TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय पंचवीसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय पंचवीसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


अध्याय पंचवीसावा
श्रीगणेशाय नम : ॥
नमो आद्या । ॐ नमो स्वसंवेद्या । नमो सकल देववद्या । सद्‍गुरु स्वामी तारका ॥१॥
श्रवणेंद्रियीं करुनि पेरणी । ब्रह्मरसाची मूस वोतोनि । तात्काळ दाखविली नयनी । अगाध करणी तुमची जी ॥२॥
स्वामी तुमचिये कृपें । अवघड मार्ग होती सोपे । सप्तचक्र सप्तद्वीपें । वेंघोनि थोपे निजरुपीं ॥३॥
चहुं वाणी चारी खाणी । चौर्‍यांशी लक्ष जीवयोनी । इतुकिया तूं कृपादानी । सबाह्य व्यापुनी निराळा ॥४॥
प्राणापानाची कडसणी । अधोर्ध्व वाहे दिनयामिनीं । अर्ध स्वरुपोन्मुखगामिनी । अर्ध बुडवणी जीवासी ॥५॥
जे शुध्दसत्त्वें आथिले । तेंचि श्रीकृष्ण बोल अति अवघड । वरं नेणोनिया; मूढ । वाक्‍ बडबड करिताती ॥७॥
प्राणापानाची समता । करुनि अपानु प्राणे वोढितां । ऊर्ध्वगामी होय तत्त्वतां । हा शुध्दसत्त्वस्थां मार्ग खरा ॥८॥
यया वर्मा न जाणतां । गिरिगव्हरें धुंडितां । नाना साधनीं कष्टता । फल तत्त्वतां न पावती ॥९॥
घरीं असोनि बहु धन । नेणोनि; फिरे रानोरान । श्रम करोनि सांची कण । ऐसे बहुजन भुलले ॥१०॥
एक श्वासीं लोकत्रयाचें । मोल वेंचोनि जाय साचें । ऐसे वचन बहु साधूंचे । विवरण त्याचें न करिती ॥११॥
दह अंगुलें वायु । जो जिणोनि करी जयु । तोचि गुरुकृपेचा उदयु । आनंदसमयु जाणावा ॥१२॥
हे सत्यचि सांचिलें धन । जो यत्नें न करी जतन । तो हतदैव; नागवे पूर्ण । योगसाधन त्या कैचें ? ॥१३॥
तैसें देवें मनुष्यजन्मीचें । आयुष्य -धन दिधलें साचें । तें प्रतिक्षणीं वेंचे । विचार कोणी न करिती ॥१४॥
आयुष्य सरतां जाय प्राण । प्राण म्हणजे वायूच पूर्ण । शरीरीं वायु असतां जाण । हानि प्राण न पवेचि ॥१५॥
वायु आणि प्राण । ही नांवें मात्र भिन्न । येर्‍हवीं यांत दुजेपण । तिळप्रमाण नाहीं कीं ॥१६॥
एकवीस सहस्त्र सहाशत । नित्य अजपेचा जप होत । साठ घटिका नियमित । अहो-रात्र म्हणती त्या ॥१७॥
शबलद्वारें जो रेचक पूरक । या नांव अजपेचा जप एक । ऐसे एकवीस सहस्त्र सहा शतक । अहो-रात्र होतसे ॥१८॥
याचि मानें मास, ऋतु । अयन संवत्सर -परियंतु । आयुष्य गणनेचा अंतु । याचि मानें जाणावा ॥१९॥
जरी शबलातें न सांडितां । शध्दांशें प्राणापानसमता । करुनियां राहे तत्त्वतां । तैं ते सार्थकता न वदवे ॥२०॥
त्याचे आयुष्याची गणना । विरंचीसही न होय जाणा । तो स्वेच्छाचारी; किंबहुना । मायोपाधि ईश्वरचि ॥२१॥
प्राणापानाची समता करी । ऊर्ध्व चिदाकाशाभीतरीं । जो निःशक मार्ग धरी । तोचि परपारी पावला ॥२२॥
सकल शास्त्राचा मथितार्थ । कीं हाचि राजयोगपंथ । गीतेमाजीं षष्ठाध्यायांत । हेंचि कृष्णनाथ बोलिले ॥२३॥
अर्जुना हें दिसे अवघड । परि अभ्यासितां सौघड । अंतःकरण करुनि दृढ । सावकाश अभ्यासिजे ॥२४॥
जेवी नवोढा पतिव्रता । प्रथम पतिशेजे रिघतां । परमदुःख मानी तत्त्वतां । मग तये त्यजितां बहु क्लेश ॥२५॥
तैसाचि राजयोगाभ्यास । पूर्ण न जाणतां, साधकास । प्रथम वाटे महाआयास । मग आनंदास पार नाहीं ॥२६॥
ऐसा राजयोगमहिमा । वर्णिता वेद पावले उपरमा । अहा तो योग दयाळा रामा । सुगम आम्हां केला तुवां ॥२७॥
जग उध्दरवयासाठीं । तुज अवताराची राहाटी । नातरी येवढी आटाआटी । पाठीपोटीं कोण वाहे ? ॥२८॥
श्रीआदिनाथापासूनी । परमगुरु महादेवमुनि । पर्यंत कथा ह्र्दयीं वसोनि । श्रीस्वामीनीं वदविल्या ॥२९॥
आतां श्रोतयांचा हेत । ज्यापासूनि आम्ही कृतार्थ । जाहलों; त्याची कथा साद्यन्त । श्रवणपुटांत भरी का ॥३०॥
जये वंशी अवतार । धरी सद्‍गुरु रामचंद्र । त्या वंशाचा विस्तार । यथानुक्रमें वर्णीं का ॥३१॥
तैसेच श्रीमहादेवमुनि । पासुनी कृतार्थ होऊनि । शिष्यसंप्रदाय वाढवुनी । कॊन कोण जनीं उध्दरिले ॥३२॥
तें साद्यन्त चरित्र । ऐकावया आमुचे श्रोत्र । बहुतृषित; पानपात्र । करी वक्त्र त्वरित तुझें ॥३३॥
ऐसा श्रोतयांचा मनोरथ । पुरविता तूं श्रीगुरुनाथ । येर्‍हवीं श्रीपति किं पदार्थ । हा ग्रंथार्थ वर्णावया ? ॥३४॥
ग्रंथ लिहून सिध्द करिसी । शेवटीं श्रीपतीचे नांव लिहिसी । तूं माउली कृपाराशि । महिमा वाढविशी बाळकाचा ॥३५॥
जें जें बाळकासी कोड । तें तें मातेसी बहु गोड । आपण बांधूनियां होड । करी जोड तयाची ॥३६॥
महानुभाव श्रोतेसज्जन । तुझे चरित्राचा प्रश्न । मज करिती याचा अभिमान । तुजसी जाण दयाळा ॥३७॥
नातरी तुझी कथा समुद्र । असंभाव्य विस्तीर्ण थोर । त्यांत स्वबुध्दी पोहणार । काय पार पावेन मी ? ॥३८॥
तरी तुमचें कृपादान । हेंचि अनन्या मज जीवन । देवेंचि तारक होऊन । मज अवधान द्यावें जी ॥३९॥
ऐसी विनवणी ऐकोनी । कृपेनें द्रवले मोक्षदानी । ना भी ना भी म्हणवोनि । अभय वरदानी गौरविलें ॥४०॥
म्हणती स्तवन पुरे करी । ग्रंथी चालवी वैखरी । कैस चढेन त्रिकुट शिखरीं । हें गुरुपुत्रीं न चिंतावें ॥४१॥
तुझ्या रोमरोमरंध्री । व्यापूनि सबाह्याभ्यंतरी । वत्सा राहिलों निर्धारी । ग्रंथ विस्तारी त्वरेंसी ॥४२॥
स्मरोनि पीठिका साद्यन्त । लेखनीं आरंभावा ग्रंथ । ज्याचा तो सिध्दीन पाववीत । आपण श्रांत कां व्हावें ? ॥४३॥
ऐसी आज्ञा होतांचि जाण । संचलें संगीत चरिताख्यान । तैसेचि बोल वदनांतून । निघे तें लेखण करीतसे ॥४४॥
श्रीमत्‍ सद्‍गुरु रामाचें । तुम्हीं चरित्र पुशिलें साचें । तेंचि ऐकावे; दैवाचे । भाग्य तुमचें उदेलें ॥४५॥
त्याची एकेक चरित्रकथा । साद्यन्त वर्णी ऐसा वक्ता । संपूर्ण ऊर्वीतळ शोधितां । ठायीं पडतां बहु कष्ट ॥४६॥
तथापि त्याचेचि दयेंकरुन । यथामति करीन कथन । ऐकतांचि पापविपिन । होय दहन क्षणार्धे ॥४७॥
दंडकारण्यामाझारीं । विख्यांत ’ पुण्यनाम ’ नगरी । त्यापासोनि सार्ध योजनावरी । केळवड नामें ग्राम एक ॥४८॥
तेथें काकाजी म्हणवूनि । उपनाम ’ कागदे ’ विख्यात जनीं । तो मूळपुरुष महामणि । राम सद्‍गुरुचा जाणावा ॥४९॥
जैसे गंगेचें मूळ स्थान । पुण्यपवित्र परमपाव्न । त्या स्थळीचें स्वल्पही जीवन । करी पावन जगत्रया ॥५०॥
तैसेंचि काकाजी पुरुष विख्यात । सर्वजनीं मान्यता बहुत । ऋग्वेदी ब्राह्मण गृहस्थ । लेखन विद्येंत परिपूर्ण ॥५१॥
जैसा बळीचा प्रह्लाद पूर्वज । कीं ’ श्रीरामचंद्राचा ’ अज । तैसेंचि राम सद्‍गुरुचें बीज । मूळ पुरुष तो होय ॥५२॥
ज्याचा वंश परम पावन । ज्याचे वंशीं राम चिद्रत्न । अवतरले; तो वंश सांगेन । नामनिर्देश यथामति ॥५३॥
काकाजीस चौघे पुत्र । कान्हो, हनुमंत, कमळाकर । चौथा ’ भीम नामा पवित्र । जन्मले साचार कुलतारुं ॥५४॥
तयामाजिला हनुमंत नाम । त्याचे वंशी सद्‍गुरु राम । जन्मला माझा परिपूर्णकाम । जगदाराम भवतारुं ॥५५॥
तयाची वर्णावया लीला । संकेतें हे पूर्वजमाला । हनुमंताचे उदरीं विठ्ठला । जन्म जाहला महीं ये ॥५६॥
तेथूनियां तयाचे उदरीं । जन्म अवधारा ’ नरहरी ’ । तया पूताचे जठरकुहरीं । जगदुध्दारी मम तात ॥५७॥
आतां त्या नरहरीचें चरित्र । पुढिलिये प्रकरणीं करुं विस्तार । जो सद्‍गुरुचे माहेर । महिमा अपार जयाचा ॥५८॥
श्रीसद्‍गुरु राम तरणि । त्यांचे पूर्वजांचा या प्रकरणीं । नामनिर्देश वर्णनीं । श्रीपति वाणी पवित्र करी ॥५९॥
धन्य धन्य तुम्ही श्रोते । तुमचेनि अवधानें मातें । नातरी मज मतिमंदातें । कोण सरते करी पुढें ? ॥६०॥
नीच रायातें प्रीति पात्र । त्यावरी धरिती सर्व छत्र । तेवीं मी लडिवाळ तुमचा किंकर । पादत्राणधरु संतांचा ॥६१॥
आपुलिया लोभास्तव । मज देत असा गौरव । परी ग्रंथकथनी वैभव । स्वयमेव तुमचें जी ॥६२॥
सद्‍गुरुस्तुति बहु करावी । ऐसी आवड उठते जीवी । तरणि-प्रकाश सर्वत्र मिरवी । परी अंध काव कें वाणी ? ॥६३॥
तैसा केउता मी पामर । आणि तयाचे स्तुतीचा पडिभर । करीन म्हणतों जी साचार । हेंचि अज्ञानत्व माझें ॥६४॥
श्रीसद्‍गुरु राम चिद्‍घना । मी शिरीं पादत्राणा । वाहोनि करितों विज्ञापना । कृपाघना कनवाळा ॥६५॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥६६॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय पंचविसावा संपूर्ण ॥

टीप- (१) अर्ध स्वरुपोन्मुख गामिनी । अर्ध बुडवणी जीवासी - ओवी ५ ::-
आपल्या शरीरांत एकच प्राणशक्ति पांच मुख्य व पांच उपप्राण अशी दशधा झालेली आहे. या पंचप्राणांची व उपप्राणांची व स्थानें ईशसात्तेनें देहामध्ये ठरलेली आहेत.  या ओवींत प्राण अपान या वायुंचा उल्लेख आहे व त्यापैकी अर्ध म्हणजे प्राण हा जीवात्म्याला स्वरुपसाक्षात्काराकडे घेऊन जातो व अर्ध म्हणजे अपान हा जीवाला [ जन्ममरणरुपी समुद्रांत ] बुडवून टाकतो असा येथें कां निर्देश केला आहे तें थोडक्यांत पाहूं षट्‍चक्रापैकी नाभीखाली मूलाधार व स्वाधिष्ठान ही दोन चक्रें आहेत. गुदस्थानीं असलेल्या आधारचक्राचीं चार दलें आहेत. या चार दलांत ’ व, श, ष, स ’ ही बीजें आहेत. पैकीं ’ व ’ दलापासून विषयोपभोगास चालना मिळते. या दलांतील शक्ति चार असून त्या गुदयोनी यासारख्या गुप्त इंद्रियांना जीवन देतात. या मूलाधाराचक्राच्या ठिकाणीं अपान वायूचें भ्रमण आहे. तसेंच त्यावरील स्वाधिष्ठान चक्र उपस्थ इंद्रियाच्या ठिकाणी वसत आहे. अपानुवायु याच्या आश्रयानें राहतो. धनंजय नांवाचा उपप्राणही येथें असतों या दोन चक्रावरची जी मणिपूर व अनाहत चक्रें आहेत ती वरील ओवीच्या संदर्भात फार महत्त्वाची आहेत. अपान वायुवर ताबा मिळवला म्हणजे तो ऊर्ध्वगत करुन वर चढवितां येतो व पुढील मणिपूर चक्रावर प्राण व अपान यांचें ऐक्य स्थापन करतां येतें. पंचप्राणापैकी समान वायु मणिपूर चक्रावर असतो. पुढें ह्र्दयस्थानांतील अनाहत चक्राशीं प्राण दाला कीं मन व प्राण यांचे ऐक्य होते. प्राणवायु येथेंच असतो. हाच पुढे विशुध्द चक्रावरुन भ्रूमध्यांतील आज्ञाचक्रावर जातो. नंतर सहस्त्रदलकमलांत प्रवेश करतो. या अत्यंत संक्षित्प वर्णनावरुन हें दिसून येईल कीं पांच मुख्य प्राणांपैकीं अपानवायु हा जीवास रतिसुखाकडे प्रवृत्त करुन जन्म-जन्मान्तरें भोगावयास लावतो ( पण तो जर प्राणाशी संयुक्त केला तर पुढें ऊर्ध्वगामी होतो. ) आणि प्राणवायु हा सहस्त्रदलकमलाकडे जात असल्यानें स्वरुपसाक्षात्कार करवून जीवाला बुडवत नाही तर वांचवितो. अधिक जिज्ञासु वाचकांनीं, योगपर उपनिषदें, हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता वगैरे प्राचीन ग्रंथ व कै. श्री. म. वैद्य यांची प्राणवोपासना, षट्‍चक्रभेदन इ. पुस्तकें पाहावीत.

(२) ऊर्ध्व चिदाकाशाभीतरी । निशंक मार्ग धरी..... तो परपारी पावला- ओवी २२ :-
जन्ममरणरुपी अखंड परंपरेला ’ भवसागर ’ असे पुष्कळ ठिकाणीं म्हटलेलें आढळते. या सागराच्या पलीकडे जाण्यासाठीं
जीवानें काय प्रयत्न केला पाहिजे याचा या ओवींत उल्लेख आहे. हा जीवात्मा या सागरांत मुळांत सांपडतो कसा याचें  
वेदान्तशास्त्रांत व योगशास्त्रांत वर्णन आहे. वेदान्त सांगतो कीं या संसारसागररुपी महादुःखाला अज्ञानजन्य भेदभ्रम हें
मूळ आहे. स्वरुपाचे अज्ञान- विपरीत ज्ञान किंवा भेद्ज्ञान - अनुकूल प्रतिकूल बुध्दि - रागद्वेष (कामक्रोध) - धर्माधर्म (पापपुण्य़)
देहप्राप्ति अशी ही साखळि आहे व उलट गेले म्हणजे ही एकमेकांचि कारणें आहेत. असो. याचें अधिक स्पष्टीकरण येथें
शक्य नाही. या भवसिंधूच्या परपार जाण्यासाठी प्राणापानाची समता करुन ऊर्ध्व चिदाकाशाकडे मार्ग धरण्याची काय
अवश्यकता आहे त्याचा योगशास्त्रीय खुलासा असा कीं गर्भामध्ये या देहाची सर्व इंद्रिये, त्यांच्या देवता व अधिष्ठान यासह
तयार झाल्यावर जीवचैतन्यरुपी प्राण मस्तकाची टाळू फोडून आंत प्रवेश करतो व नंतर तो खाली जात सर्व
शरीरांतील अणुपरमाणु व्यापून टाकतो असें ऐतरेय उपनिषदांत सांगितलें आहे. मुलाची टाळू पुढें बंद होते. प्राणाची गति
वरून खालीं या मार्गाने झाली आणि म्हणून त्याच मार्गानें खालून प्राणशक्ति एकवटून ती पुनःवर, सरळ आलेल्या
मार्गानें चिदाकाशांत नेणें हें ’ पैलपार ’ जाण्यासाठीं अत्यंत आवश्यक ठरतें. सर्वांत ऊर्ध्व असें हें शेवटचें अभ्यासाचें
स्थान आहे.
वरील विवेचनावरुन एक गोष्ट सर्वसामान्य वाचकांच्या व या संप्रदायांतील अनुग्रहीतांच्या लक्षांत येईल कीं प्रस्तुत पोथीत
जागोजाग आलेले सोऽहं जपाचे उल्लेख हा केवळ काल्पनाविलास नव्हे अगर नुसती बौध्दिक घोकंपट्टीही नव्हे !
येथील २३ व्या ओवींत सांगितल्याप्रमाणीं श्रीमदभगवद‍गीतेचें प्रामाण्य असलेला हा ’ सकलशास्त्रांचा मथितार्थ ’ असा
राजयोग पंथ आहे. महान्‍ भगवद्‍भक्त, नामस्मरणाचा अट्टाहास धरणार्‍या श्रीतुकारम महाराजांच्या अभंगांतुन ’ मी वासुदेव तत्त्वता । कळो येईल विचारिता ’ अशा सारखें ’ सोऽहं च्या बौध्दिक चिंतनाचे उल्लेख आहेत. तसेंच ’ ऊर्ध्वमुखें आळविला सोऽहं शब्दाचा नाद ’ यासारखें राजयोगाच्या अभ्यासाचेही निर्देश आहेत. ’ नुसतें सोऽहं सोऽहं करुन काय होणार ? ’
अहंब्रह्मास्मि हा सुध्दां भ्रमच आहे ’ असे गैरसमजुतीवर आधारलेले विचार, या पोथींतून दिल्या जाणार्‍या टीपांतून जाणत्या
मंडळीनीं, तपासून घेणे योग्य होईल. श्रीज्ञानेश्वरमहाराज, श्रीएकनाथ, श्रीतुकाराम महाराज, इ. साधुसंतांना परम श्रध्दास्थानें
मानणार्‍या भाविकांना या सर्व संतांच्या वाड्‍.मयांतून सोऽहंभाव उपासनेचे स्पष्ट अगर सूचक उल्लेख जागोजाग आढळतील.
प्रस्तुत पोथींतील गुरुशिष्यपरंपरा तर खुद्द श्रीज्ञानदेवांपासूनच पुनःअव्याहत चालूं राहिली आहे. या उपासनेंत गुरुभक्ति,
वेदान्तचिंतन व ’ बळिये इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजे गगना । मिळोंचि लागे ॥ ’ या
ओवींतील योग या तिन्हींचा अपूर्व त्रिवेणी संगम आहे.

(३) उपनाम ’ कागदे ’ विख्यात जनी- ओवी ४९ :-
श्रीरामचंद्रमहाराजांचे अगदीं मूळ आडनांव ’ कागदे ’ हे होते. पुढें त्यांना कुरुंदवाडकरांनी घोडयाच्या पागेचे अधिकारी म्हणून नेमल्यानें लोक त्यांना ’ पागे ’ म्हणू लागले आणि विजापूरजवळ तिकोटे येथें शेवटी वास्तव्य व विजापूरांत महासमाधि झाल्यानें त्यांची प्रसिध्दी अखेर ’ तिकोटेकर महाराज ’ अशी झाली. [ महाराजांचे विद्यमान वंशज ’ पागे ’ हेंच उपनांव लावतात. ]

कठिण शब्दांचे अर्थ - कडसणी = सूक्ष्म विचार, किंवा येथील अर्थ गुंतवणूक (५) सांचि (क्रि) = सांचवितो (१०) सौघ्ड=सोपें, सुलभ
(२४) पानपात्र = पाणी अगर पेय पदार्थ वाढण्याचें भांडे (३३) वक्त्र = तोंड (३३) होड बांधणें = पैज घेणें
(३६) ऊर्वीतळ = पृथ्वीप्रदेश (४६) तरणि प्रकाश = सूर्यप्रकाश (६३)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-03-03T18:59:02.0170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

leptocaulous

  • Bot. अपृथुअक्षी, अपृथुअक्ष- 
RANDOM WORD

Did you know?

In Hinduism, are women and men treated as equals?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.