मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय सतरावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय सतरावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्लोकः
वंदूनिया राम पदारविंदा -सोडोनियां मायिक सर्व धंदा ।
प्रार्थीतसे हेचि दया करावी - श्रोते जनां सिध्दचरित्र दावी ॥१॥

श्रीगुरुचरणीं ठेवोनि भाळ । पुढें कथा वदेन रसाळ । जे ऐकतां कलिकल्मष मळ । दहन तात्काळ होतील ॥१॥
षोडश प्रकराणाचे शेवटीं । अखंड योगीं लावोनि दृष्टी । मच्छेन्द्रनाथ बैसले कपाटीं । इतुकी गोष्टी जाहलि ॥२॥
गोरक्ष त्याचि पर्वतावरी । बहु काळ वास करी । तों वर्तली नवल परी । ती श्रोते चतुरीं परिसिजे ॥३॥
बत्तीस शिराळें ग्रामांत । पूर्वी आले मच्छेन्द्रनाथ । गोरक्ष जन्मले गारीआंत । ते षष्ठाध्यायीं कथियेलें ॥४॥
जया गारींत गोरख जन्म । तेथें महीरुह एक उत्तम । तया पादपाचें नाम । गोरक्ष चिंत म्हणताती ॥५॥
ग्रामस्थ जन भक्तिभावें । तया वृक्षा पूजिती बरवें । संकट समयीं नवसा पावे । ऐसा प्रभावें मान्य झाला ॥६॥
त्या ग्रामींची एक म्हातारी । गलितकुष्ठ सर्वांगभरी । तिने निष्ठा धरोनि निर्धारी । सेवा करी वृक्षाची ॥७॥
ऐसी वर्षे लोटलीं तीन । सेवा करी रात्रंदिन । म्हणी कृपाळुवा तुजवांचून । दुजे स्वजन मज नसे ॥८॥
गोरख नामें हांका देत । हे गोरखा समजली मात । मच्छेन्द्रनाथ प्रसाद अद्‍भुत स्मर्तृगामित्व घडे त्या ॥९॥
त्या वर-प्रभावें तत्त्वतां । गोरख मच्छेन्द्रगडीं असतां । शिराळीं ग्रामी बाईची वार्ता । वेळ न लागतां श्रुत झाली ॥१०॥
गोरख चित्तीं कळवळला । वृक्षासान्निध प्रकटला । त्या बाईस पुसों लागला । आजाणपण घेवोनि ॥११॥
म्हणे हे तुळशी ना अश्वत्थ । बिल्ववृक्षही नोहे विख्यात । या चिंच वृक्षासी घालीत । कासया तूं प्रदक्षिणा ? ॥१२॥
तिनें बाळ बटुवेष पाहिला । परम देदीप्यमान दिसला । ती म्हणे बाळका या वृक्षाला । गोरखचिंच म्हणताती ॥१३॥
काय सांगूं वृक्षाचें महिमान । या स्थलींच गोरखाचें जनन । झाले; तेथेंचि वृक्ष निर्माण । बीजावांचोनि जाहला ॥१४॥
तुलसी अश्वत्थ पारिजातक । याच्या लव-महिमेंसी न पुरती देख । चिंतिलें कार्यार्थ -दायक । हाचि एक भूमंडळीं ॥१५॥
पाहोनि तिची सद्‍भावना । कृपा उपजली नाथमना । म्हणती पैल तीर्थी करोनि स्नाना । वेगीं नमना येईजे ॥१६॥
गोरख चिंचेच्या उत्तर प्रदेशी । सन्निध निर्झर वाहे विशेषीं । तेथे स्नान करुनियां अतिहर्षी । पूर्वस्थळासी ती आली ॥१७॥
या वृक्षाचे मुळीं ब्रह्मा । मध्यें विष्णु अग्नीं शिव परमात्मा । इतर देव तयाचिया नामा । व्यापोनि सर्वांगी असती ॥१८॥
नाथ म्हणती तूं झडकरी । वृक्षासी पूजी मीलित उपचारीं । वृक्ष माहात्म्याची थोरी । किंचित्‍ परी सांगेन ॥१९॥
लक्ष्मी करी सदा वास । जे सेवन करिती या वृक्षास । उणे संतति संपत्तीस । कधींही त्यास पडेना ॥२०॥
ऐसें सांगोनि करविती पूजना । म्हणती घाली प्रदक्षिणा । प्रदक्षिणेच्या समयीं जाणा । बाई पाहे स्वदेहा ॥२१॥
तो अपूर्व वर्तलें । बाईचे शरीर दिव्य झालें । नाथ चरणी गडबडा लोळे । म्हणे जी केलें धन्य त्वां ॥२२॥
नाथ म्हणती वृक्ष महिमा ! । तूं कां व्यर्थ स्तविसी आम्हां ? । स्वस्थ चित्तें जाई स्वधामा । चित्ती प्रेमा असों दे ॥२३॥
बाई आनंदे निर्भर । म्हणे हा साक्षात‍ कर्पूरगौर । म्हणोनि स्वगृहीं आली सत्वर । वार्ता सर्वा सांगितली ॥२४॥
जन धांवोनि आले समस्त । गोरख तेथेंचि झाले गुप्त । सिध्दासी नको लौकिकार्थ । अति अनर्थ वाटे तया ॥२५॥
जन म्हणती आम्ही अभागी । नाथ -दर्शन आम्हालागी । नाही जाहलें या प्रसंगी । धन्य जगी हे माता ॥२६॥
चैत्र वद्य एकादशी । पर्वणी होती ते दिवशीं । महोत्साह अतिहर्षी । ग्रामवासी जन करिती ॥२७॥
तैंपासोनि आजवरी । उत्साह होतो त्रिरात्रीं । जन पाहती सर्व नेत्रीं । शिराळे क्षेत्री जावोनियां ॥२८॥
कोठें प्रकट कोठें गुप्त । ऐसे नाथ महीं विचरत । तों पंढरीसन्निध अकस्मार । जाहला वृत्तान्त परिसिजे ॥२९॥
(१)पंढरीपासोन किंचित्‍ दुरी । पूर्व भागीं भीमातीरीं । ब्राह्मण बाळ ब्रह्मचारी । दिव्य शरीरी देखिला ॥३०॥
नाथें तयासी अवलोकिलें । पाहतां समाधान जाहलें । सन्निध्द येवोनि पुसों लागले । नाम वहिलें सांगे का ॥३१॥
ब्रह्मचारी म्हणे नाथासी । व्यक्ति-रुप आणि नामासी । मी न जाणे अति सायासी । म्हणोनि वनवासी जाहलों ॥३२॥
मनुष्यजन्म सर्वांत वरिष्ठ । ऐसे बोलती वेद श्रेष्ठ । तो जन्म पावोन , करणे स्पष्ट । काय तें मज कळेना ॥३३॥
कोणी बोलती जपतपध्यान । कोणी म्हणती देवतार्चन । कोणी म्हणती तीर्थाटण । संध्यास्नानादि अनेक ॥३४॥
ऐसी बहु मतें शोधिलीं । वयसा सारी व्यर्थ गेली । न कळे शाश्वताची किल्ली । व्यर्थ भुली भुललोंसे ॥३५॥
खरें तत्त्व समजल्यावरी । तळमळ न राहेचि अंतरी । सत्य पाहतां हेंचि, खरी । गोष्टी परी; अनुभवा न ये ॥३६॥
तुझे चरण पडतां दृष्टी । आनंद न समाये पोटीं । सत्य तत्त्वाची सांगोनि गोष्टी । यशें सृष्टी भरी सर्व ॥३७॥
बाळपणापासोन पही । दुसरा छंद लागला नाही । देह गेह संसार कांही । स्वप्नींही कहीं न ये मज ॥३८॥
मनुष्य जन्मास येऊन । व्हावे प्राप्त गहन ज्ञान । हेचि चिंता रात्रंदिन । दुजें मना न येचि ॥३९॥
न्याय मीमांसा वेदान्त । शोधून पाहिलें ग्रंथ बहुत । परी चित्त होय शांत । ऐसें वर्म न देखों ॥४०॥
म्हणोनि चरणीं घातली मिठी । अष्टभाव दाटलें पोटीं । नाथ म्हणती उठी उठी । वत्सा संकटी न पडे तूं ॥४१॥
भूत भविष्य वर्तमान । अबाधित जयाचें ज्ञान । तो नाथ पाहे विचारोन । अधिकार पूर्ण म्हणे याचा ॥४२॥
हा विष्णु अंश शुध्दसात्त्विक । महिमा वाढवील अलोकिक । चित्तीं आणोनि सम्यक । स्थिरावले नावेक ते वेळीं ॥४३॥
मग करोनियां हास्य वदन । म्हणती तुज पाहिजे गहन ज्ञान । तरी गहिनीनाथ नामाभिधान । आजपासोन तुज असो ॥४४॥
ऐसें बोलोनियां वचन । करवोनियां शुध्द स्नान । मग संप्रदायक्रमें करुन । सन्मुख आसन घालविलें ॥४५॥
शुध्दाचमन झालियावरी । म्हणती पीठिका उच्चार करी । दृष्टि ठेवोनि नासिकाग्रीं । शंकर धरी ह्र्दयकमळीं ॥४६॥
शबलांश हटवोनि मागें । शुध्द प्राणायाम करी वेगें । म्हणोनि धारणाविधि सांगे । दावी निजांगें आचरोनी ॥४७॥
धारणा धरोनि प्रानायाम । शुध्दा मार्गे करितां सुगम । तात्काळ पावला उपरम । विषयागम निमाला ॥४८॥
तीन मुहुर्तपर्यंत । गहिनीसी अभ्यास करवीत । गहिनी जाहले समाधिस्थ । अखंड स्वार्थ पावले ॥४९॥
विराले गुरुशिष्याचें भान । विराले प्रश्नानुसंधान । निजस्वरुपीं होवोनि मग्न । गहिनी गहन सुखी झाले ॥५०॥
योगसुखाचे सोहळे । गहिनीनाथ प्रेमें डोलें । त्या योगें नाथासी जाहले । तें सुख वहिलें काय सांगों ॥५१॥
शिष्य होतां ज्ञानसंपन्न । की पुत्र होतां महाविद्वान । जें सुख गुरुस की पित्य़ास होय जाण । ते अनुभवी जन जाणती ॥५२॥
पुत्र मुख पाहोनि माता । जाहली विसरे संकटव्यथा । श्रम सफल मानी तत्त्वतां । सदगुरुनाथा तैसें होय ॥५३॥
असो; गहिनीस करोनि सावध । म्हणति चित्त-शांति सुबध्द । जाहली कीं ? पूर्णानंद । तूंचि स्पंद मायेचा ॥५४॥
जाणें असतां पूर्वदेशीं । निघालिया पश्चिममुखेंची । कैसी पावतील निजस्थानासी । भ्रांती जनांसी वेष्टिलें ॥५५॥
वत्सा तुज दिधला उपदेश । तो ग्रंथी लिहिता ये कोणास ? । सूर्य प्रतिमा सावकाश । लिहितां; प्रकाश न लिहवे ॥५६॥
तैसा हा वाड:मय उच्चार । नव्हें; हें तुज कळे साचार । (२)उच्चारावीन अक्षर । कैसें ग्रंथीं लिहवेल ? ॥५७॥
म्हणोनि ’ गुरुगम्य ’ सर्व म्हणति । ज्ञानाभिमानी जे न जाणती । पाहोनियां ग्रंथ व्युत्पत्ति । बळें स्थापिती कुमार्ग ॥५८॥
ऐकोनि सद्‍गुरुचे बोल । गहिनीस आले प्रेमाचे डोल । धन्य धन्य तूं माउली दयाळ । म्हणोनि लोळे चरणावरी ॥५९॥
बहुत दिवस मायातमीं । जाजावलों होतो स्वामी । तुझ्या उपदेश- सूर्यागमीं । मार्ग सुगमीं सुखी झालों ॥६०॥
नाकीचे मौक्तिक सुढाळ । गळां घालोनियां वेल्हाळ । शोधीतसे रानोमाळ । मौत्तिक हरवले म्हणोनि ॥६१॥
तैसेंचि मज जाहले येथें । देहीच असतां आत्मयातें । न पाहतां; कुमार्गपंथें । अंधापरी धांवलो ॥६२॥
म्हणोनि पुनरपि चरणा लागला । सद्‍गुरुराणा संतोषला । म्हणे तूं सुजाण शिष्य भला । निजखुणेला जाणसी तूं ॥६३॥
तूं पहिलाचि योगभ्रष्ट । गुरुभक्त, ज्ञानी अतिवरिष्ठ । जना मार्ग दावी सुभट । हेचि सेवा आमुची ॥६४॥
आम्ही करितों गमन । म्हणवोनि निघाले तेथून । गहिनी धांवोनि धरी चरण । म्हणे पुनर्दर्शन कै देसीं ? ॥६५॥
नाथ म्हण्ती तुजसी मजसी । आतां कैसा वियोग मानिसी । तथापि जेधवां मातें स्मरसी । तैं मी असेन तुजपाशीं ॥६६॥
ऐसें शिष्यासी आज्ञापुनी । अदृश्य जाहले तेचि क्षणीं । गहिनी निजानंदे करोनी । करी अवनीं संचार ॥६७॥
निजानंदी स्वस्थ असावे । हेंचि आवडे जीवें भावें । परी निजज्ञान वृध्दी पाववावे । ऐसें आज्ञापिलें श्रीगुरुंनी ॥६८॥
तें वचन सिध्द जाहल्यावाचोनी । कैसे बसावे योगासनीं । सुपात्र शिष्य केधवां नयनीं । देखेन; म्हणोनि चिंतिती ॥६९॥
तो श्रीनिवृत्ति अवतार जाहला । मेदिनीवरी सुगुण भला । संस्कारार्थ श्रीगुरुला । अवनीवरी शोधिती ॥७०॥
क्षुधित शोधी अन्नदाता । अन्नदाता पावे क्षुधार्ता । गांठी पडतां उभयतां । आनंद तत्त्वता बहु होय ॥७१॥
तैसें गहिनी पाहे शिष्या । निवृत्ति पाहे सद्‍गुरुदास्या । भक्त आणि दैवत उपास्या । परस्परें आवडी ॥७२॥
ऐसें उभयतां करिती संचार । शोधिती तीर्थे महाक्षेत्र । (३)तों अकस्मात‍ परस्पर । पूर्वदत्तें भेटले ॥७३॥
देखोनि पौर्णिमेच्या चंद्रा । भरते दाटतसे समुद्रा । निवृत्तीची शांत मुद्रा । देखोनि, गहिनींद्रा सुख वाटे ॥७४॥
निवृत्तीनीं पाहिला गहिनी । त्यांसी अत्यानंद वाटला मनी । जावोनियां श्रीचरणीं । मस्तक ठेवोनि प्रार्थिती ॥७५॥
निवृत्ति पूर्ण शंकरावतारु । हे खूण जाणति गहिनी सद्‍गुरु । मस्तकी ठेवोनि अभयकरु । म्हणे मुमुक्षु नर उध्दरी बा ॥७६॥
सांगितले गुरुपरंपरेतें । म्हणती श्रींनीं आज्ञापिलें मातें । उध्दरावे जडजीवांतें । कार्य सिध्दीतें नेई तूं ॥७७॥
ऐसें आज्ञापिलें निवृत्तीसी । आपण निघाले पूर्व दिशीं । बालेघाटीं चिखली ग्रामासी । स्थान आपणांसी योजिलें ॥७८॥
पर्जन्य न पाहे पात्रापात्र । दीप न म्हणे साव चोर । तैसी गहिनी-प्रीति सर्वत्र । वर्ण चारी भजती त्या ॥७९॥
ऐसा कांहीं काळ क्रमूनी । मग बैसती अखंड योगासनीं । चारि वर्ण एकत्र होवोनी । पूजा स्तवनीं तोषविती ॥८०॥
त्या स्थलीं अद्यापि यात्रा भरे । जन चमत्कार पाह्ती नेत्रें । ब्राह्मण रुद्राभिषेक स्तोत्रें । अभिषेकिती गहिनीसी ॥८१॥
यवनही येवोनि तये स्थानीं । पूजिती ’ गैबी पीर ’ म्हणोनी । इच्छा धरोनियां मनीं । नवस नवसोनि सुखी होती ॥८२॥
निवृत्तिनाथें ज्ञानदेवा । उपदेश देवोनियां बरवा । कृतार्थ केलें बहुत जीवा । जो निजगुज ठेवा वैष्णवांचा ॥८३॥
निवृत्तिनाथ समाधिसोहळा । त्र्यंबकेश्वरीं जन देखती डोळां । जयाची हे अद्‍भूत लीला । विश्वा सकळा ठाऊकी ॥८४॥
ज्ञानेश्वर तो ज्ञानमूर्ति । जगत्रयीं ज्याची कीर्ति । स्वमुखें वाखणिती गुरु निवृत्ति । बृहस्पति जो मनुजांत ॥८५॥
वामदेव कीं श्रीशुक । किंवा साक्षात्‍ याज्ञवलक्य । तैसा जीवन्मुक्त अति सम्यक । कलियुगी देख अवतरलें ॥८६॥
साक्षात रुक्मिणिकांत श्रीहरी । श्रीपांडुरंग लीलावतारी । तोही ज्याची भीड धरी । नामदेव करीं वोपीतसे ॥८७॥
श्रीमत्‍ गीता निगम सार । जना तारावया अतिदुर्धर । तो सुगम केला साचार । श्रीज्ञानेश्वरें कनवाळें ॥८८॥
गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । यांचे वर्णावया पूर्ण चरित्र । कोण महीं समर्थ साचार । जे पूर्णावतार हरिहराचे ॥८९॥
संतलीलामृती महीपति । तैसेंच भक्तिविजय ग्रंथी । ज्यांची अगाध वर्णिली कीर्ती । मतिमंद श्रीपति काय तेथें ! ॥९०॥
अमृतानुभव ग्रंथ । मान्य सर्व जगविख्यात । स्वात्मानुभव उद्‍गार तेथ । श्रीज्ञाननाथ बोलिलें ॥९१॥
समाधिस्थ अलंकापुरीं । बैसलें; ते अभंगामाझारी । श्रीतुकारामें वर्णिली थोरी । कीर्ति सुरनरी विख्यात ॥९२॥
सिंहावलोकनीं श्रोता । आठवावी मागील कथा । रामचंद्रें पुसिल्या वृत्तांन्ता । (४)झाला सांगता चूडामणि ॥९३॥
तृतीय प्रकरणाचें अंती । विस्तार जाहला कथेप्रति । जे संप्रदाय प्रौढी सांगती । तेणे ग्रंथ विस्तारला ॥९४॥
तें चूडामणि म्हणती रामा । सद्‍गुरु ज्ञानदेवें आम्हां । कृतार्थ केलें; त्याची महिमा । निगमागमा अतर्क्य ॥९५॥
तुझा देखोनि भक्तिभाव । कळवळला आमुचा जीव । बापा या युगीं तपःप्रभाव । तुवां अभिनव केला असे ॥९६॥
ऐसें ऐकताचि उत्तर । रामचंद्रा नावरे गहिंवर । धावोनि श्रीचरणावर । साष्टांग नमस्कार घातिला ॥९७॥
गडबडा लोळती चरणीं । म्हणती मम भाग्यासम कोणी । न मिळेल, हे शोधितां धरणी । दृष्टीं चूडामणि देखिले ॥९८॥
नामाऐसी ज्याची करणी । प्रत्यक्ष देवशिखामणि । योगीन्द्रांमाजीं चूडामणि । तापसश्रेणीं अग्रगण्य ॥९९॥
माझ्या तपश्चर्येच्या राशी । याच्या कृपेच्या एकलेशीं । न पुरतील; मेरु सर्षपासी । तुक तुळेसी कैसेनि ? ॥१००॥
पुनरपि मिठी घातली पायां । म्हणे तारी तारी श्रीगुरुराया । केवढा मी अभागिया । महिमा तुझा नेणेचि ॥१०१॥
महाराज या चरणाचें किंकर । श्रीगुंडोराज ब्राह्मणपुत्र । वास्तव्यग्राम श्रीपंढरपुर । हा पामर दास त्याचा ॥१०२॥
श्रीविठ्ठ्ल नामामृताची गोडी । सांगोनि संप्रदायाची प्रौढी । निजयशाची उभविली गुढीं । रंका परवडी राज्यपदाची ॥१०३॥
या संप्रदायेंकरुन । (५)मातें जोडलें पौत्रपण । परी मी न जाणे सद्‍गुरुखुण । म्हणोनि समाधान मज नाहीं ॥१०४॥
ऐसे बोलोनि जोडिले कर । अश्रुंनी पूर्ण भरले नेत्र । न सांवरत आला गहिवर । देखोनि, गुरुवर आनंदे ॥१०५॥
म्हणती धन्य धन्य रामचंद्रा । तुझी भक्तियुक्त पाहोनि मुद्रा । वारंवार ह्र्दयसमुद्रा । भरतें माझ्या दाटतसे ॥१०६॥
धन्य गुरुभक्त -शिखाभणि । धन्य धन्य तुझी वाणी । भुललो तव भक्ति देखोनी । म्हणोनि जनी प्रकटलों ॥१०७॥
गुंडा मम प्रीतिपात्र । त्याचा तुजवरी अभयकर । दुःख देशोधडी साचार । तैंच तुझें जाहलें ॥१०८॥
आतां न करी कांहीं चिंता । तूं होशील पूर्ण ज्ञाता । आपण तरोनि जनासी तारिता । कीर्तिकर्ता होशील तूं ॥१०९॥
श्रीचूडामणि रामचंद्रातें । पढवितील राजयोगातें । पुढिलिया प्रकरणीं त्या कथेतें । भाविक श्रोतें परिसोत ॥११०॥
संपले ग्रंथाचें पूर्वार्ध । जे क्षीराब्धीहूनि अगाध । जेथे वर्णिले विशद । दाते मोक्षद षड्‍ योगी ॥१११॥
श्रीआदिनाथ आणि मच्छेन्द । गोरक्ष गहिनी चित्समुद्र । श्रीनिवृत्ति ज्ञानेश्वर । महिमा अपार जयांचा ॥११२॥
प्रथमपासोन सतरापर्यंत । जाहला सिध्द -चरित्र ग्रंथ । वदवी श्रीगुरु समर्थ । होवोनि ह्रदिस्थ दयाळु ॥११३॥
द्वादश षोडश कला जिंकोनी । सत्रावी अमृतसंजीवनीं । साध्य करिती योगी जनीं । सतरावे प्रकरणीं कथा तैसी ॥११४॥
त्रिकुटस्थ श्रीरामध्वनि ही ग्रंथरचना त्याची करणी । श्रीपति मतिमंदालागोनी । सरता सज्जनीं केला असे ॥११५॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥११६॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥

॥ अध्याय सतरावा संपूर्ण ॥

(१) पंढरीपासोनि किंचित्‍ दुरी .....,ब्रह्मचारी देखिला -ओव्या ३० ते ४४ :-
श्रीगहिनीनाथांची गोरक्षांशी झालेली पहिली भेट येथें ३० ते ४४ ओव्यांत सांगितली आहे. ’ नवनाथ कथासारां ’ त गोरखनाथ
संजीवनी मंत्राचा पाठ करीत, मुलांसाथी मातीचा पुतळा तयार करीत असतां त्यांत ’ कर भजना ’ ने प्रवेश करुन
गहिनीरुपानें अवतार घेतला अशी कथा आहे. प्रस्तुत पोथींतील हकीकत वेगळी आहे.

(२) उच्चाराविण अक्षर .....कैसे ग्रंथीं लिहवेल- ओवी ५७ :- नाथपंथांतील गुरुपदेशाच्या पध्दतीचा हा आणखी एक
महत्त्वाचा उल्लेख आहे. विशेषतः श्रीसांप्रदायिकांनीं ५६, ५७, ५८ या तिन्ही ओव्यांचा अर्थ ध्यानांत घेतल्यास ही
उच्चाराविण अक्षराची जी गुरुगम्य खूण सध्यांदेखील श्री स्वामी स्वरुपानंद यांच्याकडून मिळते तिची थोरवी लक्षांत
येईल. अध्याय ८ मधील टीप ३ री पाहावी.

(३) अकस्मात परस्पर ...पूर्वदत्तें भेटलें- ओवी ७३:-
येथें श्रीगहिनीनाथ व निवृत्तिनाथ या मुक्त -मुमुक्षूंची तीर्थाट्णांत अवचित भेट झाल्याचे वर्णन आहे. हा तपशीलही वेगळा
 दिसतो. ब्रह्मगिरीस आईवडील व ज्ञानदेवादि भावंडासह प्रदक्षिणा घालीत असतां वाघाच्या भीतीनें सर्वांची पांगापांग झाली
व श्रीनिवृत्तिमहाराज एका गुहेंत शिरले व तेथेंच त्यांना गहिनीनाथांची भेट व कृपानुग्रह झाला असे वर्णन श्रीनामदेवकृत
श्रीज्ञानदेवांच्या अभंगचरित्राम्त आढळते व बहुतेक गद्य पद्य ग्रंथांतून अशा स्वरुपाचेंच वर्णन दिसतें.

(४) रामचंद्र पुसिला वृत्तांन्ता । झाला सांगता चूडामणि -ओवी ९३:-
दुसर्‍या अध्यायांत ’ अकस्मात राम दृष्टीसमोर । दिव्य पुरुष उभा ठाके ’ ॥ अशी ५१ वी ओवी आहे. तो पुरुष म्हणजेच
हे चूडामणि महाराज होत. त्यांनी या १७ व्या अध्यायांतील ९३ ओवीपर्यंत गुरुपरंपरेची नाथचरित्रें रामचंद्र नागपूरकर
महाराजाम्स गिरिनार पर्वतावर सांगितली. ( पहा अ/टीप ५)

(५) या संप्रदायेंकरुन । मातें जोडलें पौत्रपण -ओवी १०४ :- १०२ व १०३ ओव्यांत श्रीरामचंद्र नागपूरकर श्रीचूडामणींनां
सांगतात कीं मी गुंडामहाराजांचा नामधारक शिष्य आहे व गुंडा महाराज हे चूडामणीचें कृपांकित असल्यामुळें पिता-पुत्र-पौत्र
या मांसवंशाप्रमाणें विद्यावंशांत श्रीनागपूरकर हे चूडामणीचे पौत्र म्ह. शिष्याचे शिष्य - ठरतात. या ओवीतील परी मी न
जाणे सद्‍गुरु खूण । म्हणोनि समाधान मज नाही । या उद्‍गाराचा विचारही आवश्यक आहे. अध्याय १ मधील टीप ८ वी
पाहावी. श्रीगुंडामहाराजांनीं श्रीविठ्ठ्ल नामाची दीक्षा रामचंद्रांना दिली होती परंतु ते आत्मज्ञानाचें अधिकारी असल्यामुळें
ज्यायोगें निरंतर समाधान प्राप्त होते अशा तत्त्वबोधासाठीं ते तळमळत होते. किंबहुना असे म्हणता येईल की
श्रीगुंडामहाराजांनी दिलेली उपासना एकाग्र चित्तानें केल्यामुळेच भगवंताच्या कृपेनें श्री रामचंद्रांना आत्मज्ञानाची चाड
उत्पन्न झाली. येथें एक गोष्ट सध्यांही लक्षांत घेण्यासारखी आहे की स्वतःश्रीगुंडामहाराज हे सोऽहं राजयोगाचे अंतरंग
अधिकारी होते तरीदेखील ते शिष्यमंडळींना श्रीविठठल्नामाचाच उपदेश करीत असत. महाराजांच्या देगलूर -पंढरपूर येथील
वंशजांकडेही परंपरेनें श्रीविठ्ठल उपासना , चक्रो भजन, पंढरीची वारी , श्रीज्ञानेश्वरी पठण -प्रवचन अशा स्वरुपाचाच गुरुबोध
आला आहे व तीच परंपरा सध्याच्या मंत्रदीक्षेचे त्यांचे अधिकारी वंशजही चालवीत आहेत.

कठिण शब्दांचे अर्थः महींरुह = वृक्ष, पादव (६) स्मर्तृ-गामित्व =स्मरण केल्याक्षणीं त्या स्थळीम उपस्थित होण्याचें
सामर्थ्य (१०) मीलित उपचारीं = ( सहजीं ) मिळालेल्या साहित्यानें (२०) जाजावणें,=  चाचपडणें, कष्टी होणे, बावचळणें
(६१) सर्षप = मोहरी (१०१)

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP