मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय सोळावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवीन्द्र म्हणाला -
नंतरमहमूदशहास हवें होतें तें प्राप्त झाल्यानें अत्यानंद झाला. पण केवळ पित्याकरतां स्वतः सिंहगड दिल्यावर, मसलतींत निपुण असलेला शिवाजी, सर्व मसलती जाणणार्‍या सोनोपंत नांवाच्या ब्राह्मण मंत्र्यास जवळ बोलावून म्हणाला. ॥१॥२॥
शिवाजी म्हणतो - ज्या धन्य पुरुषाला लोक शहाण्या पुरुषांमध्यें अत्यंत श्रेष्ठ समजतात तो थोर मनाचा महाराज शहाजी मला खरोखर ओळखत नाहीं. ॥३॥
अडाण्यानें सज्जनाच्या अंगचे गुण जाणले नाहींत तर तो न जाणो बापडा, पण जाणत्यानेंहि जर ते जाणले नाहींत तर ती गोष्ट मात्र सज्जनांच्या मनास दुःख देते. ॥४॥
जर तो मला ओळखत असता तर त्यानें सिंहगड दिलाच नसता; नाहीं तर माझ्या हातचा हा गड बलानें कोण जिंकूं शकला असता बरें ! ॥५॥
शहाणासुरता असून सुद्धां ज्या वेड्यानें शत्रु अदिलशहास सिंहगड माझ्याकडून देवविला, त्या करारी पुरुषास मी काय म्हणूं ? ॥६॥
खरोखर स्वतः विश्वाचा नियंता असून, शत्रूंवर विश्वासून आपल्या घरीं सुखानें निजला, म्हणून तो शत्रूंकडून पकडला गेला ! ॥७॥
शत्रु क्षुद्र असले तरी शहाण्यानें त्यांची उपेक्षां करूं नये; कारण जळणारा दिवा सुद्धां पतंगाकडून विझविला जातो. ॥८॥
दिव्याचा नाश करतांक्षणींच जरी पतंग नाश पावतो, तरी एकाद्या जन्मांधाप्रमाणें कोण डोळस मनुष्य धोघांनाहि सारखे मानील ? ॥९॥
खरोखर एकादी मुंदी देखील हत्तीच्या सोंडेंत शिरून त्याचा अंत करते. म्हणून शस्त्रूस केव्हांहि क्षुद्र मानूं नये. ॥१०॥
अहो, हा महाबाहु, मोठा राजनीतिज्ञ असूनहि शत्रूंची मुळीं पर्वा करीतच नाहीं, हा ह्याचा मोठा दोष होय. ॥११॥
शत्रूंनीं पकडलेल्या माझ्या पिता शहाजीचे कारागृहामध्यें फार दिवस जे हाल झाले त्यांचा सोऒड घेण्यास मी अगदीं तयार झालों आहे; आणि आजपासून यवनांच्या नाशामुळेंच या लोकीं माझी कीर्ति होवो. ॥१२॥१३॥
जो शत्रूस अतिशय भितो त्यासहि शत्रु भीत असतो मग जो शत्रूस ( मुळींच ) भीत नाहीं त्याला शत्रु भितो हें सांगावयास नकोच. ॥१४॥
खरोखरच मी त्या सर्व यवननायकांचा फडशा उडविणारच ( आणि त्याकरतां ) भात्याच्या जोडीमधले हे बाण पाजळलेले आहेत. ॥१५॥
विजापूर शहर घेण्याविषयीं सांप्रत माझें मन उत्सुक झालें आहे. म्हणून आज तुम्हास माझें सांगणें आहे कीं, लगेच घोडेस्वारांस तयार करा. ॥१६॥
सोनोपंत म्हणाले :-
बळवानाशीं वैर, पापाचा संचय, पूज्यांची व वडिलांची निंदा यांचा परिणाम वाईट होतो. ॥१७॥
बळवानाशीं वैर करून तुझा पिता भलता आग्रह धरून सावध राहिला नाहीं. यामुळें तो पकडला गेला हें योग्य झालें. ॥१८॥
तो शहाजी महाराजा पराक्रमी आहे, त्याचें मंत्रीहि कर्तृत्ववान् आहेत; तथापि त्यानें जें बलिष्ठाशीं वैर केलें तें राजनीतिदृष्ट्या चुकीचें झालें. ॥१९॥
जर दुर्बळ माणसानें प्रबळ माणसाशीं अतिशय वैर केलें तर त्याचा पराभव करण्यास तो सर्वथा समर्थ असतो. ॥२०॥
आपल्यापेक्षां अधिक सामर्थ्यवान् शत्रूस खंडणी द्यावी; बरोबरीच्या शत्रूंशीं सलोखा करावा; कमी सामर्थ्यवान् शत्रूचें दंडन करावें; आणि भेद ( फितुरी, फूट पाडणें ) हा मात्र सर्वसामान्य उपाय होय. ॥२१॥
ज्या ( भेदा ) च्या योगें बरोबरीचा शत्रु दिवसानुदिवस कमी सामर्थ्यवान् होऊन बरोबरी सोडून देतो आणि अधिक सामर्थ्यवान् शत्रु आपलें आधिक्य टाकतो त्या भेदाची कोण बरें प्रशंसा करणार नाहीं ? ॥२२॥
हे राजा, कमी सामर्थ्यवान् शत्रूच्या ठिकाणीं सुद्धां भेद योजणें योग्य आहे. कारण, कमी सामर्थ्यवान् शत्रुसुद्धां अधिक दुर्बल होणें हें युद्धांत फायद्याचेंच होईल. ॥२३॥
‘ हा दुःखित आहे ’ असें मानून जर कमी सामर्थ्यवान् शत्रूचें सांत्वन केलें तर तो मनात फुगून जाऊन आपणा स्वतःलाच मोठा समजूं लागतो. ॥२४॥
हे राजा, दुर्बळ शत्रूंचे प्राबल्य, त्याचप्रमाणें प्रबळ शत्रूंचें दौर्बल्य हें कालमाहात्म्यानें झालेलें आढळतें. ॥२५॥
सारांश, वरुणाच्या ह्या मताकडे जो राजा चांगलें लक्ष देतो तो दुर्बळ शत्रूचें ( सहज ) शासन करतो. ॥२६॥
समर्थ आणि असमर्थ असे दोन प्रकारचे उपाय आहेत. दुसर्‍या प्रकारचा उपाय निष्फळ होतो पण पहिल्या प्रकारचा सफळ होतो. ॥२७॥
स्त्रिया शक्ति हरण करतात; मदिरा मतिभ्रम उत्पन्न करते; द्यूत धन नाहीसें करतें; कृपणपणानें कार्याची हानि होते; कठोर भाषण हें अभद्र आहे; तसेंच मृगयेपासून पाप लागतें, आणि हे राजा, कडक शासन हें अत्यं अपकीर्तिकारक आहे. ॥२८॥२९॥
म्हणून हीं सातहि व्यसनें टाकावींत, कारण यांपैकीं एकहि मतिभ्रंशास कारण होतें ! ॥३०॥
जर त्यांपैकीं एकानेंहि मतिभ्रंश होतो तर तीं अनेक सेवन केल्यावर कोणता माणूस अधोगतीस जाणार नाहीं ? ॥३१॥
राजनीतिशास्त्राविषयीं तिटकारा असणारा, आपल्या कामामध्यें आळशी व व्यसनामध्यें मग्न अशा माणसास लक्ष्मी सोडून जाते. ॥३२॥
तो अतिशय बेसावध झाला असतां खजिनदार खजिना लुटतात आणि दुष्ट अधिकारी लोकांस पीडा देतात. ॥३३॥
नाना व्यसनांत राजा भ्रम वृद्धिंगत होतो व भ्रम अतिशय वाढल्यानें त्यास योग्यायोग्य कळेनासें होतें. ॥३४॥
योग्यायोग्य कळेनासें झाल्यानें सर्व लोक त्याचा अपमान करतात. आणि कार्यांच्या ठिकाणीं नेमलेले लोक ती ( ताबडतोब ) करीत नाहींत. ॥३५॥
मग क्रोधानें अत्यंत बेफाम होऊन सभेंत जमलेल्या लोकांनाहि दररोज मनाला दुखविणारें भाषण करून तो त्यांस दुःख देतो. ॥३६॥
पुढें क्षणोक्षणीं केलेल्या अनादरामुळें त्यांचें अंतःकरण खिन्न होऊन ते त्याच्या पाठीमागें बोलतात व त्याची निंदाहि करतात. ॥३७॥
नंतर कोणी त्यास सोडून जातात, कोणी त्याच्याविषयीं उदासीन राहतात, कोणी त्याच्या शत्रुपक्षास मिळून सुखानें राहतात, कोणी त्यास कोपी समजून शिव्याशापच देतात, कोणी त्या न सोडलें तरी पूर्वीप्रमाणें त्याची सेवा करीत नाहींत. ॥३८॥३९॥
ह्या सात व्यसनांत आसक्त झाल्यानें तो  ( शत्रूचें ) कपट आणि बळ न जाणतां केवळ अहंकारानें आपणास समर्थ मानतो. ॥४०॥
चित्त व्यसनासक्त झाल्यानें जो अशा प्रकारचा बनतो, त्याचा विजयार्थ स्वार्‍या करणार्‍या शत्रूंकडून एकदम पराभव होतो. ॥४१॥
गडांची कांहीं मोठीशी किंमत नाहीं, पित्याचीच खरोखरी थोरवी आहे; ह्मणून तुम्हीं पराक्रमी असूनहि सिंहगड दिला. ॥४२॥
तो शत्रूस देऊन जर राजा ( शहाजी )ची सुटका झाली आहे तर तो सिंहगड आपण देऊनहि न दिल्यासारखाच आहे. ॥४३॥
ज्यानें सिंहगड आणि बंगळूर शर हीं शहाजीरूपी मेरूपर्वताच्या तोडीचीं मानिलीं त्या शत्रूनें ( विशेष ते ) काय केलें ? ॥४४॥
तुम्हीं आतां विजयास प्रारंभ केला आहे; आणि अत्यंत पराक्रमी राजाचीच सर्व पृथ्वी असते. ॥४५॥
प्रथम राजा, नंतर मंत्री, मित्र, विपुल धन, राष्ट्र ( प्रजा ), गड आणि सैन्यें हीं सात राज्याचीं अंगें होत. ॥४६॥
ज्या राज्याचीं हीं अंगें अव्यंग आहेत त्या राज्याची चांगले लोक प्रशंसा करतात. तेंच जरी एका अंगानें कमी असलें, तरी इतरांकडून त्याचा उपहास होतो. ॥४७॥
राजा हें मस्तक, मंत्री हें मुख, धन आणि सैन्य हे भुज; बाकीचें सारें राष्ट्र ( प्रजा ) हें शरीर, मित्र हे सांधे आणि दुर्ग हीं त्यांमधील अत्यंत दृढ हाडें होत. त्याप्रमाणें शहाण्या लोकांनीं राज्याचीं सात अंगें सांगितलीं आहेत. ॥४८॥४९॥
त्या सप्तांगात्मक राज्याचा धर्म हा आत्मा होय; मसलत हा प्राण, नीति हें बल, आणि अनीति हें दौर्बल्य होय. यथोचित दंड हें शौर्य, शत्रु बेफाम होऊं देणें हा अधर्म, परस्परांतील फूट हा मद आणि दृढैक्य हें दीर्घायुष्य, लोकरंजन हा उत्कर्ष, दूरदर्शित्व ही दृष्टि, प्रताप हें उज्ज्वल रूप, आयुध ही विमल बुद्धि, तसेंच बलवानाशीं वैर हें विघ्न होय, असावधपणा ही निद्रा, आणि सावधानता हा जागेपणा होय. ॥५०॥५१॥५२॥५३॥
सम आणि विषम असें दोन प्रकारचें वैर आहे. बरोबरीच्या शत्रूशीं असलेलें वैर हें पहिल्या प्रकारचें होय; अधिक सामर्थ्यवानाशीं असणारें दुसर्‍या प्रकारचें होय. ॥५४॥
सम वैरामध्यें दोघेहि बराबरीचे असल्यामुळें कोणालाहि खरोखरच विजय मिळणार नाहीं. विषम वैरामध्यें अधिक सामर्थ्यवानाचें सामर्थ्य अधिक असल्यामुळें त्यास विजय खात्रीनें मिळावयाचा. ॥५५॥
फत्तेखानाच्या पराभवामुळें व मुसेखानाच्या वधामुळें, अहो महाराज, महमूदशहा हा रात्रंदिवस तुमचा द्वेष करीत आहे. ॥५६॥
महाराज, पहा. तुमच्या देशास लाघूनच असलेले आदिलशहा व दिल्लीचा बादशहा हे बलाढ्य मुसलमान तुमचा रात्रंदिवस द्रोह करीत आहेत. ॥५७॥
ते दोघे शत्रु दोन्हीकडून ज्य अतुमच्यावर क्रुद्ध झाले आहेत त्या तुमचे येथें राहणें हें सांप्रत खरोखर योग्य नाहीं. ॥५८॥
म्हणून महाराज, अत्यंत दुर्गम अशा स्थानीं राहून जग जिंकण्याचा यत्न करा; तुम्हां शिवाजी महाराजांना काय अजिंक्य आहे ? ॥५९॥
शंकरानें कैलासाचा, इंद्रानें मेरूचा, आणि विष्णूनें समुद्राचा आश्रय केला आहे. ॥६०॥
दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहींत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणें हीच त्याची दुर्गमता होय. ॥६१॥
प्रभूमुळें दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळें प्रभु दुर्गम होतो. दोघांच्याहि अभावी शत्रुच दुर्गम होतो. ॥६२॥
तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगें सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असें ताबडतोब करा. ॥६३॥
सोनोपंतांचें हें भाषण ऐकून अति मोठ्यांना सुद्धां माननीय अशा त्या नृपश्रेष्ठास तें पसंत पडलें. ॥६४॥
नंतर त्रिभ्वनाचें पालन करण्यासाठीं प्रभुत्व धारण करणारा, पित्याच्या शत्रूंचा द्वेष करणारा, यवनांचें मोठें कंदन ( नाश ) करण्यास उद्युक्त झालेला, आणि निर्भय असा शिवाजी समग्र पृथ्वीच आपल्या तळहातांत आली असें मानूं लागला. ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP