शिवभारत - अध्याय चौथा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवीन्द्र म्हणाले - नंतर विठ्ठलराजाच्या खेलकर्णप्रभृति अद्भुतपराक्रमी पुत्रांचा कैवारी स्वामी निजामशहा यानें मोठा परिवार असलेला, प्रचंड सैन्य बाळगणारा, प्रतिपक्षाचा नाश करणारा, जणूं काय दुसरा इंद्रच असा तो जाधवराव अत्यंत दुर्निवार्य आहे असें जाणून आपल्या मनांत मोठें कपट योजलें. ॥१॥२॥३॥
त्याची ती दुष्ट मसलत जाणून तो महाबलाढ्य, कुलश्रेष्ठ जाधव दिल्लीच्या बादशहास जाऊन मिळाला. ॥४॥
निजामशहाचा देश सोडून जाधवराव जेव्हां गेला, तेव्हां हीच संधी प्राप्त झालेली पाहून अदिलशहास आनंद झाला. ॥५॥
कारण, पूर्वीं निजामशहाकडून त्याचा पदोपदीं पराभव झाला होता, तेव्हां त्यानें स्वतः मोंगलबादशहाशीं तह केला. ॥६॥
निजामशहाचा फार काळापासून मत्सर करणारा, उदारधी आणि प्रतापवान, दिल्लीचा बादशहा यानें आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचें एकदम कबूल केलें. ॥७॥
अत्यंत पराक्रमी असा जो मोंगल बादशहा जहांगीर त्यानें इब्राहिम अदिलशहाच्या मदतीसाठीं सैन्य पाठविलें. ॥८॥
मोंगलांची सेना येऊन मिळतांच आदिलशहास आपला शत्रु निजामशहा कस्पटाप्रमाणें वाटूं लागला. ॥९॥
तेव्हां शहाजे राजा, धनुर्धारी शरीफजी, शूर व गुणवान खेळकर्ण, बलवान् मल्लराव, मंबाजी राजा, हत्तीप्रमाणें बलाढ्य असा नागोजीराव, परसोजी, त्र्यंबकराज, आपल्या बाहुबलानें युद्धांत विख्यात असा कक्क, शत्रुजेता हंबीरराव चव्हाण, मुधोजी फलटणकर, नृसिंहराजप्रभृति युद्धोन्मुख, निषाद, दुसरेही बल्लाळ त्रिपदादि पुष्कळ सेनापति, त्याप्रमाणें प्रतापी विठ्ठलराव कांटे दत्ताजी जगन्नाथ, यशखी मंबाजी, नृसिंव्ह पिंगळे ब्राम्हण, जगदेवाचा पुत्र सुंदरराज, मानी याकुतखान सारथी, शूर सुम्दर व उग्रकर्मा मनसूरखान, जोहरखान, गर्विष्ट हमीदखान, अग्नीसारखा तेजस्वी वीर आतसखान, सूर्याप्रमाणें प्रतापी मलिक अंबरखान वर्वर, त्याचा पुत्र मानी आणि शीघ्रगति फतेखान आदमखानाचे गुणविश्रुत पुत्र, आणि दुसरेहि मोठमोठे सेनापति हे त्या निजामशहाचें सर्वबाजूंनीं रक्षण करीत होते, अशा स्थितींत तो शत्रूसमूहाचा विध्वंस करणारा, आपल्या बाहुबलाविषयीं दर्प बाळगणारा, अग्नीप्रमाणें प्रखर असा निजामशहा आपल्या शत्रूस खिजगणतींतही मानीनासा झाला. ॥१०॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥
परंतु अदिलशाह हा दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस निजामशहाशीं युद्ध करण्याची तयारी करूं लागला. जलालखान जहानखान खंजीरखान, सिकंदरखान करमुल्लाखलेलखान, सुजानखान सामदखान, असे हे सर्व प्रतापी मुसलमान बहादुरखानासह आले. युद्धपरायण दुदराज, क्षात्रकर्मामुळें प्रख्यात असा उदाराम ब्राम्हण, युद्धामध्यें भारद्वाजासारखा पराक्रमी दादाजी विश्वनाथ, राघव, अंच, जसवंत आणि बहादुर हे जाधवरावाचे पुत्र आणि स्वतः बलाढ्य जाधवराव हे सर्व लष्करखान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेनें दक्षिणेंत प्राप्त झाले. ॥२२॥२३॥२४॥२५॥२६॥२७॥
ज्याप्रमाणें अप्रतिहत आणि शीघ्रगति वायु आकाशाचें आक्रमण करतो त्याप्रमाणें त्या पराक्रमी सेनापतींनीं निजामाचा मुलूख पादाक्रांत केला. ॥२८॥
मुस्तफाखान, मसूदखान, फदारखान, दिलावरखान, सर्जास्याकुतखान, खैरतखान, अंबरखान, अंकुशखान हे यवन व इतरही आदिलशहाचे अतुलपराक्रमी पुष्कळ दोस्त व सेवक तसेच ढुंढिराज नांवाचा ब्राम्हण, त्याच्या जातीचा रुस्तुम, घांटगेप्रभृति महाराष्ट्रीय ( मराठे ) राजे हे आदिलशहाचे सरदार बलाढ्य मुल्लामहंमदाच्या पुढारीपणाखालीं यथाक्रम आले. ॥२९॥३०॥३१॥३२॥
नंतर उत्तरेकडून मोंगलांचें व दक्षिणेकडून आदिलशहाचें सैन्य चालून आलें असतां, त्यांच्यावर निजामशहानें पाठविलेला अंबर चालून गेला. ॥३३॥
तारकासुराशीं झालेल्या युद्धांत जसे देव कार्तिकेयाच्या सभोंवतीं जमले, त्याप्रमाणें शहाजीप्रभृति राजे मलिकंबरासभोंवतीं जमले. ॥३४॥
नंतर मलिकंबराचें शत्रूंशीं घनघोर युद्ध झालें; आणि त्यामुळें पिशाच, भुतें, वेताळ, निशाचर यांची चंगळ उडाली. ॥३५॥
दौडणार्‍या घोड्यांच्या खुरांनीं उडालेल्या धुळीनें बिंब मलिन झाल्यानेम सूर्य आकाशांत मेघमंडळांनीं झांकला आहे असें त्या वेळीं भासूं लागलें. ॥३६॥
पृथ्वीवरून उडणार्‍या धुळीचा मेघांना जाऊन भिडणारा असा एक प्रचंड लोळ बनला; आणि तो जणुं काय लगेच स्वर्गारोहण करणार्‍या वीरांची शिडिच आहे असें भासलें. ॥३७॥
घोड्यांचें खिंकाळणें, हत्तींचा चीत्कार, वीरांची सिंहगर्जना, दुंदुभीचा ध्वनि, सज्ज धनुष्यांचा प्रचंड टणत्कार, वार्‍यानें फडफडणार्‍या पताकांचा जोराचा फडफडाट, मेघाप्रमाणें गंभीर आवाज असलेल्या भाटांचा जयघोष, यांनीं आकाश अगदीं दुमदुमून गेलें; आणि एकमेकांवर धावून जाण्यार्‍या शूर योध्यांच्या जोराच्या पदाघातानें पृथ्वी शतधा विदीर्ण झाली. ॥३८॥३९॥४०॥४१॥
अरेरे ! एका पक्षाच्या योध्यांनीं शत्रुपक्षाच्या योध्यांचीं मुंडकीं पेरें साफ केलेल्या आणि अचानक जाऊन पडणार्‍या तीक्ष्ण बाणांनीं छेदून टाकलीं. ॥४२॥
ज्यांचे केंस रक्तानें भिजले झाले आहेत, ज्यांचे डोळे तांबडे लाल झाले आहेत आणि जीं दांत ओंठ चावीत आहेत, अशीं शूर योध्यांचीं मुंडकीं जमिनीवर पडूं लागलीं. ॥४३॥
वज्राप्रमाणें कठीण अशा हत्तींच्या सुळ्य़ांवर गाढमुष्टि योध्यांच्या तरवारी आदळूं लागल्या. ॥४४॥
विरुद्ध पक्षाच्या योध्याचे तरवारीनें एकदम दोन तुकडे करून क्षणानंतरच एकद्या वीराचें मस्तकरहित शरीर जमिनीवर पडे. ॥४५॥
शेंकडों बाणांनीं विद्ध झालेल्या हत्तींच्या गंडस्थळांतून मदरसासह अतिशय रक्त वाहूं लागल्यामुळें तीं शोभूं लागलीं. ॥४६॥
माणसें, घोडे, हत्ती यांच्या रक्ताच्या नदीच्या कांठीं मोठमोठे वीर, जणूं काय थकल्यामुळें महानिद्रा घेऊं लागले. ॥४७॥
नेम मारण्यांत पटाईत असणार्‍या आणि हातांत भाला धारण करणार्‍या वीरांकडून स्वार मारले गेल्यामुळें घोडे क्रोधानें अत्यंत खवळून जाऊन इतस्ततः धावूं लागले. ॥४८॥
नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिकंबराचें प्रिय करणारे कृष्णमुखी यवन ( शिद्दी ), त्याचप्रमाणें हंबीररावप्रभृति इतर पराक्रमी वीर यांनीं हातांत बाण, चक्रें, तरवारी, भाले, पट्टे घेऊन मोंगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हां ते भयभीत होऊन जीव बचावण्यासाठीं दाही दिशा पळूं लागले. ॥४९॥५०॥५१॥
ती मोंगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम अदिलशहाच्या सैन्यासही पळतां भुई थोडी झाली. ॥५२॥
मस्त हत्तीच्यां जोरावर गर्विष्ठ असा मनचेहर नांवाचा मोंगल त्या सैरावैरा पळणार्‍या सैन्यांच्या पिछाडीचें रक्षण करूं लागला. ॥५३॥
गर्वानें मध्यें स्थिर राहिलेला, रस्ता अडवून पुढें जणूं काय दुसरा विंध्यपर्वतच उभा राहिला आहे. अशा त्या, आपल्या जयाच्या आड आलेल्या, मनचेहरास पाहून शहाजी, शरीफजी आदिकरून सर्व पराक्रमी भोंसल्यांनीं कापाकापी करण्यास सुरुवात केली. ॥५४॥५५॥
महापर्वताप्रमाणें भव्य अशा हत्तींच्या भिंतीच्या आश्रयानें उभा राहिलेल्या त्या अत्यंत गर्विष्ठ मनचेहराशीं ते कवचधारी भोंसले वीर लढूं लागले. ॥५६॥
तेव्हां न डगमगणार्‍या व युद्धोन्मत्त शरीफजीनें निश्चल मनानें आपल्या तीव्र भाल्याच्या फेकींनीं तें हत्तींचें सैन्य ठार केलें. ॥५७॥
त्रिशूळ, धनुष्य, बाण, गदा, परिघ ( दंड ) हीं शस्त्रें धारण करणा‍या गजदळानें पुढें चालून येणार्‍या त्या शरीफजीस अडविलें. ॥५८॥
नंतर चौफेर लढणार्‍या व खवळलेल्या त्या भिमानी शरीफजीस त्यांनीं आपल्या तीक्ष्ण बाणांनीं खालीं पाडलें. ॥५९॥
शत्रूंच्या हत्तींचा सप्पा उडवून, शत्रूच्या बाणांनें विद्ध झालेला आपला शूर, धाकटा भाऊ धारातीर्थी पडलेला पाहून खवळलेला शहाजी आपल्या खेळकर्णप्रभृति बंधूंसह मनचेहर व त्याचें सैन्य यांच्यावर वेगानें चालून गेला. ॥६०॥६१॥
तेव्हां तो प्रतापवान मोंगल शत्रूच्या उत्कृष्ट भाल्यांच्या भीतीनें आपले मदोन्मत्त हत्ती मागें हटलेले पाहून स्वतः माघार घेता झाला. ॥६२॥
सुरक्षित हत्तींसह तो युद्धांतून पळून जाऊं लागला असतां निजामशहाचें सैन्य सिंहगर्जना करूं लागलें. ॥६३॥
तेव्हां कोणी उत्तरेकडे, कोणी पश्चिमेकडे आणि कोणी पूर्वेकडे असे ते मोंगल वेगानें पळूं लागले. ॥६४॥
नंतर हर्षभरित होऊन शहाजीप्रभृति राजांनीं त्या पळणार्‍या शत्रूंचा पाठलाग केला व त्यांस बळानें कैद केलें. ॥६५॥
युद्धामध्यें भयंकर अशा पुष्कळ मोंगलांच्या आणि इतर वीरांच्या दंडांत जबरीनें बेड्या अडकवून त्यांना मलिकंबराच्या पुढें आणून उभें केलें. ॥६६॥
याप्रमाणें भोंसल्यांच्या बाहुबलाच्या साहाय्यानें शत्रूला जिंकून प्रतापी मलिकंबर नगारे व शिंगें यांच्या जयघोषांत निजामशहाच्या भेटीस त्वरित गेला. ॥६७॥
प्रतापवान व अद्भुत वैभवशाली अशा दिल्लीपतीचें शत्रूंना अजिंक्य असलेलें सैन्य, तसेच आदिलशहाचेंहि अतुल सामर्थ्यवान सैन्य यांचा तडाख्यानें पाडाव करून, आणि अत्यंत गर्विष्ठ सेनापतींना युद्धांत कैद करून तो उग्रकर्मा सेनापति मलिकंबर भोंसल्यासह निजामशहास मुजरा करता झाला. ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP