कथामृत - अध्याय दहावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुदेवतायै नमः । कामधेनु नमोस्तुते ॥१॥
स्वामी म्हणजे चमत्कार । स्वामी प्रत्यक्ष ईशावतार । स्वामी करुणेचा सागर । पृथ्वीवरी कीं नांदतसे ॥२॥
अष्टदिशांचेहि दिग्पाल । हात जोडुनी उभा काळ । तयांची अवज्ञा जो करील । ऐसा न कोणी अवनीवरी ॥३॥
केवि वर्णावा अधिकार । आज्ञेंत ज्यांच्या चराचर । यास्तव वदती विश्वंभर । भक्तिभावे जन त्यांसी ॥४॥
गत अध्यायीं सेवकांसी । अभयदान देउनी त्यांसी । स्वये जाती अन्य यात्रेसी । न कळे कुणा कुठे गेले ॥५॥
शिवकांची नि विष्णुकांची । तीर्थे या दोन नावांची । रामेश्वरानजिक ती साची । प्रकटले तेथे श्रीस्वामी ॥६॥
शिवकांचीच्य देवळांत । वसती तेथे यति निवांत । अति तेजस्वी हे महंत । कोण म्हणोनि जन पुसती ॥७॥
आदर, आश्चर्य, तर्क नाना-। पाहुनी करिती लोक नाना । कोण, कोठचे कांहीं कळेना । कदा आले शिवमंदिरीं ॥८॥
सज्जन, दुर्जन जनीं असती । कांहीं सज्जन समर्था वदती । यावे देवा भोजनाप्रती । आमुच्या गृहीं आनंदे ॥९॥
सद्‌भक्तांचा विशुद्ध हेतू । जाणुनी म्हणई न धरा किंतू । विमल भक्ती तुमची परंतू । कासया घेता त्रास तुम्ही ॥१०॥
निःस्पृह निर्मळ थोर संत । जाणुनी त्यां आग्रहे नेत । मिष्टान्न भोजन तयां देत । पाद्यपूजा करोनिया ॥११॥
चरण यतींचे लागता गृहीं । इडा-पीडा नुरे कांहीं । ऐसा महात्मा देखिला नाहीं । अत्यादरे वदती जन ॥१२॥
जनमानसी मानसीं वाढले प्रेम । स्वामिदर्शन होतसे काम । यति न मागती कुणा दाम । वाटे जनांसी आश्चर्य ॥१३॥
योगेश्वरांची चरण-धूळ । लाविता जाई दुःख मूळ । तया न लागे काळ वेळ । महिमान ऐसे स्वामींचे ॥१४॥
ऐसे जाता दिवस कांहीं । वाद उपजला तिथे पाही । जहागीरदार नि वैष्णवही । भांडती परस्पर लाभास्तव ॥१५॥
जहागीर ही आमुची असे । जागीरदार ते वदती असे । वैष्णव वदती तुमची नसे । आम्ही येथले आहो धनी ॥१६॥
वाद जाई न्यायालयांत । दाखवा पुरावे आम्हा त्वरित । नातरी करुं जागीर जप्त । निवेदिती त्यां अधिकारी ॥१७॥
वैष्णव हिंडती घरीं-दारीं । धुंडालिती दप्तरे सारी । मेळवाया एकला तरी-। लेख पुरावा म्हणोनिया ॥१८॥
आधारास्तव जहागीरदार । पुरावा शोधण्या सविस्तर । यत्नशील होते अनिवार । विफल परंतु यत्न त्यांचे ॥१९॥
पक्ष दोन्हीहि चिंतातुर । काय करणे पडला विचार । दिवसगतही जाहले फार । अस्वस्थ होती सर्व मनीं ॥२०॥
उभय पक्षां बोलावुनी । वरिष्ठ सांगती बजावुनी । सादर करा पुरावा करा पुरावा म्हणुनी । ना तरी तुम्ही व्हाल कष्टी ॥२१॥
उभय पक्ष ते जाहले खिन्न । अवधी द्यावा कृपा करुन । प्रभो कैसे नासेल विघ्न । होय आमुची कुंठित मती ॥२२॥
नवस सायास, व्रते करिती । ब्राह्मणभोजन कुणि घालिती । अनुष्ठाने, अभिषेक करिती । उपाय नाना धार्मिक ते ॥२३॥
उपाय झाले सर्व विफल । पक्ष दोन्ही होति विकल । मूढ होउनी बैसले सकल-। निज कपाळी कर ठेवुनी ॥२४॥
आज्ञापत्र तेहि सरकारी । उभयतांच्या पडले करीं । पूर्व रीती बदलिलि सारी । नोकरी तुमची रद्द असे ॥२५॥
पत्र वाचोनि हादरले । कैसे करावे आतां न कळे । भयाण सारे जग भासले । वाटले जिणे व्यर्थ होय ॥२६॥
चालली तयांची पळापळ । विचार करिती पुन्हा सकळ । खापया उठला जणू काळ । म्हणती जाऊ स्वामींकडे ॥२७॥
वदले कांहीं, कासया जाता । स्वामी करणार आतां । सरकाराआज्ञा जाहली असतां । उपाय आता उरला नसे ॥२८॥
परी आग्रहे कांही वदती । चला घेऊंया प्रचिती । ना तरि आता अन्य गती । उरलीच नाही आपणां ॥२९॥
समर्थचरणीं पातले सर्व । संपले आमुचे प्रयत्न-पर्व । देवा हरला आमुचा गर्व । शरण येतसो सर्वस्वी ॥३०॥
सस्मित वदने यती वदती । बोलवा येथे वरिष्ठांप्रती । बघूं काय ते होतसे अंतीं । खंत अंतरीं न करावी ॥३१॥
वचन ऐकतां धीर आला । चला आता शंका कशाला । अधिकार्‍यांसी आणावयाला । चला जाऊंच सत्वरी ॥३२॥
वरिष्ठांसह लोक येती । स्वामींपुढे कर जोडिती । वरिष्ठांसी समर्थ वदती । जप्त कासया अधिकार ॥३३॥
वरिष्ठ वदती श्रीसमर्था । आजपर्यत वाद नव्हता । सर्व सुखे चालले असतां । भांडता हे आपसांत ॥३४॥
पूजा-अर्चा होत होती । सदावर्ते होती । कशालाही उणीव नव्हती । कलह अवदसा आठवे कां ॥३५॥
आम्ही सर्वा समजाविले। परंतु यांसे३ए ना उमगले । यास्तव निर्बध शस्त्र धरिले । चाकर आम्ही सरकारचे ॥३६॥
स्वार्थापायी भांडती अती । अशी कशी ही देवभक्ती । सत्य परमार्थ त्यागिती । लोभ अत्यंत द्र्व्याचा ॥३७॥
कां न यावा आम्हा राग । उपजेल कैसा हो अनुराग । अन्न,द्रव्य भोगण्या भोग । असेचि यांना आसक्ति ॥३८॥
धर्मकार्यात नित्य असणे । ऐसे न जमे यां राहणे । नियमानुसार कीं वागणे । भाग पडले आम्हासी ॥३९॥
उपाय सांगा तुम्ही कांहीं । पटल्यावरी विरोध नाही । शिलालेख वा दुजा कांहीं । आधार कसलाचि गवसेना ॥४०॥
समर्थ वदती वरिष्ठांसी । सत्य तेची तूं सांगसी । प्रत्यक्ष पुरावा हवा तुजसी । हेचि मागणे कीं तुमचे ॥४१॥
कर जोडुनी वरिष्ठ वदला । हेचि पाहिजे असे मजला । न्यायनिष्ठूर व्हावयाला । लाविताती हे सारे ॥४२॥
हास्य वदनें समर्थ वदत । पुरावा असे जलाशयांत । बुढी मारुनी पहा तेथ । पाषाणलेख मिळेल हो ॥४३॥
हर्षतिरेके अहा लोक । उडी ठोकिती बिनधोक । जलीं गवसला शिलालेख । त्वरे आणिला तो वरती ॥४४॥
अक्षरे होती कोरलेली । संगमरवरी शिला दिसली । वरिष्ठांनी ती वाचिली । आश्चर्य वाटे सर्वासी ॥४५॥
धन्य धन्य या समार्थाची । दिव्य दृष्ठी असे यांची । जहागीर ही वैष्णवांची । वाचिता वरिष्ठ संतोषले ॥४६॥
समर्थाच्या जयजयकारे । गगन कोंदले अहा न्यारे । हर्षातिरेके वैष्णव सारे । नाचती ते पृथ्वीवरी ॥४७॥
गुलाल पुष्पे उधळली ती । समर्थाची आरती करिती। स्तुतिस्तोत्रे गीत गाती । पारावार न आनंदा ॥४८॥
पुरावा तो मिळे स्पष्ट । वाचता होती वरिष्ठ तुष्ट । जप्त जहागिर द्यावया इष्ट-। उपाय सत्वर आम्ही करु ॥४९॥
वैष्णवा मिळे जहागीर । पूर्ववत्‍ चालती व्यवहार । समर्थाविषयी अत्यादर । वाटू लागला सर्वासी ॥५०॥
शिवकांची ती शैवांची । विष्णुकांची वैष्णवांची । ऐशी आज्ञा समर्थाची । प्रमाण मानिती सर्वही ॥५१॥
पुजारी नेमिले त्या त्यापरी । भांडणे तदा संपली सारी । धरोनि प्रेमा परस्परी । अखंड वर्तणे यापुढती ॥५२॥
यति वर्याचा सुधा बोध । ऐकुनी वदती ते प्रबुद्ध । आम्हा द्यावया ज्ञान शुद्ध । अखंड येथेचि नांदावे ॥५३॥
प्रसन्न चित्त हास्य वदनीं । स्वामी सांगती समजावुनी । जाणे आम्हा नाना ठिकाणी । अनंत कार्ये करावया ॥५४॥
स्वामी उठता त्वरे जाया । स्फुंदुनी रडती बुवा-बाया । दुर्लभ दर्शन स्वामिराया । पुनश्च केधवा दिसणार ॥५५॥
ऐकण्या स्वामी होते कुठे । अंतर्धान पावले वाटे । लोकविलक्षण संत मोठे । महत भाग्ये दर्शन घडे ॥५६॥
विधुल्लतेच्या वेगापरी । यती चालती मार्गावरी । बीड जिल्ह्यांतिल राजापुरीं । सयंसमयीं पातले ॥५७॥
जीर्ण तेथल्या कीं मठांत । जाऊनि बैसले ते निवांत । प्रातःसमय यदा होत । लोक पाहती आश्चर्ये ॥५८॥
अग्निसारखे तेज दिसते । आजानु बाहू मूर्ति गमते । केतकीवर्णे भान हरते । नेत्र तेजाळ कीं हिरे ॥५९॥
गर्भश्रीमंत दिसे कोणी । संन्यास का घेतला यांनी । विचारावया जात ज्ञानी । परंतु पुसण्या धजती ना ॥६०॥
सर्वत्र वार्ता पसरली ही । जो तो येउनी त्यांस पाही । आश्चर्य पावुनी जात गेहीं । चर्चा चालली सर्वत्र ॥६१॥
मानिती कोणी त्या योगी । अति तेजस्वी हा विरागी । कोणी म्हणती हा अभागी । उपभोग याच्या दैवीं नसे ॥६२॥
संत वृत्तीचे लोक वदती । आमुची यावरी जडे भक्ती । पादसंवाहन स्वये करिती । मानिती तयां योगेश्वर ॥६३॥
कुणी करिती साष्टांग नमन । पुष्पे सुगंधी पदिं अर्पुन । ओवाळिती आरती म्हणुन । सद्‌भक्त सारे भारावले ॥६४॥
कीर्ति सुगंध तो दरवळे । दूरदूरचे जन पातेल । भजन-कीर्तन मठीं चाले । चूर पालटे परिसराचा ॥६५॥
खाद्यपदार्थ आणिती नाना । नैवेद्य दाविती भक्त त्यांना । त्यांतील घेउनी घास जाणा । बाकिचा वाटती प्रसाद तो ॥६६॥
काय खाती आणि पिती । त्यांची ना कळे कुणा रीती । महयोगीच हे असती । वायु भक्षुनी असती हे ॥६७॥
स्वामी बोलती अति मधुर । वाणी ऐकण्या भक्त अधिर । उपदेश वाक्ये बहुत रुचिर । ऐकती सारे मनोभावे ॥६८॥
सर्वत्र पसरंता कीर्तिगंध । लोक तेणे जाहले धुंद । श्रींसेवेचा परमानंद । उपभोगिती भक्त सारे ॥६९॥
थोर थोर जे व्यापारी । लक्ष्मी नांदते ज्यांचे घरीं । उभे राहती श्रींसमोरी । कर जोडुनी नम्रपणे ॥७०॥
चरण चुरिती घालिती वारा । केशरी उटी घेउनी हारा । धनाढ्य वदती जोडुनी करां । सेवा आम्हासि सांगावी ॥७१॥
जो तो इच्छी कराया सेवा । आशीर्वाद मिळाया हवा । ना तरी संधी जाईल वाय । व्यर्थ जाईल जन्म कीं ॥७२॥
जैसी जयाची असे शक्ति । तैशी करी तो यतिंची भक्ती । श्रवणीं पडावी श्रींची उक्ती । तयाम प्रार्थिती प्रेमादरे ॥७३॥
विचार करिती सर्व जमुनी मठा करावे संस्थान म्हणुनी । राजाज्ञा ती अवश्य म्हणुनी । नेते करिती यत्न थोर ॥७४॥
चंदुलाल ते थोर दिवाण । निजामावरी तयांचे वजन । नेते भेटती त्यां जाउन । साह्य द्यावे म्हणोनिया ॥७५॥
धर्मनिष्ठ ते चंदुलाल । विचार करिती ते अमोल । मठ संस्थाना रौप्य मोल । सनदापत्रे महत्त्वाची ॥७६॥
प्रतिवर्षास्तव सहस्त्र रुपये । निजामांकरवी दिधली तये । यति आज्ञेविण करो नये । खर्च कपर्दिक एकही ॥७७॥
ऐशी सुवार्ता जनां कळतां । हर्ष तयांच्या होय चित्ता । वर्षासन ते मठाकरिता । निजामे दिधले, महाभाग्य ॥७८॥
अवकळा होती या मठासी । भुते पिशाच्चे या वस्तीसी । येथे येतांचि हे संन्यासी । मठा आली अपूर्वता ॥७९॥
परिस स्पर्शता लोहास । सुवर्णकांती प्राप्त हो त्यास । जीर्णातिजीर्ण ऐशा मठास । स्पर्श जाहला स्वामींच्या ॥८०॥
मठास सुंदर रुप आले । कीर्तनउत्सव नित्य चाले । अन्नछत्रही सुरु केले । अनाथ जाहले संतुष्ट ॥८१॥
ऐसे जाता दिवस कांहीं । राजुरीची मंडळी कांहीं । पंढरपुरां निघाली पायी । विठ्ठलदर्शन घ्यावयासी ॥८२॥
विठठल नगरी क्षेत्र पावन । लोक तेथे येति दुरुन । भजन, पूजन, संकीर्तन । अखंड चाले रात्रंदिन ॥८९॥
आषाढिच्या एकादशीस-। काय घडले पंढरीस । अति भयंकर पर्जन्यास-। सुरुवात झाली अहोरात्र ॥८४॥
पर्जन्य कोसळे मुसळधार । भीमेस आला महापूर । भयभीत तेणे लोक फार । सुचे न कोणास कांहींही ॥८५॥
दुथडीं भरोन नदी वाहे । अवघे जन पाहती हे । महाभयंकर पूर आहे । ऐसा न देखिला केव्हाही ॥८६॥
नदीबाहेर पसरे पाणी । नाव सोडण्या न धजे कोणी । वाहत जाती मुके प्राणी । मुकले बिचारे प्राणांसी ॥८७॥
उग्र अवतार तो भीमेचा । पाहतां बसली लोकवाचा । उपाय न चले हो कोणाचा । वाचवाया बुडते जन ॥८८॥
हकारे पुकारे परस्परांसी । करोनि थकले उपायांसी । तोंच पाहती जन दृश्यांसी-। अद्‌भुत आणी अलौकिक ॥८९॥
परतीराहुनि जलावरुनि । चालत येई यती कोणी । आजानुबाहु मूर्ति असुनी । सुवर्नकांती तेजस्वी ॥९०॥
स्वप्नी असू कीं जागृतीत । नेत्र विस्फारुनी बघत । अपूर्व दृश्य हे लोक वदत । अन्योन्यासी तेधवा ॥९१॥
समर्थ येता ऐल तीरा । लोक घालिती तयां घेरा । धन्य आपुली योगेश्वरा । म्हणोनि घातली लोटांगणे ॥९२॥
राजूरगावचे लोक बघती । कोण आहेत अपूर्व यती । अहो हे तो आमुचे असती । राजुराहुनी कधी आले ॥९३॥
विठठलाचे देवालयांत । लोक समर्थासवे येत । श्रीरंगाचे मुख पहात-। अदृश्य जाहले श्रीस्वामी ॥९४॥
सर्वत्र तदा गजर झाला । पुंडलिक वरदा हरि विठठला । यतिवेषे येउनी सकलां ।दर्शन दिलेती मायबापा ॥९५॥
आश्चर्यानंदा सुमार नुरला । आलिंगिती परस्परांला । समुदाय करी नर्तनाला । बेहोष जाहले हर्षाने ॥९६॥
अबिर-गुलाल जन उधळती । पांडुरंगी पुष्पे वर्षती । टाळमृदंगासह गर्जती । सभामंडप निनाद्ला ॥९७॥
महाप्रसाद जाहल्यावरी । लोक निघाले राजुरपुरी । चवकशी करिती गेलियावरी । स्वामी समर्थ असतीका ॥९८॥
प्रश्न अहो कासया करिता । अंतर्भागीं स्वामि असता । आश्चर्य वाटे तयां बघतां । यतिवर्य हे असामान्य ॥९९॥
पंढरपुरीं पाहिले स्वामी । प्रत्यक्ष घेतले दर्शन आम्ही । चालले नदीच्या जलावरुनी । पाहिले असंख्य लोकांनी ॥१००॥
वृत्तांत ऐकता थक्क होती । कोठे न गेले येथुनी यती । गुंग जाहली तेधवा मती । सिद्ध खरे हे अलौकिक ॥१०१॥
धन्य धन्य या यतिवरांची । उपमा तयां परमेश्वराची । लोकविलक्षण कृती यांची । वर्णील यांते कोण तरी ॥१०२॥
श्री स्वामींच्या प्रतापकथा । वाचावयाच्या पुढे आता । पुढील अध्याय वाचण्याकरिता । सिद्ध असावे भक्तांनी ॥१०३॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०४॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP