मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय तेहतिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेहतिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नम: ॥
ॐ नमो श्रीगुरुपीठिके । सांप्रदाई कल्पलतिके । महामाया तमच्छेदके । रविरश्मिके चित्कले ॥१॥
यथानुक्रमें नामावळी । स्मरतां मोक्षाची माउली । भवताप तप्तातें साउली । करुनि, राउळीं नेसी तूं ॥२॥
श्रीआदिनाथ मच्छेन्द्र । गोरक्ष गहिनी चित्समुद्र । निवृत्तिराज ज्ञानेश्वर । महिमा अपार जयांची ॥३॥
चूडामणि गुंडोराव । रामचंद्र महादेव । माझा तात महानुभाव । श्रीरामराव शेवटींचा ॥४॥
ऐसें हे अकरा सिध्द । ज्यांची कीर्ति जगप्रसिध्द । जयांचे स्मरणमात्रें अगाध । भवाब्धि गोष्पद होतसे ॥५॥
ते सर्वही एकच रुप । घरोनियां नाना स्वरुप। दीन अनाथा मायबाप । कृपा अमूप जयांची ॥६॥
जे एकाक्षराचे दाते । अवाग्ज वाचे बोलाविते । नादसंधानी रमविते । उध्दरिते जडजीवां ॥७॥
ते ॐ काराचेंचि बीज । स्वप्रकाशें तेजःपुंज स्थित्युद्भव प्रलय काज । चाले सहज ज्यांचेनि ॥८॥
केवळ आनंदाचे कंद । मूर्तिमय चिदानंद । जड जीवांसी करणें बोध । मूर्ति विविध याचिलागीं ॥९॥
जे करोनि अकर्ते । भोग भोगूनि अभोक्ते । जे परावाचेहुनि परते । अज्ञान हर्ते चित्सूर्य ॥१०॥
देहधारी अज्ञानदृष्टीं । परी ज्ञानाचे परमेष्ठी । जग होऊं नये कष्टी । म्हणोनि सृष्टीं अवतार ॥११॥
ऐसे ते महाराज सिध्द । तिहीं लोकामाजी प्रसिध्द ।  महिमा जयांचा अगाध । वर्णितां स्तब्ध, श्रुति होय ॥१२॥
जे भवनदीचे तारुं । भक्तह्र्दयाब्ज भास्करु । तयांचे चरणीं वारंवार । नमस्कारु पैं माझा ॥१३॥
पीठिकामिषें भागीरथी । जे जगत्रयातें उध्दरिती । तीतें पावलों अवचिती । धन्य क्षितीं तेणें मी ॥१४॥
(१)भूपति-उदरीं जनन । होय बहुपुण्यें करुन । मा जगत्रय एकांशें जाण । ज्याचें; धन्यपण कें वानूं ? ॥१५॥
ऐसियाचे चरणरज । लाधतां; धन्य होती पूर्वज । तें मी पावलों जी सहज । जे महाराज भवतरणी ॥१६॥
जयांचे अपांग पात । ब्रह्मेन्द्रादि देव वांछित । तया पदीं मी लोळणी घेत  । अहा भाग्यवंत मज्जनक ॥१७॥
अगा पंचाननाची हांक । ऐकोनि, वनचरें धाक । घेती; परी त्याचे अर्भक । वोसंगीं निःशंक प्रवेशे ॥१८॥
तैसेंचि तूं मज बाळासी । माउलिये आपुलें म्हणविशी । न भिये कळिकाळासी । रिघालों पाठीसी मी तुमच्या ॥१९॥
असो, मागिलिये प्रकरणीं । केवळ चिद्रत्नाची खाणी । सद्‍गुरु महादेवें उघडोनि । रामा नयनीं दाविली ॥२०॥
अमृता अमृतें जेवविलें । कीं चंद्रा चंद्रेंचि शीतळ केलें । सूर्यरश्मीसी आणिलें । प्रकाशत्व सूर्येचि ॥२१॥
कीं दीपें दीप प्रज्वळिला । अग्नीनें अग्नि चेतविला । केवळ आपणाऐसा केला । तैसें रामाला झाले हें ॥२२॥
ती उपदेशाची कथा । स्वयें श्रीगुरु झाला लिहिता । नाममात्र श्रीपति वक्ता । करणें, ही सत्ता तयाची ॥२३॥
सर्व करोनि अकर्ता । हे जयाची अघटसत्ता । गुरुगौरवासी तत्त्वताम । मीही माथा वोढविला ॥२४॥
सद्‍गुरुचे गमनकाळी । वियोगाग्नि तनु जाळी । परी कृपामृताची नव्हाळी । जीवविती झाली रामासी ॥२५॥
करावया जगदुध्दार । आज्ञापिती श्रीगुरुवर । ते चित्ती धरुनि, श्रीरामचंद्र । करी सुविचार तो ऐका ॥२६॥
रामचंद्राची कान्ता । ’ जानकी ’ नामें शुचिष्मंता । परमधार्मीक पतिव्रता । जिची सदयता काय वानूं ? ॥२७॥
न करी व्रतें उपोषणें । अथवा धरणे पारणें । एक पतिसेवेविणें । कांहीं न म्हणे माय माझी ॥२८॥
जी पतिदुःखे होय कष्टी । पतिसुखें दुणावे पुष्टी । तीच धन्य इये सृष्टीं । वंदी परमेष्ठी तियेसी ॥२९॥
नको जपजाप्यविधि । नलगे करणें आत्मशुध्दि । पतिसेवेंचि सर्व सिध्दि । ऐसा अनुवादि शास्त्रार्थ ॥३०॥
नातरी सर्व जाणे कळा । पतिभजनीं नाहीं जिव्हाळा । ती स्त्री परम अमंगळा । न पडो डोळां मुख तिचें ॥३१॥
जळो जळो तें शहाणपण । अथवा सौंदर्यसंपन्न । प्रेमभरें पतिसेवन । न करितां जाण सर्व व्यर्थ ॥३२॥
तैसी नव्हे माझी माउली । धर्म नांदे जिचे साउलीं । क्षिति मानी प्रतिपाउलीं । ’ धन्य झाली मम तनु ’ ॥३३॥
भ्रताराचे वैभवा देखोनी । वरिवरी दाविती संपादणी । तैसी नव्हे माझी जननी । पतिभजनीं तत्पर ॥३४॥
एके दिनीं मिष्टान्न । एके दिनीं भाजीचें पान । मिळो; कीं घडों उपोषण । परी पतिसेवन न खंडे ॥३५॥
जे जे पतीचे मनोगत । तेचि इयेचें व्रत । दुसरा नेणेचि परमार्थ । आराध्य दैवत पति येक ॥३६॥
ऐसी ती उत्तमोत्तमा । किती वानू तिचा महिमा । सदा आनंदवी रामा । सत्य प्रेमा दाउनी ॥३७॥
पतिव्रता एके दिनीं । सुप्रसन्न मुख पाहुनी । विनवी रामा कर जोडूनी । म्हणे दीनीं कृपा असो ॥३८॥
जी जी स्वामी कृपा करा । मम सौभाग्यसमुद्रा । अनाथाचिया माहेरा । देईजे थारा चरणीं मज ॥३९॥
पूर्वपुण्य माझे उदेलें । म्हणोनि हे चरण लाधले । सर्वसुखा पात्र जाहले । परी चित्तीं चिंतिलें ऐकिजे ॥४०॥
स्वामी तुम्हां वरुनि मात्र । जे जे प्राप्त होय स्वतंत्र । त्या सर्वस्वा मीच पात्र । ऐसें शास्त्र वाखाणी ॥४१॥
की पतीचे सर्व सुखा । पात्र पतिव्रताचि देखा । तरी, स्वामी श्रीगुरुमुखा । पासोनि जे का लाधलें ॥४२॥
तया सुखाची विभागी । जी मी असतां अर्धांगी । नोहे जी का मी या जगीं । ऐसी अभागी काय मी ? ॥४३॥
जरी हे दासी मानिली । आजवरी प्रतिपाळिली । तरी आतां अव्हेरिली । न पाहिजे कीं स्वामिया ॥४४॥
हां जी तुमचे अर्धांग । पावले तैंचि, सर्व सांग । माझें झालें अव्यंग । अपांगपातें तुमचिया ॥४५॥
परी श्रीगुरुची भेटी । होय, तोंवरी आपण कष्टी । बहुत होतां आनंदवृष्टि । आतां सृष्टि भरलीसे ॥४६॥
तें सुख मियांही पावावे । ऐसें वाटतसे जीवें । जरी पात्र मी; तरी देवें । कृपा गौरवें करावी ॥४७॥
ऐसा दीन चकोरचंद्र । शिष्यता दाता चित्समुद्र । प्रार्थिला श्रीरामचंद्र । कीर्ति सांद्र जयाची ॥४८॥
ऐसे पतिव्रतेचे बोल । ऐकतां रामा प्रेमकल्लोळ । न सांवरत आले तात्काळ । अंकी वेल्हाळ घेतली ॥४९॥
कृपाकरें कुरवाळोनि । म्हणती शुभांगे कामिनी । तूं सद्‍गुणरत्नांची खाणी । चिंता मनीं न वाहे ॥५०॥
जे आमुचे सर्वस्वाचें । पात्र तूंचि अससी साचें । तुज गौप्य कवणें वस्तूचें । नाही आमुचे मानसीं ॥५१॥
सुदिवस सुमुहूर्ती । तुज गूज सांगूं एकान्तीं । जें शंकरें गिरिजेप्रति । असे निश्चिती सांगितलें ॥५२॥
ऐसें अभयोत्तर घेउनी । जानकी संतोषली मनी । म्हणे धन्य मी त्रिभुवनीं । स्वामीचेनि सर्वदा ॥५३॥
राम विचारी निजमानसीं । जगदुध्दार करावयासी । सद्‍गुरु आज्ञापिती आम्हांसी । तें पतिव्रतेसी बोधीन ॥५४॥
ऐस करुनियां निश्चय । पाहोनियां सुसमय । कांतेसी म्हणे रामराय । स्वस्थ ह्र्दय करी वो ॥५५॥
तुज दिधलें जें वचन । तें आजि करूं पूर्ण । पूजा साहित्य आणी तूर्ण । निजात्मखूण सांगतों ॥५६॥
ऐसे आज्ञापितां कान्त । जानकी हर्षे निर्भरित । होऊनि;साहित्य त्वरित । सिध्द करीत आनंदे ॥५७॥
मग सन्मुख बैसवोनि । पद्मकर माथां ठेवूनि । म्हणती ऐके वो कामिनी । धन्य त्रिभुवनीं तूं एक ॥५८॥
श्रीआदिनाथें हें गुज । उमेसी बोधितां, सहज । मत्स्योदरीं तेजःपुंज । मच्छेन्द्र राज ग्रहण करी ॥५९॥
मच्छेन्द्रनाथें गोरखासी । गोरखरायें गहिनीसी । गहिनीनाथें निवृत्तीसी । ते ज्ञानेश्वरातें उपदेशिती ॥६०॥
ज्ञानदेवें चूडामणि । तेणें गुंडुराज महामुनि । हाचि सदुपदेश देउनी । केलें त्रिभुवनीं साजिरें ॥६१॥
त्या गुंडोरायें रामचंद्र । चिदैक्य बोधिला ज्ञानसमुद्र । महादेव शिरीं कर । कृपें सपूर राम धरी ॥६२॥
तो महादेव माझा तात । मज वोसंगामाजीं घेत । ऐसें परंपरागत । हें ज्ञान प्राप्त मज झालें ॥६३॥
म्हणोनि ही गुरुपिठिका । चित्ती धरावी नेमका । नित्य इयेचा जप देखा । करिता, सुखा पावशी तूं ॥६४॥
ऐसी गुरुपरंपरा । सांगूनियां सोऽहं मंत्रा । पढविती अवाग्जसूत्राक्षरा । मन स्थिरावे ज्याचेनि ॥६५॥
शबल वायु सांडविला । शुध्दांशें प्रणव पन्नासिला । तो ऊर्ध्वमुखें चालिला । प्रज्वळिला अधोर्ध्व दिसे ॥६६॥
जैसें शुष्क इंधन । माजीं स्वल्प कृशान । पडतांचि, तें देदीप्यमान । होय्य अतितूर्ण अविलंबें ॥६७॥
तेंवी प्राणापानाची समता । होवोनि, ऊर्ध्वमुखें चढतां । राहिली ती मागील अवस्था । वृत्तिशून्यता जाहली ॥६८॥
पतिव्रता शुचिष्मंता । पतिसेवे पुण्यवंता । वरी रामरायें बोधितां । वेळु न लागतां धन्य झाली ॥६९॥
प्रणव चाले निजानंदी । शोधोनियां सांदोसांदीं । शुध्द करोनि त्रिशुध्दि । परमावधि पावला ॥७०॥
तंव असनाचा उबारा । अपानु वोहटे माघारा । प्राणासी मिळे अतिसत्वरा । ह्र्दयकोशामाझारीं ॥७१॥
सप्तचक्राचे कपाट । भेदोनि; काकीमुखाची वाट । धरोनि, चालिला सुसाट । त्रिकुट घाट लंघावया ॥७२॥
कां जो नासापुटें पवन । प्रमाण द्वादशांगुलें गमन । करी; तो माघारा मुरडोन । अंतरीं तदा प्रवेशे ॥७३॥
मग सप्तधातूंचे कडे । शोधिले तेणें कडोविकडे । अत्यंत शुध्द केलें चोखडें । दिव्य रुपडें सतीचें ॥७४॥
पृथ्वी आपातें जिणोनी । वायु सांगातें घेउनी । जाहला प्रवेशतां वन्ही । चिद्‍गगनी निःशंक ॥७५॥
महातेजाचे बंबाळे । तेथें एकसरा उठिले । जणूं कोटिभानु उगवले । दाहकत्व निराळें ठेवुनी ॥७६॥
तदा असंख्य तारा रिचवती । की मोतियें विखुरती । विद्युल्लता झळकती । तेजें दिसतीं यापरी ॥७७॥
तेथें अनुहताची पाही । लागलीसे एक घाई । नादें भरल्या दिशा दाहीं । देह गेहीं स्मृति कैची ? ॥७८॥
सत्रावियेचें पाट । वाहताती घडघडाट । तेथें कुंडलिनी घोट । घेउनी, पोट भरीतसे ॥७९॥
बहुता दिवसांची भुकेली । अधोमुखें श्रमी झाली । ऊर्ध्वमुखें होतांचि धाली । आदि माउली जगाची ॥८०॥
ऐसें अद्‍भूत हें देखिलें । तेव्हा सतीसी नवल वाटलें । म्हणे म्यां पिंडींच की वहिलें । आजि देखिलें ब्रह्माण्ड ॥८१॥
हरिहराच्या मूर्ति । असंख्य शक्ती आणि गणपती । असंख्य सूर्य असंख्य दीप्ति । पाहे सती तयेवेळीं ॥८२॥
मी कामिनी, ते प्राणेश्वरु । यया भावा पडिला विसरु । तारक एक श्रीसद्‍गुरु । झाले तारूं भवाब्धींचें ॥८३॥
तयाचें म्यां करसंपुट । घरोनि जिंकिलें त्रिकूट । पुढारां वोलांडिले श्रीहाट । गोल्हाट मागे सांडिलें ॥८४॥
तेथें प्रकटली तुर्या निकी । जे उन्मनीची प्राणसखी । उपरी औटपीठाची चौकी । सती कौतुकीं ठाकली ॥८५॥
तदा हारपले ध्येय ध्याता । राहिली गुरुशिष्यपणाची वार्ता । उन्मनीशेजे सर्वातीतता । स्वानुभव सरिता पहुडली ॥८६॥
नेह नानास्ति किंचन । तें आनंदाचें भुवन । दुजेवीण एकपण । हाही शब्द गौण साहीना ॥८७॥
तया आनंदाचा गळाळा । आनंदरुपें वेल्हाळा । भोगितसे सुखसोहळा । माहिमा आगळा न वदवे ॥८८॥
राहिली वाचेची वाच्यता । न साहे लक्ष्यांशही आतां । मग केवळ चिदैक्यता । पतिव्रता पावली ॥८९॥
राहिली स्त्री पुरुष ही मात । देह गेह कैचे तेथ? । एकी एकरुप होत । वृत्तिरहित सुख भोगी ॥९०॥
तेथील कें सांगूं सोहळा । जो कां गुरुपुत्र आगळा । तोचि जाणे; इतरां सकळा । वेळोवेळां टकमक ॥९१॥
असो, ऐसी निजानुभवाचे सुखें । जे आनंदी आनंद चाखे । तें पाहोनि राम हरिखे । म्हणे भलें निके जाहलें ॥९२॥
धन्य मानी गुरुमाउली । मजवरी जेणें कृपाकेली । आत्मसाम्यता दीधली । महिमा वर्णिली नवजाय ॥९३॥
परिसें लोहाचें सुवर्ण । होय; परी तेणें आन । स्पर्शितां लोह जाण । स्वसमान न करवे ॥९४॥
तैसें नव्हें गुरुचें देणें । जें आपणा ऐसेंच करणें । दीपें दीप लाविता जेणें । न्याये तेनें होतसे ॥९५॥
ऐसा स्तविला श्रीगुरु । जो सायुज्याचें भांडारु । शिष्य ह्रदयाब्जभ्रमरु । कल्पतरु मुमुक्षा ॥९६॥
मग सतीकडे पाहे । तंव ती समाधिसुखीं आहे । वृत्तिविरहित सुखा लाहे । तेणें होय समाधान ॥९७॥
ऐसे दोन याम पूर्ण । समाधि सुखें निमग्न । मग पाठी थापटोन । रामें जाण परतविली ॥९८॥
जेवी बहु दिसां जननी । अर्भका होतां मिळणी । त्यातें काढितां वोसंगाहुनी । बाळ धांवूनि पुनः झोंबे ॥९९॥
कीं गाईचे पाडस । तियेचीच रिघतां कास । मागे हटवितां सायास । पडे जनास ज्यापरी ॥१००॥
तैसेंच येथें माझिया रामा । जाहले हो प्रियोत्तमा । ते आणितां पुनरागमा । बहु श्रमा पावले ॥१०१॥
देह प्रारब्धाची दोरी । धरोनियां फिरतां माघारीं । सती होय परम घाबरी । दिसे बावरी स्थिति ते ॥१०२॥
घाबरी पाहे चहुंकडे । तों श्रीगुरुंचें रुपडें । सन्मुख देखे दृष्टीपुढें । वोतीव चोखडें ब्रह्मीचें ॥१०३॥
पाहूनि घनःश्याम मूर्ति । किंचित्‍ अंगी आली स्फूर्ति । अष्टभाव अंगी दाटती । प्रेम चित्ती न समाये ॥१०४॥
अंगीं रोमांच थरारिले । रोममुळीं स्वेदकण ठेले । गात्र कंपायमान जाहले । सुंदरा कांपे गदगदा ॥१०५॥
जैसा मदिरा मदान्ध । नेणेचि कांही इतर छंद । सहजी सहज निघे शब्द । बरळे निर्द्वन्द्व ज्यापरी ॥१०६॥
तैसा धरोनि आवांका । नमितां सद्‍गुरु पादुका । क्षाळीतसे, नेत्रोदका । न धरत निका पूर वाहे ॥१०७॥
समचरना पडली मिठी । जीव शिवाचिये भेटीं । जें सुख लाहे तें गोरटी । ह्र्दयसंपुटीं अनुभवी ॥१०८॥
तियेतें उठविलें अमृतकरें । आलिंगिली प्रेमभरें । म्हणती शुभांगे सुंदरे । चित्त बावरें कां जाहलें ? ॥१०९॥
तैं तें जोडूनियां करकंज । म्हणे जी जी महाराज । मम सौभाग्यसाम्राज्य । केलें मज आजि धन्य ॥११०॥
आजिवरी हा महिमा । न जाणे मी प्रियोत्तमा । ऐसिया अपराधाची क्षमा । करोनि; आम्हां रक्षावे ॥१११॥
जी मी तुमची कान्ता । म्हणतां, लाज वाटे चित्ता । पतितोध्दारा दीननाथा । दासी तत्त्वतां चरणांची ॥११२॥
तूं माझा प्राणनाथ । कीं कुळींचें कुळदैवत । जें जे देऊं पाहे दृष्टांत । तें तें निश्चित गौणचि ॥११३॥
तुझिया पूर्ण पूर्णत्वासी । दृष्टान्त देणें एकदेशी । देतां माझिया चित्तासी । अतिशयेसी लाज वाटे ॥११४॥
तुजसम तूंचि एक । जेथें द्वैताचा संपर्क । न साहे; यास्तव एक । हेही वाक्‍ व्यर्थचि ॥११५॥
जीव शिवाचिये भेटी । पाडली जन्ममरणा तुटी । अनंत जन्मांची आटाआटी । कृपादृष्टीं दवडिली ॥११६॥
बुडत होतें भवसागरीं । कांसे लाऊनि पैलतीरीं । पावविली; अज्ञान - रात्रि । नासितां मित्रीं वेळ कैंचा ! ॥११७॥
अहो नसतें मानूनि बंधन । शुकनलिका न्यायें जाण । गुंतले होते; परि तूर्ण । भ्रांती पूर्ण निरसिली ॥११८॥
ऐसें करोनियां स्तवन । मग षोडशोपचारें पूजन । करोनि; जाहल्या समाधान । ’ अनंत कल्याण ’ राम म्हणे ॥११९॥
प्रिये अभ्यासीं न पडावा विसर । हेचि आमुची सेवा साचार । आणि प्रणवाचा स्वर । इतर कर्णी न पडावा ॥१२०॥
गृहीं पुत्राहूनि पाही । आन पारखें दुजें नाहीं । तरी उपदेशूं तयातेंही । मग आड कांहीं नसेचि ॥१२१॥
ऐसें बोलोनि, पुत्रासी । पाचारिलें अतिप्रेमेंसी । येवोनियां आमुचें कुशीं । धन्य होसी तैं भलें ॥१२२॥
म्हणवोनियां महावाक्य । सांगूनि, राम करविती ऐक्य । प्रणवधारणा सम्यक । दावोनि देख सुखविलें ॥१२३॥
तो सज्जन कुलावंतस । राम-मानस -राजहंस । जेवीं विहंगम झोंबे फळास । समाधि समरसें तात्काळ ॥१२४॥
आधींच बाळ ब्रह्मचारी । माजीं रामाचा उपदेश वरी । तया ’ बलवंत ’ नामा निर्धारी । अन्वर्थ करी नामातें ॥१२५॥
देखोनि, रामा, आनंद भारी । पुत्रा आणोनि देहावरी । उभयतांसी आज्ञा करी । सुखें संसारी वर्तावे ॥१२६॥
प्राप्त लाभासी मानी संतोष । न मानावा अप्राप्ताचा हव्यास । आपुला करावा अभ्यास । सावकाश निजसुखें ॥१२७॥
ऐसें सांगूनि उभयतांसी । मग आठविले श्रीगुरुसी । म्हणे धन्य धन्य तेजोराशि । उपमा तुजसी कें देऊं ? ॥१२८॥
अहा जीवाचिये कांचणी । ताता मातें उपदेशोनी । धन्य धन्य केलें अवनीं । असंख्य प्राणी सुखविले ॥१२९॥
परी कलिकाळ दुर्धर । जाहलासे प्रबळ थोर । जनां न मिळतां साक्षात्कार । कदा साचार न मानिती ॥१३०॥
ऐसिया परी थोर चिंता । मानिली होती सद्‍गुरुनाथा तव प्रभावा नेणोनि तत्त्वतां । ते क्षमा समर्थ करावी ॥१३१॥
आतां मी न भिये कवणा । शिरीं धरोनि तव शासना । उपदेशीन अनन्य जनां । नामगर्जना श्रुतिसिध्द ॥१३२॥
ऐसा करोनि सुविचार । श्रीगुरु स्तवी वारंवार । करावया जगदुद्धार । राम साचार निघेल ॥१३३॥
ती कथा अति गहन । तुंही थोर श्रोते सज्जन । जरी देतील अवधान । तरी वर्णन करीन मी ॥१३४॥
मुकियातें वाचाळ करी । पंगु वेंघेल शिखरीं । जयाची कृपा तो श्रीहरी । तिष्ठे वक्त्रीं तुमच्या ॥१३५॥
म्हणवोनियां दीनवाणी । श्रीपति जोडोनियां पाणि । असकृत करी विनवणी । कृपा दीनी असों द्यावी ॥१३६॥
दीनदयाळा श्रीरामा । भक्त कामकल्पद्रुमा । तव नामीं अखंड प्रेमा । असो, या कामा पुरविजे ॥१३७॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१३८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय तेहतिसावा संपूर्ण ॥

टीप- (१) भूपतीचे उदरीं जनन.....धन्यपण कें वानू ? -ओवी १५ :-
या संपूर्ण ओवीचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी वरील ७ ते १४ ओव्या पहाव्यात. परंपरेंतील अकरा सिध्द पुरुषांच्या
लोकोध्दरणाच्या अगाध सामर्थ्याचें, त्यांच्या अपार करुणाशीलतेचें वर्णन केल्यावर प्रस्तुत ओवींत श्रीपति एक दृष्टांत
देतात. ’ तपाअंतीं राज्यपद ’ ( व राज्याअंतीं नरक ) अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणीतील फक्त पूर्वार्धाचाच येथें
विचार कर्तव्य आहे. या ओवीचा भावार्थ असा आहे कीं फार मोठी पूर्वपुण्याई पाठीशीं असेल तरच भूपतीचे उदरी जनन
म्हणजे राजाचे पोटीं जीवास जन्म मिळतों. हे भाग्य थोर तर खरेंच पण तो जीवात्मा तेवढया पुण्यबलानें स्वरुपाचा आनंद
भोगूं शकत नाहीं अगर जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटूंही शकत नाहीं. पण हा एका अंशाने परमात्मास्वरुप असलेला जीवात्मा
[ ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। श्रीगीता ] मात्र सिध्दपुरुषांची अनुग्रहरुपी पुण्याई पाठीशीं उभी राहिली तर
जगद्‍व्यापी परमत्माच होतो- अर्थात ही खरी धन्यता, व ती मी शब्दानें काय वर्णन करुं ? असें कवि म्हणतात.

कठिण शब्दांचे अर्थ - भवाब्धि = संसाररुपी विस्तीर्ण सागर (५) गोष्पद = गाईचें पाऊल (५) तूर्ण = लवकर सत्वर
(६) गळाळा = घोंट (८८) अ-सकृत = अनेकदां ( सकृत्‍ म्ह. एकदां ) [ १३६ ]

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP