मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री महालक्ष्मीची आरती

श्री महालक्ष्मीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥
 
जय देवी जय देवी... ॥
 
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥
 
जय देवी जय देवी... ॥
 
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥
 
जय देवी जय देवी... ॥
 
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं ।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ।
वारी मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥
 
जय देवी जय देवी... ॥
 
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी  ॥
 
जय देवी जय देवी... ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP