मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय तेरावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय तेरावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः
तुझे चरण स्मरण करितां । शंकर पावला निजात्मता । गोदावरीस दर्शन होता । ते वृध्द गंगा जाहली ॥१॥
तुलसी मंजिरी तुज आवडे । यास्तव सर्वाम्त मान्यता जोडे । तूं पाहशील पाषाणाकडे । तरी तेही होतील चिंतामणि ॥२॥
ऐसा तुझा अगाध महिमा । मज कैसा वर्णवेल रामा ? । तूं नरवीर पुरुषोत्तमा । नामा अनामातीत तूं ॥३॥
सत्यमार्ग सोडोनि जन । धांवो लागले आडरान । तयांसी उध्दरावयालागोन । अवतरणें तूंतें कलियुगीं ॥४॥
धर्मग्लानि होऊं पाहे । तेव्हा अवश्य मज येणे आहे । या वचना करावया साह्य । अवतार धरिला दयाळा ॥५॥
जये देशीं तुझा वास । अथवा जिकडे घडे प्रवास । तेथील पशु-पक्षी पाषाणांस । उध्दार तव दर्शनें ॥६॥
राजयोगमार्ग अतिसुलभ । असोनि, जना झाला दुर्लभ । तो जीर्णोध्दार करावया स्वयंभ । म्हणवोनि आदरिला साक्षेपीं ॥७॥
पतित-पावन ब्रीदावळी । ती साच करुनि दाविली । किती वर्णू राममाउली । सफळ कल्पवल्ली भाविकां ॥८॥
असो; पूर्व प्रकरणान्तीं । गोरख आले सिंहलद्वीपाप्रति । पुढील कथा श्रवणीं श्रोतीं । अत्यादर करावा ॥९॥
सिंहलद्वीपाचे सीमेवरी । राजनगर नामें नगरीं । तेथें जावोनि मारुति मंदिरीं । वास करिती गोरक्ष ॥१०॥
(१)म्हणती बंकनाथ देवा । सद्‍गुरु दर्शन लाभ व्हावा । तळमळ लागलीसे जीवा । शांत करी दयाळा ॥११॥
नाथसांप्रदायिक जनां । येऊं देऊं नये ऐसी आज्ञा । सीमारक्षक अवज्ञा । राजाज्ञेची न करिती ॥१२॥
ऐसे चिंताग्रस्त गोरख । तों तेचि स्थलीं पांथिक । वस्तीलागीं पातले देख । दश अवतारी नाटकी ॥१३॥
वेष पालटोनि परम । त्याचें मृदंगवादन काम -। स्वीकारुनि, सिंहलग्राम । देखोनि, सुखी जाहले ॥१४॥
मुख्य राणी पद्मिनीसी । सेवक सांगती अति विनयेंसी । म्हणती अन्यग्रामवासी । नाटयविलासी पातले ॥१५॥
श्रीमच्छेन्द्र आज्ञेकरुनी । पाचारिलें नाटयालागुनी । मच्छिन्द्र बैसले मुख्य स्थानीं । पद्मिणी रानीसमवेत ॥१६॥
स्त्रीसभा बैसली घनदाट । खेळ आरंभिला चोखट । तों मृदंगध्वनी स्पष्ट । विचित्र निघे ती ऐका ॥१७॥
’ चलो मच्छिंदर गोरख आया ’ । ऐसे शब्द ऐकोनियां । मच्छेंन्द्र लागती पाहावया । चहूंकडे विलोकोनी ॥१८॥
पद्मिनी बोलती विनीत वचन । काय होते अवलोकन ? । नाथ म्हणती गोरख येऊन । कोठें बैसला कळेना ॥१९॥
पद्मिनी म्हणे नाथासी । गोरखध्यास तुमचे मानसी । तोचि आठवे दिवसनिशीं । म्हणोनि आभासीं भासतो ॥२०॥
गोरख येईल कैशा रीती । म्हणे, तों मृदंग वादकावरती । नाथ दृष्टि पडतां निगुती । ’ बोलवा ’ म्हणती तयातें ॥२१॥
पाचारुनि आणिलें तयासी । नमन केलें साष्टांगेंसी । उचलोनि धरिला ह्र्दयासी । उकसाबुकसी स्फुंदत ॥२२॥
तें आनंदाचें पर्व । वर्णवेल कोणा सर्व ? । जेथें व्यासादिकांचे गर्व थक्कित होऊनि राहिले ॥२३॥
गुरुशिष्याचिये मिळणीं । ब्रह्मानंद वाहे पाणी । तेथें इतर सुखाची कहाणी । कोण करील क्षुल्लक ॥२४॥
चतुर्दश वर्षानंतरें । कौसल्या देखी रघुवीरें । ब्रह्माण्ड कोंदलें आनंदनिर्भरें । तैसेंचि जाहलें ये समयीं ॥२५॥
(२)कीं कच जावोनि काव्य-सदनीं । विद्या घेऊनि संजीवनी । भेटे बृहस्पतीलागोनि । तैसेचि जाहलें ये समयीं ॥२६॥
कंस आपटोनि मारिला । श्रीकृष्ण भेटे देवकीला । माता पितरा आनंद झाला । तैसेंचि जाहलें ये समयीं ॥२७॥
ज्या आनंदासी नाही जोडा । तेथें दृष्टान्त द्यावा तितुका थोडा । परंतु गोष्टी लागती गोडा । म्हणोनि विस्तारें वर्णिल्या ॥२८॥
पूर्णत्वासी पूर्ण । दृष्टान्त आणावा कोठून ? । जैसें गगनासमान गगन । सागरा सागर उपमेसी ॥२९॥
ह्र्दिस्थ रामें आज्ञापिलें । तें श्रोतया पाहिजे निवेदिले । जे जे पूर्वी दृष्टान्त लिहिले । ते एकदेशी भासती ॥३०॥
तरी मुख्य दृष्टांत हाचि एक । जे मुमुक्षु पावे आत्मसुख । तैसेचि येथें जाहले देख । जे आत्मी आत्मसुख ऐक्य झालें ॥३१॥
असो; ऐसा सुखसोहळा । भोगितां, कांही काळ गेला । तों एकान्त समय वेळां । देखोनि विनविती श्रीगुरुसी ॥३२॥
या स्थळीं जाहला बहु काळ । मुमुक्षु उध्दरिले सकळ । आतां पहावें अन्य स्थळ । ऐसें चित्तीं वाटते ॥३३॥
नाथ म्हणती गोरखासी । निरोप विचारी पद्मिनीसी । ऐकतां, गोरख राणीपासीं - । जावोनि; विनवी पद्मिनीतें ॥३४॥
बहुत काळ जाहला येथें । सद्‍गुरुसेवा घडली तुम्हांतें । आतां आनंदे राहुनि, आमुतें - । आज्ञा द्यावी जननीये ॥३५॥
तें वचन राणीस कैसें वाटलें । शत वज्रप्रहार एकदांचि झाले । की आकाश सर्व कोसळलें । एक समयीं आपणावरी ॥३६॥
म्हणेव गुरुबंधो दीनदयाळा । सोडोनि स्नेहाचा जिव्हाळा । न येतां भगिनीचा कळवळा । कैसे प्राण हरुं पाहसी ! ॥३७॥
अंत:प्राण श्रीगुरुमाउली । बहिःप्राण तुझी साउली । उभयतां जातां, निचेतन पडली । सहजेंचि काया ये स्थानीं ॥३८॥
ऐसी ऐकोनिया विनंति । गोरख विचार करी चित्तीं । म्हणती स्त्रीदेहाची बुंथी । अज्ञान दशा नावरे ॥३९॥
म्हणोनि मान्य केलें वचना । कांहीं काळ तये स्थाना । पावन करीत बहुत जनां । स्वस्थ चित्तें राहिले ॥४०॥
आधींच स्त्रीदेहाची जाति । वरी आश्वर्याची बुंथी । म्हणे गोरख जातां निश्चितीं । नाथ न जाती येथुनी ॥४१॥
अवमानिता गोरख जाण । सहजेंचि जाईल येथून । ऐसा विचार करी अपूर्ण । काय करी एके दिनी ॥४२॥
प्रिय पुत्र तो धर्मनाथ । तेणें करुनि शौच कृत्य । गुद-प्रक्षालना मातेसी प्रार्थीत । तें कृत्य सांगे गोरखासी ॥४३॥
गोरखें जाणोनि अंतरी । म्हणे संधी तों साधली बरी ! । धर्मनाथा उचलिलें सत्वरी । आज्ञापितां पद्मिनीनें ॥४४॥
निर्झरोदकासन्निध नेले । बाळ आपटूनि शुध्द केलें । अस्थि मांस त्वचा वेगळाले । वाळूं घातलें सूर्य किरणीं ॥४५॥
कांहीं स्वल्प काळ गेला । पद्मिनी पुसे गोरखाला । गोरख म्हणे " वाळूं घातला " । ऐकतां माता घाबरे ॥४६॥
पाहोनि पुत्राची विपरीत करणी । ह्र्दय पिटी पद्मिनी राणी । स्त्री देह केवळ अज्ञान खाणी । महिमा नेणोनि विसरली ॥४७॥
तिचा देखोनि परम आकांत । गोरखनाथ तिजसी म्हणत । मच्छेन्द्रा निरोप देशी सत्य । तरीच हा पुत्र उठेल ॥४८॥
ऐसें सांगितले जरी । तरी प्रभाव न जाणेचि नारी । मोहें झळंबली अंतरी । म्हणे धर्मनाथा दाखवीं ॥४९॥
तुम्ही सुखें करा गमन । माझा पुत्र द्या मजलागून । ऐसें घेऊन त्रिवार वचन । नवल केलें गोरक्षें ॥५०॥
येई बापा धर्मनाथा । शोक करिते तुझी माता । ऐशा वचनें पाचारितां । धुडधुडां धांवत ठाकला ॥५१॥
पाहोनियां पराक्रमा । विस्मय परम पावली रामा । म्हणे मी कैसी पावले भ्रमा । गुरुचरणांसी अंतरलें ॥५२॥
सांदीपन -स्त्रीनें गुरुदक्षिणा । पुत्र मागोनि, दवडिले कृष्णा । तैसी मज जाहली तृष्णा । ठकले ठकलें मायेनें ॥५३॥
ऐसा पश्चात्ताप पावोनि । दृढ लागली गोरखाचे चरणीं । अपराधाची क्षमा मागोनी । स्वस्थ चित्तें राहिली ॥५४॥
प्रजाजन सर्व आश्चर्य करिती । म्हणती धन्य धन्य साधुमूर्ति । मूर्तिमंत दैवत हेंचि निश्चिती । पाषाण पूजिती ते मूर्ख ॥५५॥
असो; गोरख म्हणे पद्मिनीसी । आता निरोप द्यावा आम्हांसी । पूर्वीच गुंतविली वचनासी । म्हणोनि ’ अवश्य ’ म्हणतले ॥५६॥
षोडशोपचारें श्रीगुरु पूजिला । तैसेंचि पूजिलें गोरखाला । मातें न वर्णवे तो सोहळा । प्रेमें आदरिला पद्मिनीनें ॥५७॥
मग वज्र वैडूर्य मणिका । पद्मरागादि सुवर्ण मुद्रिका । एकान्त साधुनि मच्छेन्द्रसखा । विनवोनि; अर्पिलोएं पदाब्जीं ॥५८॥
हांसोनि बोले मच्छेन्द्रनाथ । अर्थ संग्रहाचा स्वार्थ । पद्मिनी जाण तूं साच आनर्थ । आयाचित संचित फलदातें ॥५९॥
तियेचा मनोभंग न व्हावा । म्हणोनि अंगीकार केला बरवा । उभयता नाथ पुसोनि सर्वा निघते जाहले ते समयीं ॥६०॥
प्रजाजन सर्व घेऊनी । बोळवीत निघाली पद्मिनी । धर्मनाथासह मिठी चरणीं । क्षणोक्षणीं घालीतसे ॥६१॥
हस्तिनापुराहुनि द्वारकेसी । श्रीकृष्ण निघाले जिय दिवशीं । तेव्हां दु:ख जाहलें पांडव द्रौपदीसी । जन पुरवासी तळमळती ॥६२॥
तैसेंचि येथें जाहलें साचार । अश्रुंनीं पूर्ण सर्वांचे  नेत्र । जे ते वर्णिती नाथ चरित्र । म्हणती आम्ही अभागी ॥६३॥
लालगा वाद्यांचा गजर । नाथ आनंदें चालती सत्वर । एक योजन पर्यंत सर्वत्र । प्रजाजन पातले ॥६४॥
पाहोनियां वापी सुंदर । वटछायेसी राहिले स्थिर । म्हणती : परतोनि जावे सत्वर । बहुत दूर पातला ॥६५॥
राणी धांवोनि लागली चरणीं । म्हणे वियोग न साहे मजलागुनी । ऐकोनियां तिची वाणी । काय प्रतिवचनीं बोलती ॥६६॥
आम्ही येवोनि य स्थानीं । राहोनियां तुमचे सदनीं । अनुग्रह प्रसाद तुम्हालागोनी । जरी का झाला असेल ॥६७॥
तरी योगी नाहींच वियोग । आणि ये घडले नसेल चांग । ते मी आलोंच नाहीं; मग । खेद कासया तुम्हातें ? ॥६८॥
(३)जाणोनियां खुणेच्या गोष्टी । पद्मिनी जालही संतुष्टी । अनुभवी अर्थ घेती पोटीं । येरां दृष्टी टकमक ॥६९॥
असो; नाथ पुढे चालले । राणी प्रजाजन मागे परतले । चित्तीं धरोनियां पाउलें । आनंदे पावले आत्मसदन ॥७०॥
इकडे नाथ गोरख चालती । परीक्षार्थ नाथ पुसती । ह्यां कुछ डर है ऐसें म्हणती । गोरखातें क्षणोक्षणीं ॥७१॥
गोरखें ते वर्म जाणितलें । एके दिनी नाथ दिशेसी गेले । गोधडीसह द्रव्य पुरले । गांठोडें बांधलें तैसेचि ॥७२॥
पुन्हां मार्ग चालतां देख । म्हणती कुछ डर हैं गोरख । गोरखें उत्तर दिधलें सम्यक्‍ । म्हणती डर तो पीछे रहैं ॥७३॥
ऐकोनियां ऐसें वचन । नाथ गांठोडी पाहती सोडून । द्र्व्य कंथा न दिसतां जाण । म्हणती गोरखा काय केले ? ॥७४॥
मार्गी असावा कांहीं संचय । म्हणोनि केला हा उपाय । त्यासी तूं कां केला अपाय । म्हणौनि लौकिकार्थ बोलती ॥७५॥
जाणोनि श्रीगुरुचा अभिप्राय । काय करी गोरखराय । सन्निध एक पर्वत पाहे । जावोनि करी लघुशंका ॥७६॥
पर्वताचे जाहलें सुवर्ण । सद्‍गुरुसी विनवी कर जोडोन । म्हणे पहा हो पहा हो कांचन । आघवेंचि भासे श्रीगुरु ॥७७॥
पाहुनि तयाची पूर्णता । आनंद झाला श्रीगुरुनाथा । म्हणे पहावया तुझिया चित्ता । विंदान केले शिष्यराया ॥७८॥
आम्हांसी काय करणें सुवर्ण । आच्छादी हे सत्वर जाण । नाहीं तरी महाविघ्न । होईल; ज्या स्थलीं द्रव्य असे ॥७९॥
आज्ञा होतांचि, पूर्ववत । पाषाणमय झाला पर्वत । परी अद्यापपर्यंत तेथ । सुवर्ण मृत्तिका मिळताहे ॥८०॥
लाहोर ज्या उत्तरप्रांतीं । सन्निध पर्वत असे विख्याति । अद्यापि जनां येत प्रचीति । सुवर्ण मृत्तिका त्या स्थळींची ॥८१॥
पुढें नाथ लाहोरा गेले । तेथें अद्‍भुत कृत्य केलें । तें श्रोतीं पाहिजे परिसिले । पुढिलिये प्रकरणीं ॥८२॥
ते कथा परम नागर । अति रम्य मनोहर । ऐकतां श्रोतियांचे श्रोत्र । तृप्त श्रीगुरु करितील ॥८३॥
प्रकरण तेरावें अति सुरस । गोरख भेटले श्रीगुरुस । चरित दावोनि पद्मिनीस । सद्‍गुरु आणिले स्वदेशीं ॥८४॥
पुत्र अथवा माता पिता । कन्या आप्त स्नेही चुलता । प्रवासी सत्वर न भेटतां त्यानें हा अध्याय अनुष्ठावा ॥८५॥
वंदोनियां गोरक्ष मछिंद्र । मग करावे पाठांतर । भाव चित्ती धरितां, सत्वर । कार्यसिध्दि होईल ॥८६॥
कुटिल जन रोगग्रस्त । त्यासी गोदुग्ध तेंचि विष होत । भाविकासी विष होय अमृत । भावार्थे प्रचीत पहावी ॥८७॥
पंगूकरवीं मेरु-लंघन । कीं मुक्याकरवीं वाचाळपण । ज्याची कृपा करी ते चरण । सद्‍गुरुचे, शिरी माझ्या ॥८८॥
काय काय वर्णू गुण । ऊर्वी न पुरे करिता लेखण । मज न विसंबती एक क्षण । जैसी तान्हुल्या माउली ॥८९॥
त्रिकूटस्थ राम माउली । तीच ह्र्दयीं चित्कला प्रकटली । म्हणवोनि श्रीपति बोलिला बोली । नातरी हे जड काया ॥९०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव ।  भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाय रचिला हा ॥९१॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥

॥ अध्याय तेरावा संपूर्ण

टीपा - (१) बंकनाथदेवा -ओवी क्र. ११:-
नाथ संप्रदायांत श्रीहनुमंतास ’ बंकनाथ ’ ही संज्ञा असावी असें या उल्लेखावरुन दिसते.
(२) की कच जावोनि काव्यसदनीं - ओवी २६ :-
दीर्घ कालानंतार संजीवनी विद्या हस्तगत करुन कच ह बृहस्पतीला भेटला त्यावेळच्या आनंदाची उपमा येथें मच्छिंद्र गोरक्ष या गुरुशिष्यभेटीस दिली आहे.  ही उपमा मार्मिक आहे. काव्यसदन म्ह. कवीचें अर्थात ( दैत्यगुरु ) शुक्राचार्याचे घर. कवि म्ह. शुक्राचार्य. पहा : कवीनां उशना कवि: भ. गी. अ. १०.

(३) जाणोनियां खुणेच्या गोष्टी -ओवी ६८ व ६९ :-
नाथपंथाचा उपदेश अगदीं थोडक्यांत सांगायचा म्हणजे या पंथांत सद्‍गुरु हे शक्तिपातद्वारां, शिष्यांचा देहसीमित अह सोडून त्या अहंची जो स: म्हणजे आत्मरुपाशीं घालून देतात. हें जोडणें म्हणजेच योग ! प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणीं श्वासोच्छ्‍वासरुपानें हा स: + अहंचा योग जीवनांत निरंतर आहेच. त्याची जाणीव सद्‍गुरु करुन देतात. म्हणून येथें या
ओव्यांतून मच्छिंद्रनाथ पद्मिनीस सांगतात कीं तुला जो ज्ञानोपदेश केला त्यावरुन समज की, या योगांत वियोग कधीहीं घडत नाहीं. म्हणून देहदृष्टीने मी दूर चाललों तरी सोऽहं रुपानें मी सदैव तुजजवळ आहेच. हा बोध करण्यासाठींच मी तुझ्याकडे आलो होतों, राहिलों होतों. आतां असें पाहा की, जर ही योगीं नाहींच वियोग अशी जाणीव तुला राहात नसेल तर माझें या राज्यातलें आगमन, न येण्यांतच जमा आहे. मी आलोंच नाहीं; तर निघालो असा खेद वाटण्याचे काय कारण ? सारांश देहबुध्दीनें अगर आत्मबुध्दिनें विचार केल्यास खेदास जागा राहातच नाहीं . हा सर्व अभिप्राय राणीनें जाणला म्हणून कवि म्हणतो ’ पद्मिनी जाहली संतुष्टी ।’
कठिण शब्दांचे अर्थ :- नाटयविलासी = रामलीला करणारे, किंवा बहुरुपी (१५) एकदेशी = मर्यादित, अंशात्मक
(३०) रामा ( संस्कृत ) = स्त्री (५२) हया कुछ डर हैं = इथें कांहीतरी भय आहे (७१).

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP