मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय एकोणतिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणतिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
नमन माझें श्रीगुरुमूर्ती । चहूं वाचेसी ज्याची स्फूर्ति । माया भासे ज्याचे विवर्ती । निवृत्त ध्याऊं तयांतें ॥१॥
ब्रह्मा विष्णु आणि शिव । रजसत्त्व तमाचें वैभव । त्यावेगळा तूं स्वयमेव । चिदैकभावमूर्ति तूं ॥२॥
पहिलें तें जहल्लक्षण । दुसरें तें अजहल्लक्षण । तिसरें जहदजहल्लक्षण । या त्रिपुटीवीण वेगळा तूं ॥३॥
ध्येय ध्याता ध्यान । पूज्य पूजक पूजाविधान । ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान । या सर्वांहुन वेगळा तूं ॥४॥
जे जे आरंभावी स्तुति । ते ते मायामय वृत्ति । वृत्तिरहित तूं कृष्णमूर्ति । स्तवनस्फूर्ति पांगुळे ॥५॥
आतां स्तव्य स्तवन स्तविता । आघवा तूंचि सद्‍गुरुनाथा । चरणीं ठेवोनोयां माथा । मौनेंचि तत्त्वतां राहिलों ॥६॥
तुझी सगुणमूर्ति साजिरी । श्यामकांति बहु गोजिरी । चरणकमल माझें शिरीं । ठेवोनि, तारी दासासी ॥७॥
जों जों स्तवनीं कसावी कास । तों तों वृत्ति होय निरास । मुळीं लटका जगदाभास । तेथ वर्णनासी गिंवसेना ॥८॥
सगुण निमित्य निर्गुण दिसे । निर्गुण विचारितां सगुण भासे । उभय परस्परानुप्रवेशें । साजिरें दिसे बोलणें ॥९॥
असो स्तवनाचा विस्तार । कथा सांगूं परम नागर । श्रोते महानुभाव थोर । श्रवणीं सादर बैसले ॥१०॥
पूर्व प्रकरणाचे शेवटीं । पित्यासी भाष्य दिधल्यासाठीं । (१)राम होवोनि परमकष्टी । गुरुस्तव सृष्टी शोधीत ॥११॥
सद्‍गुरुवांचोनि वांचुनि । वृथा कष्टविली जननी । मानवी वपूसी लाहोनीई । जन्महानि म्यां केलिई ॥१२॥
वृथा दवडिली वयसा । काय देहाचा भरंवसा । काळ घेवोनियां फांसा । रात्रंदिवसां तिष्ठत ॥१३॥
अहो ऐसा निदिध्यास । लागलासे रात्रंदिवस । मिष्टान्नाचा सेविता ग्रास । परि तो तोष नेदीचे ॥१४॥
असे सुखविलास भोग । तो तो रामा वाटती रोग । आनंद सद्‍गुरुचा योग । निःसंग होतां मिळे कीं ॥१५॥
श्रीरामचंद्र पूर्ण अवतार । आत्मतत्त्वाचा विचार । करिती, तैं राजोपचार । खदिरांगार भासती ॥१६॥
येर्‍हवी ते पूर्ण ज्ञानी । लोकसंग्रहालागोनी । दाविताती वर्तोनि जनीं । मत्तातकरणी तैशीच ॥१७॥
दत्तापाशीं मागूं गुरु । नेत्री पाहुं गाणगापुरु । ऐसा करोनि निर्धारु । करी आदरु प्रयाणी ॥१८॥
सुमुहुर्त सुलक्षणी सुवेळ । पाहोनियां, उतावेळ । राम प्रयाण करिती तात्काळ । इच्छा सफल हो म्हणवोनी ॥१९॥
कांतेप्रती पुसों जातां । घाबरी जाहली पतिव्रता । चरणीं ठेवोनियां माथा । प्राणनाथा विनवीत ॥२०॥
समागमें दासी नेतां । बहु संतोष लाभेल चित्ता । स्वामी प्रवासी जातां । गृहीं कर्तव्यता काय मज ? ॥२१॥
ऐसी विनवणी करी । राम म्हणे ऐक सुंदरी । सत्वरचि येऊं माघारीं । सुखेंसी गृही राहे तूं ॥२२॥
ऐसें तियेचें समाधान । करोनि, पाठीं दत्तचिंतन । मग करिते झाले प्रयाण । उत्तम शकुन तैं होती ॥२३॥
निघतां ग्रामाबाहेरी । पूर्ण कलश घेवोनि शिरी । सन्मुख सुवासिनी नारी । येतां, अंतरी सुखावे ॥२४॥
देदीप्यमान निर्धूम पावक । घेऊनि आला शूद्र एक । वामभागी नकुलादिक । जातां; हरिख वाटे बहु ॥२५॥
म्हणे होती उत्तम शकुन । तैं सत्य पावेन श्रीचरण । ऐसें वाटून समाधान । राम मनीं संतोषे ॥२६॥
मुखीं होत नामोच्चार । नेत्री प्रेमाचे पाझर । ऐसा तो राम योगीन्द्र । गाणगापूर पंथ क्रमी ॥२७॥
क्रोश -गव्यूति योजन । लंघीतसे वनोपवन । छंद लागलासे पूर्ण । गुरु दर्शन घ्यावया ॥२८॥
वृत्ति जाहली तदाकार । नाठवे पुत्र कलत्रागार । कैं पावेन गाणगापूर । श्रीपदीं शिर ठेवीन ॥२९॥
(२)ऐसा लागलासे ध्यास । नाठवे रात्री कीं दिवस । मार्ग क्रमणाचा हव्यास । शरीरसुखास न पाहे ॥३०॥
स्नान संध्या नित्यकर्म । येवढे मार्गी सारी राम । भोजन निद्रा कीं विश्राम । करितां श्रम वाटे जीवा ॥३१॥
ऐसा आक्रमितां पंथ । जेथ वास्तव्य करी श्रीदत्त । तें ग्राम अकस्मात । सन्निधी येत रामाच्या ॥३२॥
एक योजन गाणगापूर । राहतां, रामें नमस्कार । साष्टांग घातिला भूमीवर । वारंवार स्तवन करी ॥३३॥
प्रेमळ भक्तांचा राणा । उंच स्वरें नामगर्जना । करीतसे, मार्गक्रमणा । आनंद मना बहु वाटे ॥३४॥
गाणगापूर पाहे दृष्टी । आनंद्द न समाये पोटीं । दत्त करील कृपावृष्टि । आनंदे सृष्टीई भरीन ॥३५॥
ऐसा आनंदे डुल्लत । पावला ग्रामसीमे आंत । जेथें वास्तव्य करी दत्त । मूर्तिमंत परब्रह्म ॥३६॥
ग्रामामाजीं प्रवेश करितां । देह गेह नाठवे चित्ता । दृष्टीं केव्हां पाहेन दत्ता । श्रीपदीं माथा ठेवीन ॥३७॥
जैसी माता देखोनियां । अत्यंत त्वरा होय तान्हयां । कां जे चकोर चंद्र न्याया । तैसें रामराय जाहलें ॥३८॥
ऐसा राम उतावीळ । जेथें अनुसूयेचा बाळ । पावलासे, तें स्थळ । श्रीपदीं भाळ ठेविला ॥३९॥
भीमा अमरजा संगम । पुण्य-वारी उत्तमोत्तम । स्थळ आत्यंतिक मनोरम । पाहोनि, राम संतोषे ॥४०॥
अहो तृषिता जाह्नवी । वोळली निःसंग आटवीं । कां जे कुमुदालागोनि रवि । सुखवीतसे ज्यापरी ॥४१॥
तैसेंचि श्रीरामा जाहलें । मागील श्रम अवघे गेले । वनश्री पाहोनि सुखावले । आनंदे दाटले मनीं बहु ॥४२॥
काय वर्णू स्थान शोभा । जेथ लावण्याचा गाभा । त्रयमूर्ति दत्त उभा । भक्तलोभाकारणें ॥४३॥
दोहीं पात्रीं निर्मळ जळ । परस्परांचा आंदोळ । होतसे जळकल्लोळ । देव सकळ पाहती ॥४४॥
उभय तटी वृक्ष भारी । कल्पद्रुमाचिया हारी । चूत मांदार आणि बदरी । फलभारीं डुल्लती ॥४५॥
केतकी बहुत बकुल अशोक । सुवर्णचंपक पारिजातक । जाईजुई वेली अनेक । गुच्छस्तबक पुष्पांचे ॥४६॥
बिल्पवृक्ष दाट भारी । तळीं छाया पसरे सारी । कोमल पत्रें साजिरी । मनोहरी शोभती ॥४७॥
शमी मोगरा कण्हेरी । शेवंती चित्रविचित्रीं । गुलाब रंग नानापरी । सुगंधे भरी स्थळ सारें ॥४८॥
(३)लता वृक्षावरती । ऊर्ध्वमुखें त्वरें जाती । साधकातें मार्ग दाविती । ’ या ’ ’ या ’ म्हणती सत्वर ॥४९॥
अधोमुखें अधोगति । ऊर्ध्वपंथें -जन्मपंक्ति । अनायासें चुके; यातायाती । ऐसा दाविती संकीत ॥५०॥
वृक्षावरी कारंडव । हंस कोकिलांचा रव । सोऽहं शब्दाचा गौरव । पक्षी सर्व करिताती ॥५१॥
मयूर आनंदे नाचती । पिच्छ शोभा उभारिती । योगी जन ध्यानी पाहती । रंग दाविती ते सर्व ॥५२॥
जन्मलों इय क्षिती । धन्य आपणां मानिती । नेत्री प्रेमाश्रु स्त्रवती । मनोवृत्ति विसर्ले ॥५३॥
मग राहिले तटस्थ । नृत्यकला कुंठित । जाहल्या वृत्तिरहित । सुख अत्यंत भोविती ॥५४॥
कीर किरकिर टाकोनी । दत्त दत्त नामाची ध्वनी । करिताती निशिदिनी । आनंदे मनीं निर्भर ॥५५॥
चाष आणि भारद्वाज । सारसादि पक्षिराज । अतीव तेजःपुंज । नाम ’ द्विज ’ योग्य शोभे ॥५६॥
विचरताती कस्तूरिमृगें । ’ जवादि-बिडालक ’ अनेगें । घ्राणदेवता मनोवेगें । धावों लागे त्यापाठीं ॥५७॥
हरिण व्याघ्र एके ठायीं । आनंदानें क्रीडती पाही । जेथें द्वैतभाव नाहीं । कैंचा कांही द्वेष तेथें ? ॥५८॥
वनगाईचे भार । ऊर्ध्व पुच्छांचा संभार । धरोनि, ढाळिताती चंवर । सेवे सादर दत्ताच्या ॥५९॥
सर्प निर्विष होवोनि । वरी उभारिती फणी । समसाम्य सोऽहं ध्वनि । आचरोनि दाविती पैं ॥६०॥
’ फणि -छायेसी ’ मूषक । क्रीडतसे यथासुख । नकुळ सान्निध्य देख । अति हरिख सर्वांतें ॥६१॥
जळें स्वच्छते करोनि । तिही लाजविली स्वर्धुनी । अमृताही उणें आणी । माधुर्यपण जयाचें ॥६२॥
शतपत्र कल्हार । वरी रूंझिती भ्रमर । मज भासती ते योगीन्द्र । सोऽहं गुंगार करिताती ॥६३॥
सहस्त्र-दळकमळें । रक्तशुभ्र विशाळें । जळीं पराग मिसळे । गंध उसळे आकाशीं ॥६४॥
जळजंतू नानापरी । मीन, बदकें सुसरी । पीडा नाहीं परस्परी । क्रीडा करिती आनंदें ॥६५॥
कूर्मग्रीवा आकुंचन । करिती सवेंचि प्रसरण । अथवा करिती स्तंभन । दाविती खूण योगिया ॥६६॥
स्नान करोनियां द्विज । तटीं बैसले तेजःपुंज । अंगीं चर्चिलें भस्म, बीज । स्मरोनि निज ॐकार ॥६७॥
भूमिकेची शुध्दि करोन । दर्भ आणि कृष्णाजिन । वरुतें मृदु चैल घालून । सुखासन करिताती ॥६८॥
संध्यादि करोनि षट्‍कर्मे । साधिताती प्राणायाम । ध्यानविधि अत्यंत सुगम । आगमोक्त उपासिती ॥६९॥
कोणी दत्त दत्त नामें । परस्पर मंगलधामें । गर्जताती नित्य नेमें । सर्व कर्मे टाकोनी ॥७०॥
कोणी करिती वेदपठण । कोणी जप कोणी ध्यान । मानसपूजाविधान । आन आन करिताती ॥७१॥
श्रीगुरुचरित्राचे पाठ । द्विज करिती घडघडाट । म्हणती बिकट यमाचा घाट । करुं वाट फोडोनी ॥७२॥
समंध आणि ब्रह्मराक्षस । पिशाच्चादि योनी तामस । कर जोडोनि सद्‍गुरुस । म्हणति गतीस दे आम्हां ॥७३॥
तामस योनी मागती गति । ऐसी तेथें स्थळ प्रचीति । मा इतरांचिये स्थिति । किती म्हणोनि वर्णावी ? ॥७४॥
ब्रह्मचारी गृहस्थ । द्ण्डधारीं, वानप्रस्थ । स्वे स्वे कर्मामाजीं रत । भगवद‍भक्त वीतरागी ॥७५॥
कोणी परमहंस दीक्षा । कोणी सिध्दान्न कोणी भिक्षा । स्वशरीरा लावोनि शिक्षा । श्रीगुरुपक्षा आदरिती ॥७६॥
कोणी ऊर्ध्वबाहू देख । जटाभार शिरीं येक । मौनव्रतादि अनेक । मार्ग सम्यक चालविती ॥७७॥
गंगोदकें कावडी । भरोनि येती तांतडी । दर्शनीं लागलीसे गोडी । गुरु-गारुडी दत्ताच्या ॥७८॥
कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी द्विजा देती दक्षिणा । इच्छा पुरवी योगीराणा । भरंवसा जाण सर्वांसी ॥७९॥
साधक योगी योगाभ्यासीं । बैसले असती अहर्निशीं । प्रेमानंदें अति उल्हासी । जे दुःखासी नेणती ॥८०॥
ज्या स्थळाची महिमा । वर्णितां, भागोनि उपरमा । शेष पावला; त्या धामा । वर्णू रामा मी किती ? ॥८१॥
सर्वत्रांचे मनोरथ । पुरवीतसे श्रीगुरुनाथ । आळी घेतां, जे समर्थ । बाळकापें तात जेवीं ॥८२॥
रामे वनश्री पाहिली । ती वर्णितां कथा वाढली । पुण्याश्रमाची वनस्थळी । असे वर्णिली वेदशास्त्री ॥८३॥
वृक्ष गुल्मादि लता नाना । तये ठायीं असती जाणा । ऋषि, देव, सुरललना । येती दर्शना गुरुच्या ॥८४॥
कर्मे करोनि भागले । यातायातीं जाजावले । विश्रांति घ्यावया आले । तरुरुप ठेले होवोनी ॥८५॥
ते हे अचलत्वें राहिले । स्वस्वानंदें सुख पावले । प्रेमभरें डोलों लागले । जाहले ते कृतकार्य ॥८६॥
म्हणवोनि ऐशिया स्थळीं । जे जे वृक्षलता जन्मली । तेही पाहिजे वर्णिली । वाणी वेंचिली यास्तव ॥८७॥
असो, रामचंद्र क्षणभारी । विश्रांति संगमतीरी । घेवोनियां, स्नान करी । कर्म सारी नित्याचें ॥८८॥
मग येऊनियां राउळीं । श्रीमत्‍ दत्त चरनकमळीं । मस्तक ठेवोनियां प्रार्थिली । कनवाळू माउली अनाथांची ॥८९॥
करोनिया प्रदक्षिणा । करी साष्टांग नमना । मग आरंभिलें स्तवना । पूजा विधाना सारोनी ॥९०॥
जय जयाजी श्रीदत्ता । जय जयाजी अमूर्तमूर्ता । जय जयाजी दीननाथा । संकटहर्ता नमोऽस्तु ते ॥९१॥
जय जयाजी सगुणा । जय जयाजी निर्गुणा । जय जयाजी गुणागुणा - । रहितज्ञाना नमोऽस्तु ते ॥९२॥
जय जयाजी आनंदकंदा । जय जयाजी पूर्णबोधा । जय जयाजी गलितभेदा । सिध्दसिध्दा नमोऽस्तु ते ॥९३॥
जय जयाजी सकलाधीशा । जय जयाजी पूर्णपरेशा । जय जयाजी श्रीमहेशा । भाविकवशा नमोऽस्तु ते ॥९४॥
जय जयाजी अनसूयाबाळा । जय जयाजी कृतान्तकाळा । जय जयाजी रुद्राक्षमाळा । धारी चित्कळा नमोऽस्तु ते ॥९५॥
जय जयाजी भक्तपालका । जय जयाजी ज्ञानवर्धका । जय जयाजी योगिनायका । धर्मरक्षका नमोऽस्तु ते ॥९६॥
तुझें करावया स्तवन । वेदासी पडिले मौन । तेथे मी मतिमंद दीन । पात्र होईन कैसेनि ? ॥९७॥
होईल पृथ्वीचें वजन । वस्त्री बांधवेल अग्न । सागरा करवेल सांठवण । परी तव गुण अतर्क्य ॥९८॥
सुरद्रुम कल्पिल्या दाता । तूं देसी कल्पनातीता । एक तुझे चरणी माथां । होय , ठेवितां, सर्व सिध्दी ॥९९॥
माझी काय मनकामना । हेतु जाणसी पावना । काय करु विज्ञापना । कृपा दीनावरी करी ॥१००॥
न मागे मी धन दारा । नको ऐश्वर्य पसारा । भवाब्धीच्या पैलपारा । नेता ’ खरा गुरु दावीं ’ ॥१०१॥
(४)ब्रह्मयाकारणें हंस । होवोनि देसी उपदेश । ध्रुवाकारणें नारदास । वनी जालासी प्रेषिता ॥१०२॥
अन्य युगींच्या ज्या गोष्टी । किती वर्णूनि होऊं कष्टी । कलियुगामाजीं वाहोनि पृष्ठीं । कित्येक, सृष्टीं उध्दरिले ॥१०३॥
(५)वामनाकारणें अवतार । स्वयें धरिसी दिगंबर । नामयाकारणें खेचर । श्रीकरधरा दाविसी ॥१०४॥
तैसेंचि मज अनाथा । कारणे प्रकटे अनंता । पद्मकरा ठेवी माथा । भवव्यथा दूरकरी ॥१०५॥
ऐसी करितां विज्ञापना । दया आली कृपाघना । कळवळोनि भक्तराणा । म्हणे सुजाणा धन्य तूं ॥१०६॥
आजवरी मजपाशीं । अनेक याचकांच्या राशी । आल्या; परी ’ सद्‍गुरुसी । याची ’ ऐसी मति कैची ! ॥१०७॥
रत्नाकरापाशीं कवडी । कीं शालीदात्यासी दसोडी । मागणे; ते परवडी । विषयगोडी याचिती ॥१०८॥
ऐसा भक्तशिखामणि । आजवरी न आला कोणी । ऐसे सद्‍गुण आठवोनी । सद्‍गद मनीं जाहला ॥१०९॥
प्रत्यक्ष देउनि दर्शन । याचें करीन समाधान । परी मज निकट कांही दिन । ऐसा सुजन असावा ॥११०॥
ऐसा करोनि सुविचार । मग दिधला नाभिकार । सव्यांगीचे पुष्प सुंदर । करुणाकार दे प्रसादा ॥१११॥
मानोनियां प्रसाद थोर । श्रीचरणीं ठेविलें शिर । म्हणे जी मोक्षदानी उदार । तुंचि सागर करूणेचा ॥११२॥
श्रीस नैवेद्य समर्पण । करोनि, सारिती भोजन । आनंदमय तो गेला दिन । सन्निधानीं दत्ताच्या ॥११३॥
दुसरे दिवशी प्रखर । (६)तप आरंभिलें घोरांदर । भीमा अमरजा संगम तीर । स्थान पवित्र पाहिलें ॥११४॥
प्रातःकाळीएं संगमस्नान । करोनियां; अर्ध्यप्रदान । देऊनि; करी दत्तपूजन । चित्तसमाधान राखोनी ॥११५॥
अश्वत्थ किंवा औंदुंबर । छायेसी वाची गुरुचरित्र । एकवेळा फलाहार । करी, समग्र ग्रंथ होता ॥११६॥
उरल्या अवसरी जाणा । दत्ता घाली प्रदक्षिणा । वारंवार विज्ञापना । करोनि, दीना तार म्हणे ॥११७॥
ऐसा लोटला एक मास । मग पारिभद्राचा रस । सेवी जठराग्नि शांतीस । नित्य नेमास चालवी ॥११८॥
ऐसा होतां तपःप्रभाव । संतोषला देवाधिदेव । म्हणे हा न कष्टो भक्तराव । याच भाव शुध्द असे ॥११९॥
(७)दोन मास होतां पूर्ण । ’ महादेवकर यति ’ जाण । तयालागीं देती स्वप्न । तें विचक्षण हो आइका ॥१२०॥
दृष्टान्तामाजीं सांगे तया । कीं " प्रातःकाळ झालिया । जावोनि सांगे रामराया । स्वगृहा जाया तुज आज्ञा ॥१२१॥
तुझे पूर्ण मनोरथ । गृहा जातांचि, समस्त । होतील; राखे स्वस्थ चित्त । चिंता मनीं न करावी " ॥१२२॥
ऐसा झाला जो दृष्टांत । प्रातःकाळी येती संगत । राम साष्टांग दंडवत । तया घालीत यतिराया ॥१२३॥
तुमची आज्ञा मज प्रमाण । परी दृष्टान्तीही दर्शन । न व्हावे मज लागून । हतभाग्य पूर्ण ऐसा मी ! ॥१२४॥
असो, दत्ता येईल दया । प्रत्यक्ष दर्शन देऊनियां । जैं आज्ञा होईल जाया । तैंच या ठाया सोडीण ॥१२५॥
ऐसी स्वामीस विनवणी । करितां, संतोषला मनीं । म्हणे धन्य तूं भक्त ज्ञानी । शिखामणि अससी ॥१२६॥
आम्हां जाहली जी आज्ञा । ती तुज सांगितली प्राज्ञा । कर्तव्य तें करी सुज्ञा । सांगोनि स्वस्थाना ते गेले ॥१२७॥
राम मनीं चिंताक्रांत । म्हणे केवढा मी पतित । मज दर्शन दृष्टांतांत । देणे हे उचित न वाटे ॥१२८॥
ऐसा चिंतेंत गेला दिन । करोनि दत्ताचे चिंतन । रात्रो असतां निद्रित जाण । देखिलें स्वप्न तें ऐसें ॥१२९॥
रात्रीचिया चरण यामी । राम उठे नित्य नेमीं । गर्जतसे प्रातःस्मरामि । दत्तनामीं बहु प्रीति ॥१३०॥
मग बैसती ध्यानस्थ । मानसी ध्याती श्रीमत‍ दत्त । रात्रि घटिका-मात्र राहत । तो अद‍भुत वर्तलें ॥१३१॥
(८)कांही निद्रित कांही जागे । तंव विप्र देखिले दोघे । म्हणती " तव सुकृतौघें । संतोषलो; घे प्रसादा " ॥१३२॥
विप्र दोघे शुचिष्मंत । भस्म रुद्राक्षें शोभत । एक रामा सांगत । दावी संकेत दुसर्‍याचा ॥१३३॥
" की हे महादेव बावा । ब्रह्मरसाचा पूर्ण ठेवा । याचे वोसंगीं रामदेवा । दिधलें सदैवा तुजलागीं ॥१३४॥
आतां तूं न करी चिंता । सुखें स्वगृहाप्रति जातां । त्वरें पावसी मनोरथा । जातों आतां स्वस्थाना ॥१३५॥
जागृती कीं स्वप्न आहे. । राम पुरतें जाणे हें । घाबरा चहूंकडे पाहे । म्हणे कोठें आहे श्रीगुरु ? ॥१३६॥
मग संतोषला मनीं । म्हणे दत्ता अभयदानी । तूंचि श्रेष्ठ त्रिभुवनीं । दुजा कोणी न देखों ॥१३७॥
अनुष्ठानाची सांगता । जाहला श्रीराम करविता । पारणें करोनि; श्रीदत्ता । जाहला प्रार्थिता गमनार्थ ॥१३८॥
पुन्हां ( मागुती ) प्रसन्न चित्त । सव्यभागींचें पुष्प देत । प्रसादास घेवोनि, त्वरित । स्वगृहा येत परतोनि ॥१३९॥
जी मूर्ति पाहिली स्वप्नी । ’ महादेव ’ नामें करुनि । तीच बैसली ध्यानीं मनीं । दुजें नयनीं न देखे ॥१४०॥
म्हणे कई होईल दर्शन । कैं चरणीं भाळ ठेवीन । तत्पदीं गडबडा लोळेन । तेधवां धन्य मी खरा ॥१४१॥
ऐसा लागलासे ध्यास । दया आली श्रीगुरुस । दर्शन देवोनियां यास । तृप्त मानस करुं म्हणे ॥१४२॥
आतां भेटतील श्रीगुरु । भवसिंधूचें महातारूं । शिरीं ठेवितील पद्मकरु । तो चमत्कारु परिसावा ॥१४३॥
उभयातांचा संवाद । कैसा होईल जीवा बोध । उपनिषद्‍ भाग सुस्वाद । सेवा; सावध होवोनि ॥१४४॥
महादेवाचिया कृपें । रामा सच्चिद्‍घन झालें सोपें । जैसा दीप लावितां दीपें । उभय स्वरुपें सारखीं ॥१४५॥
ते कथा अलोकिक । पुढील प्रकरणामाजीं देख । वर्णील सद्‍गुरु सम्यक्‍ । जरी नावेक स्थिर व्हाल ॥१४६॥
अयस्कान्त सन्निधान । होतां लोह पावे चलन । तैसें तुमचें कृपादान । मज अवधान देतसे ॥१४७॥
किती वानूं तुमची महिमा । सागरा काय देऊं उपमा ? माझे अपराधाची क्षमा । करोनि; निजधामा न्या सख्या ॥१४८॥
हास्य गीत विनोद । कोणता तरी धरोनि छंद । श्रीपति बहु मतिमंद । तुमचे सन्निध असावा ॥१४९॥
हेच असे विज्ञापना । वारंवार जी प्रार्थना । उपेक्षूं नको मज दीन । ठाव चरणामाजीं देईं ॥१५०॥
दयाळा श्रीरामराया । आनाथावरी करी दया । मज वोसंगीं घेवोनियां । तारीं; पायां शरण मी ॥१५१॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१५२॥
॥ श्रीराम चंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय एकोणतिसावा संपूर्ण ॥

टीपा- (१) राम होवोनि परमकष्टी । गुरुस्तव सृष्टी शोधीत । -ओवी ११ :-
या ओवीची पार्श्वभूमि मागील अध्यायांत आहे. वाचकांनी २८ व्या अध्यायांतील टीपा ६ व ७ पाहाव्यात. श्रीरामचंद्र
महाराजांसारखें, ईश्वर तेजाचा अंश जन्मःच अंगीं असलेले सत्पुरुष जगाला परमार्थपथावरील सर्व वाटचालीचें मार्गदर्शन,
स्वतः तो मार्ग चालून, दाखवीत असतात. वस्तुतः त्यांना स्वतःला कांहीं प्राप्तव्य असतें असे नाहीं. ’ बाळकाचे साठीं ।
पंतें हाती धरिली पाटी ॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनि दाविती अंगीं ॥’ असे श्रीतुकोबांनीं यथार्थ वर्णन केलें आहे. या
ओवींतील उल्लेखावरुन, सद्‍गुरुप्राप्तीसाठीं जीव खरा तळमळूं लागला म्हणजे मथुष्यास ’ आहार निद्रा मैथुनादि ’ व्यवहारात
वृथा घालविलेल्या आयुष्याबद्दल किती तीव्र पश्चात्ताप होतो व केवढे प्रखर विषयवैराग्य मनांत निर्माण होते, त्या
मनःस्थितीचा फार उत्तम उलगडा होतो. ११ ते १६ ओव्यांतून हें वर्णन आहे.

(२) ऐसा लागलासे ध्यास । शरीर सुखास न पाहे ॥-ओव्य़ा ३० :-
श्रीगुरुप्राप्तीचा ध्यास लागला कीं मनुष्य घरदार, नातीगोती, सामाजिक प्रतिष्ठा, इतकेंच काय पण देहसुखही विसरतो.
खडतर प्रवास, उपासमार, जननिंदा, प्राणघातक संकटे, हे त्याला कष्ट वाटतच नाहींत. श्रीरामचंद्रमहाराज, घर, बायको, सुप्रतिष्ठित
नोकरी हे सर्व सोडून चिंचणीहून गाणगापूरला पायीं गेले त्या वेळचें हे वर्णन हे मुमुक्षूचे मनोभाव -परमार्थपथिकांना नित्य
चिंतनीय आहेत. ( ३० ते ३८ )

(३) लता ऊर्ध्वमुखें जाती .....साधकातें मार्ग दाविती -ओवी ४९ :-
येथील ४९ ते ६६ या ओव्यांतून, गाणगापूरचें निसर्गवर्णन करतांना, वेली, पशुपक्षी यांच्या चित्रणांत सोऽहं साधनेची जी
गुंफण श्रीपतिनाथांनी केली आहे ती बहारीची आहे. या ओवींत वृक्षांच्या शेंडयांकडे वर वर जाणार्‍या वेली ह्या सोऽहं
साधकांना जणूं कांहीं  ’ नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जायला शिकवीत आहेत. या विषयाच्या सलग विवेचनांतीळ अखेरच्या
६६ व्या ओवींत कासव आपली मान आंखडून घेते व स्वेच्छेनें बाहेर काढते यांतून ’ योगिया खूण दाविती ’ असा सुंदर
बोध केलेला आढळतो. ४९ ते ६६ यामधील सर्व ओव्यांतील, हंस कोकिल, मोर, हरिण व्याघ्र भृंग, सर्प, इत्यादिकांसंबंधींचे
निर्देश सोऽहं भाव उपासकांनीं सूक्ष्मतेनें मनन करावेत असे आहेत. मागील कांहीं अध्यायांतील कांहीं टीपांतून आपण हे
पाहिलें आहे कीं प्रस्तुतची सिध्दचरित्र ही पोथी गुरुपरंपरेचीं चरित्रें व सोऽहं उपासनेचें महत्त्व सांगण्यासाठीं लिहिली
गेली आहे. श्रीगुरुपदिष्ट सोऽहं जप करतांना आधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जो अंतरंग प्रवास व्हावयाचा त्याचेंही मार्गदर्शन
या पोथींत अनेक स्थळीं आढळते. ’ हा ऊर्ध्वपंथ आहे. ’ याची जाणीव श्रीपतींनीं ५० व्या ओवींतही पुनः दिली आहेच.
हाच आत्मोध्दाराचा मार्ग ! प्रस्तुत ओव्यांतील ’ नेत्रीं प्रेमाश्रु स्त्रवती ।’ ’ कीर दत्तनामाची ध्वनि करिती ’ ’ वनगाईचे भार ।
सेवे सादर दत्ताच्या ’ इत्यादी ओवीचरणांतील अर्थही विशेष ध्यानांत घेतला पाहिजे. पुष्कळ भाविक लोकांची अशी गैरसमजूत
असते कीं सोऽहं उपासना ही शुष्क निर्गुण उपासना आहे; ’ मी परमेश्वर आहे ’ अशा अर्थाच्या सोऽहं जपांत मनुष्याचा
अहंकार वाढतो, सोऽहं जपामुळें भगवंताची सेवा, नामस्मरण या गोष्टी त्याज्य ठरतात, मनुष्याला अष्ट सात्त्विक भाव
निर्माण न होतां तो अहं ब्रह्मास्मिच्या दंभांत कोरडा पाषाण होतो- पण या सर्व अज्ञानजन्य कल्पना आहेत हे या
ओवीचरणांतील उल्लेखांतूण स्पष्ट होईल. सोऽहं जप हा नामस्मरणाला, सेवेला अगर भावुकतेला लवमात्र विरोधी नाहीं.

(४) ब्रह्मयाकारणें ’ हंस ।’ होवोनि देसी उपदेश -ओवी १०२ :-
श्रीगुरुचरित्राचें पठण व श्रीक्षेत्र गाणगापूर, नारसिंहवाडी येथील सेवा-बहुतेक लोक ऐहिक सुखाच्या कामनेनें करतात.
श्रीरामचंद्रमहाराज असंख्य गुरुचरित्राचीं पारायणें करुण जे गाणगापुरांत आले होते ते सद्‍गुरु प्राप्तीच्या इच्छेनें ! पुढे
गाणगापूर येथील वास्तव्यांतही ग्रंथपठण, प्रदक्षिणा इ. सेवा याच हेतूनें चालूं होती. गाणगापुरी पोंचतांक्षणींच देवाला
आपला हेतु सांगतांना महाराजांनीं जी पूर्वीच्या युगांतील व कलियुगांतील, देवाचीच चरित्रें सांगितली आहेत ती सर्व
भगवंताच्या ’ सद्‍गुरु स्वरुपांतील ’ कृपेचीच आहेत हे विशेष ध्यानांत घेतले पाहिजे. ब्रह्मदेव, ध्रुव, वामनपंडित व
नामदेवमहाराज यांची नांवे नमूद करण्यांत श्रीपतींनीं केवढी समयसूचकता दाखविली आहे ! असो. या ओवींत जो ब्रह्मा व
हंस यांचा उल्लेख आहे.त्याला मूळ आधार श्रीमत्‍ भागवत महापुराणांतील ११ व्या स्कंधांतील १३ व्या अध्यायांत आहे.
या ’ हंसगीते ’ चा तपशील देण्यास येथें अवसर नाहीं. साधक वाचकांनीं श्रीएकनाथी भागवतांत या हंसगीतेवरील
श्रीनाथमहाराजांचें विस्तृत, रसाळ उदबोधक निरुपण पहावे.

(५) वामनाकारणीं अवतार । स्वयें धरिसी दिगंबर -ओवी १०४ :-
स्वतः ’ वामन ’ रुपानें भगवंताचाच दशावतारांतीळ अवतार प्रसिध्द असतांना, ’ हे दिगंबर तूं वामनाकारणें अवतार घेसी ’
असें येथें कसें म्हटलें ? असा सकृत‍ दर्शनीं वाचकांना गोंधळ होण्याचा संभव आहे. म्हणून येथें मुद्दाम टीप दिली आहे.
या ओवींतील वामन म्हणजे सुप्रसिध्द वामन पंडित होत. ते मोठे कृष्णउपासक होते. परंतु त्यांना पढीक ज्ञानांत व
काव्यरचनेंत समाधान वाटेना. म्हणून भगवंताच्या सगुण साक्षात्कारासाठीं वामन पंडितांनीं बदरीस जाऊन तपश्चर्या केली.
त्यांना परमेश्वरानें दर्शन दिले- हीच आठवण महाराज दत्तप्रभूंना करुन देत आहेत. ब्रह्मा विष्णु महेश या देवत्रयापैकीं
महाविष्णु हेच दत्तरुपानें अनसूयामातेजवल राहिल्यानें येथें दिलेली सर्व उदाहरणेम अत्यंत्त सुसंगत आहेत.

(६) दुसरे दिवशीं प्रखर । तप आरंभिलें घोरांदर ओवी ११४ :-
११४ ते ११८ ओव्यांतूण श्रीतिकोटेकर महाराजांच्या अनुष्ठानाची, तपश्चर्येची माहिती दिली आहे. टीप क्र. १ व २ यापुढील
श्रीसद्‍गुरुंचे हें साधकावस्थेतील, मुमुक्षु दशेंतीळ चरित्र वाचकांना नित्य जागृत करणारें नव्हे का ?

(७) ’ महादेवकर यतीलागी देती स्वप्न -ओवी १२० :-
वरीलप्रमाणें श्रीमहाराजांचे दोन महिने अनुष्ठान झाल्यावर, " आतां घरीं जा,  तुझे मनोरथ गांवीं गेल्याबरोबर पूर्ण होतील "
असें श्रीरामचंद्रांना सांगण्याची, श्रीदत्तप्रभूंनीं ’ महादेवकर ’ नामक गाणगापुरांत वास्तव्य करीत असलेल्य़ा कोण्या एका
स्वामींना दृष्टांतरुपानें आज्ञा केली. ( ओव्या १२० ते १२३ ) श्रीमहाराजांच्या हस्ताक्षरांतीळ पत्रांत, एक वर्षभर अनुष्ठान झाले,
असा उल्लेख असल्याचे समजलें.

(८) कांहीं निद्रित कांही जागे । तंव विप्र पाहिले दोघे - ओवी १३२ :-
१३२ ते १३५ ओव्यांतून स्वतः श्रीमहाराजांना देवाचा झालेला दृष्टांत वर्णिला आहे. त्याचें दृष्टांतामध्यें दोन ब्राह्मण आले,
त्यापैकी एक स्वतः श्रीदत्तात्रेय असून दुसरे महाराजांचे भावी सद्‍गुरु श्रीमहादेवनाथ हे होते. श्रीपति म्हणतात: प्रभूंनीं
हातानें महादेवनाथांकडे बोट दाखवून " तुला याचे पदरीं घातला आहे " असे सांगितलें. टीप क्र. ६ च्या पुढील तपःपूर्तीचें
हे चरित्र म्हणावयास हरकत नाहीं.

कठिण शब्दांचे अर्थ :- मत्तास = माझे वडील [ सद्‍गुरु या अर्थी ] (१७) नकुल=मुंगुस (२५) गव्यूत ] सुमारे दोन मैल
(२८) कीर = पोपट, मैना (५५) चाष = चास पक्षी (५६) ’ जवादि ’ बिडालक =बिडाल, बिडालक म्ह. मांजर. ’ जवादी ’ हा
जातीविशेष असून जवादी मांजराच्या अंडामध्यें सुगंध असतो (५७) स्वर्धुनी = स्वर्गगा  (६२) ग्रीवा = मान ( अवयव )
(६६) श्रीकरधर= श्रीविष्णु [ लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारा ] (१०४) सव्य अंग = उजवी बाजू (१११) परिभद्राचा रस = कडूनिंबाचा रस
(११८) चरम याम = शेवटचा प्रहर (१३०) संकेत =खूण, चिन्ह, निर्देश (१३३) अयस्कांत = लोहचुंबक ( अयस म्ह. लोखंड ) (१४७)

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP