मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय तेरावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


पंडित म्हणाले :-
शत्रूंनीं आपल्या पित्यास कैद केल्याचें ऐकून शंभूजी ( संभाजी ) आणि शिवाजी हे काय करते झाले ? ॥१॥
त्या शहाजी महाराजांस कैद करून सेनापति मुस्तफाखान आणि दुष्ट, अधार्मिक महमूदशहा यांनीं काय केलें ? ॥२॥
कवींद्र म्हणाला :-
आपल्या पित्यास शत्रूंनीं पकडल्याचें ऐकून बंगळूर येथे राहणार्‍या शंभूजीस मुस्तुफाखानाचा अतिशय संताप आला. ॥३॥
प्रतापी शिवाजीनेंहि शहाजीची झालेली ही दशा ऐकून आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. ॥४॥
महामानी मुस्तुफाखानानें बंगळूर त्वरित घेण्याच्या इच्छेनें डुरे वंशांतील मुख्य तानाजी राजे, क्षत्रिय वृत्तीनें राहणारा ब्राह्मण विठ्ठल गोपाळ आणि पोक्त फरादखान यांना ताबडतोब निघण्याची आज्ञा केली. ॥५॥६॥
त्याचवेळीं बुद्धिमान् महमूदशहानेंहि शिवाजीच्या प्रांतावर चालून जाण्याविषयीं आपल्या सरदारांना आज्ञा केली. ॥७॥
नंतर थोर मनाचा फत्तेखान नांवाचा सेनापति, मिनादशेख व रतनशेख, कोपिष्ट फत्तेखान, क्रूर, धनुर्धारी, आणि कीर्तिमान शरफशहा हे कवचधारी व शास्त्रास्त्रांनीं सज्ज यवन, आणि वज्रासारखे ज्याचे बाण आहेत असा मत्तराज घाटगे ( घांटिक ), फलटणाचा राजा बाजनाईक आणि सोन्याच्या पाठीचीं धनुष्यें, सोन्याचे कंबरपट्टे, सोन्याचीं वस्त्रें, सोन्याचे ध्वज, सोन्याच्या चांदांनीं युक्त ढाली धारण करणारे इतर शेंकडो मांडलिक राजे यांनीं बेलसर नांवाचें नगर बलानें हस्तगत करून तेथें तळ दिला. ॥८॥९॥१०॥११॥१२॥
त्याच प्रमाणें उत्तम गोलंदाज, कुशल, क्रूर, सुंदर, जणूं काय दुसरा अश्वत्वामा असा हैबतरावाचा पुत्र बल्लाळ यानें अनेक सैनिकांसह शिवाजीच्या सैनिकांकडून अडथळा न होतां शिरवळ गांठलें. ॥१३॥१४॥
तेव्हां तो आलेला ऐकून पुरंदरगडावर राहणार्‍या, कार्तिकेयासारख्या शिवाजीनें कवच घालून धनुष्य बाणें हातीं घेऊन, शस्त्रास्त्रांनीं सज्ज होऊन, स्मितयुक्त व नम्र वदन शिवाजी बलरामासारख्या आपल्या धैर्यवान वीरांस असें म्हणाला :- ॥१५॥१६॥
शिवाजी म्हणाला :-
माझे वडिल शहाजी महाराज स्वतःच्या संपत्तीनें युक्त असतांहि मुस्तुफाखानावर विश्वास ठेवल्यामुळें संकटांत सांपडले ही केवढी खेदाची गोष्ट ! ॥१७॥
अविश्वासू लोकांवर विश्वास ठेवूं नये, इतकेंच नव्हे तर विश्वासू लोकांवर सुद्धा विश्वास ठेवूं नये; ( कारण ) विश्वासापासून उत्पन्न झालेलें भय समूळ उच्छेद करतें. ॥१८॥
हें व्यासवचन माहीत असतांहि महाराजांनीं त्या अत्यंत अविश्वासू माणसांवर विश्वास ठेवला हें केवढें आश्चर्य ! ॥१९॥
आपले मनोगत समजूं न देणार्‍या यवनाधम मुस्तुफाखानानें आदिलशहाच्या हुकुमानें महाराजांना कैद केलें. ॥२०॥
एवढा दाशरथि राम, पण तोसुद्धां मृगनयना सीतेच्या आग्रहानें सुवर्ण मृगावर विश्वास ठेवल्यानें रावणाकडून फसविला गेला. ॥२१॥
नहुषाचा पुत्र ययाति याचा इंद्रानें आपल्यावर अत्यंत विश्वास बसवून घेऊन त्यास फसविलें; आणि तो स्वर्गांतून त्वरित खालीं पडला. ॥२२॥
जन्मतःच प्राप्त झालेलें कवच धारण करणार्‍या कर्णानें विश्वास ठेवल्यामुळें इंद्रानें त्यास असें बनविलें कीं, जेणेंकरून तो अर्जुनाकडून मारला गेला. ॥२३॥
भरत कुलांतील मुख्य जो धर्मराजा तो सुद्धां विश्वास ठेवल्यामुळें दुर्योधनाच्या साह्यकर्त्या शकुनीकडुन द्यूतांत जिंकला गेला. ॥२४॥
म्हणून ज्यानें लक्षणांसह व सांगोपांगासह राजनीतीचें चांगलें अध्ययन केलें आहे अशा चतुर पुरुषानें शत्रूंवर विश्वास ठेवूं नये. ॥२५॥
नागाला ( सर्पाला ) मिठी मारणें, हालाहल विष पिणें आणि शत्रूंवर विश्वास ठेवणें ह्या तीनहि गोष्टी सारख्याच होत. ॥२६॥
माकडांच्या पिलांचे लालनपालन करणें, काळसर्पांस डवचणें, त्याचप्रमाणें दुष्टांशीं मैत्री करणें हीं अपायकारक होत. ॥२७॥
आंधळ्याच्या घरांतील ओट्याच्या मध्यभागीं दिवा लावणें, नदीच्या ओघांत वाळूचा पूल बांधणें, फुटलेलें मूल्यवान् मोती पुनः जोडणें, केळीचा खांब पाडणें, आकाश खणणें, जलताडण करणें हें जसें केवळ परिश्रमास कारणीभूत होतें तशीच दुष्टांची सेवा होय. ॥२८॥२९॥३०॥
शत्रूवर विश्वासून जो प्रसिद्ध राजनीतिशास्त्र साफ विसरला त्याचा काय उपयोग ? त्यानें खदिरांगारांच्या शय्येवर शयन केलें म्हणावयाचें ! ॥३१॥
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊन जर शांत होईल तर दुष्टांच्या सेवेनेंहि पूर्ण कल्याण होईलच होईल. ॥३२॥
छिद्रान्वेषी शत्रु, दुसर्‍याची स्पर्धा करणारा दुष्ट हे सर्पापेक्षांहि अहितकारक जाणावेत; शहाण्यानें त्यांची उपेक्षा करूं नये. ॥३३॥
त्या महमूदशहाचें अखिल राज्य रक्षिलें आणि आज्ञा पाळली; महाराजांनीं त्याचें काय ( वाईट ) केलें होतें ? ॥३४॥
मित्रांचा शत्रु झाल्यामुळें निराधार असा हा आदिलशहा आपल्या ऐश्वर्यामुळें मान्य असला तरी नाश पावत नाहीं हें आश्चर्य होय ! ॥३५॥
बंगळुरीं राहणारा, फरादखानादि शत्रूंनीं वेढलेला अत्यंत मानी असा माझा भाऊ तेथें युद्ध करील. ॥३६॥
आणि मी ह्या गडांचें रक्षण करीत अगदीं निर्धास्तपणें सज्ज सैन्यानिशीं येथें शत्रूंशीं लढेन. ॥३७॥
इकडे मी स्वतः आणि तिकडे पराक्रमी शंभुराज असे दोघेहि युद्ध करून वडिलांस मुक्त करूं. ॥३८॥
अत्यंत गर्विष्ठ महमूदशहाचा आम्हाकडून पराभव झाला म्हणजे तो अपाल्या गर्वाबरोबरच महाराजांस सोडील. ॥३९॥
स्वधर्मनिष्ठ अशा आमच्या पूज्य पित्यास जर महमूद सोडणार नाहीं तर तो आपल्या कर्माचें फळ खास भोगील. ॥४०॥
जर आदिलशहा मूर्खपणानें महाराजांस अपाय करील तर बाबाच त्याला त्याच्या साह्यकर्त्यासह लगेच ठार करतील. ॥४१॥
ज्यांचें मन सदा धर्मपाशांनीं बद्ध असतें त्यांना बांधण्यास कारागृहादि बंधनें समर्थ नसतात. ॥४२॥
लोकांमध्यें प्रसिद्ध असलेली जावळी ( जयवल्ली ) मी पूर्वीं घेतली आणि तिचा अमिलाष करणार्‍या चंद्ररावाची तेथें स्थापना केली. ॥४३॥
संतापलेल्या नागांप्रमाणें भयंकर घोरपडे मला गारुड्याला पाहून अगदीं गोगलगाय झाले आहेत. ॥४४॥
युद्धार्थ एकदम चाल करून फलटणच्या राजास पूर्वीं मी पळवून लाविलें आणि त्यांस जिवंत पकडून सोडून दिलें. ॥४५॥
आतां हे फत्तेखानादि एकत्र झालेले योद्धे आम्हांस गांठून मस्त हत्तीप्रमाणें लढतील. ॥४६॥
प्रबळ सैन्य बाळगणारा हा अतिबलाढ्य बल्लाळ शिरवळ घेतल्यामुळें आपणास फारच मोठा समजूं लागला आहे. ॥४७॥
म्हणून तुम्ही येथून त्वरेनें जाऊन त्या अति बलाढ्य बल्लाळास पकडून आज शिरवळ सोडवावें. ॥४८॥
मग उद्यां किंवा परवां त्या महाबलवान् फत्तेखानास इथें वा तिथें आम्ही त्याच्याशीं युद्ध करू. ॥४९॥
कवींद्र म्हणाला :-
शिवाजीचें हें भाषण ऐकून त्या हजारों सैनिकांनीं सिंहाप्रमाणें प्रचंड गर्जना करून आकाश दणाणून सोडलें. ॥५०॥
मग शत्रूंचा विध्वंस करणारा हाडें ( घुसळणारा ) व निकराच्या युद्धांत आनंद मानणारा महायोद्धा गोदाजी जगताप, जणूं काय दुसरा भीमच असा भयंकर भीमाजी वाघ, शत्रूंच्या बाहुबलाचा गर्व हरण करणारा संभाजी कांटे, भयंकर आहे असा यमाप्रमाणें भयंकर युद्धांगांचा शृंगार, ज्याच्या भाल्याचें टोंक शिवाजी इंगळे, शत्रुवीरांची लक्ष्मी चोरणारा ( हरण करणारा ) लढण्यांत अत्यंत निर्भय, अत्यंत भयंकर सैन्य असलेला असा सेनानायक भिकाजी चोर, शत्रूंच्या हृदयांत धडकी उत्पन्न करणारा, युद्धांत भैरवाप्रमाणें भयंकर, तो तेजःपुंज भैरव नांवाचा ह्याचा सख्खा भाऊ हे सूर्याप्रमाणें तेजस्वी, आपआपल्या वैभवानें शोभणारे गडांच्या स्वामीचे ( शिवाजीचे ) शूर वीर त्याला प्रणाम करून निघाले. ॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥५६॥
ज्याप्रमाणें श्रीकृष्णानें सात्यकीस सर्व यादववीरांचा सेनापति नेमलें, त्याप्रमाणें शिवाजीनें कावुकास ( कावजीस ) त्या सर्वांचा सेनापति नेमिलें. ॥५७॥
आपला युद्धाचा पोषाख चढवून अतिशय सज्ज घोड्यांवर बसून मेघांप्रमाणें गर्जना करीत ते पुरंदर गडावरून खालीं उतरले आणि ती रात्र तेथेंच घालवून शत्रूस जिंकण्याच्या इच्छेनें प्रयाणाभिमुख होऊन त्यांनीं नौबत वाजविण्यास सांगितलें. ॥५८॥५९॥
मग पायदळाच्या पदाघातांनीं भूतल जणूं काय विदीर्ण करीत, घोड्यांच्या खुरांनीं आकाश जणूं काय कापीत, शत्रूंवर जणूं काय प्रळयाग्नि उधळीत त्या शूर वीरांनीं युद्धाचे आविर्भाव करीत शिरवळ लगेच पाहिलें ( गांठलें ).॥६०॥६१॥
शिवाजीचें बलाढ्य सैन्य जवळ आलेले पाहून शत्रूसुद्धां आपल्या सैन्यांतील अत्यंत बुद्धिमान पायदळांस असें म्हणाला :- ॥६२॥
बल्लाळ म्हणाला :-
शत्रूचें अत्यंत गर्विष्ठ सैन्य पाहून घाबरूं नका; युद्धांत मरणें हें श्रेष्ठ होय आणि युद्धांतून पळून जाणें हें निंद्य होय. ॥६३॥
फत्तेखानाच्या आज्ञेवरून हे आपण शिरवळास आलों आहों; या ठिकाणीं आपलें ठाणें ध्रुवाप्रमाणें अढळ आहे. ॥६४॥
आतांहि जर तुम्हांस भय वाट असेल तर जणूं काय दुसरा तटच अशा माझा ताबडतोब आश्रय करून माझ्या आज्ञेनें येथें राहा. ॥६५॥
आणि केवळ आमच्या मरण्यानेंच स्वाभिकार्य सिद्धीस जातें असें नाहीं. म्हणून जोराच्या युद्धासाठीं आपण टेकडीचाच आश्रय करूं. ॥६६॥
दैवानें आणलेल्या ह्या अत्यंत कठिण प्रसंगीं ही अत्यंत क्षुद्र टेकडीसुद्धां ह्या युद्धांत यश प्राप्त करून देईल. ॥६७॥
आपण मानी लोकांनीं अभिमानानें या शिरवळामध्यें लढतां लढतां आपलें शिर द्यावें; पण युद्धांत ( शत्रूंस ) यश देऊं नये. ॥६८॥
यशासाठींच आपली प्रिय पत्नी रामानें टाकली; यशासाठींच दानवांचा राजा बळी पाताळांत गेला; यशासाठींच विष्णूनें कूर्मावतार घेतला; यशासाठींच शिबीनें आपलें स्वतःचें गांस तोडतोडून दिलें; शंकर एकदम हालाहाल प्याला; यशासाठींच दधीचीचें आपलीं हाडें कापून दिलें व सद्गति मिळविली; यशासाठींच परशुरामानें सर्व पृथ्वी सोडून दिली; यशासाठींच भीष्म शरशय्येवर पडले; म्हणून आज ह्यांनीं आपल्यांतील मुख्य मुख्य लोक वेंचून वेंचून मारिले नाहींत तोपर्यंत आम्हीं यशासाठी व अर्थासाठीं शत्रूंशीं युद्ध करूं. ॥६९॥७०॥७१॥७२॥७३॥
याप्रमाणें बल्लाळानें भाषण केल्यावर त्याचे हजारों वीर दुर्गाचा आश्रय करून हत्तीप्रमाणें गर्जना करूं लागले. ॥७४॥
शत्रूंनीं तटाचा आश्रय केलेला पाहून युद्धेच्छु काबुत आपल्या सैनिकांस असें म्हणाला :- ॥७५॥
कावुक म्हणाला :-
अहो, शिवाजीचा प्रांत जिंकण्याच्या इच्छेनें आलेला हा बळवान बल्लाळ तटाचा आश्रय राहिला आहे. ॥७६॥
आपल्या ह्या शिरवळाचा आश्रय करून राहिलेला हा मंदमति आपल्या अकलेचें प्रदर्शन करीत आहे. ॥७७॥
याला बुरूंज नाहींत आणि म्हणण्यासरखा खंदकहि नाहीं. म्हणून, हे सैनिक हो, हा दुर्ग दुर्गम आहे असें समजूं नका. ॥७८॥
याला वेढा द्या, सभोंवतालचा मार्ग रोखून टाका आणि एका क्षणांत सगळा खंदकहि बुजवून टाका. ॥७९॥
पक्ष्यांप्रमाणें उंच उडी मारणारे आपले घोडे उडवून हा घ्या किंवा कुदळींनीं फोडून टाका. ॥८०॥
हा खणून टाका आणि लगेच याचा पायाहि खोदून काढा. हा किल्ला म्हणजे काय लंका लागली आहे कीं ज्यामुळें त्याची भीति वाटावी ? ॥८१॥
कावुकाच्या ह्या जोरदार भाषणाणें युद्धावेश चढलेल्या सैनिकांनीं ताबडतोब त्या किल्ल्यावर चोहोंकडून हल्ला चढविला. ॥८२॥
देवाप्रमाणें महा पराक्रमी अशा त्या वीरांना समोर पाहून लढाईस तोंड लागलें असें समजून शत्रूही धनुष्याची हालचाल करूं लागले. ॥८३॥
वरून यांस पाहण्याकरितां जो डोकें वर करी त्याचें डोकें लगेच कापलें जाऊन तो केतुग्रहासारखा होई. ॥८४॥
वृक्षांच्या फांद्यांवरून जशा भुंग्यांच्या रांगांच्या रांगा उडुन जाऊं शकतात त्याप्रमाणें शूर वीरांच्या धनुष्यांपासून तीक्ष्ण बाण सुटूं लागले. ॥८५॥
क्रूर महाबलाढ्य, शूर वीर धनुष्य आकर्ण ओढून तीक्ष्ण बाणांनीं शत्रुवीरांचीं मुंडकीं छेदूं लागले. ॥८६॥
उत्कृष्ट तिरंदाजांनीं सोडलेले व भूमीवर पडणारे बाण तिच्या पृष्ठांत इतक्या जोरानें घुसत कीं, त्यांना शेषदर्शन होई. ॥८७॥
चाकें, नांगर, कणें, मुसळें, उखळें, गोटे, घिरटें, पेटलेलीं कोलितें, खैराच्या निखार्‍यांचे ढीग, तापलेलीं तेलें आणि दुसरीं नाना प्रकारचीं शस्त्रें तटावरील लोक शत्रुवीरांवर फेकूं लागले. ॥८८॥८९॥
शत्रूंचा मारा होत असतांहि शस्त्रें उगारणार्‍या शिवाजीच्या सैनिकांनीं वेढलेला तो किल्ला अधिक शोभूं लागला. ॥९०॥
मग दीर्घ गदांनीं व परिघांनीं ( लोखंडी कांट्यांच्या सोट्यांनीं ) सुद्धां कांहीं आवेशयुक्त सैनिकांनीं अनेक ठिकाणीं तो दुर्ग फोडला. ॥९१॥
कांहींनीं भाल्यांच्या प्रहारांनीं भोकें पाडलीं; कांहीं शिड्यांवर चढून तटास बिलगले. ॥९२॥
गरुडासारख्या वेगवान घोड्यांवर बसलेले कांहीं वीर चोहोंकडे नीट पाहून त्याच्यावर उडी मारून जाण्याचा प्रयत्न करूं लागले. ॥९३॥
काकुकानें तर गदा इत्यादि नानाप्रकाच्या आयुधांनीं अनेक ठिकाणीं जोर जोरानें प्रहार करून वेस फोडली. ॥९४॥
जेव्हां तो वीर वेस फुटलेल्या त्या तटाच्या आंत घुसला तेव्हां आदिलशहाची सेना त्याच्यावर चाल करून लढूं लागली. ॥९५॥
वडवाग्नीप्रमाणें अत्यंत अनावर असे हे शत्रु चालून आलेले पाहून वडवाग्नीप्रमाणें अत्यंत प्रतिपक्ष्याचा प्रतिहार करीत असतां शोभूं लागला. ॥९६॥
अतिशय देखणा, उंच, कवच घातलेला, जवान, भाला आणि धनुष्य धारण करणारा, धैर्यवान, सैनिकांनीं परिवेष्टित, उंच घोड्यावर बसलेला तो बल्लाळ, विझण्याच्या वेळीं दिवा जसा विशेष प्रकाशतो तसा, फार शोभूं लागला. ॥९७॥९८॥
मग कावुकाच्या पुढारीपणाखालीं भिकाजी, भीमाजी, तुकाजी, गोदाजी, सदोजी, संभाजी आणि दुसरेहि शूर योद्धे आपले उंच घोडे वेगानें उडवीत व शस्त्रें पराजीत बल्लाळ प्रभृति वीरांवर अतिशय त्वेषानें प्रहार करूं लागले. ॥९९॥१००॥
त्या समयीं द्वेषरूपी काळ्याकुट्ट अंधकारामध्यें उभय पक्षांच्या योध्यांचीं आयुधें परस्परांवर थडकूं लागलीं. ॥१०१॥
युद्धावेशानें एकमेकांवर चालून जाणार्‍या, गरुडापेक्षां अधिक वेगवान् घोड्यांवर बसलेल्या योध्द्यांच्या शस्त्रांवर - आकाशांत विजांची एकमेकींवर धडक व्हावी त्याप्रमाणें - शतशः शस्त्रें धडकलीं. ॥१०२॥१०३॥
स्वतःचीं शकलें होत असतां भालाईत भालाइतास, धर्नुधारी धर्नुधार्‍यास, गदाधारी गदाधार्‍यास ठार करूं लागला. ॥१०४॥
ढालाईंत ढालाइताशिवाय, कवचधारी कवचधार्‍याशिवाय व धनुर्धर धनुर्धराशिवाय दुसर्‍या कोणाशीं लढला नाहीं. ॥१०५॥
कवच भेदूं न शकल्यामुळें वेगानें वर उडालेले बाण सूर्याच्या किरणाप्रमाणें क्षणभर आकाशांत चमकले. ॥१०६॥
कवचधारी योध्द्यांना भेदून जेव्हां बाण पृथ्वींत घुसले तेव्हां त्यांच्या आंगातून रक्ताच्या धारा एकसारख्या वाहूं लागल्या. ॥१०७॥
त्या ठिकाणीं क्रुद्ध तिरंदाजांनीं सोडलेल्या बाणांनीं मस्तकें छेदलीं जाऊन गळणार्‍या रक्तानें रक्तबंबाळ झालेलीं धडें खवळलीं. ॥१०८॥
हत्तींच्या लांब सोंडा आणि बाणांनीं ज्यांच्या अंगांचे तुकडे झाले आहेत अशा घोड्यांच्या माना भूमीवव्र तुटून पडल्या. ॥१०९॥
शूर धनुर्धार्‍यांनीं बाणांनीं तोडलेली शत्रूंचीं पुष्कळ मुंडकीं समरांगणावर पसरलीं गेलीं. ॥११०॥
युद्धरूपी सागरांतून जवळ आलेल्या एका गदाधारी रूपी मगरावर कोणी एकानें जोरानें चाल करून त्यास पकडलें. ॥१११॥
त्या ठिकाणी इंगळ्यानें पंचवीस, पोळानें बारा, चोरानें चौदा, घाटग्यानें तेवीस, वाघानें सोळा असे वीर एका क्षणांत ठार केले आणि कावुकानें एकोणीस उत्तम योद्धे ठार मारले. ॥११२॥११३॥११४॥
तेव्हां तेथें पायदळ, घोडे व हत्ती यांच्या शरीरांतून निघणार्‍या रक्ताची नदी वेगानें वाहूं लागली. ॥११५॥
जेव्हां शत्रुवीरांनीं बळानें पराभव करून वेढलें तेव्हां बल्लाळाचें सैन्य भीतीनें समरांतून पळूं लागलें. ॥११६॥
शत्रूंनीं परतविलेल्या व सैरावैरा पळणार्‍या त्या सैन्यास हैबत राजाचा पुत्र थोपवून धरूं शकला नाहीं. ॥११७॥
तेव्हां त्याला अतिशय त्वेष येऊन तो आपलें शस्त्र झुगारून ज्याप्रमाणें वृत्रासुर रागानें देवांवर चालून गेला त्याप्रमाणें, शत्रूंवर वेगानें धावून गेला. ॥११८॥
त्याच्या भात्यांच्या जोडांत जितके बाण होते तितके कावुकाचे अघाडीचे वीर त्यानें पाडले. ॥११९॥
तो जों भाला घेऊन सभोंवतीं शत्रूंची त्रेधा उडवीत आहे तोंच कावुकानें त्यास आपल्या भाल्याच्या प्रहारानें पाडलें. ॥१२०॥
सिंहानें जसें मत्त हत्तीला पाडावें तसें आवेशानें लढणार्‍या त्या शिवाजीच्या सेनाधिपतीनें हैबत राजाच्या पुत्रास पाडल्यावर रक्त, मेद, वसा आणि मांस यांचा भूमीवर चिखल झाला नंतर त्याच्या सैन्यांत कोणासहि धैर्य धरवेना ! ॥१२१॥१२२॥
त्यावेळीं दांतीं तृण धरून शरण आलेल्या शेंकडों लोकांना त्या मानी कावुकानें सोडून दिलें व ते वाटेल तिकडे निघून गेले. ॥१२३॥
अतिशय क्रोधाविष्ट झालेले कांहीं लोक युद्धाभिमानानें लढत असतां बाणांनीं त्यांचीं शकलें होऊन ते स्वगर्वासी झाले. ॥१२४॥
कांहींचे पाय तुटून, कांहींचे हात तुटून, कांहींचें कवच फुटून, कांहींची छाती भिन्न होऊन, कांहींचें माकड हाड मोडून आणि काहींचीं कोंपरें फुटून ते करुणाजनक स्वर काढून भूमीवर गडबडां लोळत असतांच बेशुद्ध झालें. ॥१२५॥१२६॥
मग तो शत्रु रणांगणावर पडला असतां हत्ती, उंच घोडे, नानाप्रकारचे अलंकार चित्रविचित्र रंगांचीं वस्त्रें, कवचें, आयुधें, पालख्या कोप आणि दुसरेंहि सामान घेऊन अत्यंत आनंदित होत्साते कावुकादि उत्तम योद्धे शिवाजीस भेटण्यास पुरंदरगडावर गेले. ॥१२७॥१२८॥१२९॥
शत्रुवीरांस मारून, आपलें कार्य त्वरित आटोपून उत्तम हत्तीं, घोडे विपुल सोनें, मोत्यांचे हार व रत्नें अर्पण करून, मस्तक नम्र करून कावुक प्रभृति सैनिकांनीं शिवाजीस प्रणाम केला. ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP