मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय बारावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


चक्रवाक पक्षाचें वियोगदुःख नाहींसें करणारा, दुपारींच्या फुलाप्रमाणें कांतिमान् सूर्य उदयाचलाच्या शिखराग्रावर आरोहण करणार्‍या बेतांत होता; प्रभातकालीन संध्यारागानें गगनरूपी अंगणास लाली आली होती; अंधकाररूपी निशाचरापासून सर्व दिशा मुक्त झाल्या होत्या, जणू काय भीतीनें आंदोलन पावणार्‍या पंपा सरोवराच्या पाण्याच्या तुषारांच्या योगें शीतल आणि विकसित कमलांच्या सुगंधाच्या योगें, अल्हाददायी असा वायू वाहात होता. अशा वेळीं दिलारखान, मसूदखा, सरजा याकुतखान, अंबरखान, अदवनीचा राजा, कर्णरपूचा राजा, फरादखान, व कैरातखान, हे दोघे, त्याप्रमाणेंच याकुतखान, आजमखान, बडलोलखान, मानी मलिक राहनखा, रागह्व मंबाजी, वेदोजी भास्कर आणि हैबत राजा ( वा ) चा पुत्र महाबलवांन् बल्लाळ, असे तिघे मदोन्मत्त ब्राह्मण सरदार, सिधोजी आणि मंबाजी पवार मंबाजी भोसला आणि निरनिराळ्या कुलांतले दुसरेहि सरदार युद्धाची खुमखुम अंगांत चढल्यामुळें मोठमोठीं आयुधें धारण करून आपल्या पताकांच्या गर्दीनें आकाश जणूं काय कांपवीत, घोड्यांच्या खुरांच्या अग्रांनीं पृथ्वीचा जणूं काय चुरा करीत, आपल्या तेजोराशींनीं सकल त्रिभुवनास जणूं काय जाळून टाकीत, प्रबल सैन्यांच्या योगानें जणूं काय सभोंवतीं तट बांधीत अग्नीप्रमाणें तेजस्वी आणि यमाप्रमाणें निर्भय असे ते ( सरदार ) मुस्तुफाखानाच्या आज्ञेवरून शहाजी राजाच्या शिबिरात वेढा देते झाले. ॥१॥२॥३॥४॥५॥६॥७॥८॥९॥१०॥११॥
इकडे शहाजीच्या शिबिरांत हत्तींवर हौदे चढविलेला नव्हते, घोड्यावर खोगिरें घातलीं नव्हतीं, सैनिकांचीं पथकें सज्ज नव्हतीं, नायक ( सेनापति ) निजून उठले नव्हते, रात्रींच्या जागरणानें अतिशय ग्लानि आल्यामुळें पाहरेकरी निद्रित होते, यामुळें नाना प्रकारच्या भीतीनें ग्रस्त होऊन त्या शिबिरांत एकच गोंधळ उडाला. ॥१२॥१३॥
मोठ्या खळ्याच्या योगानें सूर्याचें बिंब जसें दिसतें तसें शत्रु सैन्याच्या योगें शहाजीचें शिबिर त्या समयी दिसूं लागलें. ॥१४॥
सागराप्रमाणें गर्जना करणार्‍या त्या सैन्याच्या पिछाडीचें सर्व बाजूंनीं संरक्षण सेनापति मुस्तुफाखान स्वतः करीत होता. ॥१५॥
नंतर खंडोजी, अंबाजी, मानाजी हे बंधु, तसेंच इतर सरदार आणि तरवारी, धनुष्यें, भाले, बंदुका, आणि चक्रें हीं धारण करणारें सैनिक ज्याच्या भोंवती आहेत असा घोर कृत्यें करणारा महाबाउ बाजराज घोरपडे, जणूं दुसरा वडवानलच असा यशवंतराव वाडवे, पवार कुलाचें भूषण मालोजी राजा, विख्यात तुळोजी राजा भोसला असे ते सर्व बलिष्ठ सरदार आपण बसलेल्या घोड्यांच्या खुरांनीं पृथ्वीचें चूर्ण करीत शहाजीच्या शिबिरांत शिरले. ॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥
हत्तींनीं सिंहास जसें जागें करावें, तसें त्या समयीं त्या मदोन्मत्त, जयेच्छु आणि अतिशय गर्जना करणार्‍या सरदारांनीं निजलेल्या शहाजीस जागें केलें. ॥२१॥
शत्रु आलेले ऐकून जागा होतांच स्वतः सज्ज होत होत शहाजीनें “ सज्ज व्हा ” असा सर्व सैनिकांस जोरानें हुकूम सोडला. ॥२२॥
तेव्हां “ घोडा, घोडा, तरवार तरवार, भाला भाला ” असा शहाजीच्या गोटांत एकच गोंगाट उत्पन्न झाला. ॥२३॥
महाबाहु व महाबलाढ्य असा शहाजी राजा सज्ज होत आहे आणि त्याचें मोठें सैन्य आकस्मिक भयानें ग्रस्त झालें आहे ( गोंधळून गेलें आहे ) इतक्यांत प्रत्येक युद्धांत सिंहाप्रमाणें अकुंठिगति असा खंडोजीं पाटील हा एकटाच घोरपड्यांवर चालून गेला. ॥२४॥२५॥
अंगांत कवच घातलेला, अभेद्य ढालीमुळें खंबीर, भाला घेतलेला, उत्तम नेम मारणारा, तरवार लटकविलेला, युद्धकुशल असा प्रख्यात खंडोजी जेव्हां त्वरित घोड्यावर बसून रणांगणांत गेला तेव्हां बाजी घोरपडे इत्यादींनीं सिंहगर्जना केली. ॥२६॥२७॥
मग अत्यंत वेगवान घोरपडे सरदारांनीं त्या पाटील कुलभूषणाला त्वेषानें चोहोंकडून घेरलें. ॥२८॥
तेव्हां त्या तेजस्वी खंडोजी पाटिलानें मेघांना भिडणारा आपला भाला गरगर फिरवून आपल्या घोड्यास हजारों रंगणें घ्यावयास लाविलीं. ॥२९॥
त्यानें गरगर फिरविलेल्या भाल्याचें अंतरालांत गरगर फिरणारें तेजोवलय सूर्य बिंबाप्रमाणें चमकूं लागलें. ॥३०॥
नाना प्रकारच्या शस्त्रांनीं प्रहार करणार्‍या, मोठीं आयुद्धें धारण करणार्‍या वीरांचे त्यानें आपल्या भाल्यानें संतापानें तुकडे तुकडे केले. ॥३१॥
क्रुद्ध इंद्रानें आपल्या वज्रानें पाडलेल्या पर्वताप्रमाणें प्रत्येक अवयव तुटून अनेक योद्धे भूमीवर पडले. ॥३२॥
क्रोधानें दांत ओठ चावून युद्धपरायण शूर शत्रूंनीं याच्यावर जोरानें प्रहार केले असतांहि यानें आपला पराक्रम दाखविला. ॥३३॥
त्यासाठीं त्यानें आपल्या लांब आणि तीक्ष्ण भाल्यानें कोणा एकाचें पर्वत शिखरासारखें शिर छाटून टाकलें. ॥३४॥
त्याचप्रमाणें कोणाची शिळेसारखी रुंद आणि अभेद्य छाती त्या बलिष्ठानें त्वेषानें फोडून टाकली. ॥३५॥
त्यानें कोणाचा घोडा भाल्याच्या पाल्यानें भोसकून हत्तीच्या गंडस्थळासारखा त्याचा उंच खांदा एकदम खालीं पाडला. ॥३६॥
कोणाचे पाय, तर कोणाची कंबर आणि कोणाचा कंठ त्या खंडोजीनें कापून काढले. ॥३७॥
एकसारखें चाल करून भाल्यानें शत्रूंना सभोंवतीं पाडणारा तो पाटील एकटा असूनहि अनेक आहे, असें भासलें. ॥३८॥
हल्ला करणार्‍या शत्रुसमुहाच्या शेंकडों तीक्ष्ण शस्त्रांचे प्रहार होऊन ज्याचें कवच भग्न झालें होतें अशा त्या पाटलानें शत्रुरूपी हत्ती परतविले. ॥३९॥
शत्रूंनीं सोडलेल्या बाणांनीं जखमी झालेला व रक्तानें भिजलेला तो ( खंडोजी ) मंगळाप्रमाणें शोभूं लागला. ॥४०॥
लढणार्‍या त्या पाटलाचें अद्भुत कौशल्य पाहून बाजराज घोरपडे प्रभृति योद्धे गर्जना करूं लागले व दंड थोपटूं लागले. ॥४१॥
शत्रूचा गर्व हरण करणार्‍या मानाजीनें आपल्या भाल्यानें त्याआ भाला मोडून टाकला असतां त्यानें एक तीक्ष्ण तरवार हातांत घेतली. ॥४२॥
तेव्हां युद्धकुशल अशा त्या खङ्गधारी खंडोजीस पाहून महाबाहु बाजराजानें स्मित करून युद्धास आव्हान केलें. ॥४३॥
तेव्हां खंडोजी पाटलानें यमदंडाप्रमाणें भयंकर अशा तरवारीनें बाजराज घोरपड्याच्या छातीवर वार केला. ॥४४॥
विशाल छातीवर केलेल्या त्या जोराच्या प्रहारामुळें महाबाहु बाजराज घोरपड्यास मूर्च्छा आली असतां अंबाजीनें भयंकर परिघ, ( लोखंडी कांटे असलेला सोटा ) मानाजींनें मुद्गल, मालोजीनें अग्नीच्या ज्वाळेसारखी काळी शक्ति, बाळाजीनें अप्रतिम भाला जसवंतानें बाण आणि खंडोजीनें खङ्ग ( तरवार ) अशीं शस्त्रें त्या खंडोजी पाटलाच्या अंगावर फेकली. ॥४५॥४६॥४७॥
चोहोंकडून योध्यांनीं फेकलेलीं सर्व शस्त्रें अंगावर येऊन पऊं लागली; त्यांपैकीं कांहींचे आपल्या भयंकर तरवारीनें दोन तुकडे, कांहींचे तीन तीन, तर कांहींचे पांच पांच तसेच कांहींचे नऊ नऊ, दहा दहा तुकडे केलें. ॥४८॥४९॥
बाजराजानें क्षणभर मूर्छा आणि क्षणभर अत्यंत विलक्षण स्थिति स्वतः अनुभवून पुनः तो पाटलाशीं लढूं लागला. ॥५०॥
जिचा आकार शत्रूंना भयंकर होता अशी प्रचंड गदा बाजराजानें आपल्या कौशल्यानें पाटलाच्या अंगावर हाणली. ॥५१॥
कार्तिक स्वामीच्या तीक्ष्ण शक्तीनें क्रौंच पर्वत जसा पडला तसा बाजराजाच्या गदेनें भिन्न होऊन तो उत्कृष्ट योद्धा खंडोजी पाटील स्वर्गवासी झाला; तेव्हां मार खाणार्‍या शत्रुसैन्याकडून स्वतःचें सैन्य अतिविव्हळ झालें असतां, शिरस्त्राण घट्ट बांधलेलें, पटक्याचा शेंबला सोडलेले, ढाल घेतलेले, चिलखत घातलेलें, धिप्पाड, उत्कृष्ट धनुर्धर, भाला फेकण्यांत व पट्टा खेळण्यांत निष्णात असे युद्धकुशल महाबाहू शहाजी महाराज जसा मेघावर मेघ आरूढ होतो त्याप्रमाणें एका मोथ्या घोड्यावर स्वार होऊन बाजराज घोरपड्यास ठार करण्याच्या इच्छेनें एकदम त्याच्यावर चालून गेले. ॥५२॥५३॥५४॥५५॥५६॥
दहाहि दिशा जिंकणारा गवळ्यांचा राजा दसोजी, धनुष्यबाण धारण करणारा योगाजी भांडकर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, बंधु त्र्यंबकराज आणि गर्विष्ठ दत्तराज यांनीं व दुसर्‍याहि शेंकडो सरदारांनीं व पुष्कळ पृष्ठरक्षकांनीं चोहोंकडून शहाजी राजाचें रक्षण केलें. ॥५७॥५८॥५९॥
ओढलेल्या धनुष्याच्या टणत्कारानें आकाश दुमदुमवून व दणाणून सोडणारा, सिंहासारखी मान व मैलासारखे खांदे असलेला, त्र्यंबकराज आणि दत्तराज यां बंधूंनीं वेष्टिलेला, देवांनीं जसा इंद्र तसा स्वतःच्या सैनिकांनीं रक्षिलेला प्रतिकूल वार्‍याच्या मार्‍यामुळें हटविलेला असा शूर व महाबलाष्य शहाजी राजा बाजराज प्रभृति सरदारांनीं पाहिला. ॥६०॥६१॥६२॥
शस्त्रें उगारलेल्या शत्रूंस आपल्या सभोंवतीं पाहून शहाजीराजानें सिंहाप्रमाणें गर्जना करून पृथ्वी व आकाश हीं दणाणून सोडलीं. ॥६३॥
शहाजीच्या त्या गर्जनेनें दिशा भरून ( दुमदुमून ) गेल्या आणि समुद्रांतूनहि त्याचा प्रतिध्वनि निघून तो एकदम क्षुब्ध झाला. ॥६४॥
मस्त हत्तीचें ओरडणें जसें मस्त हत्तीस सहन होत नाहीं त्याप्रमाणेंच बाजराज घोरपड्यास शहाजी राजाजी गर्जना सहन झाली नाहीं. ॥६५॥
तेव्हां विजेच्या भयंकर कडकडाटा प्रमाणें गर्जना करून जवळ येऊन, आपलीं नांवें पुकारून लखलखित व सुंदर ढाल धारण केलेलें कवच घातलेले युद्धकुशल अशा घोरपडे सरदारांनीं  - मेघ जसे चंद्रास वेष्टितात त्याप्रमाणें - पूर्णपणें पक्का गराडा दिला ( घेरलें. ). ॥६६॥६७॥
तेव्हां त्र्यंबकराज व दत्तराज, दसाजी व कार्तिकस्वामी प्रमाणें तेजस्वी, महाबाहु मेघाजी, योगाजी व गुंजावटकरादि दुसर्‍याहि वीरांनें शहाजीराजाचें रक्षण करण्याच्या इच्छेनें शत्रूकडील योध्यांवर हल्ला केला. ॥६८॥६९॥
त्या समयीं धनुर्धारी त्र्यंबकराजाबरोबर मानाजी, दुष्टांस जिंकणार्‍या दत्तराजाबरोबर खंडोजी, शत्रूवीरांस जिंकणार्‍या योगाजी - बरोबर मालोजी, त्याचप्रमाणें इंद्रजिततुल्य मेघाजी बरोबर अंबाजी आणि शहाजीराजाबरोबर पराक्रमी बाजराज आणि दुसर्‍या पुष्कळ दिर्घबाहु वीरांबरोबर दुसरे पुष्कळ वीर लढूं लागले. ॥७०॥७१॥७२॥
एकमेकांस जिंकूं इच्छिणारे ते मदोन्मत्त महावीर धनुष्याचा टणत्कार करून रणभूमीवर वडवाघुळाप्रमाणें नाचूं लागले. ॥७३॥
पायदळांशीं पायदळ, घोडेस्वारांशीं घोडेश्वार, हत्तीस्वारांशीं हत्तीस्वार असे पुष्कळ योद्धे विजयेच्छेनें परस्परांशीं भिडले. ॥७४॥
शक्तींचे शक्तीवर, गाढमुष्टीचे गाढमुष्टीवर, परिघाचे भयंकर परिघांवर, मुद्गलांचें मुद्गलांवर, पट्यांचे पट्यावर, तोमरांचे तीव्र तोमरांवर, गदांचे गदांवर, हजारो चक्रांचे चक्रांवर, बाणांचे तीक्ष्ण बाणांवर, कट्यारींचे कट्यारीवर, भाल्यांचे भाल्यांवर असे त्या समयीं पुष्कळ प्रहार होऊं लागले. ॥७५॥७६॥७७॥
शिरस्त्राणांसह शिरें, कवचांसह धडे, चामड्याच्या हातमोज्यांसह हात, केयूरासह भूज, पताकेसह ध्वज, बाणासह धनुष्य, स्वारासह घोडा, माहुतासह बत्ती अशीं दोन्हीं पक्षांकडील पुष्कळ माणसें शत्रूंनीं फेकलेल्या शस्त्रांनीं तुटून त्या समयीं भूमीवर पडली. ॥७८॥७९॥८०॥
धनुष्यें ओढणारे हातांत आंगठ्या असलेले, रुंद खांद्यांचे कबंध इतस्ततः एकमेकांवर धावूं लागले. ॥८१॥
ज्याचें शिर आणि जो जो अवयव तोडून ज्यानें खालीं पाडला त्याचा तो तो अवयव तत्क्षणीं उडून त्याच्यावर ( तोडणार्‍यावर ) धावून गेला. ॥८२॥
तीक्षण बाणांनीं छिन्न भिन्न झालेल्या घोड्य़ांच्या, हत्तींच्या व माणसांच्या शरीरांतून निघालेल्या रक्ताचें खोल तळें बनलें; मज्जा, मांस, चरबी व मेद यांचा भूमीवर चिखल झाला; नाचणार्‍या हडळीसह डाकिनी कुलास मोठा हर्ष झाला; निरनिराळ्या सेनापतींच्या करट्यांची कुंडलें धारण करणारें भैरवमंडळ भैरवींसह अतिशय मत्त झाले; सूर्यमंडळ भेदून गेलेल्या ( धारातीर्थी पडलेल्या ) वीरांच्या मुंडक्यांच्या माळेनें शोभणार्‍या शंकरास भूतगणासह अत्यंत आनंद झाला; खंडोजीराजानें दत्तराजाचे हात तोडले; अहो ! त्र्यंबकराजास सुद्धां मानाजी राजानें जिंकलें; त्याचप्रमाणें अंबाजीनें केलेल्या प्रहारांनीं भयभीत झालेला मेघाजी मागें हटला; दसाजीनें सुद्धां पळ काढला; अगस्ति मुनींनी प्यालेल्या समुद्राप्रमाणें इतरहि आपलें सैन्य भयाकुल होऊन नष्ट झालें; त्याचप्रमाणें मालोजीच्या बाणांनीं भांडकर त्रस्त झाला; अशी स्थिति पाहून शहाजी राजानें बाजराज घोरपड्यावर आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला. ॥८३॥८४॥८५॥८६॥८७॥८८॥८९॥९०॥
परंतु पराक्रमी बाजराज, त्या अत्यंत तीक्ष्ण आणि वेगवान् बानांच्या वर्षावांनीं छिन्नभिन्न झाला असतांहि, मूर्छित झाला नाहीं. ॥९१॥
नंतर त्यासमयीं चकाकणारें कवच घातलेल्या शहाजीराजास पाहून त्याच्या छातीवर ( बाजराजानें ) आपल्या भाल्यानें प्रहार केला. ॥९२॥
युद्धविद्येंत कुशल आणि वज्राला सुद्धां ज्याचें शरीर अभेद्य होते असा तो शहाजी राजा त्या भाल्याच्या प्रहारानें व्यथित झाला नाहीं. ॥९३॥
तेव्हां शर, शक्ति, गदा, खङ्ग, भाले इत्यादि आयुधें धारण करणार्‍या, क्रोधानें खवळलेल्या व आपला पराक्रम दाखविणार्‍या आणि बाजराजांचे रक्षण करणार्‍या मानाजी प्रभृति योद्धांनीं पराक्रमी शहाजी राजास वेढलें. ॥९४॥९५॥
तेथें प्रलयाग्नीच्या ज्वाळांप्रमाणें प्रखर अशा बाणांनीं त्या सर्वांस प्रतापी ( शहाजी ) राजानें त्रस्त करून सोडलें. ॥९६॥
त्या वेळीं शहाजी राजानें आपल्या बाणांनीं ज्यांचे तुकडे तुकडे केले आहेत, ज्यांचे बाहु तुटून पडले आहेत, जे अंगांतून वाहणार्‍या रक्तानें तांबडेलाल झाले आहेत असे शेंकडों सैनिक, प्रचंड वार्‍याच्या तडाख्यानें नुकतेच फुललेले पळसाचे वृक्ष उमळुन पडावेत त्याप्रमाणें बाजराजासमक्ष पडले. ॥९७॥९८॥
दौडणार्‍या घोड्यावर बसलेला शहाजी राजा जेथें जेथें चालून गेला तेथें तेथें घाबरलेल्या हजारो शत्रुवीरांचे वज्रप्रहारानें विदीर्ण झालेल्या पर्वताप्रमाणें दशधा, शतधा व सहस्रधा तुकडे झाले. ॥९९॥१००॥
मग कोणी शहाजी राजाचा नोकर, कोणी त्याचा मित्र, कोणी त्याचे अप्रतिम कवच, कोणी त्याची चंद्रयुक्त ढाल, कोणा घोरपड्यानें त्याचा बाणांचा भाता व धनुष्य, कोणी त्याचा उंच ध्वज अशीं तोडलीं. ॥१०१॥१०२॥
झटकन् घोड्यावरून उडी मारून गरुडांप्रमाणें झडप घालणा‍या, बाणांनीं विद्ध अशा शरीरांतून वाहणार्‍या रक्तानें लाल झालेल्या, फार लढल्यामुळें झालेल्या परिश्रमानें मूर्च्छा आलेल्या महाबाहु शहाजी महाराजांनीं भूमीस आलिंगन दिलें असतां ( भूमीवर पडले असतां ) शत्रुमंडळ गर्जना करूं लागलें व दंड थोपटूं लागलें; आणि इकडे भोसल्यांच्या सैन्यांत मोठा हाहाकार उडाला. ॥१०३॥१०४॥१०५॥१०६॥
तेथें धर्मराजाप्रमाणें शोभणारा, धर्मनिष्ठ, धैर्यवान्, लोकांचे जणूं काय सर्वस्व, सर्वांचाच आधार दुर्दैवानें आकाशांतून पडलेल्या तेजस्वी सूर्याप्रमाणें मूर्च्छा येऊन भूमीवर पडलेल्या अशा त्या शहाजी महाराजांचें बलाढ्य बाळाजीनें वेगानें घोड्यावरून उडी मारून, बंधुभाव दाखवून आपल्या ढालीनें रक्षण केलें. ॥१०७॥१०८॥१०९॥
तेव्हां गारुडी जसा फुसफुसणार्‍या नागास पकडतो त्याप्रमाणें निःश्वास टाकणार्‍या महाबाहु शहाजी राजास बाजराजानें स्वतः कैद केलें. ॥११०॥
मग ज्यास मूर्छा आली आहे, ज्याचें तोंड सुकलें आहे ज्याचे डोळे मिटले आहेत, ज्यास कपटपटु, दुष्ट मुस्तफाखानानें फसविलें अशां शहाजी महाराजांस - पकडून आणून पिंजर्‍यात घातलेल्या सिंहाप्रमाणें - हत्तीवर घालून शत्रु घेऊन चाललेले पाहून लोक अतिशय आक्रोश करूं लागले. ॥१११॥११२॥
ज्या मुस्तुफाखानानें आपल्या कपटरूपी पटानें ( वस्त्रानें ) शहाजीराजास झांकून टाकलें तो शहाजी सर्व कांहीं जाणणारा असूनहि त्यास तो कावा समजला नाहीं असें आम्हांस वाटतें. ॥११३॥
स्वामिकार्येच्छु मुस्तुफाखानानें शहाजीस विस्वास पटावा म्हणून आपला मुलगा आतशखान याची शपथ घेतली व आपलें कुराण उल्लंधिलें. ॥११४॥
म्हणून तेव्हां जनता त्या यवनाची सर्वत्र निंदा करूं लागली. परंतु तो स्वामिकार्येच्छु मात्र कृतार्थ झाला. ॥११५॥
खोगीर नाहीं, घोडा नाहीं, हत्ती नाहीं, उंट नाहीं, आयुध नाहीं योद्धाहि नाहीं, शस्त्र नाहीं, शस्त्रधारीहि नाहीं, वाद्य नाहीं, वाजंत्रीहि नाहीं, पलंग नाहीं, छतहि नाहीं, पताका नाहीं, ध्वजहि नाहीं, विक्रीची वस्तू नाहीं, विकणाराहि नाहीं, सर्पण नाहीं, मेखहि नाहीं, कनात नाहीं, तंबुहि नाहीं अशी क्षणार्धांत शहाजीराजाच्या शिबिराची अवस्था झाली. ॥११६॥११७॥११८॥
प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणें प्रखर आणि यमाप्रमाणें क्रूर अशा त्या मुस्तुफाखान प्रभृति सरदारांनीं इंद्राप्रमाणें पराक्रमी अशा त्या अभिमानी शहाजीराजास युद्धांत पक्कें कैद केलें आहे असें आपल्या दूतांकडून ऐकून महमूद आदिलशहास आनंद झाला. ॥११९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP