥३४॥

सुखे असावे निजस्थानों । साधुसेवा सदा करुनी । सन्मार्गाने संसार करुनी । सार्थकी जिणे लावावे ॥३५॥

निरापे घेतो असे म्हणुनी ॥त्रिविक्रम हे स्थान त्यजुनी । गमन केले कीं तयांनी । क्षणांत होती अदृश्य ॥३६॥

तेथून येती द्वारकापुरीं । परम श्रेष्ठ ती दिव्य नगरी । जिथे नांदले कीं श्रीहरी । स्वामी जाहले प्रकट तिथे ॥३७॥

असंख्य येती साधु -संत। कराया तेथे तप अनंत । भेटावया श्रीभगवंत । साधने करिती कठिण महा ॥३८॥

लोक नगरिंचे भाग्यवंत । पुण्यवान नी श्रीमंत । भगवत्कथाश्रवणीं रत । सदाचरणी असती ते ॥३९॥

घराघरांतुनि कृष्ण भक्ति । कृष्णकथामृत जन सेविती । तयांच्या पुण्या नसे मिती । ऐसे सारे कृष्णमय ॥४०॥

पाणिया जाता हो नर -नारी । गायनामाजी वर्णिती हरी । कृष्णप्रेमीं तयांची सरी । कुणासि येणे शक्य नसे ॥४१॥

जनसंघ अवघाचि कृष्णमय । तापत्रयांचे तयां न भय । जीवनामधीं ते निर्भय । वृत्ति तयांची सुप्रसन्न ॥४२॥

कृष्णभक्ती ती अपार । द्वारकापुरीं तो प्रेमपूर । जन्म -मरणाच्या व्हावया पार । तपःसाधने जन करिती ॥४३॥

भुर्‍याबुवा जामे ख्यात । सान थोरां असे विदित । मंदिरामाजीं ध्यान करित -। बैसले असती निजासनीं ॥४४॥

भगवंतदर्शना तळमळती । तदर्थ साधने घोर करिती । ज्वलंत वैराग्य मूर्ती ती -। पाहतां जन नमिती तयां ॥४५॥

गोमती तीर्थावरी वसती । त्रिकाल समयीं स्नान करिती । संध्या -वंदन जपादि करिती । तपाचरणी मग्न सदा॥४६॥

अति वृद्ध असती भुर्‍याबुवा । जो जो यात्री येईल गावा । घेति तयाचा मागोवा । करिती सेवा देवभावे ॥४७॥

हव्योगाच्या मुद्रा साधने । अति कठोर तरि ते नेमाने । अनेकदां अन्न पाण्याविणे । करिती ऐसे परिश्रम ॥४८॥

समस्त जनांसी ते सेविती । मधुर बोलुनी तुष्ट करिती । अडले जाकसले जाणती । साह्य करण्यासि तत्पर ॥४९॥

धर्मग्रंथ वाचती नाना । पुराण कीर्तनीं रमविती मना । वेदांतचर्चा केलियाविना । अन्नग्रहण ते करिती ना ॥५०॥

अमृताहुनी वाणी गोड । श्रवण करिता जन उद्दंड -। सुधारती ते धरोनि चाड । ऐशी वाणी हितकारी ॥५१॥

असत्य बोलणे नसे ठावे । परम हितकर ज्ञान द्यावे । मूढ जनांसी उद्धरावे । ऐसे बुवा महापुरुष ॥५२॥

द्वारकापत्तनीं लोकप्रिय । संत -सज्जानां आदरनीय । वृत्ति जयांची भगवंतमय । अधिकारी ते भुर्‍याबुवा ॥५३॥

भुर्‍याबुवा हे नामकरण । मिळाले तया या कारन । रोम सर्वागी शुभ्र म्हणुन । संबोधिती त्यां भुर्‍य़ाबुवा ॥५४॥

तपश्चर्या अपूर्व केली । अति वृद्धिता वया आली । ईश्वरमूर्ती नसे दिसली । ऐशा विचारे निराशले ॥५५॥

सगुण रुप ते पाहिल्याविण । व्यर्थ वाटे त्यां जीवन । ज्ञान -विज्ञान वांझ हे जाण । असे वाटुनी तळमळती ॥५६॥

भाग्योदयाची वेळ आली । भुर्‍याबुवा ती परि न कळली । नित्याप्रमाणे प्रातःकाळीम मंदिरी ध्यानस्थ बसती ते ॥५७॥

ध्यानीं एकाग्रता येता । वेळ आली ते अवचिता । पाहती ते प्रकाशझोता । चित्त क्षणभर बावरले ॥५८॥

प्रकाशीं पाहती दिव्य मूर्तीं । ऐकिली होती जिची कीर्ति । परम सुंदर दत्तमूर्ती । साक्षात् ‍ राहिली पुढे उभी ॥५९॥

शंख , चक्र , गदा , पद्म । त्रिमुखी दत्त मनोरम । केतकीपरी कांति परम । पाहता घालिती लोटांगणे ॥६०॥

क्षणांत बघती दत्तमूर्ती । क्षणांत मूर्ती कौपिनवती । आलट पालट असा बघतो । गूढतेने गोंधळले ॥६१॥

भगवंतांसी ते प्रार्थित । कोण आपण हो निश्चित । प्रार्थना ऐकोनि कर ठेवित -। मस्तकावरी दिव्य प्रभू ॥६२॥

डोळे उघडा , उठा , पहा । पाहती तों आश्चर्य महा । आजानु बाहू तेजाळ अहा । कौपिनधारी दिसती यती ॥६३॥

कलियुगीं या उग्र तप । अखंड केलात तीव्र जप । साधने केली ती अमाप । तेणे आम्ही संतुष्टलो ॥६४॥

नृसिंहदत्तात्रय हे नाम । त्रिलोकीं आम्हा नित्य काम । निर्दाळुनिया भव -भ्रम । उद्धार करितो भक्तांचा ॥६५॥

श्रींस बसविती निजासनी । चरण सेविती निज करांनी । गोरस फळे त्यां अर्पुनी । अत्यादरे सन्मानिती ॥६६॥

झालांत आता तुम्ही वृद्ध । कठोर साधनीं न व्हा बद्ध । नाम चिंतन नित्य सिद्ध । मोक्ष प्राप्ती व्हावया ॥६७॥

प्रसन्न मनें सद्‌गुरुराय । सांगती त्यां वेदांत गुह्य । आत्मरुपा जाणण्या साह्य । निज सामर्थ्ये गुरु देती ॥६८॥

दास्यवृत्तिने बुवा वदले । अलभ्य आपुले चरण दिसले । आंगि पाहिजे कीं बाणले । अद्वैत ज्ञान ते तुमच्या कृप ॥६९॥

‘ तत्त्वमसी ’ वाक्यार्थ ज्ञान - । स्वामी करिती त्या प्रदान । ब्रह्मानंद वाटला पूर्ण । बुवा वदती धन्य झालो ॥७०॥

आनंदाश्रू घळघळा गळती । रोमांच आंगी थरारती । कंठ जाहला रुद्ध अती । शब्द मुखांतुनि उमटेना । ॥७१॥

भुर्‍याबुवाची प्रेमवृत्ती । पाहता हर्षले जगत्पती । अखंड समाधी त्यां दाविती । माथी ठेवुनी कर तयांच्या ॥७२॥

दिव्य स्पर्श तो होतां तयां । देहभानही गेले लया । जिवन्मुक्त स्थितीसी या -। बुवा सद‌गुरु कृपे ॥७३॥

खवळला सागर व्हावा शांत । बुवा बैसले अति निवांत । सर्व वृत्ती निमाल्या आंत । आनंन्द समाधी लागे त्यां ॥७४॥

बुवांचे पाठी कर फिरविती । समाधी तत्क्षणी उतरे ती । भानावरी बुवा येती । कवटाळिले श्रीचरणां ॥७५॥

आनंद्सागरीं मी असतां । जागृत केले मजसी वृथा । नको जीवन भोगण्या आता । अखंड समाधी मज द्यावी ॥७६॥

कार्यपूर्ती व्हावयासी । वेळ लागते यावयासी । हेच तत्व कीं अनुभवासी । ऐशा प्रसंगे कीं येई ॥७७॥

इतुक्यामाजीं पसरले वृत्त । मंदिरीं कोणी येत संत । आजानुबाहू कौपीनवंत । तेजे गभस्ती गमती जणूं ॥७८॥
मंदिरी गर्दी तो उसळली । मुंगीस जाया वाट नुरली । नृसिंहस्वामी मूर्ति दिसली । जनांसि अत्यंत तेजस्वी ॥७९॥

बुवा सांगती कर जोडूनी । साक्षात दत्तनृसिंहामुनी । प्रकट झाले द्वारका भुवनीं । चरण वंदुनी कृतार्थ व्हा ॥८०॥

बसविती तयां उच्चासनी । सान्निध बुवा कर जोडुनी । अबिर -बुकाही उधळुनी । प्रेमानंदे पूजिती त्यां ॥८१॥

आरती , स्तोत्रे , पदे गाती । भक्ति पाहतां तुष्ट होती । संत सेवेची आसक्ति । तारील तुम्हां सुनिश्चित ॥८२॥

भोंवती दाटता भक्तजन । आला मंदिरी एक जण -। काठी टेकित समोरुन -। अंध येई हळूहळू ॥८३॥

भुर्‍याबुवा होती पुढे । धरोनि हाती आणिती कडे । स्वामी चरणारविंदी पडे । स्वामींस प्रार्थी कळवळोनी ॥८४॥

देवा , नाथा तुम्ही दयाळ । रुप बघाया मनिं तळमळ । परि न माझे नेत्र सबळ । जन्मांध मी महापापी ॥८५॥

सूर्यपूजा कीं उधळिली । सांजवात कीं मी विझविली । महापातके काय मी केली । यास्तव जाहलो गर्भांध ॥८६॥

मूर्तिमंत मी पापी , करंटा । अन्यास देणे दोष खोटा । कर्मदोष हा माझाचि वाटा । भोगणे यास्तव भाग असे ॥८७॥

दया कराहो श्रीदयाळा । पहावे वाटे रुप डोळा । नेत्री पहावा हा सोहळा । ऐसे वाटते मज दीना ॥८८॥

करुण प्रार्थना येत कानीं । अंतरीं कळवळे चक्रपाणी । तयाते आणा सन्निध कुणी । नेति संन्निध भुर्‍याबुवा ॥८९॥

श्रीचरणांसी आलंगिती । करुणारवे आक्रंदती । दाखवा मजला अंधाप्रती । निजरुप देवा साजिरे ते ॥९०॥

कुरवाळिले त्या अंधाप्रती । ऐसा न करणे शोक अती । प्रेमे वदोनी कर फिरविती । नेत्रांवरोनी तयाच्या कीं ॥९१॥

तोचि घडला चमत्कार । लोक पाहती खरोखर । नेत्र उघडता चराचर । दिसो लागले सर्वही ॥९२॥

नेत्रकमळे ती उमलली । दृष्टीपुढे धरा फुलली । दिव्य विभुती तया दिसली । श्रीस्वामीही प्रत्यक्ष ॥९३॥

चक्षूंसि दिसताम यति मूर्ती । परमानंद त्या होय अती । अपूर्व सत्ता तुम्हा हाती।आपण प्रत्यक्ष परमेश्वर ॥९४॥

घळघळा वाहे अश्रुपूर । घेतली लोळण चरणांवर । अनंता अनंत हे उपकार । अनंत जन्मीं फिटते ना ॥९५॥

ऐसे बोलोनी नम्र झाले । दुजे भक्त तों पुढे आले । बघता तयासी यती वदले । यावे रावजी यावेजी ॥९६॥

अचुक नामे पुकारिता । वाटे तयासि आश्चर्यता । ओळख आमुची मुळी नसता । नामे कैसे पाचारिती ॥९७॥
क्षणांत जाहला मुखस्तंभ । ‘आ ’ वासुनी जाहला खांब । कासया बसता असे लांब । बसावे आमुच्या संन्निध हो ॥९८॥

भुर्‍याबुवां वदती स्वामी । ओळख यांची आहे जुनी । रावजी गेलेत विस्मरुनी । सांगतो आम्ही सुनिश्चित ॥९९॥

स्वामी आग्रहे रावजी बसती । गोंधळली परि मनःस्थिती । जाणुनी तया यती वदती । सर्व सांगतो ऐकावे ॥१००॥

राव तुम्हा नसे स्मरण । काशि क्षेत्रीं बांधुनी सदन -। वसत होता वैद्यकी करुन । माते सवे आपुल्या ॥१०१॥

माता होय रुग्णउपचार केलेति संपूर्ण । वाटता माता सोडील प्राण । शोकाकुल जाहला तदा ॥१०२॥
मातेचे नाम रखुमाबाई । वात ज्वरे शुद्धि जाई । स्थिती अत्यंत कठिण होई । केलांत तदा आकांत ॥१०३॥

एक संन्यासी तदा येई । अक्लोकुनी त्यां दया येई । करांगुलीतुनि तीर्थ देई -। माते मुखीं , रावांच्या ॥१०४॥

नेत्र उघडूनी मज पाहिले । आम्ही स्वहस्ते तिज उठविले । पाठीस जेव्हा गोजारिले । माय सावध जाहली ॥१०५॥

मृत्युवेळ ती तदा टळली । मरता मरता माय जगली । यांच्या हर्षास सीमा नुरली । ह्रदयीं धरिले पद आमुचे ॥१०६॥

पत्नी अहल्या , कन्यका काशी । वसतिस्थान सदैव काशी । मृत पावली सानुली काशी । दिधली आम्ही तिज सद्नती ॥१०७॥

रावजी सच्छील अत्यंत । जगदंबेचे महा भक्त । जपानुष्ठानीं अति आसक्त । जाणतो यांच्या सात पिढ्या ॥१०८॥

ऐकतां सर्व हा वृत्तांग । रावजी नेत्री अश्रुपात । साष्टांग करिती प्रणिपात । योगेश्वरांसी अत्यादरे ॥१०९॥

विस्मरणाची असावी क्षमा । मज मतिमंदा दयारामा । आशीर्वाद आपुले आम्हा । समर्थ असती रक्षावया ॥११०॥

करणे नलगे व्यर्थ चिंता । तिघेही तुमचे पुत्र आता । संपादितील ते श्रेष्ठता । ज्ञान -वैराग्ये जगतीं ॥१११॥

रावास दिले आशिवर्चन । वर्णिले गोमती तीर्थगहन । उपदेशुनी सोडिता सदन । जयजयकार निनादला ॥११२॥

पुढिल अध्यायीं सुरस कथा । सिद्ध असणे ऐकण्या आता । ऐकता वाटेल सार्थकता । निज मानसा सुनिश्चित ॥११३॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामी कृपे सर्वथा ॥११४॥

॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP