मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय दहावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवीन्द्र म्हणाला :-
जेव्हां शिवाजीस बारावें वर्ष लागलें, तेव्हां दूरदर्शी शहाजी राजानें शंकराच्या आज्ञेप्रमाणें त्या सूर्याप्रमाणें तेजस्वी आणि शुभलक्षणी अशा शंभूच्या पाठच्या पुत्रास बोलावून पुणें प्रांताच्या अधिकारावर नेमलें. ॥१॥२॥
पंडित म्हणाले :-
भगवान् शंकराच्या आज्ञेवरून शिवाजीस शहाजी राजानें पुणें प्रांतीं कसें पाठविलें आणि पित्याच्या आज्ञेनें तो पुणें प्रांतीं कसा गेला तें हे कविश्रेष्ठ परमानंदा, आम्हांस सांगा. ॥३॥४॥
कवींद्र म्हणाला :-
एकदां घरी भगवान् शंकराची पूजा करून पुण्यवान् शहाजी राजा सुखशय्येवर निजला असतां, ज्याची पांच मुखें प्रसन्न आहेत, ज्याला दहा हात व तीन डोळे आहेत, जो गंगेच्या जलानें तुळतुळीत असलेल्या जटाजूटाच्या योगें मनोहर दिसत आहे, ज्याच्या मस्तकीं चंद्राची कोर दिसत आहे, ज्याच्या कपाळाला त्रिपुंड्राच्या योगें शोभा आली आहे, ज्याचा कंठ पाचेप्रमाणें हिरवागार आहे, ज्यानें सर्पांचीं भूषणें घातलीं आहेत, ज्यानें नाना प्रकारचीं आयुधें धारण केलीं आहेत, ज्यानें व्याघ्रचर्म पांघरलें आहे व जो गजचर्म नेसला आहे, जो वरदाता, अभयदाता व वीर्यवान् आहे, जो सकल मुक्तीचें आदिकारण आहे, ज्याला इंद्र, विष्णु इत्यादि देव वंदितात, जो सकल संपत्तीचें निधान आहे, जो योग्यांमध्यें श्रेष्ठ योगी आहे अशा त्रिपुरारि शंकरास समस्त लोकांसह व पार्वती सहवर्तमान स्वप्नामध्यें समोर पाहून तो चकित झाला. ॥५॥६॥७॥८॥९॥१०॥
त्या शंकराला प्रत्यक्ष पाहून शहाजीनें स्वतः त्यास वंदन केलें आणि अतिशय आनंदभरित होत्साता हात जोडून त्याच्यापुढें उभा राहिला. ॥११॥
नंतर अप्रतिहत - शक्ति भगवान शंकर आपला भक्त जो शहाजी राजा त्याच्यावर अनुग्रह करून म्हणाला. ॥१२॥
हे सूर्यवंशी महाबाहो, महामति शहाजी राजा, माझें हें भाषण ऐक. यांत तुझें कल्याण आहे. जो हा तुझा धाकटा मुलगा तुजसमीप शोभतो आहे तो सुलक्षणी मुलगा भगवान् विष्णु आहे असें जाण. हा तुझा पुत्र विष्णू हळूहळू वाढत जाऊन सर्व पृथ्वी पादाक्रांत करून यवनांचा संहार करील. ही भक्तवत्सल भगवती पार्वती देवी वेळोवेळीं जवळ येऊन त्याचें रक्षण करील. पृथ्वीचा भार हरण करणारा व शत्रुपक्षीय राजांचा संहार करणारा असा हा माझा भक्त सर्वांना अजिंक्य होईल. म्हणून हे महत्त्वाकांक्षी राजा, ज्या शिव नांवाच्या महाबाहूची पुणें प्रांताच्या मोठ्या अधिकारावर योजना कर. ॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥
त्यास असें बोलून नंतर शंकरानें मोत्यांचा हार त्या राजकुमाराच्या गळ्यांत स्वतः घातला. ॥१९॥
याप्रमाणें शंकराच्या अंतःकरणांत प्रेमाचा पूर आला असतां, तो राजा ब्राह्म मुहूर्तीं जागा झाला. ॥२०॥
स्वतःच्या तपामुळें श्रेष्ठ असा तो ( राजा ) विस्मित होत्साता त्याच शंकराच्या मूर्तीचें वारंवार ध्यान करीत पहाटे सूर्याप्रमाणें तेजस्वी अशा प्रभाकर नांवाच्या पुरोहितास आणवून आपलें स्वप्न ( त्यास ) सांगता झाला. ॥२१॥२२॥
तेव्हां आनंदित झालेल्या त्या पुरोहितानें ( मोठ्या आनंदानें ) अनुमोदन दिल्यावर शहाजीनें शिवाजीची पुणें प्रांताच्या आधिपत्यावर योजना केली. ॥२३॥
प्रतापी पित्यानें तें आधिपत्य दिलें असतां, स्वदेशाप्रत जाऊं इच्छिणारा तो शिवाजी राजा विशेष शोभूं लागला. ॥२४॥
नंतर कांहीं हत्ती, घोडे व पायदळ, पिढीजाद् व विश्वासु अमात्य, त्याचप्रमाणें विख्यात अध्यापक, बिरुदें, उंच ध्वज, विपुल द्रव्य त्याचप्रमाणें अद्वितीय कर्में करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजी राजानें शुभदिनीं पुणें प्रांतीं पाठविलें. ॥२५॥२६॥२७॥
 मग कांहीं दिवसांनीं तो सूर्यवंशोत्पन्न ( शिवाजी राजा ) कर्णाटक प्रांताहून महाराष्ट्र देशास निघाला. ॥२८॥
प्रभाव, उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमूह आणि स्वतःची राजलक्ष्मी यांनी युक्त असा तो शिवाजी पुणें शहरास पोंचला. ॥२९॥
( चक्रवाक पक्ष्यांचें ) राष्ट्राचें हित करणारा आणि तत्काळ ( पृथ्वीस प्रकाशित करणारा ) राष्ट्रांस उल्हसित करणारा अशा ह्या ( सूर्यास ) लोकमित्रास लोकांनीं पाहिलें, परंतु जाणलें नाहीं. ॥३०॥
पुढें अनुकूल मंत्र्यांच्या साह्यानें प्रजेला ( आनंद ) देत असतां तो पराक्रमी ( शिवाजी ) हळू हळू वाढूं लागला, त्याबरोबरच त्याचें यशहि वाढूं लागलें. ॥३१॥
तेव्हां त्याच्या अधिकाराखालीं महाराष्ट्र देशांतील जनता समृद्ध झाली आणि ‘ महाराष्ट्र ’ हें नांव अन्वर्थ झालें. ॥३२॥
त्या विनयशील व गुणवान शिवाजीच्या पदरीं असलेले गुरु कृतार्थ झाले ( म्हणजे त्यांनीं शिकविलेल्या सर्व विद्या व कला यांमध्यें तो निपुण झाला. ) ॥३३॥
श्रुति, स्मृति, पुराणें, भारत, राजनीति, सर्व शास्त्रें, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, तसेंच सामुद्रिक, निरानिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती, घोडे व रथ यांवरून बसणें, तसेंच त्यांचीं लक्षणें, चढणें व उतरणें दौड मारणें, उडी मारणें, तरवार धनुष्य व चक्र, भाला, पट्टा व शक्ति, युद्ध व बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य ( दुर्गम ) करणें, दुर्लक्ष्य निशाण वेधणें, दुर्गम संस्थानांतून निसटून जाणें, इंगित जाणणें, जादुगिरी, विष उतरणें, नाना प्रकारची रत्नपरीक्षा, अवधानें, ह्या सर्व विद्या शास्त्रें व कला यांमध्यें स्वतः प्रवीण होऊन सर्व गुरूंस मोठें यश दिलें. ॥३४॥३५॥३६॥३७॥३८॥३९॥४०॥
वसंत ऋतूंतील वैभवाच्या योगें देवतरु जसा शोभतो, तसा हा शिवाजी यौवनारंभीं नवीन प्राप्त झालेल्या कांतीमुळें शोभूं लागला. ॥४१॥
कौमारदशा संपून ज्याला नुकतेंच नवयौवन प्राप्त झालें आहे आणि मदनासारखें लावण्य अंगीं खेळूं लागल्यामुळें मनोहर अशा त्या शिवाजीला सती शीलवती, रमणीय रूपवती व अत्यंत गुणशालिनी अशी पवार कुळांतील भार्या प्राप्त झाली. ॥४२॥४३॥
रुक्मिणी प्राप्त झाल्यानें श्रीकृष्णास जसा आनंद झाला, तसा पूर्वजन्मींची पत्नी अशी ही सुंदर स्त्री प्राप्त झाल्यानें शिवाजीला झाला. ॥४४॥
पूर्वजन्मींचा परिचय असलेलें हें जोडपें ( पुनः ) एकत्र आख्यानें पुरुषार्थ ह्या जोडप्याच्या ठिकाणीं एकच आल्यामुळें फार शोभूं लागले. ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP