मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १६१ ते १६५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६१.
इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥
मदोन्मत्त हस्ती देखोनियां हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥
सांवरोनी हातें केंसा देत गांठ । खोंवितसे नीत वैजयंती ॥३॥
खंब ठोकोनियां राहे पुढें उभा । सांवळी सुप्रभा अंगकांती ॥४॥
पाहोनियां शूक झाला समाधिस्थ । ऋषिमुनी समस्त वेडावले ॥५॥
दुष्ट पाही हत्ती घाली आंगावरी । क्षणार्धेंचि मारी गजालागीं ॥६॥
उपडोनियां दातं घेतसे श्रीधर । जाहला उद्धार कुवलयाचा ॥७॥
नामा म्हणे पुढें चालिला गोविंद । सावध सावध परिक्षिती ॥८॥

१६२.
चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥
इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठीं ॥२॥
अतुर्बळी तेव्हां दिसे नारायण । जळताती मनें वैरियांचीं ॥३॥
कंसाचे अंगणीं उभा असे देव । जैसा ज्याचा भाव तैसा भासे ॥४॥
कृष्णातें देखोनी वल्गना करिती । चोळिताती माती दंडालागीं ॥५॥
बळिभद्रासी खूण दावियेली तेव्हां । उशीर न लावा मारायासी ॥६॥
नामा म्हणे एक उरला असे कंस । वधती सकळांस दोघेजण ॥७॥

१६३.
रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे ॥१॥
त्वरें जाऊनियां धरीयेला केशीं । पाडियेला भूमिसी दुष्टबुद्धी ॥२॥
वज्रपाय मुष्टी वोपी नारायण । सांडि-येला प्राण कंसें तेव्हां ॥३॥
देव वर्षताती सुमनाचे भार । भक्त जयजयकार गर्जताती ॥४॥
गार्‍हाणीं सांगती ऋषिमुनी सर्व । याताती गंधर्व सप्तस्वरें ॥५॥
नामा म्हणे पुढें अप्सरा नाचती । वर्णिताती कीर्ति कृष्णजीची ॥६॥

१६४.
राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें ॥१॥
देवकीच्या स्तनीं फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥
वासुदेवें केलें त्याचें समाधान । गायी दिल्या दान ब्राह्मणांसी ॥३॥
समस्तांचि क्रिया करी उग्रसेन । झा-लासे दिवाण देव त्याचा ॥४॥
पळोनियां गेले होते जे यादव । आणियेले सर्व रामकृष्णें ॥५॥
आनंद न माये सकळ लोकांला । मथुरेत राहिला नामा ह्मणे ॥६॥

१६५.
नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी ॥१॥
अहर्निशीं माझें करावें चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥
ऐसें ऐकोनियां निराश वचन । जाईल माझा प्राण तुजविण ॥३॥
गडी ह्मणती देवा आह्मांसी टाकिलें । काय आमुचें सरलें पुण्य देवा ॥४॥
कोणासवें आह्मीं खेळूं यमुनेंत । र-क्षील आम्हांतें कोण आतां ॥५॥
ब्रह्मादिक तुझ्या वंदिताती पायां । दिल्या आम्ही शिव्या क्षमा करीं ॥६॥
यशोदेसी सांगा माझा नम-स्कार । देईन सत्वर भेटी सर्वां ॥७॥
कंठ सद्नदीत नेत्रीं अश्रुपात । निघती समस्त नामा ह्मणे ॥८॥


N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP