कथामृत - अध्याय चौथा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । कृष्ण योगेश्वराय नमः साईनाथ नमोस्तुते ॥१॥
साईनाथ आणि स्वामी- यांत भेद न करा कुणी । विनवितो मी जोडुनी पाणि । आपुल्याची हितास्तव ॥२॥
देवता वंदन केल्याविण । कार्या प्रारंभ न करि मन । आशीर्वाद असल्याविण । यश कैसेनि येईल ॥३॥
माझिया करवी ग्रंथलेखन। करोनि घेणे तुम्ही पूर्ण । समजेन मी भाग्यवान । नातरी माझे जिणे वृथा ॥४॥
यास्तव प्रार्थी पुनःपुन्हा । स्पर्शुनी तुझ्या दिव्य चरणां । विलंब न करि दयाघना । भक्त-कामना पुरवाया ॥५॥
आहेस तूं करुणासमुद्र । करशील तूं आमुचे भद्र । कशास घेऊ शंका अभद्र । होईल कैसे म्हणोनिया ॥६॥
जय जय प्रभो स्वामिराया । आरंभितो चरित्र गाया । मलिन मन्मना उद्धराया । मार्ग मातें सुलभ गमे ॥७॥
श्रवण करावे श्रोतेजन । घडले जे जे वर्तमान । जाया निघता स्वामी, जन-। जय जयकारे गर्जती ॥८॥
वायुवेगे यति चालती । भक्त त्यांसी गाठू न शकती । चालता चालता गुप्त होती । ऐसे घडले अपूर्व ॥९॥
दाही दिशा जन शोधिती । परंतु स्वामी नच भेटती । योगेश्वरांची अपूर्व रीती । बघता स्तंभित होती मुनी ॥१०॥
स्मरणपूर्वक वंदुनी यती । परतोनि मागे ऋषी जाती । परस्परांसी प्रश्न करिती । पुनश्च केव्हा भेटतील? ॥११॥
हिमनगाच्या पायथ्याशी । स्वामी येता दिसे त्यांसी । मौन पाळूनी उग्रतपी । तपाचरण तो करित असे ॥१२॥
हेतू तयाचा दत्तदर्शन-। घडावे आपणा तप करोन । उग्र-उग्रतर योगसाधन । यास्तव तेणे चालविले ॥१३॥
समीप दिसता गुहा एक । स्वामी प्रवेशले निःशंक । व्याघ्रजोडी तिथे एक । गर्जत येई सामोरी ॥१४॥
इकडे तपस्व्यां स्वप्न पडले । दिव्य मूर्तीस पाहियले । कर जोडुनी पद वंदिले । विनम्र भावे अत्यंत ॥१५॥
वदे काय मी करु सेवा-। आपुली आज्ञापिणे देवा । जन्म माझा सार्थकी लावा । हीच प्रार्थना तुम्हांसी ॥१६॥
दिव्य मूर्ती वदे त्यांसी । हेतू आपला साशावयासी । सांगतो ते करायासी । असावे आपण सुसिद्ध हो ॥१७॥
बोल ऐकता अति हर्षला । आलिंगिले पदकमलां । साश्रु नयनें तयां वदला । असे सिद्ध मी सुनिश्चित ॥१८॥
संतुष्ट झालो तव उत्तरे। सांगतो ते करणे त्वरे । विलंब करिता कार्य अपुरे-। राहील ऐसे सांगतो ॥१९॥
सन्निध येथे असे गुहा । तींत स्वामी वसती महा । शरण त्यांसी जाउनी पहा । तेचि असती दत्तात्रय ॥२०॥
नृसिंहस्वामी त्यास वदती । सामर्थ्यासी नसे मिती । कृपा केलिया तुझे वरती । परम भाग्य तव जाणावे ॥२१॥
सांगोनि ऐसे गुप्त झाले । मानसीं मुनी संतोषलें । भाग्य थोर ते फळा आले । हर्षातिरेके बोलती ॥२२॥
ऐकता स्वप्निंचा संदेशे । आनंदले यति-मानस। शरण केव्हा मुनिपदांस-। जाईन ऐसे म्हणे झाले ॥२३॥
निशा संपता त्वरे उठला । प्रातर्विधी उरकोनि सजला । स्नान, संध्या करोनि नमिला । भगवान्‍ श्रीसूर्यनारायण ॥२४॥
अधिर जाहला यतिदर्शना । घेवोनिया फळे फुलांना । करित स्वमनीं तर्क नाना । गुहेसन्निध पातला । २५॥
समिप येता गुहेपाशी । पाहिले तये दो व्याघ्रांसी । व्याघ्रे देखितां तपस्व्यासी । गर्जती ते भयंकर ॥२६॥
व्याघ्रगर्जना पडे कानीं । मुनी पळे ते स्थल त्यागुनी । व्याघ्रस्वरुपे मृत्यु धावुनी-। येतो ऐसे वाटले त्या ॥२७॥
अहो, थांबा ऐसा ध्वनी । पळता पळता पडे कानीं । बघती मागे धीर धरुनी । तोंचि देखिले अति नवल ॥२८॥
गुहेच्या त्या मुखापाशी । महान तेजस्वी मूर्तीसी । देखता थांबले विजनवासी । अद्‌भूताश्वर्य वाटले ॥२९॥
उभारोनी उभय बाहू । स्वामी पाचारिती बहू । या या इकडे नका भिऊ । व्याघ्र काही करिती ना ॥३०॥
अभय मिळता आनंदले । त्वरित जाउनी पद वंदिले । नेत्राश्रूंनी अभिषेकिले । पवित्र ऐशा गुरुचरणां ॥३१॥
सस्मित वदनें यति बोलती । न धरा कसली मनी भीति । तपःसाधनी थोर प्रगती-। होईल संशय न धरावा ॥३२॥
परब्रह्म ते एक सत्य । इतर माया, मोह असत्य । ईशचिंतनीं असणे रत । हेचि तुम्हा सांगतसे ॥३३॥
व्याघ्र तोंची पदि लोळती । यतिवर्य त्यांते गोंजारिती । प्रेमें तयांसी थोपटती । वदती त्यांसी उठा, उठा ॥३४॥
व्याघ्रांसि वदती महा मुनी । विद्धान होता विगत जन्मीं । अहंकारी मत्त दुर्गुणी-। वर्तता शापिता जाहला पशू ॥३५॥
पशूंवरी त्या कृपा केली । गत जन्मीची स्मृती दिधली । मनुष्यवाणी त्यां अर्पिली । व्यक्त मानस करावया ॥३६॥
पश्चात्तापे व्याघ्र वदती । अपराध आमुचे बहुत असती । पशुयोनीतुन करा मुक्ति । शरण येतसो उद्धारा ॥३७॥
पश्चात्तापे शुद्ध झालां । बघुनी आम्हा हर्ष झाला । विद्वानकुळी जन्म तुम्हाला-। लाभेल जाणा सुनिश्चित ॥३८॥
विद्वान आणि श्रीमान । निजवर्तने संतुष्ट जन । कीर्ति परिमलें भरेल भुवन । कराल तुम्ही संतसेवा । ३९॥
हर्षतिरेके गर्जले दोन्ही । श्रीपदकमलां चाटिलें त्यांनी । दयावंत त्यां वदती मुनी । सत्वर गती पावाल ॥४०॥
जाता निघोनी व्याघ्र दोन्ही । मुनि वंदिती कर जोडुनी । अगाध देवा असे करणी । पूर्वी कदापि पाहिली ना ॥४१॥
अत्यादरे सद्‌गुरु नमिला । गुरुने माथा कर ठेविला । दत्तदर्शन ते तुम्हाला । घडेल निश्चित सांगतो ॥४२॥
दिव्य जाहला चमत्कार । प्रकाश पडला सभोवार । भगवान श्रीदत्त योगेश्वर । साक्षात प्रकटले तेथेची ॥४३॥
जन्मजन्मांतरिचे ध्येय । सफल होता धरिले पाय । कृपावंत मज भेटली माय । नेत्रीं घळघळा प्रेमाश्रू ॥४४॥
साष्टांग नमने गुरु वंदिले । फल-पुष्पांनी पद पूजिले । स्तोत्रे गाउनी तयां स्तविले । प्रसन्न भगवान दत्तात्रय ॥४५॥
हर्षतिरेके तो मुनिवर । करु लागला जयजयकार । धन्य जाहलो मी पामर । आजला की दत्तदर्शने ॥४६॥
हिमनग त्यजुनी यति निघाले । जगन्नाथ या क्षेत्रिं आले । प्रातःसमयीं जाउनी भले । घेती दर्शन देवाचे ॥४७॥
अति तेजस्वी मुखमंडल । गौरकाया अति कमल । आजानु बाहू नेत्र विशाल । रसाळ वाणि जणु अमृत ॥४८॥
जन आश्चर्ये बघती तयां । प्रेमे लागले पुसावया । प्रत्यक्ष ईश्वर गमले जयां । वोळंगती तें चरणांवरी ॥४९॥
अभयदानें उठविती जनां । मृदुभाषणे बोध नाना । जैसा जयाचा भाव त्यांना । त्या त्यापरी उपदेशिती ॥५०॥
धर्म शालेमधीं येती । रुग्ण तेथे चार दिसती । अस्थिचर्म ती स्थिती बघती । येत करुणा करुणार्नवा ॥५१॥
जिवंत किंवा असती मृत । संशय ऐसा जनां येत । नशिदिनीं असती असे येथ । तोंड वासुनी जन सांगती ॥५२॥
साह्यहीन ती त्यांची स्थिती । बघुनी द्रवली यतिमूर्ती । जाउन संन्निध कर ठेविती । रुग्णमाथी तो प्रेमळ ॥५३॥
मायास्पर्शे रुग्ण वदती । कोण रक्षील आम्हांप्रती । मरणासन्न आमुची स्थिती । धाव पाव रे नारायणा ॥५४॥
नको नकोरे हे जीवन । याहुनी गमे गोड मरण । परलोकीं ने रघुवंदन । विलंब आता न करावा ॥५५॥
यतिवर्य त्यांते गोंजारिती । ममतेचे त्यां शब्द वदती । स्पर्शे शुद्धीवरी येती । उठोनि बसले तात्काळ ॥५६॥
अहाहा देवा तुम्ही कोण । बघतां वंदिले यतचिरण । प्रत्यक्ष गमतां नारायण । यतिवेषे कीं आलाती ॥५७॥
महत्भाग्ये हे दर्शन । अश्रूंनी न्हाणिले यती-चरण। तयां मस्तकीं कर ठेवुन । अभय देती स्वामी तयां ॥५८॥
अन्नपाण्याविण उपाशी । परि न पुसिले कुणीं त्यांसी । उपचाराची बात कशाशी । लोक जाती दुरी ॥५९॥
स्वामीकृपेने पुनर्जन्म-। लाभता झाला हर्ष परम । तोंचि दरवळे वास घमघम । सुग्रास ऐशा अन्नाचा ॥६०॥
अत्याग्रहे यतींद्रांसी । चला वदती भोजनासी । पावन करा पामरांसी । पंक्तिलाभे आपुल्या ॥६१॥
मुनींद्र वदले रुग्णांसी । चला सवे भोजनासी । शंका न धरा निजमानसीं । सर्व यथोचित होईल ॥६२॥
आपुली आज्ञा वदोनि उठले । स्वामींसवे भोजना बसले । षड्रसान्नें तृप्त झाले । आकंठ करिती भोजन ॥६३॥
सर्व लोकां आश्चर्य गमले । अरे हे कैसे जगले, जेवले । स्वामी-कृपेचे फल हे भले । स्वामी न दिसती सामान्य ॥६४॥
भोजन करुनी पंक्ती अनंत । विडे, दक्षिणे जाहले तृप्त । उच्चासनीं यतींद्र स्थित-। जाहले लोकाग्रहास्तव ॥६५॥
स्वामी बैसती आसनावरी । मंजूळ वाद्ये वाजती दारीं। पुष्पे, फळे आणुनी सारी। दिव्य पूजा करिती तदा ॥६६॥
परिमल द्रव्ये उधळिती फुले । आसंमती गंध दरवळे । जयजयकारे नभ कोंदले । ऐसा करिती महोत्सव ॥६७॥
लोक घालुनी लोटांगण । विनम्र भावे कर जोडुन । स्वामींस पुसती कोण आपण । नाम कळावे अज्ञ जनां ॥६८॥
सुहास्य वदनें सांगती स्वामी । आमुचे नाम नृसिंहस्वामी । आलो कर्दली वनांतुनी । जात आहोत यात्रेसी ॥६९॥
करा निश्चये नाम साधन । सत्कर्मे मिळवा सदैव धन । वर्तनें तोषवा संत-सज्जन । हेचि तुम्हा सांगणे असे ॥७०॥
स्वामी उठता जावयासी । अळवणी बुवा अति त्वरेसी । पदंघ्रिकमळी निज शिरासी । ठेवुनी वदती नम्रत्वे ॥७१॥
दिलाति मातें पुनर्जन्म । विसरेन कैसे आपुले नाम । ध्यान धरितां, स्मरता नाम । दर्शन आपुले नित्य घडो ॥७२॥
बुवांसि स्वामी आश्वासिती । पूर्ण होईल आस वदती । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती । धारण करुनी असणे सदा ॥७३॥
अळवणीबुवा वृद्ध अती । ऐकतां अंतरीं आनंदती । धन्य धन्य मी असे वदती । जन्मसाफत्य जाहले ॥७४॥
बुवा जाणती योगक्रिया । वेदविद्याही प्रसन्न जयां । ईशदर्शना झिजविती काया । अन्य काही न जाणती ॥७५॥
आज्ञा घेवोनि स्वामींची । वाट धरिली बडोद्याची । कीर्तनीं गाईली समर्थाची-। महती तयांनी आजन्म ॥७६॥
ऐसे कृपाळू स्वामिराज । दुर्बळांचे करिती काज । दुर्मीळ ऐसे महंत आज । भाग्यवंत ते अळवणी बुवा ॥७७॥
लोक दाटले सभोवार । जन्मांध आणिला श्रींसमोर । मस्तक ठेवुनी चरणांवर । अंध करी प्रार्थना कीं ॥७८॥
देवा आपुले दिव्य रुप । पहावेसे वाटते खूप । जन्मांधत्व हे महापाप । आड येते कैसे करु ॥७९॥
रुदन ऐकुनी देव द्रवले । तयाच्या नेत्रीं फिरविले । अंधत्व ते लया गेले । घडले सर्व विलक्षण ॥८०॥
जन्मांधा लाभे दिव्य दृष्टी । नेत्रांपुढे दिसे सृष्टी । आजन्म जो असे कष्टी । हर्षातिरेके नाचे तो ॥८१॥
अहाहा स्वामी धन्य झालो । अपूर्व दर्शन करुं शकलो । नातरी असतो वृथा मेलो । किड्या, मुंग्यासारिखा ॥८२॥
आपण प्रत्यक्ष जनार्दन । वदुनी घातले लोटांगण । केले आपण कृपादान । हेचि माझे महत्भाग्य ॥८३॥
सभेंतुनी श्री जात असतां । एक घडली नवल वार्ता । गलितांग अशा वृद्ध आर्ता । सदुपदेशे जागविती ॥८४॥
सभेतल्या त्या मार्गावरी । वृद्ध जर्जर ये समोरी । श्रींस जोडुनि कर, विचारी । दया मजुवरी कराल का ॥८५॥
वृद्धा, तुजला हवे काय?। ईश्वरलाभास्तव उपाय । ब्रह्मविद्येचे ज्ञान गुह्य । काय हवे ते मागावे । ८६॥
वक्र काया, स्वर कंपित । साश्रु नयनें वृद्ध वदत । माझी भार्या दिवंगत । भेटेल काहो स्वप्नांतरी ॥८७॥
होती जिवाची ती जिवलग । मृत्यु करी अम्हां विलग । उदास तेणे मज हे जग । निद्रानाशे पीडलो मी ॥८८॥
स्वरुपे होती अति सुंदर । वक्तृत्व होते मनोहर । पाकक्रियेंत कुशल फार । नाम सगुणा होते तिचे ॥८९॥
अशी वृद्धाची प्रेमांधता-। बघुनी द्रवले हे ऐकता । विसरलात का मजसी अता । परंतु वृद्धा तुज जाणतो ॥९०॥
वदता काय तुम्ही स्वामी । कधि न भेटलो या जन्मीं मी । ऐसे असोनी जाणता नामीं । हे तों आश्चर्य वाटते ॥९१॥
तुजला स्मृती या जन्मीची । मजला स्मृती गत जन्मीची । होतास माझा भक्त तूंची । आप्पा तेली म्हणोनिया ॥९२॥
इह जन्मांतिल खुणा त्यांना । कथन करिती यती नाना । स्तंभित झाला पटले मना । म्हणे आपण असामान्य ॥९३॥
वृद्धा तुझी रे येते दया । सोडणे आता मोह-माया । विसर आता विगत जाया । ईश्वर नामीं रत होई ॥९४॥
काळ उरला नसे फार । प्रभुसेवेचा ध्यास थोर-। घ्यावा आपण अति सत्त्वर । तरिच सद्‌गती पावाल ॥९५॥
थरथर कापे विकल काया । तरिही स्मरे विगत जाया । कृपा न केलिया जाईल वाया । स्वामी अंतरीं कळवळले ॥९६॥
प्रेमर्द्रतेचा सदुपदेश । अज्ञान-ग्रंथिचा करी नाश । सर्व तोडिला मोहपाश । सावध झालो उपदेशे ॥९७॥
स्वामी-चरणी घातली मिठी । वदे रक्षिले श्रीजगजेठी । रामनामाविणे ओठी । दुजी गोष्ट ना वदणार ॥९८॥
ऐकोनि स्वामी आनंदले । होईल आतां तुमचे भले । पश्चात्तापे दग्ध झाले । दोष तुमचे सर्वही ॥९९॥
श्रीरंगी रंगता चित्त । वासनाक्षय हो निश्चित । मोक्ष लाभेल पावता अंत । खंत आता न करावी ॥१००॥
सर्व जनां सांगती प्रेमे । विवेके करा नित्य कर्मे । भजन पूजन करा नेमे । त्यांत कल्याण सकलांचे ॥१०१॥
लोक गर्जती जयजयकार । फुले वर्षिती स्वामींवर । बघतां बघतां योगेश्वर । दिसेनासे जाहलें ॥१०२॥
ऐसा स्वामीम्चा अवतार । लोक करिती आश्चर्य थोर । पुढिल अध्यायीं कथा मधुर । सावचित्त व्हा ऐकाया ॥१०३॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यातला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०४॥
॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP