TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कथामृत - अध्याय सतरावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


अध्याय सतरावा
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । गुरुदत्तात्रेयाय नमः । श्रीशनिदेवा नमोस्तुते ॥१॥
गताध्यायीं की वाचिले । तीन गर्गाध पंडित भले । वाद घालवया आले । स्वामी । समोरी प्रज्ञापुरीं ॥२॥
स्वामी तुम्ही कोठचे कोण । तुम्हा असेका ब्रह्मज्ञान । चार वेदांचे ज्ञान गहन-। झाले असे का तुम्हासी ॥३॥
उपनिषदांतिल ज्ञान कळले । किंवा वैय्याकरणी भले । ज्योतिषशास्त्र आगळे कळे । काय कळते आपणांसी ॥४॥
करोनि प्रश्नांचा भडिमार । स्वामीस करु फजित पार-। ऐसा मनीं करुनि विचार । राक्षस आले स्वामींपुढे ॥५॥
स्वामी महा अंतर्ज्ञानी । ब्रह्मराक्षसां जाणिले त्यांनी । बघता तया-तीक्ष्ण दृष्टीनी । शुष्क काष्ठवत्‍ झाले ते ॥६॥
जाता ऐशा दोन घटका । परमाश्चर्य ते गमे लोका । दया आली जगन्‌‍नायका । होउनी शुद्ध, पातले सर्व-। शरण तत्क्षणीं स्वामींसी ॥८॥
हे तो वाचिले सर्व आपण । तैसेचि वाचिले वृत्त गहन । आळंदीचे मुनि महान । शरण रिघाले स्वामींसी ॥९॥
नृसिंहस्वामी अति महान । घेता तये स्वामीदर्शन । स्वामी वदले त्यांलागुन । रंडी कभी छोडेगा ॥१०॥
सिद्धि त्यजिती नृसिंहयती । योगेश्वरांसी नमन करिती । तदा स्वामी प्रसन्न होती । अर्पिती कंठिवी माला तयां ॥११॥
यशवंत भोसेकरांवरी । संतुष्ट होउनी समर्थ स्वारी । दिधला शाळिग्राम करीं । दिव्य स्वप्नांतरीं त्यांच्या ॥१२॥
ते जहाले थोर संत-। दुसरे जणू दामाजीपंत । देवमामलेदार वदत । प्रसिद्ध पावले या नामें ॥१३॥
वेश्यसही त्या उद्धरिले । सन्मार्गासी तिज लाविले । अनंत लोकांवरी केले । उपकार ऐसे स्वामींनी ॥१४॥
एकाहुना एक सरस । वाचिल्या कथा रम्य सुरस । तेणे वाचक मनीं खास-। जाहलेती उल्हसित ॥१५॥
आणखी वाचू नवलकथा । पापनाशक ज्या सर्वथा । हरतील जेणे मनोव्यथा । कथा इक्षुरस प्राशूया ॥१६॥
एके दिनीं तिसरे प्रहरीं । वृद्ध यवन ये श्रींसमोरी । लोकांस पुसे आर्त स्वरीं । अवलिया स्वामी ये है क्या ॥१७॥
उंचा पुरा यवन उग्र । पाहता भ्याले जन समग्र । वाटे तयांसी हा अभद्र । दुष्ट यवन की आलासे ॥१८॥
तोंच त्यासी यति बोलिती । हम है खुद्‌ स्वामी, यती । ऐसें वदुनी त्या लक्षिती । प्रमार्द्र दृष्टिने योगेंद्र ॥१९॥
महदाश्चर्ये पाहती जन । मुहूर्तपर्यत स्तब्ध यवन । हरपे तयाचे देहभान । दिव्य समाधी पावे तो ॥२०॥
धन्य धन्य हे यतिवर्य । अपूर्व त्यांचे सर्व कार्य । यवनास  केले त्या हतवीर्य । केवळ एका कटाक्षाने ॥२१॥
स्तंभित होती जन समस्त । ‘आ’ वासुनी आपसांत । नेत्रसंकेते जणू वदत । यवन जिता एकें मेलासे ॥२२॥
कूर्मदृष्टिने अवलोकिता । भानावरी ये म्लेंछ पुरता । दिव्य यतिवर्य ते पाहता । वोलंगला चरणांवरी ॥२३॥
तेजःपूंज यांचीच मूर्ती । ध्यानांतरीं पाहिली होती । देव-देवता सभोवती-। होत्या नांदत तेधवा ॥२४॥
स्वामी प्रत्यक्ष खुदा असती। सामान्य नसती एक यती । प्रत्यक्ष आली मला प्रचिती । अल्ला मालिक असती हे ॥२५॥
बहोत फकिर फुकरे । साई, हजरत मांत्रिक खरे । अल्ला इलाही आपही खरे । हमने आपको समज लिया ॥२६॥
ऐसे म्हणे अत्यानंदे । चरण चुरी प्रेमानंदे । आपको अभी नहीं भुलेंगे । दिलमे हमने पकड लिया ॥२७॥
यवनेत्रीं अश्रु गळती । वृद्ध काया थरथरे ती । स्तवन करण्या शद्व नसती । कर जोडुनी उभा ठेला ॥२८॥
स्वामी अत्यंत गहिवरले । यहां बैठो ’ तया वदले । तया पाठी गोंजारिले । प्रमातिशये योगेश्वरे ॥२९॥
घरको वापस चले जाना । हमेशा हमारी याद करना। फिकिर कभी भी नहीं करना । यादसे मैं मिळता हूं ॥३०॥
आशीर्वाद मिळायासी । भाग्य लागए थोर त्यासी । साष्टांग वंदुनी चरणांसी । यवन निघाला स्वस्थानीं ॥३१॥
मैं तो मामुली जमादार । आप अल्ला परवरदिगार । आपका बंदा खबरदार-। तुम्हारी चाकरी करनेमे ॥३२॥
सांगुनी ऐसे यवन गेला । समर्थे तयासी उद्धरिला । करुणासागर प्रेमलीला । ऐशी आहे अपूर्व ॥३३॥
जातपात ना पाहती ते । मूर्ख किंवा ज्ञानीहि ते । अंतरीं तळमळ हवी तेथे-। गरीब असो वा श्रीमंत ॥३४॥
यास्तव प्रभुचे करु स्मरण । रक्षील आपणां जगजीवन । करुणा करिती करुणाघन । आर्त होउनी स्मरती जे ॥३५॥
गगनासम ते मन विशाल । क्षमा, शांती । ह्रदयकमलही अति कोमल । अपराधि जना उद्धरिती ॥३६॥
ऐका स्वामींची अपूर्वता । इचलकरंजीं विप्र होता । श्रीपाद भट्ट विद्वान मोठा । दर्शना आला स्वामींच्या ॥३७॥
मूर्ति गंभीर तेजस्वी । नेत्र तेजाळही मनस्वी । वर्ण केतकी दिव्य कांती । बघताच घालिती लोटांगण ॥३८॥
आजानुबाहू गंभीर, नाद-। ऐकता होती थक्क श्रीपाद। अपूर्व दर्शने निर्विवाद । घडले म्हणती आम्हांसी ॥३९॥
अत्यादरे नमिले तया । हार कंठीं घालोनिया । श्रीफल, पेढे अर्पूनिया । तांबूल, दक्षिणा ठेवियली ॥४०॥
करांजुलीसी जोडुनी पुढे-। बसुनि पाहती स्वामींकडे । कृपादृष्टी ती गरिबाकडे-। असो दयाळा जगदीश्वरा ॥४१॥
तदा यतिवर्य त्यां वदती । काही महिने काशीस वसती-। करोनि तुम्ही या मागुती । आज्ञापिती द्विजवर्या ॥४२॥
बोले तदा तो द्विजवर्य । आज्ञा आपुली शिरोधार्य । आवरोनी येथील कार्य । काशीस जातो सुनिश्चित ॥४३॥
श्रीपादभट्टजी शीघ्रगती । निघती जावया काशीप्रती । तेथे जाताचि ते करिती । वसती तेथल्या पंड्याघरीं ॥४४॥
गंगाप्रवाही स्नान करिती । जयजय गंगे भागीरथी । वारंवार स्मरण करिती । काशीविश्वेश्वराचे त्या ॥४५॥
गंगाललहरी नित्य म्हणती । संध्या-वंदन गंगेत करिती । अर्ध्यप्रदाने सूर्यस्तुती । करिती अत्यंत श्रद्धेने ॥४६॥
यथाशक्ती दानधर्म । करिती आपुले धर्म-कर्म । घाटीं पसरोनि व्याघ्रचर्म । जपजाप्यही करिती ते ॥४७॥
नित्य दर्शन विश्वेश्वराचे । बेल, पुष्पे वाहुनी साचे । अखंड चिंतन भगवंतांचे । रमले श्रीपाद क्षेत्रीं त्या ॥४८॥
प्रकांड पंडित वारानशीचे । दर्शना जाती हे तयांचे । ठेविती माथा पदीं त्यांचे । वर्तती श्रीपाद नम्रत्वे ॥४९॥
ऐसा तयांचा नित्य क्रम । वेदपठणीं घेती श्रम । कदा न चुकती घ्यावया नाम । योगेश्वरांचे अहर्निश ॥५०॥
वाराणशीचे महापंडित । श्रीपादभट्टां नच मानित उपेक्षा तयांची नित्य होत । मत्सरी, गर्विष्ठ पंडित महा ॥५१॥
श्रीपादभट्टजी अति सात्विक । वृतिने होते बहु भाविक । मिथ्या भाषण ना ठाउक । संत वृत्तिने ते वर्तती ॥५२॥
असह्य होतसे अपमान । जावे वाटेचि परतोन । उदास ऐसे जाहले मन । उद्विग्नपणे ते वावरती ॥५३॥
एके दिनीं प्रभातकाळीं । विश्वेश्वराच्या मंदिराजवळी गर्दी पाहती जमा झाली । जाती प्रत्यक्ष पहावया ॥५४॥
कर एक कटीं ठेवोनिया । प्रत्यक्ष पाहती यतिवर्या । तेज अलौकिक बघोनिया । विस्मित होती सर्व जन ॥५५॥
पांथस्थांतील कुणी वदती । यांस देखिले हिमपर्वतीं । निश्चित नसती सामान्य यती । महान तपस्वी असती हे ॥५६॥
तोंच दुसरे कुणी वदले । कालिमंदिरीं यां पाहिले । साधु-संते यां वंदिले । समक्ष देखिले तेथे मी ॥५७॥
तोंचि बोले तिसरे कुणी । अहो हे असती थोर मुनी वस्त्रविणे की हे राहुनी । हिमप्रदेशीं वसती सदा ॥५८॥
थंडी, वारा, ऊन, पर्जन्य । बर्फाळ त्या प्रदेशीं वन्य । वायु भक्षुनी राहती धन्य । यांचे समान देखिला ना ॥५९॥
ज्योतिर्मठाच्या सिंहासनी । विद्वान्‍ शंकराचार्य म्हणुनी । चातुर्मास तिथे करुनी । गादी त्यजोनी आले हे ॥६०॥
वेडेपिसे वर्तती हे । गालिप्रदाना करताति हे । चतुर्वेदांसि जाणती हे । योगविद्या पारगंत ॥६१॥
निःसंशय हे असामान्य । भूत, भविष्य, वर्तमान । देखिला ना कुणी अन्य । वाचासिद्धी प्राप्त असे ॥६२॥
एक वंगीय विप्र आला । स्वामींस बघताक्षणीं वदला । दुर्गाघाटावरी मजला । यांचा अनुभव आलासे ॥६३॥
अत्यानंदांत घाटावरी । बसलो असता आम्ही सारी । मौज पाहत नदीतीरी । आले थिथे हे यतिवर्य ॥६४॥
आम्हां संन्निध बैसोनिया । प्रश्न मनांतिल जाणोनिया । अचूक उत्तरे देवोनिया । चकित केले सर्वासी ॥६५॥
साधु असते हे मन कवडे । अनुभव आले मन रोकडे । अवघड पडले जरि सांकडे । लीलया हे निवारिती ॥६६॥
जनतेमाजीं विविध लोक । असती काही दुष्ट छलक । आणून अर्पिती मद्य, अर्क । आग्रह करिती प्या म्हणुनी ॥६७॥
तोच घडले एक नवल । सौंदर्यवती परम कोमल-। प्रकट जाहली अंगना विमल । जनसंमर्दी अवचित ती ॥६८॥
सुगंध दरवले सभोवार । हार पुष्पांचे मनोहर । स्वर्ण रत्नांचे अलंकार । प्रकटली गंगा स्त्रीरुपे ॥६९॥
इंदुवदना सुहासिनी । मधुर वाणिने बोले जनीं । यति न असती क्षुद्र कुणी । प्रत्यक्ष ठाकले परब्रह्म ॥७०॥
चेष्टा, कुचेष्टा करिता कुणी । लागेल ऐकण्या शापवाणी । सावध असावे तुम्ही म्हणुनी । हितास्तव मी सांगतसे ॥७१॥
उपदेशुनी दिव्यांगनेने । मद्य, मांसा स्पर्शिता तिने-। सुग्रास त्यांचे पक्कान्न बने । पाहता जन आश्चर्यले ॥७२॥
अतर्क्य घडले तदनंतर । पाहत असता जन समोर । दिव्यांगना नी योगेश्वर । अदृश्य जाहले निमिषार्धी ॥७३॥
जागेपणीं कीं स्वप्नांत । आपण होतो काय बघत । दिव्य व्यक्ती मंदिरांत । बघता बघता अदृश्य त्या ॥७४॥
विस्मित होती सकल जन । काय वदावे हे न सुचुन । दृश्य अघटित असामान्य । महत्‍ भाग्य की बघण्या मिळे ॥७५॥
दिङ्‍मूढ होती श्रीपादभट । कैसे घडले हे अघटित । प्रज्ञापुरींचे समर्थ होत । मजला ऐसे वाटतसे ॥७६॥
कौपीन कटीं, उंचे पुरे । तेजाल नेत्र जणु ते हिरे । आजानुबाहू रुप गोजिरे । स्वामीच होते सुनिश्चित ॥७७॥
तर्कवितर्का मनीं करित । दूर बैसले ते निवांत । तोंच मागुनीं पाचारित । अरे श्रीपाद इकडे ये ॥७८॥
चमकुनी पाहती श्रीपाद । दृश्य दिसले त्याम अगाध । स्वामीच होते निर्विवाद । तात्काळ श्रींचे चरण धरी ॥७९॥
घळघळा वाहती अश्रूंसरी । रडता, स्फुंदता परोपरी । स्वामिमाउली सांत्वन करी-। पाठीवरी फिरवुनी कर ॥८०॥
समर्थ आपण अकस्मात । कैसे तेथे प्रकटलांत । जाणुनी तुझी चिंताग्रस्त-। स्थिती सत्वर आलो मी ॥८१॥
मातेहुनीही ते ममताळू । सद्‌गुरुमूर्ती अति कृपाळू । निजभक्ताचा सांभाळू-। उडी घालुनी करिती ते ॥८२॥
विप्र काशिचे अति विद्वान-। जाणतो मी हे संपूर्ण । तयांचा करण्या गर्वहरण । सभेसि त्यांच्या त्वा जाणे ॥८३॥
समर्थ मी तो अल्पमती । माझी कसली योग्यता ती । चारही वेदांत त्यांची गती । मी तो केवळ बापुडा ॥८४॥
स्वामी मस्तकी कर ठेविती । माझी आज्ञा अनुसरे ती । सांगता मी कसली भीती । पहा जाउनी काय होते । ॥८५॥
आज्ञा शिरसावंद्य मजला । सभेसि जाया तदा सजला । प्रकांड पंडित सभें जमला । श्रीपादभट्टही बसती तिथे ॥८६॥
वेदगर्जना जाहली सुरु । हातवारे लागले करु । गर्जतां लागले चुका करु । श्रीपाद तयां विरोधिती ॥८७॥
धडता ऐसे अनेकवार । श्रीपाद शास्त्री तापले फार । पंडित मनीं लाजले थोर । म्हणती अक्षम्य चुकलो की ॥८८॥
श्रीपादशास्त्री वेद म्हणती । स्वरोच्चारे शुद्ध असती । श्रवण करिता स्तब्ध होती-। पंडितांची सारी सभा ॥८९॥
वनीं गर्जतो सिंह जैसा । श्रीपाद शास्त्री म्हणे तैसा । पाहिला ना म्हणणार ऐसा । म्हणो लागले विद्वदजन ॥९०॥
मनीं लाजले काशीकर । साष्टांग घालिती नमस्कार । धरोनि हातीं तयांचा कर । उच्चासनीं त्या बैसविले ॥९१॥
अत्यादरे त्या गौरविले । कंठीं तयांच्या हार पडले शाल अर्पुनी सन्मानिले । बिदागीही थोर दिली ॥९२॥
ऐसा घडला चमत्कार । श्रीपादशास्त्री मनीं चूर । धन्य धन्य ते योगेश्वर । त्यांचीच सारी किमयाही ॥९३॥
जरि न भेटते आज स्वामी । ठरलोच असतो मी निकामी । तृणवत्‌ जीवन नसे नामी । केलीच असती आत्महत्या ॥९४॥
रक्षिले माते श्रीजगदीशे । ऋण हे तयांचे फेडू कसे । गुरुदर्शनाचे लागे पिसे । शोधितो परी मिळती ना ॥९५॥
मंत्रजागरा आमंत्रिती-। नित्य श्रीपादभट्टांप्रती । पंडित जाणती योग्यता ती । विद्वतरत्न म्हणोनिया ॥९६॥
महा बिदागी प्राप्त होता । प्रसन्न वाटे तया चित्ता । विद्वान विप्राम भोजनाकरिता । निमंत्रिती ते आनंदे ॥९७॥
भिष्टांन्नावरि मिष्टान्न । आग्रहे स्वये वाढिले अन्न । आकंठ जेविता हो प्रसन्न । विप्रसमुदाय काशीचा ॥९८॥
त्री दिन चाले ऐसा क्रम । विप्रभोजन हाचि नेम । तैसेचि गरिबां दान परम । केले तयांनी सप्रेमे ॥९९॥
दक्षिणा-तांबूल ब्राह्मणांसी । हार-गजरे अर्पिले त्यांसी । विनम्रपणे आमंत्रितांसी । निरोप देती श्रीपाद ॥१००॥
जाणे असे स्वस्थलासी । अनुज्ञा मागतो आपणांसी । चार महिने राहिलो काशी । जाणे आम्हां गुरुदर्शना ॥१०१॥
असोनि पंडित अति महान-। आपुली योग्यता जाणिली न । करावे आम्हाम क्षमा दान । मंडळी प्रार्थिती श्रीपादां ॥१०२॥
काशिचे पंडित तुम्ही थोर । तुम्हापुढे मी अति पामर । सुद‌गुरु माझे कृपासागर । रक्षिती मातें पदोपदीं ॥१०३॥
परतोनि आले प्रज्ञापुरीं । हर्ष दाटला ह्रदयांतरीं । दर्शन घडता चरण धरीं-। श्रीस्वामींचे ह्रदयीं ते ॥१०४॥
अश्रुंनी न्हाणिले यतीचरण । शब्द न फुटे मुखामधुन । गोंजावरुनी त्यां अति सांत्वन । स्वामी समर्थ करिती ते ॥१०५॥
 आवरोनी भावनावेग । श्रींस पूजिण्या यथासांग । केशर, कस्तुरी अष्टगंध । आणिल्या सुगंधी फुलमाळा ॥१०६॥
बेल, मोगरा, वैजयंती । गुलाब, केवडा, नी शेवंती । सोनचाफा भुलवी अती । गंधे दरवले आसमंत ॥१०७॥
दक्षिणा, श्रीफल, तांबूल, फळे-। मेवामिठाई यां अर्पिले । टाळ-मृंदगी भजन चाले । मैफल झाली गवयांची ॥१०८॥
उत्सवासम करि पूजन । श्रीपादभट्ट ते गहिंवरुन-। स्वामींस म्हणती दयाघन-। अखंड आपुली असो कृपा ॥१०९॥
मिळतां तयांसी अभयदान । धन्य जाहले तद्‌ जीवन । वरिल कथेचे सार म्हणुन । भक्ती करुया स्वामींची ॥११०॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामींकृपे सर्वथा ॥१११॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-04-12T07:19:41.6170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

multistage

  • (having successive operating stages; conducted by stages) बहुपद- 
  • बहुपदी 
  • बहुपद- 
  • बहुपदी 
RANDOM WORD

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site