मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय तेविसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेविसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
नमितां सद्‍गुरु देवाधिदेव । भव भय भावना जाहली वाव । एकीं एकपणें स्वयमेव । एकाक्षर संचले ॥१॥
तया एकाक्षराची सोये । निःशब्दें दाविली रामराये । कां जे अनन्या अणुमात्र नोहे । संसारभ्रांति ॥२॥
असो, गतकथानुसंधान । महादेवासी छळितां कुजन । अचिन्त्यचिंतनीं अचल मन । सावधान जयाचें ॥३॥
तेथें नदीमाजी एक बेट । होगें रमणीय चोखट । जें देखतांचि ये वीट । संसाराचा ॥४॥
सभोवार नद्योदक । निर्मळ वाहे जैसे स्फटिक । शोभा पाहतां तहानभूक । निवोनि जाई ॥५॥
आधींच पवित्र स्थान । जें शुध्द्तेचें अवतरण । वरी जाहलें लिंगस्थापन । श्रीरामहस्तें ॥६॥
पाहतां ऐसें वाटे कीर । जें प्रसिध्द रामेश्वर । तयाचेंचि बाळ सुंदर । देवस्थान हें ॥७॥
येर्‍हवी तरी दाशरथी । जें स्थापिलें लिंग आधीं । तयासीच लोक म्हणती । रामेश्वर ॥८॥
मग काय बोलों ते शोभा । जे शुचित्वाचा गाभा । आणि लिंगरुपें उभा । आदिनाथ ॥९॥
येथे रामभक्त मारुति । होऊनि ठेला भीममूर्ति । ते ऐकावी श्रोतीं । कथा ऐसी ॥१०॥
पूर्वी एकदां दंडकवनीं । रामलक्ष्मण दोघेजणी । हिंडत आले इये स्थानीं । अकस्मात ॥११॥
कृष्णा नदीचे वारी । वेगें हापटोनि खडकावरी । जाणों राम-स्तवन करी । खळखळ शब्दें ॥१२॥
तो नदीचा खळखळाट । आयको नेदी चोखट । जिया गोठी करिती सुभट । परस्परांशी ॥१३॥
तंव तया रघुनंदनें । चंद्रहास्यवदनें । मागे फिरविली नयनें । नदीकडे ॥१४॥
इया स्वामी संकेते । मनोगात हनुमंतें । जाणोनि, नदी हस्तें । निवारिलें ॥१५॥
अद्यापि हे प्रतीति । पाहोनि घ्यावी श्रोती । भीमरुपी मारुति । उभा ठेला ॥१६॥
हें सिध्दायतन पहावें । ऐसी चाड घेतली जीवें । म्हणोनि केलें महादेवें । गमन तेथें ॥१७॥
सद्‍गुरु जातां तिये स्थानीं । तेचि दिवशीं अस्तमानीं । चढों लागले पाणी । कृष्णाबाईचें ॥१८॥
तें तंव एकान्त स्थान । तेथे कैची येती जन । घरें होती तींही दोन । गोळकांची ॥१९॥
देखोनियां कठिण । समयीं आला ब्राह्मण । गोकळ म्हणति कवण । आलासी तूं ॥२०॥
येथ गांव ना ठाव । ना द्विजातीचें नांव । आणि नदी तरी धांव । करीतसे ॥२१॥
नाहीं अन्नाची सामुग्री । अथवा सांगड ना तरी । मिळेचिना; पैलतीरीं । जावयासी ॥२२॥
यालागीं उठाउठी । जंव पाणी न चढे कटीं । तंव येथूनि पैलतटी । पाय काढी ॥२३॥
तुमचा जैसा निर्वाहो । तैसाचि माझाही हो । ऐसा पोटी आग्रहो । झणीं घेसी ॥२४॥
तरी आइके गा भटा । आमुचा आहे सांठा । परी तो तंव पुरवठा । चौ मासांचा ॥२५॥
द्यावे तुजला अन्न । तरी होईल आम्हां लंघन । मग एकादांचि मरण । तुला आम्हां ॥२६॥
व्यर्थ मुकसी प्राणा । आम्हां येतें तुझी करुणा । यालागीं ब्राह्मणा । धांव घेई ॥२७॥
बोलतां बोलतां पाणी । चढत आहे क्षणोक्षणीं । तरी प्राणाची कडसणी । न करावी गा ॥२८॥
हें गोळकांचे बोलणें । ऐकोनि घेतलें ब्राह्मणें । मग तो ऐसे म्हणे । तयाप्रति ॥२९॥
हां गा श्रीचें दर्शन । घ्यावया ठाकिलें हें स्थान । तें लाभल्या; मिळो अन्न । किंवा न मिळों ॥३०॥
काया जेव्हां निपजली । तैचि अन्नसामग्री योजिली । मग तेविषयीची फोली । चिंता कायसी ! ॥३१॥
नव्हे हो हे माझीच उक्ति । ऐसी बोलते श्रुति स्मृति । ’ आयुरन्नं प्रयच्छति ’ इत्यादि वचनें ॥३२॥
मग तयाची चिंता । कायसी आम्हां तत्त्वतां । जे न चुके भवितव्यता । धात्यासही ॥३३॥
यालागी हा देहो । जावो अथवा राहो । आम्ही तया निर्वाहो । कधी न चिंतूं ॥३४॥
ऐकोनि ऐसिया वचना । गोळक म्हणती ब्राह्मणा । तुवां आवंतिलें मरणा । निश्चयेंसी ॥३५॥
मग कैची रुचे हे उक्ति । जया समीप आली मृती । तया रोगिया काय प्रीति । औषधावरी ? ॥३६॥
शिकवण केली येथवरी । आतां आवडे तैसें करी । ऐसेसं बोलोनि गेले घरीं । आपापल्या ॥३७॥
मागुती तो करुणानिधि । तैसाचि प्रातःकालावधी । राउळामाजीं समाधि । लावोनि बैसे ॥३८॥
समाधींतूनि, पहांत । होतांचि, उठिला ब्रह्मनिष्ठ । तंव भरोनि वाहे अफाट । कृष्णानदी ॥३९॥
काय वानूं ते प्रभातशोभा । पूर्वदिशी अरूणप्रभा । वृक्षीं मिळाल्या गान सभा । शुकपिकांच्या ॥४०॥
विकासितां कमल मुकुलें । आंतूनि उठिली भ्रमरकुळें । साद करिती मंजुळें । गुंजारवें ॥४१॥
घ्राण पुष्पपरिमळें । कर्ण शब्दें मंजुळें । स्पर्श मंदवातें डोले । वनश्रीनें ॥४२॥
ऐशी चारी इंद्रिये । पुष्टा होतां स्वस्वविषयें । रसने पाहिली सोये । नामस्मरणी ॥४३॥
ऐशिया ब्राह्ममुहुर्ती । महादेवें वेदमुहुर्ती । अनुष्ठिली कृष्णासरिती । स्नानसंध्या ॥४४॥
मग पुनरपि राउळा । जावोनि, आमुचा सांब भोळा । लावोनियां बैसला । समाधीतें ॥४५॥
तंव मध्यरात्रीं एक । तेथें घडलें कौतुक । श्रोते आइका अलौकिक । साधुमहिमा ॥४६॥
नानाविध मधुर फळें । ताटें भरूनि विपुलें । ठेविलीं भक्तवत्सलें । सद्‍गुरुपुढें ॥४७॥
भक्ता झाले रात्रंदिन । देखोनिया लंघन । व्याकुळ झाले प्राण । ईश्वराचे ॥४८॥
एरव्ही तरी बाळ । भुकें होता व्याकुळ । ते जननी प्रेमळ । केवी साहे ? ॥४९॥
असो, यापरी सादर । श्रींनी देऊनि उपहार । केला षण्मास पाहुणेर । सोइरियाचा ॥५०॥
हे देखोनि कवतुक । आश्चर्ये म्हणती गोळक । नेणों आम्ही मूर्ख । साधुमहिमा ॥५१॥
मग महादेवबुवा । श्रीचा निरोप बरवा । घेऊनि आला गांवा । परतोनियां ॥५२॥
तंव तयाचें वर्तमान । ऐकोनि म्हणती जन । काय हो हें विलक्षण । दृष्ट ना श्रुत ॥५३॥
जया होय श्रध्दा चित्तीं । तिही मानिली साधुशक्ति । परी पाखांड्यांच्या मती । सर्व खोटें ॥५४॥
जें प्रत्यक्ष केवळ । तेंचि मानिती ते बरळ । येर म्हणती टवाळ । अर्थजात ॥५५॥
परी जैं गोळकीं । पैज घेवोनि निकी । बोलिजे, तैं नास्तिकीं । मानिलें तें ॥५६॥
आणिक एक तेचि वर्षी । वृत्त झालें माधवमासीं । परिसावे; जे तुम्हांसी । सांगो आतां ॥५७॥
नदी तटीं एके दिवशी । स्नान करोनियां तपोराशि । बैसला असतां संध्येसी । महादेव ॥५८॥
पर्जन्य झालिया पैलीवर । येऊं पाहे महापूर । तैं सर्व लोक सत्वर । धांव घेती ॥५९॥
वेगें घेऊनि डोईवरी । रित्या भरल्या घागरीं । बाया धांवती सत्वरीं । घराकडे ॥६०॥
स्नाना आले ब्राह्मण । केलें न केलें स्नान । तैसेंचि पळती; परिधान । सांडोनियां ॥६१॥
पाणी न पाजितां, ढोरे । घराकडे सत्वरें । हांकोनि नेती पोरें गोरक्षकांचीं ॥६२॥
जिकडे तिकडे धांवा धावा । ऐसा झाला गवगवा । पळत सुटती जीवा । घेवोनियां ॥६३॥
एक म्हणति गवाळें । एक म्हणती सोवळें । एक म्हणती सांडिलें । वस्त्र माझें ॥६४॥
एक म्हणति जीव । वांचला मृत्युपासाव । हेंचि आमुचें सुदैव । मानूं आम्हीं ॥६५॥
ऐशापरी अकस्मात । नदी येतां धांवत । होवोनि ठेले भयाभीत । लोक सकळ ॥६६॥
परी नवल, हा योगिराज । येतुली होता गजबज । स्वस्थ बैसले, नेत्रपंकज । झांकोनियां ॥६७॥
लोक म्हणती ’ ब्राह्मणा । आतां गुंडाळी आसना । उरलिया अनुष्ठाना । घरीं करावे ॥६८॥
नदीनें केली लगट । अवधी नाहीं, ऊठ ऊठ । व्यर्थ वस्त्रासनासकट । वाहोनि जासी ’ ॥६९॥
ऐसें बहुपरी विनविलें । परि ते सर्व वायाचि गेलें । वृक्षांसंगें बोलिलें । अरण्यीं जैसें ॥७०॥
प्रवाही जैसा पर्वत । अथवा ध्रुव आकाशांत । तेवीं बैसला तट्स्थ । पद्मासनीं ॥७१॥
होतां प्रळयकाळ प्राप्त । विरोनि जाई आकारजात । मग केवळ चैतन्य शांत । उरे जैसें ॥७२॥
तैसा उदकाचा लोट प्रचंड । देखोनि, पळाले उदंड । तरी महादेव अखंड । तैसाचि बैसे ॥७३॥
वाटे परम पावन । महादेवाचें दर्शन । लाधावया, जणूं आगमन । कृष्णेचें हें ॥७४॥
आणि केवळ पददर्शन । घेतां नोहेचि समाधान । म्हणोनि देई अलिंगन । सर्वांगी कीं ॥७५॥
कीं हा केवळ त्रिपुरारि । आणि आपणही गंगेपरी । पवित्र, म्हणोनि तया शिरीं । जावों पाहें ॥७६॥
तैशापरी कृष्णाजळ । तया बुडवी हळुहळूं । जैसें वार्षीय मेघजाळ । भास्करातें ॥७७॥
तैसा तो योगीश्वर । जंव जंव चढे महापूर । तंव तंव जाहला अगोचर । नदीमाजी ॥७८॥
महादेव बाळ उघडें । निजलें, देखोनि वाडेकोडें । जाणों वरी झांकिलें लुगडे । कृष्णाईनें ॥७९॥
पुरामाजीं आठ प्रहर । स्वस्थ बैसला योगीश्वर । जैसा दुजा मत्स्यावतार । भगवंताचा ॥८०॥
पुरीं वहावला महादेव ब्राह्मण । जनमुखें परग्रामीं वर्तमान । ऐकोनि; मम गुरु राम धांवोन । कृष्णातीरीं पातला ॥८१॥
तयामाजी कितीएक । जे होते सांप्रदायिक । वियोगें करिती शोक । सदगुरुचा ॥८२॥
म्हणती आमुचा सद्‍गुरु । जो केव्ळ कल्पतरु । अज्ञान तिमिर भास्करु । अस्त झाला ॥८३॥
अहा रे देवा हाय हाय । आजि आमुची गेली माय । आतां येथें कवण सहाय । आम्हां बाळां ?॥८४॥  
तंव चित्ती रामें विवेक । आणोनि, अवरिले लोक । मग विचार करुनि नावेक । सद्‍गुरु माझा काय करी ॥८५॥
म्हणे या विश्वव्याप्ता जाणे येणें । आपारावारा अव्यक्त म्हणे । नाथिलाचि अज्ञजनें । अट्टाहास मांडिला ॥८६॥
असो; मग वृंदावन । बांधावे ऐसें चिंतन । करोनिया, सेवकजन । सिध्द जाहले ॥८७॥
खोरी कुदळी कामाठी । संभार घेवोनि उठाउठी । समूह अवघा कृष्णातटीं । सेवकांचा मिळाला ॥८८॥
मग तो मुमुक्षुचा कैवारी । बैसला जया खडकावरी । गाळ काढावया खोरी । मारिलीं तेथें ॥८९॥
खणतां खणतां विवर । पडलें एक भयंकर । परी आढळेना शरीर । सद्‍गुरुचें ॥९०॥
जंव जंव निघे गाळ । तंव तंव भूमी पोकळ । शोध न लगतां सकळ । निघोनि गेले ॥९१॥
तेथें माझा राम सद्‍गुरु । जयाचेनि राजयोग प्रसरु । जाहला; तो विश्वतारुं । विवरीं सूक्ष्म अवलोकी ॥९२॥
तेधवां तें उघडें द्वार । आंत शिरले सूर्य-कर । जैसें दर्शनाविखी आतुर । साधूचिया ॥९३॥
तया भानुकिरण -जाळीं । जैसीं सूर्यविकासी कमळें । तैसे उघडिले डोळे । सद्‍गुरुंनी ॥९४॥
तंव पुढें देखिले पदार्थ । यथापूर्व सुरक्षित । गेली नसे एकही वस्तू । तयामाजिलीं ॥९५॥
मग जैसा प्रभातकालीं । मित्र येई उदयाचलीं । नातरी जैसा अलि । कमलांतुनि ॥९६॥
तैसा तो द्विजवर । विवरा आंतूनि बाहीर । येता जाहला; माहेर । मुमुक्षूचें ॥९७॥
तये काळीं माझिये ताता । सद्‍गुरुदर्शनें जी अवस्था । झाली; ते इया ग्रंथा । माजी मातें न वदवे ॥९८॥
रामें भाळ चरणांबुजीं । ठेवोनि; सद्‍गुरु ह्र्दयामाजीं । सांठविला; तें मी वाकध्वजीं व्यक्त केलें श्रोतया ॥९९॥
मग आटपोनि स्नान । संध्यादिक विधान । तेथूनि निघे निधान । चैतन्याचें  ॥१००॥
आतां गांवी जरी जावें । तरी पूज्यतेचे गोंवें । पायी पडतील थवे । लोकांचे की ॥१०१॥
यास्तव आतां येथूनि पाय । काढावा, हा सदुपाय । यावांचोनि सोय । दुजी नाहीं ॥१०२॥
ऐसें चिंतोनि उजूं । तो निघाला योगिराजु । मग वसविला वासध्वजु । अन्य ग्रामीं ॥१०३॥
कंठोनि तेथें मास चारी । येतां महादेव माघारीं । लोक बुडाले सागरीं । आश्चर्याच्या ॥१०४॥
पश्चिम दिशी पहाटें । अकस्मात रवि प्रगटे । तया देखोनि वाटे । चोज जैसे ॥१०५॥
नातरी जैसा आवसीं । अवचट उगवे पूर्ण शशी । कां तरे शिळाराशी । उदकीं जेवीं ॥१०६॥
तैसा हा अवचट । देखोनि, झाला प्रकट । लोक म्हणति अचाट । सामर्थ्य हें ॥१०७॥
एकदां जाहला मृत । तो परतोनि ये जिवंत । हें दृष्ट ना श्रुत । आजवरी ॥१०८॥
गोरक्षादिक कथा । आल्या जरी कर्णपंथा । तरी त्या सकळ तत्त्वतां । प्राचीनचि ॥१०९॥
परी ऐलीकडे ऐसें वृत्त । कहीं न झालें अघटित । कीर भांबावलें चित्त । देखोनि हें ॥११०॥
अहो हा विप्र हट्टी । महानदीच्या पोटी । वाहोनि गेला; दिठी । देखिला आम्हीं ॥१११॥
हें असो, भाविकांनीं । पाहिला विप्र शोधूनि । तरी तयां न लाधे मुनि । शरीर हो ॥११२॥
परी नवल, हा ब्राह्मण । पावोनि एकदां निधन । नेणों कैसें आगमन । यया केलें ॥११३॥
नातरी अणिमादिक सिध्दी । आथिला हा त्रिशुध्दी । ऐसे चोजवे बुध्दीं । आमुचिया ॥११४॥
असती ऐसे भिक्षुक । पृथ्वीवरी अनेक । त्यांतील हाही एक । साधारण ॥११५॥
ऐसी आमुची तुच्छ मती । ययविखीं कीर होती । परि हा विप्र सु-मति । तैसा नव्हे ॥११६॥
साधू गुप्त हिंडती । ऐस्से जे सुज्ञ म्हणती । ते आजि प्रचीति । आम्हां आली ॥११७॥
आम्ही निर्दैव मूढ । विपायें झाला हस्तारुढ । परिसा म्हणोनि दगड । झिडकारिला ॥११८॥
नातरी जैसी पाच । जाणोनियां हिरवी कांच । अवमानिजे; तैसीच । मूर्खता ही ॥११९॥
हा ठाय वरी आम्हां । न दिसे तयाचा महिमा । झांकिला जैसा चंद्रमा । मेघान्तरीं ॥१२०॥
हा गा प्रत्यक्ष ईश्वर । अवतरला साचार । यासी जो म्हणे नर । तो महापापिया ॥१२१॥
ऐशापरी ते जन । करुं लागले स्तवन । आणि सांडिलें छळण । छलकीही ॥१२२॥
एर्‍हवीं तरी भक्ति । तैंचि उपजे लोक चित्ती । जैं कांहीं अगाध शक्ति । दाविजेल ॥१२३॥
जो का सदा बहिर्मुख । तया ज्ञान म्हणिजे विख । ते भुलती बाह्य वेख । देखोनियां ॥१२४॥
म्हणोनि लोकरंजन । करू न शके ज्ञान । शक्तीच होईजे विलक्षण । तयालागीं ॥१२५॥
असो यापरी अगाधु । शक्ति होता विशदु । म्हणो लागले साधु । महादेवातें ॥१२६॥
याउपरी तीर्थयात्रे । जावोनि पहावी क्षेत्रें । समाधिस्थळें पवित्रें । सत्पुरुषांचीं ॥१२७॥
ऐसी इच्छा उत्कट । चित्ती होता अवचट । तेथोनि तो योगिराट्‍ । निघता झाला ॥१२८॥
जाणों दुष्ट स्नानें पाप । तीर्थी संचतां अमूप । तई प्रार्थिला भूप । वैकुंठींचा ॥१२९॥
कीं आमुच्या ठायीं दोष । जनीं सांडिले अशेष । तयांची ह्र्षीकेश । काय गति ? ॥१३०॥
मग देवें दिधले उत्तर । जे करुं तुमचा उध्दार । घेवोनि जगीं अवतार । सद्‍गुरुरुपें ॥१३१॥
ते हे देवाची भाष । तया सत्य करावयास । तीर्थयात्रेचें मिष । केले जैसें ॥१३२॥
असो; मग तो संत । तीर्थे ठाकीत ठाकीत । येता झाला अकस्मात । चाफळासी ॥१३३॥
तंव सामसूम सर्वत्र । उलटोनि गेली मध्यरात्र । अंधेराचें कृष्णवस्त्र । नेसली जैसी ॥१३४॥
ग्रामवासी लोक । स्वस्थ भोगिती निद्रासुख । कानीं न पडे शब्द एक । मनुष्याचा ॥१३५॥
विपायें जरी ध्वनि । नावेक पडला कानीं । तरी तो केला श्वानीं । किंवा जंबुकीं ॥१३६॥
नातरी डुडुळ । किंवा ओरडे वाघुळ । जें ऐकतां भयाकुल । चित्त होई ॥१३७॥
ऐशिया भयंकर वेळीं । सद्‍गुरु आला चाफळी । तंव द्वारा घातली खिळी । राउळी़च्या ॥१३८॥
मग उभा ठाकोनि द्वारीं । उच्च स्वरें हाका मारी । मारुतिराया लौकर्री । भेट देई ॥१३९॥
तुझिया दर्शनी भुकेला । द्वारी चातक उभा ठेला । कृपाघना दयाळा । पाहि पाहि ॥१४०॥
हे अपरात्रीची वेळ । आणि मी एकाकी बाळ । पहुडे द्वारी; व्याकुळ । जीव झाला ॥१४१॥
आई तुवां ऐसी सांड । केली माझी उदंड । तरी आतां तोंड । कवणा वासूं  ? ॥१४२॥
तुजवांचोनि सोयरा । मज नाहींच दुसरा । यालागी अव्हेरा । न करावा जी ॥१४३॥
तूं अनाथांचा नाथ । ऐसा डगरु विख्यात । मा कोठवरी अंत । पाहसी देवा ? ॥१४४॥
आतां देवा धीर- । धरवेनाचि क्षणभर । धांव धांव सत्वर । भेद देई ॥१४५॥
ऐसा भक्त करुणा स्वर । ऐकोनियां हनुमंत वीर । उचंबळे सागर । दयामृताचा ॥१४६॥
तंव महाद्वारींची कुलूपें । गळूनि पडली आपाआपें । कर्मे जैसी सद्‍गुरुकृपें । मुमुक्षूंची ॥१४७॥
तें देखिलें द्विजवरें । मुक्त राउळाचीं द्वारें । उघडली रव-करें । पद्में जैसी ॥१४८॥
मग जैसा का मृगाड्क । उदैजला सन्मुख । तैसें देखोनि हास्यमुख । श्रीमारुतीचे ॥१४९॥
साष्टांग घातलें दंडवत । अष्टसात्त्विक भावयुक्त । तैं कुरवाळोनि हनुमंत । खेंव देई ॥१५०॥
तेवींच साकार रुपडे साचें । निज -भक्तवत्सल राघवाचें । पदपद्म वंदोनि जगद्‍गुरुचे । बाहेर ये कृपाळू ॥१५१॥
तंव लागली क्षणांत । कुलपें द्वारासी पूर्ववत । ऐसा महिमा अघटित । सद्‍गुरुचा, न वदवे ॥१५२॥
परी मनें घेतली हांव । तरी ते ह्रदिस्थ सद्‍गुरुराव । पुढील प्रसंगी महादेव । लीला वर्णील अशेख ॥१५३॥
’ कृष्णसुत ’ हें करोनि निमित्त । श्रोता वक्ता श्रीरघुनाथ । पुरवी कौतुकें मनोरथ । श्रीपतीचिया अनुजाचे ॥१५४॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१५५॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय तेविसावा संपूर्ण ॥

कठिण शब्दाचे अर्थ : वारी (सं) = पाणी (१२) आयुरन्न प्रयच्छति= आयुष्य अन्न देते (३२) मृति=मरण
(३६) शुक पिक = पोपट व कोकीळ (४०) दुष्ट ना श्रुत= पाहिले, ऐकलें नाही (५३) माधवमास = वैशाख महिना
(५७) पाच=निळसर हिरव्या रंगाचें बहुमोल रत्न क(११९) जंबुक = कोल्हा (१३६) डुडुक=घुबड (१३७) डगरु=महिमा, गवगवा
(१४४) खेव=मिठी, आलिंगन (१५०)

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP