मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय एकविसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकविसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमः श्रीकुलस्वामिनी । चंडमहिषासुरमर्दिनी । हे आदिशक्ति भवानी । नवदुर्गे ॥१॥
तूं सर्वभूतांची चालक । आम्हां जीवांसी मोक्षदायक । यालागीं मी बाळक । काकुळती ये ॥२॥
जरी हो का पृथ्वीपति । तया मंत्रियावांचोनि काय गति । तैसा तुजविण त्रैलोक्यपति । पांगुळा होय ॥३॥
आई अपार तुझा महिमा । नलगे श्रुतीसीही सीमा । मग तो मूढपामरां आम्हां । आतुडे केवीं ? ॥४॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । हेही होती तव किंकर । मग मूढासी तुझा पार । काय लागे ? ॥५॥
ऐसी तूं अगाध शक्ति । आकळावया एकचि युक्ति । जे, शरण व्हावे अनन्य भक्ति । तुझ्या चरणी ॥६॥
यालागीं साष्टांग द्ण्डवत । पहुडोनि तुझिया चरनाप्रत । पुढती चालावया ग्रंथ । अनुज्ञा मागे ॥७॥
तरी आतां त्रिपुरसुंदरी । बैसोनि ह्र्दयाभीतरीं । ग्रंथ बोलवी वैखरीं । बाळाचिया ॥८॥
येर्‍हवी तरी म्यां दुर्बळें । जे अध्याय सागर वलंडिले । ते तुझेचि कृपा-कटाक्षबळें । आदिमाते ॥९॥
आणि पुढीलही सागर । वाटे तैसाचि दुर्धर । तोही व्हावा पैलवार । तुझेचि योगें ॥१०॥
आतां वंदू श्रीमल्हारी । जो आमुचा कुळकैवारी । दिधली प्रसाद -मिषें भाकरी । पूर्वजातें ॥११॥
असो, पैं जेणें संसारबंधन । तोडिलें, तयाचेचि विस्मरण । झाल्या; मजहुनि कृतघ्न । दुजा कोण या जगीं ? ॥१२॥
म्हणोनि श्रीराम सद्‍गुरु । जो भवसागरीचें तारूं । वंदूनि तया; आरंभ करुं । पुढील कथा ॥१३॥
कां जें वेदत्रयीं नेणिजे । जेथ तो ’ नेति ’ म्हणोनि ठाकिजे । तें गूज सोऽहं मंत्रें सहजें । धरोनि दावी ॥१४॥
आतां तोचि सोऽहं दोरा । हाती घेवोनि आधारा । इया त्रिकुटपैलपारा । होईल मी ॥१५॥
परी या त्रिकुटापैलीवरी । सहस्त्रदळामाझारीं ।  जो बैसला कैवारी । श्रीरामचंद्र ॥१६॥
तोचि येवोनि तारक । जरी उचलोनि नेई बालक । तरी न लगतां नावेक । कार्य होई ॥१७॥
यालागीं त्याचेचि पाय । धरावे; हा सुलभ उपाय । येर्‍हवीं होईल की अपाय । निश्चयेसी ॥१८॥
परी हा सद्‍गुरुसी लळा । पाहूनि माझा आगळा । श्रोती तैसेचि रक्षिजे बाळा । इतुके मागे ॥१९॥
तुम्हांसी लागली कथेची भूक । परी थांबा जी नावेक । कां जो गुरुस्तव परिपाक । सिध्द झाला पाहिजे ॥२०॥
अन्नावांचोनि वाढणें । हें तों अबध्द बोलणें । नातरी तयावीण जेवणें । हेंही तैसेंचि ॥२१॥
येथोनि आतां श्रोतेजन । पूर्ण केले गुरुस्तवन । हें कथामृतभोजन । कर्णमुखें करावें ॥२२॥
तयामाजी स्वल्प विसांवा । घेवोनियां, ऐकावा । जो अध्याय एकविसावा । बोलेन आतां ॥२३॥
मागां बोलिलो महादेवबावा । जो वैराग्यभक्तीचा ठेवा । पंढरी क्षेत्रीं गुंडाख्य सेवा । करीत राहे ॥२४॥
मग तेथोनि पुढत पुढत । कैसा जाहला वृत्तान्त । तो करोनि एकचित्त । परिसावा जी ॥२५॥
एकदा तयाच्या मना । ऐसी आली योजना । कीं आतां तीर्थाटणा । निघावे मियां ॥२६॥
तीर्थयात्रेसी सम । नाहीं दुसरें तप उत्तम । एकदां पहावें आनंदधाम । वाराणसी ॥२७॥
ऐसें विचारुनि एकला । (१)तो गुंडाख्य मुनीचा चेला । काशी यात्रेसी निघाला । महादेव ॥२८॥
प्रयाग क्षेत्रीं तपोनिधि । पावोनि, अशेष तीर्थविधि । करोनि, कांहीं दिनावहि । तेथेंचि राहिला ॥२९॥
मग तेथोनि गेला वाराणसी । कांही काळ क्षेत्रवासी । होवोनि केली पंचक्रोशी । गयातीर्थ देखिलें ॥३०॥
यात्रा उरकोनि ऐसियापरी । महादेव आले नागपुरीं । तंव तेथें वास करी । रामचंद्र ॥३१॥
पूर्वी एकेचि गांवी राहिले । आणि एकाच गुरुचे चेले । म्हणोनि बहु सख्य मिळालें । उभयतांचें ॥३२॥
बहुतां दिवशींची भेट । लाहोनि; रामचंद्र झाले तुष्ट । देखोनि अमृताचा घट । तृषार्त जेवीं ॥३३॥
येरुही म्हणे मी धन्य धन्य । सखा भेटला मातें अनन्य । पाहोनि तुझें दर्शन -स्तन्य । चित्तार्भक तुष्टलें ॥३४॥
यापरी ते मित्र उभय । महादेव आणि रामराय । वानिती स्व-स्वभाग्योदय । अन्योन्य भेटीं ॥३५॥
पुरातन स्नेहासाठीं । बोलती अन्योन्य गुजगोष्टी । ऐसी पडली नित्य राहाटी । उभयतांची ॥३६॥
रामराय आपुले घरीं । नित्यवाची ज्ञानेश्वरी । त्यांत तयाची अर्थकुसरी । अपूर्व दिसे ॥३७॥
तैसेंचि वैराग्य आलें चित्तीं । पालटोनि गेली पूर्वस्थिति । आणि प्रपंचाची स्मृति । स्वप्नीही नसे ॥३८॥
मुखांतूनि निघे वाणी । ती ब्रह्मरसाचीच खाणी आणि देखणेंही जनीं वनीं । आन नोहे ॥३९॥
अनन्य वृत्ति उदासीन । अहर्निशीं आत्मचिंतन । किंबहुना तो निधान ब्रह्मसुखाचा ॥४०॥
ऐसा देखोनि अवचट । मित्र-स्थितीचा पालट । महादेव मनीं अलोट । आश्चर्य होय ॥४१॥
म्हणे हा तरी आमुचा । गुरुबंधु होय साचा । परी अनुभव पाहतां याचा । पूर्ण दिसे ॥४२॥
अहो रामरायाचे बोल । किती सानुभव सखोल । ऐकतांचि येताती डोल । माझिया मना ॥४३॥
या गोष्टीचें अन्तर्बीज । काय असावे ? न कळे मज । तरी आतां प्रश्न सहज । यातेंचि करुं ॥४४॥
ऐसें विवरोनि महादेवें । पुशिले सुह्यदासी नम्र भावें । कीं रामराया उत्तर द्यावे । मम प्रश्नासी ॥४५॥
(२)एकाचि कल्पतरु बुडीं । बैसले असतां दोघे गडी । एका पुरती मनोरथ कोडी । दुजिया नोहे ॥४६॥
नातरी एकाचि धेनूचे । वत्स होऊनि उभय साचे । एका वैपुल्य दुधाचें । अन्या लंघन ॥४७॥
तैसे आम्ही दोघेही । होवोनि एक तीर्थग्राही । तूं कृतार्थ, आणि मीचि कांहीं । नेणें कैसा ! ॥४८॥
ऐसें कैसेनि संभवे । तें कृपा करोनि सांगावे । कीं जे पुसितो अनन्य भावें । तुजलागी ॥४९॥
दिसती प्राप्ताचीं लक्षणें । तुझिये अंगीं पूर्णपणें । जैसी बोलिली श्रीकृष्णें । गीतेमाजी ॥५०॥
तुझे पूर्वस्वभाव-गुण । जैसे मजला ठावे पूर्ण । तैसे आणिक कवण । जाणों शके ? ॥५१॥
कां जे आम्हा उभयतांचा । स्नेह नोहे आजकालचा । जन्मापासोनि साचा । मित्रभाव ॥५२॥
परी मागां जें जें देखिलें । तें सर्व पालटोनि गेलें । हें सांग बापा झालें । नवल कैसें ? ॥५३॥
सदा बैससी एकान्तीं । अखंड समाधान चित्तीं । आणि धालेपणाची दीप्ति । मुखीं झळके ॥५४॥
तुझे बोलणें आणि चालणे । निजणें आणि जेवणे । किंबहुना श्वास घेणें । भिन्न देखे ॥५५॥
ऐसा कवण धन्वंतरी । भेटला सांग पां लवकरी । जेणे हे भवरोगहारी । मात्रा दिधली ॥५६॥
तुझ्या दृष्टीची साम्यता । आणि संभाषणीं रसिका । देखोनि मजला तत्त्वतां । चोख वाटे ॥५७॥
तुझी शांती आणि दान्ती । तैशाचि परी देहकांन्ति । अपूर्व देखोनि; माझी मति- । गुंग झाली ॥५८॥
देही असोनि विदेह स्थिति । उदासिन मनोवृत्ति । हे अलिप्तपणाची प्राप्ति । केवी जाहली ? ॥५९॥
तूं तत्त्वज्ञान निपुण । निजानंदे परिपूर्ण । त्या आनंदाचे कारण । सांगे मज ॥६०॥
इय मित्राचिया बोला । पतिसोनि, राम हासिन्नला । मग काय बोले शिष्य भला । चूडामणिचा ॥६१॥
मित्रा तुझी हे जिज्ञासा । अत्यंत रिझवी मानसा । क्षुधाकालीं वत्स जैसा । धेनूप्रति ॥६२॥
एरवी तरी होते मनीं । हेंचि गा मित्रशिरोमणी । एकदां निजानुभव भाषणीं । तोषविसी आमुतें ॥६३॥
तरी पुसिल्यावाचोनि कथन । तें केवळ अटवीरुदन । कीं भग्न घटीं जीवन । घातलिया, निरर्थक ॥६४॥
यालागीं तुझी जिज्ञासा । देखोनि केली परीक्षा । आतां झाला भरंवसा । तुझा मातें ॥६५॥
(३)तरी आतां जाण बापा । येथें एक सद्‍गुरुकृपा । त्यावांचोनि दुजा सोपा । मार्गच नाहीं ॥६६॥
आधींच पडलें मायातिमिर । माजी विषयांध झाले नर । मग केवीं बा साक्षात्कार । निजवस्तूचा ? ॥६७॥
तरी येथें महादेवा । एकचि उपाव बरवा । जे हातीं घेवोनि सोज्जवळ दिवा । गुरुकृपेचा ॥६८॥
देह -ठाणवीं सेवा-वात । घालितां भक्ति-स्नेह त्यांत । क्षणामाजी उजळे ज्योत । सद्‍गुरुकृपा ॥६९॥
तया कृपेचा प्रकाश । होतांचि; फळे उपदेश । मग उठाउठी नाश । अज्ञानाचा ॥७०॥
येर्‍हवीम तरी देखे मित्रा । मद्‍ह्रदय प्रेमपात्रा । प्रकाशविणें नेत्रा । काय गति ? ॥७१॥
तैसा सर्व अभ्याअ निका । आणि उपदेशही हो का । परी व्यर्थ होई एका । गुरुकृपेविणें ॥७२॥
हो कां जरी भूमि सुपीक । माजी पेरिलें बीज चोख । तरी अपेक्षिजे विपुलोदक । पर्जन्याचें ॥७३॥
कां उत्तम बीज पेरिलें । वरी मेघोदकही वर्षलें । परि तें जैसें वायाचि गेले । खडकावरी ॥७४॥
नातरी क्षेत्र आहे चोखट । माजीं वाहती उद्कपाट । परी धान्य पेरिलें जुनें पोचट । तरी कें विरुढे ? ॥७५॥
यालागीं भूमि बीज आणि जळ । तीनहीं होतां सानुकूळ । तैंचि यत्न होती सफळ । कृषीवलाचें ॥७६॥
तैसा सत्‍ शिष्य अधिकार । आणि उपदेश बीज साचार । वरी कृपाही थोर । सद्‍गुरुची ॥७७॥
ही तीनही जैं एकवटती । तैंचि ह्र्दयग्रंथी सुटती । मग हळुहळूं फुटती । ज्ञानांकुर ॥७८॥
परी या तिन्हीमाजीं प्रधान । सद्‍गुरुकृपा हेंचि जाण । येर दोन्ही साधारण । अंगभूत ॥७९॥
इये कृपेची बोल । होतांचि उगवे ज्ञानवेल । मग पुष्पें प्रसवी विपुल । अनुभवाचीं ॥८०॥
मग तेथ जो स्वरुपानंद । तोचि वाहे गा सुगंध । आणि भरोनि सांडे मकरंद । ब्रह्मरसाचा ॥८१॥
यालागीं तुवां जें पुशिलें । कीं आम्ही एका गुरुचे चेले । होऊनि; ऐसें पडलें । अंतर केवीं ? ॥८२॥
तरी आतां ऐके बापा । या माझिया प्रपंच=द्विपा । श्रीचूडामणीची कृपा । सिंहीण झाली ॥८३॥
तो सद्‍गुरु चूडामणि । लाभतां चिद्रत्नाची खाणी । तात्काळ झाली बोळवणी । संसाराची ॥८४॥
स्मरतांचि हा माझा धनी । श्रीसद्‍गुरु चूडामणि । नेणो कैसी खुंटली वाणी । पुढें न चले ॥८५॥
ऐसें बोलोनि स्तब्ध झाला । तो चूडामणीचा चेला । तंव डोळ्यावाटे आला । अश्रुपूर ॥८६॥
कंठ झाला सद्‍गदित । प्रेमें सर्वांग स्वेदभरित । रोमांच आले नखशिखान्त । थरारोनी ॥८७॥
ऐसा सद्‍गुरुचा आठव । होतांचि भरले सात्त्विक भाव । तें देखोनि महादेव । ऐसें वदे ॥८८॥
धन्य धन्य रामराया । म्हणोनि दंडवत घालोनि पायां । म्हणे बापा तूझिया भाग्योदया । पार नाहीं ॥८९॥
जे कां देवचूडामणि । योगियांचा शिरोमणि । तो लाभला चिंतामणि । तुझिये हातीं ॥९०॥
आतां तुज मित्र म्हणतां । लाज वाटे कीर चित्ता । तूं सद्‍गुरुचि तत्त्वतां । मजलागीं ॥९१॥
ना, तें कैसेहि पाहतां । तूं सद्‍गुरुचि तत्त्वतां । जे (४)पितुःसम ज्येष्ठ भ्राता । ऐसें म्हणती ॥९२॥
तेवीं आधीच तूं गुरुबंधु । माजी तत्त्वबोध सिंधु । मग तुझिये गुरुत्वीं विवादु । कवण करी ॥९३॥
यालागीं तुझे चरण । हेंचि माझें भवतरण । त्वांवांचोनि मज शरण्य । दुजें नाहीं ॥९४॥
परी येक शंका चित्ती । जें मी पुसतों पुढत पुढती । ते फेडावी जी निगुती । प्रसन्न मनें ॥९५॥
जे तूं म्हणसी चूडामणि । झाला मज कैवल्यदानी । परि हे वाटे कहाणी । असंभाव्य ॥९६॥
चूडामणीचें देहपतन । होऊनि जाहले बहुत दिन । मग तयांचे चरण । लाभले केवीं ? ॥९७॥
इया प्रश्ना श्रीरामचंद्र । मुमुक्षु चित्तचकोरचंद्र । कैसें बोलिला मृगेन्द्र । भव-दन्तीचा ॥९८॥
(५)पूर्वी केली महादेवा । जे गुंडाख्यतीर्थ सेवा । तोचि पुढें वोलावा । फळा आला ॥९९॥
एके नाममंत्रें नांगरिली । वरी निजतीर्थ भिजविली । येरें सोऽहं बीजे पेरिली । चित्तभूमि ॥१००॥
एवं दोघेही माझे दानी । गुंडाख्य आणि चूडामणी । यालागी अखंड ऋणी । उभयांचा ॥१०१॥
परंतु तुवां जे पुसिलें । तें बोलणें तैसेंचि ठेलें । आतां सांगेन भलें । चित्त देई ॥१०२॥
बापा रे श्रीसद्‍गुरुचाअ । वियोग कहीं नोहेचि साचा । जरी का जे या स्थूळाचा । त्याग केला ॥१०३॥
अरे झालिया घट भग्न । तरी कां आकाश होय छिन्न । तेंही होय अपरिच्छिन्न । जयापरी ॥१०४॥
नातरी उदधीचे तरंग । घडीघडी पावती भंग । तरी समुद्र काई सांग । नाश पावे ? ॥१०५॥
कां सुवर्णाचीं लेणी । वितळोनि झाली आट्णी । तरी काय सोनेपणीं । भेद आथी ? ॥१०६॥
तैसे हे योगी । जरी जाहले देहत्यागी । व्यापोनि ठेले, आगी । काष्ठीं जेवीं ॥१०७॥
याहीवरी जे सद्‍गुरु । नाथमार्गीचे तारक तारूं । स्वकीयाचा कैवारु । अत्यंत घेती ॥१०८॥
मग असोत दुरवरी । अथवा अत्यंत शेजारी । विदेह अथवा देहधारी । कैशाही योगें ॥१०९॥
परी स्वजनाची प्रथमैक । कानीं रिघतांचि हांक । न विसंबितां नावेक । पाशीं ठाकती ॥११०॥
मग जरी तो पाथस्थ । प्रपंच निदाघें तृषित । तया पाजोनि बोधामृत । तृप्त करिती ॥१११॥
कां पाय़ीं रुतला  मोहकांटा । किंवा पडला अव्हांटा । लाविती तया योग्य वाटी । हस्ते धरुनी ॥११२॥
हे असो, पाय थकले । देखोनियां अगम्य शैलें । अथवा धैर्य गळालें । मानसीचें ॥११३॥
तैं हे नाथपंथीचे वाटाडे । कुरवाळोनि घेती कडे । जैसी माता वाडेकोडें । तान्हयातें ॥११४॥
आणि त्वरें करुनि धांव । उजूं ठाकती तोचि गांव । जेथ एकछत्र राणीव्व । अद्वैताची ॥११५॥
यालागीं जो एकदां । शरण आला सद्‍गुरुपदा । तया नरा आपदा । हे भाष खोटी ॥११६॥
मजलाही ऐशाच परी । कृपा झाली अवधारी । जे, चूडामणी कैवारी । भेट दिधली ॥११७॥
प्रत्यक्ष येवोनि एक वेळीं । कारुणनिधीं कृपा केली । दावोनियां गुप्त किल्ली । समाधीची ॥११८॥
नमोनि बैसलों आसनावरी । तंव प्रकाश देखें अंतरी । आणि सद्‍गुरुचि चराचरी । भरला दिसे ॥११९॥
मग कैंचा उरे संसार । आणि कैचा देहाहंकार । जो जळूनि गेला प्रखर । बोधानळें ॥१२०॥
ऐसा चूडामणि केसरी । रिघतां माझ्या ह्र्दयकुहरीं । उठाउठी ’ प्रपंच -करी ’ । प्राणा मुके ॥१२१॥
परिसोनि ऐसा वृत्तान्त । महादेव झाला उत्कंठित । मग घालोनि दण्डवत । ऐसें विनवी ॥१२२॥
आतां काय बोलूं अधिक । पूर्वीच विनविलें अशेख । जे मज आश्रयो तूंचि एक । भूमंडळी ॥१२३॥
देखे बापा येर्‍हवी तरी । धुंडाळिता पृथ्वीवरी । तुजऐसा धन्वंतरी । कवण लाभे ? ॥१२४॥
आणि जंव न देखिलें उदक । अथवा सिध्द नसे पाक । तंवचि धरवे तहानभूक । क्षूधिता जेवीं ॥१२५॥
नातरी प्रिय भ्रतार । बहू काळ वसितां ग्रामांतर । तंवचि कांता धरी धीर । कवण्याही परी ॥१२६॥
परी तेचि विरहिणी । पति येतां गांवांहुनी । निमिषही युगाहुनि । मानी वडील ॥१२७॥
तैसा मियां आजवरी । रोग साहिला कवण्यही परी । देखिले नव्हते जोंवरी । चरण तुझे ॥१२८॥
परी आतां करुणानिधी । सरली तितिक्षावधि । क्षणभरीही भवव्याधि । साहवेना ॥१२९॥
म्हणोनि आतां कृपाघना । चातक वर्षी मज जीवना । पसरोनि ठेलोंसे; आनना । प्यावया बा मी ॥१३०॥
आणितां घराबाहेरी । देखोनि पक्षी सहचारी । करी धडपड पंजरी । पोपट जैसा ॥१३१॥
नातरी जैसी मासोळी । शुष्क कासारी तळमळी । मग उडो पाहे जळीं । समुद्राच्या ॥१३२॥
तैसा हा माझा जीव । अखंड करी लवलव । सोडावया अहंभाव । कारागृह ॥१३३॥
सांडोनि हा शबल पिंड । कैं मी ठाकेन ब्रह्माण्ड । ऐसी लागली अखंड । हांव मनीं ॥१३४॥
येर्‍हवी देहापासोन । साक्षी चैतन्य भिन्न । ऐसें भासलें तरी ज्ञान । परोक्षचि तें ॥१३५॥
जरी वसंताचा उबारा । शांत करी शीत वारा । तरी तो तृषातुरा । केवी निववीं ? ॥१३६॥
तैसें हे परोक्ष ज्ञान । देई किंचित्‍ समाधान । तरी तेणें तृप्ति पूर्ण । होईचिना ॥१३७॥
परी हेही माझे जल्प । स्वामीपुढें झाले अमूप । यालागीं विनवी; कोप । न करावा जी ॥१३८॥
की जे असे मी याचक । आणि दातया तूं धनिक । म्हणोनि येथें अधिक । बोलवेना ॥१३९॥
रंकें मागावे धन । हेंचि तया प्रयोजन । किंवा जैसे जीवन । तृषातुरें ॥१४०॥
रोगी जाऊनि वैद्याकडे । चिकित्सा-शास्त्र बडबडे । तरी तयाचें सांकडे । कोण वारी ? ॥१४१॥
तैसा जयाचा संकल्प । जे ब्रह्म व्हावे निर्विकल्प । न करावा अति जल्प । सद्‍गुरुपुढें ॥१४२॥
तरी तया हेंचि उचित । जे मागाव अपेक्षित । नम्रभावें दंडवत । घालोनियां ॥१४३॥
म्हणोनि यया अतिक्रमा । करोनि वात्सल्यें क्षमा । दुःखापासोनि रामा । सोडवी मज ॥१४४॥
ऐसी तयाची तळमळ । देखोनि सद्‍भक्ति प्रेमळ । उठले प्रेमार्णवीं कल्लोळ । रामह्र्दयीं ॥१४५॥
ते पुढे सुरसकथा नागर । परम गुरुचा जयजयकार । परिसोत श्रोते सज्जन चतुर । गुरुभक्त ज्ञानी ॥१४६॥
तारक सद्‍गुरुचा पदरज । ’ कृष्णसुत ’ श्रीपतीचा अनुज । म्हणे मम ह्र्दयीं श्रीरघुराज । वसोनि वदवील निजलीला ॥१४७॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१४८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय एकविसावा संपूर्ण ॥

टीपा :- (१) गुंडाख्य मुनीचा चेला .....महादेव -ओवी २८ :-
सांप्रदायिकांच्या परंपरा स्मरणांत गुंडाख्य रामचंद्र -महादेव असा क्रम आहे. येथें गुंडाख्याचा चेला महादेव म्हणण्याचें
कारण असें की मूळांत रामचंद्र व महादेव हे दोघेहीं गुंडामहाराजांचे उपासना मार्गातील शिष्य होते. ( अ. १९ ओव्या ३१
ते ३६ पहा ) त्या अनुरोधानें हा उल्लेख आहे.
(२) एकाचि कल्पतरुबुडीं ....आनंदाचें कारण सांगे मज -ओव्य़ा ४६ ते ६० ’ ऋते ज्ञानात्‍ न मोक्षः ’ ’ ज्ञानात एव तु कैवल्यं ’
असा श्रौत सिध्दान्त आहे. जीवाला स्वरुपज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळाला या एकाच हेतूनें उपनिषदांपासून साधुसुतांपर्यंत
सर्वांनीं नाना प्रकारें उपदेश केला आहे. मुक्ती वरील भक्ति ही पुढची पायरी आहे व संतवाड्‍.मयांतून त्याचे उल्लेख आढळ्त
असले तरी मुख्यतः जीवाला ज्ञान प्राप्त व्हावे हाच त्यांचा सगळया उपदेशाचा हेतु आहे. हा ज्ञानप्राप्तीचा अधिकार येण्यासाठी
मनुष्यानें प्रथम ईश्वरार्पण बुध्दीनें स्वकर्मे करावीत. त्यामुळे ईश्वर प्रसन्न होऊन त्याला वैराग्याचा प्रसाद देतो. अशा
वैराग्ययुक्त अंतःकरणानें आपल्या इष्टदैवताची एकाग्रतेनें उपासना केली असतां तें वैराग्य दृढावतें म्हणजेंच संपूर्ण
चित्तशुध्दि होते आणि त्या देवाच्या कृपेनेच मनुष्याला तत्त्वजिज्ञासा उत्पन्न होते. सत्संगतींत त्याला उमजते की
ज्ञानावाचून कृतार्थता नाही; मग तो जिज्ञासु ज्ञानदात्या सद्‍गुरुच्या प्राप्तीसाठी तळमळू लागतों. योग्यवेळीं सद्‍गुरु मिळून
गुरुपदिष्ट आत्मचिंतन सुरुं होते व निष्ठापूर्वक, दीर्घकाळ श्रवण मनन निदिध्यास करतां करतां ’ मी परमात्मा आहे ’
असा त्या जीवाला अपरोक्ष साक्षात्कार होतो. दुःखाची आत्यंतिक निवृत्ति आणि परमानंदप्राप्ति -असा मोक्ष त्याला याचि
देही याचि डोळा लाभतो. या जीवन्मुक्त अवस्थेत देहाचें शेष प्रारब्ध भोगून संपतें, होत असलेल्या कर्मात अहंकार व
फलास्वादाची वासना नसल्यानें क्रियमाण कर्माचा त्याला लेप लागत नाहीं आणि संचित कर्म आत्मज्ञानाचे योगें दग्ध
होऊन गेलेलें असतें. तात्पर्य जन्मान्तराला कारणीभूत होणार्‍या या तीनही प्रकारची कर्माची बाकी पूज्य झाल्यामुळे त्या
जीवन्मुक्ताला हा देह संपतांच विदेहमुक्ति प्राप्त होते. म्हणजेच जन्ममरण परंपराखंडन होते. हें सर्व विवेचन या टीपेंत
करण्याचें कारण असें कीं श्रीमहादेवनाथ हे ज्या वेळी उपासनेंतून जिज्ञासु भूमिकेवर आले होते त्यावेळी श्रीरामचंद्रमहाराज
नागपूरकर यांची जिज्ञासा मोक्षगुरु श्रीचूडामणि महाराज यांनीं गिरनार पर्वती तृत्प केली होती. गुरुपदिष्ट आत्मबोधाच्या
निदिध्यासानें ब्रह्मभूयाय कल्पते ’ एथपर्यंत श्रीरामचंद्र पोहोंचले होते, ही प्रगतीची कथा श्रीमहादेव नाथांना माहीत नव्हती
श्रीरामचंद्र हेही आपणासारखेच गुंडामहाराजांचे नामधारक असतांना त्यांच्या ठिकाणीं पूर्ण शांतिसमाधान आढळते तसे
आपणांस कां लाभलें नाहीं असें कांहीसें संशयात्मक कुतूहल महादेवबोवांचे ठिकाणी त्यांवेळी होते. ही त्यांची मनस्थिति
लक्षांत घेतली म्हणजे येथील ४६ ते ४८ या तीन ओव्यांतील गर्भितार्थ चांगला उलगडतो.

(३) आताम जाण बापा......तात्काळ झाली बोळवणी । संसाराची -ओव्या ६६ ते ८४:-
प्रस्तुतच्या एकोणीस ओव्य़ांतून श्रीद्महादेवनाथांच्या ’ तूं निजानंदें परिपूर्ण । त्या आनंदाचें कारण । सांगे मज । ’ या
विनंतीस श्रीरामचंद्र महाराजांनीं जे उत्तर दिले आहे । त्यांत ज्ञानमार्गातला सर्व प्रवास थोडक्यात व काव्यमय शैलीत
नमूद केला आहे. व तो चिंतनीय आहे. श्रीराचचंद्र व महादेव हे दोघेही नागपुरांत बालपणापासूनचे स्नेही होते व ते जेव्हां पंढरीस श्रीगुंडामहाराजांकडे गुरुपदेशासाठीं ( वेगवेगळ्या वेळी किंवा कदाचित एकत्रही ) गेले त्यावेळी शुध्द
आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करण्यास त्यांना आणखी अवधि असल्यामुळे दोघांनाही महाराजांनी नाममंत्र दिला.
( अ १ टीप ८ पहा ) पुढें श्रीरामचंद्र महाराजांना ज्ञानमार्गातील उपदेशाचा अधिकार प्राप्त होतांच ईश्वरेच्छेनें नागपूर
सोडण्याचा प्रसंग येऊन गिरनारला जावे लागले आणि तेथें श्रीचूडामणींनी ज्ञानोपदेश केला. दासबोधादि ग्रंथांत प्रतिमागुरु मंत्रगुरु, मोक्षगुरु वगैरे जे उल्लेख आहेत त्यांतील श्रीचूडामणी हे रामचंद्राचे मोक्षगुरु होत व पुढे हेच
श्रीमहादेवबोवांचे ’ मोक्षगुरु ’ ठरले.

(४) पितुःसम ज्येष्ठ भ्राता । ऐसे म्हणती ॥ ओवी ९२ :-
८९ ते ९४ या ओव्य़ांतून श्रीमहादेवनाथांचे स्वभावदर्शन फार उत्कृष्ट होते. ज्या पूर्ण समाधानासाठी आपण तळमळत
आहोत ते समाधान श्रीरामचंद्रांनां श्रीचूडामणीकडून आत्मज्ञानाचा उपदेश झाल्यामुळे प्राप्त झालें हें कळतांच त्या तीव्र
जिज्ञासु महादेवनाथांनी रामचंद्रांना लोटांगण घातले. आपण कितीही दृढ्परिचित असलो तरी आतां मी तुला समान
भूमिकेवरचा मित्र म्हणू शकत नाहीं असे निर्मत्सर अंतःकरणानें त्यांनी कबुल केलें . इतकेंच नव्हे तर या मित्राला
गुरुस्थानी समजायला शास्त्रप्रमाण सांपडले याचा महादेवांना मोठा संतोष झाला. ज्येष्ठबंधुः पितुः समः या शास्त्रवचनाप्रमाणे श्रीगुंडामहाराजांचे स्वतःच्या आधीचे नामधारक या नात्याने श्रीरामचंद्र हे गुरुस्थानीय होतेच. आतां तर ते तत्त्वबोध सिंधुरुप झाल्यानें ’ गुरुत्वीं विवाद कवण करी ?’ त्वां वाचोनि मज शरण्य । नाही दुज ॥९४॥ असे  
म्हणून महादेवांनीं त्यांचे चरणी संपूर्ण शरनागति केली. हे सर्व पैलू परमार्थप्रेमी मंडळीनी वारंवार ध्यानी घ्यावेत असे आहेत .

(५) पूर्वी केली गुंडाख्यसेवा .....मी अखंड ऋणी उभयांचा -९९ ते १०१ :-
’ सर्वतः सारमादत्ते यथा मधुकरो बुधः ’ या भागवतोक्तीप्रमाणे सज्जन लोक गुणग्राही असतात. त्यातून संतमहात्मे नुसते
सारग्राहक नसून अत्यंत कृतज्ञ असतात. ज्ञानोपदेश ग्रहण करण्यासाठी जी चित्तशुध्दि आवश्यक असते ती श्रीगुंडा महाराजांनी दिलेल्या उपासनेमुळेंच श्रीरामचंद्रांना लाभली होती. श्रीगुंडोजींनीं अंतःकरणांत ओ हरिप्रेमाचा ओलावा उत्पन्न
केला त्यामुळेंच आत्मबोधाचें मधुर फल आपणांस प्राप्त झाले अशी श्रीरामचंद्रमहाराजांची अखंड धारणा असल्याने या
ओव्यांतून ते मंत्रगुरु व मोक्षगुरु या दोघांनाही एकरुप मानीत आहेत. थोर ते थोरच !

कठिण शब्दांचे अर्थ :- नावेक = क्षणभर (१७) पुढत पुढत = पुढें पुढें (२५) दर्शनस्तन्य = दर्शन हेंच दुध ; चित्तार्भक = चित्तरुपी लेंकरुं (३४) धालेपणाची दीप्ति = तृत्पि लाभल्याचा तजेला (५४) दांती = इंद्रियदमनाचें सामर्थ्य (५८) अटवी रुदन=
रानावनांद्तले रडणे ( व्यर्थ असा लाक्षणिक अर्थ ) (६४) कें विरुढे= कसें उगवेल ? (७५) द्विप = हत्ती [ दोनदां पिणारा असा
व्युत्पत्तिसिध्द अर्थ कारण हत्ती एकदा सोंडेनें पाणी घेतो व नंतर तोंडात घेतो ). (८३) भवदन्तीचा मृगेन्द्र = संसाररुपी
हत्तीचा [ भगद्न्ती ] [ नाश करनारा ] सिंह (९८) प्रपंच निदाघ = प्रपंचरुपी कडक ऊन (१११) अव्हांटा = आडवाट, चुकीचा रस्ता  (११२) बोधानळें (बोध=अनल ) ज्ञानाग्नीने (१२०) प्रपंच ’ करी ’ = प्रपंचरुप हत्ती (१२१) कासार = सरोवर, तळे (१३२).

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP