मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय आठवा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय आठवा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला

श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो श्रीरामचंद्र गुरुवर्या । त्वद्दर्शनमात्रें अज्ञान विलया । जाय; हें देखोनि मम ह्र्दया । अति आल्हाद होतसे ॥१॥
मागील सप्तम प्रकरणान्तीं । गोरक्ष समाधान पुसती । श्रीमच्छेन्द्रनाथ तयाप्रति । सदविचार उपदेशी ॥२॥
बा रे शिष्या शिरोमणि । धन्य धन्य तुझी वाणी । जे उपनिषदू शिरोरत्न-खाणी । ते आजि तुवां उकलिली ॥३॥
जें तुज पूर्वी कथिलें । तें केवळ शाब्दिक ज्ञान वहिलें । तेणीं समाधान बाणलें । ऐसें कैसें होईल ? ॥४॥
जे अनधिकारी शिष्य वहिले । ते याच शाब्दिक ज्ञानीं ठकले । सर्व ब्रह्म ऐक्या आले । म्हणोनि वेदबाह्य वर्तती ॥५॥
नाना परीचीं पक्वान्नें । वाखाणिता तृप्ति न होणें । पाक -निष्पत्ति लागे करणें । यथाविधि साक्षेपें ॥६॥
ऐसें बोलोनियां वचन । गोरक्षा करविती शुध्दाचमन । मग भूशुध्दि करवोनि जाण । वरी आसन रचियेलें ॥७॥
तळीं दर्भ वरी कृष्णाजिन । त्यावरी शुभ्र वस्त्र घालोन । ऐसें करोनि सुखासन । वरी बैसविती गोरक्षातें ॥८॥
मग घालवोनि पद‍मासन । म्हणती बा मूळबंधाटी देऊन । मध्य मेरू सरसावून । सावधान असावे ॥९॥
ऐसा करवोनि आसनविधि । काय बोलती कृपानिधि । सोऽहं सुखाची समाधि । भोगी आतां निर्धारे ॥१०॥
(१) प्रथम करी षडंगन्यास । ’ सा ’ आदि ’ स ’ अन्त विशेष । तैसेंचि ह्रदयादि षडंगास । त्याची मंत्रें अभिमंत्री ॥११॥
न्यास जाहलिया उपरी । गुरुस्वरुपाचें ध्यान करी । ज्या स्वरुपीं गमनागमन निर्धारी । कवणे काळीं नसे पां ॥१२॥
जें केवळ ज्ञप्तिमात्र । परम प्रकाशमय स्वतंत्र । नासोनि मोह अंधकार । जगा अंतर्बाह्य परिपूर्ण ॥१३॥
ऐसें ध्यान जाहलिया उपरी । उपदेश पूर्ण(२) हंस गायत्रू । अंतरदृष्टि लावूनि खेचरी । मुद्राखूण आज्ञापी ॥१४॥
ऐसी रचना पूर्णपणें । झालिया; म्हणती प्रणवस्मरणें । (३)ओढिजे सकाराचें ठाणें । आधारमुद्रेपासूनी ॥१५॥
मार्ग शुध्द व्हावयाकारणीं । त्रिसप्त सकार घेणें । आणि ’ ह ’ कारातें सोडणें । अनुक्रमें करावे ॥१६॥
शबलांश प्राणायाम सोडून । शुध्दांश लक्षांशें घेइजे पूर्ण । इडेनें ’ स ’ कार घेतलिया पूर्ण । पिंगलेनें ’ ह ’ कार सोडिजे ॥१७॥
तैसेंच ’ स ’ कार पिंगलेने- । घेतां, ’ ह ’ कार सोडिजे इडेनें । द्वादश कुंभक प्रणव धरणीं । (४)अभ्यास लक्षण या नांव ॥१८॥
प्रणवरुप देह सहसा । न भावी ’ मी जीव ऐसा ’ । औटमात्रेचा ओतीस ठसा । नेणोनि, पिसा कां होसी ? ॥१९॥
हें नोहे अनुमान ज्ञान । मोटकें पदरीं घे जाणोन । सच्छास्त्र सप्रचीत प्रमाण । याहूनि आन काय व्हावे ? ॥२०॥
पिंडीं सात ब्रह्माण्डीं सात । त्रिकुटापासूनि ब्रह्मरंध्रांत । मार्ग पश्चिमेचे परिमित । दुजा पूर्वपंथ ऐके ॥२१॥
पूर्वपंथ तो ऐसा जाण । अधःशक्ति आकुंअन । प्राण अपाना मेळवून । ऊर्ध्वपंथें जाईजे ॥२२॥
तैं मध्यशक्ति होय चेइरी । पवन तियेचे अभ्यंतरीं । मनासह रिघोनि साही चक्रीं । सोऽहं स्वरी खेळतु ॥२३॥
प्रकृति-पुरुषपणें विनोद । द्वंद्वीं निर्द्वद्व करी संवाद । ऐक्यरुपीं दावीत भेद । क्षराक्षरभावीं अधोर्ध्व ॥२४॥
क्षररुपें भंवे पिंडीं । अक्षरें उसळे ब्रह्माण्डीं । ऐशा वेरझारा उदंडी । करिते, गणना ते ऐके ॥२५॥
आधारापासून सहस्त्रपर्यंत । एकवीस सहस्त्र सहा शत । सोऽहं शब्दी रुंझी घालित । (५)अजपा विख्यात त्या नांव ॥२६॥
अतुल सामर्थ्य अजपेचें । मूल स्मरण अंतरात्म्याचें । स्फूर्ति देत चहूंवाचे । अच्युतपदासी न्यावया ॥२७॥
अहा तो अच्युतानंत अनामा । धरोनि नानाकार नामा । नुल्लंघोनि एकत्वाची सीमा । जगदंतरीं मिरवतु ॥२८॥
योगीं, त्यागी, भोगी, व्यापी । बहुरुपी बहुसाक्षेपी । तया निरंजना सूक्ष्मरुपीं - । धूंडील आदरें धन्य तो ॥२९॥
मूलाधारीं मंगलमूर्ति । स्वाधिष्ठानीं प्रजापति । सायुधें शक्तीसह श्रीपति । मणिपूरीं म्हणवी आपणातें ॥३०॥
अनुहातीं म्हणे मी ईशान । विशुध्दीं धरिलें जीवपण । गुरुत्वें अग्निचक्रीं पूर्ण । आत्म संकल्पें राहिला ॥३१॥
तोचि स्वर, वर्ण, मात्रामेळीं । ’ हंस ’ रुपी सहस्त्रदळीं- । राहूनि, साही चक्रें चाळी । एकाक्षर सूत्रेंसी ॥३२॥
तें एकाक्षर म्हणसी कवण । ऐके, होई सावधान । अखिल जीवांचें जीवन । कूटस्थ अक्षर बोलती ॥३३॥
अज अव्यय आनंदघन । नित्य निर्गुण निरंजन । सत्य शाश्वत पुरातन । पुराणपुरुष जगदात्मा ॥३४॥
तया शाश्वता उमजले । तरीच जन्म सार्थक जाहले । ना ते व्यर्थचि वाहावले । मायापुरी; गोरक्षा ॥३५॥
तंव गोरक्ष म्हणे स्वामी । हां जी, विनवितो एक मी । तरणोपाय माया-तमीं । योगबळें जो दाविला ॥३६॥
तरी तो योग विस्तारोन । वर्ण, व्यक्ति, मात्रा स्थान । पिंडब्रह्माण्ड विवरोन । विशद करोनि सांगिजे ॥३७॥
नामाकारितां रुप आलें । रुप म्हणतां व्यक्त जाहलें । तें सुवर्ण व्यक्तिरुप वहिलें । पिंड ब्रह्माण्डीं वसे कोठें ? ॥३८॥
तैसेंचि पूर्व आणि पश्चिम । उभय मार्गीचा उपक्रम । कोन शिव-शक्ति नाम । कासयानें झालें तें ? ॥३९॥
त्रिकूट कासया म्हणती । किती मात्रा कोठें असती ? । गुणत्रयाची उत्पत्ति स्थिति । कैसी ? तेंही सांगिजे ॥४०॥
तनु-चतुष्टय विचार । आणि अष्टधेचा प्रकार । अर्धनारी नटेश्वर । प्रकृति-पुरुष कैसा तो ? ॥४१॥
नित्यानित्य विवेचन । मज सांगिजे कृपा करुन । म्हणोनि गोरक्षरायें चरण । सद्‍गद होऊनि धरिय्ले ॥४२॥
चरणीं मिठी घालोनियां । म्हणे पूर्ण ब्रह्म स्वामिया । करूणानिधि, तरणोपाया- । सांगिजे; मी अनन्य तुझा ॥४३॥
प्रश्न करुं नेणे नेटका । परी तूं फेडी सर्व आशंका । ऐसें ऐकतां सद‍गुरुसखा । प्रेमभरें आलिंगी ॥४४॥
न धरत लोटला प्रेमपूर । जीवी जीव एकाकार । झाले; तेथें प्रश्नोत्तत । कैचे उद्‍गार बोलाचे ॥४५॥
आलिंगनाचें कौतुक । कैचा मच्छेन्द्र कैचा गोरख । कैचा नित्यानित्य विवेक । भाग्य अलोलिक वदवेना ॥४६॥
मग ते घोटोनि प्रेमावस्था । गोरख उठविला धरोनि हस्ता । पद‍मकरें स्पर्शोनि माथा । वोसंगा घेवोनि काय म्हणे ॥४७॥
बा रे तूं तरी धन्य धन्य । अससी चिदानंदघन । परी लोकसंग्रहालागोन । मज तुवां पुशिलें साक्षेपें ॥४८॥
तरी ते ऐके तत्त्वतां । जे हे सांडोनि विदेहावस्था । धरोनि देहबुध्दीचे हाता । फिरे आतां माघारीं ॥४९॥
सावधान होई जागा । रे त्वां पुशिलें होतें मागा । कीं मज विस्तारोनि सांगा । योगयोगांगा विशदार्थ ॥५०॥
शुध्द ब्रह्म मूळ माया । पिंडब्रह्माण्ड अष्टकाया । मात्रा वर्ण शक्ति यया । नाम कैसे जाहलें ॥५१॥
काय पूर्ण काय पश्चिम । त्रिकूट श्रीहाटादि नाम । शिवशक्ति नाम संभ्रम । प्रकृति पुरुष कोण ते ॥५२॥
अर्धनारीनटेश्वर । (६)ऐक सांगेन हा विस्तार । तंव गोरक्ष होवोनि तत्पर । पदयुग्म नमी आदरें ॥५३॥
श्रीपद मस्तकीं वंदोन । तनुत्रयाचें केलें कान । अक्षी अक्ष मेळवोन । मार्ग लक्षी बोलाचा ॥५४॥
चकोर आनंदे देखोनि इंदु । चातक लाभलिया घन -बिंदु । त्याहुनि गोरक्षा आल्हादु । पाहे वदनेन्दु श्रीगुरुचा ॥५५॥
हरिखें दाटोनि म्हणे मनीं । काय बोलेल कैवल्यदानी । थोर मी भाग्याचा त्रिभुवनीं । जन्मोनि अवनीं धन्य झालों ॥५६॥
जाणोनि तयाचें अंतर । उचंबळला बोधसमुद्र । आदिगुरु नाथ मच्छेन्द्र । म्हणे सावधान गोरक्षा ॥५७॥
गोरक्षा पुसिला ऐक विचार । जैं हा नव्हता सृष्टयाकार । आकाश आप तेज समीर । अकल्पक अविचार संचले ॥५८॥
तें आदिकारण मूळ । तुज आतां करुं प्रांजळ । जेथें सांठविला ब्रह्माण्डगोळ । ऐके ते अढळ शुभेच्छा ॥५९॥
बा जें मनें देखिलें नाहीं । जेथेंबुध्दीचें न चले कांही । तें शब्द-पर परमात्म सोई । वाड्‍.निश्चयीं अगम्य ॥६०॥
जें गुह्याचें गुह्य निज । जे वेदश्रुतीचें निज बीज । तें परमानंद स्वरुप सहज । नादकलातीत पैं ॥६१॥
ऐसें जे निर्विकार ब्रह्म । तेथे ॐ इत्येकाक्षर नाम । स्फुरले; तें वायुरुपें नियम । वाढला भ्रम तेथूनी ॥६२॥
तेणेंचि कार्य पैसावलें । मूळप्रकृति नाम जाहलें । तिणेचि त्रिगुणातें निपजविले । अव्यक्त आणिले व्यक्तेसी ॥६३॥
पुढें पंचभूतोद्भव । तेंचि अष्टधा जाहलें नांव । जियेचें सकळ मायिक लाघव । वोडंबर रचिलें हें ॥६४॥
ऐसी मायेची परंपरा । भूतपंचकाचा पसारा । याचा द्रष्टा होऊनि पुत्रा । कौतुक पाहे इयेचें ॥६५॥
बा रे इचा आदि मध्य अन्त । पाहूं सरले थोर महन्त । तयांसही पडली भ्रांत । सतासत्‍ व्यापिनी म्हणवोनी ॥६६॥
इनें कालत्रया निर्मिलें । इनें देहत्रय आकारिले । अनामी त्यासी नाम ठेविलें । शिव शिव ऐसें बोलती ॥६७॥
वाम दक्षिण अधोर्ध्व भागा । इनें व्यापिलें अंग प्रत्यंगा । अरुप आणोनि रुप-रंगा । एकीं अनेकत्व दाविलें ॥६८॥
हे शिवशक्ति षड‍गुणेश्वरी । प्रकृति पुरुष परमेश्वरी । अर्धनारी नटेश्वरी । सृष्टयाकारें आकारली ॥६९॥
गोरक्षा हे माया राणी । भुवानत्रयाची गवसणी । पिंड ब्रह्माण्ड व्यापोनी । शेखीं स्वरुपी विलसे हे ॥७०॥
अरे इनें निर्विकारा - । चेतवोनि, आणिलें आकारा । नाद, घोष ध्वनि, अक्षरा । व्यापोनि मात्रा राहिली ॥७१॥
प्रथम आकारीं निराभासा । औटमात्रेचा उभवोनि ठसा । तेथें ब्रह्मा विष्णु महेशा । संस्थापिलें त्रिशून्यीं ॥७२॥
आपण अर्धमात्रा मेळीं । पांचा पंचकाच्या ओळी । राहोनि, देहत्रयाचे चाळी । स्थूळ सूक्ष्म कारणादि ॥७३॥
चारी खाणी चारी वाणी । चौर्‍यांशीं लक्ष जीव-श्रेणी । पंचवीस तत्त्वाम्ची मांडंणी । स्थूळ सूक्ष्म पंचकें ॥७४॥
साही चक्रीं, बावन्नास । व्यापूनि राहिली हे मात्रेस । मूळापासोनि अग्निचक्रास । गणिल्या पन्नासाभारोवरी ॥७५॥
पुढें ज्या उरल्या दोन मात्रा । त्या अचिंत्य अंतरिक्ष जाण पुत्रा । निरंजन निर्मळ निर्विकारा । परात्परा अनुत्तमा ॥७६॥
इतुकी अष्टधा प्रकृति । पिंडब्रह्माण्डा आंतौती । चलाचल सर्वत्र व्याप्ति । ते म्यां तुजप्रति जाणविली ॥७७॥
तंव गोरक्ष म्हणे जी नाथा । किती मात्रेची कोठें संस्था ? । वर्ण, दलादि विशदार्था । साम्ग समर्था दयाब्धि ॥७८॥
म्हणवोनि घाली लोटांगण । मस्तकीं वंदी पद्कंजरेणु । कंठ सद्‍गद कंपायमान । आसुवें नयन निडारले ॥७९॥
ऐशा देखोनि अवस्थेतें । आलिंगिलें श्रीगुरुनाथें । अष्टसात्त्विकभाव भरतें -। जिरवोनि, करी सावध ॥८०॥
म्हणे मम भाग्य भूषण सखया । सावध होई गा गोरक्षराया । तुझी मधुरोक्ति माझे ह्र्दया । प्रेमाल्हादें बोलती ॥८१॥
ऐक वत्स तुवां मजप्रति । पुसियेलें तें संक्षेप रीतीं- मागां निरोपिलें;  तें पुढती । तेंचि आतां अवधारी ॥८२॥
अरे द्विदलादि चक्रें साही । विशुध्द अनुहात मणिपूर पाही । लिंग, आधार क्रमें घेई । बुझे; न होई निदसुरा ॥८३॥
स्वर वर्ण दळें मातृका । याचा अंतरी बोध निका । घेई, चेइरा हो बालका । धरोनि आवांका ये मागा ॥८४॥
म्हणवोनि कुरवाळी, थापटी । बळेंचि गोरक्षा बैसवी नेहटी । येरु पुनःपुन्हां चरणीं मिठी । घालोनि, गर्जे गुरुनामीं ॥८५॥
तंव मच्छेन्द्रापोटीं सुख । दुणी दुणावे संतोख । गुह्य गुजगोष्टि अवंचक । सांगो आदरिल्या सप्रेमें ॥८६॥
तैं गोरक्षें विकळपणा । सांडोनि, सावधान श्रवणा । बैसोनि, पाहे गुरुचिद्‍घना । चातकापरी ऊर्ध्वमुखें ॥८७॥
वक्ता मच्छेन्द्र ज्ञानदक्ष । श्रोता ज्ञानार्क गोरक्ष । चालिला कथेचा सौरस । पूर्वोत्तर पक्ष आयणीचे ॥८८॥
नाना साधनें यमनियम । करितां, नातुडे जे हें वर्म । तें बोलों आदरिलें सुगम । जेणें निष्कामही लांचावती ॥८९॥
असो आतां पुरे उपपत्ति । ऐके पुसिल्या प्रश्नाप्रति । साही चक्री साही मूर्ति । पूर्वीच तुजप्रति निरुपिल्या ॥९०॥
मज तुज मी तूंपणामधीं । सत्य नाहीं गा त्रिशुद्धि । परी लोकसंग्रह वेदविधि । पुससी सुबुध्दी रक्षोनी ॥९१॥
हें जाणवलें माझिया मना । तुझ्या अंतराआतुल्या खुणा । आतां आधारस्थ गजानना । वंदोनि पुढें चालवूं ॥९२॥
तो अपराधिष्ठानमूर्ति । मूळ ॐकार गणपति । सोऽहं हंस परंज्योति । सवें चिच्छक्ति शारदाम्बा ॥९३॥
आरक्तवर्ण चतुर्भुज । रक्तांबर रक्तांबुज । चतुर्दळें तेजःपुंज । स्वर वर्णा निपज तेथोनी ॥९४॥
तया चतुर्दळीं मात्रा चारी । वकारादि सकाराक्षरी । पूर्ण कीजेल्या शास्त्रान्तरीं । तेंचि अवधारी गोरक्षा ॥९५॥
पुढें स्वाधिष्ठान षड्‍दळीं । प्रजापति वसे सुनिर्मळी । बकारादि लकारान्त मेळीं । मातृकावलि विराजे ॥९६॥
मणिपुरचक्र नाभिस्थान । दश दल दश मात्रा डफांतवर्ण । लक्ष्मीकांत मधुसूदन । देव निर्गुण नीलांबुजीं ॥९७॥
उपरीं ऐके अनुहात चक्रा । द्वादशदळीं द्वादश मात्रा । क ठ स ह इतुल्या अक्षरा । केला उभारा द्वात्रिंशत्‍ ॥९८॥
आतां कंठस्थ विशुध्दचक्रा । षोडशदळीं षोडशस्वरा । आ ई ऊ ऋ या अक्षरां । संस्थिलें पुत्रा पूर्णत्वें ॥९९॥
ललाट द्विदलाग्नि चक्रास । नोहे वाचेचा प्रवेश । यालागीं तेथें अंतरिक्ष । बोलिले हं क्षं मात्रेसी ॥१००॥
अरे हे स्थानीं यावयासाठीं । साधनें साधिती महाहटी । एकी जाऊनि गिरिकपाटीं । बैसली नेहटी निर्धारी ॥१०१॥
तरी न पवतीच हें स्थान । कां जे गुरुगम्याची हे खूण । सोऽहं हंसाचें साधन । देशिक दयाघन दे जरी ॥१०२॥
तरीच सर्वस्वें हाता चढे । उगवे योगमार्गाचें कोडें । नरदेहाचें सार्थक घडे । जैं सुकृत खरें शुध्द गांठी ॥१०३॥
असो; इतुकेनि भला । पूर्वमार्ग तो पूर्ण झाला । तेथून पश्चिम अनुक्रमाला । सांगो तुजला यथान्वयें ॥१०४॥
तें परियेसी सावधान । औटमात्रा औटस्थान । त्रिकुटीचें आयतन । ज्यामाजीं त्रिभुवन सामावलें ॥१०५॥
तया त्रिकुटापासोनि चांग । बोलिला पश्चिमेचा मार्ग । ते शुध्द स्वरुपस्थिति अव्यंग । तुझेनि योगें विस्तारुं ॥१०६॥
तुवां पुसिले होते मागां । त्रिकुट कासया म्हणती सांगा । तरी तें आतां या प्रसंगा । ऐक रे अगा सुभाविका ॥१०७॥
त्रिकूट त्रिशून्यात्मक ॐकार । रक्त श्वेत श्यामाकार । नील अर्धमात्रा ईश्वर । बिंदु परात्पर जाणिजे ॥१०८॥
ब्रह्मा विष्णु आणि हर । तेचि अकार उकार मकार । रज तम सत्त्वाम्चें बिढार । गुणावतार गुणमूर्ति ॥१०९॥
जागृदावस्था अधःशून्यीं । स्थूल देह विश्वाभिमानी । कर्ता कर्म क्रिया तिन्ही । जागरुक अखंड ॥११०॥
हे रजोगुणाची व्युत्पत्ति । म्यां सांगितली तुजप्रति । पंचीकृत पंचमहाभूतीं । स्थूळ आकृति उभविली ॥१११॥
दुजा देह तो सूक्ष्म तनु । असे श्वेत अंगुष्ठप्रमाणु । विष्णुमाया तैजसाभिमानु । स्वप्नावस्था गुणसत्त्व ॥११२॥
तिसरें शुध्द तमावरण । श्याम पर्वार्ध कारण । दैवत रुद्र अभिमानी प्राप्त । मकारस्थान मात्रेचें ॥११३॥
सुषुप्तावस्था अज्ञान गडद । भाव मी तूं -पणातीत निर्द्वद्व । परि हे नव्हेचि मोक्षद । झणी विरुध्द बोधा पावसी ॥११४॥
बा हे निबिडावस्था घोर । बां हे कृतान्ताचें कान्तार । येथेंचि जीवाचा होय संहार । यालागी पुनरावृत्ति चुकेना ॥११५॥
म्हणोनि त्रिपुटीचा न्यास । देशिक दयार्नव अवश्य । करोनि; करविती अभ्यासास । सोय साधकासी लावावया ॥११६॥
तेव्हां प्रवेश महाकारणीं । जे चतुर्थ तनु ज्ञानखाणी । तुर्यावस्था सर्वसाक्षिणी । पुढें उन्मनी सहजेचि ॥११७॥
तेथोनि चौ देहाच्या गांठी । सुटल्या मायेच्या मळकडी । अहं ब्रह्मास्मि हेही घोटी । स्वानन्दपुष्टि सहजेंचि ॥११८॥
ऐसी चरमावस्था अच्युत । जेथें कल्पनेचा झाला अंत । निजीं निजानंदी एकान्त । सुखे विचरत स्वस्वरुपीं ॥११९॥
रुपीं असोनि, अरुपता । गुणें वर्तोनि गुणातीतता । बहुकाल गुरुदास्य घडलिया; हाता- । अमलावस्था लाभे ही ॥१२०॥
बा हे निवृत्तदशा उन्मनी । योगी भोगिती योगासनीं । ब्रह्मीं ताटस्थ्य नेत्र दोनी । वस्तु चिद्‍गगनीं कोंदाटली ॥१२१॥
आसन गोल्हाट मंडळीं । इडा पिंगला सुषुम्ना मेळीं । अनुहात नादाचिये कोल्हाळीं । मागील वर्दळी विसरले ॥१२२॥
वोलांडिलें स्थूळ सूक्ष्मा । कारण महाकारण ग्रामा । सांडोनि; पावले उपरमा । अढळ अविनाश निरंजनीं ॥१२३॥
पहिलेंचि त्रिकूट श्रीहाट । लंघिलें गोल्हाट औटपीठ । भ्रमरा चैतन्यचक्रीं नीट । ऊर्ध्व वाट धरियेली ॥१२४॥
त्यापुढें उर्वरित अढळ । हंस निकेतन सहस्त्रदळ । जेथोनि अमृताचे चळाल । स्त्रवती, ते स्थ्ळीं पावले ॥१२५॥
पंचप्राणोपप्रान कला । दशविध अघवा पवनमेळा । जावोनि बिलगला सहस्त्रदळा । तो सुखसोहळा वदवेना ॥१२६॥
दश्य असतांचि झालें वाव । जड प्रकृतीचा पुसिला ठाव । एकात्मत्वें योगिराव । भोगी राणीव समसाम्यें ॥१२७॥
ज्ञानाचें जाहले विज्ञान । विज्ञान लक्षीं गेलें विरोन । दृश्य द्रष्टा त्रिपुटी पूर्ण । विमल ब्रह्मी सामावली ॥१२८॥
मौनगर्भामाजीं तत्त्वतां । निःशब्द संकोचोनि होता । तो धारनाबळें घेवोनि हाता । त्यासवें गोष्टी बोलतसे ॥१२९॥
यापरी हा मुक्तमार्ग । पूर्व-पश्चिम राजयोग । तुज अवंचकभावे अव्यंग । सांगितला सद्‍भावो ॥१३०॥
हे योगीन्द्राचे योगमथित । ऐकोनि, गोरक्ष देहातीत -। झाला; न डोले न बोले मात । स्वानन्द सुखांत निमग्न ॥१३१॥
ऐसें देखोनि मच्छेंद्रे । मागुती थापटी कृपाकरें । बाळा सावध सावध चेईरा हो रे । सांडी बा रे ताटस्थता ॥१३२॥
योगिराया शिष्यटिळका । सावध होवोनि बाळका । जगदुध्दाअ करी निका । जडमूढ लोकां संरक्षी ॥१३३॥
भवाब्धि हा अपरिमितु । खोली रुंदीचें नाही गणित । तेथें तुवा योगसेतु - बांधोनि, उतराव्या जीव-श्रेणी ॥१३४॥
बा हे जन्ममरण अमूप । भोगितां, जीवा नोहें अनुताप । अवंतोनि क्लेशकलाप । पापपंकीं बुडाले ॥१३५॥
ऐसे आत्महंते नर । त्यांचा करावा उध्दार । सोऽहं ब्रह्मानुभवें स्थिर । निजानंदी असावे ॥१३६॥
अनहंकृत देहक्रिया । अखंड आचरे सद्‍गुरुपाया । विज्ञान ज्ञाने शिष्यराया । देहभावीं वर्ते का ॥१३७॥
ऐसी श्रेगुरुची आज्ञोक्ति । ऐकोनि; उघडिली नेत्रपातीं । जिरवोनि ऐक्यभावस्थिति । बध्दांजलि स्तोत्र करी ॥१३८॥
जय जय श्रुतिसार-शिरोरत्ना । अज्ञानतम - नाशक ज्ञानांजना । म्हणोनि पदाब्जी लोटांगणा । घालोनि, गुरुनामें हांक फोडी ॥१३९॥
स्वामिया तुझे स्मरणमात्रीं । आनंद प्रकटे सर्वगात्री व्यापिलासी आब्रह्मस्तंबान्तरी । त्या तुज नमो शाश्वत ॥१४०॥
नमो निर्मला निर्विकारा । नमो निरंजना विश्वोध्दारा । नमो योगामूर्ति योगेश्वरा । चित्सुखसागरा गुरुराया ॥१४१॥
नमो आदि अनादिश्वरा । नमो परम दैवता परात्परा । तुझें पायवणी सुर-नर-किन्नरा । दुर्लभ दातारा श्रीगुरो ॥१४२॥
ते मी पदाम्बु भाग्याचें -। लाभलो, म्हणवोनि गाये नाचे । आन्म्द लहर पूर प्रेमाचे । रोम रोमांची न धरती ॥१४३॥
अहा तुज ध्यावे भजावे तुज । तुझेचि स्मरावे पादांबुज । जप तप साधनांचे कोण काज । नाम निर्लज्ज गावें तुझें ॥१४४॥
ऐसी पूर्णावस्था प्रेमोदगारा । बोधब्धिमाजिले अलंकारा । गोरक्ष लेइला ; देखोनि मच्छेन्द्रा -| आनंद अंबरी न समाये ॥१४५॥
मग म्हणे बापा आतां । पुरे ह्या ऊर्मी कालावस्था । सहजस्थिति राहोनि आतां । जगदुध्दारा करावे ।१४६॥
सतासत्‍-भेद जीवेशर । उपदेशी;  पाहोनि अधिकार । कर्म उपासना ज्ञानसार । नाम गजरेंसी सदभावें ।१४७॥
तेवींच त्यागात्यागपूज्य । तुवां तें पुसिले न जरी मज । तरी अंतरी याचा उमज । घेईजे बरवा जाणोनी ॥१४८॥
बाप शुध्द शबल गुंती । हे मायेची विस्तीर्ण बुथी । इचे तंतू नुगवतां, होती - । महाकष्ट रे प्रियोत्तमा ॥१४९॥
यालागी सांडी शवल वाच्यांश । धारणाबळें ’ सत्‍ ’ शब्दास । पूरकें आणोनि पूर्णत्वास । ब्रह्यीं प्रतिष्ठी साधका ॥१५०॥
अरे हे प्रवृत्ति निवृत्ति । अखंड अधोर्ध्वमुखें धांवती । पतन कीजे परप्राप्ति । सामर्थ्य दाविती साक्षेपें ॥१५१॥
ऐसा विचार सदसत्‍ । पिंड ब्रह्माण्ड अंतवन्त । जाणोन; साक्षित्वें देहातीत । मदनुग्रहें आसावे ॥१५२॥
हें ब्रह्मबीज आदिनाथें । प्रेमें उपदेशिलें अंबेतें । तेंचि गूज म्यां वोपिलें तूंतें । चौशून्यातें द्योतक ॥१५३॥
(७)अरे जो तनुव्याप्त अहंभावो । हाचि बध्दतेचा मूळ ठावो । तो निःशेष सांडोनि पाहा हो । सोऽहंभावी असावे ॥१५४॥
(८)सोऽहं ब्रह्मानुभवी वृत्ति । ती वृत्तीच होय निवृत्ति । आन नाना साधनोपपत्ती । काय शास्त्रोक्ति निरनुभव ? ॥१५५॥
असों, तूं तो ब्रह्मसंपन्न -। झालासी, पावनाचा पावन । आतां गुणत्रयाचें साधन । साधक जनांसी उपदेशी ॥१५६॥
अहा सकळ साधना श्रेष्ठ् साधन । सद्‍गुरु अदिनाथाचे चरण । तेथे तनुमनेंसी अनन्य । रिघावे शरण गोरक्षा ॥१५७॥
ऐसें बोलोनि ते वेळी । निजात्म सुखाचे कल्लोळीम । परमोत्साहें ह्र्दयकमळीं । कवळोनि वोपिली निजशक्ति ॥१५८॥
ह्र्दया ह्र्दय मेळविलें । श्रीगुरु सतशिष्या ऐक्य जाहलें । सांगणे पुसणें सहजचि ठेलें । मौन पडलें वाचेसी ॥१५९॥
तेव्हां श्रीपति म्हणे संतां । किती वानूं मी निजसुकृता ! । जे या सिध्दांच्या सिध्द-कथा । वदवा निजसत्ता मजकरवीं ॥१६०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित भाव । भव गज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१६१॥
श्रीरामचंद्रापर्णमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ स्कोऽहं हंसः ॥

टीपा - (१) प्रथम करी षडगन्यास- संपूर्ण ओवी ११:- प्रस्तुतचा श्रीसिध्दचरित्र हा ग्रंथ, श्रीगुरुपरंपरेंतील सिध्द पुरुषांची चरित्रें सांगतांना प्रामुख्याने सोऽहं जपाच्या अभ्यासाचें महत्त्व विशद करण्यासाठीं रचला आहे. सोऽहं हंसः या अजपाजपाचे उल्लेख उपनिषदांपासून संतवाड्‍.मयापर्यंत अनेक ठिकाणी आढळतात. मौंजी बंधनाचे वेळीं उपदेश होतो त्या गायत्रीप्रमाणेंच या अजपा-ह्म्स गायत्रीचाहे विशिष्ट जपविधि आहे. त्या विधानांत अजपेचा ॠषि, छंद देवता, बीज, शक्ति, कीलक, न्यास, ध्यान, जप, उत्तरपूजा, समर्पण इत्यादि सर्व अंगें आहेत. प्रस्तुत ओवीत ’ सा ’ आदि ’स’ अन्तविशेष असे जे षडंगन्यास उल्लेखिले आहेत ते खालीलप्रमाणें आहेत . ’ त्याचि मंत्रें अभिमंत्री ’ याचाही खुलासा क्रमाने दिला आहे.
(१) हं सां ज्ञानात्मने अंगुष्ठाभ्यां नमः
(२) हं सीं सूर्यात्मने तर्जनीभ्यां नमः
(३) हं सूं सोमात्मने मध्यमाभ्यां नमः
(४) हं सैं निरंजनात्मने अनामिकाभ्यां नम:
(५) हं सौं निराभासात्मने कनिष्ठिकाभ्या नमः
(६) हं सः सर्वात्मने करतलपृष्ठाभ्यां नमः
(१) हं सां ह्रदयाय नमः
(२) हं सीं शिरसे स्वाहा
(३) हंसूं शिखायै वषट्‍
(४) हं सैं कवचाय हुम्‍
(५) हं सौं नेत्रत्रयाय वौषट
(६) हं सं: अस्त्राय फट्‍

(२) हंस गायत्री- ओवी १४:- कोणातेंही इंद्रिय अगर कोणतीही माला वगैरे स्थूल साधन यांचा उपयोग न करतां नैसर्गीक
श्वासोच्छ्‍वासाबरोबर जें जपाचे मानसिक अनुसंधान राहते त्यास अजपा गायत्री म्हणतात. हीच हंस गायत्री होय.
 ’ अजपा नाम गायत्री योगिनां मोक्षदायिनी । ’ असें या हंस गायत्रीचें महत्त्व उपनिषदाम्त वर्णिले आहे. बृहदारण्यकांत
गायत्री शब्दाची व्युत्पत्ति पुढीलप्रमाणें आहे. गै प्राण व त्रै - वांचविणे, रक्षण करणें - अर्थात जेव्हां आचार्य शिष्याला गायत्री मंत्राचा पाठ देतो तेव्हां तो त्या शिष्यांचें अज्ञानापासून रक्षण करतो, अस्तु.  सोऽहं जपासंबंधी अगर अजपा
जपासंबंधी या ग्रंथांत दिल्या जाणार्‍या टीपा या एका अर्थानें हंस गायत्रीसंबंधीच आहेत. ( पहाः ’ सदाचार ’ प्राकृत टीका श्लोक १० )

(३) ओढिजे सकाराचें ठाणें । आधार मुद्रेपासुनी -ओवी १५ :-
श्रीसिध्दचरित्राम्त आदिनाथापासून श्री तिकोटेकर महाराजांपर्यंत जी गुरुशिष्यपरंपरा वर्णिली आहे त्या परंपरेंत, सोऽहंचा
अभ्यास शिष्याला सांगतेवेळीं एका विशिष्ट प्रक्रियेची ’ गुरुगम्य ’ खूण दिली जाते. ’ प्रणव समरणें सकाराचें ठाणें - आधारमुद्रेपासूनि ओढणें म्हणजे काय ते प्रत्यक्ष श्रीगुरुंजवळ शिकलें पाहिजें या शाखेंतील सध्याचे सद्‍गुरुपदस्थ श्रीस्वामी स्वरुपानंद ( पांवस-रत्नागिरी ) ही प्रक्रिया शिकवितात.

(४) अभ्यास लक्षण या नांव- ओव्या १६,१७,१८,:-
नाडीशुध्दीसाठीं येथें प्राणायमाची एक पध्द्ति सांगितली आहे ती अशी : इडेनें म्ह. डाव्या नाकपुडीनें ’ स ’ कार घ्यावयाचा हा पूरक. बारा ॐ कार होईपर्यंत कुंभक करावयाचा व पिंगलेनें म्ह. उजव्या नाकपुडीनें ’ ह ’ कार सोडावयाचा.
हा रेचक म्हणावा. याप्रमाणे एक प्राणायाम होतों पुन्हां पिंगलेनें ’ स ’ कार घेऊन द्वादश प्रणव कुंभक करणें आणि
इडेनें ’ ह ’ कार सोडणें अशा पध्दतीनें एकवीस प्राणायाम करावेत म्हणजे मार्गशुध्दि होते.
 
(५) अजपा विख्यात या नाव -ओवी २६ :-
वरील टीप २ पहा : शिवाय- पुढील २७ व्या ओवींत म्हटल्याप्रमाणें अजपाजय हें ’ अंतरात्म्याचें मूल स्मरण ’ असल्यामुळे, विमल आत्मज्ञानाचा बोध करणार्‍या उपनिषदांनीं व श्रीशंकराचार्यापासून श्रीज्ञानदेव- समर्थापर्यंतच्या
किंबहुना सद्य:कालीन अनेक साधुसंतांनी अजपाजपाची ख्याति वर्णिली आहे. ’ सदाचार ’ नामक ग्रंथांत ’ सर्वत्र प्राणिनां
देहे जपो भवति सर्वद । हंसः सोऽहमिति ज्ञात्वा सर्वबंन्धैः प्रमुच्यते ’ अशी श्रीमदाचार्यांनीं ग्वाही दिली आहे. या
अजपेचा आणि आत्मसाक्षात्काराचा निकटचा संबंध आहे. अस्मिता म्हणजे मी आहे ही जाणीव सर्व स्थावर जंगम प्राण्यांत असतेच. त्या अंहतेच्या पलीकडे जो चैतन्य स्फुलिंग तो देहामध्यें सूक्ष्मरूपानें पाहणारास सोऽहं रुपानें अनुभवास येतो- नव्हे त्याच्याशी एकरुप होऊन राहता येतें. अशी पात्रता , देश, काल, जाति, धर्मनिरपेक्ष कोणाही मानवास
प्रयत्नांती येऊं शकते. म्हणून अजपाजपाचें महत्त्व अनन्यसाधारण आहे.

(६) ऐक सांगेन विस्तार -ओव्या ५३ ते १३० :-
श्रीगोरक्षनाथ हे साधकच्या भूमिकेवरुन सद्‍गुरु श्रीमच्छेंन्द्रनाथांना ३७ ते ४३ ओव्यांतून अनेक प्रश्न, अनेक शंका विचारतात. त्याला श्रीसद्‍गुरुंनीं येथून पुढें ’ यापरी हा मुक्त मार्ग .... तुज अवचकभावे सांगिरला सद्‍भावो ’ या १३० व्या
ओवीपर्यंत उत्तरे दिली आहेत. हे निरुपण वाचकांनी फार तन्मयतेनें वाचून मनन केले पाहिजे. या भागांत तीन विषय आले आहेत ते असे: (अ) ७६ व्या ओवीपर्य़ंत अष्टधा प्रकृतीचा मायेचा विस्तार वर्णन केला आहे.
(ब) ९० ते १०३ ओव्यांपर्यंत योगशास्त्रांतील ’ पूर्वमार्गा ’ चे विवेचन आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुध्द,
आज्ञा व सहस्त्रदल अशीं चक्रें देहामध्यें मानली गेली आहेत. त्यांचीं स्थानें ठराविक आहेत. तें तें चक्र उमललें म्हणजे
साधकांना विशिष्ट स्वरुपाचे अध्यात्मिक अनुभव येतात . या प्रत्येक चक्राच्या ठराविक पाकळया किंवा दलें आहेत.
त्यामध्ये विशिष्ट वर्ण, बीजें, मात्रा मानतात. श्रीगणेश, प्रजापति, विष्णु अशा क्रमानें चक्राच्या देवताही आहेत. यांचे वर्णन या भागात आहे. अधिक जिज्ञासु वाचकांनी इस्लामपूरचे वैद्य यांची ’ षट्‍चक्रभेदनव प्रणवोपासना  हीं पुस्तकें पाहावी (क) ओवी १०५ ते १३० यांतून ज्याला ’ पश्चिम मार्ग ’ म्हणतात त्या योगमार्गाचा उल्लेख आहे. त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्रमरगुंफा इत्यादि संज्ञांनीं या पश्चिम मार्गाचा उल्लेख होत असतों . मुख्यतः पश्चिम मार्ग हा श्रीगुरुंच्या शक्तिपात दीक्षाद्वारें साधकानें अनुभविण्यात आहे हें लक्षांत ठेवले पाहिजे.

(७) अरे जो तनुव्याप्त अहंभावो । हाचि बध्दतेचा मूळ ठावो - ओवी १५४ :-
आत्मतत्त्व निर्लेप आहे. तें हेतु ना उपादान असें आहे; आणि देह जड आहे मग ही जन्म मरणपरंपरा, ही सुखदुःखे कोणाला भोगावी लागतात ? अशा अर्थाचा उद्भवानेही भागवतांत प्रभूला प्रश्न केला आहे. नुसत्या देहाचा किंवा नुसत्या
आत्म्याचा विचार केला तर दोहींचें स्वरुप असें आहे कीं ज्ञानघनतेमुळें केवळ आत्म्याला व जडत्वामुळे केवळ देहाला संसारपरंपरा भोगण्याची पाळी कधीही येणार नाहीं. पण जीवचैतान्याला देहाचा आश्रय केल्यावर हा सुखदुःखरुपी, जन्ममरणरूपी संसार भोगावा लागतो हें तर प्रत्यक्षच आहे . मग हे कोणामुळें घडतें ? तर याला कारण अहंकार होय.
हा अहंकार जीवाला स्वतःच्या आत्मस्वरुपाचा विसर पाडून देहच मी असे मानावयास लावतो. यावरुन असें दिसून येईल की अहंकार तनूचें पडलें वालभ हाच बध्दतेचा मूळ ठाव आहे. या ओवीच्या पुढील चरणाचा विचार असा आहे कीं देहोऽहं हा भाव सोडून जर तो अहंकार परमात्मस्वरुपाला जडेल; तो अहं जर सःशी समरस होईल तर संसार नाहीसा होईल. या अभ्यासानें, निदिध्यासानें जीव मुक्त होईल. म्हणून या चरणांत ’ हा अहंभाव देहापासून निःशेष सोडवून सोऽहं भावावर येण्याचा श्रीगुरु उपदेश करीत आहेत. ’ जयाचे अहं विश्रामे । आत्मरुपी ॥ ’ तो श्रीज्ञानेश्वर माउलींच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे ’सुटला गा ॥’
(८) सोऽहं ब्रह्मानुभवी वृत्ति । ते वृत्तीच होय निवृत्ति - ओवी १५५ :-
घरदार, बायका मुलें याला ’ संसार ’ म्हणतात तो लौकिक अर्थ होय. कल्पनांच्या, वृत्तीच्य्दा अखंड प्रवाहाला संसार म्हणतात व त्यामुळेंच पुनरपि जननं पुनरापि मरणं असा शास्त्रीय अर्थाचा संसार जीवाच्या मागे लागतों. जोंपर्यंत या
उठणार्‍या वृत्ति शमविण्याचा अगर त्या वृत्तीचें साक्षी होण्याचा अभ्यास मनुष्य करीत नाही तोंपर्यंत त्याला स्वरुपाचें ज्ञान होऊन संसारांतून सुटण्याची शक्यताच नसतें मनांत दरक्षणीं उठणार्‍या असंख्य वृत्ति त्रिपुटीयुक्त असतात. मन म्हणजेच मूर्तिमंत कल्पना अशी श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं मनाची व्याख्या केली आहे. या मनामुळेंच म्हणजे सदोदित उठणार्‍या कल्पनांमुळेंच आत्मवस्तूला जीव दशा आली आहें कांटयानें कांटा काढावा त्याप्रमानें या इतर सांसारिक कल्पनांची संगति सोडून जीव जर आपल्या मूळच्या सच्चिदानंद स्वरुपाची एकच शुध्द कल्पना करील, त्याच एका वृत्तीचें अनुसंधान ठेवील तर ती शुध्द वृत्ति त्याला आपोआप अधिष्ठानाप्रत घेऊन जाईल. सोऽहं ही वृत्ति खरी पण ती
ब्रह्मानुभवीं वृत्ति आहे व ती वृत्ति दृढ अभ्यासानें आत्मस्वरुपीं विलीन होईल असें येथें श्रीगुरु सांगत आहेत. या १५५ व्या ओवींत सिध्दपुरुषांचा अनुभव सांगितला आहे.  

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP