TransLiteral Foundation

कथामृत - अध्याय एकविसावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


अध्याय एकविसावा
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीव्यंकटेशाय नमः । नमितो श्रीकृष्ण योगेश्वर ॥१॥
गताध्यायीं अद्‌भुत कथा । वाचिता जाहला तोष चित्ता । श्रीस्वामींचे चरित्र गाता । मनोमालिन्य नासेल ॥२॥
आता आपण वाचू पुढे । स्वामी-कृपेने जे जे घडे । कुवासनेला जाती तडे । जडेल श्रद्धा श्रीचरणीं ॥३॥
नरजन्म हा सार्थ व्हाया । पुण्यकर्मी झिजविणे काया । संतवनामृत सेवाया । तत्पर असणे अहर्निश ॥४॥
समर्थनामी म विशेष--। रंगोनि जावो अहर्निष । तुटता माया मोह पाश । होईल जाणा आत्मोन्नती ॥५॥
वाचू आता सामर्थ्य कथा । धावती भक्ताकरिता स्वता । वारिली कैशी शरीरव्यथा--। वामनबुवा या भक्ताची ॥६॥
एकाच वेळीं बहुत व्याधी । उत्पन्न जाहल्या शरीरामधी । संधिवात । संधिवात नी मूळ्व्याधी । खोकला आदि नेत्रपीडा ॥७॥
मूत्रविकारेही पीडिले । उपाय करिती भले भले । स्वामिसेवेसि ना चुकले । जरी होते अति रंजित ॥८॥
बडोदेग्रामीं स्वगृहाप्ती । होते करोनी वसतीसी । माता-पिता बंधू ऐसी । शुश्रुषा करिती रात्रंदिन ॥९॥
चिंता निद्रानाश छळिती । ज्वरे गळाली सर्व शक्ती । ऐशी असता दारुण स्थिती । सेवा तयांची चुकली ना ॥१०॥
अनन्य भावें यतिचिंतन । चाले तयांचे रात्रंदिन । देहममता निवारुन । ध्यान करिती स्वामींचे ॥११॥
दुर्मिळ भक्तजन । अप्राप्य तयांचे दर्शन । ऐशा भक्तासही नमन । करु आपण नम्रत्वे ॥१२॥
वाचा जाहले पुढे काय । भयाण असता रात्रसमय । यातना होती त्यां असह्य । वाटे करावी आत्महत्या ॥१३॥
कोणासही ना कळू देता । अमावास्या रात्र असता । सूरसागरां समिप येता । जीव द्यावया उत्सुकले ॥१४॥
उतरोनि पायर्‍या जलानजिक । येता करिती ते विवेक । स्वामींस मारुनी एक हांक । उडी टाकण्या सिद्ध झाले ॥१५॥
घटना अति अद्‌भुत । हात धरोनी । तयां वदत । आयुर्मान असे बहुत । जीव कशास्तव देतोसी ॥१६॥
स्वामी प्रत्यक्ष हात धरिती । वामन जाहले स्तिमित अती । माउली माउली असे वदती । समर्थ चरणां कवटाळिले ॥१७॥
धन्य धन्य गे गुरुमाउलीं । भक्तरक्षणीं उडि घातली । उक्ति आपुली सार्थ केली । उच्चारिली जी गीतेत ॥१८॥
वामनानेत्रीं अश्रुपात । रुद्ध तयांचा कंठ होत । शब्द मुखांतुनि ना उमटत । अवाक होती वामनबुवा ॥१९॥
पुनश्च न करी दुर्विचार । हातीं धरोनी आणिती वर । वदती । करिती । शोध फार-। दुःखातिरेके माता-पिता ॥२०॥
प्रेमे वामना शांत केले । स्वये तयांसी गृहीं नेले । बघता अत्यंत आनंदले । माता-पिता स्वसा बंधू ॥२१॥
गमे सर्वासि आश्चर्य । गृहीं येताचि यतिवर्य । सफल जाहले जन्मकार्य । शतजन्मांचे वाटे की ॥२२॥
तोंचि वामना वदले यती । भोग भोगिल्याविण ना गती । ठेवि आपुली सुस्थिर मती । शरीरपीडा निरसेल ॥२३॥
अमृतवाणी अशी श्रवणीं-। पडता हर्षले सर्वही मनीं । ठेवण्या मस्तक यती चरणी-। जाती माता-पिता बंधू॥२४॥
तोचि वर्तले महा नवल । अदृश्य जाहले चरणकमल । वामनबुवादी मुग्ध सकल-। होति पाहता अद्‌भुत हे ॥२५॥
कालांतरे की तदनंतर । व्याधिमुक्त ते होय शरीर । अन्नोदकाचा स्वीकार । करु लागले वामनबुवा ॥२६॥
पत्र लिहिती धीपुरीसी । दिव्य स्वामीसमर्थासी । अपूर्व घडलेल्या वृत्तासी । यथार्थपणे भक्तीने ॥२७॥
थोड्या दिनीं ते प्रत्युत्तर । आले तयांसी अभयकर । निराश होउनी अतःपर। आतताई न वर्तावे ॥२८॥
उरली व्याधी इथे येता । जाईल निःशेष ती सर्वथा । चिंता करणे नको आता । आम्हास चिंता सर्वस्वी ॥२९॥
आश्वासनाचे पत्र बघता । धारण केले मस्तकी स्वता । समर्थाचे स्मरण होता । नेत्रीं वाहती अश्रूंसरी ॥३०॥
वामनबुवा वेदज्ञ थोर । वैय्याकरणी विद्वान फार । नाना शास्त्रांत अधिकार असे तयांचा या लोकीं ॥३१॥
अपूर्व भक्ती स्वामींवरी । कुणा न ये त्यांची सरी । दुर्लभ ऐसा पृथ्वीवरी । भक्त बघाया न मिळे की ॥३२॥
योगेश्वरांच्या अशा गोष्टी । वाचिता ऐकता मिळे तुष्टी । संसारीं जे सदा कष्टी । निराशा तयांची निरसेल ॥३३॥
समर्थाचा दुजा भक्त । तयांवरी जो परमासक्त । दैवत त्याचे एक फक्त । स्वामी समर्थ असती ते ॥३४॥
चोळाप्पा हे नांव त्याचे । समर्थाचे नांव वाचे । चित्त रंगले असे साचे । समर्थचरणीं अनुरक्त ॥३५॥
हासापुरी यती जाता । चोळा जाई त्यां मागुता । स्वामी समर्था क्रोध येता । वदती चालता होई तू ॥३६॥
सोडी न चोळा पाठलाग । स्वामींस येई तदा राग । माझिया मागे का भगभग । आम्ही आहोत संन्यासी ॥३७॥
आम्हापाशी नसे काही । द्यावयासी तुला पाही । संसार करुनी सुखे राही । परतोनि जावे स्वस्थानीं ॥३८॥
शिव्यांची वाहती लाखोली-। स्वामी चोळ्यास त्या वेळीं । परंतु चोळा महा वल्ली । पाया पडोनी त्यांसि वदे ॥३९॥
बायकापोरा मी त्यजीन । द्रव्यहव्यास सोडीन । सर्व संसार मोडीन । प्रेम आपुले जिंकाया ॥४०॥
दगड मारिती शिव्या देती । जा जा परतोनि त्या वदती । नृसिंहरुपा तदा घेती । करिती गर्जना भयंकर ॥४१॥
चोळाप्पाही अति खंमग । दगड चुकवी चोरुनी अंग । बेतला प्राणावरि प्रसंग । तरि न जाणार मी मागे ॥४२॥
बघता तयाचे निश्चयी मन । अंतरीं द्रवले दरुणाघन । निज पादुका करुनि दान । म्हणती यांचे पूजन करी ॥४३॥
पादुका हदीं कवटाळिल्या । निज मस्तकी तये धरिल्या । गृहीं नेउनी त्या स्थापिल्या । पूजा-अर्चा नित्य करी ॥४४॥
ऐसे काही दिवस जाता । पसरले लोकी गोड वार्गा । पादुकांसी नवस करिता । पूर्ण होती मनकामना ॥४५॥
चोळाप्पाचे घरीं येती-। लोक पूजन नित्य करिती । सर्व संकटे नष्ट होती । लोकीं श्रद्धा बळावली ॥४६॥
नाना तर्‍हेचे दुष्टांत । इष्ट कामना सफल होत । मार्गदर्शना नित्य करित । भक्तकाम श्रीकल्पद्रुम ॥४७॥
एकेवेळीं काय झाले । चोळाप्पाचे मनीं आले । स्वामी समाधिस्थळ निर्मिले । तये आपुल्या गृहांतरी ॥४८॥
चोळाप्पासी यती वदले । कशासि हे रे त्वां निर्मिले । उगिच आपुले’ असे बोले । स्वामी तेधवा वद्ले त्या ॥४९॥
यांत घालुने आधी तुला । मागुनी जाणे असे मजला । पुढे तैसेचि प्रत्ययाला-। आले जनांच्या की सत्य ॥५०॥
स्वामी पूर्वी सहा महिने-। गमन केले की तयाने । तदा यतिवर्य उदासमने । वदती माझा भक्त गेला ॥५१॥
बाळाप्पा हे दुजे भक्त । समर्थासी प्रिय अत्यंत । असोनि घरचे सुखी येत--। सेवा करावा स्वामींची ॥५२॥
हवेरी गावचे राहणारे । सावकारी सराफी करणारे । श्रीमंत म्हणोनी नांदणारे । भक्त ऐसे बाळाप्पा ॥५३॥
बाळाप्पा करिती मनिं विचार । प्रथम गाठणे गाणगापुर । नृसिंहस्वामी योगेश्वर । सेवा तयांची करु तेथे ॥५४॥
जाळोनि सारी मोहमाया । लागले सेवा ते कराया । भिक्षांदेही करोनिया । उग्र तपासी आचरती ॥५५॥
त्रिकाल समयीं स्नान करिती । जपानुष्ठान करिती अते । दत्तात्रयांच्या ध्यास घेती । व्हावे दर्शन म्हणोनिया ॥५६॥
चालता ऐसा नित्य क्रम । दृष्टांत तयां होय परम । होणार नाही इथे काम । तपःसाधना केली जरी ॥५७॥
स्वप्निचा साधू वदे त्यासी । अक्कलकोटीं जरी जासी । भेटेल तेथेचि संन्यासी । अनन्यभार्वे तयां ॥५८॥
होता सुस्पष्ट दृष्टांत । क्षणांत आले जागृतीत । प्रातःकालीं सिद्ध होत । जावयासी प्रज्ञापुरीं ॥५९॥
पायी करोनि ते प्रवास । सायंकाळी धीपुरीस-। येता करिती चौकशीस-। कोठे वसती यतिवर्य ॥६०॥
पुसता जनांसी त्यांस कळले । खासबागेंत यती बसले । बाळाप्पा ते त्वरित गेले । दिव्य दर्शन घडे तया ॥६१॥
स्वर्णकांती भव्य यष्टी । मर्मभेदक तीक्ष्ण दृष्टी । संतुष्ट होती जीव कष्टी । दर्शन घेता स्वामींचे ॥६२॥
बाळाप्पाने कवटाळिले-। चरण पावन अभिषेकिले । दीन दुर्बळा मज रक्षिले-। पाहिजे आपन योगेश्वरा ॥६३॥
बाळाप्पाची वज्र भक्ती । पाहुनी ती विरक्त वृत्ती । स्बामी प्रसन्न नित्य असती । भाग्यवंत ते बाळाप्पा ॥६४॥
आजानुबाहू हास्य मुद्रा । कौपीन शोभे कटि मुनिंद्रा । पाहता पडावी भूल इंद्रा । ऐसे यतींद्र तेजस्वी ॥६५॥
बाळाप्पाची सेवा अखंड । रात्रंदिन त्या नसे खंड । चरणसेवा करि उदंड । बघुनी स्वामी संतोषले ॥६६॥
स्वामींस घाली नित्य स्नान । स्वहस्तें भरवी त्यां भोजन । निद्रासमयीं अंग मर्दन । नित्य नेमे करित असे ॥६७॥
हनुमंताच्या मंदिरांत । बैसोनि करिती जप निवांत । स्वामी समर्थ हे दैवत । अन्य दैवत ज्ञात नसे ॥६८॥
एके रात्रीं काय झाले । धिप्पाड काळेकभिन्न भले । बाळाप्पासी भूत दिसले-। बसले तयाचे छातीवरी ॥६९॥
ठोश्यांवरी देत ठोसे । बाळाप्पासी म्हणे कैसे । ठिकाण हे तों माझे असे । ऊठ चालता होई तूं ॥७०॥
भयाण ऐसे स्वप्न पडले । रात्री किंचाळुनी उठले । वाचवा वाचवा मातें भले । स्वामीसमर्थ धावाहो ॥७१॥
तोंच पाहती चमत्कार । प्रत्यक्ष आले श्रीसमोर । वदती तया देउनी धीर । निर्धास्त रहावे तूं येथे ॥७२॥
आसनाभोवती हिंडोनी । दिग्बंध करिता समर्थानीं । बाळाप्पा रमले अनुष्ठानीं । पुन्हा दिसले पिशाच्च ते ॥७३॥
समर्थचरणीं बाळाप्पांची । वज्र निष्ठा असे साची । उपमा तयां द्यावयाची । रामासि जैसा हनुमंत ॥७४॥
जाणुनी आपुला निर्याणकाळ । बाळाप्पासी बसवुनी जवळ । भाषण करिती अति प्रेमळ । श्रवण करिती बाळाप्पा ॥७५॥
दिव्य पादुका करीं घेती । निज आंगठी काढुनी देती । बाळाप्पासी समर्थ वदती । आत्मलिंग की तुज दिधले ॥७६॥
माझा वारसा चालवावा । भक्तिचा महिमा वाढवावा । आर्त जनांसी दाखवावा । मार्ग अध्यात्म हितकारी ॥७७॥
समर्थाच्या आज्ञेनुसार । लोकोद्धारार्थ ते संचार-। करित हिंडले अवनीवर । बाळाप्पा भक्त स्वामींचे ॥७८॥
अपार तयांचा शिष्यगण । सर्वास करिती मार्गदर्शन । लोक करिती गुण्गायन । धन्य धन्य ते बाळाप्पा ॥७९॥
अक्कलकोटीं मठ स्थापिला । समर्थ पादुका त्या स्थापिल्या । सांज सकाळीं पूजनाला । नैवेद्य-आरती होत असे ॥८०॥
भविष्यवाणी समर्थाची । प्रत्यया आली जनां साची । कीर्ति पसरली बाळाप्पाची । प्रतिसमर्थ ऐशी म्हणोनिया ॥८१॥
नामे सुंदराबाई एक । स्वामींपदीं दिन कित्येक-। राहुनी भोगी सेवासुख । भाग्यवान ती सर्वस्वी ॥८२॥
प्रातःसमयी स्वामींस स्नान । चुकला न कधी तिचा नेम । स्वकरें भरवी त्यां भोजन । नाना पदार्थ प्रेमाने ॥८३॥
कोपिष्ट बाई स्वभावाने । सेवा करिता ती दुजाने-। आकांत तांडव करिता तिने । सेवक होती भयभीत ॥८४॥
फळे, खारका आणि पेढे । येता पदार्थ स्वामींपुढे । उचलोनी ठेवी स्वतःकडे । लोभिष्ट असे अत्यंत ॥८५॥
चोळाप्पाचे आणि तिचे । नित्य भांडण कडाक्याचे । उचलोनि घ्यावे कुणी पुढचे-। पदार्थ येता स्वामींपुढे ॥८६॥
चोळ्यास स्वामी तदा वदती । वाटील मिरी माथ्यावरी ती । सुरवातीस तुला मी ती । दिधली होतीच कल्पना ॥८७॥
बाळाप्पाशी मैत्री तिची । चोळ्यास तेथुनी काढण्याची । नाना तर्‍हेच्या युक्त्या रची । स्वार्थाध बाई अत्यंत ॥८८॥
प्रज्ञापुरीची महाराणी । कोपिष्ट बनली संशयानी । बाई देवेतसे चिथावणी । असे उन्मत्त चोळाप्पा ॥८९॥
दुष्ट कारस्थानी । बाई विख्यात धूर्त म्हणुनी । चोळाप्पासी दूर करुनी । दावा साधिला हीनपणे ॥९०॥
पुढे पुढे बाळाप्पाची । स्वामिभक्ती पाहुनी साची-। स्तुती करिती लोक त्याची । बाईस न पुसे कोणीही ॥९१॥
बाळाप्पाची वाढती स्तुती । ऐकता जाहली संतप्त ती । निश्चय करी कुटिल मती । बाळाप्पासी काढावया ॥९२॥
कुभांडे रचिली तिने नाना । राणिच्या फुंकिले तिने काना । बाळाप्पा पक्का लबाड जाणा । तया सत्वर काढावे ॥९३॥
चौर्यकर्म नसता देहभान । चोरितो वस्तू हा महान । सद्‌भक्ताचा आव आणुन । चौर्यकर्म की नित्यकरी ॥९४॥
निमित्त करुनी भांडे सदा। द्वेष । करितो सदा माझा । कोठुनी आली ही आपदा । सुंदराबाई ऐशी रडे ॥९५॥
प्रज्ञापुरीची महारानी । ऐकता हे तापली मनीं । बाळाप्पासी वदली झणी । मठी सोडुनी जावे त्व ॥९६॥
साश्रु नयने साष्टांग नमन। करुन स्वामींस करी गमन । हनुमंताच्या मंदिरीं बसुन । अनुष्ठान करी स्वामींचे ॥९७॥
बाईस स्वामी तदा वदले । लुटोनि ने तू अता सगळे । मिळणार ना पदार्थ असले । पहावया गे पुढती तुला ॥९८॥
दिवस ऐसे जात असता । उन्मत्तपणे ती वर्तता । भक्तवृंद तो त्रासला पुरता । तक्रार गेली नृपाकडे ॥९९॥
सरकारचे लोक आले । बाईस दरडावुनी वदले । जे जे चोरुनि साठविले । स्वाधीन आमुच्या सर्व करा ॥१००॥
बाई करी ती आक्रोश । कर्मा फिरले काय दिवस । स्वामी वाचवा कन्येस । गडबडा लोळे धरणीवरी ॥१०१॥
स्तंभित होती फौजदार । आ वासुनी श्रींसमोर । बोलती तयासी मुनीश्वर । कर्तव्यं आपुले चोख करी ॥१०२॥
उघडुनी पाहती तिची खोली । नाना वस्तूंनी असे भरली । चीजवस्तु ती जप्त केली । पाठविली ती सरकारीं ॥१०३॥
बाईस आज्ञा या क्षणासी । सोडोनी जावे या मठासी । पुनश्च येता या स्थलासी । कैद होईल हे जाणा ॥१०४॥
रडे, ओरडे, चरफडे ती । परी शिपाई तीस नेती । घडे भरता ऐशी स्थिती । जाहली स्वामींसमक्ष ॥१०५॥
वर्तन असोनी अति सोज्वल । समर्थस्मरणीं घालवी वेळ । समर्थ करिती सर्व काळ । संरक्षण त्या भक्ताचे ॥१०६॥
श्रीस्वामी समर्थ ऐसे । नामनुष्ठान करण्या बसे । स्वामीविण त्या ज्ञात नसे । अन्य दैवत कुठलोही ॥१०७॥
बघुनी तयाची भक्ति विमल । अंतरीं द्रवले यति कोमल । सेवा तुझी होय सफल । प्रसन्न आम्ही तुजवरती ॥१०८॥
श्रीमंत येता दर्शनासी । स्वामी तयांसी आज्ञापिती । जपानुष्ठान सांगतेसी-। बाळाप्पासी साह्य करा ॥१०९॥
बाळाप्पा ते गरिब फार । समर्थाचा त्या अधार । तयांवरी घालुनी भार । करी व्यवहार सर्वही ॥११०॥
सद्‌भक्तास्तव करुणालय-। समर्थाचे ह्रदयकमल । यास्तव यास्तव त्यांचे चरणकमल । स्मरु कल्याण साधाया ॥१११॥
एके दिनीं कनोजी ब्राह्मण । आला घ्याया स्वामिदर्शन । दर्शन घेता कर जोडून । उभा राहिला सामोरी ॥११२॥
नित्य नेमे नैवेद्यासी । दाखवी विप्र यतिवरांसी । नंतर करी भोजनासी । ऐसा कनोजी भक्ताळू ॥११३॥
आणिता एकदा नैवेद्यासी । स्वामी वदले तदा त्यासी । घेवोनि जा हा मशिदीसी । श्वान आणि फकिरास्तव ॥११४॥
मानोनि आज्ञा ती प्रमाण । दुसर्‍या दिनीं सुग्रास अन्न । श्वान फकिरास की नमुन । नैवेद्य अर्पिला सप्रेमे ॥११५॥
फकिरापुढे ठेवुनि ताट । राही उभा जोडुनी हात । फकिरे केला प्रश्न चोखट । स्वामिने तुमको भेजा क्या ॥११६॥
जी हां ऐसे विप्र बदला । फकिर भोजना तदा सजला । श्वानही सवे भोजनाला । एकत्र भक्षिती दोघेही ॥११७॥
विप्रा वाटे आश्चर्य थोर । ऐसे न देखिले आजवर । अवलिया दिसतो खरोखर । साष्टांग घालुनी नमन करी ॥११८॥
पात्री ठेवुनी वडा-खीर। अवलिया देई थोर ढेकर । श्वानासवे होउनी दूर । वदे ‘लेजाव वापस तुम’ ॥११९॥
आपकी मर्जी’ म्हणे ऐसे । मनीं वदे हे अपूर्व असे । भेदा-भेद या मुळी नसे । कोण असे हा अवलिया ॥१२०॥
परतोनि येता स्वामींकडे । यतिवर्य बघती विप्राकडे । हासुनी वदती त्या रोकडे । वडा-खीर ती भक्षी तूं ॥१२१॥
मानुनी शिरसावंद्य आज्ञा । बाजूस ठेवी स्वयंप्रज्ञा । पात्रिचे भक्षिले सर्व अन्ना । समर्थ तेणे संतोषले ॥१२२॥
साष्टांग वंदिले स्वामिचरणां । आले तयाच्या अश्रु नयना । हुंदका तयासी आवरेना । मनीं दाटले अष्टभाव ॥१२३॥
तयाचे मस्तकीं ठेविती कर । वदले तयाते कृपासागर । मुंबईस जावे तूं सत्वर । दस हजार तुमको मिलनेका ॥१२४॥
स्वामी मी तो हीन-दीन । मतीमंद मातें म्हणती जन । कलाकुसरी जाणतो न । पुसेल मजसी कोण तिथे ॥१२५॥
असलास जरी शुद्ध वेडा । भाव मजवरी नसे थोडा । भाग्योदयाचा काळ खडा । आहे तुझी रे मुंबापुरीं ॥१२६॥
विश्वसुनी स्वामीवचनीं । मुंबई गाठली त्वरा करुनी । नोकरी धंदा नसे म्हणुनी । वणवण हिंडे सर्वत्र ॥१२७॥
कुणी देता अन्न खावे । अथवा उपाशीही असावे । पाणी पिउनीही रहावे । निद्रा करावी कोठेतरी ॥१२८॥
वेड लागल्यापरी हिंडे । मार्गीचे गोळा करे तुकडे । वदे आलो कुठे इकडे । व्यर्थ सोडिले गावासी ॥१२९॥
एके समयीं की सकाळींहिंडता मूर्ती ही बावळी । प्राप्त होता बंगल्याजवळी। पाहिली दारांत शेठाणी ॥१३०॥
करीं तियेच्या एक पुडके । यासी पाहुनी पुढे सरके । तोंचि विप्र हा तिथे थडके । त्यासी तिने थांबविले ॥१३१॥
अरे विप्रा हे घे तुला । भाग्यवान रे तूंही भला । ऐसे म्हणोनी तिने दिधला । पुडा तयाच्या करांमाजीं ॥१३२॥
अहो हे मातें काय देता । गरिबाचा का घात करिता । अपराध माझा मुली नसता । संकटी मज ना लोटणे ॥१३३॥
ऐकुनी त्याची करुण वाणी । नयनीं आले तिच्या पाणी । जाऊ नका हो घाबरोनी । भाग्य तुमचे उदेले की ॥१३४॥
अखेरचा की नेम होता । दानधर्म मी नित्य करिता । विप्र मातें प्रथम दिसता । धन तयांसी अर्पिन हे ॥१३५॥
प्रथम दिसला मज आपण । धनाचे पुडके दिले म्हणुन । शांतपणे हे घ्या मोजुन । करोनि भोजन मग जाणे ॥१३६॥
मोजूनि पाहता खरोखर । द्शसहस्त्र नोटा अति सुंदर । समर्थवाणिचे प्रत्यंतर । अवचित आले तयालागी ॥१३७॥
अवचित होता द्रव्यलाभ । जाहले तया ठेंगणे नभ । पावला मजसी पद्मनाभ । प्रज्ञापुराची प्रमामात्मा ॥१३८॥
हर्षतिरेके नर्तन करी । प्रेमाश्रूंच्या वाहती सरी । टाळ्या पिटोनी घोष करी-। समर्थाच पुनःपुन्हा ॥१३९॥
दारिद्रय माझे लया नेले । उपकार कैसे फेडू भले । नवजीवन हो मातें दिले । धन्य धन्य ते यतिवर्य ॥१४०॥
सुग्रास भोजन दिधले तया । दक्षिणा-तांबूल देऊनिया । मला-गजरे घालोनिया । ब्राह्मणा केले संतुष्ट ॥१४१॥
भेटेन केव्हां माउलीला । म्हणे ऐसे जाहले मला । वंदन करुनी शेठाणिला । वदे जावया आज्ञा असो ॥१४२॥
सामर्थ्य स्वामींचे अतर्क्य । श्रीमंत केले बहुत रंक । निःशंक मानि जो बोधवाक्य । तयावरी करिती कृपा ॥१४३॥
अनंत ऐशा कथा असती । ऐकता होईल कुंठित मती । नित्य वाचता जडे प्रीती । समर्थचरणीं सुनिश्चित ॥१४४॥
सद्‌भक्ताची कामनापूर्ती । भक्तवत्सल पूर्ण करिती । जयासि आली ही प्रचीती । वाचा तरी मग सत्यकथा ॥१४५॥
सीतारामपंत हे नाम । नेने जयाचे की उपनाम । श्रीरामाचे भक्त परम । भेटिकारणे तळमळती ॥१४६॥
साधना करिती ते अखंड । कधी न पडला मधे खंड । स्वामीकृपेस्तव तप उदंड । सीताराम ते आचरिती ॥१४७॥
निराश जाहले अत्यंत । जीवन तयां व्यर्थ गमत । समाधी घ्यावी नर्मदेत । ऐसे अस्वस्थ मानसीं ॥१४८॥
सुकीर्ति परिमल समर्थाचा । दाहीदिशा दरवळे साचा । ध्यास । घेउनी दर्शनाचा । जन धावती स्वामींकडे ॥१४९॥
नेने यांजला वाटे मनीं । स्वामीसेवा नित्य करुनी । कृपा तयांची संपादुनी । हेतु आपुला साधावा ॥१५०॥
अक्कलकोटीं त्वरे जाती । आजानुबाहू मूर्ति बघती । साष्टांग नमने वंदिली ती । अत्यादरे प्रेमाने ॥१५१॥
नेने यांचा नित्य नेम । मठीं करावे सर्व काम । स्वामींसमोरी  घेत नाम-। उभे राहती नम्रत्वे ॥१५२॥
ॐभवति हे नित्य करुन । प्रत्यही करिती ते भोजन  । करिती सदा रामस्मरण । सेवा करिता स्वामींची ॥१५३॥
श्रद्धापूर्वक अशी सेवा । मिळवावया कृपा-मेवा । बघुनी तयांच्या दिव्य भावा । प्रसन्न जाहले श्रीस्वामी ॥१५४॥
एके दुपारीं नवल घडले । नेने असता निद्रित भले । कोदंडधारी राम दिसले । तेजाळ मूर्ति विलक्षण ॥१५५॥
पाहुनी तुझी भक्ती-मती । प्रसन्न जाहलो तुझे वरती । स्वामी माझीच रे मूर्ती । भेद अंतरीं न करावा ॥१५६॥
परतोनि जा तूं सुखे सदनीं । समर्थचरणीं मन ठेवुनी-। नित्य वागने इये भुवनीं । तेणे पावाल सद्‌गती ॥१५७॥
सांगोनि ऐसे गुप्त झाले । नेने जागृत तदा झाले । समर्थचरणां आलिंगिले । तोचि पुसती यतिवर्य ॥१५८॥
भेटलेना तुझे तुजला । वृथा घातला भार मजला । जाई आता निजगृहाला । रामनामीं वर्तावे ॥१५९॥
स्वामी प्रत्यक्ष कल्पद्रुम । असा जयाचा भाव परम । होई तयाचे सफल काम । कथा सादर परिसावी ॥१६०॥
भक्त थोर । सरकारचे श्रेष्ठ नोकर । मुंबापुरीचे वजनदार । गृहस्थ होते नामांकित ॥१६१॥
समर्थदर्शना प्रज्ञापुरीं । काकाजींचे येइ स्वारी । जाताच श्रींचे चरणांवरी । शिर ठेविले नम्रत्वे ॥१६२॥
समर्थसेवा चोख करुनी । आज्ञा मागती जावया सदनीं । सेवानिवृत्त व्हावे कथुनी । देती अनुज्ञा जायासी ॥१६३॥
समुद्रासन्निध बांधणे मठ । सेवा आमुची करी नीट । केलिया सेवा फळ चोखट । मिळे तूंते सांगतसे ॥१६४॥
मुंबईसी त्वरित आले । सेवेतुनी निवृत्त झाले । स्वामीसेवेत पूर्ण रमले । गौण संसार मानिला ॥१६५॥
पत्नी तयांची महासाध्वी । बोलणे तियेचे अति आर्जवी । भजन पूजनीं मन गुंतवी । धर्मपरायण दोघेही ॥१६६॥
स्वामी प्रत्यक्ष दत्तात्रय । ऐसा तयांचा दृढ निश्चय । समर्थसेवेमधीं उभयी । निमग्न असती आनंदे ॥१६७॥
क्रमिता ऐसे काही दिन । साध्वी जाहली अती रुग्ण । उपाय केले जरि महान । उतार काही पडे न तो ॥१६८॥
मनीं तयांच्या नित्य ध्यास । उभवू आपण मंदिरास । करु उभयता पूजनास-। सुमुहूर्ती समर्थाच्या ॥१६९॥
साध्वी करी प्रार्थनेस । स्वामी माझ्या मनीं ध्यास-। करावे आपुल्या पूजनास । उभयता स्वये जोडीने ॥१७०॥
दुसरे दिनीं काय झाले । स्वामींकडोनी कुणी आले । तुम्हा कारणे असे दिधले-। पहा काय हे स्वामींनी ॥१७१॥
काका उठले अधिरतेने । गृहस्था नमिले आदराने । उघडुनी बघता कौतुकाने । हर्षनिर्भर नाचती ॥१७२॥
अहो तुम्हा जाहले काय । माउलीने धाडिले काय । ऐकिल्या मला आनंद होय । सांगा सांगा मज सत्वरी ॥१७३॥
स्वामी महा अंतर्ज्ञानी । तव मनिंचे जाणिले त्यांनी । दिव्य पादुका पाठवोना । कृपा केली अपूर्व हो ॥१७४॥
पादुकांवरी शिर ठेविता । पत्निच्या नेत्रीं अश्रुसरिता । कंठ दाटला शब्द पुरता-। कैसा तरी उमटेल ॥१७५॥
चरणपादुकाक येता घरीं । व्याधीं पळाया लागे दुरी । काले तयाच्या शरीरीं । आरोग्य आले अत्युत्तम ॥१७६॥
विचार केला उभयतांनी । पादुका स्थापन करु म्हणुनी । दत्तजयंती मुहूर्त धरुनी । संस्थापिल्या समारंभे ॥१७७॥
उत्सवाचा दिव्य थाट । तीर्थ-प्रसादा जन अलोट । भजन-कीर्तने ती अवीट । थोर उत्सव जाहला ॥१७८॥
स्वामीकृपेने विघ्न हरले-। म्हणोनि हे तो सर्व घडले । कृतज्ञतेने दर्शना भले । जाय जोडपे प्रज्ञापुरीं ॥१७९॥
घडता तयांना स्वामिदर्शन । ह्रदय येई उचंबळुन । लोचनाश्रू भिजाविती चरण । प्रसन्न होती श्रीस्वामी ॥१८०॥
मस्तकांवरी कर ठेविता । दंपती मानी कृतार्थता । आम्हांवरी असो ममता । देवा तुझी आजन्म ॥१८१॥
भक्तोत्तमासी संरक्षिती । समर्थस्वामी दयाळू अती । मनोरथासी पूर्ण करिती । अनुभव आले कित्येकां ॥१८२॥
असती जे की विद्वद्व्‌दजन । स्वामी असती ज्यां प्रसन्न । आर्त जना जे मार्ग दर्शन । करिती प्रत्यक्ष आजही ॥१८३॥
महाशास्त्रज्ञ ते असती । सेवानिवृत्त ते संप्रती । अध्यात्ममार्गीं श्रेष्ठ गती । नाम रामानंद जयां ॥१८४॥
प्रसिद्धिची नसे हाव । अलिप्त असणे हा स्वभाव । आढ्यतेचे नको नांव । शांत वृत्तिचे असती ते ॥१८५॥
समर्थ-आज्ञा असल्याविण । मी ना करी मार्गदर्शन । चरणधूलिचा मी तो कण । अंगीं ऐशी विनम्रता ॥१८६॥
तयासवे जे अति परिचित । सामर्थ्य त्यांचे त्या अवगत । केवळ प्रेमाग्रहे वदत । अनुभव प्रत्यक्ष आपुले ॥१८७॥
भगिनीचे ते जुळे न लग्न । काय येतसे आड विघ्न । तेणे होउनी काळजीमग्न । प्रार्थना केली स्वामींसी ॥१८८॥
त्याच रात्री दृष्टांत झाला । मंगळसूत्रा भगिनीचे गळा-। बांधिता स्वामी वदले मुला--। सोड चिंता सर्वही ॥१८९॥
नकार पूर्वी दिला होता । निरोप त्यांचा येई अता । मुलगी पसंत मातें स्वता । पुढे काय ते ठरवावे ॥१९०॥
लग्न जाहले चवथे दिनीं । यतिवर्याची अशी करणी । चिंता माझी सवे हरुनी । विमुक्त केले जगदीशे ॥१९१॥
ऐका दुसरी सत्य कथा । ऐकता वाटे तोष चित्ता । रामानंद गृहीं असता । गृहस्थ आले भेटीसी ॥१९२॥
रामानंदासि नमस्कार-। करोनी बैसले खुर्चीवर । चिंता दिसता मुद्रेवर । रामानंद पुसती तया ॥१९३॥
काय होतसे आपणांसी । बरे नसेका प्रकृतीसी । गृहस्थ वदले तदा त्यांसी । संग्रहणीचा ताप असे ॥१९४॥
उपाय केले जरी नाना । आराम कैसा तो पडेना । यास्तव आलो मी दर्शना । उपाय काही सांगावा ॥१९५॥
क्षणभर बसुनी स्वस्थ मग ते । सांगु लागले गृहस्थाते । कोय उगाळुन प्यावयाते । स्वामी सांगती तुम्हासी । ॥१९६॥
तैसेच एकदा पत्र आले । गोव्याहुनी ते असे लिहिले । एका स्त्रीने दुःख कथिले । म्हणे उपाय सांगावा ॥१९७॥
शरीरावरी डाग उठले । कुष्ठ पांढरे असे ठरले । आयुष्य ऐसे नको झाले । काय आता करु तरी ॥१९८॥
पत्र वाचता कळवळले । मनीं स्वामींस प्रार्थियले । काहीतरी पाहिजे केले । सांगा सत्वर उपाय तो ॥१९९॥
शांत असता निशासमयीं । संदेश कानीं दिव्य येई । उपाय कळता अपूर्वाई ।वाटली तदा सर्वासी ॥२००॥
करावयासी सांगे तिला । जळीं उकळी लिंब-पाला । पाणी घे तेचि स्नानाला । करी ऐसे दिन सात ॥२०१॥
स्वप्नांत रामानंद जाती । उपाय करण्या तिज सांगती । करिता नासेल व्याधी ती । सांगणे ऐसे स्वामींचे ॥२०२॥
पुढे आले तिचे पत्र । उपाय केला एक सात्र । निश्चिंत जाहले अता मात्र । उपकार आपुले अनंत की ॥२०३॥
स्वप्नांत स्वये येवोनिया । उपाय गेलात सांगोनिया । अपूर्व वाटली ही किमया । धन्य सामर्थ्य आपुले ॥२०४॥
साठे नांवाचे गृहस्थ । रुग्णालयीं होते स्थित । व्याधी प्रकटली उदरांत । निद्रेविना ते तळमळती ॥२०५॥
लागेल करावे शल्यकर्म । उपाय हाची एक परम । परंतु प्रकृती दुर्बलतम । उपाय करणे कठिण असे ॥२०६॥
सुपुत्र रामानंदाकडे-। येउनी तयांच्या पाया पडे । संकट मोठे आम्हापुढे । निवारावे कैसेतरी ॥२०७॥
रामानंद नृसिंहभक्त । तयां अंगीं संचार होत । क्षणभर बैसोनि ध्यानस्थ । वदती करी उपाय हा ॥२०८॥
वैजयंती तुळशिमाळा । घातल्या ज्या नृसिंहगळा । निर्माल्यातिल अष्टदळां । मुखीं तयांच्या घालावे ॥२०९।
रुग्णे भक्षिता आठ पाने । गाढ निद्रा लागली त्याने । दुःख पळाले जीवघेणे । आराम वाटे अत्यंत ॥२१०॥
क्षकिरणांचे सहाय्याने । पुन्हा पाहिले डॉक्टराने-। व्यक्त केले आश्चर्य त्याने । निमाली व्याधी ही कैसी ॥२११॥
शस्त्रक्रियेची नसे जरुरी । सुखे आपण जावे घरीं । प्रभूकृपाही तुम्हावरी । मुग्ध जाहले आश्चर्ये ॥२१२॥
ऐका आता नवल थोर । क्रांतिकारक महावीर । मित्र जयांचे सावरकर । ह्रदरोगे ते अस्वस्थ ॥२१३॥
पूर्वपरिचय मुळी नसता । कीर्ति ऐकुनी आले स्वता । रामानंदासि कथिती व्यथा । ह्रदरोगाची आपुली ॥२१४॥
दुसरे दिनीं स्वये जाती । भेटायासी भटांप्रती । रामानंदां पाहता अती । भटांसि वाटे आश्चर्य ॥२१५॥
याहो, याहो बस ऐसे । वंदोनि वदती तया कैसे । अवचित आपण याल ऐसे । कल्पना नव्हती मजलागी ॥२१६॥
रामानंद म्हणती तयां । निरोप आलो सांगावया । वेळ मज ना बसावया । आज्ञा ऐकणे स्वामींची ॥२१७॥
रामानंद सांगती स्पष्ट । ललितादेवी स्तोत्र श्रेष्ठ । नित्य वाचणे तुम्ही इष्ट । ह्रदयव्यथा वाराया ॥२१८॥
स्वामी आज्ञा मज प्रमाण । करीन पूजा-स्तोत्र पठण । रामानंदां दिले वचन । घालिती तया दंडवत ॥२१९॥
नित्य करिता स्तोत्र पठण । देवीकृपे प्रकृतीमान । सुधारता त्या समाधान । अनुभव सर्वास सांगती ॥२२०॥
गोरे नांवाचे गृहस्थ । रुग्ण तयांचा पुत्र होत । उपाय केले ते अनंत । उतार त्यासी पडेना ॥२२१॥
शल्यकर्मी जे निष्णात । तयांकडे पुत्रास नेत । तपासोनी वैद्य वदत शल्यकर्म ते अवश्य ॥२२२॥
उदरीं व्यथा होति घोर । शल्यकर्म ते अति जरुर । पुत्र होइना परि तयार । करोनि घेण्या शस्त्रक्रिया ॥२२३॥
रामानंदांकडे आली । माता-पिता एक वेली । काळजी आम्हांही लागली । कैसे करावे यालागी ॥२२४॥
बघता तयांची खिन्नस्थिती । रामानंदही द्रवले अती । चित्त एकाग्र तें करिती । म्हणती चिंता न करावी ॥२२५॥
शस्त्रक्रियेची नसे जरुर । विकार ना हा भयंकर । तीव्र औषध जंतावर । सत्वर देणे पुत्रासी ॥२२६॥
तात्काळ करिता तो उपाय । सांगितले ते सत्य होय । अल्प कालीं विकार जाय । आश्चर्य वाटे सर्वासी ॥२२७॥
अक्कलकोटचे योगेश्वर । प्रसन्न असती ज्यांचेवर-। रामानंद ते भक्त थोर । स्मरणमात्रे त्या पावती । ॥२२८॥
अहमदाबादेचे गृहस्थ एक । गुजराथी ते नाम जाचक । रामानंदभेटिचे सुख-। घ्यावया आले होते ते ॥२२९॥
रामानंद पुसती तयां । येणे आपुले ते कासया । सांगा आपुल्या मनोदया । संकोच अंतरी न करणे ॥२३०॥
अति नम्रत्वे विप्र गुजर । वदले तयां ऐकाच तर । शिवमंत्न जपतो आजवर । परंतु दर्शन च घडेची ॥२३१॥
नाम आपुले कळो येता । आलो इथे दर्शनाकरिता । गरिबावरी कृपा आता । आपण करा काही तरी ॥२३२॥
व्रतवैकल्ये सर्व केले । नाना तीर्था गमन केले । ध्येय परी ना साध्य झाले । काय माझे चुकते हो ॥२३३॥
जपामाजीं चूक काही । होतसे का वदा तीही । ऋणी आपुला राहीनही । करा मातें मार्गदर्शन ॥२३४॥
तदा रामानंद वदती । वेळ लागते यावया ती । आलियवारी पूर्ण होती । मनःकामना निमिषांत ॥२३५॥
इतर बोलणे जाहल्यावरी । गृहस्थ उठती जाया घरीं । रामानंदां विनती करी । दासावरी या लक्ष असो ॥२३६॥
गंभीर रामानंद होती । तीक्ष्ण दृष्टीने गृहस्थाप्रती । बघता अंगुष्ठ ते ओढिती । भरुमध्यांत तयांच्या ॥२३७॥
भान हरपले क्षणर्धात । शून्यावस्था प्राप्त होत । दिव्यानंदीं जाहले स्थित । अनुभव आला अपूर्व ॥२३८॥
तयां पाठीं फिरविता हात । उतरे समाधी तत्क्षणांत । हर्षातिरेके मूक होत । रामानंदां शरण रिघे ॥२३९॥
रामानंदांसि ते वदती । प्रत्यक्ष दिसली ईशमूर्ती । भाग्यवान मी आहे अती । धन्य आपुले सामर्थ्य ॥२४०॥
शालीन रामानंद वदती । माझी नसे ही खरी शक्ती । स्वामीसमर्थ हे करविती । आज्ञाधारक केवळ मी ॥२४१॥
श्रीकांत ठकार एक तरुण । नोकरी बघता जाय थकुन । तेणे अत्यंत वैतागून । म्हणे करावी आत्महत्या ॥२४२॥
बेकार जगणे नको झाले । तोचि तयाचे कानिं आले । रामानंद म्हणोनि भले । पुन्यनगरींत नांदती ॥२४३॥
विचार त्याचे मनीं आला । जावे तयांच्या दर्शनाला । आशेचा जर किरण दिसला । प्रयत्न करु तैसेही ॥२४४॥
मनाची असता खिन्नस्थिती । रामानंदांकडे येती । येताक्षणीं चरणांप्रती । घातला तये दंडवत ॥२४५॥
कर जोडुनी उभे असती । तोंचि रामानंद पुसती । काय म्हणते तुमची मती । जीव द्यायचे ठरले का ॥२४६॥
श्रीकांत ठकार थक्क झाले । मनिंचे कैसे यां उमगले । प्रत्युत्तराचे भान नुरले । रडूओ कोसळे तात्काळ ॥२४७॥
रामानंद प्रेमळ अती । गोड बोलुनी समजाविती । चिंता न करणे पुढची अती । मिळेल नोकरी तुम्हाला ॥२४८॥
येतील आता बरे दिवस । होऊ नका मनिं निराश । पहा ठेवोनि विश्वास । कार्य होईल सत्वरी ॥२४९॥
अल्पकाले नोकरी तया--। लागता आले सांगावया । हार-पेढे अर्पोनिया । तयां वंदिले साष्टांगे ॥२५०॥
अनोखो एकदा पदवीधर । रामानंदां भेटल्यावर । म्हणती मजला आजवर । यश न येई कशांतही ॥२५१॥
नोकरींतही स्थिरता नसे । धंदा करिता तोही फसे । लोकांत माझे होई हसे । लाज वाटे जगण्याची ॥२५२॥
तोंचि रामानंदे पुसती । वचन पूर्वी साधूप्रती-। देउनी फसविले तयां अंतीं । सत्य असेका हे सांगा ॥२५३॥
विचार करिता स्मरे तया । पदवीधर मी जाहलिया । भरपूर पेढे मी खावया-। देईन म्हटले साधूसी ॥२५४॥
त्यास जाहले बहुत दिन । साधु नसती विद्यमान । प्रश्न आपुला सत्य असुन । आपणां परी कैसे कळे ॥२५५॥
रामानंद तयां वदले । आताच कानीं तये कथिले । म्हणोनि मजला असे कळले । वचन करावे परिपूर्ण ॥२५६॥
होते साधू नाथपंथी । दुर्दैवे ते आज नसती । यास्तव जाईन शिर्डीप्रती । पेढे नाथांसि अर्पीन ॥२५७॥
देशपांडे पुरुषोत्तम । रामानंदांमानिती । परम-। त्यांचे सान्निध्य अत्युत्तम । लाभले त्या महत्भाग्ये ॥२५८॥
संकटे वा अडिअडचणी । येणार पुढती त्या जाणुनी । पूर्वसूचना मज देउनी । उपाय सांगती करावया ॥२५९॥
रामानंदां अति तळमळ । शिष्यचिंता तयां सकळ । पूर्वसूचने येई बळ-। भोग भोगण्या आम्हासी ॥२६०॥
देशपांडे नित्य वदती । रामानंद पाठिशी असती । याची आम्हा ये प्रचिती । म्हणोनि असतो निर्धास्त ॥२६१॥
परंतु रामानंद म्हणती । मी न कुणाचा गुरु जगतीं । माझे न कुणी शिष्य असती । स्वये दास मी स्वामींचा ॥२६२॥
मी न करी गुरुचा धंदा । माझा न कुणी शिष्य खंदा । कुणी निंदा अथवा वंदा । स्वामीआज्ञे वर्ततसे ॥२६३॥
असो, असती बहुत कथा । सांगता होईल महा गाथा । हात घेवोनि आखड --। वर्णितो निर्याण स्वामींचे ॥२६४॥
एके दिनीं प्रातःकाळीं । बोलावुनी भक्त जवळी । वदले पहा तया वेळीं । बाळाप्पासी काय ते ॥२६५॥
उंच गगनीं अम्हा जाणे । परतोनि ना कदा येणे । इच्छा असलिया तूं येणे । सेवा आमुची करावया ॥२६६॥
वदे बाळाप्पा समर्थासी । ऐसे कासया बोलतासी । वियोग कल्पना ती आम्हासी दुःख देते भयंकर ॥२६७॥
निरनिराळे खेळ करिती । निरनिराळ्या भाषा करिती । वागण्याची अशी रीती । हेतू न कळे तो कवणा ॥२६८॥
अक्कलकोटीं लिंगायतांचा । प्रसिद्ध मठ तो असे साचा । समाधीपुढे कीर्तनाचा-। थाट चाले अपूर्व तो ॥२६९॥
तदा स्वामी मठीं जाती । समाधीपुढे खाट बघती । जाऊन खाटेवरी निजती । वदती भुजंगा इकडे ये ॥२७०॥
घेवोनि गोवर्‍या ये सत्वर । मला पाहिजे त्या भरपूर । आणिता तये टोपल्या चार । रचाया सांगती पिंडीवरे ॥२७१॥
तूप, खारका, बर्फी, बदाम । नारळ,पेढे, फळे, दाम । अग्नि पेटता तो बेफाम । पदार्थ अर्पिती त्यामाजीं ॥२७२॥
वृत्त सर्वत्र हे गेले । लिंगायत ते क्रुद्ध झाले । स्वामींस दंडावया सजले । मठामाजीं घुसले तदा ॥२७३॥
अग्निसम ती यतीमूर्ती । दृष्टी ठरेना मुखावरती । लिंगायतांसी गमे भीती । नृसिंहरुपा त्या पाहता ॥२७४॥
प्रातःकालीं दुसरे दिनीं । सर्व रक्षा दूर करुनी । अति तेजस्वी पिंडी बघुनी । सर्वासि वाटे आश्चर्य ॥२७५॥
प्रज्ञापुरीच्या आसंमतीं । स्वामी नित्य विहार करिती । भक्तकायीं दक्ष असती । समर्थ अत्यंत कनवाळू ॥२७६॥
सेवेकरी ते बिछान्यासी-। घालूं लागतां श्री तयांसी-। वदती पुरे या कौतुकासी । शय्या आमुची दुसरीकडे ॥२७७॥
नाना प्रकार भविष्य काळ । सुचविती लीला करोनि सकळ । विपरीत परी येईल वेळ । नुमजले हे कवणांसी ॥२७८॥
एके रात्रीं समर्थासी । जुलाब होता विकलस्थिती । ज्वर लागला यावयासी । चिंता करिती सर्वजण ॥२७९॥
सोलापूरचे वैद्य, डॉक्टर । यतीश्वरांचा पाहती ज्वर । तयांस वदती योगेश्वर । मी मेलिया काय होते ॥२८०॥
सुर्वे बर्वे न्यायाधिश । कर्वे, अवधानी सज्जनांस । कृष्णंभटादी ब्राह्मणांस । धर्मकार्यार्थ पाचारिले ॥२८१॥
प्रायश्चित्तादी धर्म विधिसी । स्वामिहस्ते दानधर्मासी । अन्नदानादी सुत्कृत्यासी । प्रेमे करविती भक्तजन ॥२८२॥
कल्पना कवणांसही नसता । दुपारचा तो समय असता । पाळीव आमुचे पशू आता । आणा सर्वा समोर ॥२८३॥
गाय-वासरु,अश्व,बैल । श्वानादि पशू आणिले सकल । प्रेमातिशये तया जवळ-। जावोनि स्वामी गोंजारिती ॥२८४॥
निजांगिची काढुनी वस्त्रे । तयांच्या अंगी घालितां ते । पशुंच्या मुखीं आपुल्या हस्ते । घातला तये सुग्रास ॥२८५॥
गाय-वासरु हंबरे ते । पशू लागले चाटू तयांते-। नेत्रीं अश्रू वाहती ते । पहाता समर्थ गहिवरती ॥२८६॥
वात्सल्यभावें वदले तदा । मुक्या माझ्या या श्वापदां । पुढती आल्या जरि आपदा । अंतराय ना देणे तुम्ही ॥२८७॥
योगेश्वरांचे दयाळू मन । बघता पावती आश्चर्य जन । यास्तव वदती करुन । संत, सिद्धांस सर्वही ॥२८८॥
ज्वरे जाहले अती श्रांत । मंचकी बसती ते निवांत । नेत्रद्वयांसी मिटोनि घेत । निश्चल होती श्रीस्वामी ॥२८९॥
ऐसा जाता बहुत वेळ । स्वामी नुघडती नेत्रकमळ । श्वास, नाडी बंद सकळ । पाहता वैद्य घाबरले ॥२९०॥
स्वामी जाहले समाधिस्थ । ऐसे वाटुनी जन समस्त । आक्रोश करिती परिसरात । शोकसागर उचंबळे ॥२९१॥
स्वामी आमुची माता । भेटेल कैची पुन्हा आता । पक्षिणी पिलां टाकोनी जाता । कोण तयांते सांभाळी ॥२९२॥
ऐसे आक्रंदता लोक । नेत्र उघडती जनपालक । हर्षतिरेके जन कित्येक । नाचु लागले तत्समयीं ॥२९३॥
भक्तांसि पाचारुनी जवळी । सांगतो जे अशा वेळीं । विसरु नका कदाकाळी । वात्सल्यभावें वदले ते ॥२९४॥
“अनन्यश्चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानाम्‍ योगक्षेमं वहाम्यहस्‌ (गीता) अन्य ठायी मन न घालिती ।
मम उपासना जे करिती त्यांचा योगक्षेम निश्चिती । करने मज पडे ॥ ज्ञा. ॥
कृष्णावतारी मीच वचन । अर्जुना दिले हेचि म्हणुन-। तुम्हासही ते दे असुन । विकल्प चित्तीं न धरावा ॥२९५॥
ऐसे सांगोनि योगेश्वर । निःस्तब्ध जाहले गादीवर । स्थिती पाहता जनसागर । भयभयीत जाहला अत्यंत ॥२९६॥
तदा पाहती वैद्य नाडी । हाता न लागे परी थोडी । उष्ण जरी ती भासे कुडी । स्वामी परंतु समाधिस्थ ॥२९७॥
चैत्र वद्य त्रयोदशीस । शक अठराशे तो विशेष । चार वाजता दिनमानास । समर्थ गेले निजधामीं ॥२९८॥
वृत्त पसरले वार्‍यासम । सर्व धावती टाकुनी काम । निर्यात पाहता फुटे घाम । दुःखे पृथ्वी आंदोळली ॥२९९॥
शोकातिरेके ऊर पिटिती । शिर फोडुनी कुणे घेती । आक्रोश हुंदके दिशा भरती । सर्वत्र माजे कल्लोळ ॥३००॥
पशु-पक्ष्यांने टाकिला चारा । नेत्रीं तयांच्या अश्रुधारा । उदास जाहला प्रांत सारा । डोंब उसळला दुःखाचा ॥३०१॥
सम्राट असता जरी मेला । तरि न असता शोक केला । परंतु मुकता महात्म्याला । शोकार्णवी ती नगरी बुडे ॥३०२॥
राजे, सेवेकरी लोक । लोटांगणे भक्तिपूर्वक-। घालोनी करिती तो विवेक । मिरवीत न्यावे स्वामींसी ॥३०३॥
विमान करुनी अति सुंदर ।आणावे ते अति सत्वर । त्यांत बसवुनी योगेश्वर । मिरवू तया प्रज्ञापुरीं ॥३०४॥
सुतार रामा महा कुशल । त्वरित करोनी आणी सकल । बघुनी वाटे जनां नवल । वदती खरा हा कलावंत ॥३०५॥
कदलीस्तंभ बांधिले चार । बांधिल्या माळा सभोवार । ध्वज, पताका विमानावर । भगव्या रंगी फडफडती ॥३०६॥
उष्णोदके घालुनी स्नान । केशर, कस्तुरी उटि लावुन । गुलाब, चाफा हार अर्पुन। चंदनी टिळा लावियला ॥३०७॥
हत्ती शृंगारुनी छान । बांधिले वरती दिव्य यान सर्वास व्हावे यतिदर्शन । ऐशा तर्‍हेने बसवीती ॥३०८॥
भजनी दिंड्या पुढे चार । मृदंग, टाळांचा नाद थोर । अभंग गाता, करुण्स्वर-। निनादला तो सर्वत्र ॥३०९॥
योगेश्वरांचा नामगजर । भक्त करिती महाथोर। गुलाल, पुष्पे स्वामींवर । लोक उधळिती भक्तीने ॥३१०॥
हुंदके, रडॆ आवरेना । गेला म्हणती देवराणा । धावेल आमुच्या संरक्षणा । ऐसा आता कोण असे ॥३११॥
शिंगे, कर्णे, तुतार्‍यांचा । नाद भरला नभीं साचा । ऐसा मिरविला समर्थाचा । पवित्र देह तो प्रज्ञापुरीं ॥३१२॥
चोळाप्पाचे मठाजवळी । निर्याणात्रा जधी आली । अलोट गर्दी तिथे झाली । दर्शनार्थ ती स्वामींच्या ॥३१३॥
नाना बर्वे आणि मोघे । बाहू उंचावुनी दोघे । जाणे आतां पुढे नलगे । स्थान येथे समाधीचे ॥३१४॥
थांबली तेथे महायात्रा । सर्वत्र पसरे गंभीरता । विमान वरुनी उतरविता । जयजयकार निनादला ॥३१५॥
बर्वे, मोघे लोक येती । नवा चंदनी पाट घेती । समर्थाची दिव्य मूर्ती । ठेविली तये पाटावर ॥३१६॥
चोळाप्पाचे मठामाजीं। बांधिली होती पूर्वीच जी । ब्रह्मानंद गुहेमाजीं । देह ठेविला समारंभे ॥३१७॥
बेल, तुळशी पुष्पमाळा । भक्त अर्पिती त्यांचे त्यांचे गळा । भक्तिपूर्वक चरणकमळां । लोक घालिती दंडवत ॥३१८॥
बंद करोनी समाधीमुख । दुःखे परतले सर्व लोक । मनांत करिती परि विवेक । स्वामी असती चिरंतन ॥३१९॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥३२०॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-04-15T20:47:51.0030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दोनपरा आसल्यावर सांजे पंचायत

  • (गो.) दुपारीं असलें तर संध्याकाळची भ्रांत 
  • फार गरीबी. 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.