मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय सदतिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीगुरुभ्यो नम: ॥ ॐ नमोजी श्रीसद्‍गुरु । भवसिंधूचें महातारुं । शिष्य अनाथा पैलपारु । पावविता दातारु तूंचि एक ॥१॥
जरी तुझी कृपा जोडे । तरी मुकेही वेद पढे । पांगुळही मेरु-कडे । लंघी, सांकडे न पडतां ॥२॥
तेहतीस कोटी सुरगण । ब्रह्मा विष्णु आदि करुन । तुझी चिच्छक्ति करी निर्माण । पुन्हां संहरण तेचि करी ॥३॥
हा तंव तियेचा नित्य खेळ । घडी मोडी ब्रह्माण्ड गोळ । परी नेणती जीव बरळ । विष तें केवळ अमृत मानिती ॥४॥
तशांतही कोणी विरळा । पूर्व पुण्ययोगें विनटला । तरी तो कोणा मानवला । ऐसें कळिकाळा न घडेचि ॥५॥
कदाचित्‍ तुझी पडतां दृष्टी । होऊं लागे अमृतवृष्टी । (१)तो प्रपंची नव्हे वेष्टी । म्हणतां पृष्ठी जन लागे ॥६॥
सर्वही जेथें नग्न । तेथें स्वस्त कोणी करी गमन । तरी तोचि मूर्ख सर्वाहून । त्यजितां परिधान; शाहाणा तो ॥७॥
तैसें हे प्रापंचिक सर्व लोक । ’ त्यागीन म्हणे ’ त्या म्हणती मूर्ख । ऐसिया संकटीं तूंचि एक । मार्ग सम्यक दाविता ॥८॥
(२)जनामाजीं जनरीति । प्रपंच करावा यथास्थिति । सो‍ऽहं मंत्राची आवृत्ति । करितां, मुक्ती हस्तगत ॥९॥
जैसा गदी आणि अपथ्यी । तया महौषधि योजिती । जेणें कुपथ्येचि पथ्यें होती । आणि निवृत्तिगतीं, रोग न पवे ॥१०॥
तैसा तुझा हा रसराज । सोऽहं मंत्र ब्रह्मबीज । जया देसी कृपें निज । तयाचें काज सर्व साधे ॥११॥
तैसा तूं सद्‍गुरु श्रेष्ठ । तुजहूनि कोणी नाहीं वरिष्ठ । तुजविना मार्ग स्पष्ट । करिता कष्ट, न सांपडे ॥१२॥
ऐसे असोन, तुझे पाय । न धरी, त्याचे न चुकती अपाय । म्हणवोनि जो सुज्ञराय । तो धांवोनि जाय गुरुसी शरण ॥१३॥
तुज आलिया शरण । कृपादृष्टीं अवलोकन । करिता, तया तुज नाहीं भिन्न । ऐसें महिमान अतर्क्य ॥१४॥
जैसा दीपें दीप लाविला । कोण साना कोण थोरला । हा द्वैत सारा विराला । तैसा केला शिष्य तुवां ॥१५॥
तुज सारिखा जिवलग प्राण । दुसरा न देखों तुजविण । संसारीं वर्ततां आत्मखूण । क्षण येक चुकों न देसी ॥१६॥
जगदंतरीं आपण आहे । आपणामाजीं जग हे पाहे । ऐसी निःसंशय दाविता सोये । तुजवीण होय कोण दुजा ? ॥१७॥
उपमे देऊं ’ स्पर्श-पाषाण ’ । तरी तो लोहाचे करी सुवर्ण । परी न करवे आपणासमान । हेम महिमान तुजचि साजे ॥१८॥
शलभ गगन अंत । कैसा पावेल जी निश्चित । तैसा मी पतिताहूनि पतित । तुझें महत्त्व काय जाणे ॥१९॥
परी तुझें पाहावे रुपडें । तुजचि वर्णावे वाडेकोडें । ऐसें वांछी श्रीपति वेडें । त्याचें सांकडें तुज असो ॥२०॥
जैसा अर्भक छंद घेत । सभाग्य पिता पुरवी समस्त । तैसाचि मी धरुनि हेत । तुज प्रार्थीत दयाळा ॥२१॥
सद्‍गुरु म्हणती रे वाचाळा । किती करिसी रे गलबला । हाचि मानूनि सुखसोहळा । चरणीं लागला श्रीपति ॥२२॥
जैसी रायाची नीच दासी । रायें पाचारुनि तिसी । स्वमुखें गाली =प्रदानासी । देतांही हरुषीं निमग्न ॥२३॥
तैसा मी नीचाचिनीच । मज सद्‍गुरुचेचि कृपाकवच । तयाचे निजमुखींचे वच । सान तेच श्रेष्ठ मज ॥२४॥
असो, जी श्रीरामा दयाळा । सिध्दचरित्र ग्रंथ आरंभिला । तो तुवां येथवरी आणिला । तैसा कडेला पाववी फुडें ॥२५॥
गत प्रकरणाचे शेवटीं । गोदावरीची वर्णिली गोष्टी । ऐकोन श्रोतयां जाहली तुष्टी । फुडें गोमटी कथा वानूं ॥२६॥
श्रीगुरुचे चमत्कार । जे जे ऐकावे ते मनोहर । त्यांतीलही अति नागर । तेचि सार निवडूं आतां ॥२७॥
जगविख्यात जाहली कीर्ति । जे ते दर्शनालागी येती । कितीयेकाचे समंध जाती । गदी ते होती रोगमुक्त ॥२८॥
ऐसें असतां, एके काळीं । एक नवलपरी वर्तली । सदलगे गांवी ब्रह्मकुळीं । नामें बोलिला श्रीपाद ॥२९॥
उपनाम अडके दशग्रंथी । त्याचा सहाध्यायी बाळंभट्ट विख्याति । दैवें पावला परत्र; गति । जाहली ब्रह्मराक्षसी ॥३०॥
ब्रह्मद्रोहें जाहलें ऐसें । हें बाळंभट्ट जाणतसे । म्हणे श्रीपादा हे कळेल कैसें । माझिये दशे तो न पावो ॥३१॥
यास्तव ब्राह्मण मुलाच्या अंगी । संचरोनि, श्रीपादालागीं । पाचारोनि आणवी वेगी । म्हणे सावध जगीं होय बापा ॥३२॥
माझे पूर्वकर्म खोटें । भोगीत आहे दुःख मोठें । तूं तरी सद्‍गुरुचरणीं लिगटे । जेणे तुटे भवबंध ॥३३॥
ऐसें ऐकतां वर्तमान । श्रीपादा गोड नलगे अन्न । म्हणे सद्‍गुरु कैं देखेन । भवबंधन सुटेल कैं ? ॥३४॥
साधुसंत येती घरीं । त्याचें श्रीपाद पाय धरी । म्हणे बुडतो जी भवसागरीं । कैसे परी तरेन मी ? ॥३५॥
कोणी काहीं एक सांगती । ते न माने श्रीपादचित्तीं । श्रीगुरु रामही तेथें येती । सहज गती एक दिनीं ॥३६॥
राम नित्य नेम सारिती । ज्ञानेश्वरी पोथी वाचिती । श्रीपादभट्टही तेथें येती । अर्थ चित्तीं घ्यावया ॥३७॥
श्रीराम व्याख्या सांगतां । तें मानत जाय श्रीपाद चित्ता । परी किंचित्‍ आशंआ येता । होय विचारिता रामासी ॥३८॥
रामाची तो ऐसी रीति । की जना लावावे सत्पथीं । परी वादीं जे प्रवर्तती । त्यासी विशेषोक्तीं न बोले ॥३९॥
म्हणूनि श्रीपादासीं म्हणती । आमुची जेवढी होती मति । तेवढें कथिलें तुम्हाप्रति । मानेल, तैं चित्ती धरावें ॥४०॥
रात्रौ श्रीपाद विचार करी । तो ब्रह्मराक्षस येवोनि दारीं । म्हणे " मूर्खा पाय धरी । वाद न करी तयासी ॥४१॥
याचि वादें माझी स्थिति । ऐसी जाहली कीं अधोगति " । हें ऐकोनि, त्वरित गतीं । श्रीपाद येती गुरुपाशीं ॥४२॥
चरणीं लागूनि लोळे सुबध्द । म्हणे क्षमा करावा अपराध । राम म्हणती, पूर्वी क्रोध । असल्या, क्षमापद शोधावे ॥४३॥
प्रभात होतां स्नान करोनी । विप्र लागे श्रीरामचरणीं । रामें पद्मकर माथां ठेवुनी । कृतकृत्य जनीं तो केला ॥४४॥
पुन्हां राक्षस पावूनि मोदा । म्हणे धन्य धन्य श्रीपादा । श्रीगुरुकृपेचिया यादा । भवाब्धि आपदा न बाधी ॥४५॥
ऐसें सांगोनि तयासी । राक्षस गेला स्वस्थानासी । श्रीपाद होऊनि परमहर्षी । श्रीगुरुसी नमस्कारी ॥४६॥
(३)सिंहावलोकनें श्रोता । आठवावी मागील कथा । जे चिंचणी ग्रामीं राम असतां । श्रीगुरु निंदका त्यागिलें ॥४७॥
त्या दाजी नामेम पटवर्धना । पश्चात्ताप जाहला मना । म्हणे व्यर्थ छळिला विप्रराणा । कवण्या पतना मी पावे ? ॥४८॥
ऐसें आणोनि मानसीं । राम ग्रामीं आले, संधीसी । तैं तो जाऊनि लागे चरणासी । म्हणे विनंतीसी परिसावे ॥४९॥
तुमचा श्रीगुरुचरणीं दृढ भाव । जडला; हें मी न जाणे हतदैव । परी आमचें सर्व वैभव । तुझे कृपेस्तव स्थिर असे ॥५०॥
जैसी चंद्रा देणें दसोडी । तैसी भूमी देतों थोडी । उदईक जाऊनि कुरुंदवाडीं । कृष्णाथडीं राहावे ॥५१॥
सप्तद्वीपा वसुमति । रामासी काय करणें क्षिति । परि श्रीदत्तदर्शना येती । तैसेची जाती कुरुंडवाडीं ॥५२॥
पूर्वील संकेत जाणून । दादा नामक पटवर्धन । ’ तिकोटी ’ ग्रामाप्रति जाण । करिती लेखन आज्ञेचें ॥५३॥
मैंदर्गी आणि त्रिकुट । या ग्रामीं भूमि गृह चोखटा । करुनि देती, अति वरिष्ठ । एकनिष्ठ श्रीमंत ॥५४॥
तेथेंही आले जे शरण । तयांसी करुनि पावन । पुन्हां यावे परतोन । म्हणवोनि प्रस्थान राम करी ॥५५॥
अक्कलकोट नामें पट्टण । येथील मांडलिक राजा जाण । नामें मालोजी म्हणोन । बहुत सुज्ञ वसतसे ॥५६॥
जयासी बाळपणापासुनी । आवडी असे भगवद‍भजनीं । शिवलिंगप्पा नामें कोणी । विद्या अन्वीक्षणी देत तया ॥५७॥
तये विद्येनेंचि भूपति । कृतार्थ मानूनि आपणाप्रति । राहिले होते स्वस्थ चित्तीं । जाहले म्हणती कृतकार्य ॥५८॥
जैसें उपमन्य़ु बाळ । पिष्ट मिश्रित शुभ्र जळ । दुग्ध म्हणोनि मानी सुकाळ । तैसा नृपाळ बहु हर्षे ॥५९॥
कांहीं काळ लोटलियावरी । तेथें ग्रामी यतिवेषधारी । कोणी पातले; त्याची थोरी । अवनीवरी विख्यात ॥६०॥
’ स्वामी अक्कलकोटवासी ’ । ठाउके बहुतेक जनांसी । परी ती लीला ज्ञानोपदेशीं । ना कोणासी सुफलद ॥६१॥
स्वामी कीर्ति वर्णना निमित्त । स्वतंत्र बहुतीं केलें ग्रंथ । ऐसें ऐकिले यास्तव येथ । विस्तारभया चकित न वानी ॥६२॥
कांहीं वाचासिध्दी असे । यास्तव राजाही भजतसे । परी लागले ज्ञानपिसें । तें तों तैसेंचि राहिलें ॥६३॥
पुढें कांहीं काळ लोटला । रायास वृत्तान्त जाणवला । की मैंदुर्गी ग्रामी सिध्द भला । असे पातला रामचंद्र ॥६४॥
तो म्हणे तया सिध्दासी । आणवावे आम्हापासी । म्हणोनि निमंत्रण करी वेगेंसी । अत्यादरेंसी राजेन्द्र ॥६५॥
राजयोग वृध्दिंगत । व्हावा; मनी हा पूर्ण हेत । म्हणोनि राम अवश्य म्हणत । निघोनि येत राजगृहा ॥६६॥
रायें बहुत सत्कार करुनी । राहविलें आपुलें भुवनीं । परी विद्या प्राप्त अन्वीक्षणी । गर्वे न मानी कोणातें ॥६७॥
रामासी विनवी एकांती । (४)ज्ञानें जाणणें काय निगुती । रुप रंग प्रकटती । आम्हांप्रतीही ठाऊकें ॥६८॥
याहून जाणणें उरलें कांहीं । ऐसें आम्हांस वाटत नाहीं । हांसूनि उत्तर देत कांहीं । राम, त्या समयीं, तें ऐका ॥६९॥
म्हणे रे राया सुजाणा । तूं ज्ञानी करिसी प्रस्तावना । इतुकेनेंचि आमुच्या मना । समाधान वाटलें ॥७०॥
परी दृश्य द्रष्टा दर्शन । हे त्रिपुटी जेथें विद्यमान । तेथें कैचें रे आत्मज्ञान । द्वैतपण जेथें न विरे ॥७१॥
अरे या पंच ज्ञानेंद्रियांसी । कर्मेद्रिय पंचक द्वारेसीं । विषम तन्मात्र पंचकेंसी । सुख अहर्निशी सर्व जीवां ॥७२॥
तैसा चक्षुरिन्द्रिय द्वारां । देखिला प्रकाश कोंदला सारा । हाचि मानूनि सुखाचा थारा । कैसा राजेन्द्रा भुललासी ? ॥७३॥
अरे ध्येय ध्याता ध्यान । आणि ज्ञेय ज्ञाता ज्ञान । हें सापेक्षित समाधान । शुध्द ज्ञान न मनावे ॥७४॥
(५)जो त्वां पाहिला प्रकाश । तया प्रकाशविता ईश । कोण ? हें शोधी सावकाश । वृथा भ्रमास भुलूं नको ॥७५॥
ऐसें ऐकोनि सुभाषित । रायाचें दचकलें चित्त । म्हणे बोल हे दिसती सत्य । परी सर्वानुमत घेऊं या ॥७६॥
ऐसें विचारुनि अंतरीं । ग्रामीं अथवा ग्रामान्तरीं । असती जे पंडित शास्त्री । तया पाचारी नृपश्रेष्ठी ॥७७॥
सर्वासमवेत प्रतिदिनीं । राया बैसतसे श्रवणीं । ज्ञानेश्वरी राम मुनि । सार्थ सांगूनि तृप्त करी ॥७८॥
पंडित करिती भवति न भवति । शेवटीं सत्य होय रामोक्ति । तों तों राजयाचिये चित्तीं । पूर्ण संवित्ति बिंबलिये ॥७९॥
परी पूर्वील ज्ञानाभिमान । तो एकाएकी नव्हे न्यून । म्हणवोनीचि साधुजन । ज्ञानाभिमान सांडिती ॥८०॥
अहो अज्ञानी भला भला । सत्वर पावे उध्दाराला । ज्ञानी अभिमानींच बुडाला । थित्या नागवला परमार्था ॥८१॥
मनीं विचारी रामचंद्र । कांहीं करुनि चमत्कार । रायासी आणूं शुध्दीवर । जेणें सुविचार जाणे हा ॥८२॥
मग रायाचे श्वशुरा । राव मोहिते वांगीकरा । तयासी उपदेशूनि सत्वरा । कृपें पूर्ण पात्र तो केला ॥८३॥
तयाकरवीं तयाची कन्या । राजपत्नी सर्वमान्या । उपदेशूनि केली धन्या । जो मार्ग अन्यां सुदुर्लभ ॥८४॥
दिवसेंदिवस बाणतां खूण । वाढत चाललें समाधान । अंतरीं प्रकाश होतां पूर्ण । देदीप्यमान बाह्य दिसे ॥८५॥
एक सुदिवस पातला । राजा अंतःपुरीं गेला । स्त्रियेसी सुखसंवाद चालिला । आगळी लीला तो दिसे ॥८६॥
चिन्मय वृत्ति जाहली पूर्ण । नाहीं देह-स्त्री -पुरुष भान । निजानंदी वृत्ति लीन । आनंदघन कोंदाटलें ॥८७॥
ऐसी पाहुनियां स्थिति । राजासी जाणवलें चित्तीं । म्हणे हे राम कृपेप्रति । पात्र निश्चितीं जाहलीसे ॥८८॥
परी ममाज्ञेवांचुनी । कैसी लागली रामचरणीं । ऐसें ऐकतां, विनीतवचनीं । राजपत्नी काय बोले ॥८९॥
अहो जी मम प्राणेश्वरा । क्षत्रियकुलावतंस भास्करा । रामचरणीं पीयुषधारा । इये पामरा तारका ॥९०॥
परी मी अत्यंत भाग्यहीन । आजवरी न देखे त्याचे चरण । परी मीनवत्‍ कृपा स्मरण । करितां, पावन हे दासी ॥९१॥
हें कैसें घडेल ऐसी शंका । तरी दासीची विनंती ऐका । श्रीरामचंद्रे माझिया जनका । शिष्य मालिका गणियेले ॥९२॥
तयाची कन्या मी लाडकी । म्हणावूनि कृपा कर ठेविला मस्तकीं । याप्रकारें श्रीरामें हस्तकीं । धरिलें; रंकी कृपा त्याची ॥९३॥
परी आतां निःशंक विनंति । करितें; क्षोभूं नये चित्तीं । गुरुहरि दर्शना वर्जिता पति । तात मातादि मती न लागावे ॥९४॥
ऐसा वाटतों शास्त्राधार । प्रभु तूं सर्वज्ञ साचार । सत्य मिथ्या जाणती प्रकार । बोलिले फार; क्षमा कीजे ॥९५॥
ऐसें ऐकतां स्त्रियेचें वचन । रायासी वाटलें समाधान । म्हणे रामप्रताप गहन । तो अज्ञान दीन न जाणे ॥९६॥
काय हा उपदेशाचा बडिवार । स्वयें न बोधिती गुरुवर । तथापि प्राप्तीचे उद्‍गार । स्त्रीमुखें साचार हे निघती ॥९७॥
असो; आम्ही आजवरी । रामा छळिले नाना परी । परी बोलून न दावितां वैखरी । प्रतीति बरी दाविली ॥९८॥
आजवरी लागलो नादीं । मिळविली ’ अय्यां ’ ची मांदी । परी भवबंधातें छेदी । ऐसा त्रिशुध्दि न देखों ॥९९॥
अहो माझिया पूर्वसंचितें । कृपा केली राम-नाथें । आतां लागुया तयाचे पदातें । निश्चय चित्तें पूर्ण केला ॥१००॥
ऐसा करुनि सुविचार । निद्रा करी राजेश्वर । प्रातःकाळ होतां, सत्वर । राम चंद्रवंदना निघे तो ॥१०१॥
रायें करुनिया वंदन । म्हणे ’ गृहभेद केला आपण ’ । राम पुसे सुहास्यवदन । काय वर्तमान जाहले ? ॥१०२॥
राव म्हणे जें जालें तें जालें । मज अंगीकारा जी वहिलें । म्हणवोनि दोनी चरण वंदिले । तैं आलिंगिले रामरायें ॥१०३॥
मग सुदिनीं सुवेळे । राया उपदेशिले घननीळें । रामें आत्मसुखसोहाळे । भोगविले आगळे भाग्याचे ॥१०४॥
उपमन्यु लावावया ओठी । मागतसे दुधाची वाटी । स्थापी क्षीरसागरतटीं । श्रीधूर्जटी ज्यापरी ॥१०५॥
त्यापरी रामें केलें । त्रिपुटीरहित सुख दीधलें । जेथें ’ एक ’ म्हणतां बोलें । बोलाविले तरी नसे ॥१०६॥
असो, राजा आणि राजपत्नी । गुरुसेवे सादर अनुदिनीं । चिदानंदैक कैवल्यदानी । दृढ मनीं हे बिंबलें ॥१०७॥
सर्वदा निजानंदीं मग्न । अथवा करी गुरुसेवन । क्षणैक अडाडी जाणून । राजकारण न पाहे ॥१०८॥
ऐसें जाणोनि राम सद्‍गुरु । काय करी सुविचारु । रायासी आणोनि सत्वरु । ऐक सादरु म्हणितलें ॥१०९॥
जनकादिक ज्ञानी झाले । त्यांनीं काय राज्य त्यागिले । जाणोनि जें जें कर्म केलें । तें नाहीं जाहलें बाधक ॥११०॥
पिपिलिकादि ब्रह्मपर्यंत । संवित्‍ असे ओतप्रोत । जाणोनि सहजावस्थे वर्तत । तोचि निश्चित परमार्थी ॥१११॥
उत्कर्ष अथव अपकर्ष काळ । प्रारब्धानुरुप येत वेळ । हर्ष विषादें मन चंचळ । नव्हता, निश्वळ असावे ॥११२॥
ऐसें वर्ततां जो संसारी । तोचि पूर्ण ज्ञानी अवधारी । ऐसें ऐकतां, चरणावरी । मस्तकु धरी राजेन्द्रा ॥११३॥
म्हणे ज्ञान, जप तप ध्यान । तूंचि माझे देवतार्चन । तुझी आज्ञा मज वेदप्रमाण । मी वर्तेन तदनुसार ॥११४॥
ऐसा प्रपंच आणि परमार्थी । रायासी करुनि पुरुषार्थी । कितीएकासी लाविलें सुपंथीं । राम कीर्ति थोरावे ॥११५॥
एके दिनीं चमत्कार । जाहला, तो भाविक नर । ऐका; मन करुनि एकाग्र । कर्ण पवित्र व्हावया ॥११६॥
दीपावलीचा समारंभ । राजवाडयांत होतसे दंभ । चंद्रज्योती; हवईचे कोंभ । राजा सुप्रभ करवीतसे ॥११७॥
श्रीसद्‍गुरुसी प्रार्थुनी । समारंभ पाहावयालागोनी । पुत्रासमवेत ये घेउनी । राजा मनीं आनंदें ॥११८॥
राजगृहासन्निध । श्रीगुरुंचें गृह प्रसिध्द । अग्नि स्फुलिंग उडे सक्रोध । तेणें गृह दग्ध होऊं पाहे ॥११९॥
गृही दुसरें नाहीं कोणी । एकटी असे सद्‍गुरुपत्नी । सर्व जन पाहावया लागोनी । राजसदनीं गुंतलें ॥१२०॥
श्रीगुरुपत्नी पतिव्रता । महासाध्वी शुचिष्मंता । पतिस्मरणे चरणतीर्था । होय शिंपितां शांत्त अग्नि ॥१२१॥
ऐसे कित्येक चमत्कार । दिवसेंदिवस होती अपार । वर्णितां होईल ग्रंथविस्तार । म्हणोनि त्रुटिमात्र बोलतों ॥१२२॥
कीर्ति वाढली अपरंपार । धांवूनि येती नारीनर । जड जीवांचा करी उध्दार । आणि जीर्णोध्दार राजयोगा ॥१२३॥
रामकृष्ण नामें विख्यात । जो का राजपुरोहित । तोही तीर्थी जाहला सुस्त्रात । शुध्द भावार्थ जयाचा ॥१२४॥
प्रावृटूकालीं सरिता ओघ । सागरा धांवूनि येती सवेग । तैसें स्वोध्दारार्थी जग । करिती लाग रामचरणीं ॥१२५॥
असो, रामें बहुत दिवस । तये ठायीं केला वास । मग पुसोनियां रायास । मागे जावयास निरोप ॥१२६॥
श्रीगुरुचे ऐसे वचन । ऐकतां दचके रायाचे मन । विनवीतसे कर जोडून । म्हणे मी दीन तुम्हाविणें ॥१२७॥
स्वतंत्र गृह आणि भूमी । देतो; वास्तव्य करावे स्वामी । राम म्हणे दिधले तुम्ही । तेणे आम्हीं संतोषी ॥१२८॥
आम्हास करणें जगदुध्दार । केला पाहिजे भूसंचार । तुमचें स्वस्थ असो द्या अंतर । नाहीं दूर मी तुम्हासी ॥१२९॥
ऐसे नाना प्रकारें संबोखून । रायाचें केले समाधान । परम कष्टे निरोप घेऊन । राम तेथून निघाले ॥१३०॥
तो शटयाप्पा नामें भाविक नर । श्रीगुरुचरणीं ठेवूनि शिर । म्हणे माझा करावा अंगीकार । ’ संगधरी ’ ग्रामी येउनी ॥१३१॥
अवश्य म्हणोनि श्रीगुरुराज । संगधरीस गेले सहज । अनेक भाविकां निज बीज । सांगोनि; कृतकाज ते केले ॥१३२॥
धोत्री आणि मंगसोळी । येथेंही राहिले स्वल्पकाळीं । बहुत जाहली शिष्यमंडळी । नामावळी गणवेना ॥१३३॥
शुध्द अथवा अपवित्र नीर । सागरा मिळतां करी सागर । तैसें श्रीरामाचें चरित्र । दासा पवित्र करीतसे ॥१३४॥
ऐसें जगा करीत पावन । राम पावले त्रिकुटस्थान । जेथें गृह आणि भूमि नूतन । संपादन जाहलीसे ॥१३५॥
तेथेंही अनेक संप्रदायी । जाहले; तारिले भवप्रवाहीं । शरण आलिया न बुडों देई । दीनाची आई गुरुमूर्ति ॥१३६॥
तया ग्रामीं मोरोपंत । उपनाम छत्रे विख्यात । तयाचे स्त्रियेचे अंगांत । समंध अद्‍भुत संचरला ॥१३७॥
बहुत देव, देवऋषि । केले; परी गुण न तियेसी । म्हणती काय करावे यासी । चिंता मनीं आप्तंच्या ॥१३८॥
एके दिनीं तियेचा भ्रतार । मोरो रामचरणीं ठेवी शिर । म्हणे काय करुं विचार । समंध दूर कैं होय ? ॥१३९॥
राम म्हणती ’ पंचाक्षरी । आम्ही नोहोत गा निर्धारी । तथापि आणी येथवरी । सामोपचारीं त्या पुसों ’ ॥१४०॥
ऐसी निघतां रामवाणी । मोरो संतोषला मनीं । येऊनियां आपुलें सदनीं । स्त्रियेसी घेउनी पुन्हां गेला ॥१४१॥
राम म्हणे समंधाला । पूर्वकर्मे हा जन्म आला । पीडिसी आतांही इतरांला । काय साधिला पुरुषार्थ ? ॥१४२॥
ऐसी ऐकतां समर्थ वाणी । समंधीं नेत्रीं आणिलें पाणी । म्हणे कैवल्य मोक्षदानी । काय करणी करूं पुढें ? ॥१४३॥
तुझे पाय आजि देखिले । पूर्वजन्मीचें स्मरण जाहलें । जी मी द्विजन्मा असतां वर्तलें । कर्म ते फळलें या रुपें ॥१४४॥
स्वधर्मी वर्तत होतो स्वामी । नाही जाहलों परस्त्रीगामी । अपहार द्रव्य अथवा भूमि । कदापि मी न करीच ॥१४५॥
परी मी स्वधर्माचरणनिष्ठ । हाचि अभिमान जाहला वरिष्ठ । अवमानिले श्रेष्ठ श्रेष्ठ । तेणें हे अरिष्ट पावलों ॥१४६॥
तुझे चरण देखिले आजि । तारक भवार्णवामाजीं । मदुध्दरणीं उपाय योजी । चरणसरोजीं मिलिंद मी ॥१४७॥
राम म्हणती सोऽहं हंस । मंत्र जपसी सावकाश । तरी तूं होशील निर्दोष । सांगतां; त्रास उपजे त्या ॥१४८॥
म्हणे जी स्वामी दीनदयाळ । तुवां जो मंत्रोच्चार केला । तो तत्प अयस्कान्त गोळा । तद्‍वत्‍ झोंबला कर्णातें ॥१४९॥
तेव्हां यया मंत्राचा जप । कैसा करुं ? मी मूर्त पाप । राम म्हणती न धरी कंप । तूं निष्पाप होशील ॥१५०॥
ऐसें आश्वासूनि तया । त्रिदिनपर्यंत चरण तोया । देऊनि, केला निष्पापिया । महिमा ही गाया मज दीना ॥१५१॥
चतुर्थ दिनीं उपदेश । देऊनि केला तो निर्दोष । वारंवारे चरणरजास । म्हणे मी दास तुमचा भुकेलों ॥१५२॥
महाराज दुर्घट योनीं । कष्टत होतो मी पावूनी । मुक्त केलें आजिचे दिनीं । कीर्ति त्रिभुवनी हे जाहली ॥१५३॥
भविष्य सन्मुख दिसे येवेळीं । एक जन्म घेऊं द्विजकुळीं । सोऽहं हंस नामावळीं । चिन्मय मेळीं मिळेन ॥१५४॥
ऐसें बोलोन; चरणकमळीं । भाळ ठेवी वेळोवेळीं । सोऽहं हंस नामावळीं । गर्जोनि मोकली देह तिचा ॥१५५॥
यापरी स्त्री आणि समंध दुर्धर । केला उभयतांचा उध्दार । किती वर्णूं रामचरित्र । सहस्त्रवक्त्र शिणला जेथें ॥१५६॥
या अध्यायीं समंध गति । देऊनि, केला शुध्दमति । यास्तव सद्‍गुरु वरदान देती । या प्रकरणाप्रति, तें ऐका ॥१५७॥
ज्यासी समंध ये अंगांत । अथवा लागले भूतप्रेत । तयांनीं एकवीस दिवसपर्यंत । वाचावा नित्य अध्याय हा ॥१५८॥
जरी न करवे तया पठण । तरी करवावे त्यासी श्रवण । तो मुक्त होय तयापासोन । भावार्थे पूर्ण फलप्राप्ति ॥१५९॥
तैसाचि जो दारिद्यें पीडित । नेमें अध्याय हा वाचित । ती होईल दारिद्यमुख । पहावी प्रचीत भावार्थे ॥१६०॥
कारण इया अध्यायीं । राजया उपदेशिलें पाही ।  तो पठण करितां दरिद्र जाई । संशय कांहीं नसेचि ॥१६१॥
श्रीपति जोडूनि दोन्ही कर । श्रोतयां घाली नमस्कार । संपत आलें सिध्दचरित्र । कृपे पात्र केलें तुम्ही ॥१६२॥
तुमचा तुम्ही केला ग्रंथ । नाम मात्र श्रीपति येथ । भणगा करावे राज्यपदस्थ । महिमा अद्‍भुत समर्थाचा ॥१६३॥
श्रीरामें मज आज्ञापितां । करावया सिध्दचरित्र ग्रंथा । भय वाटलें अत्यंत चित्ता । परी कर माथां ठेविला ॥१६४॥
तैसीच तया प्राज्ञाची आज्ञा । कोण भंगील शुभेच्छुमना । येरू करील रज; करणा । सामर्थ्य जाणा हें त्याचें ॥१६५॥
ऐसा विचार करोनि पुरता । पुन्हा चरणीं ठेविला माथा । म्हणती निर्भय चालवी ग्रंथा । आश्रय माता गोदावरी ॥१६६॥
तया सद्‍गुरुचे कृपेनें । आणि तुमचिया अवधानें । गोदावरीच्या साहाय्याने । ग्रंथ रचनें प्रवर्तलों ॥१६७॥
तो पावला येथवरी । पुढेंही बैसूनियां वैखरी । सिध्द पाववाल निज निर्धारी । अभिमानधारी तुम्ही सर्व ॥१६८॥
श्रीसद्‍गुरु राम समर्थ । तयाचा मी आज्ञांकित । कल्पद्रमाश्रित मनोरथ । यथास्थित पूर्ण होती ॥१६९॥
ब्रह्मानंदा राम पवित्रा । श्यामसुंदर कोमल गात्रा । ह्र्दयीं धरुनियां छात्रा । करी सुपात्रा तूं धन्य ॥१७०॥
केवळ काष्ठाच्या पादुका । तुवां धरितां चरणीं देखा । मान्य होती ब्रह्मादिकां । महिमा निका तुमचा हा ॥१७१॥
तैसा श्रीपति चरणरज । परी तुवां करितां चोज । याचें जळोनि वासना बीज । सहज सेवे पावेल ॥१७२॥
न करी अभ्यास अथवा सेवा । ऐसा हतभाग्य मी जी देवा । परी आधार इतुका जीवा । तारिसी नांवा आपुलिया ॥१७३॥
ब्रह्मानंदा रामराया । चिदैकरुपा भक्तसखया । महाराजा राजयोगिया । तुझे पाया नमन माझे ॥१७४॥
कल्पद्रुमाचिया हारी । वोवाळाव्या तव कृपेवरी । सलोकतादि मुक्ती चारी । कृपेच्या बालाग्रीं न पुरती ॥१७५॥
पूर्णकाम कल्पद्रुमा । योगीजनांचिया विश्रामा । इतुकें वरदान देईं आम्हां । तव चरणीं प्रेमा सदा असो ॥१७६॥
नलगे मोक्ष, संपत्ति धन । एक तव चरणीं असावे लीन । इतुकें मागूनियां वरदान । सप्तत्रिंशति प्रकरण संपविलें ॥१७७॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१७८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय सदतिसावा संपूर्ण ॥

टीप- (१) तो प्रपंची नव्हे वेष्टी । म्हणतां पृष्ठीं जन लागे ॥...ओवी ६ :-
या ओवींत श्रीपतींनी लोकव्यवहाराचें छान दिगदर्शन केलें आहे. एखाद्याला गृह बायका मुलें इत्यादि उपाधींत न गुंततां,
एकटे राहून परमार्थ करावयाचा असेल तर त्याचे आईबाप, इष्टमित्र त्याला प्रथम तरी तसें करुं देत नाहींत, मुर्ख ठरवितात. तो प्रपंचांत वेष्टी म्हणजे वेढलेला नसेल तर ( तसा वेढयांत पडण्यासाठीं ) लोक पाठीस लागतात. असा या ओवी चरणांचा शब्दशः अर्थ घ्यावा. पूर्ववयांत एखाद्यावर गुरुनें अनुग्रह केला तरी त्या साधकाला लोक ’ अरे तुला देव
देव करायला कुणी नको म्हटलें आहे ? पण हे लग्न न करण्याचें खूळ कोठून डोक्यांत घेतलें आहेस ? एकनाथांनीं नाहीं कां प्रंपच केला ? ’ अशा उपदेशाला तयारच असतात. पुढील सातव्या ओवींत या लोकांच्या वृत्तीबद्दल समर्पक दृष्टांत दिला आहे.
(२) सोऽहं आवृत्ति करितां । मुक्ती हस्तगत - ओवी ९ :- ओवी क्र ९,१० व ११ या तीन ओव्यांतून सोऽहं जपाचें वर्णिलेलें
सामर्थ्य सांप्रदायिक वाचकांची निष्ठा दृढ करणारे आहे. नवव्या ओवींतील, सोऽहं मंत्राची सतत आवृत्ति करीत राहिल्यास
मुक्ति सहज लाभते हा उल्लेख; दहाव्यांतील सोऽहं मंत्राला महौषधाची म्हणजे संजीवनीची दिलेली उपमा व ११ व्या
ओवींत सोऽहं हंसःचा ’ ब्रह्मबीज ’ हा निर्देश हें अनुग्रहीतांनीं बारकाईनें ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत अजपा गायत्रीचे महत्व ओवीबध्द स्वरुपांत व इतके पुनःपुन्हां वर्णन केलेले फारच क्वचित्‍ आढळते .

(३) सिंहावलोकनें श्रोता । आठवावी मागील कथा ओवी ४७ :-
ही सबंध मागील कथा म्हणजे बत्तिसाव्या अध्यायांतील ओव्या १९० ते २०३ पर्यंतचा चरित्र भाग होय [ ३२ अ/ टीप ६ वी पण वाचकांनीं पहावी ] तें स्मरण देऊन श्रीपतिनाथ ४७ ते ५४ ओव्यांतूण सांगतात कीं श्रीरामचंद्र महाराजांचा परमार्थातील अधिकार ओळखून श्रीदाजी पटवर्धन यांना, महाराजांस नोकरीतूंन मुक्त केल्याबद्दल, अनुताप झाला. श्रींना
शरण जाऊन दाजी व दादा पटवर्धनांनी कुरुंदवाड, मैदुर्गी व त्रिकुट म्ह. तिकोटें येथे वाडा व जमीन महाराजांना अर्पण केली.
(४) ज्ञानें जाणणें काय निगुती । रुपरंग आम्हांप्रति ठाउके ।-ओवी ६८ :- अक्कलकोटचा राजा मालोजी हा थोडी ध्यान-
धारणा करीत असे. श्रीरामचंद्र महाराजांस त्यानें राजवाडयांत आणले. ध्यानांतील नाद प्रकाशदर्शनांतच तो राजा कृतार्थता मानीद्त होता. म्हणून तो येथें महाराजांस म्हणतो " ज्ञानमार्गाने साधन केल्यावर कांहीं रक्त श्वेत पीत असे रंग दिसत
असतील तर ते आम्हांला ठाऊक आहे. तेव्हां ज्ञानानें आणखीं कांहीं जाणावयाचे असेल असे वाटत नाहीं. " अशा आशयाचे राजा बोलल्यावर महाराजांनीं त्याला ७५ व्या ओवींत उत्तर दिले आहे.

(५) त्वां पाहिला प्रकाश । तया प्रकाशविता ईश । कोण हे शोधी ॥-ओवी ७५ :-
या पोथींतील गुरुशिष्य परंपरेंत जी सोऽहं राजयोग साधना चालत आली आहे ती साधना जीवाला स्वतःच्या स्वरुपाची
ओळख करुन देणारी, मूळ ठिकाणावर पोहोचविणारी असल्यानें या अभ्यासांत, मन सोऽहं मंत्रावर केंद्रित झाल्यामुळे
विकसित झालेल्या आत्मशक्तीच्या योगें नाद, रुप, प्रकाश, यांचे विविध अनुभव येतात पण त्या अनुभवांना अवास्तव महत्त्व नाही. या अनुभवांतूनही दृश्यें पाहणारा, मी द्रष्टा पाहावयाचें ते दृश्य व पाहण्याची क्रिया अर्थात्‍ दर्शन - अशी त्रिपुटी असते. म्हणून वरील ७४ व्या ओवींत ’ तें शुध्द ज्ञान नव्हे असें सांगून श्रीगुरु येथें, ’ प्रकाशाला प्रकाशविता कोण आहे ते शोधून काढ ’ असें बजावतात. आत्मसाक्षात्काराचा हाच एकमेव मार्ग असल्याने स्थल -काल -भाषा-भिन्नत्व असूनही सर्व ज्ञानमार्गी संत हार उपदेश करतात. विख्यात ज्ञानयोगी ब्रह्मीभूत श्रीरमणमहर्षीचा उपदेशही Know thyself
असाच असे. येथें परंपरेच्या दृष्टीनें आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की शके १८०५ मध्ये लिहिल्या
गेलेल्या ओवींतील आशय हुबेहुब तशाच शब्दांतून ऐंशी वर्षानंतर परंपरेचे आजचे अधिकारी संत स्वामी स्वरुपानंद
यांच्याही एक स्फुट ओवींत आला आहे. ती ओवी अशीः नादश्रवण प्रकाशदर्शन । तेथें श्रोता द्र्ष्टा कोण । तो आत्माचि
मी , हे ओळखून । तदनुसंधान राखावे ॥ या दोन ओव्यांतील अर्थसाम्य हा योगायोग नव्हे ! शेंकडो वर्षे शुध्द स्वरुपांत चालत आलेल्या संप्रदायाच्या अखंडत्वाचा हा मोठा पुरावा आहे !!

कठिण शब्दांचे अर्थ :- शलभ = टोळ हा प्राणी (१९) गालिप्रदान = अपशब्द बोलणें, शिव्या देणें (२३) गदी= रोगी [ गद म्ह रोग ] (२८) पिष्टमिश्रित जळ = पीठ कालवलेले पाणी (५९) श्वशुर = सासरा (८३) अय्यांची मांदी = कानडी [ गु ] लोकांचा मेळावा (९९) सदंभ = दंभयुक्त, लक्षणेनें अर्थ थाटामाटानें (११७) भणगा= भणंगाला, दरिद्री मनुष्याला (१६३) हारी ( नाम ) =
ओळ (१७५) बालाग्र = [ बाल+अग्र ] केंसाचें टोंक. (१७५)

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP