मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग ४६ ते ५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥
तूंची माझ प्राण तूं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥
गणगोत भाऊ तूंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥
तूंचि माझा धनी तूंची माझें जीवन । चुंबीत वदन वेळोवेळां ॥४॥
नामा म्हणे भार घाली मांदीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥५॥

४७.
कंसें पाठविला आला तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापि-येलें ॥१॥
दुष्टबुद्धि तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठीं देवें ॥२॥
यशोदा पाहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवून शोक करी ॥३॥
गौळणींचा मेळा मिळाला समस्त । कोणी कृष्णनाथ नेला सयें ॥४॥
न लगे घरदार बुडाला संसार । दावा गे श्रीधर तान्हें माझें ॥५॥
ठावें असतें ऐसें बांधित्यें पोटासीं । कोठेम गुंतलासी बाळा माझ्या ॥६॥
धांवा गे धांवण्या पाहा गे लेंकरूं । शोक अनिवारू करीतसे ॥७॥
शिणल्या भागल्या येतों तुह्यां घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा ॥८॥
सांडूं पाहे प्राण यशोदा सुंदरी । हंबरडा मारी वत्सालागीं ॥९॥
चेपोनी नरडें गतप्राण केला । भूमीसीं पाडिला दैत्य तेव्हां ॥१०॥
नामा ह्मणे वरी खेळत गोविंद । पाहोनी आनंद सकळांसी ॥११॥

४८.
आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं ॥१॥
नंदें गर्गातें देखिलें । पूजा स्तवनीं तोषविलें ॥२॥
भूतभविष्यवर्तमान । तुह्मां कळती हो संपूर्ण ॥३॥
पाहा सामुद्रिक लक्षण । याचें कांहीं सांगा चिन्ह ॥४॥
बोले तेव्हां तो नंदाशीं । झणीं कळेल कंसासी ॥५॥
रोहिणीनंदादि वैसती । ऐकावया जातक चित्तीं ॥६॥
घालू-नियां मंगलस्नान । आरंभीं पुण्याहवाचन ॥७॥
ऐसी वदे शुकवाणी । नामा ह्मणे ऐका कानीं ॥८॥

४९.
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥
राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥
द्वादश गांव अग्नि करील प्राशन । वांचतील प्राण सकळांचे ॥३॥
चोरोनियां गाइ नेईल सौंगडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥४॥
उचलील हा पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रें ॥५॥
समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्भुत करील हा ॥६॥
सोळा सहस्र शत अष्ट नायिका । करील बाईका तुझा कृष्ण ॥७॥
त्रैलोक्यांत हाची उदाराचा राणा । देईल ब्राह्मण हेमपुरी ॥८॥
सांगुनिया ऐसें आशीर्वाद देऊनि । नामा म्हणे. मुनि जाता झाला ॥९॥

५०.
परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥
दुडदुडा पळती मुखीं लावी माती । शेणांत लोळती दोघे-जण ॥२॥
नंदाच्या पुढील ओढीताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥३॥
कटीं कडदोरा वांकी घुंघुरवाळा । पिंपळपान भाळा शोभतसे ॥४॥
देवातें झोंकिती वर्जिल्या रडती । घडोघडीं येती बिदीमाजीं ॥५॥
वत्साचिये पुच्छें बळें ओढिताती । सोडी न सो-डिती दोघेजण ॥६॥
विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पाहावया ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP