मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय अठरावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय अठरावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
नमो एकाक्षरा रामा । घनानंदा पूर्णकामा । पदत्रयाचिया विश्रामधामा । मेघश्यामा श्रीगुरो ॥१॥
अच्युतानंत तुझी पदें । तीं म्यां वर्णावी मतिमंदें । तरी तूं अंतरीं दायाम्बुधें । वसोनि, पुरवावी आळी माझी ॥२॥
योगमूर्ति योगिनाथा । साकारलासी आमुचे हिता । तरी तूं होवोनि श्रोता वक्ता । आळी ह्रदिस्था पुरवावी ॥३॥
श्रोतें बैसले महा-जन तव कथार्णवीं होवोनि मीन । कीं तूं कथामृताचा घन । वर्षोनि श्रवण निवविसी ॥४॥
राघवा तुमचे पायवणी । सेवितां, अहं सोऽहं मिळणी । मिळोनि; द्वैताची कांचणी । गेली तुटोनी अनन्याचि ॥५॥
ऐसिया निजमाये तव पदी । लोळणी लोळोनि; उदरामधीं । रिघालों आनंदाचे आदि । ते ठायीं त्रिशुध्दि पहुडलों ॥६॥
इतुकेनि झालें माझें कार्य । आतां तूंचि पिता तूंचि माय । तरी उभय स्नेह प्रेमपर्याय । वाढविणें आहे तुतेंचि ॥७॥
आतां मागिले अध्यायान्ती । (१)रामें विनविलें श्रीगुरुप्रति । गमो कर्णधार मायावर्ती । धावलासी मजप्रति तारावया ॥८॥
संशयाचे असमसाहास । लाटे जाहलों कासावीस । तैं तूं तारवेंसी परमपुरुष । धावोनि, दीनास कडे केलें ॥९॥
परी पोटीं सदया भेदरा । भरला; तो न वचेचि, दातार । त्रितापें तापोनि दिगन्तरा । माजी सैरा धाविन्नलों ॥१०॥
आतां न सोडी मी हे पाय । कृपाळु हो माझी माय । ऐसिया काकुलती बोभाय । समपदीं कव घालोनी ॥११॥
अगा उदाराचिया किरीटी । माझी भवबंध फांसोटी । तोडोनि; ऐक्यज्ञान पुष्टि । होय, ते गोष्टी मज सांगे ॥१२॥
ऐसें ऐकोनि करूणोत्तर । उचंबळला ज्ञानसागर । देखोनि श्रीराम-सुधाकर । बोधोद्गारे उसळला ॥१३॥
आतां त्या बोधोद्गार-लहरी । (२)रघुनाथ येईल धणीवरी । तरी चला चला श्रोते सत्वरी । मजही न्या तेथवरी समागमें ॥१४॥
नवविधाची एकरुपता । जगदुध्दारासी सुरसरिता । बोध प्रवाहें वाहेल आतां । ओघ न धरिता भूमंडळीं ॥१५॥
आहा तो अव्याहत प्रवाह । तेथें नवजणीं घेतली धांव । प्रथमेसीं परीक्षिति राव । दुजा मुनिपुंगव नारदु ॥१६॥
तिसरा निजभक्त प्रेमखानी । प्रह्याद बालक अचल-स्मरणी । चवथी ज्ञानकला आदिजननी । प्रणवरुपिणी जगदंबा ॥१७॥
जियेनें जाणितलें पादसेवन; । पांचवा अर्चनामाजीं परिपूर्ण । अर्चनें तोषवोनि जगन्मोहन । मागे सहस्त्र श्रवण श्रवणार्थी ॥१८॥
(३)सच्चरितामृत श्रवणाभिलाषें । राया पृथूसी प्रेमपिसें । लागले; भक्तीचिया सौरसें चराचर भासे चिद्रूपीं ॥१९॥
आतां अकूर भक्त सहावा । ज्यांहीं जगदंतरीं अ-क्रूरभावा । साधोनि, तोषविले रमाधवा । ’ वंदनीं ’ गावा प्राज्ञ तो ॥२०॥
दास्यीं अंजनी- ह्र्दयरत्न । जो रघुनाथ कृपायतन । ज्यानें तोडरीं बांधोनि पंचबाण । अंग्गी अनंगा जाण तुडविलें ॥२१॥
हा सातवा महारुद्र आठव्याचे । रथध्वजाग्रीं अर्जुनाचे । विराजे; म्हणोनि यशकीर्तीचें । झेंगट जिष्णुचें त्रिलोकीं ॥२२॥
अहो जे जलजासनाचें ध्येय । ते विजय सख्य भक्तयुपाय । युध्दा हय-शासनीं यदुराय । योजिला, हें कार्य काय त्याचे ॥२३॥
परी भक्तिभावाचा आळका । प्रेमसूत्रें निजाचा सखा । बांधोनि, बळी द्वारी घेत, तें ऐका । नववा निका भक्तराज ॥२४॥
बळी बळियाढा सत्त्वशील । तनमन धनेंसी सोडोनि जळ । त्रिभुवन पतीतें द्वारपाल । करुनि अढळ उभा केला ॥२५॥
तनु दीधली चरणातळीं । मन अर्पिलें सोऽहं मेळी । धन म्हणिपे तें राज्य सकळी । उदकांजुळीनेम समर्पिलें ॥२६॥
यापरी विद्या अविद्योपाधि । जीवेश तनु त्रयाच्या आधी । तोडोनि; बळिरायें त्रिशुध्दि । आत्मनिवेदन- विधि पूर्ण केला ॥२७॥
(४)धारनाबळें चिदाकाशीं । हंस मेळवूनि परमहंसीं । केली कैवल्य-पद मिरासी । सुख संतोषी बळिरायें ॥२८॥
ऐसें हे आत्मनिवेदन । सर्वी सर्वत्र चिदैक्य पूर्ण । अच्युतात्मस्थिति पावोन । सुखसंपन्न बळीरावो ॥२९॥
यापरी स्वात्मानुभवी नवविधा । ह्र्दयारविंदीं धरितां सदा । कर्माकर्माचा करील चेंदा । भवभयबाधा त्या कैची ? ॥३०॥
साधका भवाचे दुस्तर जळीं । नवांही नवविधा एकमेळीं । तारुवें लोटोनि बाहती बळी । चराचर सकळी उतरावया ॥३१॥
पहिला म्हणे या, श्रवण थोर । दुसरा म्हणे कीर्तन गजर । तिसरा म्हणे भवसागर । स्मरणेंचि तरुं निर्धारें ॥३२॥
चवथिया पादसेवन आल्हादे । पांचवा अर्चनाचेनि आनंदे । सहावा सबाह्य पदारविंदे । वंदोनि स्वानंदे डोलतु ॥३३॥
सातव्या आवडी दास्यत्वाची । सख्य अष्टमी अव्यसाची । नवमी बळिरायें निवेदनाची । जाणिली साची हातवटी ॥३४॥
ऐसा हा नवविधा संगम । तेथे सुस्त्रात होवोनि राम । बैसला समासनीं निर्भ्रम । वंदोनि श्री-राम -पदांबुजे ॥३५॥
अष्टांगामाजिलें निजमूळ । तें पदरजावरी ठेवितां भाळ । अंगी स्वेद-कंप, नेत्री जळ । न धरवे, तुंबळ चालिले ॥३६॥
हे दशा देखोनि कनवाळें । स्वयें प्रेमाचिया कल्लोळें । अभयवरद-करें ते वेळे । म्हणे उठी उठी वहिले श्रीरामा ॥३७॥
प्रथम चोवीस आचमनें राम । अंतरीं स्मरवोनि मेघश्याम । मग म्हणती हो नित्यनेम । प्राणायाम करी का ॥३८॥
आम्हां ब्राह्मणांसी थोर । मुख्य प्राणायामीं आदर । पाहिजे; तेणेंचि जगदुद्धार । करोनि;करवूं आन हातें ॥३९॥
ऐकुनि श्रीगुरुचा वचनार्थ । रामचंद्र परंपरागत । नासापुटासी देवोनि हात । दावित विधि नित्य ज्यापरी ॥४०॥
हें देखोनि देशिकोत्तम । हा हा राघवा येथेंचि वर्म । चुकत आले, यालागीं भ्रम । वाढला, नियम हा जाणे ॥४१॥
अहा काय वदों या जना । पूर्व म्हणवोनि पश्चिमे भ्रमणा । करिती, आणि करविती आना । कोण धारणा दुस्तर हे ॥४२॥
असो तें मागील; तुवां आतां । चित्त करोनि एकाग्रता । स्मरे जगद्‍गुरु आदिनाथा । म्हणवोनि माथा कर ठेवी ॥४३॥
तदुपरी ध्यान धारणा न्यास । करवोनि, स्मरविले परंपरेस । जे जगद्‍वंद्य पुराणपुरुष । अवतार अंश तयांचे ॥४४॥
दीन जनांचे कल्याण नेमें । करावयालागीं रुप नामें । धरोनि भूवरी हे महात्मे । विचरती संभ्रमें योगाब्धि ॥४५॥
रामा, अक्षरद्वयाचा मेळ । राजयोग विशद प्रांजळ । मही याचेनि झाला अढळ । तें तुज नाथकुळ पूर्वज ॥४६॥
ऐसें सांगोनि, अक्षरद्वया । श्रवणपुटी सच्छिष्यराया । वोपिलें, जे ब्रह्मेंद्र गाया । शक्त नव्हती या युक्तीविणे ॥४७॥
(५)ऐसी हंस द्वय अक्षरें । रामह्र्दयीं श्रोत्रद्वारें । वोपोनि; सद्‍गुरुकृपाकरें । मस्तक आदरें स्पर्शिला ॥४८॥
तेव्हां राम आनंदे तुंबळ । उकलों पाहे दिग्मंडळ । थिटा झाला ब्रह्माण्डगोळ । धन्य तो वेळ भाग्याचा ॥४९॥
मग ठायींचे उभयासनीं । आत्माभ्यासी अक्षरें दोन्ही । सोऽहं हंसः चे मिळवणी । अजपा जपोनि जपविती ॥५०॥
अहा त्या निःशब्दाच्या वोढी । रामें ब्रह्माण्डीं घेतली उडी । निर्द्वन्द्व घोषें टाहो फोडी । मुरडोनि नरडी काळाची ॥५१॥
भला भला साधिला डाव । सघोषे मनाची मोडिली धांव । धन्य गुरु, धन्य दीक्षावैभव । सत शिष्यराव धन्य तो ॥५२॥
ब्रह्माहमस्मि इया बोधीं । सद‍गुरु सच्छिष्यातें प्रबोधी । तेणेंचि काळें सायुज्यपदीं । बैसे; अवधि मग कैची ! ॥५३॥
ते हे रामचंद्र - चूडामणि । शिष्य - सद्‍गुरु एक मिळणी । बोध -बोधवितेनिसी दोन्ही । गेले विरोनी स्वात्मसुखीं ॥५४॥
दावितां प्राणापानसमता । घोंटिले गुणत्रय पंचभूतां । निमाली मी-तूं हे अवस्था । स्वरुपसत्ता पसरली ॥५५॥
शून्य संख्या मायोद्‍भ्व । आकारजात झालें वाव । एकात्मत्व योगीराव । भोगिती राणीव समसाम्य ॥५६॥
भक्ति ज्ञान उपासना । मन पवन मेळ, योगधारणा । येथें निर्धारावे कोणे कोणा । इहीं ध्येय ध्याना विसर्जिलें ॥५७॥
हें पार्वतीये आदिनाथें । मच्छेन्द्रे दिधलें गोरक्षातें । तेथोनि गहिनी निवृत्तीं दे ते । निवृत्ति ज्ञानियातें उपदेशी ॥५८॥
तेथोनि देव-चूडामणि । जी या रामाची निज-जननी । राम अनन्या शृंगारोनि । पाहे निज नयनीं आल्हादें ॥५९॥
म्हणे हा तद्रूपतेचिया राणिवा । मीनला; सांडोनि देह-भावा । किती वानूं मी आपुले दैवा । या राम-विभवा देखोनि ॥६०॥
रामें चोरोनि इंद्रियांसी । केली कैवल्यपद मिरासी । परि या आतां बोध्यतेसी । सांडोनि; वृत्तीसी अवलंबी ॥६१॥
अवलंबोनि पूर्ववृत्ति । मज सुखवावे निजसुखोक्ती । शिष्य-टिळका रे तुजप्रति । न लगे बहुयुक्ती सांगावे ॥६२॥
तुझें प्रेमयुक्त वचन । माझे अपेक्षिती श्रवण । तरी तूं मागा ये परतोन । बोल वचन मज कांहीं ॥६३॥
यापरी महानुभवी महात्मा । कुरवाळी शिष्य प्रियोत्तमा । म्हने बा नित्यमुक्ता रामा । नुल्लंघी सीमा स्थूळाची ॥६४॥
अरे जैं स्थूळाकरितां देख । क्षेम जोडिजे आत्यंतिक । तरी त्या आदरें आवश्यक । नेमें नेमक रक्षावे ॥६५॥
ह्या मूळासी नाणूनि ध्यानीं । भला शोभसी योगासनीं । ऐसे नाना विनोदभाषणीं । प्रेमें चूडामणि थापडी ॥६६॥
तरी हा नायके; न फिरे मागुती । कां जे पावला विदेहस्थिति । अचिंत्यागारी केली वस्ती । मौनवृत्ति यालागी ॥६७॥
साधकपणें सोऽहंभावी । श्रध्दा जीवनें देवदेशी । पूजितां कर्माकर्म उगवी । स्वबोधें आघवी पैं जाली ॥६८॥
अनिच्छेचिया निर्वाणपदीं । (६)यामाष्टक अव्यक्तबोधीं । राम स्थिरावला नित्यानंदीं । ध्येयध्यानादि संत्यक्त ॥६९॥
अहा ते स्थिरि अपारावार । कायसे वर्णू मी पामर । चौशून्याहूनि परात्पर । वाण्यादर तेथ कैचा ? ॥७०॥
यालागी म्यां अक्रिय वोजा । नमोनि सद्‍गुरु रामराजा । मौनेंचि मस्तक पादांबुजा । अर्पोनि पूजा सारिली ॥७१॥
उपरी चूडामणि देवे । रामह्र्दयीं अतुल भावें । रिघोनि म्हणतसे जिवे जीवें । मियां अनुवादावे कवणा पैं ? ॥७२॥
वत्सा राघवा तुजकारणें । मज विदेहा देह धरनें । कां जे तुझिया प्रेमगुणें । झालो बध्द, म्हणे दयाब्धि ॥७३॥
ऐसा विमुक्त अनन्य पावन । निःशब्दार्थी अखंड भज्न । अवस्थात्रयीं तन्मय, श्रव्ण । श्रवणेंवीण दृढ करी ॥७४॥
शब्दासरसे अर्थापाठीं । रामचंद्रासी उठाउठी । नेवोनि; तोषें थापटी पाठी । सार्थकता पोटी न समाये ॥७५॥
मग म्हणे वो शिष्यराया । बापा, अनहंकृती काया । वर्तवी; माझे बोल वांया । झणीं सखया जाऊं नेदी ॥७६॥
बा रे अवस्थात्रयांचे ठायीं । भजनानंदा खंडचि नाहीं । स्वबोधें विवरितां सोऽहं भावी । स्वयें देवदेवी आपापणु ॥७७॥
(७)ऐके रामा स्वस्मरणार्थी । अप्रयासें निजप्राप्ति । द्वय अक्षरें आसणें स्मृति । आवाग्ज उक्ति सघोष ॥७८॥
ऐसे निजानुबोध कसवटी । बोधितां अलोट प्रेम पोटी । लोटले; तैं राघवा मिठी । घालोनि; निजपुष्टि वोपिली ॥७९॥
साच निजबोध सौरस । द्यावया रामह्रदयीं प्रवेश । विमुखता परती सांडोनि ईश । मेळवी श्वास निःश्वासीं ॥८०॥
ऐसें परस्परानुप्रवेशीं । सद्‍गुरु सच्छिष्य सोऽहं हंसी । अजपा राजयोग तत्त्वमसि । करोनि, रामासी चेवविलें ॥८१॥
परमानंदें उभय बाहीं । लडिवाळ तान्हुलें निजात्मह्र्दयीं । धरोनि, म्हणती चेइरा होई । निदसुर्‍या पाही मजकडे ॥८२॥
पहिला चिंतेचिया चिंतनीं । होतासी निजप्राप्तीलागुनी । तो तूं मीनलासी चैतन्यी । घोटूनि तिन्ही अवस्थेसी ॥८३॥
ऐसें म्हणवोनि राघवा । सावध करोनि, देहभावा । आणितां; सप्रेम साश्रु तेधवां । हडबडोनि पायां लागला ॥८४॥
पाहोनीः म्हणती इये दशेसी । जिरवोनि; स्वानुभवें कांही मजसी । बोल बा; तुजस्तव पर्वतासी । येणे सायासी मज घडलें ॥८५॥
आम्हां हे परंपरा राहाटी । कां जे अनन्यें न व्हावे कष्टी । हांके आधीं तयाचे पाठीं । राहोनि, निजपुष्टीं वोपावी ॥८६॥
ऐसा कुळींचाचि कुळधर्म । श्रीआदिनाथें दिधला नेम । तरी तूं तत्कुलोत्पन्न राम । तुज गृहाश्रम हाचि आतां ॥८७॥
येथोनि तुमची परंपरा । शरणागतांसी देइजे थारा । माझिये वचनें निजकुलाचारा । आचरे’ स्वपुरा जाई आतां ॥८८॥
म्हणवोनि माथा वरद -कर । ठेवोनि; तोषवी रामअंतर तैंच सर्वाग्रहो ठेला दूर । वंद्य आज्ञोत्तर मज स्वामी ॥८९॥
धन्य बोधकळा अभिनव । कर्माकर्म त्रिपुटी वाव । होऊनि ब्रह्मीची राणीव । भोगी सदैव समसाम्य ॥९०॥
जें जें भासे दृग्गोचार । तें तें अवघें चिन्मात्र । नानात्व भावी जगडंबर । विक्षेप दूर दुरावला ॥९१॥
आदि करोनि इंद्रियवृत्ति । राहाटी जे कायिक स्थिति । स्वबोधें मीनली भगवंत्ती । नातुडे हातीं मनाचिये ॥९२॥
जनीं वागे जनसंमतीं परी न गिंवसे द्वैताहातीं । बाह्याभ्यंतरीं आदि अंती । देखें चिन्मूर्ति सद्‍गुरुतें ॥९३॥
मीपण तूंपणेसी गेले । सर्वी सर्वत्र चिदैक्य झालें सहजीं समसाम्य पाउलें । वंदोनि, डोले स्वसुखेंसी ॥९४॥
ह्र्दयीं न समाये भावप्रेम । तेनें थरथराटे स्वेद रोम । सर्वाम्गीं उभोनि सुगम । भोगी निर्भ्रम स्वानंदु ॥९५॥
आधीं चतुष्टय साधनीं गोमटा । वरी पूर्व पश्चिम चोहाटा । दावी, सद्‍गुरु ज्ञान दिवटा । निजपदापट्टा देवोनी ॥९६॥
आधारापासूनि सहस्त्रवरी । उभय मार्गीची कुसरी । लंघोनी, त्रिकुटादि भ्रामरी । चैतन्य चक्रीं स्थिर केलें ॥९७॥
तेथें राघवें सद्‍गुरुपूजा । मांडिली पदामृत-प्राशन काजा । अव्यंअ अनुपचार द्रव्य वोजा । सहजी सहजा मेळविली ॥९८॥
अनुच्चारित मंत्र मौनीं । अहं सोऽहं रहित ध्वनि । पद प्रक्षाळिलें श्रध्दा जीवनीं । शुध्द सु-मनीं शोभविलें ॥९९॥
विश्वव्यापी विश्वंभरा । अनन्य जनाचिये दातारा । मंत्रे मंत्रपुष्प एकाक्षरा । वाहोनि, ज्ञानेन्द्रा वंदिलें ॥१००॥
यापरी अक्रिय अर्चनविधि । सांगोपांग यमनियमादि । पंचदश अंग निवृत्त समाधी । ध्यानावाहनादि अर्ध्यपाद्य ॥१०१॥
तदुपरि विज्ञान-दीपोत्सव । करोनि; कैवल्यपदींचा राव । वोवाळितां, मनोन्मन भाव । स्वयें स्वयमेव कोंदाटाला ॥१०२॥
ऐसियापरी यथानुक्रमें । अर्चनविधि परिपूर्ण रामें । करोनि; न्य़ूनातिरिक्त क्षमें । प्रार्थोनि, नेमें वंदिला ॥१०३॥
जीवभावें उदकांजुळी । अर्पूनि, मस्तक पदरजातळीं । देऊनि चूडामणीचे; ते वेळीं । सहजीं सहजलीली शोभला ॥१०४॥
माथा चरनतीर्थ वंदोन । कर्माकर्माची केली उजवण । पावला परमदशा सुलीन । देहीं देहभान विदेहत्वें ॥१०५॥
(८)यापरी गुरुनाथें रामराणा । निजबोध देऊनि, ब्रह्मभुवना । संस्थापिलें जी श्रोते जना । ते मज वाकशून्या न वदवे ॥१०६॥
मज मतिमंदा कैची मति । हे विचक्षण श्रोते जाणती । परी कथा वर्णावी अत्यंत प्रीती । वरी तेचि आज्ञोक्ति श्रीगुरुची ॥१०७॥
तयें मी आज्ञोक्तीचे बळ । घेवोनि, आरंभिला ग्रंथ प्रांजळ । पोटीं निजप्रेमरस रसाळ । देईल दयाळ गुरुराजा ॥१०८॥
तयाचे चरणतीर्थेविण । ग्रंथस्फूर्तीचें साधन । मज तप दुसरें नाहीं आन । वाहोनि आण सांगतसे ॥१०९॥
तयाचे पद्पीयूषाची गोडी । कवणिया भाग्यें लाभलो जोडी । पतित मी, माझी बुध्दि कुडी । सेवाही घडी नाचरलों ॥११०॥
अन्न आच्छादानालागोन । विकिलें इंद्रियेंसी तनु मन । लोकीं लोकोपचार संग्रहोन । दुरावलों दुरजन निजस्वार्था ॥१११॥
परि ती नेणोनि मम अन्याया । हांकेसी धांवोनि लवलाह्या । येत माउली पदपय द्यावया । अतुल या स्नेहा न वदवे ॥११२॥
(९)मी नष्ट नाठवी श्रीरामा । परि ती इष्ट माय मजवरी प्रेमा । ठेवूनि धांवे नेमिल्या नेमा । मज अधमाधमा भेटावया ॥११३॥
ऐसा कृतघ्न -कृतज्ञ योग । जाहला; ऐका श्रोते सभाग्य । येथें निवडितां माझेंचि चांग । प्राचीन अव्यंग मज भासे ॥११४॥
आतां सिंहावलोकन । मूळ भाग कथानुसंधान । राम हा गुंडाख्याचा नंदन । नामधारक जाण पूर्वीचा ॥११५॥
हें श्रोतयांतें पहिलेंचि ठावें । परि मी ग्रंथान्वयाचे भावें । पुन्हां जाणविलें; कोपा न यावे । साच स्वभावें सूज्ञाहीं ॥११६॥
त्यासी निज-मंत्र -बीज दान । श्रीगुरु चूडामणि आपण । देवोनि, पावले अंतर्धान । योगीन्द्र पूर्ण चिद्‍भानु ॥११७॥
(१०)पुढें गुणनिधि रामचंद्र । गुरु आज्ञोक्तीचा सत्कार । करोनि, आदरें नागपुर । पाहिलें, साचार स्वतोखें ॥११८॥
श्रवन कीर्तन निदिध्यासी । कायिक वाचिक मानसीं । नित्यानंदें श्रीगुरुसी । प्रेम पडिभरेंसी ध्याय गाय ॥११९॥
राघवें निज नित्या वरुनि । अनित्य दृश्या केली सांडणी । स्वतोषें विचरे आत्मभुवनीं । अचिन्त्य -चिंतनीं अनुद्वेगी ॥१२०॥
दारा धनादि गृहापत्यें । अवघे निरविलें निजसुतातें । आपण मुमुक्षु - अनन्यातें । परमार्थ दीक्षेतें अनुग्रहीं ॥१२१॥
आनादि लोपला मार्ग , तया । उदयो करोनि, रामराया । जीर्णोध्दार मोक्षदानिया । करी सदुपाया दीनार्थी ॥१२२॥
ऐसिया पहिले श्रीगुरु आज्ञे । शिरसा वंदोनि राम प्राज्ञें । जगदुध्दारार्थी सुज्ञाभिज्ञें । ठेले सर्वज्ञे अनुक्रमा ॥१२३॥
त्यागा त्याग उभय भागीं । अलिप्तत्वें राहाटे जगीं । विधिनिषेध शास्त्र संयोगी । योगीच वियोगी नव्हे कदा ॥१२४॥
लोकापवाद राजशब्द । तोही डाग धुतला शुध्द । कां जे प्रभु आज्ञेवरोनि विशद । केलें निर्द्वंद्व काज रामें ॥१२५॥
यापरी येणें निजाश्रमीं । असावे आपुले विश्रामधामीं । तंव ते इष्टचि गोष्टी रामीं । जाहली निजनेमीं वर्ताया ॥१२६॥
अखंड स्वानंदी निमग्न । ओतप्रोत समाधान । अचल अमल अनुसंधान । अढळ ज्ञान अविनाशी ॥१२७॥
जेणे सुखें श्रीगुरुसी । मिळणी मिळोनि निजमानसी । अपूर्व आनंदाची राशि । झाला प्रेमेंसी रामरावो ॥१२८॥
तेणेंचि सुखे सदैव आतां । नांदे; नव्हे वियोगाव्यथा । साध्यसाधनीं परिपूर्णता । नित्यमुक्तता निजबोधें ॥१२९॥
संगी निःसंग अबाधी । ज्ञान उपासना षट‍कर्मादि । स्वतोखें आचरे वेदविधि । अद्वैतबुध्दी अनाग्रही ॥१३०॥
ऐसा निभ्रांत निःसंदेही । निवृत्त समाधि व्युत्थान नाहीं । अकल्पक अविकारी समसाम्य पाहीं । देही विदेही महात्मा ॥१३१॥
त्या महात्म्याची कुळकथा । तुमचेनि प्रसादें तत्त्वतां । यथामति वदलों श्रोता । मूळ भावार्था लक्षोनी ॥१३२॥
(११)मूळ भावार्थातें पोटी । घेऊनि; श्रीरामचरणीं मिठी । घालोनि; पायवणी घोटिलें घोटी । विमल दृष्टि ज्याचेनि ॥१३३॥
सकळ साधनांचे शिरीं । श्रीरामपदांबुची थोरी । ते मज लाभले निर्धारी । कृपा अवधारी हे त्याची ॥१३४॥
येर्‍हवी मी पतित दीन । कैसेनि पदांबु लाहे कण ? । परी तो दीननाथ दयाघन । वोळला पूर्ण मजलागीं ॥१३५॥
योगक्षेमादि आघवा भार । घेवोनि; केला अंगीकार । एकाक्षरें पैलपार । दुराविले दूर जन्ममृत्यां ॥१३६॥
तो श्रीरामसखा सद‍गुरु । माझिये मनो-रथाचे तारूं । ग्रंथ पाववील पैलपारु । चित्सुखसागरु मम तात ॥१३७॥
पुढिल अध्यायीं निरुपण । (१२)रघुनाथ-महादेव संवाद कथन । जें नाथमार्गीचें मंडन । स्वानंदजीवन ग्रंथाचें ॥१३८॥
महादेव हे कोठील कोण । श्रोतयान्तरी जरी अनुमान । तरी सांगेन, ऐका सावधान । आपुली निजखूण जीवींची ॥१३९॥
जो मुक्तरत्नांचा सागर । ब्रह्मविद्येचे भांडार । अनन्य जनांचें तरी माहेर । (१३)मज रघुवीर सद्‍गुरु तो ॥१४०॥
तयाचे शिरीं महादेव । करकंज ठेवोनि निजप्रभाव । दानें गौरविला रामराव । क्षराक्षरभावो उगवोनि ॥१४१॥
तो हा आम्हां अनाथां या । भवनिधीच्या तरणोपाया । सुगम सेतु योगपाया । श्रीरामरायें उभविला ॥१४२॥
ऐसा सद्‍गुरु रघुत्तम । जो भक्तकाम कल्पद्रुम । मज अनन्याचें विश्रामधाम । साकार ब्रह्म अमृतांशु ॥१४३॥
त्रिपुटी त्रयावस्थातिमिरें । दाटलीं जन्मजन्मांतरें तीं या योगीन्द्र चकोरचन्द्रें । एकचि अक्षरें उडविलीं ॥१४४॥
याचें उत्तीर्ण कैचें आतां । मौनेंचि पदरजातळीं माथा । देवोनि; राहिलों जी तत्त्वता । श्रीरघुनाथा चिंतुनी ॥१४५॥
वृत्ति लव क्षण निमिषार्धी । काया वाचा मनें त्रिशुध्दि । वियोग न घडो पादारविंदी । दान दयाब्धि दे मातें ॥१४६॥
वाचे नाम ह्र्दयीं प्रेमा । इतुकें देई सर्वोत्तमा । सत्यस्वरुपदानिया रामा । विश्व आरामा विश्वेशा ॥१४७॥
श्रीपरि तुझा दासानुदास । पुढील चरिताचा हव्यास । धरोनि; अध्याय अष्टादश । श्रीरामपदास समर्पी ॥१४८॥
नेणे भाव, भक्ति, पूजा । परी जगीं अनन्यपणें मी तुझा । म्हणवितों; सद्‍गुरु इतुके काजा । करणें माझा सांभाळ ॥१४९॥
येथें संपला अष्टादश । पुढील सुरसारंभ एकोणीस । (१४)जे परमगुरु परमहंस । रघुनाथ उक्तीस अनुसरती ॥१५०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भव गज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१५१॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय अठरावा संपूर्ण ॥

टीपा :- (१) रामे विनविलें श्रीगुरुप्रति -ओवी ८ :-
श्रीसिध्दचरित्रांतील शिष्यपरंपरेंत दोन ’ रामचंद्र ’ होऊन गेले. एक सदर पोथीचे लेखक श्रीपतिनाथ यांचे सद्‍गुरु श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर व दुसरें तिकोटकरांच्या गुरुंचे गुरु श्रीरामचंद्रमहाराज नागपूरकर हे होत. येथील कथाभागाम्त दोन्ही रामचंद्रांचा उल्लेख कवीनें ’ राम , रामचंद्र , रघुनाथ, रामरावो, राघव ’ अशा विविध संज्ञांनीं केला आहे व तो मधेच गुंफला गेल्यानें हा उल्लेख श्री. तिकोटेकरांचा आहे की नागपूरकरांचा आहे याचें वाचकांना अवधान ठेवावें लागतें. तें सोपें व्हावें म्हणून येथें विवक्षित ओव्यांची नोंद करीत आहोंत. प्रस्तुत ८ व्या ओवींत राम म्हणजे श्रीनागपूरकर व श्रीगुरु म्हणजे श्रीचूडामणिमहाराज.
(२) रघुनाथ घेईल धणीवरी -ओवी १४ :- ८ ते १४ ओव्यांतून एक सलग विनवणीचा विषय आला आहे. यांतीळ राम, श्रीराम व रघुनाथ म्हणजे अर्थात्‍ रामचंद्रमहाराज नागपूरकर होत.

(३) सच्चरितामृत श्रवणाभिलाषें । राया पृथूसी प्रेमपिसें लागलें -ओव्या १८,१९ :-
ओव्या १६ ते ३५ पर्यंत ’ श्रवण, कीर्तन, पाद्सेवन इत्यादि प्रसिध्द नवविधा भक्तीचें व त्या त्या भक्तिप्रकारांतील
सर्वश्रेष्ठ भक्तांचे वर्णन केलें आहे. प्रल्हाद, पार्वती, अक्रूर, हनुमान, अर्जुन बळिराजा यांची नांवे सुप्रसिध्द आहेत. १८व१९  
ओव्यांत अर्चन स्वरुप भक्तीतील सर्वोत्तम भक्त म्हणून श्रीपतींनी पृथु राजाचा निर्देश केला आहे. सदर पृथूचें चरित्र
श्रीमत्‍ भागवत महापुराणाच्या चौथ्या स्कंधांत १५ ते २३ अध्यायांत आलें आहे तें अवश्य वाचनीय आहे. येथील १८ व्या
ओवींतील ’ मागे सहस्त्र श्रवण श्रवणार्थी । ’ व १९ व्या ओवींतील ’ सच्चरितामृत श्रवणाभिलाषें रायासी प्रेमपिसें लागले ’
या ओवीचरणांचे मूल ’ विधत्स्व कर्णायुतमेष मे वरः ।’ आणि ’ यशः शिवं सुश्रव आर्यसड्‍.गमें यदुच्छया चोपशृणोति ते
सकृत‍ । कथं गुणज्ञो विरमेद्विना पशुम्‍ ।’ या श्रीभागवतांतील श्लोक पंक्ति ( स्कंध ४/२० अ ) मध्यें आढळतें.

(४) धारणाबळें चिदाकाशीं । हंस मेळवूनि परमहंसी ओवी २८ :-
नवविधा भक्तियोगांत ’ आत्मनिवेदन ’ ही अखेरची व सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमत्‍ दासबोधांत ४ थ्या दशकांत श्रीरामदासस्वामींनी नऊहि प्रकारच्या भक्तीचे फार उत्कृष्ट विवरण केलें आहे. पुढें त्याच दशकांत शेवटीं ज्या चार मुक्तीचें वर्णन आहे त्यांतील चौठी म्हणजे सायुज्याता ही या आत्मनिवेदानानेच प्राप्त होते. असो. येथील ओवींतीळ उल्लेखावरुनहि सहस्त्रदलकमलांतील आकाशांत सोऽहं भाव स्थिरावणें हीच बलिराजाची आत्मनिवेदनभक्ती होय असे दिसते. या प्रकारच्या भक्तीनें बळीनें कैवल्यपद ही आप्ली मिराशी तर केलीच पण सगुण साकार भगवंतालाहि कायमचा दारी उभा केला !

(५) ऐसी हंस द्वय अक्षरें । श्रोत्रद्वारें वोपोनि-ओवी ४८:- ४७ ते ५३ ओव्यांतून सोऽहं हंसः या सांप्रदायिक अजपाजपाचा
स्पष्ट व महत्त्वपूर्ण उल्लेख असून सद्‍गुरुंनी दीक्षा देतांच उत्तम अधिकारी कसा चटकन तद्रुप होतो तो प्रभाव वर्णिला आहे.
(६) यामाष्टक अव्यक्तबोधीं । राम स्थिरावला नित्यानंदीं -ओवी ६९:- श्रीसद्‍गुरु चूडामणिमहाराजांनीं परंपरागत सोऽहं
राजयोग दीक्षा देऊन श्रीरामचंद्रमहाराजांच्या मस्तकीं अमृत कर ठेवला आणि त्या आत्मानंदांत देहभाव विवर्जित होऊन
ते ( रामचंद्रम ) यामाष्टक म्हणजे आठ याम = आठ प्रहर -अर्थात संपूर्ण चोवीस तास राहिलें.
(७) ऐके रामा स्वस्मरणार्थी .....उक्ति सघोष ॥ संपूर्ण ओवी ७८ :- येथेंहि सूत्ररुपानें सर्व प्रक्रिया व फल सांगितले आहे.
असे दिसते.
(८) यापरी गुरुनाथें रामराणा .... निजबोधे देऊनि -ओवी १०६ :- येथपर्यंत श्रीचूडामणि या नागपूरकर यांचा गुरुशिष्य संबंध उपदेश वगैरे भाग पूर्ण झाला आहे. अर्थात येथपर्यंतचे राम, रामराणा उल्लेख श्रीनागपूरकरांचे ठरतात. ओवीतील गुरुनाथ म्हणजे चूडामणिमहाराज .
(९) मी नष्ट नाठवी श्रीरामा - ओवी १०९ :- ओव्या १०७ ते ११४ पर्यंत पोथीकर्ते श्रीपतिनाथ यांचे आत्मकथन असल्यामुळे
या भागांतील श्रीगुरु, गुरुराजा, श्रीराम या संज्ञांनी श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकरांचा निर्देश समजावा.
(१०) पुढें गुणनिधी रामचंद्र .... नागपूर पाहिलें । ओवी ११८ ओवीपासून १३२ या ओवीपर्यंत श्रीचूडामणींच्या उपदेशानंतरचे श्रीनागपूरकर रामचंद्र महाराजांचे चरित्र - जीवन्मुक्तावस्था , लोकोद्वारे - वर्णिले आहे. तेथपावेतों रामचंद्र . राघव, रामराया रामप्राज्ञ राम, रामरावो ही आलेली सर्व नांवे नागपूरकरमाहाराजांची होत हे उघड आहे.
(११) श्रीरामचरणीं मिठी घालोनि - पायावणी घोटिलें -ओवी १३३:- ओव्या १३३ ते १३७ पर्यंत श्रीपति स्वतःच्या सद्‍गुरुंच्या स्मरणानें सदगदित होतात. याहि ओव्यांतून श्रीराम, श्रीरामपदांबु, श्रीरामसखा असे उल्लेख आढळतात. ते अर्थात श्रीरामचंद्र तिकोटेकरमहाराजांचे आहेत.
(१२) रघुनाथ -महादेव संवाद कथन । स्वानंदजीवन ग्रंथाचें । ओवी १३८:-
या ओवीतील रघुनाथ म्हणजे रामचंद्र नागपूरकर महाराज व महादेव म्हणजे महादेवनाथ चिंचणीकर. ( हेच तिकोटेकर
महाराजांचे सद्‍गुरु होत).
(१३) मज रघुवीर सद्‍गुरु तो-ओवी १४०:- १४० ते १४९ ओव्यांत्तून श्रीपतींनी स्वतःच्या श्रीगुरुंचा महिमा व्यक्त केला आहे.
त्यामुळें १४९ पर्यंतच्या ओव्यांतील रघुवीर, रामरावो, श्रीरामराय, श्रीरघुनाथ म्हणजे तिकोटेकर रामचंद्रयोगी होत.
(१४) परमगुरु परमहंस । रघुनाथ उक्तीस अनुसरती - ओवी १५०:-
श्रीरामचंद्रमहाराज नागपूरकर - श्रीमहादेवनाथ महाराज - श्रीरामचंद्र महाराज तिकोटेकर - श्रीपतिनाथ अशीं गुरुशिष्य परंपरेंतील नांवे लक्षांत घेतलीं म्हणजे या ओवीतील परमगुरु परमहंस हा उल्लेख श्रीमहादेवनाथांचा ठरतो. रघुनाथ उक्ति म्हणजे रामचंद्रमहाराज नागपूरकरांचें संभाषण असा अर्थ आहे. या ओवीत रघुनाथ महादेव संवादाचे अवतरण दिलें असलें तरी पुढील दोन अध्यायांत ( या दोघांचेहि उपासनामार्गातील गुरु ) श्रीगुंडा महाराजांचे चरित्र आहे. हा संवाद नंतर अध्याय २१ मध्ये आहे.
कठीण शब्दांचे अर्थ : मायावर्ती = ( माया =आवर्ती ) मायेंच्या भोवर्‍यात
(८) असमसहास = बेसुमार, विक्राळ  (९) बोभाय = आक्रंदन करणें  (११) रमाधव = लक्ष्मीपति विष्णु
(२०) झेंगट= देवळांत आरतीच्या वेळीं किंवा तासाचे टोल वाजविण्यासाठी असलेली थाळी. येथील झेंगट शब्दाचा लक्षणेंने
अर्थ कीर्ति असा आहे. (२२) जिष्णु = आर्जुनाच्या दहा प्रसिध्द नावांपैकी एक नांव
(२२) हय शासन = घोडे चालविणे; जलजासन = कमळ हेंच ज्याचें आसन आहे तो म्ह. ब्रह्मदेव
(२३) अष्टांगामाजिलें निजमूळ = आठ अंगांपैकी पहिलें अर्थात मस्तक
(३६) संभ्रम = उत्साह, आवेश, स्फूर्ति ( हल्लीच्या वाड्‍.मयांत हा शब्द वैचारिक गोंधळ अशा अर्थानें येतो )
(४५) यामाष्टक = आठ याम, आठ प्रहर (६९)

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP