मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २१२ ते २१५

गोविंदकृत पदें २१२ ते २१५

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २१२ वें.

प्राणसख्या प्रियकरा ! ।
पद्मोद्भवजनका पद्माक्षीरमणा पद्माकरा ! ॥ध्रुवपद.॥
निजजनभयनाशना ! ।
निशिदिनिं मनिं योगी तुज ध्याती दानवकुलशासना ! ।
हे यादवकूलभूषणा ! ।
विधि हर सुर किन्नर नर स्तविती दे पद विश्वेशना ॥
चाल ॥ गुणज्ञा प्रीतिवर्धना ! ।
पौलस्त्यकुलमर्दना ! ।
उचलुनि नगगोवर्धना ॥
उठावा ॥  ब्रजवासी त्वां भक्त रक्षिले वापा मुरलीधरा ! ॥प्राण०॥१॥
कजायतलोचना ! ।
कर्मसाक्षी मधुकैटभदमना हे कलिमलमोचना ! ।
ऐकावी मम सूचना ।
काळमुखी सांपडलों बापा ! मज कांही सुचेना ।
चाल ॥ धनुर्यागि धनुभंजना ! ।
राधामानसरंजना !
निजसुख देसी निजजना ।
उठाव ॥ योगीजनविश्रामा आतां मम भवभ्रम दूर करा ॥प्राण०॥२॥
हे विश्चोद्धारका ! ।
विश्वेशा विश्वांतरसाक्षा विधिमनभयहारका ! ।
मज न गणीं तूं पारका ।
सर्वस्वीं हा देह अर्पिला यावरी मज घोर कां ? ।
चाल ॥ हे गोपीजनवल्लभा ! ।
चिद्नगनीं करावी प्रभा ।
तूं वैकुंठपुरिच्या शुभा ।
उठाव ॥ इंद्रादिक सुर स्तविति तुजला हे त्रिसुवनसुंदरा ॥प्राण०॥३॥
धांवा श्रीगुरु नरहरी ! ।
ब्रम्हाकटाहातें विदारुनि येईं सख्या ! लौकरी ।
बा ! मी बुडतों लवकरी ।
घाबरलों, मज न सुचे कांहीं, सत्वर हातीं घरी; ।
चाल ॥ गोकुलपति गोपीवरा ! ।
काऊर करावी त्वरा ।
हे मनोवृत्तिपदिवरा ।
उठाव ॥ गोविंद प्रभुनाथ नृसिंहा भवगज तुम्हि आवरा ॥प्राण०॥४॥

पद २१३ वें.

सांवळिया राधारमणा ! । कां नये दीनाची करुणा ? ॥ध्रुवपद.॥
पावन ब्रिद पायीं असतां । कां त्यजिलें अनाथनाथा ? ।
ये सत्वर धांव समर्था । सोयरिया रुक्मिणीकांता ! ।
पतितोद्धारा फणिशयना ! ॥ कां नये० ॥१॥
दुर्धरभवसरिताजीवनीं । बुड्तों काढीं करीं धरुनी ।
गुणदोषक्षमा मे करुनी । मज तारीं नामस्मरणीं ।
उन्मद भवगजमददमना ! ॥ कां नये० ॥२॥
तळमळ बहु वाटे मजला । अभिमान कसा त्वां त्यजिला ।
मम दुष्कृत पाहुनि थिजला । यास्तव  विट आला तुजला ।
योगिजनमानसहरणा ! ॥ कां नये० ॥३॥
नैराश्य होतां माझी  अपकीर्ति होईल तुझी ।
यावरि कां तुझी मर्जी । ऐकें दासाची अर्जी ।
न करीं आळस अघशमना ! ॥कां नये०॥४॥
गुरुनाथ नरोत्तमराया । अनिवार तुझी हे माया ।
सांभाळी हिला यदुराया ! । आवडी दे तव गुण गाया ।
गोविंद विनीत धरि चरणा ॥कां नये०॥५॥

पद २१४ वें.

हे ब्रजपति नंद्कुमारे सकुमारे कृष्णाबाई ! ॥ध्रुवपद.॥
तुजविण विकळ जिव होतो क्षणलवपल स्थिर न राहे ।
तळमळ बहु वाटे मजला गति कोण करूं मी माये ! ।
विश्रांति नसे तुजपरती आयुष्य वृथा सरताहे ॥
चाल ॥ हे यदुपति ! ये लवलाहें ।
अति मृदु मज दाखवी पाये ।
आलिंगन दे चहुं बाहे ॥हे व्रज०॥१॥
सर्वस्वीं शरण तुज आल्या परता कधिं केला नाहीं ।
पुरवोनि प्रीति तयाची कवटाळुनि धरिले हृदयीं ।
कनवाळुपणाची थोरी कां केली माझे आई ! ॥
चाल ॥ गुणसरिते ! सत्वर येई ।
साष्टांग नमन तव पायीं ।
सप्रेमें चुंबन देईं ॥हे व्रज०॥२॥
तान्हें टाकुनि दूर माता लपली त्या कांहीं कळेना ।
मग काय गति हो ! झाली त्याची मज आकळेना ।
लडिवाळ करावा आधी त्यागितां तोचि टळेना ॥
चाल ॥ प्रीति जडली हे वितळेना ।
पाहतां तुज तुही वळेना ।
हा देह कदापि जळेना ॥हे व्रज०॥३॥
न करिं मज पायापरता गुरुनाथ नरोत्तमराया ! ।
दुस्तर भ्रमरूपी कृष्णा ! अनिवार तुझी ही माया ।
अपराधी मी बहु दात्या  दु:खार्णवी बुडली काया ।
चाल ॥ गोविंद प्रभु सुखसदया ! ।
करिं सर्व सुखाची छाया ।
सांभाळीं मला यदुराया ! ॥हे व्रज०॥४॥

पद २१५ वें.

सज्जन विश्रांता आतां येईं समर्था ! ।
प्राणसख्या रुक्मिणीकांता ! ॥ध्रुवपद.॥
त्रिभुवनीं तुजपरता थोर कदापि दिसेना ।
मज आश्रय आन असेना ।
ध्यानासि आणितां प्रभुजी ! तूं गवसेना ।
हा द्दढ निस्वयही वसेना ।
सायास कठिण योगाचा मनीं बसेना ।
हे वृत्ति तयांत घसेना ॥
चाल ॥ भेटीची फार अपेक्षा ।
तुज न कळे अंतरसाक्षा ।
विश्वांतरचित्तपरीक्षा ॥
टीप ॥ हे दीननाथ ब्रिद पायी तुझ्या गुणवंता ! ॥प्राण०॥१॥
थोरीवपणांची चाड तुम्हांला नाहीं ।
मज कळलें कृष्णाबाई ! ।
अद्यापि पहासी काय नवल ये समयी ? ।
मी बुडतों कीं भवडोहीं ।
पाहिला करून संसार नसे सुख कांही ।
दुष्कृत बहु जडलें हृदयी ॥
चाल ॥ तुटली हे भुक्रुतदोरी ।
जन्मांतर पडलें भारी ।
पापाच्या झाल्या हारी ॥
टीप । खुंटला यत्न मी काय करूं भगवंता ! ॥प्राण०॥२॥
नामाग्निनें जळताति दुष्कृत बा रे ! ।
आधार मला कळला रे ! ।
प्रल्हाद ध्रुव उ पमन्युला वळला रे ! ।
नामें वाल्मिक तरला रे ! ।
हा अजामिळ पुत्रमिषें उद्धरला रे ! ।
तें प्रेम जिवीं धरला रे ॥
चाल ॥ तुज गोड प्रीतिच्या गोष्टी ।
त्या म्यांही धरिल्या पोटी ॥
आशा करि मज बहु कष्टी ॥
टीपा ॥ नैराश्य करुनी मन माझें तारीं दीनार्ता ॥प्राण०॥३॥
पुंडलीकवरदा देवा मनोभिरामा ।
योगीजनमनविश्रामा ! ।
गुरुनाथ नृसिंहा तारीं आत्मारामा ! ।
चिद्वैभवसुखदा आम्हां ।
गोविंदा निजपदी गति दे चित्तविरामा ।
देशिकरापा सुखधामा ॥
चाल ॥ कनवाळू बहु दासाचा ।
हा निश्चळ कळला साचा ।
आतां संशय काय कशाचा ? ॥
टीप ॥ पूर्वापार हा आधार समजला आतां ॥प्राण०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP