शिवभारत - अध्याय नववा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला
पुढें देवगिरि प्राप्त झाल्यानें दिल्लीच्या बादशहास आनंद झाला असतां व उन्मत्त महंमूदशहास आपलें सैन्य पराभूत झाल्यानें विषाद वाटला असतां शहाजी राजानेम निजामशहाचे शिवनेरी इत्यादि अनेक गड भराभर घेतले. ॥१॥२॥
तसेंच, अत्यंत पवित्र ( पुण्यकारक ) गोदावरी, प्रवरा, क्षीर समुद्रासारखें पाणी असलेली नीरा, भयंकर भिमा, यांच्या कांठचा सर्व प्रदेश क्रमा क्रमानें पादाक्रांत करून त्यानें सह्याद्रिसुद्धां लगेच आपल्या ताब्यांत आणला. ॥३॥४॥
शहाजी दिल्लीच्या बादशहाविरुद्ध झालेला पाहून घाटगे, कांटे, गायकवाड, कं, ठोमरे, चव्हाण, मोहिते, महाडीक, खराटे, पांढरे, वाघ, घोरपडे इत्यादि महाराष्ट्रिय ( मराठे ) राजे त्यास येऊन मिळाले आणि शहाजीनें त्यांस सेनापति ( सरदार ) केलें. ॥५॥६॥७॥
पुढें शहाजीस जिंकण्याच्या हेतूनें शहाजहानानें आदिलशहा बरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छिणार्‍या त्या दोघांनीं भीमा नदी ही परस्परांच्या मुलखांमधील हद्द ठरविली. ॥८॥९॥
पंडित म्हणाले :-
साहसी आणि सिंहाप्रमाणें पराक्रमी अशा शहाजी राजानें आदिलशहा आणि शहाजहान यांच्या सैन्याबरोबर किती वर्षें युद्ध केलें ? पुढें त्या दोघांशीहि तह कसा केला ? हें आपल्यापासून ऐकण्याची, हे कवींद्रा, आमची इच्छा आहे. ॥१०॥११॥
कवीन्द्र म्हणाला :-
सूर्याप्रमाणें प्रतापी शहाजीनें शहाजहान आणि आदिलशहा यांच्या सैन्याबरोबर तीन वर्षे युद्ध केलें. ॥१२॥
मग त्याला स्वप्नांत स्वप्नपति शंकराचें दर्शन होऊन त्यांस त्यानें वंदन केलें, तेव्हां आपल्या दांतांच्या प्रभेनें त्याचे डोळे दिपवीत तो त्यास म्हणाला: - ॥१३॥
शंकर म्हणाला :-
हा महादेजस्वी दिल्लीपति पृथ्वीवर अगदीं अजिंक्य आहे; म्हणून, हे शहाण्या राजा, तूं हा लढाईचा नाद सोडून दे. या दुरात्म्यानें पूर्वीं केलेलें तप संपेपर्य्म्त याचा नाश होणार नाहीं. बाबा हे सर्व यवन असुरवंशी आहेत आणि ते देवब्राह्मणांचा पदोपदीं द्वेष करितात. ह्या यवनांचा संहार करण्यासाठीं जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान विष्णु व्हिस नांवाचा तुझा मुलगा झाला आहे. तो तुझें इष्टकार्य लवकरच घडवून आणील. म्हणून, हे महाबाहो, तूं कांहीं काळ वाट पहा. ॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥
असें त्या प्रसन्न शंकरानें म्हटल्यावर राजा प्रसन्नचित्त होत्साता पहाटे जागा झाला. ॥१९॥
तेव्हां शहाजीनें आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यापैकीं कांहीं मुलुख दिल्लीच्या बादशहास आणि कांहीं आदिलशहास दिला. ॥२०॥
शहाजी हा हट्टि स्वभावाचा असतांहि त्यानें आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणें दिल्लीचा बादशाहा आणि आदिलशहा यांच्याशीं तह केला. ॥२१॥
निजामशहाचें राज्य मिळाल्यानें परमुलखावर हल्ला करणारे तें मोंगल परत फिरले असतां, शहाण्या आदिलशहास आपण दुर्बळ आहों असें वाटूं लागलें आणि त्यानें आपल्या मनांत विचार केला कीं, ज्या सामर्थ्यवान् मोगलांनीं निजामशहास युद्धात बुडविलें ते मलाहि बहुधा बुडवितील; म्हणून ह्या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन. ॥२२॥२३॥२४॥२५॥
पूर्वी माझी बाप इब्राहिमशहा हा याच्याच सह्यानें शत्रूंचा विध्वंस करून निश्चिंत होता. पण त्याच्या मृत्यूनंतर म्या मूर्खपणानें त्याचा एकाएकीं अपमान केल्यामुळें तो मानी शहाजी मला सोडून गेला. इब्राहिमशहानें ह्या महामानी व पराक्रमी शहाजीवर मजपेक्षां अधिक प्रेम करून त्यास योग्यतेस चढविलें. ॥२६॥२७॥२८॥
असा मनांत विचार करून त्या महातेजस्वी महंमूदशहानें लागलीच शहाजीकडे आपले अमात्य पाठविले. ॥२९॥
त्या मंत्रकुशल अमात्यांनीं शहाजीचें मन वळविलें आणि त्या पराक्रमी शहाजीनेंहि आदिलशहास साह्य करण्याचें वचन दिलें. ॥३०॥
साह्यकर्त्या शहाजी राजाचा आधार मिळाल्यामुळें महंमूदशहास पदोपदीं मोठा आनंद होऊं लागला. ॥३१॥
नंतर त्या प्रतापवान् महंमूदानें, सर्व सेनेला प्रिय व रणधुरंधर असा जो फरादखानाचा पुत्र सेनापति रणदुल्लाखान त्यास पराक्रमी शहाजीस कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठविलें. ॥३२॥३३॥
तेव्हां फरादखान, याकुतखान, अंकुशखान, हुसेन अंबरखान, मसाऊदखान तसेच पवार, घाटगे, इंगळे, गाढे, घोरपडे, इत्यादि मोठमोठ्या योध्यांसह रणदुल्लाखान निघाला. ॥३४॥३५॥
त्या सेनाधिपतीबरोबर महत्त्वाकांक्षीं शहाजी राजा भोसलाहि कर्नाटकांत गेला. ॥३६॥
बिंदुपूर ( बेदनूर ) चा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा ( बैलूर ? ) राजा प्रसिद्ध केंग नाइक, कावेरीपत्तनचा राजा महाबाहू जगद्देव, श्रीरंगपट्टणचा राजा क्रूर कंठीरव, तंजावरचा राजा शूर विजयराघव, तंजीचा ( चंजी ) राजा प्रौढ वेंकटनाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमलनाईक, पिलुगंडाचा राजा उद्धट वेंगटाप्पा, विद्यानगर ( विजयानगर ) चा राजा धीट श्रीरंगराजा, हंसकूटाचा ( हास्पेट ) राजा प्रसिद्ध तम्मगौडा यांना आणि इतरहि राजांना शहाजीनें आपल्या पराक्रमानें ताब्यांत आणून सेनापति रणदुल्लाखानास संतुष्ट केलें. ॥३७॥३८॥३९॥४०॥४१॥४२॥
मग रात्रंदिवस वीरांचा संहार करणारे युद्ध करून युद्धनिपुण किंपगौंडापासून घेतलेलें अतिशय रम्य बंगळूर नांवाचें शहर रणदुल्लाखानानें शहाजीला पारितोषिक म्हणून दिलें व त्या ठिकाणीं तो विजयी राजा राहूं लागला. ॥४३॥४४॥
त्या शहरचा तट व वेशी मजबूत होत्या. चुन्याच्यायोगें पांढर्‍या शुभ्र वाड्यांच्या शिखरावरील पताका गगनाला भेदीत होत्या; तें सर्व प्रकारच्या शिल्पानें - ( कला कुसरीनें ) भरलेल्या रम्य हवेल्यांनीं व्यापून टाकलें होतें; तेथें खुराड्यांत बसलेले असंख्य पारवे घुमत असत; खिडक्यांतून उडणार्‍या मोरांच्या केकांनें ते मनोहर होतें; त्यांतील विस्तीर्ण पेठेंत विक्रीचे पदार्थ मांडलेले असत; तेथें घरोघरीं आड होते; त्या शहरांत सुंदर, विस्तीर्ण विहिरी होत्या, त्याचप्रमाणें अनेक चौक असून त्यांतील कारंज्यांमधून पाणी उडत असें; त्यांतील घरांच्या बागांतील फुललेल्या झाडांच्या छायेनें भूमि आच्छादित असे; त्यांतील वाड्यांच्या भिंतीवर काढलेल्या उत्कृष्ट चित्रांनीं लोकांचे नेत्र लुब्ध होऊन जात असत; त्यांत नाना रंगाच्या दगडांनीं बांधलेल्या तुळतुळित व सुंदर पागा होत्या; तें मोठमोठ्या वेशीच्या माथ्यावरील फरसबंदीनें सुशोभित होतें; त्याच्या बुरजांच्या माथ्यावर ठेवलेले तोफांनीं तें अत्यंत दुर्गम झालें होतें. युद्धनिपुण सेनासमूहानें तें रक्षिलेलें होतें; सभोंवती अगाध पाणी असलेल्या खंदकामुळें तें सुशोभित दिसत होतें; अपार सागराप्रमाणें विस्तीर्ण तलावानें त्याला शोभा आणली होती; त्यांत वार्‍याच्यायोगें डुलणार्‍या लतांनीं सुंदर अशीं उद्यानें होतीं; मेरुपर्वताप्रमाणें देवळांनीं तें शहर मंडित झालें होतें; अशा त्या नगरामध्यें वास करणारा इंद्रासारखा तो नृपश्रेष्ठ आपल्या परिजनांसह नानाप्रकारचा आनंद अनुभवीत असे. ॥४५॥४६॥४७॥४८॥४९॥५०॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥
कधीं मृगयेंत, तर कधीं साधुसेवेंत, कधीं शंकराच्या पूजाअर्चेंत तर कधीं काव्यचर्चेंत, कधीं नृत्यांगनांचे नाच पाहाण्याच्या आनंदांत, तर कधीं अनेक प्रकारच्या शरसंधानांत, कधीं आयुधागारांत ठेवलेल्या आयुधांची पाहाणी करण्यांत, तर कधीं आपल्या पदरीं ठेवण्यालायक अशा सर्व प्रकारच्या सैन्याची परीक्षा करण्यांत, कधीं पुष्पांनीं सुगंधित अशा नगरोद्यानांत हिंडण्य़ंत, तर कधी सुंदर स्त्रियांबरोबर शृंगाररसाचा आश्वाद घेण्यांत, तर कधीं योगशास्त्रोक्त पद्धतीनें योग मुद्रेंत याप्रमाणें तो राजा सर्व प्रकारचा उपभोग घेण्यांत आपला काळ घालवीत असे. ॥५६॥५७॥५८॥५९॥
शहाजीच्या स्त्रिया पुष्कळ असूनहि, शंभू आणि शिवाजी यांची आई जी जाधवरावाची मुलगी ( जिजाबाई ) तिनें आपल्या पतीचें हृदय काबीज केलें होतें. ॥६०॥
बलराम आणि कृष्ण यांच्यायोगें जसा वासुदेव नेहमी शोभत असे, त्याप्रमाणें शंभुजी व शिवाजी यांच्या योगें शहाजी हा शोभत असे. ॥६१॥
शंभुजीपेक्षां वयानें धाकटा पण गुणांनीं मोठा असा आपला पुत्र शिवाजी यावर शहाजी राजाचें फार प्रेम होतें. ॥६२॥
जेव्हां हा पुत्र शिवाजी जन्मला तेव्हांपासून शहाजीचें सर्व ऐश्वर्य वृद्धिंगतच होत गेलें. ॥६३॥
मंदरपर्वताप्रमाणें सुंदर, कमळांच्या कांतीला ज्यांनीं मागें सारलें आहे, ज्यांच्या गंडस्थळांतून्मदजळ गळत आहे असे पुष्कळ हत्ती त्याच्या द्वारीं उभे असत. ॥६४॥
वायूप्रमाणें वेगवान् आणि युद्धांमध्यें खंबीर असे हजारों सुंदर घोडे त्याच्या पागेमध्यें होते. ॥६५॥
त्याच्या संतोषाबरोबर त्याचा कोपहि नित्य अधिक अधिक वाढूं लागला. त्याचा प्रताप आणि दरारा हे दिवसेंदिवस अतिशय वाढत चालले. ॥६६॥
दुर्जय असे दुर्ग सुद्धां त्याला सुलभ झाले, त्याचा सदोदित विजयच होत असे; आणि स्वप्नांत सुद्धां त्याचा पराभव होत नसे. ॥६७॥
फुलें, फळें आणि धान्यें यांची अभिवृद्धि झाली, आणि साधनावांचूनच त्याचें सर्व मनोरथ सिद्धीस जाऊं लागले. ॥६८॥
याप्रमाणें विष्णुरूपी त्या पुत्राच्यायोगें भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र ( शहाजी ) हा त्या मुलास पाहून अत्यंत आनंदित होत असे. ॥६९॥
मग तो गुणवान् मुलगा सात वर्षांचा झालेला पाहून तो मुळाक्षरें शिकण्यास योग्य झाला आहे असें राजास वाटलें. ॥७०॥
प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान् आणि स्पष्टोच्चार करणार्‍या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसविलें. ॥७१॥
गुरुजी जों पहिलें अक्षर लिहिण्यास सांगतात, तोंच हा दुसरें अक्षर लिहून दाखवीत असे. ॥७२॥
सकल विद्यांचें द्वारच अशीं जीं मूळाक्षरें तीं सर्व गुरुजीनें त्याला उत्तम रीतीनें शिकविलीं. ॥७३॥
तेव्हां स्वभावतःच बुद्धिमान, सुस्वभावी, आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजबिंडाला सर्व विद्यार्थ्यांमध्यें इतक्या लवकर मुळाक्षरें शिकलेला पाहून गुरूला मोठा अभिमान वाटला आणि हा कांहीं विलक्षण मुलगा आहे अशी त्यानें खूणगांठ बांधली. ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP