मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १२६ ते १३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१२६.
कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिलें नारदानें ॥१॥
व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥
विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्याप वदत कृपाळुवा ॥३॥
कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासीं याल बेगीं ॥४॥
मोडितसे वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥
नामा म्हणे तेव्हां करिताती स्तुती । पापें दग्ध होती ऐकतांची ॥६॥

१२७.
जोडोनियां हात येतों काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागीं ॥१॥
अवतार घेसी दुष्ट वधायासी । येती गोकुळासी म्हणोनियां ॥२॥
पाहोनियां तुला लक्षुमी पातली । दरिद्रें पळाली येथोनियां ॥३॥
सकळांसी सुख द्यावया आलासी । आम्हीं वनवासी दु:खी होतों ॥४॥
नामा म्हणे कंठीं धरियेला प्राण । दाखवीं चरण दयानिधी ॥५॥

१२८.
सरोवरीं कमळें तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती ॥१॥
कृपाळुवा ऐकें अगा ह्लषिकेशी । आह्मी तुझ्या दासी मोलविण ॥२॥
कामरूपदैत्य मारितो आह्मांसी । भक्तांसी रक्षिसी कीर्ति जगीं ॥३॥
दीनासी रक्षिसी दुष्टांसी मारिसी । धर्माला स्थापिसी निरंतर ॥४॥
घेवोनियां शस्त्र मारावें सकळां । आलासे कंटाळा नामा ह्मणे ॥५॥

१२९.
सुकुभार सांवळे जैसीं रातोत्पळें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥१॥
दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥२॥
दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥३॥
रांगतं अंगणीं विमलार्जुन मोडिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥४॥
अघासुरा ह्लदयीं उभे जी राहिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥५॥
नाम ह्मणे ज्यांतें वरुणानें पूजिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥६॥

१३०.
सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥
नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥
तेहेतीस कोटी देव ब्रह्मा सदाशीव । प्रार्थिताती सर्व तुजलागीं ॥३॥
यादवकुळटिळका वैकुंठनायका । विधीच्या जनका भेट आतां ॥४॥
नामा म्हणे मुख दावीं कृष्णनाथा । हरेल ही व्यथा वियोगाची ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP