TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय पंधरावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय पंधरावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


अध्याय पंधरावा
श्रीगणेशाय नम : ॥
श्रीगुरुचरणीं ठेवोनि भाळ । पुढें कथा रस रसाळ । जे ऐकातां, श्रोत्रकमळ । श्रोतयांचे तोषवी ॥१॥
माध्याह्माचे समयासी । मच्छेन्द्र पातले जयपुरासी । दयासागरा तेजोराशि । काय गोरखासी बोलती ॥२॥
बा रे तूं श्रमलासी बहुत । भिक्षार्थ न फिरे गांवांत । आम्ही जाऊनियां सत्य । भिक्षा आणिल्तं आजिची ॥३॥
करद्वय जोडूनियां ते काळीं । गोरख लागती चरणकमळीं । म्हणती दयाळे गुरुमाउली । मीच जाईन भिक्षाटणा ॥४॥
आम्हासी तुजे दास्य करितां । श्रमबाधेची नाहीं वार्ता । तुष्टी पुष्टि वाढे तत्त्वतां । चरण सेवितां सर्व सुख ॥५॥
दश वरुषें सेवेविण । स्वामी मज जाहलें उपोषण । आतां तरी रात्रंदिन । सेवा घडो अनालस ॥६॥
त्यांतही सांप्रतीचे जन । सत्य मार्ग न जाणोन । दांभिकासी गेले भुलोन । मुष्टीही अन्न न देती ॥७॥
(१)नाथ म्हणती गोरखालागुन । सहज मिळे तें दुग्धासमान । मागून घेणे होय जीवन । त्रासून घेणें अशुध्द रे ॥८॥
यास्तव मी जाईन भिक्षेसी । दाता अदाता समान आम्हाम्सी । ऐसें ऐकोनियां वचनासी । स्वस्थ चित्तेंसी राहिले ॥९॥
नाथ गेले ग्रामाभीतरीं । तो तेथील धर्मरीति ऐशापरी कीं एक प्रहर दिन आलियावरी । भिक्षा कोणासी घालूं नये ॥१०॥
सारा गांव नाथ फिरले । किंचिन्मात्र अन्न न मिळे । तो एका शूद्र स्त्रियेस देखिलें । अन्न घेतलें शिरीं बहु ॥११॥
शेता जाता होती नारी । तीस नाथ म्हणती अवधारी । हा शेवटला सवाल तुजवरी । दोन भाकरी द्या आम्हां ॥१२॥
ती म्हणे अर्धी भाकर देतें । नाथ म्हणती ऐक पतिव्रते । कैलासपति ज्या सुखातें । भोगी; तें सुख देईन ॥१३॥
तीस बहुत आला क्रोध । म्हणे मंगल-कार्य आलें सन्निध । मम पुत्राच विवाहसंबंध । सोहळे विविध पाहीन मी ॥१४॥
कैलासास जावयाचा समय । येईल, तेव्हां न चले उपाय । ऐसें रागें भरोनि ती जाय । अभागिया काय चिंतामणि ! ॥१५॥
एक प्रहर राहिला दिन । नाथ बाजारांत आले जाण । माळवे विकीत बैसली माळीण । तीस गाजरें दोन मागितली ॥१६॥
ती न देतां नाथ बोलले । बाई जें सुख स्वर्गी न मिळे । तें तुज देईन वेल्हाळे । गाजरें आम्हां देई तूं ॥१७॥
ती म्हणे जिवंत माणसालागीं । स्वर्गसुख दावणार हा ढोंगी । कोणी भिक्षा न द्यावी यालागीं । ऐसं सांगे सर्वांसी ॥१८॥
(२)सारा बाजार फिरोन थकले । परी कोणी कांहीं नाही दिलें । नाथांसी परम आश्चर्य वाटलें । परतोनि निघालें स्वस्थळासी ॥१९॥
खरें तत्त्व जाहलें कुडें । दांभिक परमार्थ आला पुढें । खोटयापाठीं खरें दडे । काय परवडे काळाचे ॥२०॥
पंचाग्नि की धूम्रपान । जटाधारी की नग्न, मौन । एक फिरती ऊर्ध्व हस्त करुन । तयांसी जन मानिती बहु ॥२१॥
कर्णपिशाच्च भगमालिनी । उच्छिष्ट चांडाळी मातंगिनी । सद्यःप्रचीत जनांलागुनी । येतां, म्हणती सिध्द मोठे ॥२२॥
सिध्दाईची काय कथा । पामर जन न जाणती वार्ता । जन भुलले मायिक स्वार्था । खर्‍या परमार्था कोण पुसे ? ॥२३॥
नाथ स्वस्थळासी येउनी । वृत्त सांगती गोरखालागुनी । गोरख बोलती हास्यवदनी । पूर्वीच विनवणी केली म्यां ॥२४॥
नाथ म्हणती पिऊनि जळ । आजिचा ऐसा काढूं वेळ । जैसें देह प्राक्तनाचें बळ । तैसाचि काळ वर्तवी ॥२५॥
ऐसे बोलोनियां वचन । करोनियां शुध्दाचमन । (३)प्रणव सह सकारातें वोढून । समाधिनिमग्न नाथ जाहले ॥२६॥
इकडे गोरख बाहेर येउनी । विचार करिती आपुले मनीं । म्हणती भिक्षासमय गेला टळोनी । कैसी करणी करावी ? ॥२७॥
जन भुलले दांभिक भावा । न जाणति आत्मराणिवा । कांहीं चमत्कार करुं बरवा । जेणें सर्व जीवा नवलावो ॥२८॥
ऐसा करोनियां विचार । बाजारांत आले सत्वर । कडासना म्हणती ’ ज्या बे उप्पर ’ । म्हणतां कडासन ऊर्ध्व गेले ॥२९॥
आपण त्यावरी अंतरिक्ष बैसती । खालून लोक जाती येती । येका माळिणीची गजर वरती । झाली सरती गोरक्षाकडे ॥३०॥
तिनें सांगितलें सर्वांसी । महंत पहा मोठा तापसी । जो अंतरिक्ष बैसोनि, जपासी । करीत आहे निरपेक्ष ॥३१॥
नाहीं तरी एक बावा वाटसरू । गाजरेमाग्या पोटभरुं । आतांचि आला होता भिकारु । तेणे मागून जर्जर केलें सर्वा ॥३२॥
तैसे नोहें हा महंत । निरपेक्ष योगी परम शाम्त । अंतरिक्ष आसन तिष्ठत । जयाच्या तपप्रभावें ॥३३॥
ऐसा कळतां समाचार । जनसमूह जमला फार । जो तो म्हणे आम्हां सत्वर । दर्शन घडो महंताचें ॥३४॥
रिक्त हस्तें कोणी न जाती । पेरु केळें नारळ नेती । खारीक सुपारी नसे गणती । मेवा मिठाई फळादी ॥३५॥
(४)तिकडे महंत नुघडी दृष्टी । जनस्तुतीसी होतसे वृष्टि । मक्कर करुनि खावी सृष्टी । घृत शर्करेसमवेत ॥३६॥
सव्वा हात मिति प्रमाण । रुद्राक्षमाळा हातीं घेऊन । महंत करिती जपानुष्ठान । मौन मुद्रा धरोनियां ॥३७॥
ऐसी कीर्ति सर्वाठायीं । बाजार तेथेंचि भरला पाहीं । राजासी श्रुत जाहले लवलाही । अनवाणी पायीं तो आला ॥३८॥
करोनियां साष्टांग नमन । उभा राहिला कर जोडून । म्हणे मौनव्रत असेल जाण । तरी विसर्जन करावे ॥३९॥
सहस्त्र अथवा अधिकोत्तरी । जो नियम झाला असेल निर्धारी । तो पूर्ण या स्थळी करी । ब्राह्मण संतर्पण करोनियां ॥४०॥
सामुग्री पुरवीन यथासांग । कांहीं न पडों देताम व्यंग । परी दयासागरा आमुचा त्याग । करोनि; न जावें येथुनी ॥४१॥
या स्थळीं करोनियां मठ । स्वस्थ राहावें, न करितां खटपट । वृत्ति करोनि देतो उद्‍भट । कांहीं तूट न पडेसी ॥४२॥
ऐसी बहुत केली विनवणी । गोरख न पाहे नेत्र उघडोनि । तों तों कीर्ति वाढली जनीं । श्रेष्ठ दर्शना धांवती ॥४३॥
शास्त्री पंडित महानुभाव । वैदिक शास्त्री वारकरी सर्व । भट भिक्षुक सोडूनि गर्व । म्हणती पर्व आलें खरें ॥४४॥
जटाधारी मौनव्रती । पंचाग्निसाधनी ऊर्ध्वहस्ती । धांवोनि आले त्वरितगति । दर्शनें म्हणती धन्य होऊं ॥४५॥
महंत दर्शना न होय वारी । मुंडप घसणी होतसे द्वारी । वृध्द तरूण बाळ. ब्रह्मचारी । दर्शना येती पतिव्रता ॥४६॥
सकाम निष्काम आत्माराम । सर्वांसी दर्शनीं उत्कंठा परम । जैसे श्रीहरि मंगलधाम । तैसेंचि भक्तोत्तम सर्वांसी ॥४७॥
कोणी साष्टांग करिती नमन । कोणी प्रदक्षिणा कोणी वंदन । अशक्त अबला दुरुनि दर्शन । घेऊनि, पावन जाहलों म्हणती ॥४८॥
संस्कृत प्राकृत व्यावहारिक । नामघोषें विनविती अनेक । परी गोरख प्रत्युत्तर एक । कोणासि कांहीं न देती ॥४९॥
एक एक मुहुर्तपर्यंत । जनचर्चा जाहली अद्‍भुत । म्हणती हे शुक की श्रीगुरुदत्त । की न कळे साक्षात शंकर हे ॥५०॥
गोरक्ष मनीं विचार करी । या स्थळाहूनि निराहारी । श्रीगुरु जातां; जन भिकारि । होतील सर्व अन्नहीन ॥५१॥
म्हणोनि केला चमत्कार । कासया पाहिजे जोजार ? । उघडोनि पाहती नेत्र । तों आसनापर्यंत उपायनें ॥५२॥
गोरखासी नवल वाटले । म्हणे साक्षात‍ परब्रह्म आलें । त्यासी कोणी नाहीं वोळखिलें । आतां भुलले चमत्कारा ॥५३॥
मिथ्या मायेचा पसारा । त्यांत जन भुलोन गेला सारा । तारी तारी श्रीगुरुवरा । म्हणोनि जप पुरा करिताती ॥५४॥
कडासन घेऊनि कांखेसी । गोर्ख निघाले गुरुदर्शनासी । उपायनांच्या घेवोनि राशी । जन त्यागूनि निघाले ॥५५॥
गोरख येऊन लागले चरणां । तो उपायनांचे पदार्थ नाना । ठेवितां, भरलें देवालय जाणा । श्रीगुरुराणा पुसतसे ॥५६॥
म्हणती वत्सा हे काय केलें ? । नगरवासीं जनां लुटिलें । कीं राज्यागाराहूनि आणिलें । कैसें केलें कवतुक ? ॥५७॥
गोरख सांगे नम्र वचनी । अनपेक्षित आलें धांवोनी । परपीडा कासया जी जनीं । करणें आम्हां सद्‍गुरो ! ॥५८॥
मच्छेंन्दे अंतरी जाणितलें । चमत्कार करुन जन भुलविले । किंचित्‍ हास्य वदन केलें । मग आज्ञापिलें गोरखासी ॥५९॥
शेष ठेवोनि किंचित्‍ मात्र । प्रसाद वांटिला सर्वत्र । ऐसें जनां दावूनि चरित्र । राहिले स्थिर स्वस्थानी ॥६०॥
प्रसाव घेऊनि जन सकळ । पावले आपुलाले स्थळ । नाथ गोरख राहिले निश्वळ । घेऊनि फलाहार, निजशेजे ॥६१॥
असो; ब्राह्म मुहुर्ती तत्त्वतां । नाथ निघाले उभयतां । पावन करीत जना समस्तां । अवनीवरी विचरती ॥६२॥
ऐसें नाथाचें चरित्र । एक एक लिहितां अणुमात्र । सप्तसमुद्र मषी -पात्र । ऊर्वी -पत्र न पुरेचि ॥६३॥
विष्णु अवतार पूर्ण मच्छिंद्र । त्यांचे कोणा वर्णवेल चरित्र ? । शक्त्यनुसार वर्णूनि, वक्त्र । आपुलें पवित्र करावें जी ॥६४॥
न कळोनि निराळाचा अंत । पक्षी क्रमिती जैसा पंथ । गरुडापासूनि मशकापर्यंत । तेवीच वर्णन हे माझें ॥६५॥
व्यासादिकांच्या कुंठित मती । तेथें इतरांचा पाड किती ? उगीच ग्रंथी नांव श्रीपति । चरित्र चालविती ज्याचें ते ॥६६॥
ते चित्कला नसतां शरीरीं । जड तनू पडेल क्षणाभीतरीं । कैचा श्रीपति पुरुष ना नारी । ग्रंत्थ श्रीगुरु करी हेंचि सत्त्य ॥६७॥
जयदेव पद्मावती-रमण । त्यांनीं केलें असे वर्णन । मूळ-मायोपाधि ईश्वर जाण । अवतार पूर्ण मच्छेन्द्र जो ॥६८॥
आतां पुढील कथानक । बोलेल श्रीगुरु रघुनायक । ह्रदिस्थ राहोनि माझे सम्यक । देईल तोख श्रोतयांसी ॥६९॥
नाथ बैसतील अखंड योगा । विस्मयो होईल सर्व जगा । शोभवितील मच्छेन्द्र -नगा । तेंचि महाभागा अवधारा ॥७०॥
गोरखें मात्र दावूनि जना । श्रीगुरु पदार्थ दीधले नाना । सेवोनि तोषला श्रीगुरुराणा । देत आशीर्वचना आनंदें ॥७१॥
जो ही कथा श्रवण करी । अथवा पठणीं आवडी धरी । अन्नपूर्णा त्याचे घरीं । वास निरंतर करील ॥७२॥
श्रीगुरुराम बैसोनि त्रिकूटीं । शब्द बोलवित वाक-पुटी । त्याचे चरण ह्रदय-संपुटीं । सांठवूनि मिठी घालीन मी ॥७३॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भगगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥७४॥
श्रीरामचंद्रार्पण्समस्तु ॥ ॐ तत्सत् सोऽहं हंस: ॥

॥ अध्याय पंधरावा संपूर्ण ॥

टीपा (१) सहज मिळे तें दुग्धासमान -ओवी ८ :-
सबंध ओवीत एक सुंदर सुभाषित आहे. प्रारब्धवशात्‍ कोणतीही गोष्ट सहजीं मिळतें तो दुधासारखा गोड योग होय.
याचनेने मिळतें तें पाण्यासारखे व परपीडेनें मिळविलेलें मात्र ’ अशुध्द ’ म्ह. रक्तशोषणच होय ! ’ सहज मिले सो दूध ’
इं एक हिंदी दोहा याच अर्थी आहे.
(२) परी कोणी कांही नाहीं दिलें - ओ. १९:- भाकरीच्या व गाजराच्य्दा मोबदल्यांत श्रीमच्छींद्रनाथ कैलासलोकाचा व स्वर्ग-लोकाचा
लाभ करुन द्यावयास तयार असूनही कोणी त्यांना पदार्थ दिले नाहींत याचा अर्थ खरें पारमार्थिक सुख फारच थोडया
जीवांना हवे असतें. सदरच्या संपूर्ण हकीकतीत हास्यरसाचे तुषार उडवून श्रीपतीनीं अनेक उद्‍बोधक मुद्दे सांगितले आहेत.
आजही राजापासून रंकापर्यंत बहुजन समाज, चमत्कार करणार्‍या साधूमागे धांवतो हें आपण पाहतों.
(३) प्रनवसह ’ स ’ कारातें वोढून - ओवी २६:- या उल्लेखांत जी प्रक्रिया नमूद केली आहे ती आजही पांवस येथें श्रीस्वामीजवळ
समजावून घेतां येते.
(४) मक्कर करुनि खात्री सृष्टी । घृतशर्करेसमवेत -ओवी ३६ :-
मगर ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्याचे वेळीं किनार्‍याव्र येऊन डोळे झांकून शांत पडते व भक्ष्य तावडींत सांपडतांच कच्च गिळंकृत करते त्याप्रमाणे ढोंगी साधू जपतपाचा आव आणून सृष्टीला भुलवतात.
समोर मेवामिठाई , पक्वान्ने, तूपसाखर येऊन पडलीई कीं त्या तूपसाखरेसहित - या भोळ्या लोकांना नादीं लावून - त्यांच्या
घरादाराचा ग्रास करतात ! असें या ओवी चरणाचें स्पष्टीकरण संभवते.
कठिण शब्दांचे अर्थ : अशुध्द =रक्त (८) परवड=दैना, शोचनीय स्थिति (२०) ’ ज्या बे उप्पर ’ = अरे वर जा बेटया ’
(२९) वृत्ति करुन देणें = मठास किंवा देवस्थानास वर्षासन करुन देणे, जमीन वगैरे देणें
(४२) मुंडणघसणी =डोक्याला डोकें घासणे, अतोनात गर्दी असा लाक्षणिक अर्थ
(४६) उपायनें = अर्पण केलेले जिन्नस
(५२) मषीपात्र= काजळाचें भांडें (येथें काळ्या शाईची दौत )
(६३) निराळ = आकाश;  मशक= चिलट, घुंगुरटें. (६५)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-25T19:00:26.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

word-by-word reading

 • शब्दश वाचन 
RANDOM WORD

Did you know?

वादाने तत्वज्ञान समजावले जाते का? किती प्रकारचे वाद आहेत?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.