कथामृत - अध्याय एकोणिसावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री शनिदेवाय नमः । मारुतिराया नमोस्तुते ॥१॥
पूर्व अध्यायी वाचिले । साहेबासि त्या विषार डसले । अल्प काले बरे केले । प्राण रक्षिले स्वामींनी ॥२॥
साहेब करी कौतुकाला । श्रीस्वामींचा दास झाला । सामर्थ्य येता प्रत्ययाला । म्हणे सत्यची समर्त्य हे ॥३॥
प्रज्ञापुरीच्या मुक्या पोरा । स्वामी दाविती चमत्कारा । मुकेपणा तो पळे सारा । दिव्य वाणी त्या दिधली ॥४॥
वाराणशीच्या शास्त्रयांसी वृद्धापकाळीं पुत्र त्यासी-। जाहला परंतु अल्पायुशी । तज्ज्ञ ज्योतिषे वर्तविले ॥५॥
तदा होय त्या दुःख फार । न सुचे कसलाही व्यवहार । साधु भेटला मनें थोर-। सांगे तया जा प्रज्ञापुरीं ॥६॥
तेथे वसती महासिद्ध । सामर्थ्य तयांचे सुप्रसिद्ध । तुम्ही असला जरी प्रबुद्ध । तिथे पत्करा शरणागती ॥७॥
प्रज्ञापुरी तो गेलियावरी । घडली वार्ता वाचली पुरी । विक्राळ मृत्युने बालकावरी । झडप घालिता रक्षिले त्या ॥८॥
बीडनगरिंचा नारायण । विख्यात तेथला की धनवान । प्राप्त व्हावयासी संतान । स्वामी समर्था नवस करी ॥९॥
नवस आला फळा त्याचा । पुत्र जणू की रत्न साचा । नवस विसरला फेडण्याचा । वर्तू लागला भ्रमिष्टसा ॥१०॥
गेले अखेरी स्वामींकडॆ । पत्नी तयाची पाया पडे । करुणा भाकिता आले रडे । म्हणे वाचवा आम्हाते ॥११॥
दया करोनी वाचविती । देती तयांसी उत्तम स्थिती । कथा वाचली संपूर्ण ती । ऐसे समर्थ कनवाळू ॥१२॥
संत-सिद्धांच्या कथा गोड । वाचावयाची अति आवड । मनाचे हे पुरविण्या कोड । कथा आता वाचू पुढे ॥१३॥
श्रीमंत निजाम सरकारचे । रायराजे नाम ज्यांचे । जागीरदार ते निजामाचे-। होते अत्यंत धार्मिक ॥१४॥
आले एकदा तया मनीं-। काशीक्षेत्रासि जावोनी-। विश्वेश्वराचे रुप बघुनी । जन्म-सार्थक साधावे ॥१५॥
सहकुटुंब सहपरिवार । हैदराबादेहून सत्वर -। काशीस पोचता हर्श थोर-। जाहला रायराजांसी ॥१६॥
होते अत्यंत श्रीमंत । खर्चाची ना तयां खंत । शास्त्री, पंडिता या समस्त । विनम्र भावे पाचारिले ॥१७॥
जे जे करणे धर्म-कृत्य । आम्हांस करने ते अगत्य । म्हणाल ते ते साहित्य । सुपूर्त करु आनंदे ॥१८॥
काशिविश्वेश्वर कृपेने । आम्हास काही नाही उणे । यथासांग ते सर्व करणे । हीच प्रार्थना तुम्हासी ॥१९॥
ऐकता विप्र ते संतुष्ट । म्हणती करुं जे सर्व इष्ट । देणार ना तुम्हा कष्ट । चिंता आता न करावी ॥२०॥
यथाविधी गंगास्नान-। करोनि देती महादान । सर्वासवें प्रभुदर्शन-। घ्यावा निघती रायराजे ॥२१॥
गंधाक्षतानी बेल-फुले । सवे घेवोनिया आले । अतिरुद्र तो मंदिरी चाले । श्रवणे आनंदे मानसी ॥२२॥
सनई-चौघडा तदा वाजे । बेल, पुष्पे, हार ताजे-। गर्भागारीं वहाया राजे-। येता बघती चमत्कार ॥२३॥
अहो पिंडी नसे येथे । प्रत्यक्ष स्वामी बसले इथे । साष्टांग नमना करिती ते । बेल-पुष्पे समर्पुनी ॥२४॥
यती पावता अंतर्धान । पिंडी लागली दिसो छान । राजे वदती कर जोडुन । दिसती मातें विश्वेश्वर ॥२५॥
राके अंतरीं गोंधळले । वदती ऐसे वदती राजेश्वर । आम्हास दिसे विश्वेश्वर । दिसले म्हणता यतीश्वर । हे तो महान आश्चर्य ॥२७॥
काशीक्षेत्रासि येताना । संकल्प होता मनीं जाणा । प्रथम जावे गुरुदर्शना-। अक्कलकोटीं स्वामींच्या ॥२८॥
परंतु जाणे जाहले ना । निघाली आम्ही दर्शनाविना । अस्वस्थ वाटे परि मन्मना । जाणिले ते यतीश्वरे ॥२९॥
विश्वेश्वराच्या पिंडीविना । स्वामिमूर्ती दिसे नयना । निजभक्ताची आस जाणा । पूर्ण ऐशी करिती ते ॥३०॥
वाटे सर्वास आश्चर्य । म्हणती कोण हे यतिवर्य । चरणांचे त्यां साहचर्य-। भाग्य आम्हासि लाभावे ॥३१॥
भक्तकाम श्रीकल्पद्रुम । भक्तहितासी दक्ष परम । अखंड घेई मनीं नाम । तया संन्निध असती ते ॥३२॥
स्वामीचरणीं नम्र नित्य । जाहला जो जाणूनी सत्य । होईल त्याचे हो अभीष्ट । जाणा अंतरीं सुनिश्चये ॥३३॥
तीर्थयात्रा त्या करोनी । राजे येती आपुल्या स्थानीं । रुग्ण जाहले प्रवासानी । गेले तैसेचि दर्शना ॥३४॥
बघता तयांची विकल स्थिती । दया उपजे यती-चित्तीं । चोळाप्पासी स्वामी म्हणती । प्रसाद घाली मुखीं त्याचे ॥३५॥
रायराजे बरे होता । नूतन मठी बांधण्याकरिता । द्रव्यार्पण ते केले स्वताः । भक्तिपूर्वक श्रीचरणीं ॥३६॥
तैसीच आता दुजी कथा । वाचा करोनी एक चित्ता । तेलंगी तो विप्र होता । येत दर्शना स्वामींच्या ॥३७॥
अनेक कारिता तीर्थयात्रा । सोलापुरीं तो आला असता । कळली त्यासी तिथे वार्ता । सिद्ध वसती प्रज्ञापुरीं ॥३८॥
जावे आपण दर्शनासी । दारिद्रय आपुले वदू त्यांसी । कृपा झालिया अहा खाशी । व्यथा जाईल सर्वस्वी ॥३९॥
त्वरे पातला प्रज्ञापुरीं । यतींद्रांची चौकशी करी । वदले तयासी कोणी तरी । खासबागेत असती ते ॥४०॥
प्रसन्न मूर्ती समर्थाची । घातली पाया मिठी साची । म्हणे प्रार्थना पामराची । कृपा करोनी श्रवण करा ॥४१॥
तीर्थयात्रा नित्य करिता । वेचिले । मी धन सर्वथा । ऋण जाहले फार आता संसार कराया द्रव्य नसे ॥४२॥
मुद्रा तयाची दीनवाणी । तैसीच त्याची करुण वाणी । ऐकता द्रवले स्वामी मनीं । वदती मी तो कफल्लक ॥४३॥
आम्ही आहोत संन्यासी । कपर्दीक ना द्यावयासी । घेऊन जा या मृत्तिकेसी-। काळे ढेकुळ देती त्या ॥४४॥
तेलंग्याची राग येई । माती घेऊन करु काई । हवी तरी रे हीस नेई । ना तरी व्हावे मार्गस्थ ॥४५॥
तदा ब्राह्मण मनीं वदला । घेवोनि जावे मृत्तिकेला । पार्थीव पूजा करायाला । शिवलिंगासी वापरु ॥४६॥
अनुज्ञा मिळता जावयासे । टाकोनी खांद्यावरी पडशी । जींत गुंडाळिली खाशी । मृत्तिकेची ढेप तये ॥४७॥
पायी चालता लांब वाट । जात होती गृहा थेट । ओझे वाहता पुरा वीट । विप्र शीणला अत्यंत ॥४८॥
पडशीची तो गाठ सोडी । फेकूनि देण्या ढेप काढी । ढेकूळ बघता मारी उडी । म्हणे काय हे आश्चर्य ॥४९॥
चकाकणारे रुपे बघता । आश्चर्य वाटे तया चित्ता । दारिघ्र झाले नष्ट आता । भाग्य उदेले स्वामीकृपे ॥५०॥
स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर । केवि वर्णावा अधिकार । कृपा केली गरिबावर । मृत्तिकेचे केले रुपे ॥५१॥
दारिद्रय त्याचे लया जाय । मनें पूजी समर्थ पाय । परम भाग्ये भेटली माय । दास निरंतर त्यांचा मी ॥५२॥
कर्ज फिटता नासले कष्ट । निज संसारीं असे तुष्ट । धर्मकृत्ये । करोनि इष्ट । शिष्य जहाला स्वामींचा ॥५३॥
ऐका अता दुजी कथा । गरिबाची ती वारिली व्यथा । संरक्षिती ते शरणागता । यतींद्र ऐसे कनवाळू ॥५४॥
रहिमतपूरचे राहणार । अप्पासाहेब माने थोर । होते पूर्वीचे सरदार । परंतु येई गरिबी तयां ॥५५॥
दोन पुत्र ने एक कन्या । महाग जाहले अन्न-धान्या । कैसे करावे हे सुचेना । कन्या उपवर त्यांची की ॥५६॥
गुणवान आणि रुपवती । कुलवंत तैशी शीलवती । सुयोग्य कैसा मिळे पती । पित्यासि लागे हद्‌रोग ॥५७॥
सर्व ठिकाणी शोध घेता । तोंचि त्यांसी कळे वार्ता । दीनोद्धारक स्वामी असता । चिंता कासया करणे ती ॥५८॥
माने पातले प्रज्ञापुरी-। बाबाराव गुर्जरां घरीं-। राहुनी बनले सेवेकरी-। जगदीश्वरांचे निस्सीम ॥५९॥
येवोनि जाहले षण्मास । धीर न परी पुसायास । विनविती ते चोळाप्पास । तुम्ही विचारा मजकरिता ॥६०॥
प्रसन्न असता महासंत । चोळा विनये तयां वदत । माने आपुल्या चरणीं रत । कृपा व्हावी त्यांचेवरी ॥६१॥
माने घालिती दंडवत । लीनतेने त्या प्रार्थित । उपवर कन्या एक असत । योग्य मिळावे स्थळ तिजला ॥६२॥
घेऊ नकोरे मनीं हाय । वर ठरविला खंडेराय । मिळेल येता योग्य समय-। शीलवंत नी श्रीमंत ॥६३॥
ऐकता हर्षले अत्यंत । म्हणे खरा मी भाग्यवंत । बोलती तदा जन समस्त । भाग्य उदेले कन्येचे ॥६४॥
एके दिनीं अकस्मात । वार्ता पसरली शहरांत । श्रीमंत मंडळी कुणी येत । नृपासि वधू शोधाया ॥६५॥
कन्या निवडिल्या तये चार । तयांच्या पालकां देत धीर । बोलती चलावे खरोखर । आम्हांसवे बडोद्यासी ॥६६॥
राजमंडळी सर्व जमुनी सर्व कन्या अवलोकुनी । अल्पावकाशे त्यां लागुनी। निर्णय  देती नृपवर्य ॥६७॥
माने करिती मनीं चिंता । निर्णय लागे काय आता । तोंच कळली तयां वार्ता । आपुली कन्या निवाडीसे ॥६८॥
नाम नृपाचे खंडेराय । ऐकता । त्यांसी हर्ष होय । धन्य,धन्य ते स्वामिराय । पूर्वीच आम्हां कथियेले ॥।६९॥
मुहूर्तावरी शुभमंगल-। होता जाहला हर्श विमल । मान्यांसि वाटे जन्म सफल-। आज सत्यची झालासे ॥७०॥
यतिवर्याची कृपा थोर । जाहलीसे आपणावर । श्रीस्वामीचे हे उपकार । फेडणे मातें अशक्यसे ॥७१॥
खंडेराय नी जमनाबाई । सिंहासनी बैसता पाही-। उचंबळोनी हर्ष येई । माने जाहले सद्‌गतित ॥७२॥
राजलक्ष्मी कन्या शोभे । सरदार भोतीं होते उभे । उदार खंडेराय राजे । दानधर्म ते करिती बहू ॥७३॥
जोड शोभे उभयतांचा । बडोदे नगरीं हर्ष साचा । वर्षाव जाहला शुभेच्छांचा । नृपतींवरी सर्वस्वी ॥७४॥
माने येताचि प्रज्ञापुरीं । योगेश्वरांचे चरणांवरी । ठेविता मस्तक अश्रूंसरी । वाहू लागती अनिवार ॥७५॥
कृतज्ञतेने यतिपूजन-। करोनी, केले समाराधन । गोरगरिबां अन्नदान-। वस्त्रदान तोषविले ॥७६॥
आपण झालिया शरणागत । स्वामी चिंता हरण करित । सामर्थ्य त्यांचे दिव्य असत । निज हितास्तव जाणावे ॥७७॥
माणसांवरी दया करिती । तैसीच प्राण्यांवरीही ती । आनंददायी गोष्ट अती । श्रवण करणे इष्ट असे ॥७८॥
अक्कलकोटीं नृपागारीं । हिंदोल्यावरी बसे स्वारी । करे जोडुनी श्रींसमोरी । नृप मालोजी होते उभे ॥७९॥
नृपासंगे ते हितगूज-। होत असता असता घडे मौज । मृत मूषका करीं सहज-। घेउनी पुजारी ते तेथे ॥८०॥
कांरे मारिले मूषकासी । स्वामी पुसती पुजार्‍यासी । वाती खाउनी नित्य मजसी । संत्रस्त केले या मूषके ॥८१॥
मृत मूषका घेती करीं । आणि तयासी बोलती हरी । कशासि दिधला त्रास भारी । गरीब बिचार्‍या पूजका ॥८२॥
फुंकर घालोनि गोंजारिती । वागू नको तूं ऐशा रीती । सुहास्य वदने तया वदती । जा जा आता पळोनिया ॥८३॥
हिंदोल्यावरि त्या ठेवित । उडी मारुनी पळे त्वरित । राजे, पुजारी अति विस्मित--। होऊनी बघती परस्परा ॥८४॥
समर्थाची अतर्क्य लीला । आले अनुभव अनेकांला । साष्टांग वंदुनी पदकमलांला । कथा आणखी वाचूया ॥८५॥
श्रीरामाच्या देवालयांत । गावाबाहेर जे विलसत । तेथील वृक्षातळीं बसत । स्वामी सदैव आनंदे ॥८६॥
तरुतळीं ते शांत बसता । चोळाप्पाही सवे होता । चिमणी चिव चिव वरी करिता । स्वामी कौतुके वदले तिज ॥८७॥
अगे मी गावास जावोनी । येईन तेथोनि परतोनी । तोपर्यत तूं बैसोनी-। रहावे या फांदीवरी ॥८८॥
चिमणीस ऐसे बजावोनी । गमन करिती श्री तिथोनी। सायंसमयास परतोनी--। स्वामी बसती वृक्षातळीं ॥८९॥
अगे तुला चिमणाबाई भूक, तृषा ती नसे काई? उडोनि जाई तुझे ठाई। म्हणतां उडाली तत्क्षणीं ॥९०॥
चोळाप्पा हो तदा थक्क । आ वासुनी बघे मख्ख। ईश्वराचे अवतार चक्क स्वामी असती खरोखरी ॥९१॥
पशुपक्षीही पाळिती आज्ञा । करिती न त्यांची ते अवज्ञा । ऐशा सिद्धासि काय संज्ञा-। द्यावी मातें कळे न हे ॥९२॥
विषाचे करिती हे अमृत । अमृताचे करिती विष । सामर्थ्य त्यांचे हे विशेष । प्रत्यया येते अनेकदा ॥९३॥
पंच भूतांवरी सत्ता । चाले तयांची की सर्वथा । कर्तुमा कर्तुम या समर्था । चराचरही शरण असे ॥९४॥
श्रोते ऐका नवे कथन । ऐकता जाईल सर्व शीण । चिंतुनी मनीं यतिचर्ण । श्रवण करावे सद्‌भावे ॥९५॥
बाबा जाधवराव साचे । राहणारे प्रज्ञापुरीचे । एकनिष्ठ ते योगेश्वरांचे । सद्‌भक्त म्हणोनी विख्यात ॥९६॥
श्रीरामाच्या मंदिरांत । बैसले असता यति निवांत । ऐन दुपारी उन्हाळ्यांत । जाधव गेले श्रींदर्शना ॥९७॥
स्वामी तयासी पाहतांची । वदले आली चिठी तुमची । करणे तयारी निघायाची । विलंब क्षणही न करावा ॥९८॥
बोल ऐकता समर्थाचे । कांपरे भरले तया साचे । नयनी देखिले काळाचे । विक्राळ रुप ते भयंकर ॥९९॥
आर्त किम्काळी फोडिती । चरण श्रींचे घट्ट धरिती । देवा वाचवा मला । वदती क्षणात पडले बेशुद्ध ॥१००॥
स्वामी समर्था दया आली । वदती दूता सोड हा बळी । धिप्पाड बैल तो पहा जवळी । त्यासि घेउनी जाई तू ॥१०१॥
चोळाप्पादी सर्व बघती । भयभीत होती तेही अती । घडणार आतां काय पुढती । पाहती ते वृषभाकडे ॥१०२॥
बघता बघता काय घडले । वृषभ भूमीवरि कोसळे । चरण झाडिता प्राण गेले । धरणीस पडे निःश्चेष्ट ॥१०३॥
मरणोन्मुख त्या जाधवासी । ऊठ म्हणती भय ना तुसी । सावध होता स्वामी त्यासी । गोंजारिती सप्रेमे ॥१०४॥
निजाश्रुणी समर्थ चरण-। अभिषेकिले कवटाळुन । जाहव वदती कर जोडुन । रक्षिले देवा मातें तुम्ही ॥१०५॥
यतिवर्याचा अपूर्व महिमा । वर्णिता ये ना निगमागमा । पामरे मी काय उपमा-। द्यावी तयासी हे न कळे ॥१०६॥
सांगोनि आता एक कथा । अध्याय संपवू हा सर्वथा । पुढील अध्याय तो पाहता । कथा विलक्षण वाचाल ॥१०७॥
आंग्ल जातिचा अधिकारे । वसतीस असे प्रज्ञापुरीं । पाळावयाची हौस भारी । पशू आणिक पक्षी ते ॥१०८॥
वानरी होती तयापाशी । घेऊनी फिरे नित्य तिजसी । मर्कटलीला पहायासी । पोरें करिती गर्दी सदा ॥१०९॥
साहेब वृत्तिने बहु उदार । बालगोपाळीं प्रेम फार । स्वामींवरीही भक्ति थोर । सर्वास प्रिय तो अत्यंत ॥११०॥
खोडी काढिता मर्कटीची । क्रोधे चवतालली साची । मारी छडी तो वेताची । लचका तोडि ती हाताचा ॥१११॥
साहेब तदा संतापला । करी आज्ञा शिपायाला । गोळी हिला त्वरे घाला । पिसाळलीसे दिसते ही ॥११२॥
बदूक आणण्या गडी गेला । जणू काही कळले तिला । वानरी पळे तया वेळा। डोळा चुकवोनि सर्वाचा ॥११३॥
खंडोबाच्या देवळामागे-। लपे येवोनिया रागे । मंदिरीं होते स्वामी उभे । भुजंगा सेवक तैसाची ॥११४॥
मारण्या तिला लोक आले । भुजंगा तदा श्रीस बोले । मर्कटीला वाचवा भले । प्राणसंकट समयीं या ॥११५॥
दायार्णवासी दया उपजे । नांव सांगुनी तिला माझे । भुजंगा म्हणे तिला ये गे । स्वामी तुजला पाचारिती ॥११६॥
पहा केवढे आश्चर्य ते । जणू तिजला समजले ते । भुजंगाच्या ती मागुते । जाऊ लागली तात्काळ ॥११७॥
येता दोघे यति समोरी । स्वामी तिला बोलले भारी । अगे चावटे हे वानरी । मालका जखमीं तूं ॥११८॥
आजपासुनी डससी जरी । फटके मारीन पाठीवरी । तेव्हापासुनी ती वानरी । वागू लागली निरुपद्रवी ॥११९॥
स्वामी तिथे जाई । झाडावरी बसोन राही । समर्थ पदीं लोळण घेई । तदा स्वामी गोंजारिती ॥१२०॥
कधी घालिती तिला माळा । कधी लाविती कुंकुम टिळा । बांधिती कधी घुंगुर गळां । आपुली टोपी घालिती तिज ॥१२१॥
सुंदरीवरी अशी माया । संरक्षिले करुनी दया । दयासागरा वर्णावया । शक्य नसे ते कवणाही ॥१२२॥
सदासर्वत्र समभाव-। ठेवुनी वर्तती हा स्वभाव । भिन्न शरिरे एक जीव । स्वये वागुनी शिकविती ॥१२३॥
पुढे वानरी होय रुग्ण । सोडीन परंतु स्वामी चरण । स्थिती दिसंदीस होत करुण । कवणांसही ते पाहवेना ॥१२४॥
विकलांग होता दीनवाणी । बघे यतींद्रा खिन्न नयनी । गळे नेत्री घळघळा पाणी । अन्न वर्जिले सर्वस्वी ॥१२५॥
वानरी जाहली अती क्षीण । बैसली कवटाळुनी चरण । जाई न तेथुनी एकही क्षण । स्वामी तिजला कुरवाळिती ॥१२६॥
एके दिनीं सायंकाळीं । चीत्कार करोनी एक वेळी । शिर ठेवुनी चरणकमळीं । सुंदरी गेली निजधामा ॥१२७॥
सुंदरी वानरी भाग्यवान । स्वामीपदी अर्पिले प्राण । ये न मानवा असे मरण । भाग्यवान ती त्रैलोक्यीं ॥१२८॥
स्वामी प्रत्यक्ष दया मूर्ती । तिन्ही लोकीं अशी कीर्ती । मुक्या भक्तावरी करिती-। दया सद्‌गती देवोनी ॥१२९॥
यास्तव स्वामीचरणी रत--। होउनी साधुया आपुले हित । वानरी कथा उपदेशित--। जणू आपणा सर्वासी ॥१३०॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१३१॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 14, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP