मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय चौथा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय चौथा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला.

श्रीगणेशायनम: ॥
त्रिकुटाचळीं कैलास शिखर । शुद्ध रजताकार शुभ्र । देदीप्यमान प्रभाकर । पौर्णिमेचा चंद्र जैसा ॥१॥
क्षीरसमुद्राचें आवरण । जया पर्वता असे जाण । माध्याह्नींही सूर्यकिरण । ताप ज्या स्थळीं न देती ॥२॥
जेथें उदयो ना अस्त । प्रकाशमय ओतप्रोत । अधोर्ध्व आणि दिक्प्रात । पाहतां जेथें दिसेना ॥३॥
ऐशिया पर्वताचे शिखरीं । नांदे भोळा त्रिपुरारी । जो भक्तजनांचा कैवारी । लीलावतारी आदिनाथ ॥४॥
पर्वताची उंची बहुत । कष्ट पावतील निजभक्त । ऐसें जाणोनि उमाकांत । मार्ग-रचना करीतसे ॥५॥
सहस्त्र सूर्याचें तेज । दाहकत्व सांडोनि सहज । शीतत्व सांडोनि चंद्रराज । मार्गी प्रकाश दाविती ॥६॥
स्वल्प स्वल्पान्तरावरी । विसांवे केले नाना परी । पूर्व मार्गी सप्त निर्धारीं । पश्चिमेसी सप्त पैं ॥७॥
स्वर्गंगा वाहे अखंड । अमृतमय लोट उदंड । जेथील जीवनाधारें ब्रह्माण्ड । जीवन पावे सर्वदा ॥८॥
ऐसा मार्ग परम सुलभ । परी सद्गुरुविणें अति दुर्लभ । असतां सुमार्ग सुप्रभ । अंधां दुर्गम होतसे ॥९॥
जे स्वज्ञानें चढूं म्हणती । ते परम दु:खें पावती । नाना कुमार्गे धांवती । हटेंच गर्ती पडती ते ॥१०॥
सद्गुरु माझी माय माउली । केली कृपेची     साउली । करीं धरोनी देउळीं नेलें क्षण न लागतां ॥११॥
(१)देउळीं जाऊनि शिव पाहिला । तंव जीवचि माझा गेला । इतर काय जाणे या बोला । गुरुपुत्र डोला पावती ॥१२॥
जो परेहूनि परता । न लिंपे माया विवर्ता । तो सद्गुरु ग्रंथकर्ता । काय पुढें वदवीतसे ॥१३॥
तृतीय प्रकरण पूर्ण होतां । शंकर जाहला भाष्य देता । जे गिरिजे पाहूनि एकान्ता । निजतत्त्व तुज कथीन ॥१४॥
ऐसा कित्येक काल गेला । अपर्णेचा भाग्योदय आला । कीं तप:प्रभाव उदेला । पार्वतीचा ते वेळीं ॥१५॥
अंकीं घेऊनि विश्व-माता । उपदेशीत जगज्जनिता । तो सुसंवाद श्रोता । यथानुक्रमें परिसिजे ॥१६॥
उपदेश एकाक्षराचा भाव । सत्स्वरुप सावयव । गुरुगुह्याचें गौरव । सांगे हरु अंबिकेसी ॥१७॥
(३)सांडोनि क्षरभाव `ह' कारा । घेईजे (३)अचिन्त्य अक्षरा । अकार मकारा - । उपरील जे गोठी ॥१८॥
ते हे उपदेशाची मात ।(४)देहत्रय-कर्दमाचा अंत । जिवाचा शिवाचा पैलप्रांत । सूक्ष्माकार स्वसंवेद्य ॥१९॥
अधोमुख बाह्यदृष्टि । गिरिजे येथेंचि पडली तुटी । अनंत जन्माच्या आटाटी । श्वान सूकर खरादि ॥२०॥
या दु:खाची व्हावया आटणी । अपर्णे पाहिजे उलटोनी । जे सर्व सुखाची खाणी । जन्म अवनी जेवाची ॥२१॥
गिरिजे या मूळ एकाक्षरें । जीवाचें जीवपणचि सरे । अहं ब्रह्मास्मि इया गजरें । गर्जे वेदु अखंड ॥२२॥
ज्ञानांबुधि करुनि मथन । सार काढिलें त्यांतून । त्याचें हें एकाक्षरे आयतन । पंचमातृकालंकृत ॥२३॥
ऋग्यजु: सामाथर्वण । चहूंचेंही ऐसेंचि वचन । प्राणोहमस्मि ब्रम्ह प्रज्ञान । अथर्वण बोलत ॥२४॥
`सर्वं खल्विदं ब्रह्म' । हें सामवेदींचें वर्म । तत्त्वमसि त्रिपदागम । एकरुप प्रतीति ॥२५॥
यापरी चिदानंदघनें । चित्कला उपदेशिली ईशानें । म्हणे ऐकिलें नगकन्ये । ज्ञानसरिते ज्ञानखाणी ॥२६॥
जें चिन्मात्रस्फूर्ति असे । तेही जाणिजे मायिक पिसें । शून्य-पूर्णा अनारिसे । तरतमप्रत्यया वेगलें ॥२७॥
नेति नेति निगम बोले । निर्धार नेणिवेमाजीं द्डाले । तें दिव्य ज्ञान निरुपिलें । परापर जें अवाच्य ॥२८॥
हें एकाक्षर गुह्य नाम । मुनिजनांचें विश्रामधाम । तद्‍वाचक सोऽहं ब्रह्म । लक्ष्य अलक्ष्यातीत जें ॥२९॥
तें ऐकूनि जगज्जननी । डोल बोलासी ग्रासूनि । ठेली तद्‍रुप होवोनी । ऐक्यपणें निवडेना ॥३०॥
इकडे हरु उपदेशित । ते तरी जाहली समाधिस्थ । तों मच्छीउदरीं सिंधुजा - कांत । रिघोनि विंदान काय करी ॥३१॥
नासापुटें प्रवेशोन । दिव्य ज्ञान केलें श्रवण । पुन:पुन्हां हुंकार देऊन । प्रार्थोनि वदवी शंकरांतें ॥३२॥
तेणें ब्रह्मानन्दें निर्भर । अक्षकपाटें लावूनि शंकर । म्हणे दुर्गे ज्ञानविचार । पुसिला तो परिसिला कीं ? ॥३३॥
क्षराक्षर अधोर्ध्व भाव । बिंदुयुक्त पूर्ण प्रणव । नाद-कलातीत तत्त्व । पंच ब्रह्म तारकादि ॥३४॥
हें गुह्य वेदगर्भोद्भव । औटपीठींची राणीव । सोऽहं मात्राशून्य व्यय । माझें ध्येय हें श्रीराम ॥३५॥
सोऽहं श्रीराम अंतरीं । जाणे मी कृतकृत्य गौरी । उप ध्यान पूजा बरी । याहून आन मज नाहीं ॥३६॥
हें तूं जाणिलें कीं सुंदरी । म्हणोनि नेत्र उघडी त्रिपुरारि । तंव ते नाहीं देहावरी । चित्कला मीनली चैतन्यीं ॥३७॥
मग ते मूळपीठ मातृका । शिवें थापटूनि अंबिका । सावध केलिया उपरीं देखा । काय म्हणे जगद्‍गुरु ॥३८॥
ऐक्यता आणि विकळपण । दोहींसही मागें सारुन । (५)सहजस्थिति अवलंबून । स्वस्वरुपीं असावे ॥३९॥
तंव ते म्हणे शंकरा । तुम्हीं जें सांगितलें हरा । ते नाद बिंदु कला सत्वरा । पाहोनि आलें, पुढें सांगा ॥४०॥
ऐसे तियेचे बोल ऐकोन । विस्मित जाहले त्रिलोचन । म्हणे हुंकार प्रतिवचन । कवणें मजसी दीधलें ? ॥४१॥
मी तरी साकल्यें ज्ञान विचार । अवंचकपणें केला विस्तार । इचा देखोनि प्रेमादर । तरी कोणें हुंकारें हिरितलें? ॥४२॥
म्हणोनि ध्यानीं शोधिनि पाहे । तंव तो विधीचा तात होये । म्हणे भली रे भली साधिली सोय । बाहेर येई पद्मनाभा ॥४३॥
नव्हते गुणत्रय पंचभूत । तैंपासोनि तुवां हेत । धरिलासी, तें आजि कृत्य । बरवें साधिलें अच्युता ॥४४॥
आतां हें अगम्य ज्ञानसार । येणें करावा जगदुद्धार । ऐसें ऐकोनि आज्ञोत्तर । बद्धांजुळी उभा ठाके ॥४५॥
भाळ विशाळ आकर्ण नयन । चारुगात्र आनंदघन । श्यामसुंदर सुहास्यवदन । पीतवसन तडित्‍सम ॥४६॥
श्रवणीं कुंडलें मकराकार । पदयुग साजिरें सुकुमार । ध्वजपद्मादि अंकुश वज्र । कीर्तिकर सुचिह्में ॥४७॥
मुकुटीं झळके दिव्यमणि । तो हा योगिराज शिरोमणि । पुढील भविष्यार्थ जाणोनि । क्षेमालिंगनीं मिसळला ॥४८॥
आदिनारायण आदिनाथ । हा नामभेदही नाहीं जेथ । ते या जीवाचिया कणवा समर्थ । महीमंडलीं विचरती ॥४९॥
आली वाट भुलोनि जेथ । ते या जीवाचिया कणवा समर्थ । महीमंडलीं विचरती ॥४९॥
आली वाट भुलोनि मंद । जीव जाहले अतिबद्ध । तयांसी दावावया निजपद । उदित मच्छेन्द्र सिद्धयोगी ॥५०॥
दुस्तर भवनिधि तरावयास । बाह्या उभवोनि बाहे विश्वास । म्हणे साधन एक धरा विश्वास । अविश्वासीं नागोवा ॥५१॥
पूर्ण पर्व हे नरकाया । आजि जोडिलें महोदया । तरी मूळ प्रयागीं स्नान होय । ऐसी सोय साधा हो ॥५२॥
ऐसे सांगोनि मच्छेन्द्रनाथ । योगाड्ग प्रकटील अव्याहत । तो हा अनुभवबोध अद्वैत । सिद्ध सिद्धान्त सुवर्म जें ॥५३॥
ते सिद्धसुवर्म परिपाठीं । जेणें जीवासी नोहे अटाटी । ते कृपेनें सांगेल गोठी । उलटा दृष्टि निरंजनीं ॥५४॥
अज्ञानावरण कृपाबळें । वितुळतीं भ्रांतीचीं पडळें । ऐसा योगप्रभाव प्रांजळें । दाविला आतां नि:शब्दीं ॥५५॥
जेणें द्वैत देशोधडी । होवोनि, अद्वयानंद गुढी । उभवील, ते अतुल गोडी । सेवोत आवडी मुमुक्षु ॥५६॥
इतर योग हा योगध्वज । परमार्थगर्भीचे निजबीज । जे आनंदाचें भोज । बोलेल स्वमुखें श्रीहरु ॥५७॥
तेथें श्रीपति दीन रंक । श्रीरघुनाथाचा सेवक । उभा जोडोनि हस्तक । वाट पाहे बोलाची ॥५८॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्रभाव । भव-गजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥५९॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥ अध्याय चौथा संपूर्ण ॥
==
टीपा-(१) शिव पाहिला । तंव जीवचि माझा गेला - ओवी १२ :-श्रीपती म्हणतात, ``सद्गुरुंच्या कृपेनें माझें शिवस्वरुप मी ओळखलें. माझी जीवदशा संपली. ही जीवदशा नाहींशी होणें म्हणजेच `जीव जाणें' असें समजतात. पहा :
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥
(२) सांडोनि क्षरभाव `ह' कारा-ओवी १८:- शाश्वत अशा आत्मस्वरुपाचा नाशिवंताशीं, दृश्याशीं कांहींही व कधींही संबंध नाहीं असा पक्का निश्चय करण्याच्या अभ्यासाचा या ओवीचरणांत निर्देश केला आहे. सोऽहं जप हा श्वासांत `सो' व उच्छ‍वासांत `ह' असा होत असतो. `सो' ध्वनींत `मी स: म्हणजे नित्य सत्य असा परमात्मा तत्त्वत: आहे' असा भाव ठेवून उच्छवासांतील `ह' कारांत `परमात्मास्वरुपाशीं सर्वथैव विलक्षण अशा क्षर, अनित्य, नामरुपात्मक प्रकृतीशीं आपला कांहीं संबंध नाहीं - असा दृढ भाव ठेवायचा असतो.

(३) घेईजे अचिन्त्य अक्षरा - ओवी १८ :- नाशिवंताच्या अपेक्षेनें जें शाश्वत म्हटलें जाते असें `अ-क्षर' परमात्मस्वरुपच आपण आहोंत, आपलें मूळचें रुप तें आहे असा भाव, श्वास घेतांना `सो' ध्वनींत असावा असें लगेच या ओवींत सुचविलें आहे.

(४) देहत्रय-कर्दमाचा अंतु-ओवी १९:- पंचभूतात्मक, वासनामय व अज्ञानरुपी तिन्ही देहांच्या - स्थूल, सूक्ष्म व कारण देहाच्या - कर्दमाचा म्ह. मिश्रणाचा अंत करणारा अर्थात्‍ निरास करणारा ज्ञानोपदेश.

(५) सहजस्थिति अवलंबून । स्वस्वरुपीं असावे - ओवी :- अष्टांगयोगांतील समाधींत जगाचें व देहाचें भान नसतें, केवळ आत्मसुखाचा अनुभव असतो. पण ही समाधि उतरल्यावर तो आत्मानंद व्यवहारांत टिकत नाहीं. समाधि साधलेले योगी याच कारणानें व्यवहारापासून, जगापासून दूर राहूं इच्छितात. नाथ संप्रदायांतील `सोऽहं' जपांत मन मुरलें म्हणजे त्या आनंदाशीं ऐक्य व विकळपण (म्ह.वियोग) या दोन्ही अवस्थांपलीकडचे आत्मसुख सदैव राहतें. नाथपंथांतील हा योगी उदंड कर्मे करीत असतांही समाधींतच असतो. हीच सहजावस्था ! देहभान विसरुन काष्ठवत्‍ झालेल्या पार्वतीस अशा सहजस्थितीचा अवलंब करण्यास शिव सांगत आहेत.

कठिण शब्दांचे अर्थ : - भाष्य देता झाला = वचन दिलें (१४) कर्दम = चिखल (संस्कृत) येथील अर्थ : मिश्रण, एकत्रित विचार (१९) आटाटी = परिश्रम, कष्ट (२०) पंचमातृका अलंकृत = ॐ काराच्या अ, उ, म, अर्धमात्रा व बिंदु ह्या पांच मातृका
(२३) त्रिपदागम = तत्‍ + त्वम्‍ + असि ह्या तीन पदांचा आगम. वेदरुप अशी तीन पदें.
(२५) मच्छीउदरीं = मत्स्यीच्या पोटांत; सिंधुजाकांत = विष्णु (सागरांतून निघालेल्या लक्ष्मीचा कांत) (३१) अक्षकपाटें = डोळ्यांच्या पापण्या (३३) अवंचकपणें = न फसवितां, प्रामाणिकपणें; हिरितलें = लुबाडलें (४२) नागोवा = नागवणूक, सर्वस्वाची हानि (५१) पडळें = पटलें (सं) पडदे, आवरणें, पदर (५५) योगध्वज = सर्वश्रेष्ठ योग (५७)

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP