मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय सहावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


शहाजीची पत्नी जिजाबाई हिच्या पोटीं जन्म घेऊं इच्छिणार्‍या योगेश्वर विष्णूनें प्रसन्न होऊन तिला आपलें दर्शन दिलें. ॥१॥
तें असें :-
एकदा त्या सुंदर राणीनें देववृन्दांनी वंदित व बालरूपधारी श्रीविष्णु आपल्या मांडीवर बसलेला पाहिला. त्याचा वर्ण सांवळा असून त्याच्या चार हातांत शंख, चक्र, गदा आणि पद्म हीं होती; वक्षस्थळीं श्रीवत्स नांवाचें चिन्ह होतें; गळ्यांत कौस्तुभमणि घातलेला होता, छातीवर वैजयन्ती माळा पडली होती; तो पीतांबर नेसला होता; मस्तकावर रत्नजडीत मुकुट झळकत होता; कानांत मकरकुंडलें तलपत होतीं; गालावर मंद स्मित चमकत होतें;प त्याचें मुख प्रसन्न होतें; डोळे कमळासारखे आरक्त व दीघ होते; नाक सुंदर असून तो शुभलक्षणसंपन्न होता; त्याचा प्रत्येक अवयव लावण्याचें क्रीडास्थान होतें; लक्ष्मी त्याच्या संनिध बसली होती; त्याच्या गळ्यांत वनमाळा शोभत होती; तो सर्व अलंकारांनीं विभूषित होता; त्याच्या पदकमळांवर वज्र, रेखा, ध्वज आणि छत्र यांचीं चिन्हें होतीं. ॥२॥३॥४॥५॥६॥७॥
पुढें थोड्याच दिवसांनीं त्या शहाजीच्या पत्नीनें सामर्थ्यवान् विष्णूचा अंश गर्भात धारण केला. ॥८॥
ज्याप्रमाणें शारदीय मेघमंडळ सूर्याच्या योगानें शोभतें त्याप्रमाणें आपल्या गर्भांतील त्या महातेजामुळें ती शोभूं लागली. ॥९॥
तो तेजोमय गर्भ धारण करणार्‍या त्या जाधवरावाच्या कन्येनें त्या समयीं भूतलाला शोभा आणली. ॥१०॥
पुढें तिला डोहाळे लागले आणि गर्भभारामुळें तिला मंदपणा आला तेव्हां त्या पृथुलश्रोणीला दागिने सुद्धा जड वाटूं लागले. ॥११॥
तेव्हां अप्रतिम गौरवर्ण धारण करणार्‍या तिच्या मुखानें शुभ्रपणांत शारदीय चंद्रास सुद्धां मागें सारलें. ॥१२॥
प्रत्यक्ष जगत्प्रभु विष्णूनें जिच्या उदरीं प्रवेश केला त्या सुंदरीच्या शरीरास जडपणा आला यांत नवल काय ? ॥१३॥
तिच्या जवळ राहून तिची सेवा करणार्‍या सखीजनास ती पांडुमुखी गरोदर राणी अगदीं निराळी च भासूं लागली. ॥१४॥
हतींवर, वाघांवर आणि गडांवर आरोहण करावें, शुभ्र छत्राखालीं सुवर्ण - सिंहासनावर स्थिर बसावें, झेंडा उंच उभारावा, सुंदर चौर्‍या ढाळून घ्याव्या, दुंदुभिध्वनि ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तरवार आणि चिलखत हीं धारण करून लढाया कराव्या, गड हस्तगत करावे, विजयश्री मिळवावी, मोठमोठीं दानें करावीं, धर्मस्थापना करावी, असे अनेक प्रकारचे डोहाळे तिला प्रतिदिनी होऊं लागले. ॥१५॥१६॥१७॥१८॥
पुढें ती दिव्यतेजोमय व दिव्यरूप राणि बाळंतघरांत ( सूतिकागृहांत ) शोभूं लागली. तेथें सुईणपणांत कुशल आणि कुलशीलवान, अशा वृद्ध स्त्रिया रात्रंदिवस बसल्या होत्या, नेहमीं मर्जींप्रमाणें वागणार्‍या आणि तिला अतिशय जपणार्‍या अशा प्रख्यात सख्या जवळ होत्या, गर्भिणीला उपचार करण्यांत अनुभविक, उत्तम हातगुणाचे आणि विश्वासू असे वैद्य अश्रांतपणें उंबर्‍यात बसले होते, चुना दिल्यानें लखलखित दिसणार्‍या भिंतीवर स्वस्तिकें काढलेलीं होतीं, त्याच्या शूभ्र छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या, ताज्या पल्लवांनीं तें सुशोभित करण्यांत आलें होतें, पांढर्‍या मोहर्‍या सर्वत्र फेकण्यांत आल्या होत्या, तेथें ताज्या पाण्यानें भरलेले सुवर्ण कलश ठेवलेले होते, दाराच्या दोन्ही बाजूंस योग्य देवता काढलेल्या होत्या, सभोंवती पुष्कळ लखलखित मंगल दीप ठेवले होते, योग्य अशा सर्व वस्तूंचा संग्रह करण्यांत आला होता. ॥१९॥२०॥२१॥२२॥२३॥२४॥२५॥
शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरीं उत्तरायणांत शिशिरऋतूमध्यें फाल्गून वद्य तृतीयेला रात्रीं शुभ लग्नावर, अखिलपृथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिनें अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचें लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते; त्याच्या कपाळावर सुंदर कुंतलाग्रें पडल्यामुळें तें मोहक दिसत होतें; त्याचे नेत्र कमळाप्रमाणें सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हसरें, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. ॥२६॥२७॥२८॥२९॥३०॥३१॥
त्यानें टाहो फोडल्याबरोबर ( उपजतांक्षणींच ) देव आणि मानव यांना आनंद होऊन त्यांचे सहस्रशः नगारे झडूं लागले. घरोघरीं नानाप्रकारचीं वाद्यें वाजूं लागलीं. दिशा व नद्या स्वच्छ झाल्या; सुगंधित आणि शीतल असे वारे मंद मंद वाहूं लागले; आणि अग्नि प्रसन्न होऊन आंत टाकलेल्या आहुति स्वीकारूं लागला. ॥३२॥३३॥३४॥
श्रुति, स्मृति, धृति ( धैर्य ), मेधा ( बुद्धि ), कांति, शांति, क्षमा, दया, नीति, प्रीति, कृति, कीर्ति, सिद्धि, लक्ष्मी, सरस्वती, तुष्टि, पुष्टि, शक्ति, लज्जा, विद्या आणि सन्नति ( सद्वंदन ) ह्या सर्व देवता त्या देवाभोंवतीं जमल्या. ॥३५॥३६॥
गर्विष्ट दर्याखान पठाणाशीं निकराचें युद्ध करण्यासाठीं शहाजी महाराज दुसर्‍या प्रांतीं ( सह्याद्रीच्या लगत्यास ) गेले असतां, देवावर अनुग्रह आनि दैत्यांचा निग्रह करण्यासाठीं त्या जगत्प्रभूनें भोसल्यांच्या कुळांत अवतार घेतला. ॥३७॥३८॥
तेव्हां अज असून जन्मास आलेल्या त्या प्रभूचें जातकर्म लगेच विधिज्ञ पुरोहितानेम यथाविधि केलें. ॥३९॥
जो स्वतः सर्व लोकांच्या रक्षणार्थ समर्थ होता त्याचेहि स्वस्तिवाचन सूक्तवेत्यांनीं सूक्तांनीं केलें. ॥४०॥
मनुष्यदेह धारण करून विष्णु अवतीर्ण झाला असतां त्याच्या तेजोऽतिशयानें रात्रसुद्धां दिवसाप्रमाणें प्रकाशमान झाली. ॥४१॥
आदित्य, विश्व, वसु, मरुद्गणांसह रुद्र, यक्ष, साध्य, गंधर्व, विद्याधर, नंदिनीप्रमुख गाइ, ऐरावतादि हत्ती; नारदादि देवर्षि, सर्व अप्सरा, इंद्र, अग्नि, यम, नैरृत, वरुण, वायु, कुबेर, शंकर हे अष्ट दिक्पाल, अश्विनीकुमार, सूर्यचंद्र, तेजःपुंज ग्रह, आणि नक्षत्रें, घटी, मुहूर्त, अहोरात्र, पक्ष, मास, ॠतु, वर्ष, मानवयुगें, देवयुगें आणि मन्वतरें ह्या सर्वांनीं पृथ्वीचा भार हलका करण्यासाठीं अवतीर्ण झालेल्या त्या जगत्प्रभूच्या संनिध येऊन त्याचें स्वस्तिवाचन केलें. ॥४२॥४३॥४४॥४५॥४६॥४७॥
गणपति, जन्मदायी षष्ठी देवी ( सटवाई ), जीवंतिका ( जिवती ) कार्तिकस्वामी, नारायण, मुरली ( बांसरी ), बळराम, नांगर, धनुष्य, बाण, तरवार, आणि नानाप्रकारचीं आयुधें यांची योग्य मंत्रांनीं पूजा त्या पुरोहितानें पवित्र होऊन, पांचव्या, सहाव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीं बाळंतघरामध्यें केली; त्या बाळाचें रक्षण करावें असें म्हणून नमस्कार केला आणि क्षेत्रपाल, भुतें, राक्षस, योगिनी, दिक्पाल, यांना घराबाहेर अनेक प्रकारचे बलि दिले. ॥४८॥४९॥५०॥५१॥
तिनहि लोकांत जागरूक असणार्‍या त्याचा षष्ठीजागर झाल्यावर लोकांमध्यें त्या महात्म्याचा जन्म महत्त्वाचा असल्यामुळें त्याच्या दहाव्या दिवशीं ताम्रपर्णी, कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, कृष्णा, कोयना, वेणा, नीरा, भीमा, गोदावरी, गायत्री, प्रवरा, वंजुळा, पूर्णा, पयोष्णी, तापी, महानदी, क्षिप्रा, चंबळा, मद्रा, यमुना, बेत्रवती, भागीरथी, चंद्रभागा, गोमती, गंडकी, इरावती ( रावी ) विपाशा ( बियास ) शत्तद्रु, ( सतलज ), सरस्वती, वितस्ता ( झेलम ), सरयू, तमसा, वधूसरा ह्या अति पवित्र नद्या सिंधु, धर्धर, शोण इत्यादि मोक्षप्रद नद, पुष्करादि सरोवरें व सागर यांस अदृश्य रूपानें मोठ्या आनंदानें त्या न्हाण्यासाठीं एकत्र जमल्या. ॥५२॥५३॥५४॥५५॥५६॥५७॥५८॥
देवसेना, शची, स्वाहा, समृद्धि, पार्वती ( सर्वमंगळा ), अदिति, विनता, संज्ञा, सावित्री, अरुंधती, या कुलस्त्रियांनीं जमून त्या अप्रतिम लावण्याच्या बाळासह त्या बाळंतिणीस न्हाऊं घातलें. ॥५९॥६०॥
पिवळें वस्त्र परिधान केलेल्या अंगावर अलंकार घातलेल्या मांडीवर बालक घेतलेल्या आणि सूर्योदयींच्या दिनश्रीप्रमाणें सुंदर शोभणार्‍या अशा त्या बालमातेस सुंदर सुवासिनींनीं ओंवाळीलें. ॥६१॥६२॥
शिवनेरी किल्ल्यावर ह्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचें “ शिव ” असें नांव लोकांत प्रसिद्ध झालें. ॥६३॥
हा सामर्थ्यवान् मुलगा ह्या लोकीं अलौकिक कर्में करील; म्लेच्छांचा निःपात करून आपली अतुल कीर्ति पसरवील; दक्षिण पश्चिम, पूर्व आणि उत्तर ह्या दिशा आपल्या बाहुबलानें जिंकून हा विजयी पुत्र स्वराज्य स्थापिल. हा धाडशी बालक समुद्रावरसुद्धां आपला अंमल बसवील. आणि आपल्या सैन्याच्या मदतीनें सर्व दिशांकडून खंडणी वसूल करील. हा प्रतापी पुत्र गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, आणि खलदुर्ग, यांचें रक्षण करील. आणि विशेष गोष्ट ही कीं, हा आपल्या प्रतापानें दिल्लीपतीच्या मस्तकावर पाय देऊन सर्व जगावर आपली सत्ता स्थापील. ॥६४॥६५॥६६॥६७॥६८॥
दुर्गम मार्ग, गहन, गिरि, नद्या आणि समुद्र यांच्यामध्यें ज्याची गति अकुंठित आहे असा हा शूर राजा, पाण्ड्य, द्रविड, लाट, कर्‍हाड, वांई, ( वैराट ) आंध्र, माळवा, आभीर, गुजराथ, आणि दुष्ट म्लेच्छांनीं धुडगूसलेला आंर्यावर्त, कुरुजांगल, हस्तिनापूर, सौवीर, ( मुलतान ), धन्व ( मारवाड ), सौराष्ट्र ( काठेवाड ), कामरूप ( अयोध्या ), बाल्हीक, मद्र, कंदाहार, त्रिगर्त, द्वारका, सिंध, कलिंग, कामरूप ( आसाम ), अंग ( बिहार ), वंग, बंगाल, कांबोज, केकय, इराण, शिबि, शात्व, पुळिंद, आरट्ट, बर्बर, काश्मीर, मत्स्य, मगध, विदेह, उत्कल, टंकण, किरात, काशि, पांचाल, चेदि, कुंदल, खश, शूरसेन, हूण, हमवत, उंड्र, पुंड्र ललित्थ हे सर्व देश आपल्या उज्ज्वल पराक्रमानें जिंकून हा बहुत कालपर्यंत महाराजा होईल. ॥६९॥७०॥७१॥७२॥७३॥७४॥७५॥
पृथु, पुरूरवा, अंबरीष, उशीनराचा पुत्र शिबि, मांधाता, नल, भरत, भगीरथ, हरिश्चंद्र, दशरथाचा पुत्र राम, जनक, ययाति, नहुष, धर्मिष्ठ युधिष्ठिर ह्यापूर्वीं होऊन गेलेल्या राजांसारखा च शहाजीचा पुत्र शिवाजी हाहि होईल. असें सर्व सिद्धांत ( ज्योतिषग्रंथ ) पारंगत ज्योतिष्यांनीं त्या मुलाचें जतक सभेमध्यें वर्तविलें. ॥७६॥७७॥७८॥७९॥८०॥
पुढें त्यास बाळसें आलें, तेव्हां तो गोंडस दिसूं लागला. कायम टिकणार्‍या लावण्याच्या योगानें त्याला विलक्षण मोहकपणा आला होता; नानाप्रकारचीं रत्नें आणि मोत्यें यांनीं युक्त असें सोन्याचें सुंदर कुंचडें त्याच्या डोक्यावर झळकत असे; चमकदार मोत्यांच्या हाराच्या टोंकास लोंबणारें सोन्याचें पिंपळपान तो खेळतांना कपाळावर सारखें हलत असे; अमूल्य हिरे आणि चित्रविचित्र माणकें ( लाल ) यांच्या किरणांनीं (तेजानें ) विलक्षण चकाकणारीं बाहुभूषणें त्याला घातलीं होतीं; पाचेनें जडित अणकुचिदार वाघनख जिच्यामध्यें पटविलें होतें अशी काळी पोत गळ्यांत घातल्यामुळें तो शोभत असे; उत्तम रत्नांच्या समूहामध्यें उठून दिसणारी जीवंतिका देवीची ( जिवतीची ) सुवर्णप्रतिमा त्याच्या छातीवर पडलेली असे; पोवळी आणि नीळ यांनीं संमिश्रित सुवर्णमण्यांच्या मनगट्या त्याच्या हातांत घातलेल्या होत्या; अहाहा ! तो आनंदाची मूर्तीच होता ! त्याच्या कमरेत दिव्य करगोटा होता; पायांत लखलखित वाळे व चकाकणारे रत्नजडित चाळ होते; चतुर स्त्रियांनीं स्वतः त्याच्या डोळ्यांत चमकदार काजळ घातलेलें असे; कपाळाच्या मध्यभागीं सुरेख तीट लावलेली असे; कपाळाच्या मध्यभागीं सुरेख तीट लावलेली असे; अत्यंत सुंदर असें सोन्याचें आंगडें त्याच्या अंगांत घातलेलें असे; अशा त्या हसतमुख बाखाला दाया मोठ्या प्रेमानें सांभाळीत असत. ॥८१॥८२॥८३॥८४॥८५॥८६॥८७॥८८॥८९॥९०॥
राजपत्नीच्या त्या बालकास - तो आंत आणि बाहेर सर्वत्र संचार करणारा - सर्वव्यापी असूनहि बाहेर नेण्यांत येऊन त्याला त्यांनीं सूर्यदर्शन करविले. ॥९१॥
त्या राजकुमाराचे उपवेशन आणि अन्नप्राशन हे संस्कार यथाविधि आणि यथाक्रम करण्यांत आले. ॥९२॥
नंतर दर्याखानास आपल्या बाणांनीं विद्ध करून आणि त्याचा गर्व हरण करून विजयी होत्साता शहाजीराजा सुद्धा शिवनेरीस आला. ॥९३॥
नित्य पराक्रम गाजवणारा तो शहाजीराजा, संभाजीचा धाकटा भाऊ जा कमलनेत्र शिवाजी त्यांचें आनंदानें मुखावलोकन करता झाला. ॥९४॥
त्यासमयीं त्या राजानें आनंदित होऊन गाई, मोहरा, हत्ती, घोडे आणि रत्नें हीं इतकीं वांटली कीं लगेच सर्व याचक लोकांना दुसर्‍या कोणाकडे तोंड वेंगाडण्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकता च राहिली नाहीं. ॥९५॥
आपलीं किरणें कमलांवर पाडून त्यांस विकसित करीत ( लोकांस हर्षभरित करीत ) पृथ्वीवर उंच ( अतिशय ) संचार करणारा प्रत्यक्ष सूर्य ( लोकांचा मित्र ) असा तो राजपुत्र बालसूर्याप्रमाणें सर्व अंधकार नाहींसा करीत हळु हळु वाढूं लागला तसा तो फारच सुंदर दिसूं लागला. ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP