मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|स्वात्मसौख्य|ज्ञानकांड|
ज्ञानकांड ओवी संग्रह १२

स्वात्मसौख्य - ज्ञानकांड ओवी संग्रह १२

श्रीस्वात्मसौख्य ग्रंथात कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी सूत्ररुपाने दाखविल्या आहेत


येर ते अवघे पामर । पामररुपे व्यवहार ॥

परी हा सकळ संसार । कर्ता तो मी ॥१११॥

संसार तो माझेंचि व्यसन । व्यसन नसतां कर्तेपण ॥

कर्ता तोचि भगवान् । भगवदरुपें ॥११२॥

भगवदरुप म्हणजे काय ॥ पुन्हा द्वैताचा उपाय ॥

उपाय न करितां अपाय । कासिया झाला ॥११३॥

अपायाची जे कल्पना । ज्याची त्यासी बद्धक जाणा ॥

बद्धमुक्ततेच्या खुणा । जाणती संत ॥११४॥

संत कोणासी म्हणावें । निवांत सकळ वैभवें ॥

अपूर्ण पूर्ण स्वभावें । उपाधिरहित ॥११५॥

उपाधिरहित जें कर्म । तोचि जाणिजे स्वधर्म ॥

स्वधर्माचें निजवर्म । जाणता तो मी ॥११६॥

स्वधर्म कासयासि व्हावा । परधर्म आचरावा ॥

तेथें ज्ञानाचा ओलावा । सहजीसहज ॥११७॥

सहजी सहज घडे । तें कल्पांतीहि न मोडे ॥

मोडून टाकटां जडे । मागुती पुन्हा ॥११८॥

पुन्हा मागुती संग्रह । करितां होये विग्रह ॥

विग्रहादिकांचा द्रोह । न करावा कीं ॥११९॥

द्रोह करितां विलक्षण । हें अपूर्णाचे भाषण ॥

पूर्णत्वाचें समाधान । बोलों आतां ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 13, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP