TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय पंधरावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


अध्याय पंधरावा
कवींद्र म्हणाला - शत्रूंनीं मुसेखानास पुरंदर किल्ल्यावर लोळविलें; तसेंच त्याचें इतर पुष्कळ सैन्यहि पराक्रम करून मागें हटविलें आणि फत्तेखान पराभव पावून परत जवळ आला आहे, हें ऐकून महमूदशहाला रात्रंदिवस चैन पडेना. ॥१॥२॥
तेव्हां फत्तेखानाच्या पराभवामुळें अंतःकरणांत दुःखित झालेला महमूदशहा आपल्या मनांत पुढीलप्रमाणें विचार करूं लागला. ॥३॥
अहो ! रात्रंदिवस ज्यांचें आम्हीं पालन केलें ते हे क्षत्रिय मराठे अनुकूल काल येतांच आम्हां यवनांचा नाश करीत आहेत. ॥४॥
माझ्या आश्रयानें अधिक समृद्धि पावून हा उन्मत्त झालेला साहसी शाहाजी राजा माझी आज्ञा मानीनासा झाला आहे. ॥५॥
ह्या रागिटानें उघडपणें जोराचें युद्ध करून पंढरपुरापाशीं रणदुल्लाखानास जिंकिलें. ॥६॥
ह्यानें आपल्या मसलतीनें मलिकअंबरास ताब्यांत आणलें आणि ह्या उद्दामानें अर्गळच्या राजास पराभूत केलें. ॥७॥
ज्यानें पित्याप्रमाणें ह्याचें पुष्कळ काळ परिपालन केलें त्या निजामास सुद्धां ह्या कपटी शहाजीनें चांगलेंच फसीवलें. ॥८॥
कर्नाटकांतील राजांनीं माझा अंकितपणा सोडून देऊन ते ह्याच्या मसलतीमुळें, आपण त्याचे अंकित आहों, असें जाहीर करीत आहेत. ॥९॥
वारंवार बोलाविलें असतांहि हा सन्निध आला नाहीं; व ह्यानेंच आमचा जय संशयगर्तेंत पाडला आहे. ॥१०॥
ह्यानें पूर्वीं इब्राहिमशहास पदोपदीं उपकृत केल्यामुळें त्यानें सुद्धा संतुष्ट होऊन ह्या शहाजीस अत्युच्च पदवर स्थापिलें. ॥११॥
ह्याच कारणस्तव फार मार्ग सोडून वागणार्‍या ह्या शहाजीचे शेंकडों अपराध मीं रोजच्या रोज पोटांतच घातले. ॥१२॥
पण अक्षम्य असे मोठे अपराध जेव्हां ह्याचे माझ्या नजरेस आले तेव्हां त्यास पकडण्यासाठीं मीं मुस्तुफाखानास हुकूम केला. ॥१३॥
नंतर ह्याला कैद केला असतां ह्याचे संभाजी व शहाजी हे दोघे मुलगे उद्दाम होऊन मला बुडविण्याच्या इच्छेनें युद्ध करीत आहेत. ॥१४॥
आपल्या पित्यासाठीं संभाजीनें तिकडे फरादखानाचा पराभव केला आणि इकडे शिवाजीनें युद्धामध्यें फतेखानासहि पळवून लाविलें. ॥१५॥
त्या विजयी संभाजीनें तिकडे फरादाचा मोड केला नाहीं तर माझेंच मन आज ह्यानें भग्न केलें आहे. केवढें मोठें त्याचें सामर्थ्य हें ! ॥१६॥
ज्या शिवाजीच्या हातांत आज सिंहगड व पुरंदरगड हे आहेत तो मज शत्रूबरोबर ताठा कां बरें धरणार नाहीं ? ॥१७॥
जेथें हें भयंकर युद्ध झालें तो भयंकर मोठा पर्वत पुरंदरगड आम्हास हस्तगत करण्यास अतिशय कठिण आहे. ॥१८॥
ह्या शहाजीनें संभाजीस बंगळुरास ठेविलें आहे; व शिवाजीस पुरंदरगडावर ठेविलें आहे. ( तेव्हां ) हा कसचा आमच्या हातून पराभव पावतो ! ॥१९॥
जर मी ह्या संभाजी व शिवाजी ह्यांच्या बापास सोडून न दिलें तर मला माझ्या ह्या समृद्ध संपत्तीवर तिलांजलि सोडावी लागेल ! ॥२०॥
कात टाकलेल्या सापाप्रमाणें ह्या शहाजीला जर मीं सोडून द्यावें तर हा अपकारक, मलाच अपकार कशावरून करणार नाहीं ? ॥२१॥
ह्याला सोडून द्यावें ही एक व सोडून देऊं नये ही दुसरी, अशा ह्या दोन्ही मसलतींपैकीं, पहिली माझ्या हिताची आहे. ॥२२॥
अपकारशील अशा ह्या शापाचा क्रोध माझ्या युक्तिप्रभावानें पूर्ण निष्फळ होईल. ॥२३॥
मी ह्याच्या डोक्यावर ( त्याला सोडून देण्याचा ) हा उपकार करून ठेवीन म्हणजे हा कुलीन व गुणाग्रणी शहाजी तो ( उपकार ) विसरणार नाही. ॥२४॥
मनामध्यें असा पुष्कळ वेळ विचार करून चतुर अदिलशहानें ( आपल्या ) बुद्धिमान् मंत्र्यांना ही मसलत सांगितली व त्यांना सुद्धां ती एकदम पतली. ॥२५॥
नंतर, मंगल स्नान करून, निर्मळ वस्त्रें व भूषणें धारण केलेल्या, जणूं काय खळ्यांतून सुटलेल्या नवीन सूर्याप्रमाणें दिसणार्‍या, त्या शहाजीस संनिध आणवून, त्याच्या मानास शोभेशा जागीं बसवून व त्याचें सांत्वन करून महमूदशहा आनंदानें त्यास म्हणाला : - ॥२६॥२७॥
महमूदशहा म्हणतो - माझ्या अजाणत्याच्या हातून जें कांहीं झालें तें जाणून बुजून नव्हे असें समज. हे राजा, तुझ्या सारख्या जाणत्यास या जगांत दुर्ज्ञेय असें कांहीं नाहीं. ॥२८॥
मुस्तुफाखानानें किंवा अफजलखानानें अत्यंत द्वेषानें जो काय लहान सहान अपराध केला असेल तो, हे राजश्रेष्ठा ! माझाच समज. ॥२९॥
तुला पाहूं इच्छिणार्‍या मीं, ज्या तुझ्यासाठीं पुष्कळ यत्न केले तो अत्यानंद मला झाला आहे; तुला झाला असो वा नसो. ॥३०॥
तुला मृदवाक्यें बोललों आहे; तुझी कैदेंतून सुटका केली आहे, हे राजा, तूं कुलीन आहेस. तेव्हां माझें प्रिय करण्यास तत्पर रहा. ॥३१॥
थोर लोक अगदीं लहानशा उपकारानेंहि संतुष्ट होऊन शेंकडों अपकार विसरून जातात; व लहानशा अपकारानेंहि खवळून जाऊन क्षुद्र मनाचे लोक हजारों उपकार विसरून जातात. ॥३२॥३३॥
दुर्जन हजारों उपकार करो, तरी पण सज्जन हजारों उपकार त्याच्यावर करतोच करतो. ॥३४॥
जे लोक दुसर्‍यानें केलेले उपकार स्मरतात व आपण केलेले उपकार विसरून जातात, तेच लोक सज्जनाचे मतें स्मरणशील व कृतज्ञ होत. ॥३५॥
जो राजा, उपकारतत्पर असलेल्या लोकांवर उपकार करीत नाहीं त्याची विपुल संपत्ति हि स्वप्नांत प्राप्त झालेल्या अमृताप्रमाणें होय. ॥३६॥
हे महाराजा, गर्वाचा पर्वत अशा तुझ्या धाकट्या पुत्रास उपदेश कर आणि तो माझा सिंहगड मला दे. ॥३७॥
सिंहगड घेण्याचा माझा निश्चय मला मुळींच सोडीत नाहीं. मात्र, माझ्या आज्ञेनें पुरंदर शिवाजीस असूं दे. ॥३८॥
त्याचप्रमाणें ज्या संभाजीकडून मोड होऊन फरादखानानें पलायन केलें त्यानें सुद्धां बंगळूर शहर मला नजराणा म्हणून द्यावें. ॥३९॥
श्रेष्ठ लोक सेवकांना क्षणोक्षणींच्या कार्यासाठींच नेमीत असतात. त्यांनीं जर तें केलें नाहीं तर ( सेवकांच्या ) शीलरक्षणाचा हेतु काय ? ॥४०॥
आपल्या कामासाठींच धनी ( सेवकाची ) नेमणूक करतो व आपल्या कामासाठींच ( सेवकहि ) त्याची सेवा करतो. त्या दोघांपैकीं एकानें जरी कर्तव्य केलें नाहीं तर दोघांचेंहि काम होत नाहीं. ॥४१॥
तृप्तीशिवाय पिण्यांत मजा नाहीं व प्राणावांचून शरीरास शोभा नाहीं; त्याचप्रमाणें, हे महाराजा, ( आपल्या धन्यास ) अनुसरल्याशिवाय सेवक शोभत नाहीं. ॥४२॥
फार काय सांगूं ! आतां मी तुझा आणि तूं माझा आहेस; आपलें परस्परावलंबन, हाच ह्या लोकांचा आधार होय. ॥४३॥
ह्याप्रमाणें थोडक्या शब्दांत पुष्कळ अर्थ भरलेले भाषण, अदिलशहानें शहाजी राजास उद्देशून केलें. ॥४४॥
विसंगत भाषण करणारा महमूदशहा जेव्हां हें व्यक्त करीत होता तेव्हां त्याचें उत्तर शहाजी आपल्या अर्धवट स्मितानें देत असे. ॥४५॥
मदोन्मत्त महमूदशहास ती गडांची जोडी देणें म्हणजे आपल्या पायांत वेडीच अडकवून घेणें होय, असें तेव्हां त्या महाबुद्धिवान् शहाजीस वाटलें. ॥४६॥
नंतर ( कैंदेतून ) सुटका झालेल्या व यथायोग्य सत्कार झालेल्या त्या शहाजीच्या वाड्याच्या दारांत अदिलशहानें हत्ती घोडे बांधविले. ॥४७॥
तेव्हां ज्याप्रमाणें मेघसमूहाच्या पटलापासून जगदाल्हादकारक चंद्राची मुक्तता व्हावी त्याप्रमाणें जगास आनंद देणार्‍या शहाजीची मोठ्या संकटांतून सुटका झाली. ॥४८॥
कैंदेंतून सुटका झालेला तो सर्व लोकांचा बंधु शहाजी, ग्रहणांतून सुटलेला ( लोकबन्धु ) सूर्याप्रमाणें अतिशय शोभूं लागला. ॥४९॥
तो सुटतांक्षणींच त्यानें मोठें सैन्य जमा केलें. आणि त्याच्या उत्कृष्ट तेजानें सर्व पृथ्वी देदीप्यमान् झाली. ॥५०॥
मग बापाच्या अनुलंघनीय अशा आज्ञेनें महाबाहु संभाजीनें बेंगळूर शहर लगेच सोडून दिलें. ॥५१॥
युद्ध करण्यास समर्थ असूनहि शिवाजीनें सर्वथा देण्यास अयोग्य असा सिंहगड बापाप्रीत्यर्थ देऊन टाकला. ॥५२॥
नंतर आपलासा मानून ( सु ) शब्दांनीं गौरव करून; पदोपदी दिलेल्या नजराण्यांनीं संतुष्ट करून आदिलशहानें पाठविलेला शहाजी मोठें सैन्य जमवून शत्रूंस जिंकण्यासाठीं निघाला. ॥५३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-13T02:27:24.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

postscript

  • पु. (a note or series of notes appended to a completed composition, -as, a letter, article or book) पश्चलेख 
  • पु. ताजा कलम 
  • पु. पश्चलेख 
  • पु. ताजा कलम 
RANDOM WORD

Did you know?

भावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site