मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय सत्ताविसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय सत्ताविसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसद्‍गुरु रामचंद्राय नमः ॥ धांव धांव सद्‍गुरु माउली । त्वरें करी कृपेची साउली । भवार्क तापें प्रतिपाउलीं । तनु झाली विकळ माझी ॥१॥
आधिभौतिक आधिदैविक । तिसरा तो आध्यात्मिक । या त्रिविध तापांचा संपर्क । अत्यंतिक मज बाधी ॥२॥
जो स्वप्नी जाजावला । तो जरी चेइरा जाहला । तरी संस्कारें संचरला । कंप राहिला तैसाचि ॥३॥
सर्प मानूनि रत्नहारा । जेणें भया दिधला थारा । तेणें करुनि सुविचारा । जरी सर्पाकारा नाशिलें ॥४॥
तरी पूर्वसंस्कारयोगें । अंग्गी भरला कंप न निघे । तैसे मज जाहलें; वेगें । धांवोनि ये गे माउली ॥५॥
बागुल भेणें बाळ भ्यालें । तें कीर साच नसे वहिलें । तरी बाळकभय जाया वडिलें । बागुल मारिले पाहिजे कीं ॥६॥
तैसी माया मुळीं नसे । परी जगदाकारें भरली दिसे । डोळा कामला आलिया जैसे । शुभ्र तें भासे पीतवर्ण ॥७॥
म्हणवोनि श्रीगुरु धन्वंतरी । धांवोनि येई गा झडकरी । कृपें ज्ञानांजन नेत्रीं भरी । शुध्द करी समदृष्टी ॥८॥
ऐसी ऐकोनियां करुणा । कृपें कळवळला सद्‍गुरुराणा । मागे टाकोनि गुरुडपवना । मनोवेगें धावतु ॥९॥
म्हणे स्थिरचर व्यापुनी । तूंचि भरलासी त्रिभुवनीं । शेखीं दशांगुलें उरोनी । मिथ्या उभवणी कां करिसी ? ॥१०॥
कैची माया कैचें भय । कोठोनि आणिलें द्वयाद्वय । सोऽहं मार्गे नीट जाय । जोंवरी लय होय नादाचा ॥११॥
नाद बिंदु कलातीत । तोचि तूं स्वयंप्रकाशवन्त । सद्‍गुरु पुत्र भयाभीत जाहला, हे मात न होय ॥१२॥
तुज आवडी गुरुस्तवनीं । यास्तव नसतीच उभवणी । करिसी; परि चरित्र श्रवणीं । श्रोते अनुदिनी उत्सुक ॥१३॥
म्हणवोनि सांडी इतरार्थी । शुध्द चालवी चरित्रग्रंथा । ऐसी श्रीगुरु आज्ञा होतां । ती म्यां माथा वंदिली ॥१४॥
तुम्ही श्रोते महानुभाव । मज देवोनि कथालाघव । मग श्रवणचा गौरव । तोही सावेव करा तुम्ही ॥१५॥
जैसी आपुलियाचि बाळका । लेववोनि अलंकारादिका । मग बैसवोनि सन्मुखा । माता सुखा पावतसे ॥१६॥
ते जें जें बोबडे बोले । तेंचि पुनः म्हणवी बळें । वेडेवाकडे; परी डोले । सुखसोहळे मानूनी ॥१७॥
तैसें तुम्ही श्रोतेसज्जन । काय वानूं तुमचें ज्ञान । केउतें माझे आरुष वचन । परि देऊनि सन्मान गौरवितां ॥१८॥
पूर्ण प्रकरणाचे शेवटीं ।रामकथेची आली गोठी । ती विस्तारीन गोमटी । श्रवणसंपुटीं साठवां ॥१९॥
नरहरीचें चरमापत्य । म्हणवोनि रामीं प्रीति अत्यंत । मातापितर आनंदभरित । सफलार्थ मानीत आपणा पैं ॥२०॥
ध्यानीं मनीं आघवा राम । जागृति स्वप्न सुषुप्ति धाम । इतुकें व्यापूनियां परम । राम आराम पितरांचा ॥२१॥
रामचंद्राचें श्रीमुख । पाहतां, पितरा दुणावे सुख । व्याधि दारिद्य आणि दुःख । दृष्टीसन्मुख न राहे ॥२२॥
बाळकाचे जन्म होतां । कुबुध्दि आणि कुतर्कवार्ता । ग्रामामधूनि जाय तत्त्वतां । वाढे ममता सत्कर्मी ॥२३॥
नरहरीची कांता । शुचिष्मंत पतिव्रता । पतिसेवेविण तत्त्वतां । अन्य पंथा न जाणे ॥२४॥
लक्ष्मी म्हणवोनि जियेचें नाम । तियेचे कुशीं जन्मले राम । जन्मभूमि चिंचणी ग्राम । पावन परम अवनीवरी ॥२५॥
द्वादश दिवस होतां नेम । अनाम्यासी ठेविती नाम । योगिजनांचा जो विश्राम । तोचि हा राम अवतरला ॥२६॥
शुक्लपक्षीं चंद्रकळा । दिवसेंदिवस होय सोज्वळा । तैसे मास-ऋतु वाढतां बाळा । सुख सोहळा पितरातें ॥२७॥
बाळपणींची लीला समग्र । वर्णितां, ग्रंथा होईल विस्तार । बोबडे बोलतां उच्चार । नाममंत्र राममुखीं ॥२८॥
इटी दांडू आणि लगोरी । खेळ बाळाचे नानापरी । ते राम कधी न अंगीकारी । अहोरात्रीं नामछंदू ॥२९॥
बाळका माय जेववितां । म्हणे मज सांगे वो रामकथा । तरीच ग्रास घेईन तत्त्वतां । ऐकोनि माता बहु हर्षे ॥३०॥
अवतारचरित्रें माता सांगे । तों तों बाळकाचें मन रंगे । ग्रासोग्रास जेवितां वेगें । म्हणे आणिक सांगे जननीये ॥३१॥
ऐसा बाळपणींचा छंद । किती वर्णील श्रीपति मंद । असो; राम आनंदकंद । पंचमाब्दाचा जाहला ॥३२॥
पित्यासी बाळ पढियंतें । म्हणे शिक्षक मारील यातें । यास्तव विद्याभ्यासातें । जाहले करविते स्वगृहीं ॥३३॥
संकेतमात्र दावी पिता । तों वेळ न लगे रामा घेतां । स्वल्पकाळामाजीं वाचितां । आणि लिहितां रामासी ये ॥३४॥
पूर्ण होतां सप्तमाब्द । आठवे वर्षी व्रतबंध । सोहळा करुनि सुबध्द । पढविती वेद यथाविधि ॥३५॥
संदीपनीगृहीं श्रीकृष्ण । कीं वसिष्ठासी राम शरण । रिघे; तैसें राम आपण । शास्त्राध्ययन आरंभी ॥३६॥
आत्माराम नामें दीक्षित । चिंचणी ग्रामामाजीं विख्यात । धार्मिक आणि शुचिष्मंत । आवडे वेदान्त सदा जया ॥३७॥
त्यांसी शरण जावोनियां । म्हणती दीनावरी दया । करावी जी श्रीगुरुराया । शरण पायां मी असे ॥३८॥  
अल्पवयामाजीं लीनता । पाहूनि, गुरुचे आनंद चित्ता । म्हणती सुखेनैव आतां । जाणे वेदान्ता मजपाशीं ॥३९॥
शास्त्राध्ययनाचें मिष । परी वेदान्त श्रवणाचा हव्यास । दीक्षितगृही रात्रंदिवस । छंद सर्वदा तोचि असे ॥४०॥
आधींच आवड रामापोटीं । त्यावरी सन्मुखें ऐकिल्या गोठी । कीं नरजन्म लाधलियापाठीं । प्रपंचीं हिंपुटी कां व्हावें ? ॥४१॥
चौर्‍यांशी लक्ष जीवनयोनीं । ज्या ज्या जन्मा जाय प्राणी । तेथें प्रपंच कडसणी । पृष्ठीं वाहिनी असेंचि ॥४२॥
आहार निद्रा भय मैथुन । हें पश्वादिकांसी समान । मानवजन्मीं भगवद‍भजन । मार्गे ज्ञान संपादावें ॥४३॥
हेंचि मुख्य असे सार । ऐसा रामें दृढ विचार । करोनि, भागवतधर्माचार । करी विस्तार पूर्णपणें ॥४४॥
नावडे प्रापंचिक गोष्टी । नावडे प्रवृत्ति राहाटी । कैं कृपा करील जगजेठी । पायीं मिठी घालीन मी ॥४५॥
ऐसा लागला असे छंद । मेळवोनि अर्भकांचा वृंद । त्यांसी म्हणे म्हणा गोविंद । हाचि आनंद खेळ खेळूं ॥४६॥
भिंतीस कोनाडा करुनी । त्यांत देवाची मूर्ती स्थापुनी । समवयी अर्भकें मेळवुनी । कीर्तन भजनें खेळती ॥४७॥
उपमन्यु ध्रुव कीं प्रल्हाद । यांसी बाळपणीं लागला छंद । तैसाचि रामासी आनंद । राम गोविंद भजनाचा ॥४८॥
योगभ्रष्ट जन्मासी येतां । पौर्वदेहिक बुध्दि तत्त्वतां । प्रकटोनि लावितसे सत्पथा । ऐसी गीता सांगतसे ॥४९॥
तैसीच रामचंद्राची स्थिति । आवडे मनीं भगवद्‍भक्ति । माता पिता पितृव्याप्रति । गोष्टी पुसती परमार्थु ॥५०॥
सुभूमिके उत्तम बोल । होतां, बीजाची पाही वेळ । तैसें राममन अतिचंचळ । झालें उतावेळ उपदेशा ॥५१॥
आत्माराम दीक्षितांच्या । संगती वेदान्त इतिहासाच्या । कथा श्रवण केल्या साच्या । त्या राममनीं दृढ ठेल्या ॥५२॥
एकें दिवशीं सुवेळ पाहूनि । राम पित्यासी करी विनवणी । म्हणे महाराज भवतरणीं । काय करणी करावीं ? ॥५३॥
ऐकोनि पुत्रमुखींचे बोल । पिता स्वजन्म मानी सफल । म्हणे मम भाग्या समतोल । ब्रह्माण्डगोल कीं नसेचि ॥५४॥
याचेनि माझा वंश पावन । याचेनि मी धन्य धन्य । काय माझें पूर्वपुण्य । ऐसें रत्न प्राप्त मज ॥५५॥
ऐसा मानोनि आनंद । मग पुत्रासी करिती बोध । जये मार्गे साधुवृन्द । ब्रह्मपद पावले ॥५६॥
मंत्रराज द्वादशाक्षरी । विष्णु उपासना निर्धारी । मानसपूजा राजोपचारी । यथाप्रकारी सांगती ॥५७॥
मानसपूजा जप ध्यान । यांतचि राम सदा निमग्न । वडिलांचाही लोभ पूर्ण । समागमेंचि वागविती ॥५८॥
राजकार्यासी पिता जाई । तेव्हां रामा न ठेविती गृहीं । अत्यंत पढियंते पाही । यास्तव नेई समागमें ॥५९॥
समयोचित भाषण ऐकोनी । राजा आनंद पावे मनीं । कांही वेतन बाळपणीं । दिधलें करोनि, संतोषें ॥६०॥
राम गृहकार्या न ये कामा । काळ घालवितो रिकामा । यास्तव वडील बंधूंनीं रामा । विभक्त धामामाजीं केलें ॥६१॥
देवगृह बंधुकडे जातां । रामा स्थान न मिळे एकान्ता । ग्रामाबाहेर शोधूं जातां । विशेष साह्यता मिळाली ॥६२॥
निर्झर वाहे मनोहर । तेथें श्रीउत्तरेश्वर । स्थान असे परमपवित्र । पाहतां नेत्र संतोषती ॥६३॥
तेथें एकान्ती बैसोनी । मानसपूजा जपध्यानीं । काळ सारिती विष्णु -चिंतनीं । प्रेम मनीं दुणावे ॥६४॥
ग्रामी पांडूरंग देवालयीं । तिसरे प्रहराचिये समयीं । समवयीं मुलें मिळवूनि पाही । कीर्तनीं गाई हरिगुण ॥६५॥
बुध्दिबळ, गंजिफा पगडी । इकडे रामा नसे गोडी । छंद काय तो घडोघडी । अवडी कीर्तन भजनाची ॥६६॥
(१)नानासाहेब चिंचणीकर । ईशसत्ते पावले परत्र । षोडश वर्षे वय साचार । तैं रामचंद्र असती ॥६७॥
त्यांचे कुटुंब वेल्हाळा । अन्नपूर्णा नामें सुशीला । रामचंद्र लेखनीं कुशल । पाहोनि ’ पागेंत ’ वोपिती ॥६८॥
ज्यासी सद्‍वासना होय । त्यासी श्रीहरि होतो सहाय । पुराणें ऐकावी हा होय । हेतु अन्नपूर्णाबाईसी ॥६९॥
नेमिली सेवा संपादुनी । राम बैसे पुराणश्रवणीं । नाना इतिहास बोध ऐकोनी । राम मनीं संतोषें ॥७०॥
आधींच अनुतापें तापला । त्यावरी स्वामी वियोग जाहला । जगीं सभ्याचार बुडाला । म्हणवोनि कंटाळला संसारा ॥७१॥
पारी पितृभति विशेष । तया त्यजितां; महादोष ! । म्हणवोनि राम पितृसेवेस । रात्रंदिवस तत्पर ॥७२॥
वडिलीं घेवोनि चतुर्थाश्रम । स्वल्प काळें पावले विराम । अन्नपूर्णाबाईही परंधाम । त्यास समयीं पावली ॥७३॥
प्रपंची राम न घाली मन । बंधू विभक्त झाले म्हणवोन । रामा वाटलें समाधान । पाशमोचन झालों म्हणें ॥७४॥
करवीर क्षेत्र दक्षिण काशी । तेथें येती तडी तापसी । तैसेचि कुटुंब निर्वाहासी वृत्ति थोडीशी असे तेथें ॥७५॥
(२)ऐसा ग्रामीं विचार केला । सहकुटुंब करवीरीं आला । दिवसा पाहोनि गलबला । रात्री भजनाला नेमली ॥७६॥
साधुसंत आणि बैरागी । तडी तापसी हठयोगी । पाहतां, राम जाजोनि वेगीं । सेवा निजांगें करी त्यांची ॥७७॥
पुसवी परमार्थाची खूण । कोणी सांगती मुद्रासन । कोणी सिध्दलक्ष्मी पूजन । बीज यंत्रासह सांगती ॥७८॥
कोणी विठ्ठ्ल उपासमा । कोणी मंत्र सांगती नाना । परी समाधानाच्य खुणा । राम मना न येती ॥७९॥
ठेवणें ठेविलें वित्त । तें चुकता तळमळे चित्त । तेवीं राम योगभ्रष्ट विख्यात । खूण शोधीत आपुलीई ॥८०॥
पुन्हां आले चिंचणीपुरीं । धरिली पंढरीची वारी । म्हणती तये क्षेत्रीं तरी । सिध्द निर्धारीं भेटेल ॥८१॥
तों चिंचणी ग्रामाधिपति । दाजी ऐसिया नामें विख्याति । जयासी गंगाबाई घेती । दत्तक; वृत्तिरक्षणार्थ ॥८२॥
नाना नामें चिंचणीकर । पटवर्धनामाजीं कीर्ति थोर । तयांचे द्वितीय कलत्र । गंगाबाई असे पैं ॥८३॥
त्या पदाधिकारियांनीं । रामाची सुकीर्ति ऐकोनि । आदरें सत्कार करुनी । सन्निधानीं ठेविती ॥८४॥
दत्तकमाता गंगाबाई । पुत्रासी सांगे लवलाही । रामा आश्रयीं ठेवीं पाहीं । तरी मग नव्हे तुज उणें ॥८५॥
दाजी म्हणती रामराया । तुमची वडिलीं करोनि दया । चालविलें राजकार्या । तशीच माया ठेवा जी ॥८६॥
रामा नलगे राजभोग । भोग तोचि वाटॆ रोग । परी देह प्रारब्ध भोग । आदरिल्या विराग; सुटेना ! ॥८७॥
वडिलांचे वेळचे बृध्दवृध्द । तिहीं रामा केला बोध । म्हणती टाकोनि कामक्रोध । कार्य सुबध्द चालवी ॥८८॥
चालवितां राजकारण । त्यांतचि घडे परमार्थ पूर्ण । परोपकारीं ठेवी मन । राजसन्मान स्वीकारी ॥८९॥
सर्वांचा आग्रह पाहोनी । राम विचार करी मनीं । प्रारब्ध भोगिल्यावांचोनि । सुटका जनीं नसेचि ॥९०॥
ऐसा करोनि विचार । स्वीकारी राज्यकारभार । रायें विश्वास ठेवूनि थोर । सर्व कारभार सोंपविला ॥९१॥
चालवितां राजकारण । रामा न वाटे समाधान । तथापि न पडों देतां न्यून । यथाविधीनें चालविती ॥९२॥
कार्यापुरतें राजकारण । उरल्या अवसरीं भगवदभजन । दोन महिने वर्षातून । निरोप घेऊन विचरत ॥९३॥
जावे तीर्थक्षेत्रामाजीं । राहावे साधूंचे समाजीं । म्हणे कैं इच्छा पुरेल माझी । सद्‍गुरु या जी म्हणेन मी ॥९४॥
नेम भरातांचि सत्वर । पुन्हां यावे कामावर । नित्यवाची गुरुचरित्र । पाहे साचार ज्ञानेश्वरी ॥९५॥
घेतले दाजीस दत्तक पुत्र । त्या गंगाबाई पावल्या परत्र । दाजी जाहले स्वतंत्र । आवडे शृंगार तयासी ॥९६॥
ज्याचा जैस स्वभाव । तया तैसाचि मिळे समुदाव । विषयीं वेधे दाजीचा जीव । तेंचि वैभव विषयीं जनीं ॥९७॥
तों तो विटे रामाचें मन । कदाही न वाटे समाधान । म्हणे समागमें घे दुर्जन । तो यजमान नको मज ॥९८॥
परी आरंभिलें कार्य । सिध्दीस पावविती आर्य । ऐसें धरोनियां धैर्य । राजकार्य चालविती ॥९९॥
रामा अंगीं तारुण्य पूर्ण । आणि विषयासक्त यजमान । विषयसंगति रात्रंदिन । परी याचें मन नव्हे संसक्त ॥१००॥
तारुण्य आणि विषय संगति । असतां, जे शुध्दमति । विषयामाजीं लिप्त न होती । ते त्रिजगतीं धन्यतम ॥१०१॥
श्रीशुक की राजा जनक । प्राप्त होतांही विषयसुख । न चळों देती सुविवेक । राम देख तैसा वर्ते ॥१०२॥
दोष-मलिन जनांचें मन । अन्तर्निष्ठ राम नेणोन । विपरीत बोलताती वर्तन । राम महिमान न जाणतां ॥१०३॥
सांगलीचे राज्याधिपति । ’ चिंतामणि ’ नामें असती । कीं कुरुंदवाडाधिपति । ’ रघुनाथ ’ नामें विख्यात ॥१०४॥
ऐसे जे सुविचारी । ते मात्र जाणती निर्धारी । कीं राम हा पापभीत भारी । दुःसंग करी काय त्यातें ? ॥१०५॥
जळीं असोनि पद्मपत्र । जळा न स्पर्शे अणुमात्र । तैसेंचि साधूचें चरित्र । संग अपवित्र न बाधी ॥१०६॥
असो; रामा आवडी मोठी । सद्‍गुरुची व्हावी भेटी । जनकासी भाष्य दिधले शेवटीं । तेंही पोटी स्मरतसे ॥१०७॥
जया आपुले मनोरथ । पूर्ण व्हावे ऐसा हेत । त्यानें गाणगापूर पंथ । अति त्वरित धरावा ॥१०८॥
प्रवेशतां गाणगापुरीं । हेतु पूर्ण श्रीगुरु करी । ऐसें वाचितां गुरुचरित्रीं । रामा अंतरीं पूर्ण भरलें ॥१०९॥
काय पित्यासी दिधलें भाष्य । पुढें काय करी कार्यास । तें कथानक अति सुरस । श्रोते सावकाश परिसावे ॥११०॥
ते कथा परम नागर । पुढिलिये प्रकरणीं विस्तार । करीन म्हणतो; जी, पामर । शिरीं कर ठेवाल जरी ॥१११॥
नातरी श्रीपति मतिमंद । हें जाणती आबालवृध्द । ह्रदयीं वसोनि सुबध्द । ग्रंथसंवाद चालविसी ॥११२॥
हातीं घेवोनि लेखणी । मूळ ग्रंथ पुढें ठेवोनि । स्वमतें कष्टतां दिनयामिनीं । ग्रंथरचनीं न चाले ॥११३॥
पुन्हां करितां तुझें स्मरण । धरिसी दासाचा अभिमान । प्रसुप्त वाचेतें चेववून । ग्रंथीं सौजन्य आणिसी ॥११४॥
मी तंव दुर्गुणाची राशी । परी क्षणही तूं न विसंबिसी । माया माउली तव गुणासी । सदयतेसी किती वानूं ? ॥११५॥
अंगीकारिल्यासाठीं । माझ्या अपराधांच्या कोटी । माउली तूं घालिसी पोटी । होसी कष्टी मजलागीं ॥११६॥
काय काय स्मरुं उपकार । किती वानूं वारंवार । माये तुझे चरणीं शिर । ठेवितां; परत्र पावो हा ॥११७॥
नाहीं संध्या नाही स्नान । नाहीं केलें देवतार्चन । एकादशी व्रत उपोषण । तेंही जाण न करी मी ॥११८॥
ऐसा मी परम अपवित्र । परी तुझा म्हणवितो किंकर । शिरीं पाद्त्राणधर । हा आधार भवतरणीं ॥११९॥
रायाचा परिजन होता । तयाची रायासी पडे चिंता । मग स्वयें का कष्ट आतां ? । चरणीं माथा ठेवितसे ॥१२०॥
हो स्वगुणांचें स्मरण । ग्रंथीं विस्तार झाला पूर्ण । तो क्षमा करोनि आपण । द्यावे अवथान मजलागीं ॥१२१॥
तुम्ही धन्य धन्य श्रोते । तुमचेनि मज केलें सरतें । ह्र्दयीं वसोनि श्रीगुरुनाथें । केले पुरतें मनोरथ ॥१२२॥
धृतराष्ट्रासी युध्दकथा । सांगावयासी, त्रिकालज्ञाता । संजया करावे तत्त्वतां । व्यासचित्ता मानलें ॥१२३॥
तैसें तुम्हां श्रोतयासाठीं । ह्र्दयीं वसोनि धूर्जटी । किमपि न करितां कष्टी । ग्रंथ कोटी चालविती ॥१२४॥
पितापुत्राचा संवाद । पुढिले प्रकरणीं विशद । करीन; होवोनि सावध । श्रोते सन्निध या तुम्ही ॥१२५॥
पिता पुत्र संवाद मिष । करोनि वोतेल ब्रह्मरस । तो कथाभाग अतिसुरस । श्रोते सावकाश सेवोत ॥१२६॥
ब्रह्मानंदा श्रीपतिवरा । त्रिकुटस्था श्रीरामचंद्रा । चरणीं देवोनियां थारा । तारा तारा मायबापा ॥१२७॥
श्रीपति मतिमंद केवळ । परी तुझें पोसणें बाळ । असतां; सेवे वेळोवेळ । चुके; हळहळ हेंचि वाटे ॥१२८॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१२९॥
श्रीराम चंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय सत्ताविसावा संपूर्ण ॥

टीपाः (१) नानासाहेब चिंचणीकर । ईशसत्ते पावले परत्र । ओवी ६७ :-
६६ व्या ओवीपर्यंत श्रीरामचंद्र महाराजांचें बालवयांतले चरित्रकथन चालूं असतां लगेच हा अगदी वेगळा नामोल्लेख येतो.
यांचा संदर्भ पुढील १०६ ओव्यापर्यंत आहे. त्यांतील जरूर तेवढा तपशील देत आहोत. श्रीनानासाहेब हे पटवर्धन होत.
चिंचणी गांवचे हे जहागिरदार. [ छोटेसे संस्थानिक म्हणाना ! ] श्रीमहाराजांचे वडील यांचेकडे नोकरीस होते. हे वरल्यानंतर
त्यांच्या ( जहागिरदारांच्या ) पत्नी अन्नपूर्णाबाई यांनीं श्रीमहाराजांसही आपल्या नोकरींत ठेवलें. पुढें महाराजांच्या वडिलांनीं संन्यास घेतला व अन्नपूर्णाबाई पण मृत्यु पावल्या. नानांचे दुसरे कुटुंब गंगाबाई यांनीं दाजी ’ नामक एका व्यक्तीस दत्तक घेतले. दाजीसाहेबांनीं महाराजाची वाडवडलापासूनाची नोकरी स्मरुन त्यांना पदरीं ठेवले व दिवाणासारखें मोठें महत्त्वाचें काम सोपविलें दाजींचा स्वभाव विलासी होता. दत्तक मातोश्री गंगाबाई मरण पावतांच हे अगदीच स्वतंत्र व स्वच्छंदी झाले. असल्या धन्याची चाकरी करतांना आणि त्यांचें संगतींत चारित्र्य सांभाळतांना श्रीमहाराजांस फार
उद्विग्नता येत असे. तरी देखील चिंचणी गांग व नोकरी त्यांनी सोडली नाहीं त्याचें कारण पुढील टीपेंत दिलें आहे.
विलासी धन्यामुळें लोक महाराजांवरही शिंतोडे उडवीत असत. सांगली व कुरुंदवाडचे अधिपति मात्र श्रीमहाराजांचें शुध्द चारित्र्य जाणून होते.

(२) ऐसा विचार ग्रामी केला । सहकुटुंब करवीरी आला । ओवी ७६ :-
श्रीमहाराज परम पितृभक्त होते. नानासाहेब चिंचणीकर वारल्यानंतर ’ जगीं सभ्याचार बुडाला ’ असें वातावरण जहागिरीत
त्यांना अनुभवास येऊं लागले. चिंचणी सोडून तपश्चर्येसाठी, सद्‍गुरुप्राप्तीसाठीं तीर्थक्षेत्रीं जावे अशी त्यांना प्रबळ इच्छा होती परंतु संन्यासी वडिलांची फार भक्ति असल्यानें ते तसेच पितृसेवा करीत राहिले. वडील ब्रह्मीभूत झाले, बंधूही विभक्त झाले आणि मग मात्र महाराज साधुसमागमासाठीं दक्षिण काशी-कोल्हापुरला आले. तेथें त्यांची थोडीफार जमीन वगैरे होती.

कठिण शब्दाचे अर्थ :- जाजावणें = घाबरणें, संत्रस्त होणें (३) कामला = कावीळ (७) चरमापत्य =[ चरम +अपत्य ] शेवटचें
मूल, शेंडेफळ (२०) पंचमाब्द = पांच वर्षे (३२) पढियंते = आवडते (३३) पौर्वदेहिक = पूर्व जन्मार्जित (४९) पितृव्य = चुलता
(५०) परत्र पावणें = मृत्यु पावणें (६७) पाशमोचन + फांसातून [ बंधनांतून ] सुटका (७४)

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP