मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय एकोणिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो श्रीशंकरा । भक्तह्र्त्कमल -भास्करा । सकळ सृष्टयक सुंदरा । जय हर हरा पार्वतीशा ॥१॥
तूं सकल सुरांचा राजा । घालवी आमुच्या मोह माजा । तव कृपाकटाक्षें खुजा -। संसार माझा क्षणार्धे ॥२॥
आतां वंदूं सद्‍गुरुचरण । ज्याचेनि जाय जन्ममरण । शिरी वाहूं पादत्राण । तेवीण आन नेणे मी ॥३॥
एवढा अफाट भवसागर । क्षणार्धे होय थिल्लर । ऐसा उपदेश बडिवार । सहस्त्रशिरा वदवेना ॥४॥
काव्यरचनेचा प्रसंग । नसे ग्रंथाचा व्यासंग । कैसा होईल श्रोती रंग । अंत्तरंगी चिंता हे ॥५॥
परी गुरुकथेची आवडी । माजी तदाज्ञा रोकडी । शिरीं वाहिली लवडसवडी । बुध्दि थोकडी जरी होय ॥६॥
आतां तोचि जिव्हेवरी । बैसोनियां, सारथ्य करी । वळवी जैस जैसी वैखरी । तदनुसारी मज्जल्प ॥७॥
आतां श्रोद्ती सावधांन । परिसावे पूर्वानुसंधान । मूळ आदिनाथ पासोन । पीठिका- कथन पूर्वीचें ॥८॥
सिध्दचरित्र नामेंकरुनी । आरंभिलें पूर्वजांनीं । अध्याय अठरा संपवोनी । ग्रंथ गुरुंनीं दाविला ॥९॥
देखोनियां ग्रंथ रसाळ । गंभीर साद्यन्त प्रेमळ । जो चाखितांचि अळुमाळ । होय निर्मळ अंतर ॥१०॥
अहो हे केवळ कथानक । नव्हे; हा ज्ञानामृताचा पाक ! । वाचकां देवोनि ज्ञान चोख । पळवी निःशेख मोहजाळ ॥११॥
ही अठरा मोत्यांची माळा । जो भाग्यवंत घाली गळा । तो ब्रह्मसुखाचा सोहळा । भोगी आगळा निश्चयेंसी ॥१२॥
कीं ही अष्टादश पुराणें । हेही बा उणेंचि बोलणें । मुमुक्षूचें सरस लेणें । कंठीं वागविणें सर्वदा ॥१३॥
असो; इये ग्रंथीचे वर्णनीं । गढूनि, वाव्हटलों म्हणोनि । कोपूं नये श्रोतृजनीं । हस्त जोडोनि विनवितो ॥१४॥
ऐसिया रसाळ सिध्दचरित्रा । हातीं देवोनियां पवित्रा । गुरुमाय वदे बा रे पुत्रा । ग्रंथसूत्रा चालवावे ॥१५॥
ऐकोनि हे कौतुक वचन । लाजिरें होय माझें मन । बुध्दि अल्प, कार्य कठिण । नम्रपणें विनविलें ॥१६॥
आपुली आज्ञा शिरसावंद्य । परी अत्यंत माझें मतिमांद्य । वाटे चित्ता ग्रंथ अगाध्दा । कैसा साध्य होईल ॥१७॥
ऐकोनिया बाळाचे जल्प । माय म्हणे नकोचि विकल्प । कीं एकदां होय जो संकल्प । तें रुप झालें पाहिजे ॥१८॥
त्यावरी ही सद्‌गुरु सेवा । येविषयीं नसावा वानवा । गुरुकृपें बुध्दीस नवा । अंकुर बरवा फुटेल ॥१९॥
आशीर्वचन पडले कानीं । धीर मनीं अश्रु नयनी । वेगें मस्तक गुरुचरणीं । ठेवोनि ग्रंथ आरंभिला ॥२०॥
गताध्यायीं कथा प्रवाह । (१)राम आमुचे प्रपितामह । ब्रह्मपरायण विगतमोह । येवोनि राहे नागपुरीं ॥२१॥
उपरी आज्ञापी राजेंद्र । आतां पुरे कारभार । ते इष्ट ऐकोनि आज्ञोत्तर । म्हणे करुणाकर वोळला ॥२२॥
राजसेवेचा कंटाळा । आज्ञा झाली पडत्या फळा । म्हणे आइते फेडिलें विटाळा । आतां मोकळा होईन ॥२३॥
मग सांडूनि संसार । वोपिला पुत्रीं घराचार । आपण अंगें जगदुध्दार । करी आदरें ॥२४॥
येथवरी पूर्वानुसंधान । येथोनि आतां कथा नूतन । सिध्दचरित्र परम पावन । एकाग्र मनें परिसावें ॥२५॥
कथिलें नागपूर पत्तन । तेथेंचि वसे एक ब्राह्मण । महादेव नामाभिधान । अति प्रवीण मंत्रशास्त्रीं ॥२६॥
शुचिर्भूत धर्मतत्पर । साळीभोळी वृत्ति उदार । केवळ सांबाचा अवतार । नांव साचार शोभतसे ॥२७॥
त्याची भार्या पतिव्रता । दुजी भवानीच तत्वतां । किती बानू लावण्यता । विद्युल्लता लाजवी ॥२८॥
(२)बोल केवळ कृपण-धन । परद्वीप जिये पर-सदन । अन्य पुरुषांचे वदन । इंदूसमान चवथीच्या ॥२९॥
ऐसें हें अनुरुप जोडपें । देह द्वय परी मनैक्यरुपें । आचरावी तपाचीं तपें । तैंचि सोपें भूतळीं ॥३०॥
बरे, आतां पुढील वृत्त । महादेव हे पत्नीसहित । उभयही आले पंढरींत । मनी संकेत दर्शनाचा ॥३१॥
तेथें प्रसिध्द गुंडोराज । महान‍ साधु तेजःपुंज । रामचंद्राचे गुरुराज । तत्पदपंकज भ्रमर मी ॥३२॥
असो, श्रीगुरु महादेव । पत्नीसहित देवाधिदेव । पुजिला; तव गुंडाख्य गौरव । श्रवणीं अभिनव ऐकिला ॥३३॥
मग ते उभय दंपती । गुंडोराज चरणांप्रति । येवोनि, वंदिले अतिप्रीति । अनुताप चित्तीं दारुण ॥३४॥
(३)आतां तो सज्जन । पाहूनि, पदरजीं अनन्य । होवोनि; निरसावे भवबंधन । जेणे दारुण गांजिलें ॥३५॥
तनु मन धना अर्पुनी । लाधले चिरानंद पायवणी । कैक दिन श्रीसन्निधानीं । क्रमिले त्यांनी पंढरिये ॥३६॥
अवचटा आला कथेचा ओघ । गुंडाख्य चरिताचा प्रसंग । वर्णू आतां सांगोपांग । श्रवण-पांग फेडावया ॥३७॥
म्हणाल चुकला पीठिकाक्रम । गुंडाख्याचा शिष्य राम । आधीं वर्णिला अनुपम । मग कल्पद्रुम गुंडाख्य ॥३८॥
तरी ऐसें नव्हे श्रोतेजन । मुख्य येथें कथानुसंधान । तेथें ठेवितां अवधान । जाहले गौण अनुक्रमा ॥३९॥
जैसा जैसा कथा वोघ । तैसा तैसा घेणें भाग । यालागीं हा विपरीत योग । श्रोतीं अनुराग परिसावा ॥४०॥
बरें, तो योगियांचा राजा । गुंडाख्य परमगुरु माझा । सदैव तत्पर मुमुक्षु काजा । नित्य सहज समाधींत ॥४१॥
उपासना अति खडतर । अहर्निशीं साक्षात्कार । आतां एक चमत्कार । परिसा थोर तयांचा ॥४२॥
एके दिनीं गोकुळ अष्टमी । निशीं जागद्र विठ्ठलधामीं । नामगजरें रोमरोमी । हा मी हामी ध्वनि उठे ॥४३॥
ऐक्य झाला भगवद्‍भजनीं । पूर्ण भक्त-शिखामणि । तेजःपुंज जैसा तरणि । चिद्रत्न खाणी गुंडाख्य ॥४४॥
रोमांच उठले थरथरोनी । कंठ दाटला भरोनी । भजनें लागली उन्मनी । होय आटणी वृत्तीची ॥४५॥
ऐसा भजनाचा कडाखा । आनंदाश्रु आले आंखा । घर्मबिंदू तयाच्या मुखा । सरस मौक्तिका लाजवीत ॥४६॥
मागुती आज्ञापी गुंडुराय । जयंतीचा संप्रदाय । सुंठवडयाची कांही सोय ! । आतां पाहे लवकरी ॥४७॥
परि हे भगवदभक्त अति विरक्त । उदासीन, वृत्ति-अयाचित । उलटोनि गेली मध्यरात । नसे घरांत संग्रहो ॥४८॥
यानंतरी सर्व सेवक । आन आनाचे मुख । पाहूं लागोनि टकमक । येकमेकां बोलती ॥४९॥
पुढें आतां काय गति । उलटोनि गेली मध्यराती । सुंठ गूळ ऐशा वक्ती । लाधेल हातीं कैसेनि ? ॥५०॥
मग त्यामाजीं एक बोलिला । बाजारीं आतां वेगें चला । जरी वाणी होय निजेला । चेववूनि त्याला; सुंठ आणा ॥५१॥
मागुती करुनि लगबग । शिष्य धाविन्नला सवेग । तों दुकानीं नव्हता वाणिक । कुमरास वेगें उठविलें ॥५२॥
उठवूनि वेगें वाणिकपुत्रास । म्हणे सुंठ पाहिजे आम्हांस । परि तो नायके त्याची भाष । पुनरपि निद्रेस वश होय ॥५३॥
तदा चाळवोनि केलें जागे । तंव वणिक पुत्र उठे वेगें । सुंठ दुकानीं हुडकूं लागे । परि कोठें थांग लागेना ॥५४॥
तेथ बचनाग आणि सुंठ । ठेविली होती एकवट । निद्रेंत होता वाणगट । नेणोनि नीट; विख दिलें ॥५५॥
घेऊनि उजूं घरीं आला । चूर्ण करोनि गुड कालविला । ऐसा सुंठवडा करिजेला । मग वांटिला आघव्यांसी ॥५६॥
तेथोनि अरूणोदयपर्यंत । भजन चाललें आतोनात । तंव वाणी ये दुकानांत । कुमरा वृत्त पुसतसे ॥५७॥
बा रे गिर्‍हाइकें कोणी । आली होती की दुकानीं ? । येरु बोले सुंठ गूळ दोन्ही । नेले संतांनी मध्यरात्रीं ॥५८॥
यावरी पुसे बा रे मुका । बचनाग सुंठींत कालविला । ठावे होते कीं तुजला ? । येरु म्हणे नेणे मी ॥५९॥
ऐकोनियां पुत्रोत्तर । वाणी जाहला चिंतातुर । मनीं म्हणे काय हर हर । प्रमाद दुर्धर जाहला ॥६०॥
हा हा दैवा काय अनर्थ । प्राणा मुकतील जीव व्यर्थ । ह्र्दय पिटीत जाय धांवत । भजन जेथ होत असे ॥६१॥
संत समुदाय गाढ भजनीं । देखोनि होय चकित वाणी । म्हणे अद्‍भुत ईश्वर करणी । मस्तक चरणीं ठेविलें ॥६२॥
म्हणे मी सर्वस्वी अपराधी । काय जाहली मज दुर्बुध्दि । क्षमा असावी कृपानिधि । पाप-निधि कीर मी ॥६३॥
ऐकोनि; गुंडाख्य परमभक्त । म्हणती कवण हा शरणागत ? । ऊठ, म्हणोनि; त्याचें वृत्त । इत्थंभूर पुसियेले ॥६४॥
हस्त जोडोनि वाणी बोलला । सुंठ बुध्दीं बचनाग दिला । पुत्र हस्तें प्रमाद घडला । वाटे मनाला अनुताप ॥६५॥
परिसोनि वणिकाची उक्ति । स्वामी गजबजले चित्तीं । अवलोकिती विठ्ठलमूर्ति । तंव ते कान्ति कृष्णवर्ण ॥६६॥
देखोनिया मूर्तीची स्थिति । अश्रु वाहती नेत्रपातीं । उडोनि गेली देहस्फूर्ति । ऐसी भक्ति अनन्य ॥६७॥
प्रहरद्वय भजन धुमाळी । गुंडाख्यें मग आरंभिली । तंव घाई करिती मंडळी । पात्रें वाढिली स्वामिया ॥६८॥
परी महाराजांनीं धरिला हट्ट । देवा चढलें विख दुष्ट । तें उतरल्याविना चोखट । अशनीं वीट येतसे ॥६९॥
ऐसा देखोनि आग्रह । ताटस्थ जाहला समूह । तैसाचि भजनाचा प्रवाह । शिष्यासह चालविला ॥७०॥
तेणें देवा अंगीचें विढ । उतरोनिया निःशेष । जाहला सर्वांगी प्रकाश । परि कंठी शेष राहिला ॥७१॥
मग भजन करोनि समात्प । पारणें सोडिलें सर्वांसहित । ऐसें अद्‍भुत भक्तचरित्र । त्याचा अंत कळेचिना ॥७२॥
उपासनेचें अगाध सामर्थ्य । कर्तुमकर्तुं अन्यथा समर्थ । पाहिजेल तो सिध्द अर्थ । क्षणार्धात दावित ॥७३॥
सर्व सिध्दी जेथ आकळिल्या । तैसें ब्रह्मपद हातीं आल्या । तया मग काय उणें बोला । भक्त-लीला अंगाध ॥७४॥
असो हें संतलीलावर्णन । वाणीस होय अतिक्रमण । अद्यापि त्या मूर्तीचें पूजन । करिती जन पंढरींत ॥७५॥
आतां पुढील इतिहास । गुंडोमहाराज चातुर्मास । करुनि पंढरपुरीं वास । तेथोनि प्रवास चिंतिला ॥७६॥
प्रतिवर्षी कुळाचार । चंपाषष्ठीस भक्तवर । (४)पहावया मैलार । धर्मतत्पर निघाला ॥७७॥
आरुढ होवोनि अश्वावर । गुंडाख्य भक्त-धुरंधर चालिलें असतां, एक फकीर । मार्गातरीं भेटला ॥७८॥
जया अभिधान पीर बाच्छा । लौकिक ऐकोनि गुंडाख्याचा । अध्यात्मविषयीं भाषणेच्छा । अंतरीं त्याच्या निपजली ॥७९॥
मग अवलियें कुशल प्रश्न । केला, गुंडाख्यासी वंदोन । परि तो तदा समाधिमग्न । त्याचें वचन न्ब परिसे ॥८०॥
देखोनि गुंडाख्याचें मौन । अवलिया होय अति खिन्न । म्हणे हेंचि इच्छी भगवान । त्यासी कवण उपाय ? ॥८१॥
अवलिया जाय ऐसें वदत । इकडे काय जाहलें वृत्त । कीं गुंडोरायाच्या समाधींत । नखशिखान्त तोचि दिसे ॥८२॥
शिष्यीं दिधलें प्रत्युत्तर । पीर बाच्छा नामें फकीर । आले असतां; आपण नेत्र । झांकूनि स्थिर बैसला ॥८३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । म्हने म्यां दुखविलें साधु-मन आतां होईल दर्शन । तोचि सुदिन भाग्योदय ॥८४॥
मागुती गुंडाक्य परमहंस । येता जाला मैलारास । इकडे अवलियें स्वग्रामात । केला वास स्वाश्रमीं ॥८५॥
आतां त्याचें पुढील चरित । श्रोते ऐका सावचित्त । जें श्रवण केलिया चित्त । सुसमाहित होईल ॥८६॥
अवलियानें एके दिवशीं । पाचारुनि सर्व जनांसी । म्हणे इच्छा होय मानासी । अन्नसत्रासी स्थापावे ॥८७॥
परि या महत्कार्यासी । पाहिजेत द्रव्याच्या राशी । मी तों आकिंचन तापसी । नसे मजपासी कवडीही ॥८८॥
जयापाशीं असेल धन । तेणें द्यावे आम्हां ऋण । तें मी सावकाश फेडीन । त्यालागीं धरण बैसूं नये ॥८९॥
जैं जैं पडे आम्हां नड । तैंच दिली पाहिजे रोकड । आधीच सांगतो निर्भीड । पुढें चडफड नसावी ॥९०॥
नसावा कधीं तगादा । नसावा खात्यावरी आदा । हुंडी परतों नये कदा । ऐसा धंदा आमुचा ॥९१॥
इया व्यवसायातें राजी । जरी कोणी असेल गाजी । तरी सत्वर बोला जी । भिडेमाजीं न पडावे ॥९२॥
ऐसें ऐकोनि त्याचें वचन । सावकार गेले परतोन । म्हणति अवलिया अकिंचन । याला ऋण न देववे ॥९३॥
याला आजि धन द्यावे । मागुती आम्ही रडत बैसावे । अहो हा फकीरचि स्वभावें । किमर्थ बुडावे या संगें ? ॥९४॥
घेऊनि आमुची संपत्ति । मेळवील जगीं कीर्ती । नको नको ही संगति । होईल अवगति निश्चयें ॥९५॥
जरी आम्ही झालों धनिक । या वेडयाचे बोल ऐकूं । मागावी लागेल पुढें भीक । अंगा राख लावोनी ॥९६॥
ऐसे नाना परींचे तर्क । करुं लागले सर्व धनिक । कृपणाचे गाळीव अर्क । कवडीचुंबक उन्मत्त ॥९७॥
एरवीं तरी ते बापुडे । नेणती साधूचे पवाडे । सदा परमार्थी वाकुडे; । अज्ञान रोकडे धनामाजी ॥९८॥
असो, त्या सावकारामाजीं एक । जेवीं काकांमाजी शुक । मल्लेश नामें एक धनिक । निःसीम सेवक विठ्ठलाचा ॥९९॥
परि त्या एक मोठी चिंता । लागली तया धनवंता । वृध्दापकाळी अनपत्यता । तेणें खिन्नता अहर्निशीं ॥१००॥
मल्लेशे केला विचार । माझी धनिकता थोर । परि जैं पोटी नाही पोर । व्यर्थ भार द्रव्याचा ॥१०१॥
पडों नेदी पुन्नाम नरकांत । म्हणवोनि म्हणिजे त्या नांव पूत । पूत्र नसतां सर्व वित्त । गति विपरीत करीतसे ॥१०२॥
तरी आतां ही सर्व संपत्ति । द्यावी अवलियाच्या हाति । येर्‍हवींही जें मरणान्ती । जाय हाती नृपाच्या ॥१०३॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । पुसिली भार्येसी संमति । येरी म्हणे : प्राणपति । ऐशीच मति माझीही ॥१०४॥
(५)त्याग असूनियां धन । प्रिय शब्दें जें ज्ञान । क्षमा असूनि शूरपण । लोकीं तीण दुर्मिळ ॥१०५॥
यालागीं हे प्राणनाथा । विचार जो आणिला चित्तां । तो मज मानवला तत्त्वतां । होय सार्थकता धनाची ॥१०६॥
घेवोनि प्रियेची संमति । मल्लेश आला अवलियाप्रति । अर्पिली पीर बाच्छाचे हाती । सर्व संपत्ति तेधवां ॥१०७॥
देखोनि औदार्य चोखट । होय अवलिया संतुष्ट । भला रे भला तूं एक धीट । म्हणोनि पाठी थापटी ॥१०८॥
तूंचि एक खरा भक्त । येर ते द्रव्य-दारासक्त । ऐशियापरी तो विरक्त । तद‍गुण बहुत वानितसे ॥१०९॥
घेऊनि मल्लेशाचें वित्त । वेंचिले सर्व दिन-द्वयांत । जे जे याचक द्वारी येत । त्यांचे इच्छित पुरवीतसे ॥११०॥
ऐकोनि याची दान-कीर्ति । कोटयानुकोटी याचक येती । जे जेतुलें द्रव्य मागती । तेतुलें हाती अर्पितसे ॥१११॥
एक म्हण्दती मुलाचें लग्न । एक म्हणती उपनयन । उदईक आहे; द्यावे धन । तूंतें पुण्य लागेल ॥११२॥
एक म्हणती काशी-यात्रा । आम्हासी करवी तूं पवित्रा । कृपा करी दीनमित्रा । प्रीतिपात्रा आम्हांवरी ॥११३॥
एक म्हणति प्रसंग कठिण । बाईल जाहली बाळंतीण । तयामाजी बहुत ऋण । होती प्राण व्याकुळ ॥११४॥
ऐसे नाना परीचें याचक । कोणी सत्य कोणी वंचक । कोणी अंगा लावूनि राख । जाहले देखा बैरागी ॥११५॥
परि हा दाता समदृष्टि । करी सर्व जनांची तुष्टि । हो कां सुखी अथवा कष्टी । करी वृष्टी द्रव्याची ॥११६॥
ऐशिया परी धर्म आचरितां । जाहला द्र्व्य-कोश रिता । मल्लेश धनिका तत्त्वतां । निर्धनता पदरी ये ॥११७॥
मल्लेश पडला चिंतेंत । उडोनि गेले सर्व वित्त । आतां जरी मागेल संत । काय उचित बोलावें ? ॥११८॥
ऐशी मल्लेशाची चिंता । सिध्दें जाणोनि तत्त्वतां । दया आली साधु-चित्ता । मनीं खिन्नता वाटली ॥११९॥
भला रे उदार सात्त्विक । धैर्यवंत आणि वचनिक । व्यर्थ छळिला विठ्ठ्ल सेवक । यासी दुःख बहु जाहलें ॥१२०॥
आतां याचें ऋण । फेडोनि, करावें समाधान । मग मुद्रिका शतद्वय घेऊन । मल्लेश सदना पातला ॥१२१॥
मग म्हणे बा रे वणिका । तुवां घेवोनि हा पैका । यांतूनि शत शत मुद्रिका । खर्च तितुकाचि करावा ॥१२२॥
जरी एकदाचि वेंचिसी सारे । तरी उजूचि फससी बा रे । दारिद्य येऊनि पुन्हां शिरे । मागुती नुरे कवडीही ॥१२३॥
हाती घेऊनियां धना । मल्लेश निघाला निजसदनां । तंव मार्गी त्याचा मेहुणा । दीन वदन देखिला ॥१२४॥
शतद्वय मुद्रिका देणें । म्लेंच्छ राजाचें होय तेणें । परी अनुपपत्तीकारणें । त्यांस देणे होईना ॥१२५॥
म्हणोनि राजसेवकांनीं । पाठीं दगड देऊनी । उभा केला पटांगणीं । अश्रु नयनीं वाहती ॥१२६॥
देखोनि श्यालकाची स्थिति । मल्लेश गजबजला चित्ती । पुशिलें वृत्त तयाप्रति । ऐसी गति कां जाहली ? ॥१२७॥
येरूं म्हणे मल्लराया । राजद्रव्य देणे होय । रौप्यमुद्रिका शतद्वय । परी सहाय कोणी नसे ॥१२८॥
एकही नाहीं कपर्दिका । मा कोठून येतील मुद्रिका ? । ऐशिया प्रसंगीं श्यालका । तुजहुनि निका कोण सहाय ? ॥१२९॥
तुवां जे एवढी संपत्ति । दिधली अवलियाचे हाती । परी कैसी होय निजाप्त-गति । याची क्षिति तुज नसे ॥१३०॥
राजद्वारी आणि स्मशानी । उत्सवीं आणि व्यसनीं । तैसेंचि राष्ट्रप्लवनीं । जो सन्निधानीं तोचि बंधु ॥१३१॥
प्रसंद्गी सहाय्य करणें । तैचि सफल आप्त -जिणें । इये वेळीं उपेक्षिणें । लाजिरवाणें तुज होय ॥१३२॥
ऐकूनियां दीन वाणी । पोटीं गंहिवरलासे वाणी । अश्रु लोट आले नयनीं । मागुती मनीं विचारी ॥१३३॥
म्हणे आप्त झालिया शरण । साहाय्य व्हावे: देऊनि प्राण । सांडोनि मनाचें कार्पण्य । याहुनि पुण्य काय असे ? ॥१३४॥
ऐसा करुनि निश्चय निका । मल्लेशें तैं राजसेवका । देऊनि त्याचि मुद्रिका । निजश्यालका सोडविले ॥१३५॥
ऐकोनियां वृत्तान्तास । अवलियें निजस्थानास । पाचारुनि तो मल्लेश । तया सरोष बोलिला ॥१३६॥
रे तुवां मूर्खे काय केलें ? । तूंतें म्यां जें द्र्व्य दिधलें । तें श्यालका देऊनि टाकिलें । तेथ जाहलें अ-चातुर्य ॥१३७॥
पाळिलें असतें माझें वचन । तरीच होते ऋणमोचन । घेऊनि आतां त्वदुदरीं जनन । अवश्य ऋण फेडणें ॥१३८॥
बरें आतां काय उपावो । अवश्य होणार तें होवो । ऐसें बोलिला अवलिया रावो । तात्काळ देहा ठेविलें ॥१३९॥
इकडे मल्लेशाची पत्नी । तैचि होय ते गर्भिणी । दिवसा मासा शोभनी । काळिमा नयनीं वाढली ॥१४०॥
अहो अगाध संत-महिमा । तत्सामर्थ्या नसे सीमा । पुरवी शरणागत कामा । तया उपमा जगीं नसे ॥१४१॥
केवढें अवलियाचें सामर्थ्य । अनन्यत्वें देतां सकळार्थ । मल्लेशाचा मनोरथ । एका क्षणांत पुरविला ॥१४२॥
असो; तेचि दिवशी, रातीं । मल्लेशाचिये दृष्टान्तीं । येवोनि अवलिये म्हणती । तूझिया पोटी येईन ॥१४३॥
होईल जो पुत्र ज्ञानी । घालूनि तया गुंडाख्य चरणी । सद्‍गुरुची आज्ञा घेवोनि । नामकरणी करावी ॥१४४॥
गुंडाख्यासी तैसेंचि स्वप्न । होवोनियां, बाणली खूण । वेगें मल्लेश विनवण । करी जाऊन पंढरीये ॥१४५॥
ऐकोनि तयाची प्रार्थना । वेगें येई मल्लसदना । देखोनियां पुत्ररत्ना । गुंडूराणा संतोषला ॥१४६॥
म्हणे मल्लेशा तूं धन्य । अगाध तुझीं पूर्वपुण्य । म्हणवोनिया ऐसें वदान्य । पुत्ररत्न लाधलें ॥१४७॥
आतां तव सुता ’ वीराप्पा ’ । म्हणवोनि नांव ठेवी बापा । तुझिया बाळावरी जाण पां । ईशकृपा पूर्ण असे ॥१४८॥
देवोनि आशीर्वादास । गुंडाख्य निघाला पंढरीस । मनीं संतोषला मल्लेश । पुढें इतिहास परिसावा ॥१४९॥
यावरी दिवसानुदिवस । थोर जाहला वीरेश । झाली वयासी दहा वर्ष । अनुग्रहासी योग्य होय ॥१५०॥
पूर्वसंकेतें गुंडूरावो । वीरा देणें अढळ ठावो । तयासी द्यावया अनुग्रहो । मल्लेश गृहा पातला ॥१५१॥
जैसा पूर्वील दृष्टान्त । तैसीच आतां पूर्ण प्रचीत । म्हणे हा अवलियाचि सत्य योगच्युत उदरा ये ॥१५२॥
प्राचीन योगसंस्कार । वीरेशा होय बलवत्तर । उपदेशाचा अंकुर । अतिसत्वर उगवेल ॥१५३॥
आधींच भूमि सुपीक । माजी वर्षलें पर्जन्योदक । मग तया फलाचा परिपाक । होय आत्यन्तिक निश्चयें ॥१५४॥
ऐसा हा पूर्ण अधिकारी । देखोनि, घेतला अंकावरीं । प्रेमें आलिंगोनि; शिरी । वरदकरी स्पर्शिलें ॥१५५॥
मग तयावरी बालकासी । उपदेश दिधला ’ तत्त्वमसि ’ । श्रवणेंचि शब्दार्थासी । झॊंबे वस्तूसी निवृत्त ॥१५६॥
अहो तो पहिलाचि परिपूर्ण । त्यामाजी गुंडूरायें दान । सोऽहं हंसाचें साधन । सिध्द सदन दाविलें ॥१५७॥
तेथील अच्युतानंत पद । दिधला मिराशी स्वान्म्द । धन्य ते उभयानंदकंद । मी मतिमंद केवीं वानूं ? ॥१५८॥
झाले गुंडाख्य शिष्य बहुत । परी तयामाजी मल्लेशसुत । मृगाड‍.क जैसा नक्षत्रांत । तैसा अत्यंत शोभतसे ॥१५९॥
कल्याण जेवीं समर्थासी । कीं तो एका जनार्दनासी । धनंजय जेवीं भगवंतासी । तैसा यासी प्रिय ’ वीर ’ ॥१६०॥
ज्येष्ठ पुत्रीं राज्यभार । जैसा देई नृपवर । तैसेंचि गुंडाख्यें निजसार । शिष्य ’ वीरा ’ वोपिलें ॥१६१॥
असो आतां; सद्‍गुरुराणा । देवोनि शिष्य हस्तकीं वीणा । म्हणे बा रे प्रिय वीरण्णा । अखंड भजना चालवी ॥१६२॥
आणखी आईक शिष्यवरा । भूमंडळावरी संचारा । करोनियां, जगदुध्दारा । तुवां साचार करावा ॥१६३॥
ऐकोनियां गुरुवचना । स्कंधावरी वाहोनि वीणा । भजन करीत वीर राणा । देशाटणा चालला ॥१६४॥
मुखीं न विसंबे नामगजर । वीणा न ठेवी भूमीवर । करीतसे दीनोध्दार । पोटी अपार कारुण्य ॥१६५॥
ऐसा ’ वीर ’ मल्लेशसुत । जाहला भूमीवरी विख्यात । इतुकियामाजीं एक वृत्त । होय अवचित; परिसा तें ॥१६६॥
पुण्याख्य नगरामाजीं । श्रीमंत प्रधान पेशवा बाजी । जो तमो गुणी विषयभोगी । असे गाजी सर्वदा ॥१६७॥
पूर्वी घेतली शिवदीक्षा ल्क। मागुती शक्तिपंथाऽपेक्षा । गोड वाटली तयापेक्षा । तिकडे लक्ष वेधिलें ॥१६८॥
(६)अहो हा शाक्तांचा पंथ । उपासका फलद अत्यंत । परि तो मूढीं केला कु-पंथ । नेणोनि अंत तयाचा ॥१६९॥
नेणोनि मूळ ग्रंथींचा अर्थ । करोनि यथेच्छ विपरीतार्थ । संपादावया विषयस्वार्थ । लोकीं अनर्थ मांडिती ॥१७०॥
प्रत्यक्ष यंत्रपूजन । घेऊनियां ऐसें वचन । शिश्नोदरपरायण । भग -पूजन आरंभिती ॥१७१॥
तैसेंचि दंपति-ऐक्य -दर्शन । मायेपासोनि विश्वोत्पादन । याही वचनी अर्थलापन । करिती जन विपरीत ॥१७२॥
परी हे शृंगारपर टीका । सांडोनि, करी जो विवेक निका । तैंचि वर्म उमजे साधका । येर्‍हवी फुका सकल क्रिया ॥१७३॥
अहो योगांगींचा नियम । शिवशक्तीचा संगम । ॐ इति एकाक्षर आनाम । आनंदधाम युग्म हें ॥१७४॥
अनन्य साधका हेंचि दर्शन । आतां यंत्रपूजाविधान । तें परिसावें श्रोतेजन । जे सत्कुलीन गुरुपुत्र ॥१७५॥
सदभ्यासीं शून्यत्रया । लंघोनि, चतुर्थावस्था तुर्या । उभयांगीची अप्रमेया । पिंडब्रह्मांडीं या प्रकाशी ॥१७६॥
तेचि ही साधकाची माय । सद्‍गुरु दावी साधनोपाय । हा यंत्रपूजेचा जाणे अन्वय । तैं निका होय परमार्थ ॥१७७॥
आतां मायराणी पासोन । कैसें होय विश्वोत्पादन । जे क्षराक्षरांचें मेळवण । देशिक दयाघन दावितु ॥१७८॥
पूर्णाश भरें चिदंबरीं । मागुती पिंडीं भरोवरी । रिघोनि, ब्रह्माण्डाच्या हारी । परोपरी उभवितु ॥१७९॥
चारी खाणी चारी वाणी । चौर्‍यांशी लक्ष जीवश्रेणी । पिंड ब्रह्माण्डाची उभवणी । हेळार्धेनि घडी-मोडी ॥१८०॥
हाचि विश्वोत्पादनभावो । श्रोती न धरिजे संदेहो । हाचि जाणिजे मूळान्वयो । श्रीगुरुरावो बोलिला ॥१८१॥
असतिया दीपातें पदर । साक्षेपें देऊनि; अंधकार । संग्रहोनि; तेथेंचि आदर । ठेविती घोर; निंद्य हे ॥१८२॥
असो; श्रीमंतांची स्वारी । वाई क्षेत्री आलियावरी । इच्छा झाली अभ्यंतरी । पंढरपुरीं जावया ॥१८३॥
आज्ञापिलें कारभारी । कीं सिध्दता करावी सत्वरी । संगें घेऊनि मानकरी । येत स्वारी क्षेत्रास ॥१८४॥
उत्तम पूजासाहित्य । सर्व राजोपचारासहित । घेऊनि आले श्रीमंत । वाजतगाजत महाद्वारीं ॥१८५॥
तेथें देखिले दोघे सुतार । दारीं पहुडले ते सहोदर । लोक म्हणती साधू थोर । कीर्ति फार पसरली ॥१८६॥
उभय बंधु जळोजी मळोजी । नामें प्रसिध्द लोकांमाजी । कीर्ति ऐकोनि म्हणे बाजी । होय आजि धन्य दिवस ॥१८७॥
मग पांडूरंगाचें दर्शन । घेवोनि, परतले श्रीमान । द्रव्यराशि पुढें ठेवून । केलें नमन साष्टांग ॥१८८॥
हस्त जोडोनि नम्रभावे । प्रार्थना केली बाजीरावें । स्वामी हें तुळशीपत्र घ्यावे । अनन्यभावें अर्पिलें ॥१८९॥
बाजीस दिधलें प्रत्युत्तर । द्र्व्य म्हणिजे विष प्रकार । अर्थ नव्हे हा अनर्थ घोर । तेथूनि दुर असावे ॥१९०॥
यावरी बोलिला बाजी । ’ घेऊनि धर्म करावा जी ’ । ऐसी होय इच्छा माझी । पूर्ण आजि करावी ॥१९१॥
साधू म्हणती आधी । हात घालावा विष्ठेमधीं । मागुती करावा क्षालनविधि । इतुकी उपाधि कासया ? ॥१९२॥
परद्रव्यें जो का धर्म । तो होय केवळ अधर्म । मूर्खजन नेणतां वर्म । व्यर्थ कुकर्म आचरिती ॥१९३॥
यालागीं हे नृपनाथ । घेऊनि जावे आपुल्या वित्ता । देखोनि ऐसी निःस्पृहाता । त्यासी विस्मयता वाटली ॥१९४॥
मग बोले बाजी त्यांसी । आम्ही आलों पायापाशीं । जैसी इच्छा होय मानसी । आज्ञा तैसी करावी ॥१९५॥
मी आपुला दासानुदास । सिध्द आपुल्या चरणसेवेस । जें जें येईल चित्तास । तें तें सावकाश मागा वो ॥१९६॥
साधू म्हणत्ती तया उपरी । बाजीराया तूं दीन-कैवारी । इच्छा असे एक अंतरी । ते सत्वरीं पुरवावी ॥१९७॥
बाजी म्हणे मनींचे इष्ट । सांगावे जी मातें स्पष्ट । जरी का कांही असे कष्ट । तात्काळ नष्ट करीन ॥१९८॥
मग बोलती भगवत्सेवक । राया इच्छा असे एक । पुनरपि नच दावावे मुख । येतुली भीक द्या आम्हां ॥१९९॥
नलगें आम्हां द्र्व्य -दारा । नलगे राज्याचा पसारा । नको नाशिवंत जो सारा । इच्छा दातारा पुरवावी ॥२००॥
ऐकोनि ऐसें निःस्पृह वचन । बाजी झाला खिन्न वदन । चित्ती म्हणे संत महिमान । अति गहन त्रिशुध्दि ॥२०१॥
म्हणे ही केवढी विरक्ति । काय ही विषयांची खंती । आमुची येवढी संपत्ति । असोनि; विपत्ति जाईना ॥२०२॥
आम्ही इतुके केले गुरु । परि ते नव्हतीच सद्‍गुरु । हे तो भवसागरींचे तारूं । कल्प-तरु मुमुक्षूचे ॥२०३॥
ऐसा लाधेन कैं गुरु आतां । जो होय मोक्षाचा दाता । उपदेश देतांचि, तत्त्वतां । बध्दां मुक्तता सहजचि ॥२०४॥
ऐसी उत्कट चिंता मनीं । बाजी आला पुण्यपत्तनीं । सकळ मंत्री मेळवूनि । सभास्थानीं बैसला ॥२०५॥
एकेकी निज विचार । दाविती कीर जे साचार । जे जया वाटती थोर । ते त्या आदरें वानिती ॥२०६॥
मग म्हणे त्र्यंबक डेंगळा । जो सर्वाहूनि आगळा । आणि गुंडाख्याचा चेला । विश्वासु भला बाजीचा ॥२०७॥
विनवी परिसा महाराज । प्रख्यात साधु गुंडराज । मस्तकीं घेतल्या चरणरज । विज्ञान बीज अंकुरी जे ॥२०८॥
ऐकोनि त्र्यंबकाचें वचन । सभासद डोलविती मान । म्हणती हे भली निवडण । केली आपण ये वेळीं ॥२०९॥
घेऊनि मंत्र्यांची संमति । बाजी करी निश्वयो चित्तीं । कीं जावे आतां पंढरीप्रति । नृप मागुती निघाला ॥२१०॥
येथवरी ग्रंथविस्तारु । जेणें वदविला; तो सद्‍गुरु । अनन्य -काम कल्पतरी । तत्पदीं शिर लीन असो ॥२११॥
पुढील अध्यायीं दर्शन । घेईल बाजी प्रधान । गुंडाख्याचें, परम पावन । ते सावधान परिसावें ॥२१२॥
जैसी कृपा येथवरी । केली श्रोती या दीनावरी । तैसीच आतां पुढील विस्तारी । श्रोतृ चतुरीं करावी ॥२१३॥
त्रिकुटवासी सद्‍गुरु राम । त्रिविध तापाचा विराम । जेणे वारुनि माझा भ्रम । आनंदधाम दाविलें ॥२१४॥
परि जें दाविले तेंचि पावावे । साक्षात्कारें अनुभवावे । ऐसी इच्छा अनन्यभावें । गुरुरावेंचि पुरवावी ॥२१५॥
येर्‍हवी मी सेवाहीन । अनधिकारी पतित दीन । तारावया जड पाषाण । दुजा कवण समर्थ ॥२१६॥
यालागीं त्याचेंचि स्मरण । त्याचेंचि भजन आणि अर्चन । मजला विश्रांतीचें स्थान । नसे तयाविण त्रिशुध्दी ॥२१७॥
जो दे उठाउठी सायुज्यमुक्ति । तो कैसा नेदी ग्रंथ -स्फूर्ति ? । यालागीं ग्रंथाच्या अंतीं । तत्पदीं मम नती अखंड ॥२१८॥
मागां अष्टादशापर्यंत । (७)ममाग्रज श्रीपति रामचरित । बोलिला; तेंचि कौतुकें येथ । सद्‍गुरु कृष्णसुता बोलवी ॥२१९॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥२२०॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय एकोणिसावा संपूर्ण ॥

टीपः (१) राम आमुचे प्रतितामह .....येऊनि राहे नागपुरीं -ओवी २१ :-
श्रीरामचंद्र महाराज नागपूरकर हे श्रीगुरुपरंपरेनें श्रीपतिनाथांपासून चौथे पूर्वज आहेत म्हणून त्यांचा येथे प्रतितामह असा
यथार्थ उल्लेख आला आहे. मांसवंशांत वडील -आजोबा -पणजोबा -खापरपणजोबा अशा पिढया असतात तशा विद्यावंशांत
गुरु-परमगुरु - परमेष्ठि गुरु -परात्पर गुरु अशा पिढया मानल्या जातात. श्रीगुरुपौर्णिमेस या सर्वांचे स्मरण पूजन करावें
लागतें. नित्य तर्पण आहे शिवाय पुण्यतिथीरुपानें या पारमार्थिक पूर्वजांचे श्राध्द प्रत्येक शिष्यास करावें लागतें.
असो. २२,२३,२४, ओव्यांतून असें दिसतें कीं श्रीमहाराज परत नागपूरला येतांच त्यांचेवरील किटाळ दूर झालें ( पूर्वसंदर्भ
अ २ ) व भोसले सरकारनें त्यांना अधिकारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलें.   

(२) बोल केवळ कृपणधन ......इंदूसमान चवथीच्या ओवी २९ :- या ओवींतील प्रत्येक चरणांत श्रीमहादेव नाथांच्या
धर्मपत्नीच्या पातिव्रत्याचें आलंकारिक भाषेंत अर्थ गर्भ वर्णन केलें आहे ते ह्यद्य आहे. पहा चरण १) कंजूष मनुष्याचें द्र्व्य
पेटींत दडून राहाते. व्यवहारासाठीं बाहेर येत नाही त्याप्रमाणे ही सती मितभाषिणी होती हें ’ बोल केवल कृपणधन ’ या
शब्दांतून सुचविलें आहे. चरण २) परद्वीप जिये पर-सदन - स्मृतिग्रंथांतून जलपर्यटण, परदेशगमन हें निषिध्द मानलें
जात असे. हा बहिष्कार -पात्र असा गुन्हा मानीत असत. लोकमान्य टिळकांनाही विलायतेंतूण परतल्यावर प्रायश्चित्त
घ्यावे लागलें सारांश, इतरांची घरें परद्वीपासारखीं निषिध्द मानून महादेवनाथांची स्त्री कोणाच्याही घरीं जात नसे असा
ह्या चरणाचा गर्भितार्थ आहे. याचा आणखीही एक संभाव्य अर्थ आहे तो असा की महासती सीतादेवी परद्वीपांत म्हणजे
लंकेत राहिली तरी तिचें पतिचरणचिंतन अखंड चालू होते व तिचे पातिव्रत्य भंगले नाहीं त्याप्रमाणे दुसर्‍यांचीं घरें या
सतीला परद्वीपासारखी वाटत. अर्थात्‍ परगृही जाण्याचा प्रसंग आला तरी ही स्त्री तेथें अति शुचिर्भूत वागे. परिचिंतनांत
आवश्यक तें काम त्या करुन त्वरित घरीं येत. इतर बायकांसारख्या उखाळया पाखाळ्या करायला त्या दुसरीकडे
जात नसत. ३) अन्य पुरुषांचे वदन । इंदुसमान चवथीच्या -चवथीचा इंदु म्ह. श्रीगणेशचतुर्थीचा चंद्र. हा चंद्र आपण जसा
कधींहि पाहात नाहीं त्याप्रमाणे ही पतिव्रता परपुरुषांकडे केव्हांही पाहात नसे. असा एकून ओवीचा काव्यपूर्ण अभिप्राय आहे

(३) आतां तो सज्जन .....संपूर्ण ओवी -३५ :- या ओवींतीळ पदांचा अन्वय लावून व अध्याह्यत शब्द घेऊन अर्थ जास्त
स्पष्ट होतो तो असा: आतां अतो सज्जन (गुंडाख्य ) पाहूनि (मग) पदरजीं अनन्य होवोनि ( महादेव म्हणे ) जेणें दारूण
गांजिलें तें भवबंधन निरसावे.

(४) पहावया मैलार-भक्तवर निघाला -ओवी ७७ :- श्रीगुंडामहाराज देगलुरकरांचा कुळस्वामी श्रीखंडेराय मैलारचा खंडोबा आहे.
अद्यापीही त्यांचे वंशज प्रतिवर्षी मैलारक्षेत्रीं जातात अशी माहिती मिळते.

(५) त्या असूनिया धन .....लोकीं तीन दुर्मिळ -ओवी १०५ :- ही सबंध ओवी म्हणजे एक सुंदर सुभाषित आहे. अर्थ असा
कीं धन असून दानधर्माची आवड असणे, उपदेश करणे तो गोड शब्दांनीं व शूरपण असून वृत्ति क्षमाशील असणें हे योग
जगांत दुर्मिळ आहेत. असेंच एक संस्कृत सुभाषित आढळते: ’ दानं प्रियवाक‍सहितं ज्ञानमगर्व क्षमान्वितं शौर्यम्‍ ।
वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुष्टयं लोके ॥’

(६) अहो हा शाक्तांचा पंथ .....मूढीं केला कुपंथ-ओव्या १६९ ते १८२ :-
शेवटचा बाजीराव पंढरीस शिष्यभावानें श्रीगुंडामहाराजांकडे येण्यापूर्वी त्यानें निरनिराळया पंथाच्या दीक्षा घेतल्या होत्या
असें दिसतें. त्यापैकीं शाक्त पंथांतील कांहीं साधन प्रकारांचा खरा आध्यात्मिक अर्थ व मूर्ख लोक विषयलोभानें जो
बीभत्स अर्थ घेऊन साधना करतात त्या दोहींचेही वर्णन १८२ व्या ओवीपर्यंत आहे. हा सर्व तपशील म्हणजे थोडेसें
विषयान्तर वाटण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्राच्या भाग्यानें, सकलसंतवृंदाग्रणी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं भक्तीचा पायाच
इतका सात्विक व भक्कम घातला आहे की येथें वर्णिलेल्या शाक्तपंथीय साधनाकडे अगर मधुरभाव उपासनेच्या नांवाखाली
नैतिक भ्रष्टाचार ज्यांत चालतो अशा उपासनाप्रकाराकडे निदान महाराष्ट्रीय मनुष्य तरी ढुंकूनदेखील पाहात नव्हता व
आजही नाहीं. मराठी भाषेंत असलेला शाक्त म्ह. ’ छाकटा ’ हा शब्द उपहासव्यंजक आहे हें आपण जाणतो.

(७) ममाग्रज श्रीपति रामचरित बोलिला .....तेंचि सद्‍गुरु ’ कृष्णसुता ’ बोलवी- ओवी २१९ :-
या संपूर्ण ओवीचा अर्थ असा आहे कीं माझे थोरले बंधू -गुरुबंधु -श्रीपति यांनीं मागे अठरा अध्यायांपर्यंत रामचरित्र
सांगितलें. तेम्च रामचरित्र ( श्रीगुरुपरंपरेचीं चरित्रें ) सद्‍गुरु ( श्री तिकोटेकर महाराज ) आतां येथे ’ कृष्णसुत ’ नामक आपल्या
दुसर्‍या एका शिष्याकडून कौतुकानें वदवीत आहेत. ( अधिक खुलाशासाठी प्रस्तावना पहा )
कठिण शब्दाचे अर्थ: थिल्लर = डबकें; उपदेश बडिवार = उपदेशाचें सामर्थ्य; सहस्त्रशिर = हजार फण्यांचा शेष
(४) मज्जल्प= ( मत्‍+जल्प ) माझी बड्बड (७) वाव्हटलों = वाहवत गेलों (१४) मतिमांद्य = बुध्दीचा जडपणा
(१७) चिरानंद = अखंड आनंद (३६) तरणि = सूर्य (४४) वक्त = वेळ, प्रसंग (५०) येरु= दुसरा माणूस, समोरची दुसरी व्यक्ति
(५८) कीर= (प्राकृत) खरोखर, निःसंशय (६३) वचनिक = दिला शब्द पाळणारा (१२०) श्यालक =मेहुणा
(१२७) निजाप्तगति = स्वतःच्या नातलगांची स्थिति (१३०) वदान्य = उदार (१४७) मृगांक = हरणाचें चिन्ह ( ज्यावर आहे तो )
लक्षणेने चंद्र (१५९) असतिया = असलेल्या (१८२) सहोदर = एकाच गर्भातून आलेले ( सख्खे भाऊ ) (१८६)

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP