शिवभारत - अध्याय आठवा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


पंडित म्हणाले :-
अहो परमानंद, शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्मला असें आपण सांगितलेंत त्याविषयीं आम्हांस शंका आहे. ॥१॥
कारण तो किल्ला निजामशहाचा आवडता, यशस्वी आणि बळकट असून जणूं काय दुसरा देवगिरी ( दौलताबाद ) म्हणून लोकांत विख्यात होता. ॥२॥३॥
कवींद्र म्हणाला :-
हे द्विजश्रेष्ठांनो, ही अमृताप्रमाणें अत्यंत मधुर आणि पवित्र अशी शहाजी राजाची कथा श्रवण करा - ॥४॥
सूर्याप्रमाणें प्रतापी असा मलिकंबर बर्बर हा अस्तंगत झाला आणि निजामशहाला दुसरा चांगला प्रधान न मिळाल्याने त्याचें राज्य कसें टिकतें याची शंका उपस्थित झाली. तसेंच दैववशात् चतुर इब्राहिम आदिलशहा दिवंगत होऊन त्याचा उन्मत्त मुलगा महंमदशहा त्याच्या गादीवर आला. इकडे शहाजहान हा दिल्लीचा बादशहा झाला आणि त्याचें सैन्य दक्षिण जिंकण्यासाठीं मोठ्या घमेंडीनें आलें. अशा वेळीं आपला पुरातन संबंध ओळखून निजामशहाचें कल्याण करण्याच्या इच्छेनें बलाढ्य शहाजी राजा विजापूर सोडून त्याच्याकडे आला. ॥५॥६॥७॥८॥
पुढें जाधवराव सुद्धा मोंगलांचें अनुयायित्व टाकून दौलताबादेस निजामशहाच्या पक्षास येऊन मिळाला. ॥९॥
( याच्या ) दरम्यान विश्वासराजाच्या कुळांतील सिद्धपालाचा मुलगा शंकरभक्त, कर्तृत्ववान, सुप्रसिद्ध व अत्यंत वैभवशाली विजयराज हा निजामशहाचा अत्यंत विश्वासू असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहात असे. त्यास आपली जयंती नांवाची मुलगी शहाजीचा पुत्र संभाजी या अनुरूप आहे असें वाटलें. ॥१०॥११॥१२॥
शहाजी राजास सुद्धां तो संबंध अत्यंत श्लाघ्य वाटून त्यानें आपल्या मुलासाठीं जयंतीची मागणी त्याजपाशी केली. ॥१३॥
पुढें विजयराजा आणि शहाजी राजा या दोघांच्या संबंधास साजेसा मोठा समारंभ झाला. ॥१४॥
विश्वासराजाच्या वंशांतील अत्यंत तेजस्वी राजांचें आणि भोंसल्याचें मोठें वर्‍हाड जमलें. ॥१५॥
जयंती आणि संभाजी ह्या प्रशंसनीय गुणांच्या जोडप्याचा लग्नसमारंभ शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या थाटानें झाला. ॥१६॥
नंतर कांहीं दिवसांनीं तो समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या संमतीनें आपल्या गरोदर पत्नीस स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला. ॥१७॥१८॥
शिवनेरी किल्यावर शहाजी राजाचें आगमन कसें झालें हें मीं सांगितलें. आणखी काय ऐकण्याची आपली इच्छा आहे ? ॥१९॥
पंडित म्हणाले :-
दिल्लीच्या बादशहास एकदम सोडून निजामशहाचा कैवारी, कर्तृत्ववान्, बलाढ्य राजा जाधवराव आला व चाल करून येणार्‍या मोंगलांशीं युद्ध करण्यास सज्ज झाला असें असतां आपलें अभीष्ट साधण्यासाठीं निजामशहानें काय केलें ? ॥२०॥२१॥
कवींद्र म्हणाला :-
दैवयोगानें विषयासक्त झालेल्या निजामशहास दुष्ट मंत्री मिळून त्याची बुद्धि फिरली. ॥२२॥
त्या उन्मत्त सुलतानास सज्जन दुर्जनासारखा वाटूं लागला व हांजी हांजी करणारा अत्यंत दुष्ट माणूस सुद्धां सज्जन वाटूं लागला. त्याच्या दृष्टीला विपरीत भासवयास लागल्यामुळें वडीलधार्‍या माणसास तो तुच्छ लेखूं लागला व पोक्त सल्लामसलतगारांच्या गुणांबद्दल त्याची आदरबुद्धि नष्ट झाली. ॥२३॥२४॥
चंचल स्वभावाच्या व दररोज दारूनें बेहोष होऊन निंद्य भाषण करणार्‍या त्या निजामशहाचें राज्य अगदी खालावत चाललें. ॥२५॥
( अशा स्थितींत ) अत्यंत तेजस्वी जाधवराव एकदां त्यास मुजरा करण्यास आला असतां त्या दुर्बुद्धि निजामशहानें त्याचा अपमान केला. ॥२६॥
निजामशहाकडून असा अपमान झाला तेव्हां त्या महामानी व बाणेदार जाधवरावास फार संताप आला. ॥२७॥
मग हमीदादि दुष्ट सेनापतींना निजामशहानें हा दुष्ट बेत अगोदरच सांगून ठेविला होता. त्यांनीं मस्त हत्तीप्रमाणें संतापानें परत फिरणार्‍या जाधवरावास सभागृहाच्या द्वारापाशींच घेरलें. ॥२८॥२९॥
आपले पुत्र, अमात्य, बांधव यांसह तेथें पुष्कळ लोकांशीं लढतां लढतां त्यानें स्वर्गलोकाची वाट धरली. ॥३०॥
जसेंमेरूचें उलथून पडणें किंवा सूर्याचें खालीं पडणें किंवा यमाचा अंत होणें किंवा वरुणाचा दाह होणें तसा जाधवरावाचा तेथें झालेला अंत सातहि लोकांस अत्यंत अहितकारक झाला. ॥३१॥३२॥
आपला सासरा जाधवराव याची झालेली ती दशा ऐकून कीर्तिशाली शहाजी राजानें निजामास साहाय्य करण्याचें सोडून दिलें. ॥३३॥
पुढें तापी नदीच्या तीराहून मोंगलाचें सैन्य त्वरेनें आलें आणि निजामशहाची राजधानी जी दौलताबाद तिला वेढा दिला. ॥३४॥
त्याच वेळीं महामानी व लोभी आदिलशहानें आपलें सैन्य जमवून दौलताबादेवर पाठविलें. ॥३५॥
दौलताबाद घेण्याच्या इच्छेनें शहाजहानाच्या व महंमूद आदिलशहाच्या सैन्यामध्यें परस्पर दररोज लढाई होऊं लागली. ॥३६॥
स्वतः निजामशहासुद्धां देवगिरीच्या माथ्यावरून त्या दोन्ही सैन्यांशीं लढूं लागला. ॥३७॥
पुढें मुख्यत्वेंकरून मोंगलांच्या अत्यंत प्रबळ सैन्याकडून आणि महंमूद आदिलशहाच्या सैन्याकडून निजामशहाचा तेव्हांच पराभव झाला. ॥३८॥
तेव्हां तो किल्ला, नानाविध सैन्य, मूर्ख मंत्री फत्तेखान, सर्व परिवार आणि विपुल खजिना यांसह तो निजामशहा मोगलांच्या सेनासमुद्रांत बुडाला. ॥३९॥४०॥
पंडित म्हणाले :-
ज्याच्या जवळ ऐशीं हजार चलाख घोडा, चौर्‍यांशी गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि स्थलदुर्ग होते, ज्याच्या ताब्यांत समृद्ध व शत्रूंस अजिंक्य असा देश होता, ज्यानें आदिलशहाच्या आणि मानी दिल्लीपतीच्या सैन्याचा पावलोपावलीं फडशा उडविला होता, चालून येणार्‍या ससाण्याच्या झडपे प्रमाणें ज्याच्या आकस्मिक छाप्याच्या जोरामुळें शत्रुरूपी पक्षी लपून बसत त्या निजामशहाचा नाश कोणत्या कारणामुळें झाला तें ऐकण्याची आमची इच्छा आहे तेव्हां तें आम्हांस सांगावें. ॥४१॥४२॥४३॥४४॥४५॥
कवींद्र म्हणाला :-
सर्वांचें पालन करणारा पिता मलिकंबर निवर्तल्यावर त्याचा मुलगा क्षुद्रबुद्धि फत्तेखान यास दैवयोगानें निजामशाहाची वजिरी मिळाली; आणि तो यमाप्रमाणें क्रूर आणि प्रतापवान् फत्तेखान जनतेला पीड देऊं लागला. ॥४६॥४७॥
त्याच्या आणि दुष्ट हमीदखानाच्या सल्यानें जेव्हां निजमशहानें जाधवरावास ठार मारविलें तेव्हांपासून शहाजीप्रभृति सर्व राजे व मुसलमान सरदार यांचीं मनें विटून गेलीं. विश्वास उडाल्यानें, संताप आल्यानें व भीतीमुळें कित्येक आदिलशहास जाऊन मिळाले, कित्येकांनीं दिल्लीच्या बादशहाचा आश्रय केला, कित्येक क्रूर मनाचे लोक विरोध करूं लागले आणि कित्येकांनीं तर आपण तटस्थ आहोंत असें दाखविलें. ॥४८॥४९॥५०॥५१॥
त्या दुष्ट निजामशहाच्या अशा प्रकारच्या अनेक दुष्कृत्यांमुळें भयंकर अवर्षण पडून लोकांच्या फार हालअपेष्टा होऊं लागल्या. ॥५२॥
पुष्कळ काळपर्यंत त्याच्या देशांत पाऊस न पडल्यानें धान्य अत्यंत महाग झालें आणि सोनें मात्र स्वस्त झालें. ॥५३॥
श्रीमंत लोक शेरभर रत्नें देऊन मोठ्या प्रयासानें शेरभर कुळीथ घेत. ॥५४॥
खाण्यास कांहीं न मिळाल्यामुळें एकच हाहाकार उडून जाऊन पशू पशूंस आणि माणसें माणसांस अशी परस्परांस खाऊ लागली. ॥५५॥
त्या भयंकर अवर्षणामुळें, परचक्र आल्यामुळें, पिढीजाद - जुन्या प्रधानांच्या आणि विपुल सैन्याच्या अभावामुळें क्षणोक्षणीं क्षीण होत जाणारा निजामशहा आणि त्याच्याबरोबरच दुष्ट फत्तेखान प्रबल मोंगलांच्या हातीं सांपडले. ॥५६॥५७॥
काळ अनुकूल असतां सर्व कांहीं अनुकूल होतें आणि ताच प्रतिकूल झाला असतां सर्व कांहीं प्रतिकूल होतें. ॥५८॥
ज्या मनुष्यास हा भगवान् सनातन काळ अनुकूल असतो त्याचीं कार्यें अनायासेंच सिद्धीस जातात. ॥५९॥
उत्पत्ति, स्थिति, वृद्धि, परिपक्वता, क्षय आणि नाश ह्या सहा अवस्था म्हणजे कालानेंच निर्मिलेले विकार होत. ॥६०॥
जय किंव अपजय, वैर, मंत्रिबल किंवा त्याचा अभाव, विद्वत्व किंवा अविद्वत्व, उदारता किंवा कृपणता, प्रवृत्ति किंवा निवृत्ति, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य, समृद्धि आणि असमृद्धि हीं काळाच्या उलटापालटीमुळें उत्पन्न होतात. ॥६१॥६२॥
जन्म, आयुष्य आणि मृत्यु ह्या तीन्ही अवस्था काळामुळेंच होतात; तसेंच यज्ञादिक क्रियाहि त्याच्यामुळेंच होतात. ॥६३॥
काळाशिवाय बीज नाहीं, काळाशिवाय अंकुर नाहीं, काळाशिवाय पुष्प नाहीं, काळाशिवाय फळ नाहीं, काळाशिवाय तींर्थ नाहीं, काळाशिवाय तप नाहीं, काळाशिवाय सिद्धि नाहीं, काळाशिवाय जय नाहीं, काळाशिवाय चंद्र, अग्नि व सूर्य हे प्रकाशत नाहींत, काळाशिवाय समुद्रास भरती - ओहटी होत नाहींत, काळाशिवाय भगीरथानें गंगेस आणलें नाहीं, नृगराजा काळ आल्यावांचून सरडेपणांतून सुटला नाहीं, काळाशिवाय रामानें रावणास मारलें नाहीं, काळाशिवाय बिभीषणास लंका प्राप्त झाली नाहीं, काळाशिवाय कृष्णानें गोवर्धन पर्वत उचलून धरला नाहीं, काळाशिवाय अर्जुनानें कर्णास मारलें नाहीं. सुखदुःखाचें कारण काळच आहे ह्मणून उत्पत्ति, स्थिती आणि लय करणार्‍या काळासच मी ईश्वर समजतों. ॥६४॥६५॥६६॥६७॥६८॥६९॥७०॥
युद्धांत मोड होऊन निजामशहाचा नाश झाला; देवगिरी प्राप्त होऊन दैत्य रूपी दिल्लीच्या बादशहास आनंद झाला आणि आपल्या सैन्याचा मोड झाल्यानें आदिलशहा खजील झाला हें सर्व काळामुळेंच झाले असें, हे पंडितांनों समजा. ॥७१॥७२॥
देवगिरीच्या प्रचंड किल्ल्यास वेढा देऊन मोंगलांनीं निजामशहास पकडलें असतां आदिलशहाच्या सैन्यानें, हतगर्व होऊन, आपला पाय तेथून काढला. ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP