मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय पंचविसावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवीन्द्र म्हणाला :-
रुस्तुमखानप्रभृतींना पराभूत करून, आपली धवल कीर्ति पसरून अल्लेशहाचा मुलूख ताबडतोब ताब्यांत आणण्याकरितां सेनापतीबरोबर मोठी सेना पाठवून शिवाजी स्वतः पुनः पन्हाळगडाची देखरेख करण्यास गेला. ॥१॥२॥
त्या महाविख्यात सेनापति नेताजीनेंहि शिवराजाच्या आज्ञेवरून आदिलशहाचा तो मुलूख हां हां म्हणतां ताब्यांत आणला. ॥३॥
कवठें, बोरगांव, मालगांव, कुंडल, घोगांव, सत्तीकी, एड ( आड ), मिरज, गोकाक, दोदवाड, मुरवाड, धारवाडची मोठी गढी, क्षुद्रवंद्यपूर, श्यामग्राम ( सांगांव ), मायिल, पारगांव, सांगली, काणद, कुरुंदवाड, कागल, हेबाळ, हनुवल्ली, हूणवाड, रायबाग, हुकेरी, कांडगांव, हळदी, घुणिका, कणी, अरग, तेलसंग, केरूर, अंबुप, कमळापूरअथणी, तिकोटें हीं व xक्षरींहि मोठीं नगरें व पुरें जिंकून तीं त्या जयनिपुण नेताजीनें आपल्या ताब्यांत आणिलीं. ॥४॥५॥६॥७॥८॥९॥
ह्याप्रमाणें देश उध्वस्त झाला, पुष्कळ सैन्य गळालें ( पांगलें ) पन्हाळादि गड शत्रूच्या ताब्यांत गेले, त्वरित बोलाविलें असतांहि मोंगलांनीं उशीर केला, यामुळें दिवसेंदिवस खिन्न होऊन संकटसागरांत बुडत असतां अल्ली आदिलशहानें कर्णूलचा अधिपति शिद्दी जोहर यास बोलावून शिवाजी राजास पकडण्यास त्वरित पाठविलें. ॥१०॥११॥१२॥
तेव्हां तो बलाढ्य सरदार आपल्या जातीचे अनेक हजार घोडेस्वार, पर्वतासारखे प्रचंड अगणित हत्ती, व अतिबलाध्य कर्णाटकी पदाति यांसह शिवाजी राजाच्या ताब्यांतील पन्हाळगडास आला. ॥१३॥१४॥
पूर्वीं पराभूत झालेले रुस्तुम व फाजल हे दोघेहि आदिलशहाच्या आज्ञेवरून पुनः आपलें सैन्य घेऊन, समानगुणी व समानशील सादाताशीं मिळून, त्वरेनें पुढें जाणार्‍या त्या जोहरास जाऊन मिळाले. ॥१५॥१६॥
बाजराज घोरपडे, कर्णाटकी पीडनाईक, बल्लीखानाचा पुत्र अजिंक्य भाईखान, शिद्दी मसूद आणि दुसरेहि सरदार आदिलशहाच्या आज्ञेनें पन्हाळा घेण्यासाठीं शिद्दी जोहरापाशीं आले. ॥१७॥१८॥
नंतर तो जोहर, तसेच फाजल व रुस्तुम ह्या रणधीर सरदारांनीं आपापल्या घोडेस्वारांसह व बडेखानादि पायदळाच्या सेनापतींसह पूर्वेकडून पन्हाळगडास वेढा दिला. ॥१९॥२०॥
सादात, मसूद, क्षत्रिय बाजराज आणि भायीखानादि दुसरेहि सरदार यांनीं आपापल्या सैन्यांसह, तसेंच प्रतापी पीडनायकानें, प्रकाशमान ढाल, लाठी, कर्णाटकी लाठीवाले आणि हल्ला करण्यास उत्सुक असे दुसरे बंदुके पदाति यांसह पश्चिमेकडून पन्हाळगडास वेढा दिला. ॥२१॥२२॥२३॥
दुसर्‍याहि सैन्यांनीं जोहराच्या आज्ञेनें त्या गडाच्या दक्षिणेकडून व उत्तरेकडून कडेकोट वेढा दिला. ॥२४॥
गडावर शिवाजी अति उंच आणि जोहर अति खालीं तरीसुद्धां तें युद्ध भारतीय युद्धाच्या तोडिचें झालें ! ॥२५॥
तो शिद्दी राजाशीं पुष्कळ महिनेपर्यंत लढला; तथापि प्रत्येक वेळीं हटविला गेल्यामुळें त्यास यश मिळालें नाहीं. ॥२६॥
ह्याप्रमाणें कथन करणारा, श्रीविष्णूच्या चरण कमलांच्या आनंदभरानें भरलेला, शिवरायाच्या यशोरूपी सोमरसानें चित्त हर्षनिर्भर झालेला अशा निष्पाप ब्राह्मणश्रेष्ठ कवींद्रास काशीस्थ पंडितांनीं असं पुसलें :- ॥२७॥२८॥
पंडित म्हणाले :-
अल्ली आदिलशहानें आपला दूत पाठवून रणगर्व वाहणारी दिल्लीपतीची जी सेवा बोलाविली ती किती होती, तिचा नायक कोण होता, ती कोणत्या मार्गानें व कोठें आली, तिनें कोणतें कार्य आरंभलें आणि शिवरायानें तिचा कसा प्रतिकार केला तें सर्वं, हे बुद्धिमान् परमानंदा, सांगावें. ॥२९॥३०॥३१॥
कवींद्र म्हणाला :-
शिवाजीचा उत्कर्ष व आपला अपकर्ष झालेला पाहून उत्कृष्ट साह्यकर्ता मिळावा म्हणून आदिलशहानें ( दिल्लीकडील ) सैन्य मागितलें असतां, शरणागताचें रक्षण करण्यामधें तत्पर व शेंकडों लढाया ज्यानें मारल्या आहेत अशा दिल्लीपतीनें आपला मामा बलाढ्य शाएस्तेखान याच्या सेनापतित्वाखालीं दौलताबादेच्या ( देवगिरीच्या ) पायथ्याशीं असलेल्या आपल्या महासामर्थ्यवान् व अफाट सैन्यास त्वरित जाण्यास आज्ञा केली. ॥३२॥३३॥३४॥
नंतर धन्याच्या आज्ञेंत वागणारे अनेक सेनानायक चांगले सज्ज होऊन शाएस्तेखानाच्या नेतृत्वाखालीं निघाले. ॥३५॥
विख्यात पराक्रमी व मानी शमसखान पठाण, जाफरखानाचा पुत्र अजिंक्य नामदार, तसाच गयासुदीखान, हसन मुनीम, सुतान मिर्झा, प्रतापी मनचेहर, तुरुकताज, क्रूर कुबाहत व हौदखान हे तिघे युद्धोत्सुक उझबेग, इमाम बिरुदीखान व दुर्जय लोदीखान हे दोघे पठाण, त्याचप्रमाणें दोघे दिलावर मौलद, तसाच अबदुल बेग, प्रख्यात खोजा भंगड, जोहर, पराक्रमी खोजा सुलतान, युद्धविशारद सिद्धी फते व फतेजंग, कोपी कारतलव, गाजीखानादि सरदार, शत्रुशल्याचा पुत्र पराक्रमी भावसिंह, त्याचे बंधु किशोरसिंह व शामसिंह हे दोघे राजे, राजा गिरिधर मनोहर, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पांचवा पुरुषोत्तम व ( सहावा ) गोवर्धन असे सहा गौडवंशांतील शत्रुविध्वंसक श्रेष्ठ क्षत्रिय राजे, गौड विठ्ठलदासाचा सूर्याप्रमाणें तेजस्वी नातू, अर्जुनाचा पुत्र विजयी राजा राजसिंह, वीर बीरमदेव, सदाचारी रामसिंह, तसाच रायसिंह हे तिघे शिसोदे वंशांतील राजे, चंद्रवत वंशांतील राजा श्रीमान अमरसिंह, चंद्रपूरच्या राजाचा सेनापति अरिंदम, द्वारकाजी, जिवाजी, परसोजी, बाळाजी, शरीफ राजाचा पुत्र युद्धोत्सुक त्र्यंबकजी हे सर्व महाबलाढ्य प्रतापी भोसले, स्रजी गायकवाड, महाबाहु येसाजी, प्रख्यात राजा दिनकर कांकडे, त्र्यंबक, अनंत व दत्त हे तिघे खंडार्गळ, दत्त व रुस्तुम हे जाधव; सर्वाजीचा पुत्र शत्रुवीरघ्न रंभाजी पोवार, युद्धामध्यें वाघिणीप्रमाणें निर्भय अशी जी उदयरामाची बायको व जगजीवनाची आई ‘ रायबागीण ’ म्हणून ख्यात आहे ती, मोठ्या प्रतापामुळें अप्रतिहतगति स्त्री व तिचे कृष्णराज, प्रचंड इत्यादि भाऊ, सर्जेराव घाटगे, कमळाजी गाढे, जसवंतराव व कमळाजी कोकाटे हे सर्व बलाढ्य सरदार दिल्लीपतीच्या आज्ञेनें आपापल्या सैन्यासह सेनापति शाएस्तेखानामागोमाग गेले. ॥३६॥३७॥३८॥३९॥४०॥४१॥४२॥४३॥४४॥४५॥४६॥४७॥४८॥४९॥५०॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥
त्या सैन्यांनीं सभोंवतालीं सुद्धां मार्गांतील नद्या अशा करून टाकल्या ( आटवून टाकल्या ) कीं, त्या आपला पति जो समुद्रत यास पावसाळा सुरू होईंपर्यंत भेटेनात. ॥५६॥
मग तो सेनापतींचा शास्ता निश्चयी शाएस्ताखान सत्याहत्तर हजार घोडेश्वार, पर्वतासारख्या भद्र जातीचे उद्दाम हत्ती, बक्सर जातीचे उत्तम अघाडीचे पदाति यांसह सर्व विविध युद्धसामग्री घेऊन सज्ज होत्साता शत्रूच्या प्रदेशाची सीमा जी भीमा नदी तिच्यासमीप आला. ॥५७॥५८॥५९॥
ज्यांतील देवळांचा विध्वंस केला, मठ मठ्या मोडल्या तोडल्या, अधिकार्‍यांचीं घरें जमीनदोस्त केलीं, बागांतील झाडें मोडून टाकलीं, पुष्कळ जुनीं गांवें व नगरें उजाड केलीं, सर्वत्र संचार करणार्‍या मुसलमान सैन्यांनीं नदीतीरें स्पष भ्रष्ट केलीं असा तो भूप्रदेश खग्रास ग्रहण लागलेल्या चंद्राप्रमाणें भेसूर दिसूं लागला. ॥६०॥६१॥६२॥
नंतर खवळलेल्या समुद्रासारख्या त्या सेनेनें त्वरित येऊन चाकणप्रांत भयचकित केला. ॥६३॥
शिवाजीमहाराज पन्हाळागडावर असतांना मोंगलांनीं त्या चाकणच्या किल्ल्यास क्रोधानें वेढा दिला. ॥६४॥
त्या संग्रामदुर्गांतील शिवाजीचे ते युद्धकुशल पदाति ( शिपाई ) पुष्कळच दिवस झुंजले. ॥६५॥
“ जोंपर्यंत क्रुद्ध शिवाजी राजा पन्हाळगडावर बलाढ्य जोहराशीं लढत आहे, तोंपर्यंत हे आम्ही सगळे मिळून चाकण प्रांतांत शत्रूंशीं पदोपदीं लढूं ” अशी किल्ल्यांतील लोकांची इच्छा जाणून शाएस्तेखानास सुद्धां बरें वाटलें नाहीं. ॥६६॥
दिल्लीच्या बादशहाचें मोठें व विख्यात सामर्थ्य असलेलें सैन्य त्या संग्रामदुर्गाशीं झुंजत आहे असें जाणून अल्लीशहाच्या चित्तास कांहींसा धीर आला व त्यानेंसुद्धां विजापुराहून जोहरास अत्यंत रागानें असें लिहिलें कीं, सावध राहून पन्हाळगडावर ह्या शत्रूस पक्कें कोंडून ठेवावें. ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP