मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|देवी स्तोत्रे|
उपनिषद

देवी अथर्वशीर्ष - उपनिषद

देवी आदिशक्ती माया आहे. तिची अनेक रूपे आहेत. जसे ती जगत्‌कल्याण्कारी तसेच दुष्टांचा संहार करणारीही आहे.

The concept of Supreme mother Goddess is very old in India. The divine mother has been worshipped as 'Shakti' since vedic times


॥ देवी उपनिषद ॥

हरिः ॐ ॥ सर्वे वै देवा देवीम् उपतस्थुः । कासि त्वं महादेवीति
भक्‍तकल्याणार्थ एकदा देवीमातेने आपले रूप प्रकट केले तेव्हां सर्व देवदेवता देवीजवळ जाऊन प्रार्थना करू लागले , " हे महादेवी ! आपण कोण आहात ? " ॥ १ ॥

साब्रवीद अहं ब्रह्मस्वरूपिणी । मत्तः प्रकृतिपुरुषात्मकम् जगत् शून्यंचाशून्यम् च
ती देवी म्हणाली , मी ब्रह्मस्वरूप आहे. माझ्या कडूनच प्रकृति-पुरुषात्मक ( कार्य-कारणरूप) जगताची उत्पत्ति होते. ॥ २ ॥

अहम् आनन्दानानन्दौ अहम् विज्ञानाविज्ञाने । अहम् ब्रह्म अब्रह्मणि वेदितव्ये । अहं पञ्चभूतान्यपञ्चभूतानि । अहमखिलं जगत्

मी साक्षात आनन्द असून आनन्दरूप आहे. विज्ञान व अविज्ञानरूप आहे. जाणण्याजोगे असें ब्रह्म व अब्रह्मही मीच आहे. पंचीकृत व अपंचीकृत महाभूतें ही मीच आहे. हे सर्व दृश्य जगत् मीच आहे ॥३॥

वेदो अहम् अवेदो अहम् । विद्या अहम् अविद्या अहम् । अज अहम् अनजहम् । अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चहम्
- वेद आणि अवेद मी आहे. विद्या आणि अविद्या मी आहे. अजा (उत्पन्न झालेली प्रकृति ) आणि अन् अजा ही ( त्याहून भिन्न जें ते ) मीच आहे. खाली वर आजूबाजूला अशी सर्वत्र मीच व्यापलेली आहे ॥ ४ ॥

अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि अहमादित्यैरुत विश्वदेवैः ।
अहं मित्रावरुणावुभौ बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥ ५॥
मीच एकादश रुद्रा ( दश इन्द्रियें आणि मन ) आणि  अष्टवसूंच्या ( अग्नि, वायु, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, चन्द्रमा व नक्षत्रे ) रूपाने सर्वत्र संचार करते. मीच आदित्य व विश्वदेव ह्यांच्या रूपाने भ्रमण करते. मित्र आणि वरुण, इन्द्र आणि अग्नि तसेच दोन्ही अश्विनिकुमार ह्यांचे भरण पोषण मीच करते.

अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधाम्यहम् ।
अहम् विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥ ६ ॥
मीच सोम, त्वष्टा, पूषा व भगाला धारण करते. तसेच विष्णु, ब्रह्मदेव आणि प्रजापति ह्यांचा आधार मीच आहे.

अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ।
अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनामहं चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् ।
अहम् सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।
य एवं वेद स दैवींसंपदमाप्नोति ॥ ७ ॥
देवांना हवि पोचविणाऱ्या व सोमरस काढणाऱ्या यजमानांसाठी हवियुक्त धन मीच धारण करते. मी संपूर्ण विश्वाची ईश्वरी, उपासकांना धन देणारी, ज्ञानवती, व यज्ञीय लोकांत ( यजन करण्यास योग्य अशा देवतांमध्ये ) मी मुख्य आहे. संपूर्ण जगत् ज्यांत वसलेले आहे अशा पितारूपी आकाशाचे अधिष्ठान असलेला परमेश्वर माझ्यांतूनच उत्पन्न झालाय. बुद्धितील ज्या वृत्तीमुळे आत्मरूप धारण केले जाते ते स्थान म्हणजे मीच आहे.

ते देवा अब्रुवन् - नमो देव्यै महादेव्यै शिवायैः सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥ ८ ॥
हे देवी ! तुला नमस्कार असो. कल्याणकर्त्री महादेवीला आमचा नित्य नमस्कार असो. गुण साम्यावस्थारूपिणी मंगलमयी देवीला नमस्कार असो. नियमाने आम्ही तुला प्रणाम करतो.

तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् ।
दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्रै ते नमः ॥ ९ ॥
अग्नि प्रमाणे वर्ण असलेली, झगमगणारी, दिप्तीमान, कर्मफळ हेतुसाठी उपासिली जाणारी दुर्गादेवी, तुला आम्ही शरण आहोत. आमच्यासाठी आसुरांचा नाश करणारी दुर्गादेवी, तुला आम्ही शरण.

देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति ।
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥ १० ॥
प्राणरूपी देवांनी ज्या प्रकाशमान वैखरी वाणीची उत्पत्ती केली, ती कामधेनुतुल्य आनंददेणारी, अन्न व बळ प्रदान करणारी वाग्‍रूपिणी भगवतीदेवी, उत्तम स्तुतीने संतुष्ट होऊन आमच्या निकट यावी ( असावी ).

कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम् ।
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥ ११ ॥
काळाचा नाश करणारी, वेदांकडून स्तुत्य, विष्णुशक्ति, स्कन्दमाता (शिवशक्ति), सरस्वती (ब्रह्मशक्ति), देवमाता अदिती, दक्षकन्या (सती), पापांचा नाश करणारी व कल्याण करणारी भगवती, आम्ही तुला प्रणाम करतो.

महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि ।
तन्नो देवी प्रचोदयात् ॥ १२ ॥
आम्ही महालक्ष्मीला ओळखतो (जाणतो) व त्या सर्वशक्तीरूपिणीचे ध्यान करतो. हे देवी ! आम्हाला त्यांत ( ज्ञान-ध्यान ) प्रवृत्त कर.

अदितिह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव ।
तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥ १३ ॥
हे दक्ष ! आपली कन्या अदिती प्रसूत झाली आणि तिचापासून अमृत-तत्त्व लाभलेले (मृत्युरहित) व स्तुति करण्यास योग्य असे देव उत्पन्न झाले.

कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः ।
पुनगुहा सकला मायया च पुरूच्यैषा विश्वमातादिविद्योम् ॥ १४ ॥
काम (क), योनि (ए), कमला (ई), वज्रपाणी - इन्द्र (ल), गुहा (ह्रीं), ह, स हे दोन वर्ण, मातरीश्वा - वायु (क), अभ्र (ह), इन्द्र (ल) पुनः गुहा (ह्रीं), स  क,  ल हे तीन वर्ण आणि माया (ह्रीं), ही (पंचदशोक्षरी) सर्वात्मिका जगन्मातेची मूळ विद्या तसेच ब्रह्मस्वरूपिणी आहे . [ ह्या मंत्राचा भावार्थ = शिवशक्ति अभेदरूपा, ब्रह्म-विष्णू-शिवात्मिका, सरस्वती-गौरी-लक्ष्मीरूपा, अशुद्ध-मिश्र-शुद्धोपासनात्मिका, समरसीभूत शिवशक्त्यात्मक ब्रह्मस्वरूपाचे निर्विकल्प ज्ञान देणारी, सर्वतत्त्वात्मिका  महात्रिपुरसुन्दरी.  हा मन्त्र सर्व मंत्रांचा मुकुटमणी समजला जातो आणि मंत्रशास्त्रांत पंचदशी 'कादी'विद्येच्या नावानें प्रसिद्ध आहे. ह्याचे भावार्थ, वाच्यार्थ, संप्रदायार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ आणि तत्त्वार्थ असे सहा प्रकारें अर्थ "नित्या-षोडशिकार्णव" नांवाच्या ग्रंथात आले आहेत. तसेच "वरिवस्यारहस्य" ग्रंथामध्ये आणि अनेक अर्थ दर्शविले गेले आहेत. ह्यावरून दिसून येते कीं हा मंत्र किती गोपनीय आणि महत्त्वाचा आहे. ]

एषात्मशक्तिः । एषा विश्वमोहिनी पाशाङ्कुशधनुर्बाणधरा । एषा श्रीमहाविद्या । य एवं वेद स शोकं तरति ॥ १५ ॥
नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान्‍पातु सर्वतः ॥ १६ ॥
ही परमात्मशक्ति आहे. ही विश्वमोहीनी आहे. पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण केलेली आहे. ही "श्रीमहाविद्या" आहे. अशा प्रकारे देवीचे ज्ञान असलेला दुःखापासून मुक्त होतो. भगवती माते ! तुला नमस्कार असो, सर्व प्रकारे आमचे रक्षण कर.

अशा प्रकारे मुक्त झालेले मंत्रदृष्टा ऋषी म्हणतात -

सैषाष्टौ वसवः । सैषैकादश रुद्राः । सैषा द्वादशादित्याः । सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च । सैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाच्चा यक्षाः सिद्धाः । सैषा सत्त्वरजस्तमांसि । सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणि । सैषा प्रजापतीन्द्रमनवः । सैषा ग्रहा नक्षत्रज्योतींषि । कलाकाष्ठादिकालरूपिणी । तामहं प्रणौमि नित्यम् । पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् । अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम् ॥  १७ ॥
हीच अष्टवसू आहे. हीच एकादश रूद्र आहे. हीच द्वादश आदित्य आहे ( संवत्सराचे बारा महीने म्हणजे बारा आदित्य ). सोमपान करणारे व न करणारे विश्वदेवही हीच आहे. हीच असूर, राक्षस, पिशाच्च, यक्ष व सिद्ध आहे. हीच सत्त्व-रज-तम, ब्रह्म-विष्णू-रुद्र, ग्रह-नक्षत्र-तारे, कला-काष्ठादि-कालरूपिणी इ., पापांचा नाश करणारी, भोग व मोक्ष देणारी, अन्त नसलेली, विजयाची अधिष्ठात्री, निर्दोष, शरण जाण्यास योग्य, कल्याण आणि मंगल करणारी आहे. अशा देवीला आम्ही नित्य, सदा नमस्कार करतो.

वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् ।
अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ॥ १८ ॥
वियत (आकाश) - त्याचे अक्षर 'ह', आणि 'ई' कारानें युक्त वीतिहोत्र (अग्नि) चे अक्षर 'र' सहीत अर्चचन्द्र, ह्यानें अलंकृत असे जे देवीचे बीज "ह्रिं" , ते सर्व मनोरथ सिद्धीस नेणारे असे आहे.

एवमेकाक्षरं मन्त्रं यतयः शुद्धचेतसः ।
ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ॥ १९ ॥
ज्यांचे चित्त शुद्ध, परम आनंदपूर्ण झालेले आहे, जे ज्ञानाचे साक्षात सागर आहेत असे यति "ह्रीं" ह्या एकाक्षर ब्रह्माचे ध्यान करतात. [ ॐ कारा प्रमाणेंच हा देवीचा प्रणव मंत्रही त्याच्यासारखाच व्यापक अर्थाने घेतला जातो.

वाङ्माया ब्रह्मसूतस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् । सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुः संयुक्तष्टातृतीयकः  । नारायणेन संमिश्रो वायुश्चाधरयुक् ततः ।
विच्चे नवार्णकोऽ र्णः स्यान्महदानन्ददायकः ॥ २० ॥
वाणी (ऐं), माया (ह्रीं), ब्रह्मसू-काम (क्लीं), ह्यापुढे कान्यासहीत सहावे व्यंजन (म्हणजे 'चा'), अवाम (दक्षिण) कर्ण, 'उ' अनुस्वारयुक्त सुर्यसहीत ( म्हणजे 'मुं'), नारायणांतील 'आ' ने युक्त ट वर्गातील तिसरे अक्षर ( म्हणजे 'डा' ), अधर (ऐ) नें युक्त वायु, (म्हणजे 'यै'), आणि ह्या सर्वानंतर "विच्चै" असा एकूण नऊ वर्णांचा मंत्र [ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ] उपासकांना आनंद व ब्रह्मसायुज्य मिळवून देणारा आहे.

हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातःसूर्यसमप्रभाम् ।
पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम् ।
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे ॥ २१ ॥
जी हृदयरूपी कमळात वास करते, उगवत्या सूर्याप्रमाणे जिची प्रभा आहे, मनोहर रूप असलेली, लाल वस्त्र परिधान केलेली, एका हाताने वर व दुसऱ्या हाताने अभयप्रद देणारी, जिचे तीन नेत्र असून भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते अशा देवीचे मी भजन करतो

नमामि त्वाम् महादेवीं महाभयविनाशिनीम् ।
महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ॥ २२ ॥
महाभयाचा नाश करणारी, महासंकटांचे निवारण करणारी, करुणेची साक्षात मूर्ति असलेल्या अशा देवीला माझा नमस्कार असो.

यस्याः स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया । यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता । यस्या लक्ष्यम् नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या । यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा । एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका । एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नैका । अत एवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ॥ २३ ॥
ब्रह्मादिकांना जिच्या स्वरूपाचा पार लागत नसल्याने जिला 'अज्ञेया' म्हणतात, जिचा अंत न कळल्यामुळे जिला 'अनंता' म्हणतात, जिचे स्वरूप दृगोचर होत नसल्यामुळे जिला 'अलक्ष्या' असे संबोधिले जाते, जिच्या जन्माचे रहस्य न कळल्यामुळे जिला 'अजा' म्हणतात, सर्वत्र जिचे अस्तित्व असते म्हणून 'एका' आणि संपूर्ण विश्वरूपाने सजल्यामुळे जिला 'नैका' ही म्हणतात. अशी ही देवी अज्ञेया, अनंता, अजा, एका आणि नैका म्हटली जाते.

मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी ।
ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी ।
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ २४ ॥
सर्व मंत्रांत 'मातृका' मूळाक्षररूप, शब्दांमध्ये अर्थरूपाने, ज्ञानात ' चिन्मयातीत', शून्यामध्ये 'शून्यसाक्षीणी', आणि जिच्याहून दुसरे असे कांही श्रेष्ठ नाही ती "दुर्गा" नावानेंही प्रसिद्ध आहे.

तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम् ।
नमामि भवभीतोहम् संसारार्णवतारिणीम् ॥ २५ ॥
जिच्या रूपाचे अजिबात आकलन होऊं शकत नाही अशी दुर्विज्ञेय, दुराचारांचा नायनाट करून संसार-सागर तारणारी, अशा ह्या दुर्गादेवीला, भयप्रद अशा संसारापासून निवृत्तिसाठी मी नमस्कार करतो.

इदमथर्वशीर्षं योऽधीते पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति । इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति । शतलक्षं प्रजप्त्वापि सोऽर्चासिद्धिं च विन्दति । शतमष्टोत्तरं चास्याः पुरश्चर्याविधिः स्मृतः ॥ दशवारं पठेद्यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते । महादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः ॥ २६ ॥
ह्या अथर्वशिर्षाचा जो अभ्यास करेल त्याला पांच अथर्वशिर्षाच्या जपाचे फळ प्राप्त होते. ह्याच अर्थ न जाणतां लाखोंवेळा जप केल्यानेही कांहीच साध्य होत नाही. अष्टोत्तर जप ह्याचा पुरश्चरण विधी आहे (पुरश्चरणासाठी १०८ वेळा जप करावा). दहा वेळां पाठ केल्याने महादेवीच्या प्रसाद प्रित्यर्थ अती दुस्तर संकटांचे निवारण तसेच पापापासुन मुक्ति मिळते. पुढच्या श्लोकात फलश्रुति सांगितलेली आहे.

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति । निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति । नूतनायाम् प्रतिमायां जप्त्वा देवतासांन्निध्यं भवति । प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति । भौमाश्विन्यां महादेवी संनिधौ जप्त्वा महामृत्युं तरति स महामृत्युं तरति । य एवं वेद । इत्युपनिषत् ॥ २७ ॥
पहाटे पठण करणाऱ्याला रात्री घडलेल्या पापांचा तसेच संध्याकाळी  पठण करणाऱ्याला दिवसभरांत घडलेल्या पापांचा नाश होतो. मध्यरात्रीच्या अध्ययनाने वाचासिद्धी प्राप्त होते. समोर प्रतिमा ठेऊन जप केल्याने देवीचे सान्निध्य लाभते. 'भौमाश्विनी' योग असतांना जप केल्याने साधक महामृत्युही तरून जातो. अशी ही अविद्येचा नाश करणारी ब्रह्मविद्या आहे.

ॐ  शान्तिः  शान्तिः  शान्तिः ॥
॥ इति श्रीदेव्युपनिषत्समाप्ता ॥

N/A

References :
http://www.manogat.com/node/7011 
विशेष अनुवाद - प्रे. विरभि
Last Updated : December 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP