मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय सतरावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला :-
मग आपल्या सैन्याचा मुख्य अफजलखान यास बोलावून अल्लीशहानें स्वतः त्यास उद्देशून समयोचित भाषण केलें :- ॥१॥
अल्लीशहा म्हणाला :-
ह्या सैनिकांच्या समुदायामध्यें तूं आमचें हित करणारा आहेस; देवब्राह्मणांचा विरोध करणारा ( द्वेष्टा ) आणि जणूं काय दुसरा कलिकालच आहेस. ॥२॥
पूर्वीं तूं मोठें सैन्य घेऊन स्वारीवव्र निघून रामराजाच्या वंशातींल राजांना युद्धांमध्यें जिंकलेस. ॥३॥
शत्रूंस ताप ( पीडा ) देणारा तुझा प्रताप जागृत असतां श्रीरंगपट्टणचा राजा सुद्धां समरांगणापासून विरक्त झाला आहे. ॥४॥
ज्याप्रमाणें गारुड्यानें अतिशय चिडलेल्या सापास वश करावें त्याप्रमाणें त्वां वीरानें पराक्रम करून एका क्षणांत कर्णपूरचा राजा ताब्यांत आणला. ॥५॥
मंदराचलाप्रमाणें सामर्थ्य असणार्‍या त्वां मदुरा शहर उध्वस्त केलें; व कांचीं हस्तगत करून सुवर्णहि लुटून आणलें. ॥६॥
पदोपदीं यश मिळणार्‍या त्वां दास बनविलेला वीरभद्र सुद्धां छत्रचामरयुक्त ऐश्वर्य विसरून गेला आहे. ॥७॥
सिंहलचा राजा, त्याचप्रमाणें लंकेचा मत्त राजा मला भितो आणि ससुद्रहि माझी सेवा करतो, हं तुझ्या पराक्रमाचेंच फळ होय. ॥८॥
हे अफजलखाना, तूं चालूं लागलास म्हणजे सातहि कुलपर्वत डळमळूं लागतात, सातहि समुद्र क्षुब्ध होतात आणि सातहि द्वीपें खचतात ! ॥९॥
तुझा पराक्रम ऐकून क्रोधाविष्ट झाल्यानें दिल्लीच्या बादशहास सुद्धा रात्रंदिवस निद्रा येत नाहीं. ॥१०॥
अशा प्रकारचा तूं अजिंक्य महावीर जागृत असतां शहाजीचा पुत्र शिवाजी माझा रात्रंदिवस द्रोह करतो हें आश्चर्य होय ! ॥११॥
अरेरे ! त्या महा उत्साही, मानी, स्वधर्माभिमानी वीराकडून सुसलमानी धर्माचा नाश होत आहे ! ॥१२॥
भयंकर अरण्य सिंहाप्रमाणें क्रमाक्रमानें आक्रमण करून हा स्वतंत्र ( वीर ) माझा अंमल मुळींच मानीत नाहीं. ॥१३॥
कपटामुळें ज्याचें चित्त चलित झालें आहे, अशा ह्या दुष्टाच्या हातीं हा सह्य पर्वत असल्यामुळें माझ्या मनाला पुष्कळ काळ असह्य झाला आहे. ॥१४॥
माझा बाप महमूदशहा यानें जर ह्याचें निवारण केलें नसतें, तर ह्यानें दंडाराजपुरीच्या राजास समुद्रांत बुडविलें असतें. ॥१५॥
पुत्र व अमात्य यांसह चंद्रराव मोरे यास जिंकून त्यानें अप्रतिबंधपणें जावली घेतली. ॥१६॥
सख्य करण्याच्या इच्छेनें मीं औरंगजेबास गड, अरण्यें व खाणी यासह जो प्रदेश दिला होता तो त्या प्रतापी, स्वतंत्र व उन्मत्त अशा ( शिवाजीनें ), मला व त्या ( मोंगलां )ना न जुमानता बलात्कारानें काबीज केला ! ॥१७॥१८॥
हा लुटारूपणा करणारा, व बंडखोर शिवाजी अचानक छापा घालून माझीं शहरें, गांवें व खेडीं लुटतो. ॥१९॥
एका अहोरात्रांत, एका पंध्रवड्यांत किंवा एका महिन्यांत करावयाची मजल हा निर्भय शिवाजी एका क्षणांतच करतो. ॥२०॥
उग्र पराक्रमाचा आणि स्वतः कपटी स्वभावाचा हा जागरूक शिवाजी लहानपणापासून यवनांचा अपमान करीत आला आहे. ॥२१॥
ह्या अत्यंत पराक्रमी शिवाजीनें मोंगलांचीं शहरें काबीज करून अहमदनगरादि शहरांना भय्म्कर शासन केलें. ॥२२॥
मोथ्या प्रयासानें घेतलेल्या निजामशहाच्या राज्याचीहि शश्वती दिल्लीच्या बादशहास सुद्धां ह्याच्या भीतीमुळें मुळींच वाटत नाहीं. ॥२३॥
पूर्वीं माझ्या आजोबानें वाढविलेला त्याचा पिता शहाजी हाहि त्या उद्धट पोराला शिक्षा करण्यास समर्थ नाहीं. ॥२४॥
माझ्या प्रतापवान पित्यानें छापा घालून कैद केलेल्या शहाजी राजास ह्या महाबाहु शिवाजीनें आपल्या बळावरच सोडविलें. ॥२५॥
हा अल्पवयी असूनहि शत्रूच्या भीतीनें घाबरून जात नाहीं; आणि आश्चर्यकारक पराक्रमी असा हा आमच्यावरहि ताण करीत आहे. ॥२६॥
रोजच्यारोज प्रताप आणि संपत्ती यांच्यायोगें हा उत्कर्ष पावत असल्यामुळें वैभवाची इच्छा करणारे राजे ह्याचा आश्रय करूं लागले आहेत. ॥२७॥
हा बलवान् शिवाजी हळुहळू पाऊल पुढें पुढें टाकीत आमचें राज्य हिसकावून घेऊन गिळंकृत करणार कीं काय ? ॥२८॥
त्याला जिंकण्यासाठीं पूर्वीं ज्या ज्या वीरांना वारंवार पाठविलें त्यांची याच्याशीं गांठ पडल्यावर ते पुनः परत आले नाहींत. ॥२९॥
शत्रुवीरांचा नाश करणार्‍या निर्भय अशा तुझ्याशिवाय त्याला जिंकणारा दुसरा कोणी मला दिसत नाहीं. ॥३०॥
म्हणून तूंच जाऊन गडांच्या आश्रयानें राहणार्‍या त्या दुर्जय शिवाजीला मूर्तिमंत ग्रहाप्रमाणें जिवंत पकडून आण. ॥३१॥
कवीन्द्र म्हणाला :-
ह्याप्रमाणें अतिशय विश्वासानें मानी अल्लीशहा त्याला बोलला असतां, अफजलखान खूष होऊन प्रस्तुत कार्यासंबंधीं बोलला. ॥३२॥
अफजलखान म्हणाला :-
विश्वासानें आणि प्रेमानें धनी जें करावयास सांगतो त्याचा कर्ता तो ( धनीच ) होय; सेवक हा केवळ निमित्तमात्र होय. ॥३३॥
शत्रूंचा नाश करण्याची जी शक्ति माझ्या ठिकाणीं जागृत आहे ती आपण आज मला कार्य सांगून उत्तेजित केलीत. ॥३४॥
भयंकर युद्ध करण्यासाठीं ह्या सेवकाला त्याच्यावर पाठविल्यानें आपण ह्याच्यावर अनुग्रह करून ह्याला आपलासा केला, असें मी समजतों. ॥३५॥
स्वामी जर सेवकांस काम सांगणार नाहीं तर त्यांच्या ठिकाणीं पराक्रम आहे कीं नाहीं हें कोणाला समजणार ? ॥३६॥
अहर्निश स्पर्धा करणार्‍या व काळाप्रमाणें दुष्ट अशा त्या शिवाजीला पक्का बांधून प्रत्यक्ष आपणासमीप आणीन. ॥३७॥
कर्णाटक प्रांतांत शिरून शेंकडों राजांना मीं जिंकलें. तो माझा जय, ह्या शिवाजीला न जिंकतां मी जगलों असतां, फुकट होय. ॥३८॥
कवीन्द्र म्हणाला :-
ह्याप्रमाणें बोलणार्‍या, आपल्या प्रचंड शक्तीचा अतिशय गर्व वाहणार्‍या आणि अंगीकृत कार्य करण्यास ताबडतोब तयार झालेल्या अफजलखानास तिकडे पाठविण्यास उत्सुक अशा आदिलशहानें त्या समयीं पुष्कळ पारितोषिकें देऊन त्याचा सत्कार केला. ॥३९॥४०॥
रत्नखचित खोगीर असलेले उंट व घोडे, तसेच अलंकारयुक्त ( साज घातलेले ) ‘ भद्र जातीचे हती, नामा प्रकारचीं कवचें ( चिलखतें ), शिरस्त्रणें, शस्त्रें, विचित्र वस्त्रें, स्वतःचीं बिरुदें, विमानांना मागें टाकणार्‍या अनेक प्रकारच्या पालख्या, चांदीसोन्याचे पलंग, पानसुपारीचे डबे, तस्तें, रत्नांचीं शिरोभूषणें, मोत्यांच्या माळा ( हार ), हिर्‍यांची बाहुभूषणें, कडीं, नाना रंगांच्या रत्नजडित आंगठ्या, तसेच दुसर्‍या देशांत होणारे त्या त्या जातीचे अनेक उत्कृष्ट पदार्थ आणि कोट्यावधि खजिना अल्लीशहापासून अफजलखानास मिळाला. ॥४१॥४२॥४३॥४४॥४५॥
वज्राच्या धारेप्रमाणें तीक्ष्ण, रत्नजडित म्यानांत ठेवलेली, हातांत असलेली आपली स्वतःची कट्यार अल्लीशहानें त्यास दिली. ॥४६॥
मग स्वामीनेंच प्रेमानें त्याच्या कमरपट्यांत अडकविलेली ती रत्नजडित म्यानांत असलेली व अलंकारांनीं युक्त अशी कट्यार त्यानें धारण केली. ॥४७॥
नंतर निघण्याच्या समयास उचित असा मुजरा त्यास प्रेमानें पुनःपुनः करून पर्वतासारखा तो अफजलखान चालूं लागला. ॥४८॥
वारंवार मुजरा करणार्‍या व चालूं लागलेल्या त्या अफजलखानावर पदोपदीं कृपादृष्टि फेंकून स्वामीनें अनुग्रह केला. ॥४९॥
त्या महत्त्वाकांक्षी ( आदिलशहानें ) त्या वीरमान्य अफजलखानास सेनापति करून दुसर्‍याहि सेनानायकांस त्याला साहाय्य करण्याविषयीं आज्ञा केली. ॥५०॥
शंबर दैत्यासारखा अंबर आणि प्रतापवान् याकुत, महामानी मुसेखान आणि हसन पठाण, रणदुल्लाखानाचा रणदुल्ला नांवाचा पुत्र आणि निरंकुश हत्तीप्रमाणें स्वैरगति अंकुशखान, खेलकर्णाचा विकत घेतलेला पुत्र ( गुलाम ) बर्बर आणि तो शत्रुरूपी वृक्षांना हत्तीप्रमाणें असलेला महाबाहु हिलाल हे आणि सैन्यानें व मित्रसमुदायानें युक्त असे दुसरे यवन ताबडतोब स्वामीच्या आज्ञेनें त्या सेनापतीच्या मागून गेले. ॥५१॥५२॥५३॥५४॥
ज्यांनीं बलानें अनेक शत्रुवीर जिंकले अहएत असे युद्धनिपुण, घोरकर्मे घोरपडेसुद्धां त्याच्या मागून गेले. पांढरे नाईक, खराटे नाईक, पुष्कळ सैनिकांचा नाईक कल्याण यादव जाधव), ज्यांचा युद्धावेश प्रचंड आहे असा मंबाजी भोसले, जगद्विख्यात पराक्रम करणारे घांटगे व कांटे हे आणि दुसरे राजे आणि हजारों सामंत चतुरंग सेनेसह त्या सेनापती मागून गेले. ॥५५॥५६॥५७॥५८॥
तेव्हां ज्योतिष्यानें सांगितलेल्या मुहूर्तावर निघालेल्या त्याला अशुभसूचक पुष्कळ दुश्चिन्हें झालीं. ॥५९॥
पंख फडफडून मोठमोठ्यानें ओरडणार्‍या व डाव्या डाव्या बाजूनें जाणार्‍या कावळ्यांनीं त्याचें साहस वृथा आहे असें सांगितलें. भर दुपारी सूर्य अस्पष्ट दिसूं लागला. अंतरिक्ष जणूं काय पेटलें, दिशा धूसर ( धुंद ) झाल्या. एक मोठी उल्का आकाशांतून एकाएकीं पडली. मेघाशिवायच आकाशांत विजेचा मोठा कडकडाट झाला. पूर्वेकडे कोल्ह्या भयंकर ओरडूं लागल्या; ध्वज मोडला, आणि वाहनें खिन्न झालीं. खडे, धूळ यांचा वर्षाव करणारा वारा उलट वाहूं लागला; सैन्याच्या अघाडीचा हत्ती अंकुशानें टोंचला असतांहि पुढें सैरावैरा पळूं लागला. ॥६०॥६१॥६२॥६३॥६४॥
ह्या व दुसर्‍या दुश्चिन्ह्यांनीं जरी त्याचें निवारण केलें तथापि नमुचीप्रमाणें त्यानें युद्धोत्साह सोडला नाहीं. ॥६५॥
मग विजापूराहून निघालेल्या त्या अफजलखाननें अर्ध्या योजनावर आपला तळ दिला. ॥६६॥
तेथें चोहोंकडून आलेल्या सेनांनीं युक्त असा तो तळ देण्याच्या बेतांत असलेला सेनासमूह समुद्राप्रमाणें भासला. ॥६७॥
उंची कापडाचे खांब उभे केलेल्या उंचीमुळें आकाश झांकून टाकणार्‍या, नव्या तंबूंनीं तें सैन्य शोभत होतें; अनेक रंगाच्या विस्तीर्ण बैठकी सभामंडपाच्या आंत पसरलेल्या होत्या; आवडीच्या पुष्कळ वस्तूंच्या रचलेल्या राशींनीं तें सुशोभित दिसत होतें; उंच उभारलेल्या छतांनीं त्यातील अंगणें छायामय व शोभिवंत दिसत होतीं; जवळच पुढील भागीं घोडे बांधलेले होते; मदोन्मत्त गजसमूहांच्या गर्जनांनीं दिशा भरून गेल्या होत्या; अहोरात्र पहारा करणारे बंदूकवाले, धनुर्धर, दुसरे ढाल तरवार धारण करणारे, अगणित परशुधारी, शक्ति [ भाला ] धारण करणारे असे लोक सभोंवतीं उभे राहून त्याच्या आठहि दिशांचे रक्षण करीत होते; पुष्कळ नगारे व प्रचंड वाद्यें यांच्या धडाक्यानें तें भयंकर भासत होतें; नाना प्रकारचीं कार्यें करण्यांत गढून गेलेल्या लोकांच्या गोंगाटानें तें व्यापून गेलें होतें; आपआपल्या योग्य ठिकाणीं राहिलेले सर्व लोक आनंदांत होते; अशा प्रकारचें तें सर्व सैन्य सेनापतीनें मोठ्या गर्वानें पाहिलें. ॥६८॥६९॥७०॥७१॥७२॥७३॥७४॥७५॥
युद्धाभिमानी, स्वामीकडून अतिशय मान मिळालेला, शौर्यतेजानें शोभणारा, भोसले राजास एकदम जिंकू इच्छिणारा, दुर्दैवानें ओढून नेलेला असा तो अफजलखान ठिकठिकाणीं सारखीं दुश्चिन्हें पाहात, अंतःकरणांत मोठें कपट ठेवून वाई प्रांतीं शीर्घ आला. ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP