मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग ८१ ते ८५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


८१.
एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र ॥१॥
तेव्हां गोप आले विनविती गोपाळा । आतां जाऊं चला चोरीलागीं ॥२॥
कोठें काय असे तें आम्हां ठाउकें । जाऊं एकमेकें मिळोनियां ॥३॥
तुझिये संगती वाढतो आनंद । दाविसी विनोद ब्रह्मांदिका ॥४॥
नामा ह्मणे ऐसें गोपाळ बोलिले । ऐको-नियां झालें देवा गोड ॥५॥

८२.
देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-नियां ॥१॥
तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥
घ्यारे आतां वरी मृत्तिका गाळुनी । सराटे वेंचुनी वोंटीं भरा ॥३॥
डांगा एक आणा वेंचुनीयां खडे । निघावें रोकडे एकसरा ॥४॥
नामा ह्मणे ऐसें ऐकतां गोपाळ । नाचती सकळ कृष्णापुढें ॥५॥

८३.
मेघ: शाम वर्ण झालासी सगुण । कार्य आणि कारण तुज नमों ॥१॥
गुंजाहार गळां मयुरपुच्छे वेंटी । कृपाळु जगजेठी तुज नमों ॥२॥
वनपुष्पमाळा अपाद शोभती । लक्षुमीच्या पति तुज नमों ॥३॥
वेणू वाजविसी गायी त्या चारीसी । न कळे कोणासी तुझी लीला ॥४॥
हातीं तुझ्या कवळ शोभे पीतांबर । चरण सुंदर तुज नमों ॥५॥
घेवोनी अवतार दुष्टांसी मारिसी । भक्तांसी रक्षिसी निरंतर ॥६॥
रावण कुंभकर्ण मारीसी आत्मारामा । सोड विलें आह्मां बंदीहुनी ॥७॥
तुझें मी बालक वेडें अविचारी । नामा ह्मणे करीं कृपा आतां ॥८॥

८४.
भवसिंधु तराया एकचि उपाय । ध्यावे तुझे पाय वासुदेवा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥२॥
नारायण नारायण करी जो पारायण । तो उद्धरे जाण इहलोकीं ॥३॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवा उद्धरणा नाम स्मरा ॥४॥
अहर्निशी कीर्ति गाती भाविक भोळे । त्यांनीं तुज जिंकिलें ब्रह्मा म्हणे ॥५॥
नामा ह्मणे ऐसें दाविलें सुगम । नलगे तुह्मा नेम नाना कोटी ॥६॥

८५.
कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी ॥१॥
कार्य आणि कारण लटका हा शीण । वर्म न कळोन वांयां गेलें ॥२॥
नामा ह्मणे माझी खेचर माउली । कृपेनें दाविली वाट मज ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP