मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय पहिला

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


श्री गणेशाय नमः । श्रीसांबसदाशिवाय नमः । श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - देवताभ्यो नमः । श्रीरस्तु ।
वंदन करणार्‍या देवश्रेष्ठांच्या मस्तकांवरील मंदारपुष्पांच्या मालांच्या योगें ज्याच्या पदकमलांस घाम सुटला आहे अशा विष्णूस मी पुनः पुनः नमस्कार करतो. ॥१॥
कोण्या एका काळीं परमानंद नांवाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण तीर्थयात्रेच्या निमित्तानें काशी क्षेत्रीं गेला. ॥२॥
जेथें सर्वच लोक मुक्त होतात, पण मुक्ती मात्र मुक्त होत नाहीं ( म्हणजे जेथें ती सतत वास करते ), व जेथें स्वतः शंकर तारक ब्रह्माचा उपदेश करतात अशा त्या काशी क्षेत्रामध्यें तीर्थविधि करून आणि महादेवांचें दर्शन घेऊन तो धर्मज्ञ ब्राह्मण भागीरथीच्या पवित्र तीरीं राहिला. ॥३॥४॥
तेथें पद्मासन घालून बसलेला, विद्येच्या तेजानें झळकणारा, सर्व शास्त्रांचा ज्ञाता, विख्यात, श्रेष्ठ अध्यात्मवेत्ता, पौराणिकांचा मुकुटमणि, एकवीरा देवीच्या कृपेनें वाक्सिद्धिवैभव प्राप्त झालेला, परमानंदाची मूर्तीच असा जो गोवंदभट्टाचा पुत्र, कविश्रेष्ठ परमानंद, त्यास पाहून त्या काशीनिवासी पंडितांस मोठा हर्ष झाला ॥५॥६॥७॥
त्या उदारचरित पंडितांना त्यानें उत्थापन देऊन अभिवादन केलें व घरीं आलेल्या अतिथींप्रमाणें त्यांचा विधिपूर्वक सत्कार केला. ॥८॥
ते सर्व श्रेष्ठ ब्राह्मण शिवाजी महाराजांचें प्रख्यात चरित्र ऐकण्याच्या इच्छेनें त्यांच्या सभोवतीं बसले. ॥९॥
नंतर आनंदित झालेले ते सर्व पंडित सुंदर काव्यांचा कर्ता व प्रत्यक्ष बृहस्पतीचा अवतार अशा त्या परमानंदास म्हणाले. ॥१०॥
पंडित म्हणाले :-
जो राजगडचा अधिपति राजा ह्या पृथ्वीवर राज्य करीत आहे, तुळजाभवानीच्या प्रसादानें ज्याला राज्यप्राप्ति झाली आहे, जो महातपस्वी, विशेषेंकरून विष्णूचा अंश व अष्टदिक्यालांचा अंशभूत आहे, जो बुद्धिमान्, प्रसन्नचित्त, प्रतापी, जितेंद्रिय, भीमापेक्षांहि महाभयंकर आणि सर्व धनुर्धरांची मुकुटमणि आहे, तसेंच जो शहाणा, उदारचरित, वैभवशाली, अद्भुत पराक्रमी, ज्ञानी, कृतज्ञ, पुण्यवान्, आत्मसंयमी व गुणांनीं प्रख्यात आहे, जो सत्यवक्ता, अति चतुर श्रोता, देव ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, प्रजेचें प्रिय करणारा आहे, अशा त्या शिवाजी राजाचें जें अनेकाध्यायात्मक चरित्र आपण एकवीरा देवीच्या प्रसादानें प्रसिद्ध केलें आहे, ज्यांतील शब्दरचना उत्कृष्ट आहे, जें अद्भुत असून, अर्थगांभीर्यानें भरलेलें आहे, जें माधुर्यादि गुणांनीं युक्त, अलंकारांनीं विभूषित, धर्मशास्त्र आणि राजनीति यांनीं परिपूर्ण आणि ज्याची जणूं काय नवें पुराण म्हणून सर्व लोकांत प्रसिद्धि झाली आहे, जें समस्त दोषांपासून मुक्त आणि सर्व निजलक्षणांनीं युक्त आहे असें तें सर्व चरित्र, हे सर्वज्ञ आणि स्तुत्याचरणी ब्राह्मणा आम्हांस सांग. ॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥
काशीच्या पंडित मंडळींनीं अशी विनंती केल्यावर तो धर्मात्मा व वक्त्यांमध्यें श्रेष्ठ असा कवींद्र म्हणाला, ॥२०॥
कवींद्र म्हणाला :-
भगवती एकवीरा, गणपति, सरस्वती, आणि सिद्धांना सुद्धां सिद्धिदाता महासिद्ध सद्गुरु यांना प्रणिपात करून, भरतवंशाच्या भारताप्रमाणें असलेलें बुद्धिमान् शिवाजी महाराजांचें चरित्र मी कथन करतों. ॥२१॥२२॥
कलियुगांतील पापें नाहींशीं करणारीं आणि लोकांचीं चित्तें हरण करणारीं अशीं शिवरायांचीं यशोगीतें आपण श्रवण करावींत. ॥२३॥
जो हा वीर, गडांचा अधिपति, दक्षिणेंतील महाराजा, प्रत्यक्ष विष्णूचा अवतार, यवनांचा संहारकर्ता, शहाजी राजाचा पुत्र, शिवाजी विजयशाली झाला आहे, तो एकदां मला ब्रह्मनिष्ठास विनंती करून म्हणाला कीं, हे सुमते, जीं जीं कृत्यें मीं या पृथ्वीवर केली आहेत व करीत आहें त्या सर्वांचें तूं वर्णन कर. माझे आजोबा प्रसिद्ध मालोजी राजे यांच्यापासून प्रारंभ करून, हे महाभागा, तूं ही महनीय कथा सांग. ॥२४॥२५॥२६॥२७॥
हे ब्राह्मणश्रेष्ठांनो, त्याच्या ह्या पवित्र भाषणाचें अभिनंदन करून मी तें मान्य केलें, आणि घरीं येऊन स्वतःशीं असा विचार करूं लागलों कीं, भारताप्रमाणें मोठें चरित्र म्यां रचावें अशी ही अलौकिक - चरित्राच्या शिवाजीची इच्छा माझ्या हातून कशी पार पडेल असा दीर्घकाळ एकाग्र चित्तानें विचार करीत असतां भगवती एकवीरा देवी साक्षात् येऊन मला असें म्हणाली :- ॥२८॥२९॥३०॥
देवी म्हणाली :-
हे कविश्रेष्ठा, तूं काळजी करूं नकोस. मी तुला प्रसन्न झाल्यें आहें. माझ्याच आज्ञेनें शिवरायानें हें काम तुला सांगितलें आहे. याप्रमाणें मला धीर देऊन ती कृपाळू कुलदेवता चतुर्भुजा एकवीरा माझ्या हृदयांत प्रवेश करती झाली ( मला काव्यस्फूर्ति झाली ). ॥३१॥३२॥
तेव्हांपासून पाहतां पाहतां समग्र वाग्ब्रह्म अर्थासह माझ्या जिव्हाग्रावर अधिष्ठित होऊन जागें आहे. ॥३३॥
गत आनि भावी सर्व गोष्टी मला प्रत्यक्ष दिसूं लागल्यामुळें मी जणूं काय एक अलौकिक पुरुष झालों. ॥३४॥
मग, हे सच्छील पंडितांनो, मी स्वतःला कृतकृत्य मानून हा अतिशय पवित्र इतिहास रचिला. ॥३५॥
ज्यामध्यें शंभूमहादेव आणि दुष्ट असुरांचा निःपात करणारी तुळजा भवानी यांचा महिमा वर्णिला आहे, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि तीर्थें यांचेंहि माहात्म्य ज्यांत सम्यक् रीतीनें कथिलें आहे, या पृथ्वीवर ज्याचा अवतार यवनांच्या विनाशाकरितांच झाला त्या शिवाजीनें यवनांबरोबर केलेल्या युद्धांचें वर्णन ज्यांत आहे, देवं, ब्राह्मण आणि गाई यांचा महिमा, आणि राजांचीं पवित्र व अद्भुत चरित्रोंहि ज्यांत वर्णिलीं आहेत, हत्ती, घोडे आणि दुर्ग यांचीं संपूर्ण लक्षणें, आणि शाश्वत राजनीति ह्यांचेंहि ज्यांत वर्णन आहे, असें त्या पवित्र सूर्यवंशाचें आरंभापासून मी वर्णीत असलेलें चरित्र हे श्रोतृश्रेष्ठानों, आपण सर्वांनींच लक्ष देऊन ऐकावें. ॥३६॥३७॥३८॥३९॥४०॥४१॥
स्वतः सूर्याप्रमाणें तेजस्वी असा श्रीमान् मालोजी राजा दक्षिणेंत, सूर्यवंशांत होऊन गेला. क्षात्रधर्मघुरीण आणि प्रसन्नचित्त असा तो मराठा राजा महाराष्टांत राज्य करीत होता. ॥४२॥४३॥
विष्णूप्रमाणें पराक्रमी आणि कमलासारखे दीर्घ नेत्र असलेला तो गुणगंभीर राजा प्रजेस सुख देत असतां त्याची कीर्ति पसरूं लागली. ॥४४॥
त्या धर्मात्म्यानें पुणें प्रांतीं आपलें वास्तव्य केलें आणि भीमानदीच्या कडेनें राज्य अधिक वाढविलें. ॥४५॥
ज्यानें भरधांव जाणार्‍या आपल्या घोड्यांच्या खुरांनीं भीमा नदीच्या कांठचा प्रदेश तुडवला, ज्यांच्या दुंदुंभीपासून उठणार्‍या ध्वनीच्या लहरींनीं समुद्र खवळून टाकला, ज्यानें आपल्या प्रतापानें शत्रुराजे जर्जर केले असा तो बलाढ्य राजा स्वसामर्थ्यानें सर्व सह्याद्रीच्या प्रदेशाचा स्वामी झाला. ॥४६॥४७॥
विष्णूच्या अंशापासून झालेला, सर्व धनुर्धार्‍यांचा म्होरक्या, जणूं दुसरा अर्जुनच असा तो राजा शत्रूंना दुःसह झाला. ॥४८॥
ज्याप्रमाणें सत्यवानानें सावित्रींशीं विवाह केला, त्याप्रमाणें त्या राजानें मोठ्या कुळांत जन्मलेल्या उमा नावांच्या शुभलक्षणीं कन्येशीं लग्न केलें. ॥४९॥
मग रघुराजाचा पुत्र श्रीमान् अज हा जसा साध्वी इंदुमतीला मानी तसा तो मालोजी त्या अनुरूप गुणांनीं मंडित अशा आपल्या पत्नीला मानूं लागला. ॥५०॥
पार्वतीनें जणूं काय प्रसाद म्हणून स्वतः दिलेलें आपलें उमा हें नांव ती साध्वी उमा भूषविती झाली. ॥५१॥
नंतर, कुबेराप्रमाणें संपन्न, बुद्धिमान् आणि ज्ञानवान् अशा त्या राजानें आपल्या लावण्यवती पत्नीसह अनेक प्रकारचीं धर्मकृत्ये केलीं. ॥५२॥
अग्निहोत्रें, सत्रें, बहुदक्षिणात्मक यज्ञ, आणि त्याचप्रमाणें महादानें सुद्धां त्याच्या राज्यांत सदोदित होत असत. ॥५३॥
त्या शिवभक्त राजानें शंकराला प्रसन्न करण्यासाठीं सागराप्रमाणें विस्तीर्ण असा गोड पाण्याचा तलाव शंभुपर्वतावर खणविला. ॥५४॥
उंच बहिर्द्वारें असलेले मेरुपर्वतासारखे राजवाडे, पुष्कळ वृक्षांच्या योगें शोभणारीं रमणीय उद्यानें, सोन्याच्या पायर्‍या असलेल्या मोठमोठ्या विहिरी, पुष्कळ पाणपोया व धर्मशाळा त्या धर्मात्म्यानें बांधविल्या. ॥५५॥५६॥
भगीरथाच्या पाठीमागून जशी गंगा गेली, तशीच त्या बलाढ्य राजाच्या पाठीमागून अतिशय बलाढ्य आणि अफाट चतुरंग सेना जात असे. ॥५७॥
वार्‍यामुळें किनार्‍यावरून उसळणार्‍या समुद्राला ज्याप्रमाणें वेत नमन करतात ( वांकतात ), त्याप्रमाणें त्या उत्कर्ष पावलेल्या मालोजी राजाला मांडलिक राजे नमूं लागले. ॥५८॥
याच समयीं देवगिरी ( दौलताबाद ) येथें राहून धर्मनिष्ठ निजामशहा पृथ्वीवर राज्य करीत होता. जाधवरावादि दक्षिणेंतील सर्व राजे सदोदित त्या यवनाधिपतीच्या सेवेंत होते. ॥५९॥६०॥
त्यावेळेस यवनांनीं परिवेष्टित आदिलशहाहि विजापूर येथें राज्य करीत होता. ॥६१॥
नंतर कांहीं काळानें एका प्रबल कारणामुळें आदिलशहा आणि निजामशहा यांच्यांत मोठा लढा पडला. ॥६२॥
तेव्हां त्या बुद्धिमान् निजामशहानें मालोजी राजा हा शत्रूंचा कर्दनकाळ आहे असें ऐकून त्यास आपल्या मदतीस बोलावलें. ॥६३॥
तेव्हां त्याचें प्रिय करण्यासाठी तो अद्वितीय तेजस्वी मालोजी देवगिरी येथें जाऊन राहिला. ॥६४॥
त्याचा भीमाप्रमाणें पराक्रमी असा विठोजी नांवाचा भाऊ ही आपल्या सैन्यासह निजामशहास येऊन मिळाला. ॥६५॥
त्यांच्या आगमनानें संतुष्ट होऊन निजामशहानें सामदान इत्यादिकांनीं त्यांचा गौरव केला. ॥६६॥
बलाढ्य मालोजी राजानें निजामशहाला जे जे शत्रू उत्पन्न झाले त्यांचा त्यांचा उच्छेद केला. ॥६७॥
इंद्राप्रमाणें पराक्रमी अशा विठोजीनेंही निजामशहास साहाय्य करून त्याचे मनोरथ पूर्ण केले. ॥६८॥
तेथें निजामशहाचे साहाय्यकर्ते पुष्कळच होते. परंतु मालोजीच त्या सर्वांत श्रेष्ठ होता. ॥६९॥
वडिलोपार्जित राज्य आपल्या मंत्र्यांवर सोंपवून निजामशहानें दिलेल्या जहागिरीवर तो राज्य करूं लागला. ॥७०॥
आपल्याला पुत्र होऊन ह्या राजलक्ष्मीला शोभा येईल अशा आशेंत पत्नीसमवेत त्याचे पुष्कळ दिवस लोटले. ॥७१॥
तेव्हां तो पुत्रेच्छु राजा आपल्या धर्मपत्नीसह मोठें व्रत आचरून शंकराची आराधना करूं लागला. ॥७२॥
नंतर पुष्कळ दिवस लोटल्यावर त्या महातेजस्वी मालोजीची पत्नी गर्भवती होऊन आपल्या पतीला आनंद देती झाली. ॥७३॥
दहाव्या महिन्यांत राजलक्षणांनीं युक्त ( झळकणारा ), सुंदर व अलौकिक पुत्र तिला शुभ वेळीं झाला. ॥७४॥
त्याची नासिका सरळ, डोळे मोठे, कपाळ रुंद, केश तुळतुळीत छाती विशाल, हात लांब, मान भरलेली, वर्ण सुवर्णासारखा व हातपाय आरक्त आणि गोंडस असून त्याच्या विपुल तेजानें गृह प्रकाशमान झालें. ॥७५॥७६॥
त्याला पाहून दायांना आनंद झाला आणि त्यांनी गडबडीनें अंतःपुरांतल्या सेवकां मार्फत राजाला ही बातमी कळवली. ॥७७॥
पुत्रजन्माची ती आनंदाची वार्ता ऐकून त्याच्या सर्व शरीरावर जणूं काय अमृताचाच वर्षाव झाला ( इतका तो हर्षभरित झाला. ) ॥७८॥  
तेव्हां आनंदसागरांत पोहणारा आणि पुत्रमुख पाहाण्यास उतावीळ झालेला तो राजा जलदीनें ( अंतःपुरांत गेला; आणि त्यानें आपल्या सुकुमार मुलाचें मुखावलोकन केलें. ॥७९॥
नंतर त्या आनंदित राजानें आपल्या पुरोहितासह स्वस्तिवाचन करून त्या मुलाचें जातकर्म केलें.
कार्तिक ‘ स्वामी सारख्या तेजस्वी अशा त्या राजपुत्राच्या जन्मप्रसंगीं मंगल वाद्यें वाजावयास लागलीं. वारयोषिता नृत्य करूं लागल्या, गवई मधुर आणि उच्च आलाप काढूं लागले; भाट उच्च स्वरानें प्रसिद्ध बिरुदावळी गाऊं लागले; द्विजश्रेष्ठ फलदायक आशीर्वादांनीं त्याचें अभिनंदन करूं लागले; आणि घरोंघरीं तो महोत्सव विशेष रीतीनें साजरा करण्यांत आला. ॥८०॥८१॥८२॥८३॥
त्यानें याचक जनांस अमूल्य मोत्यें, पोंवळीं रत्नजडित अलंकार व मोहरा आणि जरतारी वस्त्रें, गाई, घोडे व हत्ती हीं दिलीं, तेव्हां हा लोकांना प्रतिकल्पवृक्षच भासला. ॥८४॥८५॥
ज्योतिष्यांनीं सांगितलेल्या व धर्माला जुळणार्‍या अशा शुभ दिवशीं मालोजीनें स्वतः आपल्या मुलाचें शहाजी असें नांव ठेविलें. ॥८६॥
कमलाप्रमाणें सुंदर मुख असलेला तो बालक दिवसेंदिवस वाढूं लागला आणि त्याबरोबरच आपल्या बाललीलांनीं आपल्या आईबापांच्या दृष्टीस आनंद देऊं लागला. ॥८७॥
पुढें दोन वर्षांनीं मूर्तिमंत आनंद असा दुसरा पुत्र तिच्या पोटीं झाला ॥८८॥
त्याचेही पंडितांच्या मदतीनें यथाविधि संस्कार करून सिद्ध पुरुषानें सांगितल्या प्रमाणें शरीफजी हें नांव ठेवलें. ॥८९॥
सिद्धांचीं नांवे धारण करणारे असे ते कुलदीपक पुत्र शहाजी आणि शरीफजी वाढूं लागले. आणि त्याची त्यांच्या बरोबरच संपत्ति वाढत गेली. ॥९०॥
नंतर त्या राजलक्षणांनीं युक्त असलेल्या पुत्रांमुळें स्वजनांसह आनंदित होत्साता तो राजा आपला वंश पृथ्वीवर वृद्धिंगत झाला आहे असें मानूं लागला. ॥९१॥
कलिकस्मषाचा नाश करणारें, शुभदायक आणि जगत्प्रसिद्ध असें मीं केलेलें हें राजपुत्रांचें जन्मवर्णन ऐकून बुद्धिमान् मनुष्यास आपल्या इच्छा प्राप्त झाल्याचा अनुभव होतो. ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP